स्टब्झ, विल्यम : (२१ जून १८२५—२२ एप्रिल १९०१). इंग्लंडमधील एक प्रभावी, परखड इतिहासकार आणि इतिहासाचा विश्लेषक. त्याचा जन्म नॅर्झ्बर, यॉर्कशर ( इंग्लंड ) येथे एका सुशिक्षित कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि अँग्लिकन चर्चची दीक्षा घेतली व आपल्या कारकिर्दीला १८५० मध्ये किरकोळ नोकर्यांनी सुरुवात केली. प्रथम त्याने नेव्हस्टॉकमध्ये धर्मोपदेशकाचे, नंतर लँबेथ राजवाड्यात ग्रंथपालाचे काम केले. त्यानंतर त्याची नियुक्ती ऑक्सफर्ड विद्यापीठात इतिहासाचे रीज्य ( राजाचा पुरस्कृत ) प्राध्यापक म्हणून झाली (१८६६—८८). या काळातच त्याने बॉडलिअन ग्रंथालयाचा अभिरक्षक, कोल्डरटनचा कुलमंत्री ( रेक्टर ), सेंट पॉल चर्चच्या वसतिगृहातील धर्मगुरू आणि चेस्टरचा बिशप अशा विविध जबाबदार्या सांभाळल्या. पुढे त्याची पूर्णवेळ ऑक्सफर्डचा बिशप म्हणून निवड झाली (१८८८—१९०१).
स्टब्झने द कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी ऑफ इंग्लंड इन इट्स ऑरिजिन अँड डेव्हलपमेंट (१८७३—७८) या नावाच्या ग्रंथाचे तीन खंड प्रसिद्ध केले. या खंडांमध्ये त्याने मध्ययुगीन संविधानात्मक इतिहासाच्या विकासासंदर्भातील परस्परसंबंधांचा आढावा घेतला आहे. याशिवाय अतिशय महत्त्वाच्या रोल्स सेरिजमधील ऐतिहासिक ग्रंथांचे त्याने संपादन केले. इतिहासावरील त्याची भाषणे अनेक खंडांत प्रकाशित झाली असून त्यांपैकी लेक्चर्स ऑन यूरोपियन हिस्टरी (१९०६) हा ग्रंथ यूरोपच्या सर्वांगीण इतिहासावर प्रकाश टाकतो. त्याचा सिलेक्ट चार्टर्स … ऑफ इंग्लिश कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी फ्रॉम द अर्लिअस्ट टाइम्स टू द रेन ऑफ एडवर्ड द फर्स्ट (१८७०) हा ग्रंथ तत्कालीन घटनात्मक तपशील व त्यावरील टीकाटिपणी यांसाठी प्रसिद्ध आहे.
ऑक्सफर्ड जवळच्या कुडझ्डन येथे त्याचे निधन झाले.
सोसे, आतिश सुरेश