स्कर्व्ही : आहारातील क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ( कमतरते-मुळे ) उद्भवणारा हा विकार मुख्यतः दीर्घकाळ टिकविलेल्या अन्नाचा आहारात वापर करणार्‍या व्यक्तींमध्ये आढळतो. अनेक महिने जहाजावर राहणार्‍या खलाशांमध्ये या विकाराची लक्षणे आढळूनही त्यावर अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत उपाय सापडला नव्हता. ⇨ कॅप्टन जेम्स कुक या ब्रिटिश संशोधकांना १७६८ — ७५ या काळात सफरीवर असताना असे आढळले की, ताजा भाजीपाला, फळे आणि विशेषतः लिंबे व संत्री यांसारखी फळे खाणार्‍या नाविकांना स्कर्व्ही होत नाही. तेव्हापासून दर्या- वर्दी व्यक्तींचा आहार क जीवनसत्त्वांनीयुक्त अशा फळांनी परिपूर्ण करण्यात आला. हंगेरियन शास्त्रज्ञ ⇨ ऑल्बेर्ट सेंट-ड्यर्डी फोन नॉडीरॉपोल्ट यांनी संत्र्याच्या रसातून आणि हंगेरियन लाल पॅप्रिकामधून ( ढोबळी मिरची ) क जीवनसत्त्व वेगळे करण्यात यश मिळविले. त्यालाच नंतर ॲस्कॉर्बिक (स्कर्व्ही प्रतिबंधक ) अम्ल असे नाव मिळाले. ब्रिटिश शास्त्रज्ञ ⇨ सर वॉल्टर नॉर्मन हॉर्थ यांनी १९३३ मध्ये या पदार्थाची रासायनिक संरचना व प्रकाशीय समघटकता ठरविली आणि ते प्रयोगशाळेत तयार केले. तेव्हापासून मानवनिर्मित क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आणि कमी किमतीत उपलब्ध होऊन स्कर्व्हीचे प्रमाण कमी झाले.

कारणे : आहारातील ॲस्कॉर्बिक अम्लाचे प्रमाण प्रतिदिनी ४०—६० मिग्रॅ.पेक्षा कमी झाल्यास या विकाराची शक्यता वाढते. डब्यातील दुधाच्या पावडरवर वाढणार्‍या व मातेच्या अंगावर न पिणार्‍या अर्भकांमध्ये ( विशेषतः ६—१२ महिन्यांच्या वयात ) हे प्रमाण अधिक आढळते. या काळातही त्यांना ४०—६० मिग्रॅ. क जीवनसत्त्व आवश्यक असते. कोरडे टिकविलेले अन्न खाणार्‍या प्रौढ व्यक्तींमध्ये, आहाराकडे दुर्लक्ष करणार्‍या वृद्धांमध्ये आणि गरोदर स्त्रिया तसेच अंगावर पाजणार्‍या मातांमध्ये याची कमतरता निर्माण होऊ शकते. शस्त्रक्रियेच्या किंवा मोठ्या प्रमाणात भाजल्यामुळे झालेल्या जखमा बर्‍या होत असतानाही अशी परिस्थिती उद्भवू शकते. हे जीवनसत्त्व शरीरात फारसे साठवून ठेवता येत नसल्यामुळे आहारात त्याचा नियमित पुरवठा करणे आवश्यक असते. रुग्णालयात आणि बर्‍याचशा पूरक आहारांमध्ये हल्ली जीवनसत्त्वांचा वापर होत असल्याने स्कर्व्हीचे रुग्ण फारसे आढळत नाहीत. संपूर्ण आहाराच्या कमतरतेमुळे ( कुपोषणामुळे ) किंवा सर्वच जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे ( आहारातील नियोजनाच्या अभावामुळे ) जेव्हा लक्षणे निर्माण होतात, तेव्हा ती अनेक प्रकारच्या अभावामुळे असतात, केवळ क जीवनसत्त्वाच्या अभावानेच नसतात.

लक्षणे : क जीवनसत्त्व मुख्यतः संयोजी ( जोडणार्‍या ) ऊतकांच्या ( समान रचना व कार्ये असणार्‍या कोशिकांचा समूह ) निर्मितीमध्ये महत्त्वाचे कार्य करते. त्याच्या अभावामुळे बालकांमध्ये वाढ खुंटलेली आढळते. हाडांची जाडी कमी असते. लांब हाडांची टोके ( सांध्याजवळचे कूर्चेने आच्छादिलेले भाग ) फुगीर दिसतात. बरगड्यांची पुढची टोके उरोस्थीला जोडणारे सांधे सुजल्यामुळे छातीवर दोन्ही बाजूंना जाड मण्यांची रांग किंवा माळ घातल्याप्रमाणे दिसते. रक्तवाहिन्यांच्या संयोजी ऊतकांच्या कमजोरपणामुळे अनेक ठिकाणी रक्तस्राव होतो. उदा., हिरड्या, नखे, त्वचेखालील ऊतके, हाडांभोवतालची आवरणे इत्यादी. या रक्तस्रावामुळे हालचाल करताना वेदना होऊ शकतात. त्यामुळे लहान मुले एका जागी बसून राहतात व त्यांना हलविण्याचा प्रयत्न केल्यास रडतात. प्रौढांमध्ये हिरड्यांची मजबुती कमी होऊन दात सैल होतात व हिरड्यांमधून वरचे- वर रक्त येते. अल्परक्तता, रक्तदाब व नाडीचा वेग कमी-जास्त होणे, अशक्तता, भूक न लागणे, जखमा लवकर बर्‍या न होणे अशी विविध लक्षणे आढळतात. लोहाच्या शोषणासाठी जीवनसत्त्व आवश्यक असल्याने रक्ताच्या निर्मितीतही बाधा येते. त्यामुळे अशक्तपणा वाढतो व मानसिक अवसादनही निर्माण होते.

ॲस्कॉर्बिक अम्ल हे ई जीवनसत्त्वाप्रमाणेच अनेक ऊतकांमधील ऑक्सिडीकरणाच्या प्रक्रियेस प्रतिबंध करते. त्यामुळे ‘ मुक्त मूलके ’ या नावाने ओळखली जाणारी रासायनिक द्रव्ये आणि त्यांचे घातक परिणाम टाळले जातात. उदा., वयोवर्धनामुळे घडून येणारे ऊतकांचे र्‍हसन, हृदयविकारास कारणीभूत होणार्‍या कोलेस्टेरॉलासारख्या घटकांची निर्मिती इत्यादी.

स्कर्व्हीच्या रुग्णांमध्ये रक्तातील ॲस्कॉर्बिक अम्लाचे प्रमाण कमी होते. निरोगी व्यक्तीत ते ०.५—१.५ मिग्रॅ. प्रति १०० मिलि. असते. श्वेतकोशिकांमधील प्रमाणदेखील मोजता येते व त्यावरून स्कर्व्हीच्या निदानास मदत होते. शरीरात कोलॅजेन निर्मितीसाठी क जीवनसत्त्व आवश्यक असते.

उपचार : स्कर्व्हीची शक्यता कमी करण्यासाठी बालकांना रोज संत्री किंवा मोसंबी यांसारख्या फळांचा रस देणे उपयुक्त ठरते. ३०—४० मिग्रॅ. ॲस्कॉर्बिक अम्ल १०० मिलि. रसातून मिळू शकते. प्रौढांच्या आहारात हीच फळे, लिंबे, आवळा, पेरू, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोबी, हिरव्या पालेभाज्या व मोड आलेली धान्ये यांतून जीवनसत्त्वाचा पुरवठा होऊ शकतो. हे जीवनसत्त्व उष्णतेने नष्ट होत असल्यामुळे अधिक वेळ शिजविलेल्या भाज्या त्या दृष्टीने उपयुक्त ठरत नाहीत.

स्कर्व्हीची लक्षणे दिसत असल्यास त्यांच्या उपशमनासाठी प्रौढांना रोज १,००० मिग्रॅ. व बालकांना २०० मिग्रॅ. ॲस्कॉर्बिक अम्ल साधारण एक आठवडा द्यावे लागते. त्यानंतर या मात्रा निम्म्याने कमी करून महिनाभर दिल्या जातात. दीर्घकाळ मोठ्या मात्रा देऊन काहीही साध्य होत नाही. कारण एका ठराविक पातळीपेक्षा अधिक असलेले ॲस्कॉर्बिक अम्ल मूत्रातून उत्सर्जित होते. फार मोठ्या मात्रा सतत दिल्यास जुलाब होणे, मूत्रात स्फटिकनिर्मिती होणे यांसारखे त्रासदायक परिणाम काही व्यक्तींमध्ये दिसू शकतात.

पहा : ॲस्कॉर्बिक अम्ल जीवनसत्त्वे त्रुटिजन्य रोग ब्लेन, सर गिलबर्ट.

श्रोत्री, दि. शं.