गुलाम घराणे : तेराव्या शतकात सु. १२०६ ते १२९० च्या दरम्यान दिल्ली येथे राज्य स्थापन करणारा तुर्की गुलाम ⇨कुत्बुद्दीन ऐबक  ह्याच्या घराण्यास गुलाम घराणे किंवा गुलाम वंश म्हणतात. या घराण्यातील दहा सुलतानांपैकी ऐबक, ⇨ अल्तमश  व ⇨बल्बन  हे तीनच राज्यकर्ते गुलाम होते. उरलेले सर्व दास्यमुक्त झालेले होते. त्यामुळे यास गुलाम घराणे म्हणणे फारसे सयुक्तिक वाटत नाही. ऐबकला दास्यातून मुक्त होताच अधिकार प्राप्त झाला होता. अल्तमश व बल्बन हे लहान वयातच दास्यमुक्त झाले होते. दहा राज्यकर्त्यांपैकी तीन वेगवेगळ्या घराण्यांतील होते. मध्ययुगीन तुर्की प्रघाताप्रमाणे ह्या सुलतानांना सुलतान म्हणणेही योग्य नाही.

दिल्लीच्या तख्तावर एकंदर चौतीस मुसलमान राजे बसले. त्यांपैकी महंमद घोरीचा वजीर कुत्बुद्दीन ऐबक हा पहिला सुलतान होय. याने दिल्ली, मीरत, बनारस, कालिंजर, काल्पी वगैरे ठिकाणे काबीज करून दिल्ली हे राजधानीचे ठिकाण केले. जिंकलेल्या मुलखाचा बंदोबस्त करून त्याने व्यवस्थित राज्यकारभार केला. तरीही हिंदूंवर त्याची वक्रदृष्टी होती. कुत्बुद्दीननंतर त्याचा मुलगा आरामशाह गादीवर आला. त्याच्यात कर्तबगारी नसल्याने त्याचा मेहुणा शम्सुद्दीन अल्तमश याने आरामशाहास पदच्युत करून स्वतः गादी बळकावली. तो स्वतःच्या कर्तबगारीने वर चढला. एकछत्री अंमल सुरू करण्याकरिता अल्तमशने घोरीच्या सुभेदारांकडून सिंध, पंजाब व बंगाल हे प्रांत काबीज केले. राजपुतांविरुद्ध लढून रणथंभोर व माळवा प्रांत जिंकले. ह्याच्या कारकीर्दीत मोगल लोक प्रथमच हिंदुस्थानात आले. बगदादच्या खलीफाने त्याला स्वतंत्र सुलतान म्हणून वस्त्रे पाठविली.

अल्तमशनंतर रुक्नुद्दीन गादीवर आला. तो दुराचरणी असल्याने दरबारच्या लोकांनी त्यास पदच्युत करून अल्तमशची मुलगी रझिया बेगम हिला गादीवर बसविले. राज्यशासनास आवश्यक असे गुण तिच्यात असल्याने तिने चांगल्या रीतीने कारभार केला. दिल्लीच्या तख्तावर बसलेली ही पहिली स्त्री होय. दरबारातील तिच्या विरोधकांनी तिला व तिच्या नवऱ्यास ठार मारले. तिच्यानंतर आलेले मुइझ्झुद्दीन बहराम व अलाउद्दीन मसूद हे दोघेही राज्य करण्यास असमर्थ होते. त्यांच्या कारकीर्दीत मोगलांनी पंजाब आणि बंगालवर हल्ले केले. ह्या दोघांनंतर नासिरुद्दीनची सुलतान म्हणून नेमणूक झाली.

नासिरुद्दीनच्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत पुष्कळ बंडे झाली. बाहेरच्या शत्रूंचे हल्ले झाले. त्याची वृत्ती शांत आणि धर्मशील होती. तो आपला बहुतेक काळ धर्माचरणात आणि विद्याव्यासंगात घालवीत असे. कुराणाच्या प्रती स्वतः हाताने लिहून तो आपला खाजगी खर्च भागवी. त्याने सरहद्दीची बळकटी करून मोगलांच्या स्वाऱ्यांचे निराकरण केले. गझनी काबीज करून ते राज्य दिल्लीच्या राज्यास जोडले. नासिरुद्दीन निपुत्रिक असल्यामुळे बल्बन ह्याचीच सुलतान पदावर योजना झाली. हा राज्यव्यवहारात दक्ष असून मोठा पराक्रमी होता. राजपूत बंडाळीचा त्याने बीमोड करून कडक उपाययोजना केली. बल्बनच्या पश्चात होऊन गेलेले सुलतान कमकुवत व नालायक निघाले. दरबारात अंदाधुंदी माजून अफगाणिस्तानातून आलेल्या फिरुझशाह खल्जी याने शेवटच्या सुलतानाचा पराभव केला आणि तो सिंहासनावर बसला.

हिंदूंची राज्ये पादाक्रांत करून या सुलतानांनी नर्मदेच्या उत्तरेकडील बहुतेक भाग जिंकला. मुसलमानांचे राज्य हिंदुस्थानात प्रथमच स्थापन करून ते कायम करण्याची कामगिरीही या सुलतानांनी केली. यांनी गुलाम जातीला प्राधान्य देऊन गादी आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातून सतत भांडणे व युद्धे होत राहिली. यांनी भारतीय शासनपद्धतीच व्यवहारात आणली. सैनिक दलात चांगली प्रगती करून सरहद्दीच्या रक्षणार्थ सैन्य ठेवले. नवीन नाणी पाडली. हजारो मंदिरांचा नाश करून दिल्ली, अजमीर, नागौर येथे पुष्कळ मशिदी, स्वतःची स्मारके व इमारती बांधल्या. बल्बनने इस्लामी वास्तुकलेतील अर्धवर्तुळाकार कमानींची सुरुवात केली. मशिदींपैकी दिल्लीतील कुव्वतुलइस्लाम ही मशीद उल्लेखनीय आहे. अल्तमशने हीच मशीद वाढविली. ऐबकने ⇨ कुतुबमीनार  हा एक प्रचंड विजयस्तंभ उभारण्यास आरंभ केला. ह्याचा पहिला मजला त्याच्या कारकीर्दीत बांधला गेला व तो अल्तमशच्या काळात पुरा झाला. ह्या वास्तूंच्या बांधणीवरून इस्लामी वास्तुकलेची वैशिष्ट्ये हिंदुस्थानात प्रथमच दिसून येतात. ह्या वास्तुशिल्पांत हिंदु-इस्लामी कलेचे मिश्रण झालेले दिसते. यांच्या दरबारात कवी, विद्वान व लेखक यांना उदार आश्रय होता. बल्बन संगीताचा पुरस्कर्ता होता. तो भारतीय संगीत सगळ्यात श्रेष्ठ मानीत असे. साहित्यात फार्सी व हिंदी यांच्या मिलाफाने नवीनच उर्दू भाषा उदयास आली. त्याने सरकारपुरस्कृत अशा मदरसा (शाळा) सुरू केल्या. मुझ्झिया व नासिरिया ही दोन महाविद्यालये दिल्ली येथे बांधली. यांच्या अंमलात हिंदुस्थान मुसलमान राजांचे कायमचे निवासस्थान झाले. मुख्य गुलाम सुलतान असे : (१) कुत्बुद्दीन ऐबक (१२०६–१०), (२) आरामशाह (१२१०–११), (३) शम्सुद्दीन अल्तमश (१२११–३६), (४) रुक्नुद्दीन फीरुशाह (१२३६–सहा महिने), (५) सुलताना रझिया (१२३६–४०), (६) मुइझ्झुद्दीन बहराम (१२४०–४२), (७) अलाउद्दीन मसूद (१२४२–४६), (८) नासिरुद्दीन महमूद (१२४६–६६), (९) घियासुद्दीन बल्बन (१२६६–८७), (१०) ककुबाद (१२८७–९०). 

गोखले, कमल