स्वीडिशसाहित्य : ज्याला खऱ्या अर्थाने स्वीडिश साहित्य म्हणता येईल त्याचा आरंभ मध्ययुगाच्या उत्तरार्धात झाला. त्या काळा-पर्यंत स्वीडिश भाषेत बरेच भाषिक बदल होऊन जुनी स्वीडिश (ओल्ड स्वीडिश) ही एक स्वतंत्र भाषा झाली. या भाषेचे आज उपलब्धअसलेले सर्वांत जुने साहित्य म्हणजे Vastgotalagan ( इं. शी. ‘लॉ ऑफ वेस्ट गॉटलंड’) या नावाची एक विधिसंहिता आहे. १२२० च्या दशकात ती तयार झाली, असे दिसते. ही संहिता जुन्या स्वीडिशमध्ये आहे. ह्या संहितेची भाषा प्रतिमांनी युक्त, अनुप्रासात्मक आणि तालबद्ध अशी आहे. चौदाव्या शतकात झालेला ‘द साँग्ज ऑफ यूफेमिआ’ (इं. शी.) हा शिलेदारी कवितांचा संग्रह उपलब्ध आहे. ह्या संग्रहात फ्रेंच रोमान्सकार ⇨ क्रेत्यँ द त्र्वा (बारावे शतक) याच्या एका रोमान्सचा स्वीडिशअनुवाद अंतर्भूत आहे. यातून स्वीडिश कवींच्या रोमान्स रचनेचा कसा कल होता हे दिसून येते. चौदाव्या-पंधराव्या शतकांपासूनचे काही बॅलडही मिळाले आहेत. त्यांतूनही दरबारी प्रेमाचे आदर्श प्रकट झालेले आहेत. ह्या बॅलडरचनांमधून पेगन विषय आणि स्थानिक ऐतिहासिक घटना पद्यरूप झालेल्या आढळतात.
सोळाव्या शतकात स्वीडनच्या इतिहासात दोन महत्त्वाच्या घटनाघडून आलेल्या दिसतात. एक, स्वीडनची डेन्मार्कपासून झालेली फारकतआणि गस्टाव्ह पहिला व्हासाचे राज्यारोहण (१५२३). दुसरी, रोमनांपासून झालेली फारकत आणि राष्ट्रीय ल्यूथरन चर्चची स्थापना. यांतील राजकीय घटनांचा परिणाम स्वीडिश साहित्यावर ताबडतोब जाणवला नाही, तरी इ. स. १५०० नंतर धर्मसुधारणेच्या चळवळीचा साहित्यावरील प्रभाव मात्र मोठा होता.
१५४१ मध्ये बायबलचे स्वीडिश भाषांतर प्रकाशित झाले. त्यापासून अनेक कवींना प्रेरणा मिळाली. ओलाउस पेत्री (१४९३-१५५२) आणि त्याचा भाऊ लॉरेन्शस पेत्री (१४९९-१५७३) हे दोन भाऊ ल्यूथरच्या धर्मसुधारणेच्या चळवळीतले धर्मोपदेशक. बायबलच्या स्वीडिश भाषां-तराशीही ते निगडित होते. ओलाउसने दिलेली धार्मिक प्रवचने अतिशय प्रभावी आहेत. त्याने स्वीडनच्या गतकाळासंबंधी लिहिलेले इतिवृत्त म्हणजे चिकित्सक संशोधनावर आधारलेला पहिला इतिहासग्रंथ होय. आज पूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेले Tobie comedia (प्रकाशित १५५०) हे स्वीडिश नाटकही त्याने लिहिले असावे. हे नाटक बायबल मधील एका विषयावर आधारलेले आहे. ओलाउस मांगनस (१४९०-१५५८) हा रोमन कॅथलिक पंथाचा. धर्मसुधारणेच्या काळात त्याला आणि त्याचा भाऊ जोहानीझ याला परागंदा व्हावे लागले होते. जोहानीझने गॉथ आणि स्वीड राजांचा इतिहास लिहिला. त्याने ज्या राजांचे पराक्रम वर्णिले ते तसे अज्ञातच होते. जोहानीझच्या इतिहासामुळे त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश पडला. ओलाउसने स्कँडिनेव्हियाचा भूगोल आणि तेथील मानववंश ह्यांबद्दल लिहिले (इं. शी. १५५५, ‘हिस्टरी ऑफ द नॉर्दर्न पीपल्स’). ह्या विषयावरचा स्वीडिश भाषेतला हा पहिलाच इतिहास होय.
सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वीडिश साहित्याचा आवाका सीमित होता. साहित्यकृतीही मोठ्या संख्येने निर्माण झाल्या नाहीत तथापि लार्स विव्हॅलिअस ह्याची निसर्गावरील प्रेम प्रकट करणारी कविता स्वीडिश कवितेचा एक नूतनाविष्कार घडविणारी होती. तीस वर्षीय युद्धात स्वीडन सहभागी झाल्यामुळे एक यूरोपीय सत्ता म्हणून स्वीडनची ओळख प्रस्थापित झाली. त्यामुळे स्वीडनचा राष्ट्राभिमान वाढला. त्याचा परिणाम स्वीडिश साहित्यावरही झाला. येओर्य शार्नयेल्म (१५९८-१६७२) ह्या स्वीडिश कवीचे हर्क्यूलस (१६५८) हे रूपकात्मक महाकाव्य म्हणजे सतराव्या शतकातली एक श्रेष्ठ साहित्यकृती होय. या महाकाव्यात तत्कालीन स्वीडनमधील अनेक सामाजिक-राजकीय समस्यांचे प्रतिबिंब पडलेले आहे. शार्नयेल्मचा एक अनुयायी सॅम्यूएल कोलंबसयाने काही उद्देशिका लिहिल्या (१६७४, इं. शी. ‘स्वीडिश ओड्स ‘). शार्नयेल्मच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणाऱ्या काही घटनाही त्याने लिहिल्या आहेत. एका कवीने स्वीडिश भाषेतली पहिली सुनीतमालिका लिहिली (Wenerid, १६८० ) पण टोपणनावाने लिहिणाऱ्या ह्याकवीची ओळख अजून पटलेली नाही. स्वीडिश भाषेच्या विकासाच्या संदर्भात ह्या शतकात काही विचार झालेला दिसतो. शार्लयेल्म याने स्वीडनचा सांस्कृतिक वारसा आणि यूरोपीय साहित्यातून वाहणारे वाङ्मयीन अभिजातवादाचे वारे ह्यांच्यात एकात्मता साधण्याचा प्रयत्न केला. हर्क्यूलस-मधून त्याने अनेक जुन्या स्वीडिश शब्दांचे पुनरुज्जीवन घडवून आणले. स्वीडिश भाषेतील पहिली सुनीतमालिका लिहिणाऱ्या अज्ञात कवीने स्वीडिश भाषेच्या दुःस्थितीबद्दल लिहिले होते (१६५८, इं. शी. ‘द लॅमँट ऑफ द स्वीडिश लँग्वेज’).
राष्ट्रीय अभिमान आणि धार्मिक अभिमान ह्यांचा मिलाफ हकीन स्पेगेल आणि येस्पर स्वीडबर्ग यांच्या ग्रंथांतून आढळतो. स्वीडबर्गने एक स्तोत्रपुस्तिका तयार केली होती (१६९५). तिच्यासाठी स्पेगेलने सहकार्य दिले होते. स्वीडिश लोकांवर ह्या स्तोत्रपुस्तिकेचा मोठा प्रभाव होता.
अप्साला येथे पेत्रस लागरलव्ह ह्या विद्वानाने स्वीडिश साहित्यात अभिजाततावादी साहित्याचे मानदंड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला,तर ओलाफ व्हेरेलिअस ह्याने आइसलँडिक सागांचे संपादन आणिअनुवाद केले. ओलाफ रूडबेक (१६३०-१७०२) याने Atland eller Manheim (१६७९-१७०२) ह्या आपल्या ग्रंथात अशी प्रणाली मांडली, स्वीडन म्हणजे लुप्त झालेले ॲटलांटिस असून येथेच पश्चिमी संस्कृतीचा पाळणा हलला. ह्या ग्रंथाचे लॅटिन भाषांतर Atlantica या नावाने झाले आणि या ग्रंथाला यूरोपीय कीर्ती प्राप्त झाली.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वीडिश साहित्यात बरोक आणि अभिजाततावादी प्रवृत्ती समांतरपणे प्रकट होताना दिसतात. गन्नोयूरेलिअस ह्याने ‘हिम टू द किंग’ (१६९७, इं. शी.) हे काव्यस्वीडनचा राजा चार्ल्स अकरावा ह्याच्या निधनाच्या प्रसंगी लिहिले.याकोप फ्रेझे याच्या भावकवितांनी एक प्रकारच्या भावनात्मक धर्म-परायणतेला चालना दिली.
अठराव्या शतकाच्या आरंभीच (१७१८) स्वीडनचा राजा चार्ल्स बारावा याचे निधन झाले. त्याचे साम्राज्यही संपुष्टात आले. त्यानंतरच्या काळात स्वीडिश जीवनावर उपयुक्ततावादी विचारसरणीचा प्रभाव पडला. स्वीडनमध्ये फ्रान्स आणि इंग्लंडमधील विवेकवादी विचारसरणी प्रसृत करण्यात ओलाफ फोन डलिन ह्याने विशेष पुढाकार घेतला होता. स्टॉकहोममध्ये तो ‘द स्वीडिश ॲर्गस’ (१७३२-३४, इं. शी.) हे साप्ताहिक चालवीत असे. इंग्रज पत्रकार आणि निबंधकार ⇨ जोसेफ ॲडिसन ह्याच्या द स्पेक्टेटर ह्या नियतकालिकाचा आदर्श त्याच्यापुढेहोता. ‘द स्वीडिश ॲर्गस’ ने स्वीडनमध्ये पत्रकारीचे एक नवे पर्व सुरू केले. त्या साप्ताहिकातील विचारांमुळे स्वीडनमध्ये संशयवाद आणि विवेकवाद ह्या विचारसरणींचा प्रभाव वाढला. त्याचप्रमाणे साहित्यात अभिजाततावादी प्रवृत्ती ठळकपणे प्रकट होऊ लागल्या. याच सुमारास स्वीडनमधील मध्यमवर्ग वाङ्मयाचा प्रमुख आश्रयदाता बनला. डलिन हा उत्तम उपरोधकार होता आणि रूपकात्मकतेच्या आधारे तो उपरोधप्रचुर लेखन करीत असे. त्याने काही नाटकेही लिहिली पण त्यांच्यांत जिवंत नाट्यात्मकतेचा अभाव होता.
कवितेच्या क्षेत्रात हेडव्हिग शारलोट्टा नूरडेनफ्लक्ट (१७१८-६३) आणि गस्टाव्ह फिलिप क्रूएट्झ (१७३१- ८५) ही नावे विशेष उल्लेख-नीय. ‘द सॉरोइंग टर्टल्ड्व्ह’ (१७४३, इं. शी.) ह्या काव्यसंग्रहात नूरडेनफ्लक्टने आपल्या पतिनिधनाचे दुःख उत्कट भावकवितांतून प्रकट केले आहे. क्रूएट्झचे काव्यलेखन थोडे आहे पण त्यातून कवितेचा घाट आणि काव्यलेखनाचे तंत्र यांवरील त्याचे प्रभुत्व दिसून येते.
कादंबरी मंद गतीनेच विकसित झाली. याकोप मोर्क आणि अँडर्स टॉर्नग्रीन यांनी लिहिलेली ‘द ॲड्व्हेंचर्स ऑफ ॲडलरिक अँडग्योथिल्डन’ (१७४२-४४, इं. शी.) ही खऱ्या अर्थाने पहिली स्वीडिश कादंबरी होय. तिच्यावर आइसलँडिक सागांचा परिणाम दिसून येतो. अठराव्या शतकात यूरोपीय कीर्ती प्राप्त झालेले केवळ दोन लेखक होते. ते म्हणजे कार्ल फोन लिनिअस (कार्ल फोन लिन्ने – १७०७ – ७८) आणि ⇨ इमॅन्युएल स्वीड्नबॉर्ग (१६८८-१७७२). ते शास्त्रज्ञ होते. लिन्ने हा निसर्गवैज्ञानिक. काटेकोरपणे ज्याला वाङ्मयीन ग्रंथ म्हणता येईल, असा ग्रंथ त्याने लिहिला नाही तथापि राजकीय ताणतणावांच्या काळात जेव्हा अन्य देशांतील प्रभावस्रोतांनी स्वीडनला वेढले होते, तेव्हादेशाच्या स्वीडिश संस्कृतीचा विचार त्याने सतत आपल्या मनात वागवला. स्वीड्नबॉर्ग हा गणिती परंतु तो ईश्वरविद्येकडेही वळला. त्याने स्वतःच्या ईश्वरविद्येविषयी लेखनही केले.
अठरावे शतक हा स्वीडिश साहित्यातील कालखंड स्वीडनचा राजा गस्टाव्ह तिसरा (कार. १७७१-९२) याच्या नावावरून गस्टाव्हियन कालखंड म्हणूनही ओळखला जातो. साहित्य आणि कला ह्यांचा तो उदार आश्रयदाता होता. नाटक आणि रंगभूमी ह्या विषयांत त्याला विशेष रस असल्यामुळे स्वीडिश रंगभूमीची एक परंपरा विकसित होऊ शकली. गस्टाव्ह स्वतः एक अभिनेता आणि नाटककार होता. त्याच्या कारकीर्दीत स्वीडिश रंगभूमी आणि स्वीडनमध्ये चाललेले नाट्यविषयक उपक्रम अन्य यूरोपीय देशांच्या तुलनेत विशेष उठून दिसत होते. गस्टाव्हने ‘रॉयलस्वीडिश ऑपेरा’ ही संस्था स्थापन केली. तिचा आरंभ गस्टाव्ह आणियोहान वेलांडर (१७३५-८३) यांनी मिळून लिहिलेल्या ‘थेटीस अँडपेली’ (इं. शी.) या नाट्यकृतीने झाला (१७७३). Gustaf Vasa ही गस्टाव्हने संकल्पिलेली ऐतिहासिक संगीतिका (ऑपेरा). योहान हेन्रिक केलग्रेन (१७५१-९५) आणि संगीतकार जे. जी. नाउमान ह्यांच्या सहकाऱ्याने ती पूर्ण करण्यात आली. केलग्रेन हा कवी आणि समीक्षकहोता. विचारांनी तो विवेकवादी होता आणि प्रभावी उपरोधकार म्हणून त्याची ख्याती होती. नव-अभिजाततावादाचा तो कट्टर पुरस्कर्ता तथापि नंतर त्याने स्वच्छंदतावादी कल्पनांशी जुळवून घेतले. योहान गाब्रिएल ऊक्सेनशर्ना ह्याच्या ‘हार्वेस्ट्स’ (१७९६, इं. शी.) मध्ये त्याचे स्वच्छंदतावादी वृत्तीने प्रकट केलेले निसर्गसौंदऱ्याबद्दलचे प्रेम दिसूनयेते. बेंग्ट लिडनर याने लिहिलेली ‘द डेथ ऑफ काउंटेस स्पास्तारा’ (१७८३, इं. शी.) ही उद्देशिका स्वच्छंदतावादाच्या पूर्वचिन्हांचे प्राति-निधिक उदाहरण आहे.
कार्ल मायकेल बेलमन (१७४०-९५) हा अठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ स्वीडिश भावकवी समजला जातो. तो जसा कवी, तसाच संगीतकारही होता. भाषेची आणि तिच्या लयतालांची सूक्ष्म जाणीव त्याच्यापाशी होती. तो उत्तम विनोदकारही होता.
स्वीडिश ॲकॅडमीचा पहिला सचिव नील्स फोन रोझेनस्टाइन याने आपल्या ‘ऑन एन्लाय्टनमेंट’ (१७९३, इं. शी.) ह्या निबंधात गस्टाव्हियन कालखंडातल्या वाङ्मयीन उद्दिष्टांचा विचार मांडला. गस्टाव्हच्या दरबारातील वातावरण संस्मरणिकांच्या रूपाने काहींनी सशब्द केले. त्यांत जी. जे. ॲड्लरबेथ, जी. जे. एह्रेन्सव्हार्ड अशांचा समावेश होतो.
एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी स्वीडिश साहित्यात स्वच्छंदतावाद प्रभावी ठरला. जर्मन स्वच्छंदतावादाने वाङ्मयीन वातावरण भारून गेलेहोते. ह्या प्रभावाखालील विद्यार्थ्यांनी आपली वाङ्मयमंडळे आणि नियतकालिके काढली होती. स्वीडनमधील स्वच्छंदतावादी चळवळीचा मुख्य नेता ⇨ पेअर डानिएल आमाडेअस आटरबुम (१७९०-१८५५) हा होता. त्याने कविता, काव्यात्म नाटके आणि स्वीडिश साहित्यिकांची चरित्रे लिहिली.
स्वीडनमधील तरुण स्वच्छंदतावाद्यांवर ⇨ फ्रीड्रिख शिलर आणि ⇨ गटे या जर्मन साहित्यिकांचा प्रभाव होता. त्यांनी काढलेल्या वाङ्मयीन नियतकालिकांत फॉस्फोरस नावाचे एक नियतकालिक होते. त्यातील लेखनातून स्वच्छंदतावादी विचारसरणीवरील त्यांची निष्ठा प्रकट होत असे. ‘गॉथिक सोसायटी’ (इं. शी.) म्हणूनही एक संघटना निर्माण झाली होती. आपल्या ‘गॉथिक’ भूतकाळाचा अभ्यास करावा, अशी प्रेरणा निर्माण होऊ लागली होती. (गॉथिक लोकांचे पूर्वज द. स्वीडनमधील असावेत, अशी पारंपरिक माहिती आहे). इसायास टेगनर हा ‘गॉथिक सोसायटी ‘चा एक सदस्य. तो स्वच्छंदतावादी असला, तरी त्याला साहित्यकृतीच्या बांधीव, परिपूर्ण घाटाचे आकर्षण होते. त्यामुळे त्याला कधीकधी परंपरावाद्यांच्या वाङ्मयीन भूमिकेची बाजू घ्यावीशी वाटत असे.
अनेक स्वीडिश स्वच्छंदतावादी हे विद्वान आणि तत्त्वचिंतक होते. त्यांची कविता तत्त्वज्ञानाकडे झुके. काही इतिहासाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करीत. ‘द आइल ऑफ ब्लेस्ड’ (१८२४-२७, इं. शी.) हे आटरबुमचे काव्य त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. त्यात माणसाचे ईश्वरापासूनचे दुरावलेपण रूपकात्मक पद्धतीने प्रकट केले आहे. ⇨ एरिक यूहान स्टॅग्नेलिअस (१७९३ -१८२३) हा प्रतिभावंत कवी पण त्याने कोणत्याही संप्रदायाशी स्वतःला निगडित करून घेतले नाही. ‘लिलीज ऑफ शेरॉन’ (१८२१, इं. शी.) ह्या त्याच्या कवितासंग्रहातील कवितांतून पुनःपुन्हा येणारा विषय म्हणजे पापाच्या अंधारमय तुरुंगात अडकून पडलेला मनुष्याचा आत्मा. त्याच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रतिभावना आणि धर्मभावना त्याच्या लेखनात विलक्षणपणे एकत्र गुंफलेल्या आढळतात.
गद्याच्या क्षेत्रात कार्ल योनास लव्ह आल्मक्व्हिस्ट (१७९३-१८६६) ह्या स्वच्छंदतावादी कादंबरीकाराचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. स्वैर कल्पनाशक्ती आणि वास्तववाद ह्यांचा संयोग त्याच्या कादंबऱ्यांतून आढळतो. फ्रीड्रिका ब्रेमर (१८०१-६५) हिला तिच्या द नेबर्स (१८३७, इं. भा. १८४२), द होम (१८४२, इं. भा. १८४३) ह्या कादंबऱ्यांमुळे आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली. सर्वसामान्यांच्या जीवनाची चित्रे तिच्या कादंबऱ्यांतून तिने रंगविली. स्त्रियांच्या समानाधिकारांबाबत तिच्या धारणा ठाम होत्या. हेर्था (१८५६, इं. भा. १८५६) ही तिची कादंबरी त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे. तिने दीर्घकथाही लिहिल्या. टू यिअर्स इन स्वित्झर्लंड अँड इटली अँड ट्रॅव्हल्स इन द होली लँड (१८६१-६२,इं. भा.) ह्या तिच्या प्रवासवर्णनातून अभिव्यक्तीचा विलोभनीय ताजेपणा प्रत्ययास येतो. सोफी फोन क्नोरिंगने मुख्यतः उमराव कुटुंबांतल्या जीवनाबद्दल लिहिले, तर एमिली फ्लायगेअर-कार्लेन हिने पश्चिम किनाऱ्यावरील जीवनाचे चित्रण आपल्या कथांतून केले.
स्वीडिश साहित्यात वास्तववाद काहीसा मंदगतीनेच आला. १८४०-६० ह्या कालखंडावर स्वच्छंदतावादाचीच छाया होती. १८६० चे दशक हे काव्यात्म वास्तववादाचे होते. एडवर्ड बॅकस्टॉर्म, पाँटस विकनर, ⇨ कार्ल स्नोइलस्क्यू (१८४१-१९०३) हे ह्या काळातले उल्लेखनीय कवी.
कादंबरीकार ⇨ आब्राहाम व्हिक्तॉर ऱ्यूडबॅरय (१८२८-९५) हा ह्या कालखंडातला नामवंत साहित्यिक. द लास्ट अथेनियन (१८५९, इं. भा. १८६९) ह्या कादंबरीने त्याला ख्याती प्राप्त करून दिली. पेगनधर्म आणि ख्रिस्ती धर्म यांच्यातला अथेन्समधील झगडा हा ह्या कादं-बरीचा विषय. धार्मिक असहिष्णुता आणि सनातनीपणा ह्यांना त्याचा तीव्र विरोध होता. ‘द आर्मरर’ (१८९१, इं. शी.) ह्या कादंबरीतून तो त्याने तीव्रतेने प्रकट केला. स्वीडनचा एक अग्रगण्य भावकवी म्हणूनही त्याचे कर्तृत्व मोठे आहे. आपल्या कवितांतून यंत्राधिष्ठित आधुनिक समाजाबद्दल त्याने निराशा व्यक्त केली आहे.
१८०० नंतर फिनलंडमध्ये स्वीडिश साहित्याची जी लक्षणीय निर्मिती झाली, तिचाही परामर्श घेण्याची आवश्यकता आहे. ⇨ यूहान लड्व्हिग रूनेबॅर्य (१८०४-७७) ह्या कवीचे नाव ह्या संदर्भात विशेष निर्देशनीय आहे. ‘द मूज हंटर्स’ (१८३२, इं. शी.) आणि हान्ना (१८३६) ह्या दोन काव्यकृतींनी त्याला मोठा लौकिक मिळवून दिला. द साँग्ज ऑफ एन्साइन स्टाल (दोन खंड, १८४८ १८६०) ह्या त्याच्या देशभक्तिपर कविता-संग्रहातील ‘अवर कंट्री’ (इं. शी.) ही कविता फिनलंडचे राष्ट्रगीत आहे. कार्ल स्नोइलस्क्यूच्या Dikter (१८६९ इं. शी. ‘पोएम्स ‘) ह्या काव्य-संग्रहातील जोमदार लयबद्धता आणि इंद्रियनिष्ठता स्वीडिश वाचकांना आकर्षित करणारी ठरली. त्याच्या ‘पोएम्स’ ह्या नव्या काव्यसंग्रहातून सर्वसामान्यांच्या आकांक्षांशी थेट संवाद साधला.
आधुनिक स्वीडिश साहित्य आकाराला आणण्यात काही प्रभावस्रोत कारण झाले : त्यांत इंग्रज निसर्ग वैज्ञानिक चार्ल्स डार्विन, इंग्रज तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्ट्यूअर्ट मिल, फ्रेंच निसर्गवादी एमिल झोला, हेन्रिक इब्सेन, ब्यर्नस्टेअर्ने ब्यर्न्सॉन हे नॉर्वेजियन नाटककार आणि गिऑर ब्रांडेस हा डॅनिश साहित्यसमीक्षक यांचा समावेश होतो. ह्या प्रभावस्रोतांतून निर्माण झालेल्या स्वीडिश साहित्यिकांचा ⇨ आउगुस्ट स्ट्रिनबॅर्य (१८४९-१९१२) हा पहिला आणि सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी. विसाव्या शतकातील यूरोपीय नाटकाच्या विकासात इब्सेनच्या बरोबरीने स्ट्रिनबॅर्यचे योगदान आहे. आपल्या नाटकांसाठी त्याने नवे आणि अधिक प्रभावी असे अभिव्यक्तीचे प्रकार शोधण्याचा प्रयत्न केला. आधुनिक माणसाला अस्वस्थ आणि प्रक्षुब्ध करणाऱ्या यातनादायी निराशेचा त्याने आपल्या नाटकांतून वेध घेतला. तो अत्यंत प्रखर आत्मजाणीव असलेला कलावंत होता. आपल्या स्वतःच्या खळबळत्या अस्तित्वाला आकार आणि अर्थ देण्यासाठी नाट्याविष्काराचे वेगवेगळे घाट तो धुंडाळीत होता. ‘मास्टर अलॉव्ह’ (१८७२, इं. शी.), ‘द फादर’ (१८८७, इं. शी.), ‘मिस् ज्यूली’ (१८८९, इं. शी.), ‘ए ड्रीम डे’ (१९०२, इं. शी.) ह्या त्याच्या काही निर्देशनीय नाट्यकृती. १८८० नंतरच्या अनेक साहित्यिकांना स्ट्रिनबॅर्यने आपल्या प्रतिभेने झाकून टाकले.
गस्टाव्ह आफ यारस्टाम (१८५८-१९०९), ॲनी शार्लट एडग्रेन-लेफ्लर आणि व्हिक्टोरिया बेनेडिक्टसन (१८५०-८८) हे स्ट्रिनबॅर्यचे काही समकालीन साहित्यिक होत. गस्टाव्ह आफ यारस्टाम हा एरिकग्रेन (१८८५) ह्या साहित्यकृतीचा लेखक. ॲनी आणि व्हिक्टोरिया यादोन लेखिकांनी समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या अन्याय्य वागणुकीबद्दल लिहिले. ॲनीने कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. व्हिक्टोरियाने कथा लिहिल्या. ‘फ्रॉम स्केन’ (१८८४, इं. शी.) सारख्या तिच्या कथांतून नव्या गद्यसाहित्यातला प्रादेशिक आविष्कार दिसून येतो. आल्बर्ट बाथ आणि ओला हानसून ह्यांनी प्रादेशिक कविता लिहिली.
⇨व्हेर्नर फोन हेइडेन स्टाम (१८५९-१९४०) ह्याने ‘पिल्ग्रिमेज अँड वाँडर यिअर्स’ (१८८८, इं. शी.) ह्या आपल्या काव्यसंग्रहातून स्वीडिश साहित्यातील निसर्गवादाविरुद्ध प्रतिक्रिया नोंदवली आणि कल्पनाजाल, सौंदर्य आणि राष्ट्रीय अस्मिता प्रकट करणारे साहित्य आपल्या भाषेत निर्माण झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली. आपल्या कवितेबरोबरच त्याने ऐतिहासिक कथाही लिहिल्या. १९१६ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. ऑस्कर लेव्हरटीन (१८६२-१९०६) हा कवी, कथाकार आणि समीक्षक. आरंभी तो सामाजिक वास्तववादाचा पुरस्कर्ता होता तथापि नंतरच्या त्याच्या लेखनात स्वच्छंदतावादी प्रवृत्ती जाणवू लागल्या. प्रेम आणि मृत्यू ह्या विषयांनी त्याच्या कवितेचे भावविश्व भारलेले आहे. प्राचीन कविता आणि प्राचीन चित्रे ही त्याच्या कवितेत ठळकपणे आढळणारी ज्ञापके. त्याची काव्यशैली चित्रमय आणि उत्कट आहे. स्वीडिश इतिहास आणि संस्कृती यांकडे त्याने काहीशा अलिप्ततेने, पण बाहेरून एखाद्या चित्राचे निरीक्षण करणाऱ्या संशोधकाच्या उत्साहाने पाहिले. समीक्षक या नात्याने समकालीन अभिरुचीला वळण देण्याचा प्रभावी प्रयत्न त्याने केला. ⇨ एरिक कार्लफेल्ट (१८६४-१९३१) हा स्वीडन-मधील डालार्ना या प्रांतातला. कार्लफेल्टची कविता म्हणजे डालार्नाचा आवाज होता. तेथील जीवन, परंपरा, रीती त्याच्या कवितेतून सशब्द झाल्या. त्या भूमीत घडणारे एकेका ऋतूचे दर्शन, तेथील झाडे, फुले त्याच्या कवितांतून जिवंत झाली पण निसर्गचित्रण हा त्याच्या कवितेचा हेतू नव्हता, तर विविध निसर्गप्रतिमांतून एकेका भाववृत्तीचा आविष्कार घडवणे हा होता. त्याने १९१८ मध्ये नाकारलेले नोबेल पारितोषिक १९३१ मध्ये त्याच्या निधनानंतर त्याच्यासाठी जाहीर केले गेले. ⇨ सेल्मा लागरलव्ह (१८५८-१९४०) ही अग्रगण्य स्वीडिश कादंबरीकर्त्री. तिच्या कादंबऱ्यांतून नित्याच्या अनुभवांचे जग आणि पऱ्या-भुतेखेते ह्यांसारख्या अतिमानवी शक्ती आढळतात. गोश्ता बेर्लिंग्ज सागा (२ खंड, १८९१, इं. भा. १८९८) ही तिची पहिली कादंबरी पण एक अग्रगण्य स्वीडिश कादंबरीकर्त्री म्हणून तिची ख्याती तिच्या जेरूसलेम (२ खंड, १९०१-०२, इं. भा. १९१५) ह्या कादंबरीमुळे झाली. तिने कथालेखनही विपुल केले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जुन्या संस्कृतीपुढे उभे राहिलेले आव्हान हा तिच्या अनेक कादंबऱ्यांचा मध्यवर्ती विषय आहे. १९०९ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन तिच्या साहित्यसेवेचा जागतिक पातळीवर गौरव करण्यात आला.
विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात जे लेखक उदयाला आले, त्यांत ⇨ याल्मार साडरबॅर्य (१८६९-१९४१) आणि बो बर्गमन (१८५९-१९६७) यांचा समावेश होतो. साडरबॅयर्र् हा कवी आणि कथा-कार. सूक्ष्म मानसशास्त्रीय दृष्टी आणि उपरोध त्याच्या कथांतून प्रभावीपणे प्रत्ययास येतात. मार्टिन बर्क्स यूथ (१९३०, इं. भा.) आणि डॉक्टर ग्लास (१९६३, इं. भा.) ह्या कादंबऱ्याही त्याने लिहिल्या. त्याच्या सर्व लेखना-तून उत्कृष्ट गद्यशैलीकार म्हणून त्याची प्रतिमा मनात ठसते. बर्गमन याने काही लघुकथा लिहिल्या तथापि भावकविता हे त्याच्या आविष्काराचे खरे माध्यम होते. ‘मारिओनेट्स’ (१९०३, इं. शी.) आणि ‘द किंगडम’ (१९४४, इं. शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहांतून याचा प्रत्यय येतो.
आधुनिक स्वीडिश कादंबरीच्या विकासाच्या संदर्भात गस्टाव्ह हेलस्ट्रॉम (१८८२-१९५३), लुडविग नॉर्डस्टॉर्म (१८८२-१९४२), एलिन वॅग्नर (१८८२-१९४९) आणि सिगफ्रिड सिव्हेर्ट्झ (१८८२-१९७०) हीनावे महत्त्वाची आहेत. यूरोप, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये हेलस्ट्रॉमने पत्रकार म्हणून काम केले होते. त्याचा परिणाम त्याच्या कादंबरी-लेखनावर झालेला आहे. उपरोध आणि काळजीपूर्वक मांडलेले तपशील हे त्याच्या लेखनाचे विशेष. त्याच्या कादंबऱ्या आत्मचरित्रात्मक आहेत. इंग्रजी साहित्याचा त्याच्यावर असलेला प्रभाव त्याच्या तीन उत्कृष्ट कादंबऱ्यांतून दिसून येतो : लेसमेकर लेकहोल्म हॅज ॲन आयडिआ (१९२७, इं. भा. १९३०), कार्ल हेरिबर्ट मालमॉस (१९३१) आणि स्टॉर्म ओव्हर जूरो (१९३५, इं. भा.). एलिन वॅग्नर ही स्त्रीमुक्तिवादी लेखिका. Pennskaflet (१९१०) ही कादंबरी त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. सिव्हेर्ट्झवर काही काळ फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ आंरी बेर्गसाँ याच्यातत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. त्या तत्त्वज्ञानाने त्याला जीवनाविषयी आशावादी बनविले होते तथापि पहिल्या महायुद्धाच्या अनुभवाने त्याला निराश केले. डाउनस्ट्रिम (१९२०, इं. भा.) ह्या कादंबरीत पहिल्या महायुद्धाच्या काळात नफेबाजी करणाऱ्या हिणकस भांडवलशाही मनोवृत्तीवर त्याने प्रकाश टाकला आहे.
१९२० नंतरच्या कालखंडातला अग्रगण्य कादंबरीकार याल्मार बर्गमन (१८८३-१९३१) हा होय. दाय रॉड अँड दाय स्टाफ (१९२१,इं. भा.) ह्या त्याच्या कथेत त्याने एका प्रभावी स्त्रीची व्यक्तिरेखा परिणामकारकपणे रेखाटली आहे. गॉड्स ऑर्किड (१९१९, इं. भा.) ही त्याची एक उपरोधिका. Swedenhielms (प्रयोग १९२५) ही त्याची स्वीडिश साहित्यातील मोजक्या सुखात्मिकांपैकी एक होय.
श्रमिकांची दुःखे चित्रित करणाऱ्या कादंबऱ्याही लिहिल्या गेल्या. मार्टिन कोच आणि आयव्हर लो-योहानसन ह्यांची नावे या संदर्भात उल्लेखनीय आहेत. श्रमिकांच्या यातनांना प्रखरपणे वाचा फोडणारा कथालेखक यान फ्रिडेगार्ड हा होय. व्हिलेल्म मोबर्ग (१८९८-१९७३) याने शेतकऱ्यांच्या जीवनावर कादंबऱ्या लिहिल्या पण त्याला मोठी कीर्ती प्राप्त झाली, ती त्याने चार खंडांत लिहिलेल्या एमिग्रंट्स (१९४९-५९, इं. भा.) ह्या कादंबरीमुळे. स्थलांतर करून उत्तर अमेरिकेत गेलेल्या काही स्वीडिश व्यक्तींवर ही महाकादंबरी लिहिलेली आहे. स्वीडिश साहित्यातील आत्म-चरित्रात्मक कादंबऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने यूनसन एव्हिन (१९००-७६) याची Romanen Om Olof (४ खंड, १९३४-३७) ही कादंबरी लक्षणीय आहे. ‘रेन ॲट डे ब्रेक’ (१९३३, इं. शी.), रिटर्न टू इथाका (१९४६, इं. भा. १९५२), द डेज ऑफ हिज ग्रेस (१९६०, इं. भा. १९६८) या त्याच्या काही अन्य कादंबऱ्या. भांडवलशाही, सर्वंकष सत्तावाद हे त्याच्या कादंबऱ्यांतील काही ठळक विषय. हॅरी मार्टिनसन (१९०४-७८) आणि ॲग्नेस फोक क्र्यूसेनशर्न (१८९४-१९००) हे आत्मचरित्रात्मक कादंबरीलेखन करणारे अन्य काही कादंबरीकार. हॅरी मार्टिनसन हा पुढे श्रेष्ठ भावकवी म्हणून प्रसिद्धीस आला. रतिप्रधान प्रतिमासृष्टी आणि निसर्गप्रेम ही त्याच्या भावकवितेची वैशिष्ट्ये. Amiara (१९५६) या त्याच्या काव्यकृतीच्या रूपाने त्याने महाकाव्य ह्या साहित्य-प्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला.
स्वीडिश भावकवितेच्या विकासात व्हिलेल्म आकलंड (१८८०-१९४९) ह्याचे स्थानही महत्त्वाचे आहे. हा प्रतीकवादाचा पुरस्कर्ता. डॅन अँडरसन (१८८८-१९२०), बर्गर शूबॅर्य (१८८५-१९२९), याल्मार गुलबॅर्य हे अत्यंत लोकप्रिय कवी. शूबॅर्यने एका गावातले जीवन चित्रित करणाऱ्या काही उपरोधप्रचुर कविता लिहिल्या. त्याच्या अन्य कवितांतून आधुनिकतेची रूपे साकार झालेली आहेत. स्वप्न आणि वास्तव यांच्यातील भेदक विरोध हा त्याच्या कवितेचा मूलभूत विषय आहे. त्याच्या कवितांवर शेक्सपिअरच्या काव्यरचनेचाही काही प्रभाव दिसून येतो. गुलबॅर्यच्या कवितेत धार्मिक निष्ठा आणि अभिजात साहित्याचा व्यासंग ह्यांचे समतोल दर्शन घडते. बेर्टिल माल्मबॅर्य (१८८९-१९५८) याच्यावर शिलर, स्टेफान गेओर्ग आणि रिल्के यांचा प्रभाव होता. जगातील ओबडधोबड वास्तवापासून अलिप्त राहून शुद्ध कल्पनांच्या जगात रमण्याची त्याची वृत्ती ऑर्फिका या त्याच्या काव्यसंग्रहात दिसून येते. १९४० च्या दशकातील पिढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविसमूहात एरिक लिंडग्रेन (१९१०-६८), कार्ल व्हेनबॅर्य (१९१०-९५) ह्यांचा समावेश होतो. ह्या कवींवर आंग्ल कवी टी. एस्. एलियटचा प्रभाव होता. लिंडग्रेनच्या द मॅन विदाउट अ वे (१९४२, इं. भा.) ह्या कवितासंग्रहात जीवनाचा अर्थ शोधण्याची या पिढीची धडपड प्रतिबिंबित झालेली आहे.
गनार एक्लॉफ (१९०७ – ६८) हा विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ स्वीडिश भावकवी. त्याच्या ‘लेट ऑन अर्थ’ (१९३२, इं. शी.) ह्या पहिल्याच काव्यसंग्रहात स्वीडिश साहित्यातील अतिवास्तववादी लेखनाच्या पहिल्या खुणा आढळतात.
१९६० नंतरच्या स्वीडिश साहित्यात सामाजिक -राजकीय बांधिलकीचा प्रभाव आढळतो. साहित्यकृतीच्या कलात्मक घाटाचा विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोण ह्या काळात मागे पडलेला दिसतो. सारा लिडमन (१९२३-२००४) हिची वाङ्मयीन कारकीर्द या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. ती कादंबरीकार आणि नाटककार पण ही लेखिका राजकीय विचारांकडे वळली. १९७० नंतर ती पुन्हा सर्जन-शील लेखनाकडे वळली. स्व्हेन लिंडक्व्हिस्टच्या बाबतीत असेच घडले. त्यानेही सामाजिक बांधिलकीच्या भावनेने लेखन केले पण तोही नंतर वेगळ्या प्रकारचे लेखन करू लागला. हे लेखन काहीसे आत्मचरित्रात्मक स्वरूपाचे आहे. ‘ए लव्हर्स डायरी’ (१९८१, इं. शी.) ही त्याची कादंबरी त्याच्या लेखनात आलेला वेगळेपणा दाखविणारी आहे. पी. सी. जेरसिल्ड याने आपल्या ‘आफ्टर द फ्लड’ (१९८२, इं. शी.) ह्या लेखनात विध्वंसक अणुयुद्धानंतरच्या मानवी संस्कृतीचे भेदक चित्रण केलेले आहे.
१९२० नंतर झालेली फिनो-स्वीडिश (फिनलंडमधील लेखकांनी निर्मिलेले स्वीडिश साहित्य) साहित्यनिर्मिती लक्षणीय आहे. भावकवितेत आधुनिकतेचे प्रवाह आले. या संदर्भात इडिथ सोडरग्रॅन ह्या कवयित्रीची कविता निर्देशनीय आहे. आपल्या कवितेतून तिने भविष्यकाळाचे एक प्रभावी स्वप्नचित्र (व्हिजन) उभे केले आहे आणि ते करताना ती जणूएका वैश्विक परिप्रेक्ष्यात जग पाहते. गन्नार जोर्लिंग याने आपल्या कवितेतून निसर्गाची संस्कारवादी चित्रे उभी केली.
रूनार शिल्ड ह्याने आपल्या कथांतून बुद्धिवंत आणि कलावंत ह्यांचे जीवनाशी संबंध कसे असू शकतात, ह्या प्रश्नाभोवती केंद्रित झालेल्या कथा लिहिल्या. ख्रिस्टर किलमान ह्याच्या कादंबऱ्यांत सामाजिक समीक्षेबरोबर मानसशास्त्रीय भाष्यही आढळते.
संदर्भ : 1. Gustafson, Alrik, A History of Swedish Literature, 1961.
2. Scobbie, Irene, Aspects of Modern Swedish Literature, 1988.
कुलकर्णी, अ. र.
“