नटॉल, जॉर्ज हेन्‍री फॉकिनर :  (५ जुलै १८६२–१६ डिसेंबर १९३७). ब्रिटिश जीववैज्ञानिक आणि केंब्रिज (इंग्‍लंड) येथील जीवोपजीवनविज्ञानामध्ये (दुसऱ्या जीवांवर जगणाऱ्या जीवांच्या जीवनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये) संशोधन करणाऱ्या मोल्टेनो इन्स्टिट्यूटचे संस्थापक. त्यांचा जन्म अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येते झाला. बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाची एम्. डी. ही वैद्यकाची पदवी त्यांनी १८८४ मध्ये मिळविली. १८८५ मध्ये ते बॉल्टिमोर मधील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात दाखल झाले. १८८६–९१ या काळात त्यांनी बहुतांशी जर्मनीमध्ये प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान आणि आरोग्यविज्ञान या विषयांचे अध्ययन केले. या काळातच त्यांना जीवोपजीवनविज्ञानाविषयी आवड उत्पन्न झाली व पुढे त्यांनी याच विषयावर लक्ष केंद्रित केले. १८९० मध्ये जर्मनीतील गटिंगेन विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी त्यांना मिळाली. १९०० मध्ये केंब्रिज विद्यापीठात सूक्ष्मजंतुविज्ञान व प्रतिबंधक वैद्यक या विषयांचे व्याख्याते म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९०६ मध्ये नव्यानेच सुरू केलेल्या जीवविज्ञानाच्या ‘क्विक’ प्राध्यापकपदी त्यांची निवड झाली व या पदावर ते १९३७ पर्यंत काम करीत होते.

इ. स. १८९२ मध्ये त्यांनी व विल्यम हेन्‍री वेल्श यांनी मिळून बॅसिलस एरोजिनेस नावाच्या सुक्ष्मजंतूचा शोध लावला. १८९५ मध्ये एच्. थीयरफेल्डर व नटॉल यांनी आरोग्यपूर्ण प्राणिजीवन व आतड्यातील पूर्ण पचन त्या ठिकाणी कोणतेही सूक्ष्मजंतू नसतानाही शक्य असते, असे दाखविले. त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र मोठे होते. अपूती (सुक्ष्मजंतूंना प्रतिरोध करण्याच्या) अवस्थेतील जीवनावरील पायाभूत असलेले प्रयोग, द्रवीय प्रतिरक्षाविषयक (रोगप्रतिकारक्षमताविषयक) अभ्यासाचा पाया घालणे आणि प्रेसिपिटिनासंबंधीच्या [प्रतिजन व प्रतिपिंड यांमधील विक्रियेच्या वेळी तयार होणाऱ्या निक्षेपाच्या म्हणजे साक्याच्या संबंधीच्या → प्रतिजन प्रतिपिंड] विक्रिया हे त्यांच्या संशोधनातील विशेष होत.

नटॉल यांनी विविधि क्षेत्रांत विपुल लेखन केले आहे. सूक्ष्मजंतुविज्ञान, रक्तरसविज्ञान (रक्तरसाच्या विविध अंगांचा अभ्यास करणारे शास्त्र), आरोग्यविज्ञान, उष्ण कटिबंधीय वैद्यक व जीवोपजीवनविज्ञान या विषयांवर त्यांचे जवळजवळ २०० संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. १९०१ मध्ये त्यांनी जर्नल ऑफ हायजिन या नियतकालिकाची स्थापना केली व ते त्याचे मृत्यूपावेतो संपादक होते. १९०६ मध्ये त्यांनी पॅरासायटॉलॉजी हे नियतकालिक सुरू केले आणि १९३३ पर्यंत ते त्याचे प्रमुख संपादक होते. ब्‍लड इम्युनिटी अँड ब्‍लड रिलेशनशिप हा त्यांचा अभिजात व्याप्तिलेख १९०४ मध्ये प्रसिद्ध झाला. काही काळानंतर त्यांनी गोचिड्यांमार्फत मानवात पसरणाऱ्या रोगांचा अभ्यास केला आणि डब्ल्यू. आर्. हाडवेन यांच्या समवेत पशूंतील पायरोप्लाझ्‌मोसिस (मेंढ्या, कुत्री इ. प्राण्यांत एक प्रकारच्या जीवोपजीवीपासून होणारा रोग) नावाच्या विकृतीवरील ट्रिपॅन ब्ल्यू हे गुणकारी औषध शोधून काढले. सी. वॉरबर्टन, एल्. रॉबिनसन आणि नटॉल यांनी मिळून लिहिलेला टिक्स, ए मोनोग्राफ ऑफ द आयक्सोडॉयडिया हा ग्रंथ १९०८ नंतर भागशः प्रसिद्ध झाला. केंब्रिज येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश राष्ट्रीयत्व स्वीकारले. ते लंडन येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.