स्पार्टा : ग्रीसमधील एक प्राचीन नगरराज्य, आधुनिक व्यापारी शहर व लॅकोनिया परगण्याच्या राजधानीचे शहर. ते स्पार्टासच्या आग्नेयीस सु. १४४ किमी.वर यूरोटस नदीकाठी वसले आहे. प्राचीन काळी ते लॅसडियन या नावाने परिचित होते. लोकसंख्या ३५,२५९ (२०११). मायसीनी संस्कृतीच्या काळात (इ. स. पू. १६०० — १२००) स्पार्टाचा उल्लेख आढळतो. मेनलेअस राजाची पत्नी हेलन हिला स्पार्टातून पॅरिसने( अलेक्झांडर ) पळवून नेल्यामुळे ट्रोजन युद्ध (इ. स. पू. सु. ११९३ — ११८४) उद्भवले. त्यानंतर स्पार्टा डोरियन लोकांनी लुटले आणि मेसिनिया येथे वसाहत स्थापन केली (इ. स. पू. ८००). त्या वेळी स्पार्टात अल्पतंत्र राज्यपद्धती असून दोन राजे ( सत्ताधीश ) व तीस सभासदांचे सिनेट कार्यरत होते. राजा युद्धकाळात सर्वंकष अधिकार उपभोगीत असे तर शांततेच्या वेळी सिनेट प्रशासन चालवीत असे. त्यांनी मेसिनिया हा समृद्ध प्रदेश जिंकून घेतला. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या स्पार्टा समृद्ध झाले आणि सांस्कृतिक प्रगती होऊन परदेशी कवी व कलाकार या नगराकडे आकृष्ट झाले तथापि स्पार्टाचा चिरंतन शत्रू आर्गॉस नगराकडून पराभव झाला (इ. स. पू. ३८८). तसेच मेसिनियनांच्या बंडखोरीला तोंड द्यावे लागले. ती स्पार्टाने शमविली आणि लष्करी सामर्थ्यावर, विशेषतः योद्धे व युद्धसामग्रीवर, भर दिला आणि पेलोपनीशियन संघाची स्थापना केली. त्यात इतर स्वल्पतंत्र नगरराज्यांना सामावून घेतले. पहिला क्लिऑमनीझ (कार. इ. स. पू. ५२१ — ४९०) या स्पार्टाच्या राजाने सत्ताविस्तारासाठी अथेन्सवर हल्ला केला आणि तेथील हिपीअस (कार. इ. स. पू. ५२७ — ५१०) या जुलूमशहाला बडतर्फ केले. आर्गॉस नगर त्याने आधीच जिंकले होते. या काळात लायकरगस या विधिज्ञाने राजकीय व सामाजिक संस्थांचे संवर्धन केले. इराणने ग्रीसवर स्वारी करण्याची धमकी दिली, तेव्हा स्पार्टाने अथेन्सला सर्वतोपरी मदतीचे वचन दिले. पुढे झर्क्सीझने मोठे सैन्य घेऊन ग्रीसवर चाल केली, तेव्हा सर्व नगरराज्यांचे नेतृत्व स्पार्टाने केले पण पराभव झाला. त्यानंतर इ. स. पू. ४७९ मध्ये पॉसेनिअस या ग्रीक सेनापतीने प्लाटिया येथे विजय मिळविला. त्याने इराणच्या ताब्यातील ग्रीस नगरराज्ये सायप्रस व बायझंटिन यांच्या जोखडातून मुक्त केली मात्र त्याच्या उद्दाम व महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे ग्रीक नागरिकांकडून तक्रारी आल्या, तेव्हा त्याला माघारी बोलाविले. या सुमारास इराणविरुद्ध लढण्यासाठी अथेन्सच्या नेतृत्वाखाली डेलियन संघाची इ. स. पू. ४७८ — ४७७ स्थापना झाली. पहिल्या झर्क्सीझच्या मृत्यूनंतर ग्रीसवरील इराणच्या आक्रमणाचे संकट टळले पण अथेन्सचे वर्चस्व वाढले. तेव्हा त्यातील अनेक सभासद बाहेर पडले आणि युद्धाच्या वेळी पेलोपनीशियन संघ संपुष्टात आला. अथेन्सने इ. स. पू. ४६१ मध्ये आर्गॉसबरोबर मैत्री करून स्पार्टाच्या जमिनीवरील वर्चस्वास आव्हान दिले. तेव्हा घनघोर युद्ध होऊन तनाग्रा येथे स्पार्टाने विजय मिळविला (इ. स. पू. ४५८). त्या वेळी अथेन्सने तीस वर्षांचा शांतता तह केला. अथेन्सने स्पार्टाचे जमिनीवरील वर्चस्व मान्य केले आणि स्पार्टाने त्यांचे आरमारी वर्चस्व मान्य केले. परंतु स्पार्टाची मित्र नगरराज्ये आणि अथेन्सविषयीची भीती यांतून इ. स. पू. ४३१ मध्ये पेलोपनीशियन युद्धाला तोंड फुटले आणि स्पार्टाने अथेन्सविरुद्ध युद्ध पुकारले. हा पेलोपनीशियन संघर्ष दीर्घकाळ चालला. यात अथेन्सने पेलोपनीशियस किनारा पादाक्रांत करून १२० स्पार्टन सैनिकांना पकडले आणि सिझिकसच्या लढाईत ( इ. स. पू. ४१०) स्पार्टाचा दारुण पराभव केला. तेव्हा स्पार्टाच्या लायसँडर या नौदल प्रमुखाने इराणच्या साहाय्याने नवे आरमार उभारले व नोशीमच्या संग्रामात अथेन्सचा पराभव केला. तसेच इगस्पॉटमसच्या लढाईत अथेन्सच्या आरमाराचा धुव्वा उडविला आणि स्पार्टाच्या मांडलिक नगरराज्यांनी अथेन्सवर आपल्या फौजा धाडल्या, तेव्हा अथेन्सने शरणागती पत्करली ( इ. स. पू. ४०४). अथेन्स पूर्णपणे नष्ट करण्याचा कॉरिंथ व थीब्झ यांचा सल्ला लायसँडरने मानला नाही. तेथे स्वल्पतंत्र स्थापन केले व ग्रीसचे नेतृत्व अथेन्सकडून स्पार्टाकडे आले. अथेन्सला मानहानिकारक शांतता तह स्वीकारावा लागला पण हा विजय अल्पकाळच टिकला. स्पार्टाच्या मांडलिक नगरराज्यांत स्पार्टाच्या उद्दाम व क्रूर शासकांमुळे बंडखोरी झाली. थीब्झचा सेनापती व मुत्सद्दी इपॅमिनॉन्डस याने ल्यूक्याच्या युद्धात ( इ. स. पू. ३७१) पहिला क्लीॲमब्रटस ( कार. इ. स. पू. ३८० — ३७१) राजाच्या नेतृत्वाखाली सैन्याचा पराभव केला. त्यानंतर थीब्झने मेसिनियनांना स्पार्टाच्या जाचातून मुक्त केले. या निर्णायक लढाईमुळे स्पार्टा एक कमकुवत नगरराज्य झाले आणि पुढे इ. स. पू. १४६ मध्ये स्पार्टा रोमनांच्या नियंत्रणाखाली आले. व्हिसिगॉथांनी इ. स. ३९६ मध्ये स्पार्टा उद्ध्वस्त केले. बायझंटिन यांनी त्याची पुनर्बांधणी केली आणि त्यास प्राचीन लॅसेडीमॉन हे नाव दिले. तेराव्या शतकात फ्रँक लोकांनी स्पार्टाच्या नैर्ऋत्येस १२०४ मध्ये मिस्ट्रॉनामक गडनगरी टेईजेटस पर्वतरांगेच्या कड्यावर बांधली. इ. स. १२५९ नंतर ती पेलोपनीशियसची राजधानी होती. १४६० पासून ग्रीक स्वातंत्र्यापर्यंत (१८३०) हा प्रदेश तुर्कांच्या आधिपत्याखाली होता.

आधुनिक स्पार्टा शहराची स्थापना १८३४ मध्ये प्राचीन स्पार्टाच्या जागी करण्यात आली. त्याला नी (नवीन) स्पार्टी असे स्थानिक नाव प्राचीन अवशेषांच्या स्पार्टाहून भिन्नता दर्शविण्यासाठी देण्यात आले. या ठिकाणी १९०६ — १० आणि १९२४ — २९ दरम्यान उत्खनने झाली. त्यांत काही मौलिक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. सांप्रत स्पार्टा हे एक औद्योगिक आणि वाणिज्य केंद्र असून येथून ऑलिव्ह तेल व लिंबूवर्गीय फळे यांचा व्यापार चालतो. प्राचीन काळी उपयोगात असणारे एक लहान गिथिऑन (आधुनिक यिथिआन) बंदर स्पार्टाच्या आग्नेयीस सु. ४५ किमी.वर आहे.

पहा : अथेन्स ट्रोजन युद्ध डेलियन संघ पेलोपनीशियन युद्धे.

देशपांडे, सु. र.