स्टॅना इट : सल्फाइडांच्या कॅल्कोपायराइट गटातील हे खनिज कथिलाचे गौण धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे. याचे स्फटिक चतुष्कोणीय [ ⟶ स्फटिकविज्ञान] असून हे बहुधा संपुंजित तसेच कणमय पुंजांच्या रूपात आढळते. रंग पोलादाप्रमाणे करडा ते लोखंडासारखा काळा कस काळा चमक धातूसारखी अपारदर्शक भंजन खडबडीत विषमदिक् व गलनीय [ ⟶ खनिजविज्ञान]. कठि. ४·०० वि. गु. ४·३-४·५३ रा. सं. Cu2FeSnS4. हे कथिलाच्या धातुकयुक्त शिरांमध्ये कॅसिटेराइट, कॅल्कोपायराइट, वुल्फ्रॅमाइट, पायराइट व क्वॉर्ट्झ या खनिजांबरोबर आढळते. विरळा आढळणारे हे खनिज इंग्लंडमधील कॉर्नवॉलचे विविध भाग, बोलिव्हिया, झीहान (टास्मानिया), चेकोस्लोव्हाकिया इ. ठिकाणी आढळते. बेलमेटल ओअर व टिन पायराइट या नावांनीही हे ओळखले जाते. कथिलासाठी असलेल्या स्टॅनाइट हे नाव आले आहे.
ठाकूर, अ. ना.