स्ट्राव्हिन्स्की, ईगॉर फ्यॉदरॉव्हिच : (१७ जून १८८२ — ०६ एप्रिल १९७१). प्रख्यात रशियन-अमेरिकन संगीतरचना-कार, पियानोवादक व संगीत संयोजक-निर्देशक. जन्माने रशियन; तथापि त्याचे वास्तव्य फ्रान्स व अमेरिका येथे होते. त्याचा जन्म सेंट पीटर्झबर्ग ( सध्याचे लेनिनग्राड ) नजीकच्या ओरानियनबाऊम येथे झाला. त्याचे वडील ‘ मारिन्स्की थिएटर ’ मध्ये गायक म्हणून कार्यरत होते. वयाच्या नवव्या वर्षी चायकॉव्हस्की या प्रख्यात संगीतकाराच्या बॅलेने तो प्रभावित झाला. अगदी लहानपणीच पियानो हे वाद्य त्याने आत्मसात केले. वयाच्या पंधराव्या वर्षी तो तत्कालीन संगीतकारांच्या अनेक प्रसिद्ध रचना पियानोवर लीलया वाजवीत असे. संगीतात त्याला चांगली गती होती; तथापि त्याच्या आई-वडिलांना मात्र त्याने कायद्याचे शिक्षण घ्यावे असे वाटे. त्यामुळे स्ट्राव्हिन्स्कीने १९०१ मध्ये सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला; पण तेथे त्याचे मन रमले नाही. अखेर वडिलांच्या मृत्यूनंतर (१९०२) तो पूर्णतः संगीताच्या अभ्यासाकडे वळला.
स्ट्राव्हिन्स्की निकोलाय रिम्स्की-कोर्साकोव्ह या संगीतकाराच्या संपर्कात आला. त्याने त्याच्याकडून संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सांगीतिक दृष्ट्या त्याच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा कालखंड होता (१९०३ —०८). कोर्साकोव्हच्या मृत्यूपर्यंत (१९०८) स्ट्राव्हिन्स्कीचे हे अध्ययन चालू होते. तत्पूर्वी कॅथरिन नॉसेन्को या जवळच्या नात्यातील युवतीशी तो विवाहबद्ध झाला (१९०६).
स्ट्राव्हिन्स्कीने रचलेली फायरबर्ड (१९१०) ही बॅलेरचना रशियातील लोकविद्येवर आधारित होती. द राइट ऑफ स्प्रिंग ही त्याची विशेष उल्लेखनीय रचना. या रचनेमुळे त्याला प्रसिद्धी लाभली. तीत त्याने सुफलता — विधीवर भर दिला आहे. स्ट्राव्हिन्स्कीच्या रचना ऐकून सेरगी दियागीलेव्ह हा तत्कालीन प्रसिद्ध संगीतकार इतका प्रभावित झाला, की त्याने फायरबर्ड या बॅलेच्या संगीत-संयोजनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. स्ट्राव्हिन्स्कीने काही वर्षे स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्य केले (१९१४—२०) व नंतर तो फ्रान्सला गेला (१९२०). तिथे त्याने ‘ प्लेयल ’ या स्थानिक कंपनीबरोबर व्यावसायिक भागीदारी केली. या कंपनीसाठी तो संगीतरचना करीत असे आणि कंपनी त्याच्या पियानोवादनाच्या ध्वनिमुद्रिकांची विक्री करीत असे. या भागीदारीत त्याला बर्यापैकी आर्थिक लाभ झाला.
१९२० च्या सुमारास पॅरिसमधील एका प्रसिद्ध चित्रकाराची पत्नी व्हेरा-दी-बोसे हिच्याशी त्याचा परिचय झाला. त्याचे रूपांतर प्रेमात होऊन व्हेरा आपल्या पतीस सोडून स्ट्राव्हिन्स्कीकडे राहू लागली. तेव्हा त्याचे कुटुंब दक्षिण फ्रान्समध्ये होते. पुढील काही वर्षे स्ट्राव्हिन्स्की व्हेरा आणि पत्नी कॅथरिन नॉसेन्को या दोघींशी संबंध ठेवून होता. १९३९ मध्ये त्याच्या पत्नीचे निधन झाले.
स्ट्राव्हिन्स्कीने पुल्सिनेल्ला (१९२०) हा बॅले रचला. यात सुरुवातीच्या संगीतातील गुणविशेष आणि आधुनिक संगीतातील गुणविशेष यांचा मिलाफ केला असून, त्याने जोव्हान्नी पेर्गोलेसी या इटालियन संगीत-काराच्या कृतीतील उतार्यांचा वापर करून त्याला स्वतःच्या वृंदवादनाचा व कल्पकतेचा साज चढविला.
स्ट्राव्हिन्स्कीला फ्रान्सचे नागरिकत्व मिळाले (१९३४). याच सुमारास तो अमेरिकेतील संगीतक्षेत्रातील काही नामवंत व्यावसायिकांच्या संपर्कात आला. त्यावेळी तो शिकागो फिलहॉर्मोनिक ऑर्केस्ट्राबरोबर काम करीत होता. त्याचे संगीतातील योगदान पाहून अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठाने त्याला संगीतावर व्याख्याने देण्यासाठी पाचारण केले. दुसरे महायुद्ध चालू असतानाही त्या परिस्थितीत दिलेला शब्द पाळण्यासाठी सप्टेंबर १९३९ मध्ये स्ट्राव्हिन्स्की न्यूयॉर्कला आला व दिलेली जबाबदारी पार पाडली. नंतर १९४० मध्ये तो अमेरिकेत स्थायिक झाला. पुढे काही महिन्यांनी व्हेरासुद्धा अमेरिकेत आली आणि ते दोघे विवाहबद्ध झाले.
अमेरिकेत आल्यानंतर स्ट्राव्हिन्स्कीने लॉस अँजल्स फिलहॉर्मोनिक ऑर्केस्ट्राच्या संगीत-संयोजनाचे काम केले. हॉलिवुडमधील प्रसिद्ध चित्रपटनिर्मिती कंपनी ‘ पॅरामौंट पिक्चर्स ’ मध्येही तो कार्यरत होता. १९४५ मध्ये त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळाले व तो वेस्ट हॉलिवुड येथे स्थायिक झाला. त्याच्या नव-अभिजात बॅलेकृतींत सिंफनी ऑफ साम्स (१९३०), सिंफनी ऑफ थ्री मुव्हमेंट्स (१९४६), द रेक्स प्रोग्रेस (१९५१) हे काही प्रसिद्ध बॅले होत. त्यांच्या सुधारित आवृत्त्याही निघाल्या आहेत.
स्ट्राव्हिन्स्की आपल्या आगळ्या वेगळ्या शैलींसाठी प्रसिद्ध होता. ताल आणि स्वरमेल यांचा सुरेख संगम त्याच्या संगीतात असून तत्कालीन संगीत-समीक्षक त्याच्या संगीताचे वर्णन ‘ नव-अभिजात ’ असे करीत. कलात्मकता आणि विविधता ही त्याच्या संगीताची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. विसाव्या शतकातील पाश्चिमात्य संगीतावर त्याच्या संगीताचा प्रभाव प्रकर्षाने आढळतो. विशेष म्हणजे संपूर्ण आयुष्य संगीताला वाहिलेला स्ट्राव्हिन्स्की साहित्याचाही मोठा व्यासं गी होता. थ्रेनी (१९५८) ही त्याची बारा स्वरपंक्तींचा वापर केलेली सुसंगत गायकमंडल कृती. रेक्वियम कॅन्टिक्लीज (१९६६) ही त्याची अखेरची बॅलेकृती होय. न्यूयॉर्क शहरी त्याचे निधन झाले.
संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल स्ट्नाव्हिन्स्कीला डेन्मार्कमधील पतिष्ठित सोनिंग पुरस्कार मिळाला (१९५९). त्याच्या दि फ्लड आणि फायरबर्ड यांना सवोर्त्कृष्ट बॅलेरचना म्हणून गौरविण्यात आले (१९६२). स्ट्नाव्हिन्स्की गामी पुरस्काराचाही मानकरी होता. अमेरिकेकडून विशेष जीवन गौरव पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले ( मरणोत्तर—१९८७).
कुलकर्णी, रागेश्री अजित