बल्गेरियन भाषा : बल्गेरियन ही इंडो-यूरोपियन कुटुंबाच्या स्लाव्हिक गटाची दक्षिणेकडील शाखा आहे. ती प्रामुख्याने बल्गेरियात बोलली जात असून एक सांस्कृतिक व राष्ट्रीय स्वरूपाची भाषा म्हणून ती केवळ एकोणिसाव्या शतकापासून ओळखली जाऊ लागली आहे. तिची लिपी सिरिलिक आहे. तिचे भाषिक मुळात तुर्की वंशाचे होते, म्हणून ही भाषा प्राचीन स्लाव्हिकपेक्षा बरीच भिन्न आहे. बल्गेरियन भाषिकांची संख्या पाऊण कोटीच्या आसपास आहे.

भाषिक रूपरेषा : ज्या सिरिलिक लिपीचा उपयोग बल्गेरियन करते तिच्यात एकदंर बत्तीस ध्वनिचिन्हे आहेत.

इतर स्लाव्हिक भाषांच्या तुलनेने बल्गेरियनची दोन वैशिष्टये आहेत : (१) तिच्यात निश्र्चित निर्गुण विशेषण आहे, आणि (२) सर्व विभक्तींसाठी नामाचे एकच रूप वापरले जाते. व्कचित संबोधनासाठी वेगळे रूप आणि जुन्या विभक्तींचे थोडे अवशेष आढळतात.

नामात लिंगभेद असून लिंगे तीन आहेत. निर्गुण विशेषण नामापूर्वी न येता त्याला शेवटी जोडले जाते. वचनभेद असून वचने दोन आहेत.

विशेषण नामापूर्वी आले तर निर्गुण विशेषण त्याला जोडले जाते.

बल्गेरियन क्रियापद इतर स्लाव्हिक भाषीय क्रियापदांप्रमाणे गुंतागुंतीचे आहे. शिवाय इतर भाषांत नसलेले भूतकाळ, अतिभूतकाळ, भविष्यभूतकाळ इत्यादींची रूपेही त्यात आढळतात.

काही शब्द : व्रात् ‘भाऊ’, स्मृत् ‘मृत्यू’, झेम्प् ‘जमीन’, नोवा ‘पाऊल’, उरवो ‘कान’, गेन्य् ‘दिवस’, इस्लातो ‘सोने’, नोस् ‘नाक’, वोगा ‘पाणी’.

 

पहिले दहा अंक : एजिन्, ग्वा, त्री, चेतिरी, पेत्, सेस्त, सेगेम्, ओसेम, गेवेत्, देमेत्.

कालेलकर, ना. गो.