स्पॅनिश साहित्य : स्पॅनिश ही रोमान्स भाषासमूहातील एक भाषा असून स्पेन ह्या राष्ट्राची ती अधिकृत भाषा आहे. स्पेनप्रमाणेच बहुतेक लॅटिन — अमेरिकन देशांचीही ती अधिकृत भाषा आहे. संपूर्ण जगात सु. २९७ दशलक्ष लोक ही भाषा बोलतात. ह्या भाषेला लॅटिन–अमेरिकन देशांत कॅस्टीलियन भाषा असेही संबोधतात. कॅस्टीलियन, कॅटालन आणि गॅलिशियन अशा तीन बोलीभाषा स्पेनमध्ये बोलल्या जात होत्या. गॅलिशियन आणि पोर्तुगीज या दोन भाषांचे नाते अतिशय निकटचे आहे. स्पेनमधील मध्ययुगीन साहित्याचा विचार करीत असताना गॅलिशियन-पोर्तुगीज असाही शब्दप्रयोग केला जातो. आजची स्पॅनिश भाषा ही कॅस्टीलियनमधून विकसित झालेली असल्यामुळे तिला स्पॅनिश आणि कॅस्टीलियन अशी दोन नावे आहेत.

स्पॅनिश साहित्यावर परिणाम घडविणारे दोन ऐतिहासिक कालखंड विशेष महत्त्वाचे आहेत. एक, इ. स. पू. २०० पासून सु. ६०० वर्षे स्पेनवर रोमनांची सत्ता होती. रोमनांकडून स्पेनला लॅटिन भाषेचा वारसा मिळाला. दुसरा कालखंड सु. ७०० वर्षांचा ( इ. स. ७००—१४०० ). ह्या कालखंडात इस्लाम धर्मीय मूर आणि ख्रिस्तीधर्मीय ह्यांच्यात स्पेनवर वर्चस्व मिळविण्यासाठी लढा चालू होता. ह्या लढ्यामुळे एक प्रकारचा धार्मिक राष्ट्रवाद निर्माण होऊन त्यातून जगातील काही उत्कृष्ट धार्मिक कविता आणि गद्य लिहिले गेले.

मध्ययुगीन स्पॅनिश ( कॅस्टीलियन ) साहित्य : दहाव्या शतकापासून स्पेनमध्ये भावकवितांची परंपरा होती तथापि कॅस्टीलियन-मधील साहित्य बाराव्या शतकापासूनचे आहे. Poema de mio Cid (  सु. ११४०, इं. शी. ‘ पोएम ऑफ माय थीद ’ ) ही कॅस्टीलियन भाषेतील आरंभीची एक श्रेष्ठ साहित्यकृती होय. ह्या महाकाव्याची १३०७ सालची  एक हस्तलिखित प्रत उपलब्ध आहे. हे काव्य ३,७३५ ओळींचे आहे. आपल्या राजाच्या मर्जीतून उतरलेला एक शूर योद्धा आत्मसन्मान पुन्हा कसा प्राप्त करून घेतो, हा या काव्याचा विषय. याचा कर्ता अज्ञात आहे पण तो मुस्लिम सत्तेखालील स्पॅनिश प्रदेशात जन्मलेला ख्रिस्ती असावा. कॅस्टील आणि सॅरागॉसा ही अरबांची राज्ये. यांच्या सीमारेषेवरील मेदीनाचेली या ठिकाणचा तो रहिवासी होता, असे दिसते. फ्रेंच भाषेतील ला शांसाँ द रॉलां हे वीरकाव्य, तसेच त्या भाषेतील इतरही वीरकाव्ये त्याने वाचली असावीत पण त्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपले काही वेगळेपण दाखवावे, असा त्याचा हेतू दिसतो. हे महाकाव्य रचताना त्याने त्याच्यापूर्वी रचल्या गेलेल्या काही स्पॅनिश महाकाव्यांचा आदर्श समोर ठेवलेला आहे. रोद्रीगो दीआझ दे व्हिवार हा वीरपुरुष ह्या काव्याचा नायक आहे. ‘ थीद ’ या नावाने तो लोकप्रिय होता. ज्या राजाच्या ( आल्फान्सो सहावा ) सेवेत तो होता, त्याचे कान थीदच्या एका शत्रूने भरल्यामुळे त्याला राज्याबाहेर घालविण्यात आले. त्यानंतर ऑरगॉनमधील छोट्या छोट्या मूरिश राज्यांतून त्याने सेवा केली. लढायांतून पराक्रम केले. मूरांशीही तो लढला. त्याचे पराक्रम आणि त्याने मिळविलेली कीर्ती पाहून राजाचे मतपरिवर्तन झाले आणि त्याची थीदवर पुन्हा मर्जी झाली. थीद ही एक ऐतिहासिक व्यक्ती आहे. या महाकाव्याने ऐतिहासिक घटनांशी बरेच इमान राखलेले आहे. हे काव्य अतिशय लोकप्रिय असून त्याच्यावर अनेक काव्ये-नाटके लिहिली गेली. उदा., Cantar de Rodrigo ( इं. शी. ‘ साँग ऑफ रॉद्रीगो ’ ) हा थीदच्या जीवनावर लिहिला गेलेला रोमान्स मात्र त्याला फारसा ऐतिहासिक पाया नाही.

स्पॅनिश वीरकाव्यांपैकी काही उल्लेखनीय काव्ये अशी : Los siete infantes de Lara ( इं. शी. ‘ द सेव्हन प्रिन्सेस ऑफ लारा ’ ), El cerco de Zamora ( इं. शी. ‘ द सीज ऑफ झामोरा ’) आणि Bernardo del Carpio. कॅस्टीलच्या सरंजामशाही इतिहासाशी या काव्यांचे विषय निगडित आहेत.

बाराव्या-तेराव्या शतकांत कथनपर कवितेचा एक नवा संप्रदाय प्रचलित झाला. जनसमुदायापुढे आपल्या कविता म्हणून दाखविणार्‍या चारणांपेक्षा त्यांची कविता वेगळी होती. ह्या कवितेचा रसिक वर्ग सुशिक्षित होता. धार्मिक, बोधपर आणि मिथ्या ऐतिहासिक ( स्यूडो हिस्टॉरिकल ) अशी ही कविता होती. तिला mester de clerecia ( इं. शी. ‘ क्राफ्ट ऑफ द क्लर्जी ’ ) असे नाव आहे. ह्या कवितेचे कवी अभ्यासू असत. ह्या कवितेचे प्रातिनिधिक रूप गोंथालो दे बेर्थेओ ( सु. ११९८ — १२६५ ) ह्याच्या कवितेत पाहावयास मिळते. नावाने ज्ञात असलेला हा पहिला स्पॅनिश कवी होय. त्याची कविता भक्तिपर आहे. स्पॅनिश संत, कुमारी मेरीचे चमत्कार ह्यांसारखे त्याच्या कवितेचे विषय आहेत. आशयाच्या मांडणीसाठी स्पष्टता आणि चित्रमयता हे त्याच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय.

गद्याचा आरंभ : स्पॅनिश गद्यावर अरबी भाषेचा मोठा प्रभाव होता. मुस्लिमांच्या ताब्यातील टोलीडोवर ख्रिश्चनांनी ताबा मिळवल्यानंतर पौर्वात्य ज्ञानसंचिताचा परिचय त्यांना झाला. पौर्वात्य भाषांतील ग्रंथांचे स्पॅनिशमध्ये अनुवाद करण्याचे टोलीडो हे एक केंद्र झाले. संस्कृत पंचतंत्राच्या अरबी भाषांतराच्या आधारे पंचतंत्र  स्पॅनिश भाषेत आले. पौर्वात्य साहित्या-तील इतर काही कथाही स्पॅनिशमध्ये अनुवादिल्या गेल्या. पेद्रो आल्फॉन्सो याने ११२० मध्ये काही पौर्वात्य बोधकथांचे स्पॅनिशमध्ये भाषांतर केले.

बाराव्या शतकाच्या मध्याला कॉर्दोव्हा, व्हॅलेंशिया आणि सेव्हिल ही ठिकाणे ख्रिश्चनांनी मुस्लिमांकडून जिंकून घेतली. काही विद्यापीठे स्थापन झाल्यामुळे बौद्धिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याच कालखंडात आल्फॉन्सो दहावा ( १२२१—८४ ) हा लेऑन आणि कॅस्टील ह्या स्पेनमधील प्रदेशांचा राजा झाला ( १२५२ ). विद्वान लेखक असलेल्या या राजाने अरबी आणि लॅटिन भाषांतील अनेक उत्कृष्ट ग्रंथांचे अनुवाद आपल्या पदरी असलेल्या विद्वानांकडून करून घेतले. त्यांत खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषविषयक ग्रंथही होते. इतिहासाच्या लेखन-अध्ययनासाठी एक स्वतंत्र संस्था त्याने स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून प्रथमच स्पॅनिशमध्ये दोन इतिहासग्रंथ लिहिले गेले. त्यांतील एक ग्रंथ General estoria हा विश्वेतिहास लिहिण्याच्या दिशेने केलेला एक प्रयत्न आहे, तर Estoria de Espana किंवा Primera cronica general या दुसर्‍या ग्रंथात स्पेनचा आरंभीपासून दुसर्‍या फर्डिनंडच्या मृत्यूपर्यंतचा (१२५२) इतिहास आहे. आल्फॉन्सो हा जसा स्पॅनिश गद्याचा जनक, तसाच तो स्पॅनिश इतिहासलेखनाचाही जनक होय. आल्फॉन्सो हा कवीही होता मात्र आपल्या ४०० भावकविता त्याने स्पॅनिशमध्ये नव्हे, तर गॅलिशियनमध्ये लिहिल्या.

चौदावे शतक : स्पेनच्या इतिहासातले हे शतक यादवी युद्ध आणि इतर लढाया यांनी ग्रासलेले होते. दहाव्या आल्फॉन्सोच्या काळात विद्या-व्यासंगाचे जे वातावरण होते, ते या शतकात मंदावले. त्यातच ‘ ब्लॅक डेथ ’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या तापाच्या साथीने स्पेनमध्ये हातपाय पसरले अनेकांचे प्राण घेतले. ह्या शतकात होऊन गेलेल्या स्पेनच्या राजांना साहित्याला आश्रय देण्यात फारसा रस नव्हता तथापि अशा परिस्थितीतही साहित्यनिर्मिती होत होती. ह्या काळातील किमान दोन साहित्यिक ठळकपणे नजरेत भरतात : एक, दॉन व्हान मानवेल ( १२८२—१३४८ ) आणि दोन, व्हान रूईथ म्हणजेच आर्थिप्रेस्टे डे इटा. मानवेलने ५० गद्य बोधकथा लिहिल्या. त्या काउंट लूकानोर : ऑर, द फिफ्टी प्लेझंट स्टोअरीज ऑफ पात्रोनिओ ( १८६८, इं. भा. ) या ग्रंथात संग्रहित आहेत. त्या लिहिताना त्याने काही अरबी ग्रंथांचा आधार घेतलेला असला, तरी लेखक म्हणून त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्याने कथांच्या केलेल्या हाताळणीतून, तसेच त्याच्या शैलीतून येतो. आर्थिप्रेस्टे डे इटा याचा लिब्रो डे कांटारेस ओ डे बुएन आमोर ( इं. शी. ‘ बुक ऑफ ट्रू लव्ह ’ ) हा काव्यसंग्रह. त्यात लहानमोठी कथनकाव्ये आहेत. काही गीतेही आहेत. ह्या कवितांचा सर्वसाधारण सूर आनंदी, उपरोधप्रचुर असा आहे. प्रेम हा विषय त्याने नाजूकपणे आणि कधीकधी विनोदी पद्धतीने हाताळला आहे. काही ईश्वरस्तोत्रेही त्याने लिहिली आहेत पण या सर्वांतून त्याच्या व्यक्तिगत जीवनाचा एक धागा सरकताना दिसतो, हे विशेष लक्षणीय आहे. अनेक भानगडींची प्रेमप्रकरणे ह्या काव्यसंग्रहात वर्णिली आहेत आणि ह्या प्रकरणांत सतत अव्हेरलेल्या प्रियकराची भूमिका आपल्या वाट्याला आली, असेही तो सांगतो. अनेक ठिकाणी तो सांगतो, की ह्या ग्रंथाचे प्रयोजन धार्मिक आणि नैतिक आहे. ह्या शतकात पहिला स्पॅनिश रोमान्स लिहिला गेला ( libro de cabellaria ) आणि पहिली परिपूर्ण स्पॅनिश कादंबरीही लिहिली गेली ( El caballero cifar इं. शी. ‘ द नाइट सायफर ’ ). सेंट यूस्टस हा ह्या साहित्यकृतींचा विषय. मुळात एक रोमन सेनापती असलेल्या यूस्टसने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. Amadis de Gaula हा आणखी एक निर्देशनीय रोमान्स. रोमान्समधील आर्थरिअन मालेशी तो संबंधित होता. त्यातील भावुक आदर्शवाद, भावकाव्यात्म वातावरण आणि अतिमानुष साहसे ह्यांमुळे सोळाव्या शतकात ह्या रोमान्सला मोठे महत्त्व प्राप्त झाले.


Proverbios morales ( सु. १३५५ ) याचा कर्ता सांतोब दे कारिऑन दे लोस काँदेस हा होय. या ग्रंथातील एकेक म्हण म्हणजे शहाण-पणाचे सत्त्व म्हणता येईल. जीवनातील कठोर कसोट्यांमुळे दुःख झाले तरी ते तत्त्वचिंतनशील आणि शांत अशा वृत्तीने स्वीकारावे, असा सूर ह्या म्हणींतून आढळतो.

Doctrina de la discrecion ( कर्ता पेद्रो दे व्हेराग्यू ) आणि Ravelacion de un ermitano याही या शतकातील उल्लेखनीय कविता. Doctrina…. या दीर्घ कवितेत दशाज्ञा ( टेन कमांडमेंट्स ),सात भयंकर पापे (  सेव्हन डेड्ली सिन्स ), पवित्र संस्कार ( सॅक्रमेंट्स )असे विषय स्पष्ट केले आहेत. Ravelacion…. ही एका वादाच्या स्वरू पाची कविता आहे. या आधीच्या — तेराव्या — शतकात अशी वादकाव्ये खूपच लोकप्रिय होती. ह्या कवितेत शरीर आणि आत्मा यांच्यातील वाद मांडला आहे.

पेद्रो लोपेथ दे आयाला ( १३३२ — १४०७ ) याने या शतकातील कवितेवर आणि गद्यावर आपला ठसा उमटवला. ‘ पोएम ऑफ पॅलेस लाइफ ’ (  इं. शी.) ही त्याची एक प्रमुख कविता. याशिवाय त्याने काही इतिवृत्ते ( क्रॉनिकल्स ) लिहिली. त्यांत पीटर पहिला, हेन्री दुसरा ( त्रास्तामाराचा ), जॉन पहिला आणि कॅस्टीलचा हेन्री तिसरा यांची इतिवृत्ते समाविष्ट आहेत. १३५० — १४०६ पर्यंतचा कालखंड ह्या इति-वृत्तांतून प्रसृत झाला आहे. यांतून समकालीनांचा इतिहास लिहिण्यास चालना मिळाली. याशिवाय रोमन इतिहासकार लिव्ही, रोमन तत्त्वज्ञ बोईथिअस, इटालियन लेखक बोकाचीओ, सेंट ग्रेगरी, सेंट इसिडोर यांचे साहित्य त्याने स्पॅनिशमध्ये अनुवादिले.

पंधरावे, सोळावे व सतरावे शतक : या शतकांत स्पॅनिश जीवनात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून आल्या. जॉन दुसरा (  कार. १४०६ — ५४  ) आणि हेन्री चौथा (  कार. १४५४ — ७४  ) ह्या कॅस्टीलच्या राजांच्या कारकिर्दीचा काळ हा राजकीय बखेड्यांचा आणि नैतिक र्‍हासाचा होता. तथापि जॉन दुसरा याची कन्या इझाबेला आणि आरँगोचा फर्डिनंड दुसरा ( कॅस्टीलचा राजा म्हणून फर्डिनंड पाचवा ) हे दांपत्य कॅस्टीलच्या राजपदी आल्यानंतर मोठे परिवर्तन घडून आले. काही सरदारांनी बंडाळी माजवली होती. त्यांचा बंदोबस्त करण्यात आला. पोर्तुगीज आक्रमणाचा  धोकाही संपवण्यात आला. ग्रानादाचे राज्य हा मूर लोकांचा अखेरचा बालेकिल्ला १४९२ मध्ये पडला. याच वर्षी कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला आणि त्यामुळे स्पेनला तेथे जाऊन आपल्या वसाहती स्थापन करण्याची संधी मिळाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीअखेरीस स्पेनमध्ये मुद्रणकला आली आणि मूर संस्कृतीपासून बाजूला होऊन स्पेनने प्रबो-धनाची अभिजात संस्कृती आत्मसात केली. त्यातूनच त्या अखेरीअखेरीस स्पॅनिश साहित्यातील सुवर्णयुग अवतरले (१५९८—१७००).

पंधराव्या शतकात स्पॅनिश भावकवितेने इटालियन कवितेच्या प्रभावा-खाली नवे रूप घेतले. स्पॅनिश कवींनी इटालियन काव्यप्रकार हाताळ-ण्यास आरंभ केला. जुन्या रूपाकडून नव्या रूपाकडे जाणार्‍या स्पॅनिश कवितेचे संक्रमण Cancionero de Baena (  इं. शी. ‘ साँगबुक ऑफ बीना ’ ) ह्या काव्यसंकलनात दिसते. व्हान आल्फॉन्सो दे बीना हा ह्या संकलनाचा कर्ता. Cancionero…. मध्ये ५५ कवींच्या ५८३ कविता अंतर्भूत आहेत. हे कवी सरदारांपासून समाजातील अगदी साध्यासुध्या माणसांच्या स्तरांपर्यंतचे आहेत. गॅलिशियन-पोर्तुगीज त्रूबदूरांची र्‍हासाला लागलेली कविता ज्याप्रमाणे ह्या संकलनात दिसते, त्याप्रमाणे बौद्धिकतेकडे झुकणारी आणि रूपक-प्रतीकांचा वापर करणारी कविताही या संकलनात आहे. कवितांचे विषय नैतिक, तात्त्विक आणि राजकीय स्वरूपाचे आहेत.

या संग्रहातल्या कवींपैकी काही इटालियन वळणाने लिहिणारे होते. त्यांत फ्रान्सिस्को इंपिरिअल ह्याचा समावेश होतो. तो अत्यंत बहुश्रुत होता. अभिजात साहित्याचा सखोल व्यासंग त्याने केलेला होता. लॅटिन, इटालियन, फ्रेंच, इंग्रजी आणि अरबी या भाषा त्याला येत होत्या. इटालियन महाकवी आलिग्येअरी दान्ते ह्याचे अनुकरण त्याने आपल्या कवितेत केलेले दिसते. स्पेनला दान्तेचा परिचय त्यानेच करून दिला. Cancionero de Stuniga हे आणखी एक उल्लेखनीय संकलन. हे संकलन आल्फॉन्सो पाचवा याच्या दरबारी असलेल्या लोपे दे स्ट्यूनिगा याने केले आहे. ह्या संग्रहातील कविता बीनाच्या संकलनातील कवितांपेक्षा अधिक भावगेय आहेत. बॅलड आणि लोकांना प्रिय असलेल्या इतरही काही कविता यात आहेत. या संकलनातील कवितांतून स्पॅनिश सत्तेखाली असलेल्या नेपल्सचे चित्र काही प्रमाणात आढळते. यातील बहुसंख्य कविता कार्बाकॉल ह्या कवीच्या आहेत. इटालियन भाषेत लिहिणारा हा पहिला कवी.

पंधराव्या शतकाच्या आरंभी एका अज्ञात कवीने लिहिलेले ‘ डान्स ऑफ डेथ ’ ( इं. शी. ) हे एक उत्कृष्ट काव्य आहे. यात मृत्यू आणि त्याने घेतलेले बळी यांच्यातील संवाद आहे. हा संवाद नाट्यरूपाने सादर करण्यासाठी लिहिलेला नसला, तरी उत्तरकालीन स्पॅनिश नाटकाचा त्याने पाया घातला. ‘ द लॅबरिंथ ऑफ फॉर्च्यून ’ ( इं. शी. ) ही व्हान मेना दे ( १४११ — ५६ ) याची दीर्घ, रूपकात्मक कविताही निर्देशनीय आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे एक इतिहासनाट्य या कवितेत त्याने उभे केले आहे. मात्र एक प्रकारचा पढीकपणा, लॅटिन भाषेतील शब्दांचे आणि निर्देशांचे प्राचुर्य ह्या कवितेला काहीसा उणेपणा आणणारे आहे.

मार्केथ दे सांतिल्याना ( इनिगो लोपेथ दे मेंडोथा ) (१३९८ — १४५८) हा पंधराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ स्पॅनिश कवी होय. या शतकातल्या काही सर्वोत्कृष्ट भावकविता त्याच्या आहेत. अतिशय सुसंस्कृत आणि व्यासंगी असा हा कवी होता. त्रूबदूरांची गॅलिशियन-पोर्तुगीज कविता, स्पॅनिश लोककाव्ये आणि इटालियन कवितेचे प्रकार यांतील जे सुंदर ते जाणून घेण्याची मर्मज्ञता त्याच्या ठायी होती. इटालियन भाषेच्या प्रभावातून स्पॅनिशमध्ये सुनीते ( एकूण ४२ ) लिहिणारा हा पहिला कवी. पीत्रार्क आणि दान्ते यांच्या धर्तीवर दीर्घ, रूपकात्मक कविता त्याने लिहिल्या. ‘ प्रेफेस अँड लेटर टू इ कॉन्स्टेबल ऑफ पोर्तुगाल ’ ( इं. शी.) हा त्याचा ग्रंथ म्हणजे साहित्येतिहास आणि साहित्यसमीक्षा यांच्यावर स्पॅनिशमध्ये झालेले पहिले लेखन होय. सांतिल्यानाने परभाषेतील उत्तम साहित्यकृतींचा संग्रह केला होता. भाषांतरांनाही त्याने प्रेरणा दिली.

पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पेनमध्ये प्रबोधनाचे वारे वाहू लागले होते. Comedia de Calixito y Melibea (१४९९) ही संवादरूप कादंबरी प्रसिद्ध झाली. ह्या कादंबरीतील सेलेस्टिना या प्रभावी स्त्री–व्यक्तिरेखेवरून ही कादंबरी La Celestina या नावानेही ओळखली जाते. भावनांचे विश्लेषण आणि नाट्यमय संघर्ष यांचे मानसशास्त्रीय चित्रण या कादंबरीत इतक्या उत्कटपणे केलेले आहे, की स्पॅनिश गद्याच्या क्षेत्रातली सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणून, तसेच स्पॅनिश भाषेतील पहिली वास्तववादी कादंबरी म्हणून या कादंबरीला मान्यता प्राप्त झाली आहे.

स्पॅनिश बॅलड किंवा रोमान्स हा मध्ययुगीन वीरकाव्ये आणि विसाव्या शतकातील काव्य-नाटके यांच्यातील दुवा आहे. स्पॅनिश रोमान्स- रचनांचे महत्त्व हे आहे, की त्यातून सामान्य स्पॅनिश माणसांना राष्ट्रीय इतिहास आणि राष्ट्राचे सत्त्व जाणून घेण्याचा एक स्रोत उपलब्ध होतो. ‘ बॅलड साँगबुक ’ ( इं. शी.) आणि ‘ मिसलनी ऑफ व्हेरिअस बॅलड्स ’ ( इं. शी.) ही पारंपरिक बॅलडरचनांची दोन संकलने सु. १५५० मध्ये तयार झाली.

गार्थिलासो दे ला व्हेगा (१५०३ — ३६) या थोर कवीने स्पॅनिश भावकवितेचा एक प्रकारे पुनर्जन्म घडवून आणला. मध्ययुगीन आणि अभिजात कवींकडून आत्मसात केलेल्या काव्यरचनातंत्राबरोबरच त्याने आपल्या कवितेत आत्मपरतेचा एक सूरही जपला. त्याच्या छोट्या छोट्या कविता, विलापिका, सुनीते, गोपकाव्ये यांनी या स्पॅनिश साहित्याच्या सुवर्णयुगातील कवितेची दिशा आणि तिचा ओघ निश्चित करण्यात मह-त्त्वाची कामगिरी बजावली. लूईस दे लेऑन (१५२७ ? — ९१) याने काही प्रमाणात गार्थिलासोच्या काव्यरचनातंत्राने कविता लिहिली आणि कवितेच्या घाटापेक्षा तिच्या आशयावर अधिक भर दिला. फेर्नांदो दे एर्रेरा (१५३४ ? — ९७) याच्यावरही गार्थिलासोचा प्रभाव होता. त्याचा भर भावनांच्या सूक्ष्मतेवर होता. आपल्या काही उद्देशिकांतून त्याने हाताळलेले वीरांच्या पराक्रमाचे विषय स्पंदनशील अभिव्यक्तीमुळे लक्षणीय ठरतात.


स्पॅनिश महाकाव्याने इटालियन कवितेच्या प्रभावाखाली आदर्श बाळगले, ते लोदोव्हीको आरिऑस्तो आणि तोरक्वातो तास्सो या इटालियन महाकवींचे. आलोंझो दे एरथील्या इ थून्येगा (१५३३ — ९४) याच्या ङर ईर्रीलरपर (३७ सर्ग, १५६९ — ९०) या महाकाव्यात चिली जिंकण्याचा प्रयत्न करणार्‍या स्पॅनिश लढवय्यांना एतद्देशीयांनी कसा प्रखर विरोध केला याचे कथन आहे, तर लोपे दे व्हेगाचे (१५६२ — १६३५) ऊीरसेपींशर (१५९८) हे महाकाव्य सर फ्रान्सिस ड्रेक याचे अखेरचे जलपर्यटन आणि त्याचा मृत्यू याची कथा सांगते. ती सांगताना ड्रेकवर त्याने टीका केली आहे.

आरंभीची नाटके : स्पेनमधील नाटकांचा मूलस्रोत चर्च हा आहे. ‘ प्ले ऑफ द थ्री वाइज किंग्ज ’ ( इं. शी.) ह्या नाटकाची अपूर्ण संहिता म्हणजे मध्ययुगीन स्पॅनिश नाटकाचा एकमेव उपलब्ध दस्तऐवज. आरंभीची नाटके धार्मिक आशयाची असली, तरी लौकिक स्वरूपाचीही काही नाटके तेराव्या शतकात होऊन गेली असावीत, असे दहाव्या आल्फॉन्सोच्या विधिसंहितेतील काही निर्देशांवरून वाटते मात्र असे एकही नाटक उपलब्ध नाही.

व्हान देल एंथीना (१४६९ — १५२९) याने स्पॅनिश नाटक चर्चच्या बंधनातून मोकळे केले. त्याच्या Cancionero (१४९६, इं. शी. ‘ साँगबुक ’) मध्ये ग्रामीण बोलीत काही धार्मिक, गोपनाट्यात्म संवाद आहेत तथापि लवकरच तो लौकिक विषयांकडे वळला. इटलीत तो दीर्घकाळ राहिला होता. त्या वास्तव्याचा परिणाम त्याच्या नाट्यदृष्टीवर झालेला होता. प्रबोधनकाळाला साजेसे नाट्यलेखनप्रयोग त्याने केले.

स्पॅनिश नाटक राजदरबारातून सार्वजनिक ठिकाणी सामान्य लोकां-समोर नेण्याचे श्रेय लोपे दे र्वेदा (१५१० ? — ६५) याच्याकडे जाते. आपल्या स्वतःच्या नाट्यरचना घेऊन  तो स्पेनमध्ये हिंडला. माद्रिद आणि सेव्हिलमध्ये त्याने नाट्यप्रयोग केले. आपल्या पद्य नाटकांबरोबर (Comedias) ‘ पासो ’ नावाच्या नाट्यमय गद्यरचना तो सादर करी. डॉक्टर, नोकर अशा समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील व्यक्तिरेखा त्यांत असत. खेळकर भाषेत त्या बोलत. पासो हे मोठ्या नाटकाच्या मधेमधे विष्कंभकासारखे सादर केले जात. र्वेदाच्या लेखनातले नाट्यगुण या पासोंमधूनही प्रकट होतात. व्हान दे ला क्वेव्हा (१५४३ ? — १६१०) याने बॅलडरचनांमधून मिळणार्‍या सामग्रीचा उपयोग नाट्यलेखनासाठी प्रभावीपणे करून घेता येईल हे जाणले आणि त्यानुसार काही नाटकेही लिहिली. Los siete infantes de Lara ( इं. शी. ‘ द सेव्हन प्रिन्सेस ऑफ लारा ’), El reto de Zamora ( इं. शी. ‘ द चॅलेंज ऑफ झामोरा ’) आणि La libertad de Espana por Bernardo del Carpio ( इं. शी. ‘ द लिबरेशन ऑफ स्पेन बाय बेर्नार्दो देल कार्पिओ ’ ) ही त्याची नाटके या संदर्भात उल्लेखनीय आहेत. ही सर्व नाटके १५८८ मध्ये प्रसिद्ध झालेली आहेत.

उत्तरकालीन नाटक : स्पॅनिश नाटकांचा असा हा पूर्वेतिहास असला, तरी स्पॅनिश नाटकाला खरे तेज प्राप्त करून दिले ते लोपे दे व्हेगा ह्या नाटककाराने. स्पॅनिश साहित्याच्या सुवर्णयुगातला हा नाटककार. नाट्यलेखनकलेवर त्याने जाहीरनामाही लिहिला होता : Arte nuevo de hacer comedias en este tiempo (१६०९, इं. शी. ‘ न्यू आर्ट ऑफ रायटिंग प्लेज ॲट धिस टाइम ’ ). नाट्यलेखनाच्या नवअभिजाततावादी नियमांचे बंधन स्वीकारण्यास नकार, सुखात्मिका आणि शोकात्मिका यांचा मिलाफ नाट्यकृतींत करण्याला मान्यता, नाटकातील काव्यात छंदवैविध्य आणण्याची आवश्यकता प्रतिपादणे आणि उत्तम अभिरुचीचा निवाडा जनसामान्यांकडे सोपवणे, ही त्याच्या जाहीरनाम्याची काही वैशिष्ट्ये होत. व्हेगाने विपुल नाट्यलेखन केले. त्याने १,८०० नाटके लिहिली, असे म्हटले जाते. यांशिवाय त्याने ४०० लघुनाट्ये लिहिली, असेही नमूद आहे. आज त्याच्या ४२६ नाटकांच्या आणि ४२ धार्मिक लघुनाट्यांच्या संहिता उपलब्ध आहेत. आत्मसन्मान, व्यक्तीचा मानबिंदू यांना त्याच्या नाटकांत महत्त्व प्राप्त झाले. त्याच्या नाटकांतून व्यक्तिरेखनापेक्षा कृतींवर आणि गुंतागुंतीच्या घटनांवर त्याने भर दिला.  रंगभूमीच्या तंत्राची त्याला उत्तम जाण होती. त्याच्या नाटकांनी स्पेनच्या राष्ट्रीय रंगभूमीला सामर्थ्य प्राप्त करून दिले.

तिर्सो दे मोलिना ( १५८४ ? — १६४८ ) हा लोपे दे व्हेगा याच्यानंतरचा ठळक स्पॅनिश नाटककार. एल् बर्लदॉर दे सेव्हिल्य (१६३०, इं. शी. ‘ द ट्रिक्स्टर ऑफ सेव्हिल ’ ), ला प्रुदेन्शिआ एन् ला मुखेर (१६३४, इं. शी. ‘ फेमिनिन् श्रूडनेस ’ ), एल् कॉन्देनादो पॉर देस्कान  फियादो (१६३५, इं. शी. ‘ द डाउटर डॅम्ड ’ ) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके. ‘ द ट्रिक्स्टर …. ’ मधून डॉन वॉनची आख्यायिका त्याने नाट्यबद्ध केली. ‘ फेमिनिन् …. ’ हे स्पॅनिश साहित्यातील उत्कृष्ट ऐतिहासिक नाटकांपैकी एक होय. धार्मिक स्वरूपाची, ‘ क्लोक अँड सोर्ड ’ ह्या प्रकारातली नाटकेही त्याने लिहिली. खानदानी स्त्रियांशी प्रेमप्रकरणे करणारे त्यांच्यासाठी द्वंद्वयुद्धे खेळणारे आपल्या मानसन्मानाला जपणारे शूर पुरुष हे अशा नाटकांचे विषय असतात. रूईथ दे आलार्कॉन इ मेंडोथा ( १५८१ — १६३९ ) ह्याच्या २० नाटकांतून नैतिकतेचा पुरस्कार केलेला आढळतो. त्याच्या ‘ द ट्रथ सस्पेक्टेड ’ ( १६३४, इं. शी. ) ह्या नाटकाचा प्रभाव थोर फ्रेंच नाटककार म प्येअर कोर्नेय याच्यावर पडला होता.

पेद्रो काल्देरॉन दे ला बार्का (१६०० — ८१) हा स्पॅनिश साहित्याच्या सुवर्णयुगातील अखेरचा नाटककार होय. काल्देरॉनने बंदिस्त संरचनेची नाटके लिहिताना लोपे दे व्हेगाचेच सूत्र वापरले. त्याला भावकाव्याची आणि तत्त्वचिंतनाची जोड दिली. काल्देरॉनने अशी नाटके लिहिली, की ती सार्वजनिक नाट्यगृहांतच नव्हे, तर दरबारी नाट्यगृहातही प्रभावी ठरली. त्याने धार्मिक आशयाची रूपकात्मक नाटके लिहिली त्याचप्रमाणे लौकिक आशयाची नाटकेही लिहिली. पुराणकथांवर आधार-लेली नाटके — उदा., La estatua de Prometeo (१६६९, इं. शी. ‘ द स्टॅच्यू ऑफ प्रॉमिथीअस ’ ) — लिहिण्यात त्याचे प्रावीण्य दिसून येतेच तथापि लौकिक विषयांवरची नाटकेही त्याने समर्थपणे लिहिली. त्यांत शोकात्मिकांबरोबरच सुखात्मिकांचाही समावेश आहे. त्याच्या सुखात्मिका रोमान्सला जास्त जवळच्या आहेत, तर त्याच्या शोकात्मिका मानवी जीवनातील समस्यांचा — विशेषतः माणसाच्या वैयक्तिक आणि सामूहिक अपराधभावनेतून निर्माण होणार्‍या समस्यांचा — खोलवर जाऊन वेध घेणार्‍या आहेत. काल्देरॉनच्या मृत्यूनंतर जवळपास शंभर वर्षे स्पॅनिश नाटक मृतावस्थेत असल्यासारखे होते.

इतिहासविषयक लेखन : स्पॅनिश साहित्याच्या सुवर्णयुगात जे गद्य-  लेखन झाले, त्यात इतिहासलेखन लक्षणीय आहे. व्हान दे मारयाना (१५३६ — १६२४) याने लॅटिन भाषेत स्पेनचा इतिहास लिहिला होता. त्याचे स्पॅनिश भाषांतर त्यानेच तयार केले. ह्या इतिहासात आदिम काळापासून ते फर्डिनंड आणि इझाबेला यांच्या निधनापर्यंतचा इतिहास आहे. लॅटिन भाषेवर देशी भाषेने हा एक प्रकारे विजयच मिळवला होता तथापि अधिक ठळकपणे नमूद करण्यासारखे इतिहासलेखन नव्या जगात—अमेरिकेत—झाले. कोलंबसाच्या जलपर्यटनाचे वृत्तान्त, त्याची पत्रे ह्यांचा त्यात समावेश होतो. अमेरिकेचा शोध आणि स्पॅनिश लोकांनी तेथे केलेल्या वसाहती यांतून इतिहासलेखनाची विपुल सामग्री उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे त्या काळात यूरोपमध्ये ज्या घटना घडत होत्या, त्यांत स्पेन बजावीत असलेली महत्त्वाची भूमिकाही इतिहासलेखनाला प्रवृत्त करणारी ठरली. अमेरिकन इंडियनांना स्पॅनिश आक्रमकांनी जी दुःखदायक आणि अन्यायाची वागणूक दिली, तिची हकीकत बार्तोलोमे दे लास कासास (१४७४ — १५६६) याने ‘ व्हेरी ब्रिफ अकाउंट ऑफ द डिस्ट्रक्शन ऑफ द इंडीज ’ (१५५२, इं. शी. इं. भा. द टीअर्स ऑफ द इंडियन्स ) ह्या  नावाने लिहिली आहे.

 

कादंबरी : कादंबरीसंबंधीची लोकाभिरुची मध्ययुगीन रोमान्सवर पोसली गेली होती. झ्यील व्हिसेंत (१४७१ ? — १५३७ ?) या पोर्तुगीज नाटककाराने लिहिलेले Amadis de Gaula हे नाटकही  एका शिलेदारी रोमान्सवरच आधारलेले होते. मध्ययुगीन शिलेदारीची काही ध्येये अशा लेखनातून जिवंत राहिली, तरी त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध राहिलेला नव्हता. त्यामुळे यथावकाश अशा रोमान्सची जागा ‘ पिकरेस्क ’ कादंबरीने घेतली. अशा कादंबर्‍यांचे नायक ‘ पिकारो ’ किंवा लुच्चे लोक असत. तथापि आधुनिक स्पॅनिश कादंबरीचे आद्यरूप मीगेल दे सरव्हँटीझ (१५४७ — १६१६) याच्या दोन किखोते ( डॉन क्विक्झोट, दोन भाग १६०५ १६१५ ) या कादंबरीने घडविले. ही कादंबरी म्हणजे शिलेदारी साहसाच्या रोमान्सवर लिहिलेली एक प्रभावी उपरोधिका आहे. दोन किखोते हा अशा काही रोमान्सच्या वाचनाने प्रभावित झालेला आहे. रोमान्सच्या सरदार नायकाप्रमाणे भोवतालच्या जगातील अन्यायाविरुद्ध उभा राहण्याचा तो प्रयत्न करतो. एका काव्यात्म सत्याच्या पातळीवर तो जगत असतो. त्याचा सेवक सँको पाँझा हा मात्र व्यवहारी आणि वास्तववादी आहे. यातून धनी आणि नोकर ह्या नात्याने सतत एकत्र असणार्‍या आणि वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तींच्या परस्परांशी होणार्‍या आंतरक्रियेतून मानवी अस्तित्वावरचे एक तात्त्विक भाष्य समोर येते. सरव्हँटीझने लिहिलेल्या Novelas ejemplares (१६१३, इं. शी. ‘ एक्झेंप्लरी टेल्स ’ ) या कथासंग्रहातील कथांमधून त्याच्या वेगळेपणाचा प्रत्यय येतो. त्यांतील काही इटालियन शैलीने लिहिल्या आहेत काही सेव्हिलमधील गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करतात तर काही प्रत्यक्ष जीवनातील घटना आणि व्यक्ती यांवर आधारलेल्या आहेत.


गूढवादी लेखन : गूढवादी लेखन विशेषतः सोळाव्या शतकात झाले. बायबल मधील ‘ साँग ऑफ सॉलोमन ’ हे स्पॅनिश गूढवाद्यांचे स्फूर्तिस्थान होते. लेओन एब्रेओ (१४६० — १५२०) ह्या स्पॅनिश ज्यूने इटालियन भाषेत लिहिलेल्या Dialoghi de amore (१५३५, इं. शी. ‘ द डायलॉग्ज ऑफ लव्ह ’ ) या लेखनाचा उत्तरकालीन स्पॅनिश विचारावर मोठा प्रभाव पडला. व्हान दे आबीला (१५०० — ६९), सांता तेरेसा (१५१५ — ८२), सान व्हान दे ला क्रूथ ( सेंट जॉन ऑफ द क्रॉस, १५४२ — ९१), लूईस दे ग्रानादा (१५०४ ? — ८८) ही स्पॅनिशमधील गूढवादी लेखन करणार्‍यांची काही उल्लेखनीय नावे. सांता तेरेसा हिचे लाइफ ऑफ द मदर तेरेसा ऑफ जिझस् (१६११) हे आत्मचरित्र आणि तिची पत्रे यांतून तिच्या लेखनशैलीतील लालित्य प्रत्ययास येते. ङ्क सान व्हान दे ला क्रूथ ङ्ख याच्या गूढानुभव प्रकट करणार्‍या तीन उत्कट कवितांमुळे तो विशेष ख्याती पावला. गूढवादी लेखनाचे महत्त्व अभिव्यक्तीसाठी भाषेच्या मर्यादा ओलांडून जाणार्‍या लेखकांच्या प्रयत्नांत आहे. या प्रयत्नांतून भाषेच्या विविध शक्यतांचा त्यांनी शोध घेतला आणि तिचे तोवर सुप्तावस्थेत असलेले स्रोत त्यांनी वाहते केले. 

अठरावे शतक : स्पेनचा राजा चार्ल्स दुसरा ( कार. १६६५ — १७०० ) याच्या कारकीर्दीत स्पेनला उतरती कळा लागली होती. त्याच्या मृत्यूनंतर फ्रान्सचा राजा चौदावा लूई याचा नातू पाचवा फिलिप ( कार. १७०० — ४६ ) स्पेनचा राजा झाला. तो बूर्बाँ राजघराण्यातला होता. त्याच्या कारकीर्दीत स्पॅनिश जीवनाचे चित्र हळूहळू आशादायक होण्यास सुरुवात झाली. अठराव्या शतकाच्या मध्याला तिसर्‍या चार्ल्सच्या कारकीर्दीत ( १७५९ — ८८ ) या प्रक्रियेचा ठळक प्रत्यय आला. १७०० — १८३३ ( स्पेनचा राजा सातवा फर्डिनंड याच्या कारकीर्दीची अखेर ) हा शंभरांहून अधिक वर्षांचा काळ स्पेनचा एकंदरीत सुखासमाधानाचा काळ होता, असे म्हणता येईल. स्पॅनिश साहित्याच्या इतिहासात अठरावे शतक हे १८३३ पर्यंत धरणे सोयीचे होईल. ह्या काळात फ्रेंच रा जघराण्याच्या सत्तेमुळे फ्रेंच संस्कृती आणि तिची ध्येये प्रभावी ठरली, हे स्वाभाविक म्हणावे लागेल. रूसो आणि फ्रेंच विश्वकोशकर्ते यांच्या विचारांचा आणि कल्पनांचाही परिणाम ह्या अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जाणवू लागला. स्पेनमधील बौद्धिक जीवन जोम धरू लागले. अनेक अकादेमी निर्माण झाल्या. १७१३ मध्ये स्थापन झालेली Real Academia de la Lengua Espanola ( आता Real Academia Espanola ) ही त्यांपैकी एक प्रमुख अकादेमी होय. स्पॅनिश भाषेची शुद्धता राखणे हे या अकादेमीचे उद्दिष्ट होते. पश्चिम यूरोपातील बौद्धिक प्रवाहापासून स्पेन किती दूर झाला आहे, याचा अंदाज परदेशी जाऊन येणार्‍या साहित्यिकांना आला. आपल्या जुन्या वारशाचा शोध घेण्यासाठी साहित्यिक त्यांच्या मध्ययुगीन स्पॅनिश साहित्या-कडे वळले. ग्रेगोरिओ मायेस ई सिस्कार याने सरव्हँटीझ याचे पहिले अभ्यासपूर्ण चरित्र लिहिले. फ्लोरेथ दे सेत्येन ई वीथोब्रो (१७४७ — ७५) ह्याने Espana Sagrada या आपल्या ग्रंथातून मध्ययुगीन ख्रिस्ती स्पेनची संपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी पुनरुज्जीवित केली. बाराव्या शतकातले स्पॅनिश महाकाव्य Poema de mio Cid, आर्थिप्रेस्टे डे इटाचे लिब्रो डे कांटारेस ओ डे बुएन आमोर अशा साहित्यकृतींचे पहिल्यांदाच प्रकाशन झाले.

याच शतकात साहित्यसमीक्षेबाबत नवा दृष्टिकोनही मांडला गेला. या संदर्भात ईग्नाथ्यो दे ल्यूथान क्लारामुंट (१७०२ — ५४) याचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. लोपे दे व्हेगा आणि काल्देरॉन या नाटककारांच्या प्रतिभे-बद्दल त्याला आदर होता. लूइस दे गोंगोरा इ आरगोते याच्या कवित्वाचीही त्याने स्तुती केली. तथापि नाट्यरचनेत स्थळ, काळ आणि कर्म या त्रयीचे ऐक्य असलेच पाहिजे, हा फ्रेंच दृष्टिकोण त्याला मान्य होता. कल्पनाशक्तीवर विवेकाचे नियंत्रण असले पाहिजे, अशी त्याची धारणा होती. त्याचा Poetica हा ग्रंथ नव-अभिजाततावादी समीक्षातत्त्वांचा पुरस्कार करणारा आहे.

बेनितो जेरोनिमो फेइहोओ इ माँतेनेग्रो (१६७६ — १७६४) हा एक ख्रिस्ती मठवासी अंधश्रद्धेच्या विरुद्ध होता. त्याने Teatro critico y universal (८ खंड, १७२६ — ३९) हा सर्व विषयांचा परामर्श घेणारा विश्वकोशीय स्वरूपाचा ग्रंथ रचिला. त्याला पूरक असे पाच खंड Cartas eruditas y curiosas (५ खंड, १७४२ — ६०) ह्या नावाने रचिले. अंधश्रद्धांवर आपल्या लेखनाने आघात करून त्याने स्पेनला बौद्धिक दृष्ट्या मुक्त करण्याच्या दिशेने जोमदार प्रयत्न केला. मात्र त्याच्या विचारांतून विवाद निर्माण झाले आणि ते वातावरण या शतकाच्या अखेरीपर्यंत टिकले.

सतराव्या शतकाच्या आरंभी कल्तरेनिस्मो (Culteranismo) आणि कन्सेप्तिस्मो (Conceptismo) ह्या दोन परस्परसंबंधित अशा शैलीविषयक विचारांनी स्पॅनिश गद्य तसेच काव्य ह्यांवर परिणाम घडवून आणला. लुइस दे गोंगोरा इ आरगोते हा कल्तरेनिस्मोचा ठळक प्रतिनिधी. स्पॅनिश भाषेला उदात्त भारदस्तपणा प्राप्त करून देण्यासाठी त्याने अभिजात लॅटिन शब्दकळेचा पुरस्कार केला. शब्दसंग्रह, वाक्यरचना, शब्दक्रम ह्यांबाबतीत ही प्रवृत्ती टोकाला गेली. एवढेच नव्हे तर, ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यातील मिथ्यकथा आणि संदर्भ यांनी स्पॅनिश गद्यपद्याची अभिव्यक्ती अवगुंठित केली जाऊ लागली. त्याचप्रमाणे सूक्ष्मार्थसूचक रूपकांनी ती काहीशी संकुलही बनली. लॅटिन भाषा अमर आहे, असे गृहीत धरून तिच्या वापराने केलेली काव्यरचना शेकडो वर्षांनी वाचली गेली, तरी ती ताजी टवटवीत वाटेल, असेही कल्तरेनिस्मोच्या पुरस्कर्त्यांना वाटत होते. त्याच्या Soledades (१६१३ — १७, इं. शी. ‘ सॉलिट्यूड्स ’) ह्या दीर्घकवितेचे अनुकरण करणारे अनेक सामान्य कवी निघाले. गोंगोराने पुरस्कारिलेली कल्तरेनिस्मो ही शैली ‘ गोंगोरिझम ’ ह्या नावाने ओळखली जाते. कन्सेप्तिस्मो ही शैली भारदस्त, संक्षिप्त आणि सुभाषितात्मक होती. त्यामुळे ती मुख्यतः गद्यासाठी — त्यातही उपरोधप्रचुर गद्यासाठी — वापरली गेली. निबंधलेखनासाठीही ही शैली उपयुक्त होती. फ्रांथीस्को गोमेथ दे केव्हेदो इ व्हिल्येगास (१५८० — १६४५) हा कन्सेप्तिस्मो ह्या शैलीचा प्रभावी वापर करणारा गद्यलेखक. त्याने विपुल गद्य लिहिले. त्या काळातील स्पेनचा सर्वश्रेष्ठ लेखक म्हणून त्याची ख्याती आहे. ‘ द लाइफ ऑफ ए स्काउंड्रल ’ (१६२६, इं. शी.) ही त्याची उपरोधप्रचुर कादंबरी उल्लेखनीय आहे. ‘ ड्रीम्स ’ (१६२७, इं. शी.) ह्या त्याच्या उपरोधिकेत त्याने मृत्यू आणि नरक यांचे काल्पनिक जग उभे केले आहे. कन्सेप्तिस्मोच्या शैलीचे ‘ ड्रीम्स ’ हे एक उल्लेखनीय उदाहरण आहे.

होसे दे कादाल्सो इ बाथकेथ (१७४१ — ८२) याचे Noches lugubres (१७८९-९०, इं. शी. ‘ सॅड नाइट्स ’ ) हे गद्यलेखन तो प्रेम करीत असलेल्या एका अभिनेत्रीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्या-साठी झालेले असून त्यातून स्पॅनिश साहित्यातील आगामी स्वच्छंदता-वादाची सूचना मिळते. होसे फ्रांथेस्को दे इस्ला (१७०३ — ८१) याची Fray Gerundio (१७५८) ही उपरोधप्रचुर गद्यकृती एखाद्या पिकरेस्क कादंबरीचे स्मरण करून देते. 

स्पॅनिश कवितेची जवळपास शंभर वर्षे क्षीण झालेली परंपरा सालामांका येथल्या एका लहानशा कविवर्तुळातून सचेतन होऊ लागली. ह्या कवींचे नेतृत्व द्येगो गोंथालेथ (१७३३ — ९४) याच्याकडे होते. हे कवी लूईस दे लेऑन ह्या कवीला आपले प्रेरणास्थान मानत होते. या कवीने विपुल गद्यलेखन केले असले, तरी त्याची कीर्ती मुख्यतः त्याच्या भावकवितेवरच अधिष्ठित आहे. विश्वाची विस्मयजनक गूढता आणि शांत जीवन जगण्याची ओढ त्याच्या कवितेतून प्रतीत होते. द्येगो गोंथालेथ याने अनेक सुंदर स्त्रियांना उद्देशून लिहिलेल्या कवितांची शैली सौम्य, पण डौलदार आहे. ‘ द ट्रेचरस बॅट ’ ( इं. शी.) ही त्याची विशेष प्रसिद्ध कविता आपल्या एका प्रिय स्त्रीला भिववल्याबद्दल एका वाघूळाची कडक निर्भर्त्सना करण्यासाठी त्याने लिहिली आहे. व्हान मेलांदेथ व्हाल्देस (१७५४ — १८१७) ह्याने बॅलड, गोपगीते अशी रचना केलेली आहे. आपल्या उत्तरायुष्यात तो तत्त्व-चिंतनात्मक आणि सामाजिक विषयांकडे वळला. स्वच्छंदतावादाचे पूर्वचिन्ह प्रकट करणारी एक विशिष्ट भावविवशता त्याच्या कवितेत आढळते. स्पॅनिश कवितेच्या पुनरुज्जीवनात त्याच्या कवितेलाही स्थान आहे. व्हाल्देस याने इंग्रज कवी एडवर्ड यंग याच्या कवितेतून प्रेरणा घेतली. ह्या काल-खंडातील एकूण स्पॅनिश कवितेत नवनवे प्रभावस्रोत येऊन त्यांचा मिलाफ होत होता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नाट्यरचनेच्या नव-अभि-जाततावादी नियमांवर ( स्थळ, काळ आणि कर्म वा कृती यांचे ऐक्य ) वादंग माजले. ईग्नाथ्यो दे ल्यूथान याने ह्या नियमांचा जोरदार पुरस्कार केला होता. शोकसुखात्मिका हा नाट्यप्रकार तर त्याला मान्यच नव्हता. सुखात्मिका आणि शोकात्मिका यांच्यात फारकत झाली पाहिजे, असे त्याचे मत होते. नाट्यरचनेचे नव-अभिजाततावादी नियम पाळूनही नाटककार व्हिसेंत आंतोन्यो गार्थेआ दे ला वेर्ता इ म्यूनोथ (१७३४ — ८७) याने आपली La Raquel (१७७८) ही शोकात्मिका हे नियम मान्य नसणार्‍यांनाही स्वीकारार्ह वाटेल अशा कौशल्याने लिहिलेली आहे.

रामॉन दे ला क्रूथ (१७३१ — ९४) हा अठराव्या शतकातील एक ख्यातनाम नाटककार. शोकात्मिका, सुखात्मिका, संगीतमय नाटके असे विपुल नाट्यलेखन त्याने केले. स्पॅनिश जीवनाची उपरोधप्रचुर चित्रेही त्याने आपल्या छोट्याछोट्या नाटुकल्यांतून उभी केली. पासोसारख्या गद्यरचनाही त्याने लिहिल्या. स्थळ-काळ-कर्माचे ऐक्य अबाधित राखून त्याने स्पॅनिश नाटकाला समाजजीवनावरील भाष्याकडे नेले आणि सर्वसाधारण प्रेक्षकांना आनंद दिला. लेआंद्रो फेरनांदेथ दे मोरातीन (१७६० — १८२८) याने पूर्ण लांबीची नाटके लिहिली. La Comedia nueva (१७९२, इं. शी. ‘ द न्यू कॉमेडी ’) आणि El Si de las ninas (१८०६ इं. भा. द मेडन्स कन्सेंट, १९६३) ही त्याची नाटके प्रसिद्ध आहेतच पण अठराव्या शतकातील उत्कृष्ट गद्याचा नमुना म्हणूनही त्यांचे महत्त्व आहे.

एकोणिसावे शतक : स्पेनचा राजा फर्डिनंड सातवा ( कार. १८०८ १८१४ — ३३ ) ह्याच्या राजवटीत अनेक उदारमतवाद्यांना परागंदा व्हावे लागले होते आणि त्यांनी फ्रान्समध्ये आश्रय घेतला होता. १८३३ मध्ये फर्डिनंडचा मृत्यू झाल्यानंतर ते स्पेनमध्ये परत आले, ते फ्रेंच स्वच्छंदतावादाने प्रभावित होऊनच. हा प्रभाव एवढा मोठा होता, की १८३३ हे वर्ष स्पेनमधील स्वच्छंदतावादी चळवळीचे आरंभवर्ष म्हणून मानले जाते. फ्रान्सप्रमाणेच इंग्लंड, जर्मनी, इटली येथूनही स्वच्छंदतावादी विचारांचे वारे स्पेनमध्ये येत होते. स्वच्छंदतावाद स्पेनमध्ये आला तथापि तो काहीसा उशिराच आला आणि अल्पकाळ टिकला. त्याला एखाद्या संप्रदायाचे स्वरूप आले नाही आणि त्याचा एखादा विशिष्ट नेताही नव्हता. होसे दे एस्प्राँथेदा (१८०८ — ४२) हा कवी मात्र स्वच्छंदतावादी जगला Canto a Teresa, El Estudianatede Salamanka ( दोन भाग, १८३५, १८३७ इं. भा. द स्टूडंट ऑफ सालामांका, १९१९), Canciones (१८४०, इं. शी. ‘ साँग्ज ’) आणि El diablo mundo (१८४०-४१, इं. भा. द वर्ल्ड डेव्हिल, १९४२ ) ह्या त्याच्या काव्यग्रंथांतील कविता म्हणजे स्पेनच्या स्वच्छंदतावादी साहित्यकाळातील उत्कट आत्मपरतेचा प्रत्यय देणार्‍या उत्कृष्ट भावकविता होत. स्पॅनिश कवितेच्या विकासाचा एक टप्पा म्हणूनही त्यांचे महत्त्व आहे. आंजेल दे साव्हेद्रा (१७९१ — १८६५) याचे Don Alvaro o la fuerza del sino ( १८३५, इं. शी. ‘ डॉन आल्व्हारो ऑर, द फोर्स ऑफ डेस्टिनी ’) हे नाटक तसेच त्याचे El moro exposito (१८३४, इं. शी. ‘ द फाउंडलिंग मूर ’ ) हे कथाकाव्य यांतून स्वच्छं-दतावादाचे तत्त्वज्ञान बरेचसे प्रकटले आहे. गुस्तावो आदॉल्फो बेकर (१८३६ — ७०), रामॉन दे कांपोआमॉर इ कांपोओसोर्‍यो (१८१७ — १९०१) हे स्वच्छंदतावादी कवीही उल्लेखनीय आहेत. बेकरच्या Rimas (१८७१, इं. शी. ‘ र्‍हाइम्स ’ ) मधील कवितांत त्याच्या दुःखमय भाव-जीवनाचा इतिहास आलेला आहे. रामॉन ह्या कवीचे Doloras (१८४५, इं. शी. ‘ सफरिंग्ज ’ ), Pequenos poemas (१८७१, इं. शी. ‘ लिट्ल पोएम्स ’ ) हे काव्यसंग्रह. एके काळी श्रेष्ठ कवी म्हणून लौकिक असणार्‍या ह्या कवीच्या कविता आज क्वचितच वाचल्या जातात. Humoradas (१८८६) मधील त्याच्या काव्यरचना म्हणजे कवितेचे त्याने शोधलेले नवप्रकार होत. गॅस्पर नून्येथ दे आर्थे (१८३४ — १९०३) याने Gritos del combate (१८७५, इं. शी. ‘ कॉम्बट क्राइज ’ ) मधील आपल्या कवितांतून लोकशाही राज्यव्यवस्थेचा पुरस्कार, देशभक्ती असे विषय हाताळलेले आहेत. 


‘कॉस्च्यूंब्रिस्मो’ ही एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाची वाङ्मयीन चळवळ. ती स्पॅनिश साहित्यातील स्वच्छंदतावादाच्या आधी सुरू झाली. लेखक राहात असलेल्या विशिष्ट शहरातील वा प्रांतातील लोकांच्या चालीरीती आणि जीवन चित्रित करण्याची ही प्रवृत्ती होती. अशा चित्रणाबरोबर एखादी कथाही येई पण त्या लेखनात तिचे स्वरूप दुय्यम असे. हे लेखन एकोणिसाव्या शतकातील कादंबरीला मार्गदर्शक ठरले. कादंबरीने आपले सामर्थ्य कादंबरीकाराच्या व्यक्तिगत अनुभवांत शोधण्यापेक्षा एखाद्या समाजाच्या सामाजिक जीवनात शोधले पाहिजे याची जाणीव कॉस्च्यूंब्रिस्मोने निर्माण केली. सेबास्त्यान दे मिनानो याचे Cartas de un pobrecito holgazan ( १८२०, इं. शी. ‘ लेटर्स फ्रॉम ए पुअर आय्ड्लर ’) हे ह्या प्रकारातले पहिले लेखन म्हणता येईल. तथापि ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय नावे मारयानो होसे दे लारा (१८०९ — ३७), रामॉन दे मेसोनेरो रोमानोस (१८०३ — ८२) आणि सेराफीन एस्तेव्हानेथ काल्देरॉन (१७९९ — १८६७) ही होत. लाराने उपरोधप्रचुर पण आनंददायक लेख लिहून समाजातील अनेक दोषांवर बोट ठेवले. रोमा-नोसच्या Escenas matritenses (१८३६ — ४२, इं. शी. ‘ सीन्स ऑफ माद्रिद ’ ) मध्ये माद्रिदमधील तत्कालीन जीवनाचे चित्रण आहे. काल्देरॉनने आपल्या Escenas andaluzas (१८४७, इं. शी. ‘ अँदालूशियन स्केचिस ’) मध्ये अँडलूझियातील चालीरीती, लोकविद्या तसेच त्या प्रदेशाचा इतिहास यांविषयी लिहिले आहे. अशा लेखनातून प्रकट होणारे त्या-त्या प्रदेशाचे जिवंत, वास्तववादी चित्रण स्पॅनिश कादंबरीच्या पुनरुज्जीवनाला उपकारक ठरले.

स्पॅनिश साहित्याला मोठे योगदान देणारी स्पॅनिश कादंबरी जवळ- पास दोन शतके लुप्तच झाली होती तथापि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कॉस्च्यूंब्रिस्मोच्या प्रभावातून वास्तववादी स्पॅनिश कादंबरी आकाराला आली. आरंभी लिहिल्या गेलेल्या कादंबर्‍यांतून निरीक्षणे आणि वर्णने यांवर भर होता. कल्पनाशक्ती आणि निवेदनशैली यांचा विचार फारसा केला गेला नव्हता. ते स्वाभाविकही होते कारण कॉस्च्यूंब्रिस्मोकडून कादंबरीकडे जाण्याचा हा संक्रमणकाळ होता. फेर्नान काबाल्येरो (१७९७ — १८७७) हिची La gaviota (१८४९, इं. भा. द सीगल ) ही कादंबरी स्पॅनिश कादंबरीच्या पुनरुज्जीवन काळातील पहिली कादंबरी. कलात्मकतेच्या दृष्टीने ही कादंबरी श्रेष्ठ दर्जाची नसली, तरी तिचे पहिलेपण महत्त्वाचे आहे. ह्या कादंबरीत संविधानकाच्या विकासाबरोबर विकास न पावणार्‍या ठोकळेबाज व्यक्तिरेखा आणि बोधवादावर भर असला, तरी तिच्या निरीक्षणाचा आणि संवेदनशीलतेचा आवाका लक्षणीय आहे. पेद्रो आंतोन्यो दे आलार्कॉन (१८३३ — ९१) ह्याच्या El sombrero de tres picos ( इं. भा. द थ्री कॉर्नर्ड हॅट ) या कादंबरीपासून कादंबर्‍यांना बहर आला. अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळाचे वास्तववादी चित्रण तीत आहे. एका शेतकर्‍याच्या मानसिकतेचे दर्शन घडविताना त्याचा खळखळता विनोद, तसेच त्याची वेधक निवेदनशैली नजरेत भरते. व्हान बालेराच्या (१८२४ — १९०५) कादंबर्‍याही वास्तव- वादी आहेत तथापि त्याच्या कादंबर्‍यांतून तो घेत असलेला मानवी मनाचाड्ढ विशेषतः स्त्रीमनाचा ड्ढअंतर्वेध विशेष महत्त्वाचा आहे. कादंबरी हा कवितेचा एक प्रकार आहे, असे तो मानत असे. त्याच्या उत्कृष्ट कादं-बर्‍यांत Pepita jimenez (१८७४), Las ilusiones del doctor faustino (१८७५), El comendador mendoza (१८७७) आणि Dona Luz (१८७९) अशा काही कादंबर्‍यांचा समावेश होतो. नेमक्या शब्दांची डौलदार शैली, प्रभावी व्यक्तिरेखन ही त्याच्या कादंबर्‍यांची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. व्हालेराने काही उत्कृष्ट अनुवाद — उदा., गटेचे फाउस्ट — केले. तसेच सरव्हँटीझच्या दोन किखोते ( डॉन क्विक्झोट ) सारख्या साहित्यकृतींची वाङ्मयीन समीक्षा केली कथा लिहिल्या धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र अशा विषयांवर लेखही लिहिले. होसे मारिआ दे पेरेदा (१८३३ — १९०६) हा सर्वश्रेष्ठ प्रादेशिक कादंबरीकार होय. निसर्ग हे चिरंतन वास्तव असून त्याची प्रभावी पुनर्निमिती हा खरा वास्तववाद होय, अशी त्याची भूमिका होती. सांतांदेर येथील कोळ्यांचे जीवन जिवंतपणे उभे करणारी सोतीलेझा (१८८४, इं. शी. ‘ सटल्टी ’) ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी. त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबर्‍यांत पेद्रो सांचेझ (१८८३) आणि ‘ अप द रॉक्स ’ (१८९४, इं. शी.) यांचा समावेश होतो. प्रादेशिक जीवनाच्या अनेक रूपांवर त्याने आपल्या संपन्न आणि लवचिक भाषाशैलीतून प्रकाश टाकला. पारंपरिक धर्ममूल्ये, कुटुंब, ग्रामीण जीवन ह्यांसंबधी त्याला असलेला आदर ‘ सटल्टी ’ आणि ‘ अप द रॉक्स ’ यांसारख्या त्याच्या कादंबर्‍यांतून विशेष प्रत्ययास येतो. आर्मांदो पालाथ्यो व्हाल्देस (१८५३ — १९३८) हा अस्तुरियासचा रहिवासी. त्याच्या काही कादंबर्‍यांना ह्याच प्रदेशाची पार्श्वभूमी आहे. कोळ्यांच्या जीवनावरील त्याची Riverta (१८८६) आणि तिचा दुसरा भाग Maximina (१८८७)  यांतील घटना माद्रिदमध्ये घडतात. ह्या कादंबर्‍यांतील स्त्री व्यक्तिरेखा व्हाल्देसने अतिशय हळुवारपणे रंगविल्या आहेत. बेनीतो पेरेथ गाल्दोस (१८४३ — १९२०) याची साहित्यनिर्मिती विपुल आहे. त्याच्या कादं-बर्‍यांतून एक स्वतंत्र जग त्याने निर्माण केले. १८०५ पासून १८७४ पर्यंतचा स्पेनचा इतिहास त्याने आपल्या ऐतिहासिक कादंबर्‍यांतून उभा केला. या कादंबर्‍यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांत चित्रित केलेल्या आणि प्रत्यक्ष घडलेल्या ऐतिहासिक घटनांतून काल्पनिक व्यक्तिरेखा वावरताना दिसतात. ह्या ४६ ऐतिहासिक कादंबर्‍या असून त्या Espisodios nacionales (१८७३ — १९१२, इं. शी. ‘ नॅशनल एपिसोड्स ’) ह्या समूहनावाने प्रसिद्ध आहेत. मूळ घटनांचा अभ्यास तो अतिशय काटेकोर-पणे करीत असे. संस्मरणिका, जुन्या वर्तमानपत्रांतले लेख, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले वृत्तान्त अशा सर्व साधनांचा उपयोग त्याने ह्या कादंबर्‍यां-साठी करून घेतला. त्यानंतर त्याने आणखी एक कादंबरीमालिका लिहिली. या समकालीन स्पॅनिश जीवनाबद्दलच्या कादंबरीमालिकेला Novelas espanolas contemporaneas ( इं. शी. ‘ कटेंपर्र् स्पॅनिश नॉव्हेल्स ’) असे म्हटले जाते. या कादंबर्‍यांतून त्याने तत्कालीन स्पॅनिश समाजाची परखड चिकित्सा केली आहे. Dona perfecta (१८७६) ह्या कादंबरीने आरंभ झालेल्या या मालेत त्याच्या वाङ्मयीन परिपक्वतेचा प्रत्यय देणार्‍या द डिस्इन्हेरिटेड लेडी (१८८१, इं. भा ) आणि Fortunata y Jacinta ( ४ भाग, १८८६-८७ ) यांचा समावेश होता. . Dona perfecta मध्ये धार्मिक माथेफिरूंच्या कृतींचे परिणाम काय होतात याचे दुःखदायक चित्र त्याने रंगविले आहे. एका कठोर परंपरावादी स्पॅनिश शहरात घडणार्‍या घटना या कादंबरीत आहेत. गाल्दोसला दुःखी, दुबळ्या माणसांविषयी असलेली उत्कट आस्था द डिस्इनहेरिटेड लेडी ह्या कादंबरीत दिसते तसेच Fortunata… … मध्ये दोन वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून आलेल्या आणि वैवाहिक जीवनात दुःखी असलेल्या स्त्रियांच्या परस्परक्रिया ( इंटरॲक्शन्स ) सूक्ष्मपणे विश्लेषून मांडल्या आहेत. 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील नाटकांत मान्वेल तामायो इ व्हाऊस (१८२९ — ९८) याचे Un drama nuevo (१८६७, इं. भा. ए न्यू ड्रामा ) हे नाटक उल्लेखनीय आहे. या नाटकात शेक्सपिअरच्या नाटक कंपनीतील माणसांच्या व्यक्तिरेखा आहेत. आदेलार्दो लोपेथ दे आयाला (१८२८ — ७८) याने बूर्झ्वा मनोवृत्तीच्या लोकांवर त्याच्या El tejado de vidrio (१८५७, इं. शी. ‘ द ग्लास रूफ ’) आणि Consuelo (१८७०) या नाटकांतून टीका केली आहे. आपल्या नाटकांतून त्याने नैतिक विषय हाताळले. सांगीतिक सुखात्मिकाही त्याने लिहिल्या. होसे एचेगाराई (१८३२ — १९१६) हा आघाडीचा स्पॅनिश नाटककार. त्याने ६३ नाटके लिहिली. त्याची काही नाटके गद्य, तर काही पद्य आहेत. त्याची काही नाटके अतिनाट्याच्या स्वरूपाची असली, तरी काही गंभीर शोकात्म आणि सामाजिक समस्यांना भिडणारी आहेत. O locura o santidad (१८७७, इं. भा. मॅड्मन ऑर सेंट, १९०७) आणि El gran Galeoto (१८८१, इं. भा. द वर्ल्ड अँड हिज वाइफ, १९०८) ही त्याची विशेष उल्लेखनीय नाटके. १९०४ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. जोआकिम डिसेंटा (१८६३ — १९१७) ह्याने श्रमजीवी वर्गाचे जीवन स्पॅनिश रंगभूमीवर आणले. व्हान होसे (१८९५) ह्या नाटकात एक प्रामाणिक कष्टकरी आपल्या धन्याच्या दुष्ट प्रवृत्तीला आणि छळाला वैतागून खुनी कसा बनतो, याचे चित्रण आहे. १८९० नंतर कादंबरीकार गाल्दोस याने आपल्या कादंबर्‍यांना नाट्यरूप द्यावयास सुरुवात केली होती. ही सारीच नाटके रंगभूमीवर यशस्वी ठरली असे नाही. पण ह्या नाटकांतून सामाजिक विषय त्याने वास्तववादी पद्धतीने हाताळले. इलेक्ट्रा (१९००) ह्या नाटकात त्याने दुराग्रही परंपरावाद आणि विवेकाधिष्ठित आधुनिक प्रवृत्ती व विचार यांच्यातील संघर्ष उभा केला आहे. उद्ध्वस्त झालेला उमराववर्गही त्याने La de san Quintin (१८९४) मध्ये दाखवला. खरा खानदानीपणा माणसाच्या गुणवत्तेवरच पारखला जाऊ शकतो, ही त्याची धारणा Elabenlo (१९०४) या नाटकात त्याने व्यक्त केली.

आधुनिक कालखंड : ( द जनरेशन ऑफ ९८). एकोणिसावे शतक संपण्यापूर्वी सु. वीस वर्षे स्पेनमध्ये राजकीय-सामाजिक विचारांचे मंथन सुरू झाले. गार्सिआ आंजेल गॅनिव्हेट (१८६५ — ९८) याचा Idearium espanol (१८९७, इं. भा. स्पेन, ॲन इंटरप्रिटेशन ) हा ग्रंथ अशाच विचारमंथनातून निर्माण झाला. स्पॅनिश माणसाची प्रकृती हा त्याच्या चिंतनाचा विषय ह्या ग्रंथात मांडला असून, एक राष्ट्र म्हणून स्पेनचे दोष दाखविण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि सखोल शोधकता यांचा प्रत्यय त्याने केलेल्या स्पेनच्या सामाजिक-राजकीय विश्लेषणातून येतो. १८९८ मध्ये स्पॅनिश-अमेरिकन युद्ध सुरू झाले. या युद्धात स्पेनचा पराभव झाला. स्पेनचा राजा आल्फॉन्सो तेरावा ( कार. १८८६ — १९३१ ) हा ह्या समयी किशोरवयीन होता आणि त्याचे सल्लागार स्पेनच्या तत्कालीन समस्या सोडविण्याइतके सक्षम नव्हते. अशा परिस्थितीत स्पेनमधील विचारी व्यक्तींनी आपल्या राष्ट्रीय मनोवृत्तीचा शोध घेण्याचे काम केले. आपल्या राष्ट्रीय गुणदोषांची झाडाझडती त्यांनी घेतली आणि एक राष्ट्र म्हणून आपल्या मनोवृत्तीत दृढमूल झालेल्या इच्छाशक्तीच्या अभावाकडे त्यांनी लक्ष वेधले. स्पेनचे पूर्वीचे वैभव कुठे आणि का गेले, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा त्यांचा प्रयत्न गॅनिव्हेटच्या उपर्युक्त ग्रंथात दिसतो. १८९८ च्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धात अमेरिकेत स्पेनच्या ज्या वसाहती होत्या, त्या एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच स्पेनच्या ताब्यातून गेल्या होत्या तथापि प्वेर्त रीको, क्यूबा आणि फिलिपीन्स हेही स्पेनकडून हिसकावून घेतले गेले. स्पेनच्या राजकीय प्रश्नांबरोबरच आर्थिक प्रश्नही अवघड होऊन बसले. अशा परिस्थितीत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जे स्पॅनिश साहित्यिक प्रकाशात आले, त्यांना ‘ १८९८ ची पिढी ’ ( द जनरेशन ऑफ ९८) म्हणून सामान्यतः संबोधिले जाते. या नावाने ओळखला जाणारा असा कुठलाही लेखकसमूह नव्हता, असे मानणारेही काही आहेत पण ह्या समूहातले म्हणून जे साहित्यिक ओळखले जात होते, त्यांचेही विचार आणि कलात्मक ध्येये परस्परांपासून लक्षणीय रीतीने भिन्न होती. मात्र ‘ जुन्याला विरोध ’ हे त्यांच्या विचारांचे एक समान सूत्र होते, असे म्हणता येईल. नाटकातली अतिनाटकी भाषा, कवितेचा ठाशीव सूर, कादंबरीतील पारंपरिकता त्यांना मान्य नव्हती. पुनरुत्थान हा त्यांचा आवडता शब्द होता आणि अनेकांना असे वाटत होते, की स्पेनने आता ठसठशीतपणे यूरोपीय व्हायला हवे. बाहेरच्या जगातील बौद्धिक आणि कलेचे प्रवाह यांची त्यांना जाणीव झालेली होती. या दृष्टीचे परिणाम स्पॅनिश साहित्याला पोषकच ठरले.

स्पॅनिश साहित्यिक आणि विचारवंत मीगेल दे ऊनामूनो ई हूगो (१८६४ — १९३६) याच्या En torno al casticisimo (१८९५, इं. शी. ‘ ऑन स्पॅनिश प्यूरिझम ’ ) ह्या ग्रंथात स्पेन आणि त्याच्या समस्या यांचा केलेला सखोल अभ्यास प्रकट झाला आहे. Del Sentimiento tragic de la vida (१९१३, इं. भा. द ट्रॅजिक सेन्स ऑफ लाइफ इन मेन अँड इन पीपल्स ) या आपल्या सर्वांत महत्त्वाच्या ग्रंथात त्याने अमरत्वाच्या प्रश्नाचा विचार केला आहे. चिरंतनाचा ध्यास ही सर्व धर्मांच्या आणि मानवी प्रयत्नांच्या मुळाशी असलेली एक महत्त्वाची प्रेरणा आहे, अशी त्याची धारणा होती. कादंबरी ही मानवी व्यक्तिमत्त्वासंबंधीच्या मूलभूत चिंतनाचे एक प्रभावी माध्यम आहे, अशी त्याची भूमिका होती. Niebla (१९१४, इं. भा. मिस्ट ), अबेल सांचेझ (१९१७) आणि Tres novelas ejemplares y un prologo (१९२०, इं. भा. थ्री एक्झेंप्लरी नॉव्हेल्स अँड अ प्रोलॉग, १९३०) ह्या त्याच्या कादंबर्‍या या संदर्भात निर्देशनीय आहेत. मार्तीनेथ र्युएथ ऊर्फ आथोरीन (१८७३ — १९६७) हा ‘ १८९८ च्या पिढी ’ तला महत्त्वाचा समीक्षक. समीक्षेच्या पूर्वमूल्यांचा अन्वयार्थ पुन्हा लावण्याचा प्रयत्न त्याने El alma castellana (१९००, इं. शी. ‘ द कॅस्टीलियन सोल ’) ह्या त्याच्या ग्रंथात केला. त्याच्या मनाची कॅस्टीलियन जडणघडण त्यातून प्रत्ययास येते. त्याचा स्पेन आणि स्पॅनिश साहित्य यांचा अभ्यास प्रगाढ होता. त्याची लेखनशैली अनलंकृत आणि शांतसंयत आहे. होसे ओर्तेगा इ गासेत (१८८३ — १९५५) याचे राजकारण, तत्त्वज्ञान आदी विषयांवरील लेखन विचारप्रवर्तक आहे. स्पेनच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय समस्यांचे चिकित्सक विश्लेषण त्याने केले. अनेक मूलभूत प्रश्नांना हात घातला. Medi-taciones del Quijote (१९१४, इं. शी. ‘ मेडिटेशन्स ऑन किखोते ’), La Espana invertebrada (१९२२, इं. भा. इनव्हर्टिब्रेट स्पेन,१९३७), El tema de nuestro tiempo (१९२३, इं. भा. द मॉडर्न थीम, १९३३), La rebellion de las masas (१९३०, इं. भा. द रिव्होल्ट ऑफ द मासेस, १९३२) हे त्याचे विशेष उल्लेखनीय ग्रंथ होत. पीओ बारोखा (१८७२ — १९५६) याने सु. शंभर कादंबर्‍या लिहिल्या. मानवी स्वभाव आणि जीवन यांच्याबद्दलचा त्याचा दृष्टिकोन निराशावादी  होता आणि प्रचलित मूल्यांना आणि संस्थांना त्याचा विरोध होता. उदा., लष्कर, चर्च, राज्य आणि व्यक्तिवाद. La raza ( इं. शी. ‘ द रेस ’), La lucha por la vida (१९०४, इं. भा. द स्ट्रगल फॉर लाइफ ) आणि Agonias de nuestro tiempo (१९२६, इं. भा. ॲगनीज ऑफ अवर टाइम ) ह्या साहित्यकृतींतून प्रचलित स्थितीबद्दल त्याने प्रखर असंतोष व्यक्त केला आहे. व्हिसेंत ब्लास्को ईबान्येथ (१८६७ — १९२८) या कादंबरीकाराच्या सर्जनशीलतेचा खरा काळ १८९४ — १९०२ हा होय. ह्या काळात त्याच्या पाच कादंबर्‍या आणि एक लहानसा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. हा लेखक स्पेनच्या व्हॅलेंशिया या प्रदेशातला. त्याचे हे लेखन या प्रदेशाशी निगडित असून त्याची वाङ्मयीन कीर्ती मुख्यतः ह्याच लेखनावर अधिष्ठित आहे. काही कादंबर्‍यांतून त्याने तत्कालीन सामाजिक समस्यांवर अराजकतावादी भूमिकेतून लिहिले. La bodega (१९०५, इं. भा. द वाइन व्हॉल्ट ) आणि La horda (१९०५, इं. भा. द मॉब ) ह्या त्याच्या कादंबर्‍या त्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. पहिल्या महायुद्धावर त्याने लिहिलेल्या Los cuatro jinetes del apocalipsis (१९१६, इं. भा. द फोर हॉर्समेन ऑफ द अपोकॅलिप्स ) या कादंबरीला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. 


विसाव्या शतकारंभी काही साहित्यिकांनी बौद्धिक आणि कलात्मक मानदंडाचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला. कादंबरीच्या क्षेत्रात रामॉन पेरेथ दे आयाला (१८८०—१९६२) याच्या कादंबर्‍यांतून नितळ कलात्मक घाट आणि त्याच्या चौकटीत येणारी तत्त्वचिंतनात्मकता यांचा प्रत्यय येतो. Belarmino y Apolonio (१९२१, इं. भा. बालार्मीनो अँड अपोलोनिओ ) या कादंबरीत श्रद्धा आणि विवेकबुद्धी यांच्यातला विवाद प्रतीकात्मक व्यक्तिरेखा निर्माण करून मांडला आहे. गाब्रीएल मीरो (१८७९—१९३०) याची गद्यशैली वर्णनात्मक आणि आवाहक आहे. होसे ओर्तेगा इ गासेत ह्याने La deshumanizacion del arte (१९२५ इं. भा. द डीह्यूमनायझेशन ऑफ आर्ट अँड नोट्स ऑन द नॉव्हेल, १९४८) ह्या आपल्या महत्त्वाच्या ग्रंथात कलेविषयीचे मार्मिक विचार मांडले. कला, नैतिकता आणि विवेकबुद्धी मानवी जीवनासाठीच आहेत. सामाजिक मूल्ये अधिकाधिक लोकशाहीभिमुख आणि सर्वांच्या समतेवर अधिष्ठित होत असलेल्या या काळात कला आणि साहित्य मानवी आशयापासून दूर जात असून केवळ शैलीचे बंदी होऊन राहिले आहे, अशी भूमिका त्याने मांडली आहे. एक कलाप्रकार म्हणून कादंबरीचे विश्लेषण करून कादंबरीचा र्‍हास होणार असल्याचे भाकीत त्याने केले आहे.

१९३६ ते ३९ हा काळ स्पेनमधील यादवी युद्धाचा होता. या काळात काही स्पॅनिश कादंबरीकारांना देश सोडून जावे लागले. माक्स ऑब याने या यादवीचे विश्लेषण करणार्‍या कादंबर्‍यांची एक मालिकाच लिहिली (El laberinto magico १९४३ — ६८ इं. शी. ‘ द मॅजिक लॅबरिंथ ’). रामॉन होसे सेंडर (१९०२ — ८२) याच्या यादवी युद्धापूर्वीच्या कादंबर्‍या वास्तववादी आणि सामाजिक-राजकीय आशयाच्या होत्या तथापि पुढे तो गूढतेकडे वळला. Cronica del alba (१९४२ — ६६, इं. शी. ‘ क्रॉनिकल ऑफ द डॉन ’) या त्याच्या त्रिकृतीची ( ट्रिलॉजी ) मांडणी वास्तववादी आहे. मिथ्यकथांचा प्रभाव असलेल्या त्याच्या Epitalamio del prieto Trinidad (१९४२, इं. भा. डार्क वेडिंग ) आणि Las criaturas saturnianas (१९६८, इं. शी. ‘ सॅटर्नाइन बीइंग्ज ’) ह्या कादंबर्‍या एक प्रकारच्या वैश्विक आशयाकडे वळलेल्या दिसतात. फ्रांथीस्को आयाला याने आपली एकेकाळची सौंदर्यवादी भूमिका सोडून आपल्या कादंबर्‍यांतून आणि कथांतून स्पॅनिश तसेच ज्यांना निखळ मानवी म्हणता येतील असे विषय हाताळले. उदा., Muertes de perro (१९५८, इं. भा. डेथ ॲज अ वे ऑफ लाइफ ) ह्या कथा-कादंबर्‍यांतील परिप्रेक्ष्य बहुस्पर्शी आणि निवेदनतंत्रे गुंतागुंतीची आहेत.

कामीलो होसे सेला (१९१६ — २००२) हा स्पेनमधील यादवी युद्धोत्तर काळातील श्रेष्ठ कादंबरीकार. मानसशास्त्रीय दृष्टी आणि समज असलेल्या कामीलोच्या La familia de Pascual Duarte (१९४२, इं. भा. द फॅमिली ऑफ पास्क्यूअल दुआर्ते, १९४७ ) ही कादंबरी देहान्ताच्या शिक्षेची वाट पाहणार्‍या एका गुन्हेगाराचे आत्मनिवेदन म्हणून लिहिलेली आहे. भेदक वास्तववाद आणि अर्थहीन हिंसेची या कादंबरीत आलेली वर्णने थरारक आहेत. ‘ त्रेमेंदिस्मो ’ ह्या नावाने विख्यात झालेली एक वैशिष्ट्यपूर्ण शैली त्याने स्पॅनिशमध्ये प्रस्थापित केली. La colmena (१९५१, इं. भा. द हाइव्ह, १९५३ ) या कादंबरीत यादवी युद्धानंतरच्या माद्रिद शहराचे मनाला विषण्ण करून टाकणारे चित्रण त्याने केले आहे. कमालीचे दारिद्य्र आणि भूक सोसणार्‍या अनेक व्यक्तिरेखा या कादंबरीत दिसतात. वाङ्मयीन तांत्रिकतेची एक नवीच उंची गाठण्याचा एक प्रयत्न सेलाने या कादंबरीत केला आहे. Esas nubes que pasan (१९४५, इं. शी. ‘ द पासिंग क्लाउड्स ’) आणि El Molino de viento, y otras novelas cortas (१९५६, इं. शी. ‘ द विंडमिल अँड अदर शॉर्ट फिक्शन ’) हे त्याचे उल्लेखनीय कथासंग्रह. 

स्पेनमधील यादवी युद्धामुळे राष्ट्रावर जो सामाजिक-राजकीय आघात झाला, त्यामुळे स्पेनमध्ये मुख्यतः आर्थिक दृष्ट्या एक अनिश्चिततेचे वाता-वरण निर्माण झाले. त्याचा वाङ्मयावर झालेला परिणाम असा, की त्यात प्रयोगशीलतेचे चैतन्य हरपले. सांकेतिकता आणि कारागिरी दिसू लागली. व्हान आंतोन्यो दे झुनझुनेग्वी (१९०१ — ८२) याच्या कादंबर्‍या या दृष्टीने पाहता येतील. आर्थिक दृष्ट्या सुरक्षित असलेल्या वर्गाचे चित्रण त्याच्या कादंबर्‍यांतून आढळते. त्याच्या कादंबर्‍यांतला वास्तववादही एकोणिसाव्या शतकातील पारंपरिक वास्तववाद आहे. जीवनाच्या अंतरंगात शिरण्या-पेक्षा आपल्या कादंबर्‍यांत त्याने बाहेरून चित्रण केल्याचा आरोप त्याच्यावर केला जातो. तसेच एखाद्या छायाचित्रकारासारखे चित्रण तो करतो असाही आक्षेप त्याच्यावर घेतला गेला आहे. होसे मारीआ गिरोनेल्ला (१९१७ — २००३) हा कादंबरीकार परदेशी वाचकांना अधिक ज्ञात आहे. Los cipreses creen en Dios (१९५३, इं. भा. द सायप्रेसिस बिलिव्ह इन गॉड ) ह्या त्याच्या कादंबरीत्रयीने ( ट्रिलॉजी ) त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. Un millon de muertos ( १९६१, इं. भा. द मिल्यन डेड ) आणि Ha estallado la paz ( १९६६, इं. भा.  द पीस आफ्टर वॉर ) ह्या या त्रयीतील अन्य दोन कादंबर्‍या. यादवी युद्धापूर्वीच्या स्पेनचे चित्रण या कादंबरीत आहे तसेच त्या युद्धानंतरचा स्पेनही त्याने दाखविला आहे. मीगेल डेलिब्ज याची Cincohoras can Mario (१९६६, इं. शी. ‘ फाइव्ह अवर्स विथ मारीओ ’) ही प्रभावी ठरलेली कादंबरी जवळजवळ पूर्णतः आंतरिक एकभाषितांतून उभी करण्यात आलेली आहे. १९५० च्या दशकात सामाजिक वास्तववादाचे एक कठोर स्वरूप काही कादंबरीकारांच्या लेखनातून प्रकट झाले. आना मारीआ मातूते, राफेल सांचेझ फेर्लोसीओ, व्हान आणि ल्यूईस गॉय्टीसोलो हे दोघे भाऊ, केस्यूस फर्नांदेथ सांतोस, व्हान गार्सिया होर्तेलानो हे अशा कादंबरीकारांपैकी काही होत. बांधिलकीच्या भावनेने लिहिणारे हे कादं-बरीकार होते. El Jarama (१९५६, इं. भा. द वन डे ऑफ द वीक ) ही फेर्लोसीओची कादंबरी, अशा लेखकांनी लिहिलेल्या कादंबर्‍यांत सर्वोत्कृष्ट मानली जाते. शहरी तरुणांच्या जीवनांतील एकारलेपण त्यांच्या निरुद्देश संभाषणांतून या कादंबरीत दाखवलेले आहे.

थेट आणि निखळ वास्तववादाची ही लाट लवकरच ओसरली. Tiempo de silencio ( १९६२, इं. भा. टाइम ऑफ सायलेन्स ) ह्या लूईस मार्टीन सांतोस ह्याच्या कादंबरीने प्रथम वेगळी वाट चोखाळली. यादवी युद्धानंतरचा स्पेन हाच या कादंबरीचा विषय तथापि तो कलात्मकतेने हाताळण्यात आला आहे. गॉय्टीसोलोने कादंबरीचा घाट आणि भाषा ह्यांच्याबाबत अनेक क्रांतिकारक प्रयोग केले. Senas de identidad (१९६६, इं. भा. मार्क्स ऑफ आयडेंटिटी ) ही त्याची कादंबरी या संदर्भात निर्देशनीय आहे. मिथ्यकथा आणि रूपकात्मकता असलेली व्हान बेनेट गोइटा याची Volveras a Region ( १९६७, इं. भा. यू विल रिटर्न टू रीजन ) ही कादंबरी या नव्या प्रवाहातली आहे.

नाटक : विसाव्या शतकातील नाटकात जोम निर्माण करण्याचे श्रेय हाथींतो बेनाव्हेंते ई मार्तीनेथ (१८६६ — १९५४) याच्याकडे जाते. सुमारे १७० नाटके त्याने लिहिली. तीव्र नैतिक जाणीव, उपरोधप्रचुरता, नाट्यतंत्रावरील पकड ही त्याच्या नाट्यलेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. स्पॅनिश नाटकाला समृद्ध करण्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या यूरोपीय नाटककारांकडून आवश्यक ते नाट्यसंकेत आत्मसात केले. वेगळ्या संविधानकांचा परिचय स्पॅनिश नाटकांनी घडवला. ‘ सॅटरडे नाइट ’ (१९०३, इं. शी.), ‘ ऑटमल रोझीस ’ (१९०५, इं. शी.), ‘ बाँड्स ऑफ इंटरेस्ट ’ (१९०७, इं. शी.), ‘ द पॅशन फ्लॉवर ’ ( १९१३, इं. शी. ) ही त्याची काही विशेष उल्लेखनीय नाटके. १९२२ मध्ये साहित्याचा नोबेल  पुरस्कार  त्याला  देण्यात  आला.

कींतेरो आल्वारेथ (१८७१ — १९३८) आणि क्वाकीन आल्वारेथ (१८७३ — १९४४) हे दोन नाटककार बंधू परस्परांच्या सहकार्याने नाटके लिहीत असत. दक्षिण अँडलूझिया या प्रदेशाचे ते रहिवासी. आपल्या या प्रदेशाची विलोभनीयता, तिची विविध अंगे आपल्या सुखा- त्मिकांतून त्यांनी सादर केली. ही नाटके यशस्वीही ठरली. ‘ द फ्लॉवर्स ’( १९०१, इं. शी. ), ‘ ए सनी मॉर्निंग ’ (१९०५, इं. शी. ), माल्व्हालोका ( १९१२ ) ही त्यांची काही उल्लेखनीय नाटके.

रामॉन मारीआ देल बाल्ये इंगक्लान (१८६६ — १९३६) हा १९२० च्या दशकातला ठळक नाटककार. स्पॅनिश नाटकाला त्याने नवतेचा प्रत्यय आणून दिला. कलात्मकतेच्या सामान्य कल्पनांच्या बाहेर काढले. समाजातील भ्रष्टाचार आणि ढोंग यांवर त्याने आपल्या नाटकांतून उपरोध-प्रचुर टीका केली. ‘ एस्पेरेंतो ’ या तंत्राचा वापर त्याने Luces de Bohemia (१९२०, इं. भा. बोहेमिअन लाइट्स ) ह्या त्याच्या नाटकात केला. विरूप वास्तवाचे अतिशयोक्त चित्रण हेतुपूर्वक करणे हे एस्पेरेंतो-तंत्र होते. चोथींतो ग्राऊ याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराशावादी होता. खुसखुशीत संवादांचा अभाव, उच्चभ्रू प्रेक्षकांनाच आवडतील अशी संविधानके आणि त्या संविधानकांनाच अनुरूप अशी भाषा यांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली नाही.

नाटकाच्या क्षेत्रात फेथेरीको गार्सीआ लोर्का (१८९८ — १९३६) हा आपल्या समकालीनांमध्ये खूप मोठी उंची गाठलेला नाटककार. स्पॅनिश नाटकांप्रमाणे यूरोपीय नाटकांशीही लोर्काचा चांगला परिचय होता. त्यांच्यात जे चांगले, ते त्याने घेतले. स्पॅनिश नाटकात खर्‍या अर्थाने शोकात्मिकेची परंपरा नसताना त्याने पद्य-शोकात्मिकेचे लेखन केले. मानवी विकारवासनांचा उग्र, उत्कट आविष्कार काव्यात्म प्रतिकात्मकतेतून त्याच्या नाटकांत येताना दिसतो. नियती आणि माणूस यांच्यातील शोकात्म नातेसंबंध त्याच्या नाटकांतून प्रकट होताना दिसतात. आपल्या नाटकांतून त्याने प्राधान्याने स्पेनमधील ग्रामीण समाजाबद्दल लिहिले. त्याच्या नाटकांत ब्लड वेडिंग  (१९३३, इं. भा. १९५८ ), येर्मा (१९३४), ‘ दोना रोसिता द स्पिन्स्टर ऑर द लँग्वेज ऑफ द फ्लॉवर्स ’ ( १९३५, इं. शी. ), ‘ द हाउस ऑफ बर्नार्डा आल्बा ’ (१९३६, इं. शी. ) यांचा समावेश होतो. स्पॅनिश जीवनातील आत्मसन्मानाचा पारंपरिक विषय या नाटकांतून त्याने हाताळला आहे. येर्मा  या त्याच्या नाट्यकृतीचा मराठी अनुवाद आरती हवालदार यांनी चांगुणा या नावाने केला आहे.

स्पॅनिश नाटकांच्या अभिजात पूर्वरूपांचे कल्पकतेने रूपांतर करणे हे आल्बेर्ती रॅफेएल याच्या नाट्यलेखनाचे एक वैशिष्ट्य होते. उदा., त्याचे El hombre deshabitado (१९३१, इं. शी. ‘ द अन्इन्हॅबिटेड मॅन ’) हे काल्देरॉनच्या नाटकाचे रूप डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले नाटक. स्पॅनिश नाटकामध्ये नवप्रवाह आणण्याचे अशा नाटककारांचे प्रयत्न स्पेनमधील व्यावसायिक रंगभूमीच्या बाबतीत निष्प्रभ ठरले आणि यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर तर थांबलेच. १९४० नंतरच्या काळात मोठा नाटककार स्पेनमध्ये झाल्याचे दिसत नाही. आंतोन्यो ब्यूएरो व्हाल्लेजो (१९१६ — २०००) याने ह्या परिस्थितीत काही परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. En la ardiente oscuridad ( १९५०, इं. शी. ‘ इन द बर्निंग डार्कनेस ’), La tejedora de suenos ( १९५२, इं. शी. ‘ द ड्रीम वीव्हर ’) आणि Un sonador para un pueblo ( १९५८, इं. शी. ‘ ए ड्रीमर फॉर द पीपल ’) ही त्याची नाटके उल्लेखनीय आहेत. तत्कालीन सामाजिक जीवनावरील भाष्य करण्यासाठी त्याने मिथ्यकथा, रूपके, इतिहास यांचा मार्मिकतेने आणि कल्पकतेने उपयोग करून घेतला. आल्फॉन्सो सास्त्रे याने मात्र बांधिलकीच्या भावनेने सामाजिक समस्या अगदी थेटपणे आपल्या नाटकांतून मांडल्या. फेर्नांदो आर्राबाल याने मृषा रंगभूमीकडे ( द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड ) आपले लक्ष वळविले. 


कविता : लॅटिन-अमेरिकन कवी रूबेन दारीओ (१८६७ — १९१६) याने ‘ मोदेर्निझ्मो ’ ( मॉडर्निझम ) हा नवा प्रवाह १८९२ मध्ये स्पेनमध्ये आणला. जीवनातील सौंदर्यमूल्यांचा शोध मॉडर्निझमने घेतला. स्पॅनिश कवितेत दारीओने आणलेल्या आधुनिकतावादाच्या नव्या प्रवाहाने नवी वृत्ते आणि छंद आले. स्पॅनिश कविता संगीतमय बनली. आधु-निकतावादाने सु. ५० वर्षे स्पॅनिश कवितेवर आपला प्रभाव टिकवून ठेवला. खोल, आत्मपर आणि सौंदर्यसंपन्न कविता निर्माण झाली. ह्या कवितेतला सूर सर्वदेशीय ( कॉस्मॉपॉलिटन ) स्वरूपाचा असला आणि मानवी स्थितीला मनुष्य म्हणून भिडणारा असला, तरी स्पॅनिश वाङ्मयीन परंपरेचा त्याला विसर पडलेला नव्हता.

आनतोन्यो माचादो इ रूईथ (१८७५ — १९३९) ह्या कवीत निसर्गदृश्यांतून स्वतःची भावावस्था व्यक्त करण्याची प्रवृत्ती दिसून येते. साध्यासुध्या काव्यशैलीतून खोल अर्थाचे अनुनाद उमटविण्याचे सामर्थ्य त्याच्या प्रतिभेत आहे. त्याची आत्मचिंतनात्मक कविता त्याच्या Soledades (१९०३, विस्तारित आवृ. १९०७, इं. शी. ‘ सॉलि-ट्यूड्स ’) या काव्यसंग्रहात अंतर्भूत आहे. कास्टील या स्पेनमधील प्रदेशा-बद्दल त्याला वाटणारे प्रेम Campos de Castilla (१९१२, विस्तारित आवृ. १९१७, इं. शी. ‘ फील्ड्स ऑफ कास्टील ’) ह्या त्याच्या काव्य-संग्रहातून व्यक्त झाले आहे. व्हान रामॉन हीमेनेथ (१८८१ — १९५८) याच्या काव्यसंग्रहांत Rimas (१९०२, इं. शी. ‘ र्‍हाइम्स ’), Sonetos espirituales (१९१४-१५, इं. शी. ‘ स्पिरिच्यूअल सॉनेट्स ’), Diario de un poeta recien casado (१९१७, इं. शी. ‘ डायरी ऑफ ए पोएट रिसेंट्ली मॅरिड ’) आणि Animal de fondo (१९४७, इं. शी. ‘ ॲनिमल ऑफ द डेप्थ ’) यांचा समावेश होतो. भावकवितेला त्याने आपले सर्व आयुष्य वाहिलेले होते. कवितेतून केवळ सौंदर्य शोधण्याचा ध्यास त्याने घेतला होता. कविता आणि जीवन एकात्मच    आहेत अशी त्याची धारणा होती. १९५६ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार त्याला देण्यात आला. 

१९२० च्या आणि १९३० च्या दशकांत नामवंत स्पॅनिश कवींचा एक गट उदयास आला. ‘ १९२७ ची पिढी ’ ( जनरेशन ऑफ 1927 ) या नावाने तो ओळखला जातो. या गटातील कवींनी भूतकाळापासून प्रेरणा आणि स्फूर्ती घेतली ( उदा., पारंपरिक गीते, बॅलड ). त्याचप्रमाणे त्यांच्या वर्तमानकाळातील अतिवास्तववादासारख्या कलासाहित्यविषयक चळ-वळीपासूनही त्यांनी चेतना प्राप्त केली. ह्या प्रभावस्रोतांपासून उत्कट, आत्मपर कविता लिहिण्याचा ह्या कवींचा प्रयत्न होता. काव्यनिर्मितीत येणार्‍या प्रतिमा तर्क, विवेकबुद्धी यांच्यासारख्या अडथळ्यांपासून मुक्त असल्या पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती.

या कवींमध्ये प्रमुख होता फेथेरीको गार्सीआ लोर्का. ‘ बुक ऑफ पोएम्स ’ (१९२१, इं. शी. ) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. लोकसंगीतात विशेषतः जिप्सी संगीतात त्याला स्वारस्य होते. त्यातूनच त्याचे Romancero gitano (१९२८, इं. शी. ‘ जिप्सी बॅलड ’) लिहिले गेले. बॅलडसारखा पारंपरिक काव्यप्रकार हाताळताना लोर्काने त्यात अनेक अभिनव प्रतिमा वापरल्यामुळे त्या काव्यप्रकाराला एक नवे चैतन्य प्राप्त झाले. Poeta en Nueva York (१९४०, इं. शी . ‘ पोएट इन न्यूयॉर्क ’) मधील त्याची कविता अतिवास्तववादी वळणाची आहे. पेद्रो सालीनास इ सेर्र्नो (१८९१ — १९५१) याने भाषेबद्दलची अत्युत्कट संवेदनशीलता आणि आशयाचे संक्षिप्तीकरण यांतून विशुद्ध कविता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘ द व्हॉईस इन्स्पायर्ड बाय यू ’ (१९३४, इं. शी. इं. भा. ट्रूथ ऑफ टू अँड अदर पोएम्स ) मध्ये बाह्य वास्तव आणि वार्‍याप्रमाणे सतत वाहत राहणारे आत्मनिष्ठ संवेदन यांच्यातील सूक्ष्म परस्परसंबंध ह्यांतील शोध घेण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. हॉर्हे ग्विल्येन याचे कांतीको : ए सिलेक्शन (१९२८, इं. भा. ) हे नित्याच्या वास्तवातील विलक्षणाला उद्देशून लिहिलेले एक स्तुतिगीत आहे. ‘ क्लॅमर ’ (१९५७ — ६३, इं. शी.) आणि Homenaje (१९६७, इं. शी. ‘ होमेज ’) ह्या त्याच्या काव्यग्रंथांतून भोवतालच्या दुःखांची आणि विसंवादांची तीव्र जाणीव त्याने व्यक्त केलेली आहे. अलेक्सांद्रे वीथेंते हा ‘ १९२७ च्या पिढी ’ चा आणखी एक महत्त्वाचा सदस्य होय. La destruccion o el amol (१९३५, इं. शी. ‘ डिस्ट्रक्शन ऑर लव्ह ’) मध्ये त्याने मानवी वैफल्याचे दर्शन घडविले आहे. राफेल आल्बेर्तीने आरंभी लोकसाहित्यातील वैशिष्ट्यांचा उपयोग आपल्या कवितेसाठी करून घेतला पण पुढे तो अनेक प्रकारच्या प्रभावांखाली आला. अति-वास्तववादाचाही त्याच्यावर प्रभाव होता. असे असले, तरी त्याच्या काव्यरचनेवर कवी म्हणून त्याचा स्वतंत्र ठसा नेहमीच असे. Marinero en tierra (१९२५, इं. शी. ‘ सेलर ऑन लँड ’), Cal y canto (१९२७, इं.  शी. ‘ लाइम अँड स्टोन ’) आणि Sobre los angeles (१९२९, इं. शी. ‘ कन्सर्निंग द एंजल्स ’) ह्या त्याच्या काव्यकृती उल्लेखनीय आहेत. ल्यूईस सेर्नुडा आपल्या कवितेत खडतर वास्तव आणि आदर्शलक्ष्यी आकांक्षा यांच्यातील अंतर प्रकट करतो. La realidad y el deseo (१९३६, इं. शी. ‘ रिॲलिटी अँड डिझायर ’) ह्या त्याच्या काव्यसंग्रहाचे नाव त्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. 

स्पॅनिश कवितेच्या या उज्ज्वल कालखंडातील इतर काही कवी म्हणजे गेरार्दो दीएगो, दामासो ऑलोन्सो, एमिलिओ प्रादोस हे होत. मीगेल हेरांदेथ ह्याने ‘ १९२७ ची पिढी ’ आणि यादवी युद्धोत्तर कवींची लाट ह्यांच्यातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न केला.  

यादवी युद्धानंतरच्या काळात १९३० च्या दशकातच क्षीण होत गेलेली विशुद्ध कविता लुप्त झाली. कवितेची भाषा अधिक सोपी करण्याकडे कल होऊ लागला. कवितेच्या घाटाबद्दलची शिस्त, स्पष्टता आणि त्यासाठी थेट प्रतिमांचा वापर लक्षणीयपणे कवितेत दिसू लागला. कवितेचा आशय अधिकाधिक सामाजिक होत गेला. लीओपोल्दो पानेरो, लूईस रोझालीस, लूईस व्हीव्हांको, गाब्रिएल सेलाया असे काही कवी ह्या संदर्भात निर्देशनीय आहेत. 

विसाव्या शतकाच्या अखेरच्या सु. २५ वर्षांतल्या प्रमुख कवींमध्ये आंतोन्यो कोलिनास, ग्वान लुईस पानेरो, मीकेल द ऑर्स, आंद्रेस त्रापिएल्लो, काव्हेयर साल्व्हागो आणि पेद्रो जिमफेरर ( ह्याने स्पॅनिश भाषेबरोबर काटलनमध्येही लेखन केले. ) ह्यांचा समावेश होतो. ह्या कवींनी अनेकदा बोलभाषेचा उपयोग केला आणि कवितेसाठी अधिक निकटचे विषय शोधले. 

विसाव्या शतकारंभीच्या कादंबरीकारांनी कादंबरीरचनेचा घाट आणि तंत्र ह्यांच्या संदर्भात प्रयोग केले संविधानक आणि व्यक्तिरेखा ह्यांवर ह्यांचा भर कमी राहिला. यादवी युद्धोत्तर काळात कादंबरीकारांची एक नवी पिढी उदयास आली. रोझा चान्सेल, मीकेल देलीबेस आणि कारमेन लाफोरेत ह्यांनी अशा प्रकारची प्रयोगशीलता टाळून पारंपरिक रचनेचाच मार्ग अनुसरला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या आसपासच्या कादंबरीने स्पॅनिश कादंबरीत विविध प्रवाह आणले. वास्तववादी कादंबर्‍यांमध्ये दैनंदिन जीवनातील भाषा वापरणे हा एक प्रवाह. ग्वान बेनेट आणि त्याच्या अनुयायांच्या छोट्याशा गटाने दुसरे टोक गाठले. त्यांच्या कादंबर्‍या वैचारिक स्वरूपाच्या होत्या. टेरेन्सी मॉइक्स आणि आपल्या लेखन–कारकीर्दीच्या उत्तरार्धात ग्वान गॉयटिसोलो ह्यांसारखे कादंबरीकार अ-पश्चिमी ( नॉन-वेस्टर्न ) संस्कृतींकडे ओढले गेले. एदू आर्दो मेंडोझा, ग्वान मार्से, लूईस गॉयटिसोलो, सोलोदाद प्यूर्तोलास, मीकेल सांचेझ ऑर्टिझ, माँतसेरात रॉइग, यॉन जुआरिस्ती, रामॉन इरिगोयेन हे कादंबरीकारही उल्लेखनीय आहेत. 

काटलन साहित्य : ह्या व्याप्तिलेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे काटलन आणि गॅलिशियन या स्पेनमध्ये बोलल्या जाणार्‍या दोन बोली-भाषा होत. काटलन या बोलभाषेचे प्रॉव्हांसाल भाषेशी निकटचे नाते आहे. या नात्याच्या अनेक खुणा काटलन भाषेत दिसतात. त्रूबदूरांनी विकसित केलेले काव्यप्रकार काटलनमध्ये काव्यरचना करणार्‍या कवींनी वापरले. 

मध्ययुगीन कविता : या युगाच्या आरंभी होऊन गेलेले कवी प्रॉव्हांसाल कवितेच्या प्रभावाखाली होते. सुमारे शतकभराच्या काला-वधीनंतर म्हणजे चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात हा प्रभाव कमी झाला. या शतकातील कवींनी उत्तर फ्रान्समधील कवितेकडून प्रेरणा घेतली. आपल्या काव्यरचनेसाठी त्यांनी रोमान्सचे विषय घेतले. उदा., राजा आर्थर व त्याचे सरदार या विषयावर आधारलेले रोमान्स. पंधरावे शतक हा काटलन कवितेच्या बहराचा काळ होय. १३९३ मध्ये म्हणजे चौदाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस ऑरगॉनचा राजा जॉन पहिला (कार. १३८७ — ९५) याने बार्सेलोना येथे एक काव्य अकादेमी स्थापन केली. ह्या अकादेमीतर्फे कवितेला उत्तेजन दिले गेले. या अकादेमीने काव्य-रचनेच्या स्पर्धा घडवून आणल्या. उत्तेजनाची ही परंपरा मार्टिन पहिला आणि फर्डिनंड पहिला यांच्या कारकीर्दीतही चालू राहिली. काटलन कवितेला मिळालेल्या राजाश्रयामुळे ह्या कवितेला परकीय प्रभावापासून मुक्त होण्यास मदत झाली. पंधराव्या शतकात वाङ्मयीन उपक्रमांचे प्रभावी केंद्र व्हॅलेंशियात उदयाला आले. तेथे एक नवीन काव्यसंप्रदायही उदयाला आला. कवितेच्या फ्रेंच प्रतिमानांकडे पाठ फिरवून या संप्रदायाने इटली-कडून प्रेरणा घेतली. औझीआस मार्क (१३९७ — १४५९) याची कविता काटलनमधील उत्कृष्ट कवितेत मोडते. त्याच्या कवितेचा प्रभाव आधुनिक काटलन कवितेवरही पडलेला आहे. इंद्रियभोग्यता आणि उत्कट आदर्शवाद ह्यांतील संघर्ष हे त्याच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. इटालियन कवी पीत्रार्क ह्याचा औझीआसच्या कवितेवरील प्रभाव जाणवतो. आत्मपर अभिव्यक्ती, मौलिक प्रतिमा, तत्त्वचिंतनात्मकता, सूक्ष्मता ही त्याच्या काव्यरचनेची काही वैशिष्ट्ये होत. सोळाव्या शतकातल्या कॅस्टीलमध्ये तसेच आधुनिक काटलन कवींवरही त्याच्या कवितांचा प्रभाव पडलेला आहे. जाउमे रॉईग याची ‘ द मिरर ऑर बुक ऑफ विमेन ’ ( सु. १४६०, इं. शी. ) ही सु. १६,००० ओळींची रचना म्हणजे स्त्रियांवरील उपरोध-प्रचुर टीका आहे. तत्कालीन व्हॅलेंशियन जीवनाचे चित्रणही ह्या काव्य-रचनेत आढळते. योहान रॉइक दे कोरेल्ला हा व्हॅलेंशियन भावकवी ह्या प्रबोधनकालाचा प्रतिनिधी मानता येईल. 

ऑरगॉन आणि कॅस्टील या प्रदेशांचे एकीकरण झाल्यानंतर कॅस्टीलियन ( स्पॅनिश ) भाषेचे महत्त्व वाढत चालले आणि या स्थितीचा प्रतिकूल परिणाम काटलन साहित्यावर झाला. परिणामतः काटलनमधील काव्य- निर्मिती जवळपास पन्नास वर्षे थांबली होती. 

गद्य : तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत काटलनमध्ये वाङ्मयीन गद्य-निर्मिती झालेली नव्हती. मध्ययुगीन काटलन गद्याचा उत्कृष्ट नमुना या भाषेत लिहिल्या गेलेल्या चार इतिवृत्तांमध्ये आढळतो. त्यांत ‘ बुक ऑफ द डीड्स ऑफ किंग जेम्स ’ ( सु. १२७६, इं. शी.) ह्याचा समावेश आहे. राजा जेम्स पहिला याच्या मृत्यूनंतर, ह्या इतिवृत्तांची रचना झालेली असून त्याचा कर्ता अज्ञात आहे. रामॉन म्यूंतानेर (१२६५ — १३३६) याचे Cronica Catalana हे इतिवृत्त भाषा आणि निवेदनशैली ह्या दोन्ही दृष्टींनी आपली गुणवत्ता सिद्ध करते. बेर्नाट डेस्कलॉट ( तेरावे शतक ) याच्या इतिवृत्तात पीटर फर्स्ट द ग्रेट याच्या कारकीर्दीचा वृत्तान्त आलेला आहे. रामॉन ल्यूल ( सु. १२३५ — १३१६) याने कोशनिर्मितीचे महत्त्वपूर्ण काम करून मध्य-युगीन ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचा परामर्श घेतला. तो तत्त्वचिंतकही होता. Llibre de contemplacio en Deu ( सु. १२७२, इं. शी. ‘ बुक ऑफ द काँटेप्लेशन ऑफ गॉड ’) हा त्याचा ईश्वरविद्याविषयक ग्रंथ या संदर्भात उल्लेखनीय आहे. ‘ द ग्रेट आर्ट ’ (१३०५ — ०८, इं. शी.) ह्या नावाने झालेल्या त्याच्या ग्रंथसंकलनात ‘ द ट्री ऑफ नॉलेज ’ ( इं. शी.) आणि ‘ द बुक ऑफ असेंट अँड डिसेंट ऑफ इंटलेक्ट ’ ( इं. शी.) ह्या दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश होतो. ब्लँकेर्ना (  सु. १२८४ ) आणि फेलिक्स ( सु. १२८८) या त्याच्या रूपकात्मक कादंबर्‍यांना लोकप्रियता लाभली. शूरोदार ( शिव्हल्र् ) वर्तनाचे नियम सांगणारे एक पुस्तकही त्याने लिहिले. 


बेर्नाट मेत्ये (१३५० — १४१३) याने इटालियन साहित्यिक जोव्हान्नी बोकाचीओच्या एका कथेचे काटलनमध्ये भाषांतर करून त्या भाषेच्या साहित्यात अभिजाततेचा एक प्रवाह आणला. तसेच आपल्या काव्यमय शैलीने त्याने काटलन गद्य संपन्न केले. काटलन भाषेत काही रोमान्सही लिहिले गेले. पंधराव्या शतकात या भाषेत नाट्यनिर्मितीही होऊ लागली. 

गेलेल्या राजकीय स्वातंत्र्याबरोबर काटलन भाषकांचे भाषिक आणि वाङ्मयीन स्वातंत्र्यही संपुष्टात आले. सोळाव्या शतकात काटलन भाषा फक्त ग्रामीण भागांत आणि चर्चच्या व्यासपीठांवरून बोलली जाऊ लागली. पेरे सेराफी हा एकच नाव घेण्याजोगा कवी या शतकात होऊन गेला. गद्यलेखन मुख्यतः इतिहासकारांनी केले. लोकगीते, बॅलड यांसारख्या रचना या काळात झाल्या. 

एकोणिसाव्या शतकात Gramatica y apologia de la llengua cathalana (१८१४, इं. शी. ‘ ग्रामर अँड अपॉलजी ऑफ द काटलन लँग्वेज ’) या जोसेफ पाऊ बॅलट इ टोर्रेस याच्या पुस्तकाने काटलन भाषेच्या भाषिक आणि वाङ्मयीन पुनरुज्जीवनाचा आरंभ केला असे म्हणता येईल. अनेक बौद्धिक कल्पनांच्या आविष्कारासाठी प्राचीन काटलन भाषा अपुरी पडते, ह्याची जाणीव अनेकांना झाली होती. बार्सेलोनामध्ये काटलनच्या अभ्यासासाठी स्थापना झालेल्या The Institut d’Estudis Catalans (१९०७) ह्या संस्थेने काटलन भाषा संपन्न करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या काळात काटनल कवितेत स्वच्छंदतावादी प्रवृत्ती दिसू लागल्या होत्या. ब्यूनाव्हेंच्यूरा कार्ल्स आरीबाऊ (१७९८ — १८६२) (१८३२, इं. शी. ‘ ओड टू द फादरलँड ’), जोआकिम रूबीओ इ ओर्स व बालागेर (१८२४ — १९०१) हे कवीही काटलन भाषेच्या विकासाला साहाय्यभूत ठरले. 

आधुनिक काटलन गद्याचाही विकास होत होता. रूबीओ इ ओर्स, फ्रांथीस्को पी इ मार्गॉल, होसे तोर्रास इ बागेस ( la tradico catalana, १८९२, इं. शी. ‘ द काटलन ट्रॅडिशन ’ या ग्रंथाचा लेखक ) ह्यांची नावे या संदर्भात उल्लेखनीय आहेत. झेनिअस तथा यूजेनी द ओर्स याची La ben plantada (१९११, इं. शी. ‘ फर्मली रूटेड ’) ही तत्त्वचिंतनात्मक कादंबरी आधुनिक काटलन साहित्यातील एक उत्कृष्ट साहित्यकृती होय. काटलन नाटककारांनी लिहिलेल्या नाटकांत आंजेल गिमेराकृत Terra baixa (१८९६, इं. शी. ‘ लोलँड्स ’), इग्नासी इग्लेसियासकृत एश्री तशश्रश्री यांचा अंतर्भाव होतो. या दोन्ही नाटककारांना यूरोपीय कीर्ती प्राप्त झाली.  

१९२३ — ३० या कालखंडात प्रीमो दे रीव्हेरा या हुकूमशहाने कॅस्टीलियन भाषेखेरीज अन्य भाषांवर बंदी आणल्यामुळे काटलन साहित्याची पिछेहाट झाली. तसेच १९३६ ते १९३९ ह्या कालखंडातील स्पॅनिश यादवी युद्धाच्या काळात अनेक काटलन साहित्यिक आपली जन्मभूमी सोडून अन्य देशांत पळून गेले. जे उरले त्यांना आपली वाङ्मय-निर्मिती करण्यासाठी अनुकूल वातावरणच नव्हते. पुढे जनरल फ्रँकोने काटलन भाषेविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे काटलन साहित्याची प्रगती फारशी झाली नाही. काही लेखकांनी लेखन चालू ठेवले पण आपल्या साहित्यातून त्यांनी एक प्रकारच्या कलात्मक पलायनवादाचा मार्ग काढला. साल्व्हादोर एस्प्रिऊ आणि पेरे क्वार्ट ( खरे नाव जोन ऑलिव्हर ) हे या कालखंडातले नामवंत कवी होत. आपल्या कवितांतून त्यांनी सामाजिक प्रश्नांचा वास्तववादी आविष्कार केला. गद्यलेखकांनीही ही सामाजिक सन्मुखता जपलेली दिसते. 

गॅलिशियन साहित्य : पोर्तुगीज भाषेशी अतिशय निकटचे नाते असलेल्या गॅलिशियन भाषेतील मध्ययुगीन कवितेचा विचार केल्यास पोर्तुगीज आणि गॅलिशियन या भाषांतील सीमारेषा काढता येत नाही. भावकाव्यावर माध्यम म्हणून कॅस्टीलियन कवींनीही एक शतकाहून अधिक काळ गॅलिशियन भाषाच पसंत केली होती. पुढे कॅस्टीलियनच्या वाढत्या प्रभावामुळे गॅलिशियन भाषेची जी दुर्दशा झाली, ती एकोणिसाव्या शतकापर्यंत तथापि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस गॅलिशियन शब्दकोश (१८६३) आणि त्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध झाले (१८६४). परिस्थितीत झालेला हा बदल महत्त्वाचा होता. फ्रांथीस्को अनॉन इ पाझ, रोझालिआ दे कास्त्रो, एदूआर्दो पोंदाल इ अबेंते व व्हॅलेंटिन लामास कार्व्हाजल हे प्रमुख आधुनिक गॅलिशियन कवी होत. पाझच्या कवितांतून देशप्रेम आणि स्वातंत्र्य या विषयांची उत्कट अभिव्यक्ती दिसून येते. रोझालिआ दे कास्त्रो हे गॅलिशियन साहित्यातील अत्यंत महत्त्वाचे नाव. आपल्या Cantares gallegos (१८६३, इं. शी. ‘ गॅलिशियन साँग्ज ’) मधील कवितांतून तिने गॅलिशियातील ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेले आपले मन प्रकट केले आहे. Follas novas (१८८०, इं. शी. ‘ न्यू लीव्ह्ज ’) मधील कवितांतून आत्मनिरीक्षणाबरोबरच नैराश्याची भावना आविष्कृत झालेली आहे. एदूआर्दो पोंदाल इ अबेंते ह्याच्या कवितांतून निसर्गप्रेम आणि केल्टिक पुराणकथांचे संदर्भ आढळतात. व्हॅलेंटिन लामास कार्व्हाजल ह्याच्या कवितेतून शेतकर्‍यांचा आवाज प्रकट होतो. 

कवितेच्या तुलनेत गद्य काहीसे उणावलेले दिसते. आऊरेल्यो रिव्हाल्टा, मान्वेल ल्यूग्रीस फीअर आणि हेराक्लीओ पेरेझ प्लेसर ह्यांनी कथा-लेखन केले. १९२० नंतरच्या काळात गॅलिशियनमध्ये विपुल काव्यलेखन झाले आहे. 

संदर्भ : 1. Brenan, Gerald, The Literature of the Spanish People : From Roman Times to the  Present, 1976.

           2. Chandler, Richard E. Schwartz, Kessel, A New History of Spanish Literature, 1961.

          3. Green, Otis H. Spain and the Western Tradition : The Castilian Mind in Literature from El Cid to Calderon, 4 Vols., 1963–66.

कुलकर्णी, अ. र.