हमीरपूर : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर व याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या ३८,०३५ (२०११). ते यमुना व बेटवा या नद्यांदरम्यान, त्यांच्या संगमापासून पश्चिमेस ९ किमी. व कानपूर शहराच्या दक्षिणेस ६० किमी.वर वसले आहे. कानपूर-महोबा महामार्गावर वसलेले हे एक ऐतिहासिक शहर असून यास धार्मिक महत्त्व आहे. हमीरपूर जिल्ह्यात पाषाणयुगीन दगडी हत्यारांचे अवशेष सापडले आहेत. अकराव्या शतकात अलवरवरून आलेल्या हमीर देव या कलचुरी राजपूत राजाने या शहराची स्थापना केली व त्यावरून या शहराचे नाव हमीरपूर असे पडल्याचे परंपरेने सांगितले जाते. मध्ययुगीन काळात काही काळ खंगार राजपूत आणि बुंदेलांनी या प्रदेशावर राज्य केले. अकबर बादशाहाच्या काळात हे ठिकाण हमीरपूर महालाचे किंवा परगण्याचे मुख्यालय होते. औरंगजेबाच्या कारकीर्दीत बुंदेलांचा प्रमुख राजा छत्रसालाने १६७१ मध्ये औरंगजेबाशी लढून धसान नदीच्या पूर्वेकडील भागावर आपले राज्य प्रस्थापित केले. त्यात या प्रदेशाचाही समावेश होता. १८२१ मध्ये हे काल्पी जिल्ह्याचे मुख्यालय होते. १८२३ मध्ये जिल्ह्याचे नाव हमीरपूर होऊन मुख्यालय तेच ठेवण्यात आले.

हमीरपूर हे महत्त्वाचे कृषी व्यापाराचे केंद्र आहे. कडधान्याच्या उत्पादनासाठी याचा परिसर प्रसिद्ध असून गहू, तांदूळ, बार्ली, कापूस यांची ही बाजारपेठ आहे. शेती उत्पादनांवर आधारित उद्योगांचा येथे विकास झाला आहे. इस्लामिया इंटर कॉलेज, गव्हर्नमेंट इंटर कॉलेज, विद्यामंदिर इंटर कॉलेज या शैक्षणिक संस्थांमार्फत येथे पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. सिंह महेश्वरी मंदिर आणि बांकेबिहारी मंदिर ही येथील प्रसिद्ध धार्मिक ठिकाणे आहेत. महाभारता त वर्णन असलेला फार प्राचीन वटवृक्ष येथे दाखविला जातो. त्यास कल्पवृक्ष असे संबोधले जाते. अकराव्या शतकातील हमीरच्या किल्ल्याचे अवशेष व काही मध्ययुगीन थडगी येथे आढळतात. संगमेश्वर हे शहराजवळील एक पर्यटकांचे आकर्षण स्थळ असून येथील यमुना आणि बेटवा नद्यांचा संगम नयनरम्य आहे.

चौधरी, शंकर रामदास