इव्हाल, योआनेस: (१८ नोव्हेंबर १७४३–१७ मार्च १७८१). डॅनिश कवी आणि नाटककार. जन्म कोपनहेगन येथे एका गरीब कुटुंबात. शिक्षण श्लेस्विग आणि कोपनहेगन येथे. विद्यार्थी असतानाच तो जर्मनीला पळून गेला आणि सप्तवार्षिक युद्धात त्याने स्वयंसेवक म्हणून काम केले. तेथून परतल्यावर प्रेमभंगाच्या धक्क्याने तो निराश झाला व त्याला मद्यपानाचे व्यसन जडले. अतिरिक्त मद्यपानामुळेच त्याला कोपनहेगन येथे अकाली मृत्यू आला.

तो अठरा-एकोणीस वर्षांचा असतानाच साहित्यिक म्हणून त्याला काही मान्यता प्राप्त झाली होती. शेक्सपिअरची नाटके तसेच जेम्स मॅक्फर्सनचे ओसियन हे काव्य वाचून तो प्रभावित झाला होता. हा प्रभाव त्याच्या Rolf Krage (१७७०) ह्या नाटकात जाणवतो. Balders Dod (१७७४–१७७५, इं. भा. द डेथ ऑफ बाल्डर, (१८८९) आणि Fiskerne(१७७९, इं. शी. द फिशरमेन) ही त्याची आणखी काही उल्लेखनीय नाटके. ही पद्यमय असून सॅक्सो ग्रमॅटिकस ह्याच्या क्रॉनिकलमधील आख्यायिकांवर आधारलेली आहेत. त्यांतून त्याच्या श्रेष्ठ प्रतिभेचा प्रकर्षाने प्रत्यय येतो. त्याच्या काव्यरचनेपैकी Rungsteds Lyksaligheder (इं.शी. द जॉइज ऑफ रंग्‌स्टेड) आणि आत्म्याला उद्देशून लिहिलेले एक ओड विशेष महत्त्वाचे आहे. पहिल्या काव्यात परमेश्वर आणि कवी ह्यांच्या सर्जनशीलतेचे स्तवन केले आहे. दुसऱ्यात त्याची धर्मश्रद्धा आणि स्वतंत्र प्रज्ञा ह्यांत निर्माण झालेला संघर्ष आहे. Levnet og Meninger (१८०४–१८०८, इं. शी. लाइफ अँड ओपिनिअन्स) ह्या त्याच्या आत्मचरित्रास श्रेष्ठ साहित्यकृतींचा दर्जा प्राप्त झाला आहे. 

अठराव्या शतकातील वाङ्‌मयीन प्रवृत्तींबरोबरच एकोणिसाव्या शतकातील स्वच्छंदतावादी प्रवृत्तीही त्याच्या वाङ्‌मयात आढळतात. डॅनिश स्वच्छंदतावादाचा अग्रदूत म्हणून तो ओळखला जातो. आपल्या उत्कृष्ट ओडरचनेने ओड ह्या काव्यप्रकारास त्याने नवचैतन्य प्राप्त करून दिले. स्कँडिनेव्हियाच्या मिथ्यकथा, सॅक्सो ग्रमॅटिकसचे क्रॉनिकल, मध्ययुगीन वीरगीते ह्यांतून काव्याचा आशय शोधणारा तो पहिला डॅनिश कवी होय. त्याचे Kong Kristian stod ved hogen Mast(इं. भा. किंग ख्रिश्चन स्टूड बाय द लॉफ्टी मास्ट) हे गीत डेन्मार्कचे राष्ट्रगीत झाले आहे. Lille Gunver हा डॅनिशमधला पहिला रोमान्स त्यानेच लिहिला. डेन्मार्कचा सर्वश्रेष्ठ भावकवी म्हणून अनेक समीक्षकांनी त्याला मान्यता दिली आहे. 

यानसेन, बिलेस्कॉव्ह एफ्. जे. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)