स्थानेश्वर : थानेसर. हरयाणा राज्याच्या ईशान्य भागातील एक धार्मिक व इतिहासप्रसिद्ध ठिकाण. कुरुक्षेत्र जिल्ह्यातील हे ठिकाण अंबाल्याच्या दक्षिणेस सु. ४० किमी.वर सरस्वती नदीकाठी वसलेले असून रस्त्याने व लोहमार्गाने ते दिल्ली व अंबाल्याशी जोडलेले आहे. सांप्रत याचा कुरुक्षेत्र शहरामध्ये समावेश करण्यात आला आहे. बाणाच्या हर्षचरितामध्ये स्थाण्वीश्वर, कनिंगहॅमच्या वृत्तांतामध्ये स्थानेश्वर, तर यूरोपीय संदर्भग्रंथांमध्ये ठाणेसर किंवा थानेसर असे याचे नामोल्लेख आढळतात. कुरुक्षेत्रातील हे पवित्र स्थळ असून येथे स्थाण्वीश्वराचे किंवा स्थाणु-शिवाचे प्राचीन मंदिर आहे त्यामुळे याला ‘ ईश्वराचे ठिकाण ’ ( स्थानेश्वर ) असे नाव पडले असावे, असे मानतात. पुराणांमध्ये याचे माहात्म्य वर्णिले आहे. या ठिकाणाविषयी व येथील स्थाण्वीश्वर ( ब्रह्म ) सरोवराविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. या तीर्थक्षेत्री एक सहस्र शिवलिंगे असून येथील सरोवरामध्ये स्नान केल्याने वनराजा ( बेन राजा ) कुष्ठरोगमुक्त झाला होता, असा उल्लेख वामन पुराणामध्ये आढळतो. येथे वसिष्ठ व विश्वामित्र या ऋषींचे आश्रम होते. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या प्रेरणेने या स्थळी शंकराची उपासना केली व त्याच्या आशीर्वादानंतर युद्धास सुरुवात केल्याचे उल्लेख महाभारतात आहेत.
इसवी सन ६०६—६४७ या काळात हे हर्षवर्धनाच्या राजधानीचे ठिकाण होते. त्याच्या मृत्यूनंतरही काही काळ स्थानेश्वराचे महत्त्व टिकून होते. ह्यूएनत्संग (६०२—६६४) या चिनी प्रवाशाच्या वृत्तांतातही या शहराच्या समृद्धीबाबत अनेक वर्णने आढळतात. गझनीच्या मुहंमदाने हे १०१४ मध्ये लुटले व येथील चक्रस्वामी विष्णूचे मंदिर नष्ट केले. १०४३ मध्ये दिल्लीच्या हिंदू राजाने त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतरही बर्याच काळापर्यंत हे ओस पडले होते. ११९१-९२ मध्ये पृथ्वीराज चौहान आणि मुहंमद घोरी यांच्यामध्ये येथे दोनदा लढाई झाली होती. त्यांत राजपुतांचा पराभव झाला [⟶ ठाणेश्वरची लढाई ]. सिकंदर लोदीने ( कार. १४८९—१५१७) येथील थानेसर ( स्थाणुतीर्थ ) या तीर्थामध्ये स्नान करण्यास यात्रेकरूंना बंदी केली होती. औरंगजेबाने या स्थानाचा संपूर्ण उच्छेद करून यात्रेकरूंना येथे स्नान करण्यास मज्जाव केला होता. त्यांना रोखता यावे म्हणून सैन्याला राहण्यासाठी सरोवरामध्ये किल्ला बांधला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हे ठिकाण व त्याच्या परिसरावर शिखांची सत्ता होती. १८५० मध्ये हे शहर व प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. १८६२ पर्यंत स्थानेश्वर ‘ ब्रिटिश डिस्ट्रिक्ट ’ चे मुख्यालय होते परंतु त्यानंतर मात्र शहराचा फारसा विकास झाला नव्हता. १८६७ मध्ये येथे नगरपालिका स्थापन करण्यात आली आहे. एक पवित्र धार्मिक ठिकाण म्हणून येथे अद्यापही सूर्यग्रहणाच्या वेळी व कार्तिक महिन्यात स्थाणुतीर्थामध्ये स्नानासाठी मोठी यात्रा भरते.
पहा : कुरुक्षेत्र पंजाब राज्य.
चौंडे, मा. ल.
“