स्वाइन फ्ल्यू : ( इन्फ्ल्यूएंझा-ए एचवन एनवन हॉग फ्ल्यू पिग फ्ल्यू ). या रोगाची लक्षणे स्वाइन म्हणजे डुक्कर याच्यात आढळून येणार्‍या रोगाच्या लक्षणांसारखी असल्यामुळे या रोगाला ‘ स्वाइन फ्ल्यू’ असे म्हणतात. इन्फ्ल्यूएंझा प्रकार ए उपप्रकार एचवन एनवन या विषाणू-मुळे श्वसन मार्गात तीव्र दाह निर्माण होतो [ इन्फ्ल्यूएंझा ]. हा जलदपणे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. सदर विषाणूचा समावेश आरएनए (रिबोन्यूलिइक अम्ल) गटाच्या ऑर्थोमिझोव्हिरिडी कुलात होतो. इन्फ्ल्यूएंझा विषाणूच्या तीन मुख्य प्रकारांपैकी ए प्रकार दोन उप-प्रकारांत विभागलेला आहे. हे दोन्ही प्रकार हीमॅग्लुटिनीन (एच) आणि न्यूरॅमिनिडेझ (एन) या पृष्ठभागावर असलेल्या प्रतिजनांवरून ओळखले जातात. आरएनए अम्लाच्या क्रमामध्ये होणार्‍या बदलांवर आधारित असे उपप्रकारांचे वाण निर्माण होतात.

इतिहास : इसवी सन १९१८ मध्ये अनेक देशांत साथ या स्वरूपात या रोगाचा प्रथम माणसांत व नंतर डुकरांत उपद्रव झाला. या साथीत योग्य निदान व उपचार न झाल्यामुळे जगात असंख्य लोक मृत्युमुखी पडले. तीत मुख्यतः तरुण लोक मृत्युमुखी पडले. १९३३ मध्ये डब्ल्यू. स्मिथ, एफ्. डब्ल्यू. अँड्रूज आणि पॅट्रिक लेडलॉ यांनी लंडन येथे ए प्रकारचा विषाणू वेगळा केला.

फेब्रुवारी १९७६ मध्ये अमेरिकन लष्करातील एका सैनिकाला अचानक ताप, प्रचंड थकवा व अशक्तपणा जाणवू लागला आणि दुसर्‍या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी काही सैनिकांना अशाच लक्षणांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी हा आजार फक्त एका जिल्ह्यातच पसरला होता. त्यांची तपासणी केल्यानंतर एचवन एनवन या विषाणूचे निदान झाले. १९७७ मध्ये जगभर सदर विषाणूचा प्रादुर्भाव पसरला होता. या वेळी मुख्यतः १९५० नंतर जन्माला आलेले लोक प्रभावित झाले. या आधीच्या काळातील लोकांमध्ये एचवन एनवन विषाणूंना प्रतिकार करू शकणारी प्रतिपिंडे त्यांच्या शरीरात असल्या- मुळे त्यांच्यावर विषाणूंचा परिणाम झाला नाही. हा विषाणू २००९ मध्ये सर्वांत आधी डुकरांमध्ये आढळून आल्याने त्याला स्वाइन फ्ल्यू असे म्हटले गेले. याचा आढळ सर्वप्रथम मेसिको येथे झाला आणि नंतर तो अमेरिकेच्या मार्गाने सर्वत्र जगभर पसरला. या एचवन एनवन विषाणूच्या जननिक द्रव्यात मानवी आणि पक्ष्यांच्या इन्फ्ल्यूएंझा विषाणूंच्या जननिक द्रव्यांतील घटक आढळून आले. त्यामुळे असे समजले जाते की, डुकरां-मध्ये आढळलेला हा विषाणू जैविक तंत्रज्ञानाद्वारे निर्माण केला गेला असावा.

रोगप्रसार : स्वाइन फ्ल्यू बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने याची लागण होते. संसर्ग झाल्यानंतरच्या पहिल्या ते सातव्या दिवसांपर्यंत रोगाची लागण होऊ शकते. बाधित व्यक्ती खोकल्यावर कफाचे द्रवकण, शिंकल्यावर स्रावकण किंवा थुंकल्यावर लाळेचे द्रवकण हवेत उडतात.या कणांमध्ये असंख्य विषाणू असतात. ते हवेतील धूलिकणांना चिकट-तात. असे धूलिकण हवेतून निरोगी व्यक्तीच्या श्वासावाटे श्वसन संस्थेत शिरतात. शिंकताना व खोकताना तोंडावर हात ठेवल्यामुळे विषाणू हाताला चिकटतात. नकळतपणे विषाणूंचे कण दारांच्या कड्या, नळ, दिव्यांची बटणे तसेच दुसर्‍या व्यक्तींच्या हातांना चिकटतात. त्या वस्तूंना निरोगी व्यक्तीने हात लावून तेच हात पुन्हा नाकाला वा तोंडाला लावल्याने विषाणू श्वसन संस्थेत शिरू शकतात. फ्ल्यूबाधित व्यक्तीच्या ३-४ फुटांपर्यंत संपर्कात आल्यास संसर्गाची शयता असते.

सर्वसामान्य लक्षणे : स्वाइन फ्ल्यूने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये पुढीलप्रमाणे लक्षणे आढळतात : रुग्णास धाप लागते किंवा श्वसनास अडथळा निर्माण होतो. ओठ व जीभ काळी-निळी पडते. रुग्ण खूप चिडचिडा होतो. खोकला व शिंका येतात. घसा खवखवतो व शरीर दुखू लागते. तीव्र डोकेदुखी व थंडी वाजून येणे यांबरोबर शरीरास प्रचंड थकवा जाणवतो, चक्कर येते, छाती वा पोट दुखते किंवा त्यावर दाब वाटतो. या लक्षणांच्या सोबतच मळमळणे, उलटी, जुलाब ही लक्षणेही दिसून येतात. धोकादायक प्रमुख लक्षणांत न्यूमोनिया किंवा श्वसनक्रिया बंद पडणे, अतितीव्र ज्वर ( ताप ), जुलाब व उलट्या होऊन शरीरातील पाणी व विद्युत् विच्छेद्य ( इलेट्रोलाइट्स ) कमी होणे यांचा समावेश होतो.

उपचार : स्वाइन फ्ल्यूच्या ( एचवन एनवन ) विषाणूंचा प्रतिबंध व उपचार यांसाठी टॅमी फ्ल्यू व रेलेन्झा या औषधांचा वापर केला जातो.

टॅमी फ्ल्यू : हे औषध गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. ही गोळी ७५ मिग्रॅ.ची असून रोज दोन याप्रमाणे पाच दिवस दिली जाते. एक वर्षावरील रुग्णांवर उपचारासाठी, तर ३ महिने ते १ वर्ष गटातील रुग्णांवर प्रतिबंधासाठी या औषधाचा वापर केला जातो.

रेलेन्झा : तोंडात फवारा मारण्याच्या स्वरूपात हे औषध उपलब्ध आहे. याचा १० मिग्रॅ.चा फवारा दिवसातून दोनदा याप्रमाणे पाच दिवस दिला जातो.

प्रतिबंधात्मक उपाय : स्वाइन फ्ल्यूचा व्हायरस वातावरणात दोन आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो. यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवतात. त्यासाठी विविध जंतुनाशकांचा वापर करतात. स्वाइन फ्ल्यू बाधित व्यक्तींच्या संपर्कात राहिल्याने हा रोग पसरत असल्यामुळे वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षिततेकडे लक्ष दिले जाते. तोंडाला मुखाच्छादन ( मास्क ) बांधतात. शय असल्यास हातमोज्यांचा वापर करतात. हात-पाय जंतुनाशक साबणाने अथवा अन्य प्रकाराने स्वच्छ करतात. घराच्या स्वच्छतेसाठी लोरीनयुक्त सौम्य विरंजक द्रावणाचा वापर केला जातो. दारांच्या कड्या, दिव्यांची बटणे, टेबले, सार्वजनिक वर्तमानपत्रे, सार्वजनिक वाहनांमधील कड्या, साखळ्या, नळ इ. वस्तूंना हात लावण्याचे शयतो टाळतात. डोळे, नाक व तोंडाला हात लावण्याचे रुग्णांबरोबर अनावश्यक संपर्क बाधित प्रदेशातील प्रवास व मानसिक ताण टाळतात. खोकताना व शिंकताना तोंडावर हात न धरता टीपकागदाचा वापर करतात. स्वाइन फ्ल्यूचा संसर्ग झाल्यास भरपूर विश्रांती घेऊन घाबरून न जाता स्वतःचे आरोग्य सांभाळणे इष्ट असते. भरपूर झोप व आहारात द्रव पदार्थ घेतात. नियमित शारीरिक हालचाल करणे गरजेचे असते. तसेच रुग्णालयातील तज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार व पथ्यपाणी करणे योग्य असते.

दीक्षित, रा. ज्ञा. वाघ, नितिन भ.