पद्मदुर्ग: कुलाबा जिल्ह्यातील एक भुईकोट किल्ला. मुरुड तालुक्यात राजपुरी खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येस सु. ३ किमी. वर एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. निजामशाहीच्या काळात सद्दी लोकांनी कुलाबा व रत्नागिरी या जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यावर आपली सत्ता स्थापन केली आणि तेथे काही जलदुर्ग व भुईकोट किल्ले बांधले. दांडा राजपुरी हा त्यांपैकीच एक किल्ला होता. हा किल्ला घेण्याचा शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केला पण तो घेणे त्यांना शक्य झाले नाही. निदान दांडा राजपुरीकडील सिद्द्यांची सत्ता वाढू नये, म्हणून शिवाजीने दांडा राजपुरीसमोर सिद्दीला जरब बसविण्याच्या उद्देशाने एक नवीनच भुईकोट किल्ला बांधला आणि त्यास पद्मदुर्ग हे नाव ठेविले. या किल्ल्याच्या आश्रयाने दांडा राजपुरी काबीज करण्याच्या हेतूने पेशवे मोरोपंत पिंगळे १६६९ मध्ये दांडा राजपुरीवर चालून गेले असता, त्या प्रदेशातील शिवाजीच्या सुभेदाराने मोरोपंतास आवश्यक ती सामग्री पुरविली नाही. त्यामुळे शिवाजीच्या आरमाराची कुचंबणा झाली आणि ही मोहीम फसली. सुभेदाराने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुढे शिवाजीने एका पत्रात त्याची खरमरीत शब्दात कानउघाडणी केली. यानंतर मात्र या किल्ल्याचे नाव फारसे एेकू येत नाही.

खरे, ग. ह.