हक्सली, अँड्र्यू फील्डिंग : (२२ नोव्हेंबर १९१७-३० मे २०१२). इंग्रज शरीरक्रियावैज्ञानिक. त्यांचे संशोधनकार्य तंत्रिका तंतू व स्नायू तंतू यांवर केंद्रित झालेले होते. त्यांनी विशेषतः तंत्रिका आवेग प्रेषणात घडणाऱ्या रासायनिक आविष्कारांशी संबंधित संशोधन केले. या संशोधनकाऱ्याबद्दल त्यांना १९६३ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक ⇨ ॲलन लॉइड हॉजकिन आणि ⇨ सर जॉन (कॅर्यू) एक्लिस यांच्यासमवेत विभागून मिळाले.
हक्सली यांचा जन्म हॅम्पस्टेड (लंडन) येथे झाला. त्यांचे शिक्षण इंग्लंड युनिव्हर्सिटी कॉलेज, वेस्टमिन्स्टर स्कूल आणि ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज) येथे झाले. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून एम्.ए. ही पदवी मिळविली. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात हवाई दल व नौदलामध्ये कारवाईविषयक संशोधन केले (१९४०-४५). ते केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये शरीरक्रियाविज्ञान या विद्याशाखेत जीवभौतिकी विषयाचे डायरेक्टर ऑफ स्टडीज होते (१९५२-६०). ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे शरीरक्रियाविज्ञान विभागात जॉड्रेल प्राध्यापक होते (१९६०-६९). तसेच ते जॉन हॉपकिन्स विद्यापीठातहेर्टर व्याख्याते (१९५९), कोलंबिया विद्यापीठात जेसप व्याख्याते (१९६४), ग्रास फाउंडेशनमध्ये अलेक्झांडर फोर्ब्ज व्याख्याते (१९६६) आणि रॉयल सोसायटीमध्ये क्रूनियन व्याख्याते (१९६७) होते.
हक्सली आणि हॉजकिन यांचे संशोधन मुख्यत्वे सोडियम व पोटॅशियम आयनांच्या होणाऱ्या अदलाबदलीमुळे तंत्रिका कोशिकांच्या विद्युत् ध्रुवीकरणात थोडासा विरुद्ध परिणाम घडतो, या विषयाशी संबंधित होते. या आविष्काराला क्रिया वर्चस् असे म्हणतात. यामुळे तंत्रिका तंतू-मधून आवेगाचे प्रेषण होते. याशिवाय हक्सली यांनी स्नायू तंतूंच्याआकुंचन प्रक्रियेसंबंधी मूलभूत संशोधन केले. याकरिता त्यांनी व्यतिकरण सूक्ष्मदर्शक हे उपकरण वापरले.
हक्सली हे अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस,लिओपोल्डिना ॲकॅडेमी आणि डॅनिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस यासंस्थांचे सभासद होते. त्यांना सार विद्यापीठाची सन्माननीय एम्.डी. (१९६४) आणि शेफील्ड विद्यापीठ व लायसेस्टर विद्यापीठ यांची सन्माननीय डी.एस्सी. या पदव्या मिळाल्या. त्यांनी अनेक शोधनिबंध विविध नियतकालिकांत प्रसिद्ध केले. विशेषतः त्यांचे लेखन जर्नल ऑफ फिजिऑलॉजीमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी शेरिंग्टन येथे दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह रिफ्लेक्शन्स ऑन मसल्स या नावाने १९८० मध्ये प्रसिद्ध झाला.
हक्सली यांचे केंब्रिज येथे निधन झाले.
कानिटकर, बा. मो. भालेराव, य. त्र्यं.
“