उलतकंबळ :(उलतकंबळ, तांबोळ, ओलक तंबोल हिं. कुमल क. मेल्पुंडिगिड इं. डेव्हिल्स कॉटन लॅ. अँब्रोमा आउगुस्टा कुल-स्टर्क्युलिएसी). हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) झुडूप (किंवा लहान वृक्ष) भारत (उत्तर प्रदेश ते सिक्कीमपर्यत, खासी टेकड्या व आसाम), इंडोनेशिया, चीन, फिलिपीन्स, पाकिस्तान इ. देशांतील उष्ण प्रदेशांत, जंगलांत किंवा लागवडीत आढळते. बागेत शोभेकरिता लावतात. सर्व भाग लवदार पाने साधी, १५ × १२ सेंमी., एकाआड एक, पातळ व कमीजास्त प्रमाणात त्यांची कडा दातेरी किंवा तरंगित असते. फुले जांभळट लालसर व ५ सेंमी. व्यासाची असून शेंड्यावर अथवा पानांसमोर झुबक्यांनी येतात. फळे (बोंडे ) खाली अरूंद व वर पसरट असून त्यावर पाच पातळ पंखासारखे भाग असतात. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे सामान्यत:  स्टर्क्युलिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे बिया अनेक व मऊ केसांनी आच्छादलेल्या. या झाडाच्या सालीपासून फिकट, पिवळट, मऊ व गुळगुळीत धागे (वाख व तागापेक्षा सरस असलेले ) काढून त्यापासून दोऱ्या, कोळ्यांची जाळी वगैरे वस्तू करतात. यापासून कृत्रिम रेशीम व त्याच्या वस्तू तयार करणे शक्य आहे. या झुडूपाची लागवड  सनताग  व ताग  यांपेक्षा सोपी असून वर्षातून तीन-चार पिके घेणे शक्य असल्याने पुरवठा व किंमत यादृष्टीने फायदेशीर होणेही शक्य आहे. या वनस्पतीचे मूळ व त्याची साल औषधी आहे. मूळ गर्भाशयास उत्तेजक व पौष्टिक असून आर्तव (मासिक पाळी) नियमित करण्यास साल वाटून काळ्या मिरीबरोबर देतात.

परांडेकर, शं. आ.