शिशुनाग वंश :एक प्राचीन भारतीय राजवंश. या वंशाविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. पुराणे, बौद्ध साहित्य, विशेषत: महावंस ग्रंथ आणि काही जैन ग्रंथ यांतून तत्संबंधी माहिती मिळते परंतु पुराणांतील माहिती बौद्ध सांप्रदायिक माहितीशी जुळत नाही. सामान्यतः बौद्ध वृत्तांत अधिक ग्राह्य मानतात. या वंशातील राजांनी इ. स. पू. ६४२ ते इ. स. पू. ३७२ दरम्यान प्राचीन मगध प्रदेशावर राज्य केले. पौराणिक कथेनुसार काशीचा राजा शिशुनाग याने अवंतीच्या प्रद्योतवंशी राजाचा पराभव करून मगधचे राज्य काबीज केले. तो राजगृह (राजगीर) येथून राज्य करीत असे. त्याच्या वंशास शिशुनाग वंश म्हणतात. पुराणांत या वंशातील शिशुनाग, काकवर्ण, क्षेमधर्मन, क्षत्रौजस, ⇨बिंबिसार, ⇨अजातशत्रू, दर्शक, उदायिन, नंदिवर्धन ब महानंदिन या दहा राजांची नावे आढळतात तथापि महावंसानुसार बिंबिसार, अजातशत्रू, उदयभद्र, अनुरुद्ध, मुंड, नागदासक, सुसुनाग (शिशुनाग), कालाशोक आणि त्याचे दहा पुत्र यांनी मगधावर राज्य केले. वरील राजांपैकी शिशुनागाने पुराणांनुसार चोवीस वर्षे राज्य केले व त्यानंतर काकवर्ण गादीवर आला. काकवर्ण हा बौद्धमतानुसार कालाशोक होय. बाणभट्टलिखीत हर्षचरितात काही परंपरागत ऐतिहासिक कथा दिलेल्या आहेत. त्यांत शिशुनागपुत्र काकवर्ण हा आपल्या राजधानीजवळ कट्यारीने मृत्यू पावल्याचा उल्लेख आहे.

या वंशातील बिंबिसार व अजातशत्रू हे दोन प्रसिद्ध राजे असून त्यांनी मगध राज्याचा विस्तार केला. बुद्धचरितात अश्वघोषाने बिंबिसार हा हर्यंक कुळातील होता, असे नमूद केले आहे तर महावंसात त्याला त्याचे वडील राजा भट्टिय यांनी तो पंधरा वर्षांचा असताना राजपद दिले, असा उल्लेख मिळतो. बौद्धमते त्याचा पुत्र अजातशत्रू पित्याचा खून करून मगधच्या गादीवर आला तर जैन ग्रंथान्वये राज्यपाल असलेल्या कूणिक (अजातशत्रू) याने पित्यास कैदेत टाकून राजपद मिळविले.

अजातशत्रू (? – इ. स. पू. ५२७ ?) याने तत्कालीन प्रबळ गणराज्यांच्या संघाचा व लिच्छवी या घटकराज्याचा कपटकारस्थान करून पराभव केला. तो बुद्धाचा समकालीन असून त्याचा भक्त होता. त्याने पहिली बौद्ध संगीती राजगृह येथे भरविली. त्याच्यानंतर उदयभद्र हा त्याचा मुलगा गादीवर आला. सुरुवातीस तो चंपा येथे राज्यपाल होत. मगधातील ज्येष्ठ सभेने त्याची राजा म्हणून शिफारस केली. त्याने कुसुमपूर हे नविन नगर वसविले आणि त्यात जैन चैत्यगृह बांधले. त्याचा वध झाला आणि नंतर अनुरुद्ध व मुंड हे अनुक्रमे गादीवर आले. त्यांच्यानंतर नागदासक मगधच्या गादीवर आला. पुराणांनी उल्लेखिलेला दर्शक हाच असावा. त्यानंतर त्याचा मंत्री शिशुनाग याला प्रजेनेच गदीवर बसविले. वत्स व कोसल हे प्रदेश त्याने जिंकले.

शिशुनागाचा मुलगा कालाशोक म्हणजेच पुराणांनी उल्लेखिलेला काकवर्ण असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याच्या कारकीर्दीत बौद्धांची दुसरी संगीती भरली होती. त्याच्या एका राणीच्या प्रियकराने कालाशोकचा खून केला. त्यानंतर कालाशोकच्या दहा मुलांनी संयुक्तपणे दहा वर्षे राज्य केले मात्र राणीचा प्रियकर हाच खरा सत्तधीश होता. ग्रीक लेखकांच्या मते त्याने ह्या दहा पुत्रांना कंठस्नान घातले. त्याला प्रस्तुत राणीपासून झालेल्या महापद्म या अनौरस मुलास मगधाचे राज्य मिळाले. तोच नंद वंशाचा मूळ पुरुष. तिथून नंद वंशास प्रारंभ झाला. [⟶ नंद वंश].

संदर्भ : Majumdar, R.C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1960.

                      

मिराशी, वा. वि.