स्मॉलिट, टोबायस जॉर्ज : (१९ मार्च १७२१—१७ सप्टेंबर १७७१). इंग्रज कादंबरीकार. जन्म कार्ड्रोस, डंबर्टन (स्कॉटलंड) येथे. (१९ मार्च १७२१ ही तारीख त्याच्या बाप्तिस्म्याचा दिवस म्हणून काही ठिकाणी नमूद केलेली आहे .) आरंभीचे शिक्षण ‘ डंबर्टन ग्रामर स्कूल ’ मध्ये घेतल्यानंतर त्याने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ग्लासगो विद्यापीठात प्रवेश घेतला तथापि १७३९ मध्ये पदवी न घेताच त्याने ते विद्यापीठ सोडले. पुढे १७५० मध्ये ॲबर्डीन येथील ‘ मारिश्चल कॉलेज ’ मधून त्याने एम्. डी. ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली. गणित, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, वाङ्मय ह्या विषयांचा अभ्यासही त्याने केला होता मात्र लेखक होण्याची त्याची इच्छा होती. ग्लासगो विद्यापीठ सोडल्यानंतर काही काळ ग्लासगोमध्ये वैद्यकीय सेवेची उमेदवारी त्याने केली. त्यानंतर रेजिसाइड हे नाटक घेऊन तो लंडनला गेला होता. पुढे वर्षभराने रॉयल नेव्हीत शल्यविशारदाचा सहायक म्हणून त्याला काम मिळाले. आर्थिक अडचण असल्यामुळे त्याने ते स्वीकारले. तेथे काम करताना समुद्री जीवनाचा अनेक प्रकारचा अनुभव त्याला मिळाला. नोकरीनिमित्ताने जमायका येथे असताना ॲन लासाल हिच्याशी त्याचा ( बहुधा १७४३ मध्ये ) विवाह झाला. १७४४ मध्ये लंडनमध्ये वैद्यकीय व्यवसायात आपले बस्तान बसव-ण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने कविता लिहिण्यास आरंभ केला. रेजिसाइड हे आपले पहिले नाटक रंगभूमीवर आणण्याचा अयशस्वी प्रयत्नही त्याने केला. त्याच्या प्रासंगिक कवितांत ‘ टिअर्स ऑफ स्कॉटलंड ’ ही भावोत्कट उद्देशिका उल्लेखनीय आहे तथापि पुढे तो ‘ पिकरस्क ’ कादंबर्यांकडे वळला. रॉडरिक रँडम (१७४८) ही त्याची या प्रकारातली पहिली कादंबरी. ह्या कादंबरीत त्याने निर्माण केलेल्या दुर्गुणी व्यक्तिरेखा, अप्रशस्त भाषा यांसारख्या दोषांवर समीक्षकांनी केलेल्या टीकेमुळे ती वादग्रस्त ठरली तथापि नाविक युद्धांची भीषण वर्णने, गतिमान निवेदन आणि काहीशा अनघडपणे रेखाटलेली व्यक्तींची रंगतदार विडंबनचित्रे ह्यांमुळे सर्वसाधारण इंग्रज वाचकांना ती आवडली. कादंबरीचा तरुण नायक रॉडरिक हा एकामागून एक साहसे करीत जातो. ह्या जगात टिकून राहायचे, तर चातुर्याचा वापर करायला हवा, हे तो अनुभवाने शिकतो.
स्मॉलिटच्या रॉडरिक रँडम ह्या पहिल्या कादंबरीनंतर पेरीग्रीन पिकल (१७५१), फर्डिनंड काउंट फॅदम (१७५३), सर लॉन्सेलॉट ग्रीव्ह्ज (१७६०-६१) आणि हंफ्री क्लिंकर (१७७१) ह्या त्याच्या कादंबर्या प्रसिद्ध झाल्या. पेरीग्रीन पिकलमध्ये विख्यात इंग्रज कादंबरीकार ⇨ हेन्री फील्डिंग आणि श्रेष्ठ इंग्रज अभिनेता ⇨ डेव्हिड गॅरिक ह्यांच्यावर त्याने व्यक्तिगत हल्ले चढवले होते. भ्रष्टाचारी आणि संवेदनाशून्य जगात आपली बुद्धिमत्ता कौशल्याने वापरली पाहिजे, हाच संदेश त्याने दिला. फर्डिनंड काउंट फॅदम ही कादंबरी त्याच्या पहिल्या कादंबर्यांच्या तुलनेत फारशी यशस्वी ठरली नाही. सर लॉन्सेलॉट ग्रीव्ह्ज मध्ये ⇨ सरव्हँटीझ च्या डॉन क्विक्झोट ची कथा अठराव्या शतकातील व्यक्तिरेखांच्या चौकटीत बसविण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. हंफ्री क्लिंकर ही त्याची अखेरची आणि सर्वोत्कृष्ट कादंबरी. ती पत्ररूप आहे. ह्या कादंबरीची संरचना त्याने अधिक काळजीपूर्वक केली आहे. तसेच मानवी स्वभावाचा विचारही अधिक समतोलपणे केलेला आहे. मॅथ्यू ब्रँबल आणि त्याच्या कुटुंबीयांचा व त्यांच्या सोबत्यांचा इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडचा प्रवास ह्या कादंबरीत निरनिराळ्या पत्रांच्या माध्यमातून त्याने वर्णिला आहे. प्रवासातल्या आपल्या अनुभवांकडे अगदी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पत्रलेखकांनी पाहिले आहे.
या सर्व कादंबर्यांतून चावर्या उपरोधाचा घटक तीव्रतेने प्रत्ययास येतो. धक्कादायक पाशवीपणा आणि हिंसा यांच्या चित्रणामुळेही त्याच्या कादंबर्या अठराव्या शतकातल्या मध्यात ख्याती पावलेल्या हेन्री फील्डिंग, ⇨ सॅम्युएल रिचर्ड्सन आणि ⇨ लॉरेन्स स्टर्न ह्या इंग्रज कादंबरीकारांपेक्षा वेगळ्या उठून दिसतात.
स्मॉलिटने वैद्यकीय पदवी घेतलेली असली, तरी वैद्यकीय व्यवसाया-पेक्षा व्यावसायिक लेखक म्हणून लेखनावरच त्याने चरितार्थ चालवला. १७५६ च्या सुमारास त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय जवळ-जवळ सोडूनच दिला होता. नाटककार म्हणून तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. त्याने लिहिलेला इंग्लंडचा इतिहास—द कंप्लीट हिस्टरी ऑफ इंग्लंड — १७५७-५८ मध्ये चार भागांत प्रसिद्ध झाला. या लेखनाने त्याला खरे आर्थिक यश प्राप्त करून दिले. ह्या ग्रंथाचा पाचवा खंड त्याने पूर्ण केला आणि या खंडासह इंग्लंडच्या इतिहासाचे पाच खंड १७६०—६५ ह्या कालखंडात प्रसिद्ध झाले. १७५७ मध्ये द रिप्राइझल : ऑर, द टार्स ऑफ ओल्ड इंग्लंड हा त्याने लिहिलेला फार्स रंग- मंचावर आला आणि यशस्वी झाला. १७६६ मध्ये ट्रॅव्हल्स थ्रू फ्रान्स अँड इटली हे त्याचे प्रवासवृत्त दोन भागांत प्रसिद्ध झाले. ह्या प्रवासात भेटलेल्या व्यक्ती, त्यांच्या चालीरीती, कला इत्यादींवरील निरीक्षणे त्यांत नोंदविलेली आहेत. सरव्हँटीझच्या डॉन क्विक्झोट चे त्याने केलेले इंग्रजी भाषांतर १७५५ मध्ये प्रसिद्ध झाले.
स्मॉलिटने क्रिटिकल रिव्ह्यू या नियतकालिकाचे संपादन केले तसेच ब्रिटिश मॅगझीन या नियतकालिकाच्या प्रकाशनातही मदत केली होती. इटलीतील लिव्होर्नो येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Boege, Fred W. Smallett’s Reputation as a Novelist, 1947.
2. Kahrl, George, M. Tobias Smallett : Traveller–Novelist, 1945.
3. Knapp, Louis M. Tobias Smallett : Doctor of Men and Manners, 1949.
4. Spector, Robert D. Tobias Smallett, 1968.
कुलकर्णी, अ. र.
“