रेणुकादेवीसौंदत्ती : कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण व धार्मिक क्षेत्र. लोकसंख्या ३८,१५५ (२०११). हे बेळगावच्या पूर्वेस ७८ किमी.वर वसलेले आहे. येथील शहराजवळच असलेल्या डोंगरावरील रेणुकादेवीचे (यल्लमा) मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. हे शहर इतर शहरांशी रस्त्यांनी जोडलेले आहे. येथे सापडलेल्या शिलालेखात शहराचा उल्लेख सुगंधवर्ती असा आढळतो. बेळगावच्या रट्ट राजांची (इ. स. ८५०-१२५०) ही राजधानी होती. रट्ट राजे जैन धर्मीय होते, त्यांनी येथे इ. स. ८७६ व ९८१ मध्ये दोन जैन मंदिरे बांधली, असे शिलालेखावरून दिसून येते. १७३० मध्ये हे नवलगुंदचे देसाई यांच्या अखत्यारित होते. त्यांनी सौंदत्तीचा किल्ला बांधला आहे.

सौंदत्तीपासून जवळच मलप्रभा नदीवर धरण बांधण्यात आलेले असून त्याच्या जलाशयास रेणुकासागर असे नाव देण्यात आले आहे. या धार्मिक स्थळाचा जुना इतिहास फारसा ज्ञात नाही परंतु ते दोन हजार वर्षांपूर्वीचे असावे असे सांगितले जाते. तेराव्या शतकातील मूळच्या ठिकाणचे गर्भगृह वगळता सांप्रतचे रेणुका मंदिर सतराव्या-अठराव्या शतकात बांधण्यात आले आहे. रेणुका मंदिराच्या प्राकाराबाहेर भैरवनाथ, जमदग्नीश्वर शिव, परशुराम यांची मंदिरे असून रामतीर्थ, नैलतीर्थ, क्षीरतीर्थ, यमतीर्थ, हरिद्रा इ. पवित्र कुंडे आहेत. या ठिकाणी जमदग्नी ऋषींचा आश्रम होता व पर्वतशिखरावर रेणुकादेवीने तपश्चर्या केल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील रट्ट राजांनी बांधलेले चालुक्य शैलीतील मंदिर, रेणुकाद्रीवरील दत्तात्रेय मंदिर तसेच पुरंदरेश्वर, बसवेश्वर, वेंकटेश्वर इ. अन्य मंदिरे प्रसिद्ध आहेत. दरवर्षी चैत्र व आश्विन महिन्यांत, नवरात्रात मोठा उत्सव भरतो व रेणुकादेवीच्या दर्शनासाठी येथे लाखो भाविक जमतात.

गाडे, ना. स.