स्वोल (झ्वॉल) : नेदर्लंड्समधील ओव्हराइसल प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,२३,२११ (२०१४). हे डेव्हंटरच्या उत्तरेस २७ किमी. झ्वार्टवॉटर नदी व ओव्हराइसल कालवा यांच्या संगमावर वसलेले आहे. याची स्थापना इ. स. ८०० मध्ये झाली आणि १२३० मध्ये त्याला शहराचा दर्जा मिळाला. सोळाव्या शतकापर्यंत या शहराला व्यापारी दृष्ट्या विशेष महत्त्व नव्हते. नेदर्लंड्सच्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये (१५६८-१६४८) हा डचांचा बालेकिल्ला होता परंतु १६७४ मध्ये फ्रान्सचा राजा चौदावा लूई याच्या सहकाऱ्याने मुनस्टर व कोलोग्न या बिशपांनी त्याचा विनाश केला. हे लोहमार्ग व महामार्गांवरील प्रमुख स्थानक आणि बाजारपेठेचे शहर असल्या- मुळे हे अलिकडे प्रशासकीय व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनले आहे. रसायने, धातूच्या वस्तू , कापड, जहाजबांधणी, बांधकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ व दुग्धजन्य पदार्थनिर्मिती हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

मध्ययुगीन काळात स्वोलला सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व होते. त्या काळी येथील विद्यालये प्रसिद्ध होती. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांतील अनेक वास्तू येथे असून त्यांपैकी गॉथिक क्रोर्ट केर्क (कॅथीड्रल ), नगरभवन, ससेनपूर्ट हे अष्टकोनी चार बुरूज असलेले उंच प्रवेशद्वार या वास्तू प्रेक्षणीय आहेत. येथील जुन्या तारकाकृती तटबंदीचे उद्यानात परिवर्तन करण्यात आले असून त्याभोवतालच्या खंदकाचे रूपांतर कालव्यात करण्यात आले आहे. शहराजवळील सेंट ॲमॉन्ट्सबर्ग टेकडीवर ऑगस्टीनिअन आश्रम आहे. या आश्रमात थॉमस. ए. केम्पज या धर्मगुरूचे १४०७ पासून त्याच्या मृत्यूपर्यंत वास्तव्य होते.

निगडे, रेखा