हॉर्न भूशिर : दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण टोकास असलेले उंच भूशिर. हे चिली देशाच्या टिएरा डेल फ्यूगो द्वीपसमूहातील हॉर्न बेटावर, ५५° ५९′ द. अक्षांश व ६७° १६′ प. रेखांश यांदरम्यान आहे. या भूशिराची उंची ४२४ मी. असून हे भूशिर सागरात खूप आतपर्यंत पसरले आहे. या भूशिराचा शोध डच समन्वेषक विल्यम सी. शाउटेन व ईसाक ले मरे यांनी १६१६ मध्ये लावला. शाउटेन याने या भूशिरास नेदर्लंड्समधील स्वतःच्या जन्म गावावरून होर्न भूशिर असे नाव दिले. नंतर त्याचे हॉर्न असे नाव झाले. सर फ्रान्सिस ड्रेक हा इंग्लिश दर्यावर्दी १५७७ मध्ये गोल्डन हिंद बोटीतून पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना वादळी वाऱ्यामुळे ५७° द. अक्ष-वृत्तापर्यंत पोहचला होता मात्र तो हॉर्न भूशिरापर्यंत गेला किंवा नाही, याविषयी शंका घेण्यात येते. जेम्स कुक, विल्यम ब्लिग इ. समन्वेषकही हॉर्न भूशिरापर्यंत आले होते.

 

पनामा कालवा जलवाहतुकीस सुरू होईपर्यंत पूर्व-पश्चिम भागात होणारी जलवाहतूक हॉर्न भूशिराला वळसा घालून होत असे. त्यामुळे या भागातील वाहतुकीस खूपच महत्त्व होते. थंड हवामानामुळे येथे वनस्पती तुरळक आहेत. तसेच जोरदार वादळी वारे व थंड हवामान यांमुळे हॉर्न भूशिरापासून नौकावहन अत्यंत धोकादायक असते. त्यासाठी धैर्य, सहनशक्ती व कौशल्य या बाबींची आवश्यकता असल्याचे म्हटले जाते.

  

गाडे, ना. स.