स्तनीवर्ग : (मॅमॅलिया ). हा नियततापी व पृष्ठवंशी ( पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांचा एक मोठा वर्ग आहे. त्याची गुण-वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतात : या प्राण्यांना स्तनग्रंथी असून मादी आपल्या पिलांना स्वतःच्या अंगावरचे दूध पाजून वाढविते [⟶ स्तन ]. यांच्या अंगावर केसांचे आवरण असते व मध्यकर्णात तीन अस्थिका असतात यांच्यामध्ये वक्षगुहा व उदरगुहा यांना अलग करणारे स्नायुमय पटल असते. यांच्या रक्तातील तांबड्या कोशिकांत ( पेशींत ) केंद्रक नसते. यांचा भ्रूणविकास ⇨ अपरापोषिका व भ्रूणच्छद यांमध्ये होतो [⟶  भ्रूणविज्ञान ]. हा प्राणिसृष्टीतील सर्वाधिक विकसित झालेला वर्ग असून यातील प्राण्यांना सस्तन प्राणी असेही म्हणतात. 

  मॅमल हा शब्द मॅमे या लॅटिन शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ स्तनग्रंथी असा आहे. मॅमॅलिया या संकल्पनेचे जनक कार्ल लिनीअस असून त्यांनी १७५८ मध्ये ही संकल्पना मांडली. या वर्गात अस्तित्वात असणार्‍या प्राण्यांचे २७ गण व विलुप्त झालेल्या प्राण्यांचे १४ गण असून त्यात प्राण्यांच्या सु. ४,४०० जाती व १२,००० उपजाती आहेत. सस्तन प्राण्यांच्या अधिवासांमध्ये विविधता आढळते. ते सबंध जगभर पसरलेले आहेत. ते दोन्ही ध्रुव, उष्ण व उपोष्ण कटिबंध, सागर, वने, वाळवंटे या भागांत आढळतात. देवमासा ( व्हेल ), वॉलरस, सील व ऊद मांजर यांसारखे पाण्यात राहणारे वटवाघळासारखे हवेत संचार करणारे हत्ती, वाघ, सिंह व कांगारू यांसारखे जमिनीवर राहणारे गिबन, खार व अस्वल यांसारखे वृक्षवासी ( झाडावर राहणारे ) उंदीर, घुशी यांसारखे बिळांत राहणारे अशा विविध प्रकारच्या अधिवासांत सस्तन प्राणी राहतात.

  सस्तन प्राण्यांच्या आकार व आकारमानांत खूपच विविधता आढळते. जमिनीवर आढळणार्‍या प्राण्यांत किटीस हॉग नोज्ड बॅट ही वटवाघळाची सर्वांत लहान जाती असून तिची लांबी सु. २.९ सेंमी. आहे. टायनी श्रू या लांब नाक असलेल्या उंदरासारख्या प्राण्याचे वजन फक्त काही ग्रॅम असते. वजनाने सर्वांत मोठा प्राणी आफ्रिकन हत्ती असून त्याचे वजन सु. ७,००० किग्रॅ. असते. सागरी प्राण्यांमध्ये सर्वांत मोठा प्राणी ब्ल्यू व्हेल हा देवमासा असून त्याची लांबी सु. ३३.५ मी. व वजन सु. १,३६,००० किग्रॅ. असते.

  नैसर्गिक इतिहास : सुधारित प्रजोत्पादन पद्धती, पिलांचे संगोपन व पालकांकडून घेतली जाणारी काळजी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याची पद्धत व वर्तनातील लवचिकता ही स्तनी प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवता येत असल्याने या प्राण्यांवर वातावरणाचा फारसा परिणाम होत नाही तसेच या प्राण्यांना उच्च पातळीची कार्यक्षमता राखता येते. या वर्गातील प्राण्यांचे विविध प्रकारच्या वातावरणांत अन्न मिळविणे, अधिवासात राहणे व हालचाली करणे यांसाठी ⇨ अनुकूलन  झालेले असते.

  गेल्या सात कोटी वर्षांपासून सस्तन प्राण्यांचे जमिनीवर प्रभुत्व आहे. इतर अधिवासांत राहणार्‍या समूहांत देखील ते महत्त्वाचे प्राणी आहेत. सुरु-वातीचे सस्तन प्राणी हे आकारमानाने लहान, चपळ, मांसाहारी ( शिकारी ), जमिनीवर राहणारे किंवा अर्धवृक्षवासी होते. या सर्वसामान्य पूर्वजांपासून पुढे विविध प्रकारचे सस्तन प्राणी निर्माण झाले. नवजीव महाकल्पात ( सु. ६.५ कोटी वर्षांपूर्वी ) जमिनीवरील आदिम सस्तन प्राणी व त्यांच्या विविध शाखा यांना मिळालेले संरक्षण व झाडे-वने यांची मिळालेली साथ यांमुळे त्या प्राण्यांचा विकास झाला. या सस्तन प्राण्यांपासून जमिनीखाली ( बिळात राहणारे ), हवेत संचार करणारे, सागरी तसेच गोड्या पाण्यात राहणारे सस्तन प्राणी निर्माण झाले.

हालचाल : अधिवासाच्या गरजेनुसार सस्तन प्राण्यांत चलनवलन ( हालचाल ) करणार्‍या अवयवांमध्ये बदल झालेले आढळतात. जमिनीवर राहणार्‍या प्राण्यांच्या हालचालींमध्ये विविधता आढळते. आदिम प्राणी हालचाल करण्यासाठी पायांच्या तळव्याचा वापर करीत. चालताना ते अंगुली ( बोटे ) व पायाच्या चवड्याचा वापर करीत. अधिक हालचाली करण्यासाठी त्यांचे पाय अनुकूलित झालेले होते.

  धावणार्‍या सस्तन प्राण्यांना कर्सोरियल प्राणी म्हणतात. या प्राण्यांत हालचालींसाठी अंगुलींचा वापर केला जातो. कुत्र्यामध्ये हालचाल करताना सर्व अंगुलींचा जमिनीला स्पर्श होतो, तर घोड्यासारख्या प्राण्यां-मध्ये अंगुलीच्या ( खुराच्या ) टोकांचा जमिनीला स्पर्श होतो. यापेक्षा प्रगत प्राण्यांमध्ये पायांची पुढील व मागील दिशेने हालचाल होते. उड्या मारणार्‍या सस्तन प्राण्यांत चित्ता, शिशुधान प्राणी, कृतंक ( कुरतडणारे ) प्राणी, लॅगोमॉर्फा ( ससा, हेअर इ. ) यांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या हालचालीस उशी घेणे ( रिकोशेतल ) असे म्हणतात. हे प्राणी एकमेकांशी संबंधित नसणारे, परंतु उघड्या मैदानावर राहणारे असतात. या प्राण्यांचे पाठीमागील पाय लांब व मजबूत असून त्यांना चवडे असतात. पुढचे पाय आखूड व शेपटी लांब असते.

  अनेक सस्तन प्राणी आकारमानाने मोठे असून ते चपळपणे हालचाली करतात तसेच त्यांनी शरीराचे संतुलन राखण्याचे कौशल्य मिळविलेले आहे. त्यांच्या पायांचा वापर करताना अंगुले वर्तुळाकार पद्धतीने पडतील अशी पावले टाकली जातात. यामुळे या प्राण्यांना आधार मिळतो. वटवाघळे हवेत संचार करणारे सस्तन प्राणी आहेत. ते हवेतून वेगाने हालचाली करतात. हवेत संचार करण्यासाठी त्यांच्या पुढच्या पायांचे रूपांतर पंखा-सारख्या भागांमध्ये झालेले आहे.

  काही सस्तन प्राणी ( शिशुधान व कृंतक ) झाडांवर राहतात. माकडा-सारख्या प्राण्यांत वृक्षवासी अधिवासासाठी अनुकूलन झालेले असते. माकडामध्ये चवडे व पाच अंगुली असणार्‍या पायांचा उपयोग वेगवान हालचालींसाठी केला जातो. शेपटीचा उपयोग पाचवा हात म्हणून शरीराचे संतुलन राखण्यासाठी केला जातो. गिबन माकडामध्ये हाताचा अंगठा विरुद्ध दिशेस वळविता येतो. याचा उपयोग त्यास झाडाच्या फांद्या पकडण्यासाठी होतो. ही माकडे हाताने झाडाची फांदी पकडून एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर उड्या मारत हालचाल करतात. टार्सिअर या वृक्षवासी प्राण्या- मध्ये पायाच्या अंगुली पसरट असतात. यामुळे त्याची पकड अधिक घट्ट होते. अस्वलासारख्या वृक्षवासी प्राण्यांमध्ये नखर असतात. त्यांमुळे त्यांची पकड घट्ट असते.


काही सस्तन प्राणी पाण्यात राहणारे आहेत. हे अर्धजलचर किंवा जलचर प्राणी जमिनीवर राहणार्‍या सस्तन प्राण्यांचे प्रतिनिधी आहेत. यांमध्ये ऊद मांजर, चिचुंदरी, वॉटर श्रू यांचा समावेश होतो. वॉलरस व सील या प्राण्यांमध्ये जलचर अधिवासासाठी अनुकूलन झालेले असते. हे प्राणी पिलांना पाण्याबाहेर म्हणजे जमिनीवर जन्म देतात. देवमासा, शिंशुक ( पॉरपॉइज ) ,डॉल्फिन हे सीटॅसिया गणातील प्राणी पाण्याबाहेर हालचाली करू शकत नाहीत.

सामाजिक वर्तन : लहान सस्तन प्राणी सुरुवातीच्या काळात अन्नासाठी मातेवर अवलंबून असतात. त्यांना वर्तनाचे प्राथमिक ज्ञान ( माहिती ) मातेकडून मिळते. या अनौपचारिक शिक्षणामुळे एका पिढीतील ज्ञान पुढच्या पिढीकडे दिले जाते. वयस्कर प्राण्यांकडून पिलांना मिळणार्‍या शिक्षणामुळे त्यांच्या वर्तनात लवचिकता निर्माण झाली आहे. या लवचिक वर्तनामुळे सस्तन प्राणी इतर प्राण्यांपेक्षा यशस्वी झाले आहेत. अनुभवातून शिकणे, चांगल्या बाबींचे निवड पद्धतीने अनुकूलन व वातावरणातील बदलास योग्य प्रतिसाद यांमुळे सस्तन प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत यशस्वी ठरले आहेत. प्रत्येक प्राण्याचा छोट्या छोट्या बदलास वैयक्तिक प्रतिसाद हा आनुवंशिक बदलापेक्षा जास्त परिणामकारक ठरला आहे.

  काही सस्तन प्राणी एकांतवास ( एकटे राहणे ) पसंत करतात ( उदा., वाघ ) मादी माजावर येण्याचा काळ त्यास अपवाद असतो. हरणे व काळवीट समूहाने राहतात. हा समूह प्रजनन व कळपाचे संरक्षण ही दोन्ही कामे पार पाडतो. समूहातील बलवान नर कळपाचे नेतृत्व करतो. नेतृत्व बदलाच्या वेळी नरांमध्ये लढाई होते. या लढतीत विजयी झालेला नर कळपाचे नेतृत्व करतो.

  सामाजिक सस्तन प्राण्यांत लिंगभेद मोठ्या प्रमाणावर आढळतात. प्रभावी नराचा कळपातील माद्यांवर ताबा असतो. काही वेळा समूहातील प्राण्यांत लैंगिक उपलक्षणे निर्माण होतात. कळपात असणार्‍या माता-पित्याकडून व त्यांच्या समवयस्क सदस्यांकडून पिलांना नैसर्गिक पद्धतीने शिक्षण व संरक्षण मिळते. 

  प्रादेशिक सार्वभौमत्व : प्रत्येक प्राण्याचा वावर विशिष्ट अनु-कूलनक्षम भूक्षेत्रात असतो. यामुळे प्राण्यांना अन्न व निवारा मिळतो, यास प्रादेशिक सार्वभौमत्व म्हणतात. अन्न, पाणी व निवारा यांसाठी एकाच जातीतील प्राण्यांना एकमेकांशी संघर्ष करावा लागतो. वाघ, सिंहासारखे प्राणी त्यांच्या प्रादेशिक सरहद्दीवर मूत्र वा विष्ठा टाकून खुणा करतात. लेमूरासारखे प्राणी विशिष्ट प्रकारचा गंध सरहद्दीवर सोडतात, यासाठी त्या प्राण्यांत गंध-ग्रंथी असतात. प्रादेशिक सार्वभौमत्वाचे महत्त्व सस्तन प्राण्यांपेक्षा पक्ष्यांमध्ये जास्त असते. दिनचर सस्तन प्राण्यांच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाबद्दल पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. यावरून प्राणी प्रादेशिक सार्वभौमत्वास किती महत्त्व देतात ते लक्षात येते. काही प्राणी प्रादेशिक सार्वभौमत्वाची काळजी घेत नाहीत. मात्र, असे प्राणी त्यांच्या भूक्षेत्रात इतर प्राण्यांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर हल्ला करून त्यांना हाकलून लावतात. [⟶ सामाजिक जीवविज्ञान ].

वातावरणातील बदलास प्राण्यांचा प्रतिसाद : वातावरणातील बदलांस प्राण्यांचा प्रतिसाद वातावरण पुनःपुन्हा बदलल्यावर सारखाच असतो. वातावरणातील प्रतिकूल बदलास प्राणी वेगळ्या स्वरूपात प्रतिसाद देतात. यामध्ये शीतनिष्क्रियता, शीतनिद्रा व ग्रीष्मसुप्ती यांचा समावेश होतो. काही प्राणी दिवसातील काही वेळ ( विशेषतः दुपारी उन्हाच्या वेळी ) विश्रांती घेतात. कमी कालावधीची निष्क्रियता ही लहान प्राण्यांना फायदेशीर ठरते. ज्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान लवकर कमी होते व लगेच वाढते, त्या प्राण्यांना कमी कालावधीची निष्क्रियता फायदेशीर ठरते. उष्ण प्रदेशातील वटवाघळाच्या शरीराचे तापमान ( विशेषतः प्राणी झोप घेताना ) वातावरणाच्या तापमानाच्या जवळपास असते. उंच प्रदेशात राहणारी अस्वले हिवाळ्यात गुहेत विश्रांती घेतात. ही बाब हिवाळी शीतनिद्रेसारखी आहे परंतु ती खरी शीतनिद्रा नाही.

  खर्‍या विश्रांतीचा ( झोपेचा ) हेतू ऊर्जाबचत करणे हा असतो. या काळात प्राण्याच्या शरीराचे तापमान किमान राखले जाते. त्याचा श्वसनाचा वेग कृतिशील काळातील श्वसनाच्या वेगाच्या एक टक्का इतका असतो. या अवस्थेत प्राण्याचे रक्ताभिसरण मंद गतीने होते. अस्वल, स्कंक व रॅकून यांसारखे हिवाळ्यात विश्रांती घेणारे प्राणी विश्रांतीनंतर अधिक क्रियाशील होतात. उन्हाळ्यात वातावरणात होणार्‍या प्रतिकूल बदलांवर ( वाढणारी उष्णता, पाण्याची कमतरता, अन्नाची टंचाई ) मात करण्यासाठी प्राणी उन्हाळी विश्रांती घेतात त्यास ग्रीष्मसुप्ती म्हणतात. काही प्राण्यांमध्ये ती दीर्घ विश्रांती असते काही प्राणी त्यांच्या हालचाली किमान करून ऊर्जाबचत करतात. वातावरणातील प्रतिकूल बदलास प्रतिसाद म्हणून काही प्राणी अधिवासात थोडा बदल करतात. असे प्राणी थंड भागात राहण्यास जातात. कृंतक प्राणी ओलसर बिळात राहतात. अशा पद्धतीने उन्हाळ्यात होणार्‍या प्रतिकूल बदलांवर ते मात करतात. 

  स्थलांतर हा देखील वातावरणातील बदलास दिलेला एक प्रकारचा प्रतिसाद आहे. बहुतेक सस्तन प्राणी अक्षवृत्ताच्या दिशेने स्थलांतर करतात. उष्ण प्रदेशातील वटवाघळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात.वटवाघळांच्या काही जाती उन्हाळ्यात सुरक्षित जागी वा गुहेत विश्रांती घेतात. कडक हिवाळ्यात तसेच खाण्यास कीटक उपलब्ध नसताना वटवाघळे विश्रांती घेतात. कॅरिबू ( रेनडियर ) हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण करण्यासाठी टंड्रा प्रदेशातून जंगलाकडे स्थलांतर करतात. सीटॅसिया व पिन्निपीडस गणातील ( उदा., वॉलरस, सील ) प्राणी ध्रुवीय पाण्यातून  समशीतोष्ण भागाकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. ग्रे व्हेल ( करडे देवमासे ) दक्षिण दिशेस, तर बाजा ( लोअर ) कॅलिफोर्नियाकडे स्थलांतर करतात.

  काही खुरी प्राणी कमी उंचीच्या प्रदेशातून जास्त उंचीच्या प्रदेशात स्थलांतर करतात.यांमध्ये अमेरिकन एल्क वा वापिटी व बीग हॉर्न शीप या प्राण्यांचा समावेश होतो. काही वटवाघळे उन्हाळ्यात स्थानिक स्थलांतर करून विश्रांती घेतात. बहुतेक सस्तन प्राण्यांत स्थलांतर दरवर्षी सारख्या पद्धतीने होत असते परंतु लेमिंग ( बिळात राहणारे लहान कृंतक प्राणी ) व बर्फाळ प्रदेशातील हेअर ( कान, पाय व शेपूट अधिक लांब असलेले सशाहून मोठे प्राणी ) या प्राण्यांची संख्या वाढल्यास सर्वांना पुरेसे अन्न मिळत नसल्याने ते स्थलांतर करतात. 

प्राणिसंख्या : या संकल्पनेत जननपूर्व, जननक्षम व वृद्ध ( जननक्षमता ओलांडलेले ) असे तीन प्रकार आहेत. प्राण्यांची संख्या तिचे स्वरूप व रचना तसेच इतर अनेक बाबींवर अवलंबून असते प्राण्यांचा सर्वसाधारण जीवनकाळ ( आयुर्मर्यादा ), नवीन प्राण्यांचा समावेश होण्याचे प्रमाण ( नवीन जन्मास आलेले प्राणी व स्थलांतरामुळे समाविष्ट झालेले प्राणी ), तसेच स्थलांतरामुळे सोडून जाण्याचे प्रमाण व मृत्यूमुळे कमी होणारी संख्या या बाबींवर प्राणिसंख्या अवलंबून असते.

  कृंतक प्राण्यांमध्ये जननक्षमता मोठ्या प्रमाणावर ( विशेषतः म्युरिडी या कुलातील प्राण्यांमध्ये उदा., उंदीर, घूस ) असते.काही उंदरांच्या जाती वयाच्या चौथ्या आठवड्यात जननक्षम बनतात.त्यांचा गर्भावधी काल तीन आठवड्यांचा किंवा त्यापेक्षा कमी असतो.काही प्राण्यांमध्ये गर्भावधी व मातेचा पिलांना दूध देण्याचा कालावधी एकाच वेळी चालू असल्याचे आढळते.हे प्राणी एका वेतात ४-५ पिलांना जन्म देतात.अन्नाची उपलब्धता असल्यास त्यांचे प्रजनन वर्षभर चालू राहते. काही जातींमध्ये प्राण्यांची जननक्षमता मोठी असल्याचे वाटते परंतु मादी वर्षभर जननक्षम राहू शकत नाही प्राण्यांच्या संख्येत होणारी वाढ ही जन्माला आलेल्या पिलांपैकी किती जननक्षम होईपर्यंत जिवंत राहतात, यावर अवलंबून असते.कृंतक प्राणी चार आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जननक्षम बनतात, तर आफ्रिकन हत्तीमध्ये हा कालावधी १५ वर्षांचा आहे.

  सस्तन प्राण्यांमध्ये वृद्ध प्राण्यांची संख्या नेहमीच कमी असते.उंदीर व चिचुंदरी यांसारख्या लहान प्राण्यांना एका प्रजनन काळात टिकून राहणे कठीण असते मोठ्या जातींतील प्राण्यांची आयुर्मर्यादा लहान प्राण्यांच्या तुलनेत खूप मोठी असते. काही वटवाघळे २० वर्षे जगतात. बहुतेक जाती नैसर्गिक अवस्थेपेक्षा बंदिस्त अवस्थेत जास्त काळ जगतात, असे आढळले आहे. बंदिस्त अवस्थेतील काटेरी मुंगीखाऊ ५० वर्षांपेक्षा जास्त काळ जगल्याची नोंद आहे. घोडे ६० वर्षे तर हत्ती ७० वर्षे जगतात.मानवाची आयुर्मर्यादा इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त आहे.


अन्नाबाबतच्या सवयी : सुरुवातीचे सस्तन प्राणी त्यांच्या सरीसृप ( सरपटणार्‍या ) पूर्वजांप्रमाणे शिकारी ( मांसाहारी ) होते.या प्राथमिक पूर्वजांपासून या प्राण्यांमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार अन्नाच्या सवयींत बदल झाले.आधुनिक सस्तन प्राण्यांत अन्नाच्या सवयींबाबत विविधता आढळते. बहुतेक जमिनीवर राहणारे प्राणी व काही जलचर प्राण्यांमध्ये मांसाहारी सस्तन प्राणी अन्नसाखळीत सर्वांत वरच्या स्थानावर आहेत काही सस्तन प्राणी ( शाकाहारी ) अन्नसाखळीत प्राथमिक वापर करणारे म्हणून पर्यावरण तंत्रात असतात.काही लहान सस्तन प्राणी खादाड चिचुंदरीसारखे त्यांच्या आकारमानापेक्षा मोठ्या पृष्ठवंशी प्राण्याची शिकार करतात हे प्राणी दररोज त्यांच्या वजनाच्या दुप्पट अन्न खात असल्यामुळे ते चपळपणे हालचाली करतात व हवामानातील बदलांना यशस्वीपणे सामोरे जातात.सर्वांत मोठा पृष्ठवंशी प्राणी ब्ल्यू व्हेल याचे क्रिल ( लहान कवचधारी प्लवक प्राणी ) हे अन्न आहे. 

सस्तन प्राण्यांमध्ये गरजेनुसार अन्नाच्या सवयी बदलल्याचे दिसते.काही प्राणी ( उदा., रॅकून, अस्वले ) सुरुवातीस मांसाहारी होते, नंतर ते सर्वभक्षी बनले.मोठा पंडक यासारखे मोठे शाकाहारी प्राण्यांत तसेच शिशुधान प्राण्यांमध्ये अन्नाबाबत विविधता आढळते.ऑस्ट्रेलियातील शिशुधान ( मातेच्या उदरावर स्तनाग्रांच्या वर त्वचेचा झोळ वा पिशवी असणार्‍या ) प्राण्यांच्या अन्नाबाबतच्या सवयींमध्ये विविधता आढळते.हे प्राणी व इतर ठिकाणी आढळणारे अपरास्तनी प्राणी यांमध्ये विविध प्रकारच्या वातावरणांत राहण्यासाठी समांतर विकास झाल्याचे आढळते.शिशुधान प्राणी, छछुंदर, काटेरी मुंगीखाऊ, उंदीर व मांजर ही त्यांची उदाहरणे आहेत.बँडिकूट प्राण्याचे वातावरणातील कार्य बिळात राहणार्‍या ससा व बाँबट या शाकाहारी प्राण्यांसारखे आहे.ऑस्ट्रेलियातील कुरणा-मध्ये चरणार्‍या मोठ्या प्राण्यांमध्ये कांगारू व वॉलबी यांचा समावेश होतो. 

  वटवाघळांच्या जातींत अन्नाच्या सवयींबाबत खूप विविधता आढळते.काही वटवाघळे कीटकभक्षी, तर काही फळांवर जगणारी असतात.मेगा-किरोप्टेरा कुलातील वटवाघळे फळे खाऊन जगतात, तर मायक्रो-किरोप्टेरा कुलातील वटवाघळे कीटकभक्षी आहेत.फायलोस्टोमिडी उपगणातील वटवाघळे फळे, मकरंद ( फुलांतील गोड रस ), कीटक व लहान पृष्ठवंशी प्राणी खातात.रक्तशोषक वटवाघळे ( व्हॅम्पायर) दुसर्‍या प्राण्यांचे रक्त शोषून घेतात.

सस्तन प्राण्यांचा उदय व विकास : सुमारे २२.५ कोटी वर्षां-पूर्वी ट्रायासिक कल्पात ( सु.२३ ते १८.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) सरीसृप वर्गातील थेरॅप्सिडा गणातील प्राण्यांपासून सस्तन प्राणी निर्माण झाले.थेरॅप्सिडा हे सिनॅप्सिडा उपवर्गातील प्राणी असून त्यांना सस्तन प्राण्यांसारखे सरीसृप म्हणून ओळखले जाते.सिनॅप्सिड प्राणी कार्बॉनिफेरस कल्पात ( सु. ३५ ते २७.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) अस्तित्वात होते.ते सुरुवातीचे सरीसृप वर्गातील प्राणी आहेत.हे प्राणी त्या काळातील इतर सरीसृप प्राण्यांच्या तुलनेत प्रभावहीन होते.पर्मियन कल्पात ( सु. २७.५ ते २३ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) त्यांची संख्या वाढली.ते प्रामुख्याने मांसाहारी प्राणी होते परंतु काही प्राणी शाकाहारीहोते. [⟶ सरीसृप वर्ग ].

  अकोसॉरस या ⇨ डायनोसॉरसारख्या सरीसृप प्राण्यांचे पृथ्वीवर प्रभुत्व होते.थेरॅप्सिड हे प्राणी आकारमानाने लहान व मांसाहारी होते.या प्राण्यांच्या जबड्यात कृंतक, सुळे, उपदाढा व दाढा इ.अनेक प्रकारचे दात होते.जलद हालचालींसाठी या प्राण्यांचे पाय धडाजवळ होते.द्वितीय टाळू अस्थीमुळे यांचे हवा व अन्नमार्ग वेगवेगळे होते कवटीभोवतीचे स्नायू बळकट व विकसित झालेले होते.या प्राण्यांत संक्रमण काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हळूहळू सस्तन प्राण्यांची लक्षणे निर्माण झाली व त्याचे रूपांतर सस्तन प्राण्यांमध्ये झाले.सुरुवातीच्या काळात सरीसृप तसेच स्तनी वर्गांची लक्षणे दाखविणारे प्राणी निर्माण झाले.या उत्क्रांतीच्या पद्धतीला ‘ मोझॅइक ’ ( संकलित ) पद्धती म्हणतात.ही पद्धत संक्रमण काळातील सर्वसाधारण पद्धत आहे. 

  सुरुवातीस निर्माण झालेले सस्तन प्राणी निशाचर होते तर सरीसृप प्राणी दिनचर होते.यामुळे या दोन्ही प्राण्यांचा संघर्ष झाला नाही सस्तन प्राण्यांमध्ये रात्री हालचाली करण्यासाठी अनेक बदल झाले.यामध्ये प्रामुख्याने शरीराचे तापमान नियंत्रित करणे व त्वचेवर केसांची निर्मिती हे होत.सुरुवातीचे सस्तन प्राणी आकारमानाने लहान होते व त्यांची संख्या कमी होती मध्यजीव महाकल्पाच्या ( सु. २७.५ ते १४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या ) मध्यास व अखेरीस या प्राण्यांमध्ये विविधता निर्माण झाली आणि ते बरेचसे स्थिर झाले.मध्यजीव महाकल्पाच्या ट्रायासिक, जुरासिक व क्रिटेशस या कल्पांतील सस्तन प्राण्यांच्या जीवाश्मांचे ( शिळाभूत झालेल्या जीवावशेषांचे ) पुरावे अपुरे व असमाधानकारक आहेत.त्यानंतर मधल्या काळात जीवाश्मांचे कोणतेच पुरावे आढळत नाहीत.यामुळे या प्राण्यांचा सुरुवातीचा इतिहास समजणे अडचणीचे झाले आहे.

नवजीव महाकल्प ( सु.६.५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ ) हा सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीतील सुवर्णकाळ मानला जातो.या महाकल्पाच्या सुरुवातीस डायनोसॉरांसारखे सरीसृप प्राणी मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले.पृथ्वीवर इतर प्राण्यांना विकासासाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध झाली.पक्ष्यांना सस्तन प्राण्यांइतकीच विकासाची संधी उपलब्ध होती त्यांनी हवेवर प्रभुत्व मिळविले.यामुळे सस्तन प्राण्यांच्या विकासासाठी जमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. 

  जमिनीवर राहणार्‍या सस्तन प्राण्यांचा सर्वसामान्य पूर्वज म्हणजे चिचुंदरीसारखा कीटकभक्षी प्राणी होय त्यास पाच नखे असणारी बोटे होती.या मूळ प्राण्यापासून विविध सस्तन प्राणी निर्माण झाले.यासाठी या सुरुवातीच्या सस्तन प्राण्यांमध्ये पायांचे अनुकूलन व शरीराचे स्वरूप यांमध्ये वेगाने बदल होऊन विविध प्रकारच्या अधिवासांत राहणारे प्राणी निर्माण झाले.

  प्लायोसीन कल्पात ( सु. २ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) ऑपॉस्समासारखे दिसणारे शिशुधान तसेच कीटकभक्षी प्राणी अस्तित्वात होते.या कीटकभक्षी प्राण्यांपासून अपरास्तनी ( वार असलेले ) प्राणी निर्माण झाले.या प्राण्यांमध्ये नंतर खूप विविधता निर्माण झाली.यातून मांसाहारी व खुरी प्राणी निर्माण झाले.यूईंटॅथेरियम या प्राण्यांची शिंगे व आकारमान आजच्या गेंड्यासारखे होते.या प्राण्यांमध्ये प्लायोसीन ते इओसीन कल्पांत ( सु. ५.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) खूप बदल झाले.या प्राण्यांना ‘ आर्कियन सस्तन प्राणी ’ असे म्हणतात.हे प्राणी स्पर्धेत न टिकल्याने इओसीन कल्पाच्या अखेरीस विलुप्त झाले.सुरुवातीचे कृंतक व लॅगोमॉर्फा प्राणी हे प्लायोसीन कल्पात निर्माण झाले.या कल्पात सस्तन प्राणी आकारमानाने लहान असून ते सर्व जगभर आढळत.इओसीन काळात सस्तन प्राण्यांचे सर्व गण स्थिर झाले.ऑलिगोसीन व मायोसीन कल्पांत ( सु. ३.५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) अपरास्तनी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला.

  अनुकूलनासाठी सस्तन प्राण्यांमध्ये झालेले बदल : सस्तन प्राण्यांच्या क्रमविकासात विविध प्रकारचे प्राणी निर्माण झाले.क्रिटेशस कल्पाच्या सुरुवातीस अपरास्तनी व शिशुधान प्रकारांतील वेगवेगळे प्राणी निर्माण झाले.त्यांनी डायनोसॉरासारखे प्राणी नष्ट झाल्याने रिकामी झालेली पृथ्वीवरील जागा व अधिवास व्यापले.

  सस्तन प्राण्यांच्या सर्वसामान्य पूर्वज असलेल्या चिचुंदरीसारख्या प्राण्यांपासून क्रमविकास होऊन विविध प्रकारचे प्राणी निर्माण झाले व ते वेगवेगळ्या अधिवासांत राहू लागले.यास ‘ अनुकूली विकिरण ’ म्हणतात.हा सिद्धांत एच्.एफ् ऑस्बर्न यांनी १८९७ मध्ये मांडला.

सस्तन प्राण्यांतील अनुकूलनीय विकिरण हे प्रामुख्याने पायांच्या आकारात झालेला बदल हे आहे.स्तनी प्राण्यांच्या पायांच्या आकारात बदल होऊन हालचालीचे पाच प्रकार विकसित झाले आहेत.यांमध्ये पळणारे, बिळात राहणारे, वृक्षवासी, हवेत संचार करणारे व पाण्यात राहणारे यांचा समावेश होतो.


सस्तन प्राण्यांची प्रमुख लक्षणे :त्वचा व केस : त्वचा हे सस्तन प्राण्याचे बाह्य आवरण असून त्वचेवर दाट किंवा विरळ केस असतात.ठराविक काळाने केस गळून पडतात व पुन्हा नवीन केस येत असतात.त्वचेमध्ये स्वेदग्रंथी, स्नेहग्रंथी, गंधग्रंथी व स्तनग्रंथी असतात.स्वेदग्रंथी ( घामाच्या ग्रंथी ) वातावरणाचे तापमान वाढल्यावर स्वेद तयार करतात व त्याद्वारे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते.स्नेहग्रंथींच्या ( ज्याच्या स्त्रावाने चरबी निर्माण होते अशा ग्रंथींच्या ) तेलकट स्रावामुळे त्वचा व केस मुलायम ठेवले जातात.गंधग्रंथी काही प्राण्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा गंध निर्माण करतात.त्याचा उपयोग माद्यांना आकर्षित करण्या-साठी होतो. माद्यांच्या स्तनग्रंथींमध्ये निर्माण होणार्‍या दुधावर पिलांचे पोषण होते. काही सस्तन प्राणी विशेषतः नरवानर गणातील प्राणी चेहर्‍यावरील त्वचा, हावभाव व हालचालींद्वारे भावना व्यक्त करतात.देवमाशासारख्या सीटॅसिया गणातील जलचर प्राण्यांमध्ये शरीरावर केस नसतात तर त्वचेखाली चरबीचे ( मेदाचे ) आवरण असते. आफ्रिकेतील सँड रॅट या बिळात राहणार्‍या प्राण्याच्या शरीरावर विरळ केस असतात.[⟶ केस त्वचा ].

  दात : सस्तन प्राण्यांच्या दोन्ही जबड्यांत दात असून ते गर्तिकांमध्ये ( खळग्यांत ) घट्ट बसविलेले असतात.अन्नाचा प्रकार व ते खाण्याची पद्धती यांस अनुसरून दातांचे कृंतक, सुळे, उपदाढा व दाढा असे प्रकार असतात.या प्राण्यांमध्ये सुरुवातीस दुधाचे दात असतात, नंतर त्याची जागा कायमचे दात घेतात.[⟶ दात ] 

  कंकाल तंत्र : सस्तन प्राण्यांमध्ये दोन पश्चकपालास्थिकंद असतात.मानेमध्ये सात कशेरुक असतात.खालचा जबडा अस्थींच्या जोडीपासून बनलेला असतो त्यास डेंटरी असे म्हणतात.हा जबडा स्क्वॅमोझल अस्थीने कवटीशी जोडलेला असतो.शरीरातील लांब हाडांच्या टोकांशी उपास्थी ( कूर्चा ) असते.या उपास्थीचे अस्थीभवन होते.यामुळे शरीराची वाढ होते.या प्राण्यांचे कंकाल तंत्र अक्षीय व उपांगी अशा भागांपासून बनलेले असते.अक्षीय कंकाल तंत्रात कवटी, मेरुदंड व बरगड्यांचा समावेश होतो.उपांगी कंकाल तंत्रात हातांच्या व पायांच्या अस्थी, श्रोणी मेखला व अंसीय मेखला यांचा समावेश होतो.कवटीचे आकारमान सरीसृप प्राण्यांपेक्षा मोठे असते.पहिल्या बोटात दोन अस्थी व इतर बोटांत तीन अस्थी असतात.[⟶ कंकाल तंत्र र्].

  नियततापी : सर्व सस्तन प्राणी नियततापी ( शरीराचे तापमान स्थिर ठेवणारे ) असतात.बहुतेक प्राणी दिनचर आहेत परंतु वटवाघळासारखे काही प्राणी निशाचर आहेत.

  पचन तंत्र : या प्राण्यांचे पचन तंत्र पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे असते.यामध्ये तोंड, लाला ग्रंथी, ग्रसिका ( घसा ), जठर, आतडे व गुदद्वार यांचा समावेश होतो.शाकाहारी प्राण्यांमध्ये आतड्याची लांबी जास्त असते.रवंथ करणार्‍या प्राण्यांचे जठर चार कप्प्यांचे बनलेले असते.अंधनाल ( लहान पिशवीसारखा अवयव ) लहान आतड्याच्या टोकाशी असतो.त्याचा उपयोग सेल्युलोजाच्या ( वनस्पतीत असणार्‍या घटकाच्या ) पचनासाठी होतो.[⟶ पचन तंत्र ].

रक्ताभिसरण तंत्र : एका पूर्ण स्नायुमय मध्यपटलाने वक्षगुहा उदर-गुहेपासून अलग झालेली असते.वक्षगुहेत हृदय व फुप्फुसे असतात.हृदय दोन अलिंद व दोन निलय यांपासून बनलेले असते.हृदयात शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचे मिश्रण होत नाही.डाव्या महारोहिणीस चाप असतो.महारोहिणीच्या मार्फत रक्त शरीराच्या सर्व भागांना पुरविले जाते.तांबड्या रक्तकोशिका सामान्यतः वाटोळ्या असून त्यांच्यात केंद्रक नसते.[ ⟶ रक्ताभिसरण तंत्र ].

  श्वसन तंत्र : बहुतेक सस्तन प्राणी फुप्फुसाच्या साहाय्याने श्वसन करतात.या प्राण्यांत द्वितीय टाळू अस्थीमुळे हवा व अन्नमार्ग वेगवेगळे आहेत.अधिस्वरद्वार या पडद्याच्या साहाय्याने श्वासनालाकडे जाणार्‍या मार्गाचे नियंत्रण केले जाते.या प्राण्यांत स्वरयंत्र असून त्यामध्ये असणार्‍या ध्वनितंतूंच्या साहाय्याने प्राणी निरनिराळे आवाज काढतात.[ ⟶ श्वसन तंत्र स्वरयंत्र ]. 

  उत्सर्जन तंत्र : या तंत्रात पश्च वृक्क, वृक्कांची एक जोडी, मूत्रवाहिनी, मूत्राशय व मूत्रमार्ग यांचा समावेश होतो.मूत्रवाहिनी मूत्राशयात उघडते. मूत्राशयात तात्पुरते मूत्र साठविले जाते.नंतर ते मूत्रमार्गाद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.वृक्कांमध्ये मूत्रजनन नलिका मोठ्या प्रमाणावर असतात.त्या मूत्र तयार करण्याचे काम करतात.⇨ मोनोट्रिमॅटा या संघातील( अंडजस्तनी ) प्राण्यांत अवस्कर ( या कप्प्यात आतडे, मूत्रमार्ग व प्रजोत्पादक नाल यांचे उत्सर्ग येतात ) असते.इतर सस्तन प्राण्यांत ते नसते.[⟶ उत्सर्जन ]. 

  स्नायू तंत्र : सस्तन प्राण्यांतील स्नायू तंत्र हे सरीसृप प्राण्यांसारखे असते.या प्राण्यांच्या हालचालींच्या पद्धतीत झालेला बदल व पार पाडावयाची कार्ये यांनुसार तंत्रात बदल झालेला आहे. त्वचेवर असणारे बाह्य आवरण यास पॅन्निक्युलस कार्नोसस ( म्हणजे अधस्त्वचीय स्तर ) म्हणतात.ते सस्तन प्राण्यांत विकसित झालेले असल्यामुळे बाह्य आवरणाची हालचाल आतील स्नायूची हालचाल न होता होऊ शकते. नरवानर गण व मांसाहारी प्राण्यांमध्ये चेहर्‍यावरील स्नायूंचा विकास झालेला आहे. हे प्राणी चेहर्‍यावर स्नायूंच्या हालचालींच्या साहाय्याने निरनिराळ्या भावना व्यक्त करतात. सामाजिक अनुकूलनासाठी हे महत्त्वाचे आहे.[ ⟶ स्नायू तंत्र ]. 

  तंत्रिका तंत्र : या तंत्रामध्ये मेंदू व मेरुरज्जू यांचा समावेश होतो. सस्तन प्राण्यांचा मेंदू सरीसृप प्राण्यांच्या मेंदूपेक्षा आकारमानाने मोठा असतो. या प्राण्यांचा मेंदू अतिविकसित असून प्रमस्तिष्क गोलार्धावर वळ्या असतात. प्रमस्तिष्क व निमस्तिष्क गोलार्ध मोठे असतात. प्रमस्तिष्क गोलार्धांचे उजवा व डावा भाग जोडण्याचे काम तंतुपट्ट ( मस्तिष्क गोलार्ध जोडणारा तंत्रिका ऊतकांचा पट्ट ) करतो. शिशुधान प्राण्यांमध्ये तंतुपट्ट कमी विकसित झालेला असतो तर अंडजस्तनी प्राण्यांमध्ये तो नसतो. मस्तिष्क तंत्रिकाच्या ( मेंदूपासून निघणार्‍या मज्जातंतूच्या ) १२ जोड्या असतात. मस्तिष्क तंत्रिका व मेरुरज्जूपासून निघणार्‍यातंत्रिकांचे मिळून परिसरीय तंत्र बनते. [⟶ तंत्रिका तंत्र ].

  ज्ञानेंद्रिये : आजूबाजूच्या वातावरणातील उद्दीपनांचे आकलन होण्या-करिता इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे सस्तन प्राण्यांत तंत्रिकांशी सलग्न ज्ञानेंद्रिये असतात व ज्ञानेंद्रिये दृष्टी, श्रवण, गंध, रुची व स्पर्श यांच्याशी निगडित असतात. 

  दृष्टी : सस्तन प्राण्यांच्या डोळ्यांची रचना सर्वसाधारणपणे पृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांप्रमाणे असते. डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांची हालचाल होते. डोळा खोबणीत बसविलेला असतो. पापण्यांच्या कडांवर केस असतात. वरच्या पापणीच्या बाह्य बाजूस अश्रुग्रंथी असतात. त्या अश्रू ( लवणयुक्त द्रव / स्राव ) तयार करतात. यामुळे डोळा ओलसर राहतो तसेच डोळ्याचे धुलिकणांपासून संरक्षण होते.

नेत्रभिंगाची हालचाल सहा स्नायूंच्या साहाय्याने घडवून आणली जाते. जवळचे दृश्य पाहताना नेत्रभिंगाची जाडी त्यावरील दाब कमी करून वाढविली जाते. त्यामुळे नेत्रभिंग गोलाकार ( फुगीर ) होऊन प्राण्यांना वस्तूचे चित्र दिसते. दूरचे दृश्य पाहताना नेत्रभिंगाची जाडी कमी होते. सशासारख्या प्राण्यामध्ये डोक्याच्या दोन्ही बाजूंस डोळे असतात. त्यामुळे या प्राण्यांना दोन्ही डोळ्यांनी वेगवेगळे दृश्य दिसते त्यास एकनेत्री दृष्टी असे म्हणतात. मानव व इतर उच्च प्राण्यांमध्ये दोन्ही डोळ्यांना एकच दृश्य दिसते त्यास द्विनेत्री दृष्टी असे म्हणतात. [⟶ डोळा ].

  श्रवण : सस्तन प्राण्यांमध्ये कानांची एक जोडी असते. कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण व अंतकर्ण असे तीन भाग असतात. बाह्यकर्ण कर्ण-दलाच्या स्वरूपात असतात. मध्यकर्णात कर्णपटल व तीन कर्णास्थी असतात. अंतकर्णात कलामय सर्पिल कुहर ( पोकळी ) असते. कर्ण-दलाच्या साहाय्याने ध्वनितरंग एकत्र केले जातात. ते कर्णपटलावर आदळतात. ही कंपने मध्यकर्ण व अंतकर्णामार्फत मेंदूपर्यंत पोहोचविली जातात. अंतकर्ण तंत्रिकांच्या साहाय्याने मेंदूला जोडलेला असतो. मेंदूमध्ये ध्वनीचे आकलन होते. सस्तन प्राण्यांत श्रवणशक्तीचा चांगला विकास झालेला आहे. [⟶ कान श्रवणक्रिया ].

  घ्राणेंद्रिय : स्तनी प्राण्यांमध्ये नासीय कप्पा हे गंधेंद्रिय असून त्याच्या-मार्फत वासाची संवेदना होते. ते बाहेरील बाजूस नासीय छिद्र म्हणून उघडते तर आतील बाजूस मुखगुहिकेत उघडते. नासीय कप्प्यात असणार्‍या कोशिकांमुळे वास ओळखता येतात. [⟶ नाक ].

  रुचिकलिका : ( स्वादकलिका ) या कलिका ओठ व जीभ यांवर असतात. जिभेतील रुचिकलिका उभट आकाराच्या असून त्या रुचिछिद्रांद्वारे उघडत असतात. त्यांच्या साहाय्याने अन्नाची चव कळते.     [⟶ जीभ रुचि स्वाद ].

  स्पर्शेंद्रिये : त्वचेवर सर्वत्र अंकुरांच्या स्वरूपात स्पर्शेंद्रिये असतात. त्यांना सूक्ष्म तंत्रिका जोडलेल्या असतात. या दोन्हींपासून संवेदन कोशिका तयार होते. यामुळे प्राण्यांना स्पर्शाची जाणीव होते. [⟶ त्वचा स्पर्शज्ञान ].


जनन तंत्र : सस्तन प्राणी एकलिंगी असून प्रजोत्पादन लैंगिक पद्धतीने होते. नरामध्ये वृषण ( जनन ग्रंथी ) सामान्यतः उदराबाहेर असलेल्या मुष्कांत ( लोंबणार्‍या पिशवींत ) असतात. यांत शुक्राणू तयार होतात. प्रत्येक वृषणापासून शुक्रनलिका निघते व तिच्यातून शुक्राणूचे वहन होते. दोन्ही बाजूंच्या शुक्रनलिका एकत्र येऊन त्यांतील रेत [⟶ वीर्य ] मूत्रनलिकेत सोडले जाते. ती नलिका मैथुनांगाच्या ( शिश्‍न ) टोकाला उघडते. मिलनाच्या वेळी नर मैथुनांगाच्या साहाय्याने  रेत मादीच्या योनीत सोडतो .

  मादीच्या जनन तंत्रात अंडकोश ( अंडाशय ), अंडवाहिनी, गर्भाशय, योनिमार्ग आणि पूरक ग्रंथींचा समावेश होतो. अंडाशयात स्त्रीबीज निर्माण होतात [⟶ अंडी ]. अंड सामान्यतः सूक्ष्म असतात, त्यांवर कवच नसते. मादीच्या गर्भाशयात निषेचित अंडाची वाढ होते. उल्ब, जरायू आणि अपरापोषिका या भ्रूणकला असतात. अपरेने ( वारेने ) भ्रूण गर्भाशयाला जोडलेला असतो. भ्रूणाचे पोषण आणि श्वसन अपरेद्वारे होते. जन्मानंतर पिलांचे पोषण स्तनात उत्पन्न होणार्‍या दुधावर होते.

अंडजस्तनी प्राणी कवचयुक्त अंडी घालतात. त्यांचे अंडज चक्र इतर सस्तन प्राण्यांसारखेच असते. शिशुधान प्राण्यांत गर्भाशयामध्ये भ्रूणाची ८ — ४० दिवस वाढ झाल्यावर पुढील वाढ शरीराच्या खालील बाजूस असणार्‍या शिशुधानीत होते उदा., कांगारू, ऑपॉस्सम, कोआला, वाँबट. काही सस्तन प्राण्यांमध्ये वर्षातून एकदाच प्रजनन काळ असतो, त्यांना एकमद ( मोनोइस्ट्रस ) प्राणी म्हणतात तर काही प्राण्यांमध्ये वर्षात एका-पेक्षा अधिक वेळा प्रजनन काळ असतो, त्यांना बहुमद ( पॉलिइस्ट्रस ) प्राणी म्हणतात. जरायुज प्राण्यांत गर्भावधी वेगवेगळा असतो. तो प्राण्यांच्या आकारमानावर तसेच वेतातील पिलांची संख्या यांवर अवलंबून असते. डोमेस्टिक हॅमस्टरमध्ये तो दोन आठवड्यांचा, ब्लू व्हेल या देवमाशामध्ये आकरा महिन्यांचा व आफ्रिकन हत्तीमध्ये एकविस महिन्यांचा असतो.

  मादीने पिलांना जन्म दिल्यानंतर स्तनामध्ये दुधाच्या निर्मितीस सुरुवात होते. पिलांनी स्तनाचे बोंड तोंडाने ओढल्यावर त्यातून दूध येण्यास सुरुवात होते. जरायुज प्राण्यांत स्तनांना स्तनाग्रे असतात. शिशुधान प्राण्यांच्या पिलांना दूध ओढून घ्यावे लागत नाही. मातेकडून पिलांच्या तोंडात आपोआप दूध येते वा सोडले जाते [⟶ जनन तंत्र प्रजोत्पादन ].

  वर्गीकरण : सस्तन प्राण्यांचे तीन उपवर्ग आहेत. प्रोटोथेरिया, ॲलोथेरिया व थेरिया या तीन उपवर्गांची माहिती खाली दिली आहे.

प्रोटोथेरिया : या उपवर्गात अंडी घालणारे व नियततापी सस्तन प्राणी यांचा समावेश होतो. अंड्यात मोठ्या प्रमाणावर पिवळा पीतक असतो.अंडी मातेकडून ( मादीकडून ) उबविली जातात. या प्राण्यांमध्ये अवस्कर असते. स्तनग्रंथी असून त्यांना स्तनाग्रे असतात. मेंदूत तंतुपट्ट नसते. दात नसतात. हे प्राणी न्यू गिनी, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया येथे आढळतात. या उपवर्गात तीन गणांचा समावेश होतो.

  ट्रायकोनोडोंटा : या गणातील प्राणी आदिम प्रोटोथेरियन असून ते सध्या अस्तित्वात नाहीत. हे प्राणी ट्रायासिक कल्पाच्या सुरुवातीस व क्रिटेशस कल्पाच्या अखेरपर्यंत आढळत होते. ते आकारमानाने लहान होते. उदा., ट्रायकोनोडॉन, प्रायकोनोडॉन.

  सिमेट्रोडोंटा : या गणातील प्राणी विलुप्त झालेले प्राणी आहेत. जुरासिक कल्पाच्या सुरुवातीपासून ते क्रिटेशसच्या मध्यापर्यंतच्या काळात ते आढळत होते उदा., स्पॅलॅकोथेरियम, पेरालिस्टस.

  मोनोट्रिमॅटा : या गणामध्ये ऑर्निथोर्‍हिंकिडी व एकिनॉयडिया या कुलांचा समावेश होतो. या प्राण्यांमध्ये प्रोटोथेरियन प्राण्यांची वैशिष्ट्ये आढळतात उदा., एकिड्ना, ऑर्निथोर्‍हिंकस.

  ॲलोथेरिया : या उपवर्गात विलुप्त झालेले प्राणी असून जुरासिक ते इओसीन या काळात ते आढळत होते. ते विलुप्त झालेल्या प्रोटोथेरियन प्राण्यांपेक्षा अधिक प्रगत होते. यामध्ये एका गणाचा समावेश होतो. [⟶ मोनोट्रिमॅटा ].

  मल्टिट्युबरक्युलेटा : या गणातील प्राण्यांच्या दाढांवर लहान उंचवट्याच्या दोन-तीन उभट रांगा असतात. प्रत्येक रांगेत २—५ सुळे ( दंतागे्र ) असतात. उदा., सायनोकोनोडॉन, प्लॅजिनेक्सस.   

  थेरिया : या उपवर्गामध्ये सर्व आधुनिक सस्तन तसेच काही विलुप्त झालेल्या प्राण्यांचा समावेश होतो. यामध्ये पँथोथेरिया, मेटॅथेरिया, व यूथेरिया या कनिष्ठ वर्गांचा समावेश होतो.

  पँथोथेरिया : या कनिष्ठ वर्गात विलुप्त झालेले मध्यजीवकालीन सस्तन प्राणी आहेत. ते आकारमानाने लहान होते. यामध्ये ड्रायोलेस्टॉयडिया व डोकोडोंटा या गणांचा समावेश होतो.

  (१) ड्रायोलेस्टॉयडिया : या गणातील प्राणी जुरासिक कल्पात आढळत होते. ते कीटकभक्षी पँथोथेरियन असावेत. त्यांचे जबडे लहान असून त्यांचे आकारमान सु. ४ सेंमी. होते. उदा., अँफिथेरियम, अंबलोथेरियम.

  (२) डोकोडोंटा : या गणातील प्राणी जुरासिक कल्पाच्या सुरुवातीस आढळत होते. ते ड्रायोलेस्टॉयडियासारखे असून फक्त दातांची रचना व आकारमान यांमध्ये फरक होता. उदा., डोकोडोंट.

मेटॅथेरिया : या कनिष्ठ वर्गातील प्राण्यांमध्ये मादीच्या उदरावरील स्तन- ग्रंथीवर शिशुधानी ( पिशवी ) असते. या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. या प्राण्यांचे मागील पाय पुढील पायांपेक्षा लांब व मजबूत असतात. या प्राण्यांची कवटी लहान असून मेंदूत तंतुपट्ट नसतो किंवा कमी विकसित झालेला असतो. श्रोणी मेखलेशी ( मागील पायांना आधार देणार्‍या हाडांच्या शृंखलेशी ) निगडित दोन शिशुधानी अस्थी असतात. या अस्थिंचा शिशुधानीला आधार मिळतो. हे प्राणी अपूर्ण वाढलेल्या म्हणजेच अकाल प्रसव अवस्थेत पिलांना जन्म देतात. या पिलांची उर्वरित वाढ मातेच्या दुधावर पूर्ण होते. या काळात पिलू मातेच्या स्तनाग्रांना चिकटून राहते. अवस्कर अनेक प्राण्यांत असते परंतु ते पूर्णपणे विकसित झालेले नसते. नरामध्ये शिश्‍न हे मैथुन इंद्रिय असून काही प्राण्यांमध्ये टोकाला ते दोन भागांत विभागलेले असते. मादीमध्ये दोन योनिमार्ग व दोन गर्भाशय असतात. हे प्राणी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका व टास्मानिया येथे आढळतात. या कनिष्ठ वर्गात तीन गणांचा समावेश होतो.

  (१) पॉलिप्रोटोडोंशिया : (  बहुदंती ). या गणात आदिम मेटॅथेरियन प्राणी आहेत. बहुतेक प्राणी कीटकभक्षी वा मांसाहारी असून वृक्षवासी आहेत. या प्राण्यांत ४-५ कृंतक ( कुरतडण्यास उपयुक्त ) दात असतात. काही प्राण्यांत शिशुधानी पिशवी असते, काहींत नसते. उदा., शिशुधानी मोल, ऑपॉस्सम, बँडिकूट. 

  (२) डायप्रोटोडोंशिया : ( द्विदंती ). या गणामध्ये विकसित शिशुधान प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या खालच्या जबड्यांत कृंतक दातांची एक जोडी तर वरच्या जबड्यात दोन जोड्या असतात. बहुतेक प्राणी शाकाहारी आहेत. उदा., फॅलँजर, कांगारू, वॉलबी, वाँबट.


(३) सीनोलिस्टॉयडिया : या गणातील प्राणी बहुदंती व द्विदंती प्राण्यांच्या दरम्यानच्या अवस्थेतील प्राणी समजले जातात. यातील काही काही प्राणी विलुप्त झाले आहेत. ते आकारमानाने लहान आहेत. उदा., सीनोलिस्टस, ओरोलिस्टस, रायनोलिस्टस. [⟶ शिशुधान प्राणि ].

  यूथेरिया : या कनिष्ठ वर्गामध्ये सर्व आधुनिक सस्तन प्राण्यांचा समावेश होतो. हे प्राणी जरायुज सस्तन प्राणी असून गर्भाचे पोषण गर्भाशयात होते व पूर्ण वाढ झाल्यावर पिलांचा जन्म होतो. या प्राण्यात अवस्कर नसते. स्तनग्रंथींचा विकास झालेला असून स्तनांना स्तनाग्रे असतात. दात विविध प्रकारचे असून त्यांचे दुधाचे दात व कायमचे दात असे दोन संच असतात. दात जबड्याच्या अस्थीच्या खाचेमध्ये बसविलेले असतात. बरगड्या मागील बाजूस कशेरुकाला जोडलेल्या असतात. तंत्रिका तंत्रात तंतुपट्ट विकसित झालेला असतो. अपरापोषिका व वार विकसित झालेली असते. या कनिष्ठ वर्गात खालील गणांचा समावेश होतो.

(१) इन्सेक्टिव्होरा : या गणात लहान आदिम सस्तन प्राणी आहेत. यांच्या शरीरावर काटे किंवा केस असतात. मुस्कट लांब असून खालच्या जबड्यापेक्षा थोडे पुढे आलेले असते. पायास पाच अंगुली असून प्रत्येक  अंगुलीस नखर असते. बहुतेक प्राणी जमिनीवर राहणारे, काही वृक्षवासी तर काही जलचर, काही बिळांत राहणारे आहेत. उदा., जाहक, छछुंदर, चिचुंदरी.  

  (२) किरोप्टेरा : या गणात हवेत संचार करणारे सस्तन प्राणी आहेत. या प्राण्यांच्या पुढील पायांचे रूपांतर पंखासारख्या भागांमध्ये झालेले असते. दुसरी व पाचवी अंगुली लांब असून त्या त्वचेच्या पडद्यास आधार देतात. उरोस्थीला कण्यासारखा भाग असतो. जत्रू अस्थी मजबूत असून ते स्कंधास्थी व उरोस्थीशी जोडलेले असतात. यामध्ये दोन उपगण आहेत. 

  मेगाकिरोप्टेरा : या उपगणात मोठ्या आकारमानाच्या परंतु फळे खाणार्‍या वटवाघळांचा समावेश होतो. उदा., टेरोपस, सायनोप्टेरस.

मायक्रोकिरोप्टेरा : या उपगणामध्ये लहान आकरमानाच्या कीटकभक्षी वटवाघळांचा समावेश होतो. उदा., मेगॅडर्मा, र्‍हेनोलोफस.

  (३) डर्मोप्टेरा : या गणात मांजराच्या आकारमानाची वटवाघळे आहेत. त्यांचा पंखासारखा भाग मोठा असून तो मानेपासून मनगटापर्यंत पसरलेला असतो. तसेच पाठीमागील बाजूस शेपटीपर्यंत असतो. उदा., गॅलिओपिथिकस.

  (४) नरवानर गण : ( प्रायमेट्स ). या गणात सर्वभक्षी प्राणी असून फांद्या घट्ट पकडण्यासाठी हातापायांना पाच लांबट बोटे असतात. अंगठा व शेजारचे बोट यांची टोके एकमेकांस टेकू शकतील अशी चिमट्या-सारखी रचना असते. डोक्याच्या पुढील बाजूस खोबणीत डोळे असतात. नरामध्ये वृषण उदराबाहेर असलेल्या मुष्कात असतात. या प्राण्यात मैथुनांगे (  शिश्‍न व योनी  ) असतात. मादीत दोन स्तनग्रंथी व स्तनाग्रे असतात. यांमध्ये तीन उपगण आहेत.

  लेमुरॉइडिया : या उपगणातील प्राणी लहान व निशाचर असून त्यांना लहान शेपटी असते. ते आदिम नरवानर आहेत. ते भारत, मादागास्कर, आफ्रिका व ईस्ट इंडीजमध्ये आढळतात. उदा., लेमूर, चिरोगले, इड्रिस.

  टार्सिडिया : या उपगणात टार्सिडिया या एकाच प्रजातीचा समावेश होतो. या प्राण्यांचे डोळे व कान मोठे असतात. अंगुली लांब असून टोकाला पसरट असतात. ते इंडो-मलाया, फिलिपीन्स, अर्चिपेलागो येथे आढळतात.

  अँथ्रोपॉइडिया : या उपगणात प्रगत सस्तन प्राण्यांचा समावेश होतो.यांची कवटी मोठी असून डोळ्यांचा आकार गोलाकार झाला आहे. प्रमस्तिष्काच्या ( मोठ्या मेंदूच्या ) वाढीबरोबर त्याच्या पृष्ठभागावर घड्या पडून सीता ( खाचा ) व संवेलक यांची निर्मिती झाली आहे. डोळे पुढील दिशेस असून दृष्टी द्विनेत्री असते. बाह्यकर्णाचे आकारमान कमी झालेले असते. वरचा ओठ खालच्या ओठापेक्षा किंचित पुढे आलेला असतो. हातांच्या व पायांच्या अंगुलींना नखे असतात. दातांची संख्या ३२—३६ असते. उदा., माकडे, कपी, मानव.

(५) रोडेंशिया : हा सस्तन प्राण्यांचा मोठा गण आहे. या गणातील प्राणी आकारमानाने लहान असून कीटकभक्षी गणामधील प्राण्यांसारखेच असतात. या प्राण्यांमध्ये सुळे नसतात, कृंतक दात लांब व धारदार असतात. अंगुलींना नखर असतात. लांबट जबडा असलेले मुस्कट असते. वृषण उदरात असते. उदा., उंदीर, आफ्रिकन उडणारी खार.

  (६) एडेंटाटा : या गणातील प्राणी काही बाबतींत अतिशय प्रगत आहेत. काही प्राण्यांत दात असतात, तर काहींत नसतात. दात असणार्‍या प्राण्यांत सुळे व कृंतक नसतात. अंगुलींना नखर असतात. वृषण उदरात असतात. उदा., स्लॉथ, आर्मडिलो. यांमध्ये दोन उपगण आहेत.

  पिलोसा : या उपगणातील प्राणी केसाळ असून त्यांच्या पायांच्या अंगुलींना नखर असते. मुस्कट लांबट असून जीभ बाहेर फेकता येणारी असते. उदा.,स्लॉथ, मर्मिकोफॅगा. लोरिकाटा : या उपगणात शरीरावर खवले असणार्‍या प्राण्यांचा समावेश होतो. बहुतेक प्राणी निशाचर, कीटकभक्षी आहेत. उदा., आर्मडिलो.  

  (७) फोलिडोटा : हा लहान गण असून यामध्ये खवल्या मांजर या मुंगीखाऊ प्राण्याचा समावेश होतो. याच्या शरीरावर एकावर एक असे त्रिकोणी खवले असतात. शरीराच्या काही भागांवर केस आढळतात. या प्राण्यात  लांब व बाहेर फेकता येणारी जीभ असून मुस्कट लांब असते. याच्या लांब व बाकदार नखरांचा उपयोग माती उकरण्यासाठी होतो. उदा., पँगोलीन, मॅनिस जागँटिआ.

  (८) ट्युबिलिडेंटाटा : या गणामध्ये एकएकटे राहणार्‍या प्राण्यांचा समावेश होतो. ते मुंग्यासारखे कीटक खातात. त्यांचे मुस्कट लांबट असून  बाहेर फेकता येणारी जीभ असते. त्यांची त्वचा जाड असून तीवर केस असतात. उदा., ओरिक्टेरोपस.

  (९) कार्निव्होरा : या गणातील प्राणी विकसित झालेले असून तेकीटकभक्षी प्राण्यांपासून निर्माण झाले आहेत. ते अतिशय ताकदवान व मांसाहारी आहेत. या प्राण्यांचे दात मांसाचे तुकडे करणे व फाडणे ( ओढणे ) यांसाठी अनुकूलित झालेले असतात. जबड्यांच्या बाजूस तीन लहान कृंतक दात असतात. सुळे लांब व टोकदार असतात. दाढा व उपदाढांना मांस तोडण्यासाठी धारदार भाग असतात. पायांना किमान चार नखरयुक्त अंगुली असतात यामध्ये तीन उपगण आहेत.


पिन्निपीडिया : या उपगणात सागरी मांसाहारी प्राण्यांचा समावेश होतो. यांच्या हातांच्या व पायांच्या अंगुलींना त्वचेचे पडदे असतात. काही प्राण्यांमध्ये ओठांवर केस असतात. उदा., वॉलरस, सागरी सिंह.

  फिसिपीडिया : या उपगणात जमिनीवरील मांसाहारी प्राण्यांचा समावेश होतो. यांच्या प्रत्येक अंगुलींना नखर असते. उदा., वाघ, चित्ता, बिबळ्या, तरस, कुत्री, अस्वल.

  क्रिओडोंशिया : या उपगणात विलुप्त झालेल्या मांसाहारी प्राण्यांचा समावेश होतो.

  (१०) सीटॅसिया : यामध्ये प्रगत सागरी प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांमध्ये केस, नखर, दात, मागचे पाय व बाह्यकर्ण नसतात. बाह्यकर्ण असल्यास ते लहान असतात. पुढील पाय पोहण्यासाठी विकसित झालेले असतात. या प्राण्यांचे आकारमान मोठे असते. त्वचेखाली मेदाचा स्तर असतो. यामध्ये दोन उपगण आहेत.

  ओडाँटोसीटाय : या उपगणातील प्राण्याचे सर्व दात एकाच प्रकारचे असून दातांचा एकच संच असतो. एक नासिका छिद्र असते. उदा., वसातिमी ( स्पर्म व्हेल ), ओरका.

  मिस्टॅकोसीटाय : या उपगणातील प्राण्यांमध्ये दात नसतात, असल्यास ते लहान असतात. दोन नासिका छिद्रे असतात. उदा., बॅलेनिया, बॅलिनॉप्टेरा.

(११) विषमखुरी : ( पेरिसोडॅक्टिला ). या गणात विषमखुरी प्राण्यांचा समावेश होतो. मधला विकसित झालेला खुर प्राण्याच्या शरीराचे जास्त वजन पेलतो. यांच्या दाढांना एनॅमलाचे आवरण असलेले आडवे उंचवटे असतात. उदा., घोडा, गाढव, गेंडा, झीब्रा.

  (१२) समखुरी : ( आर्टिओडॅक्टिला ). या गणातील प्राणी समखुरी  आहेत. बहुतेक प्राणी जमिनीवर राहणारे, शाकाहारी व आकारमानाने मोठे असतात. पायांना दोन किंवा चार खुर असतात. जठर चार कप्प्यांचे असते. दाढा व उपदाढा असतात. हे प्राणी जलद चालणारे असतात. काही प्राण्यांना शिंगे असतात. यामध्ये तीन उपगणांचा समावेश होतो.

  सुईफॉर्मस : या उपगणातील प्राण्यांत दोन किंवा चार खुर असतात. या प्राण्यांत दुधाचे दात असतात. जठर साधे असते व काही प्राण्यांमध्ये ते तीन कप्प्यांचे बनलेले असते. काही प्राणी अर्धजलचर आहेत. उदा., डुक्कर, पाणघोडा.

  टायलोपोडा : या उपगणात रवंथ करणार्‍या प्राण्यांचा समावेश होतो. यांचे पाय लांब असतात आणि त्यांना दुसरे व पाचवे खुर नसते. खुरांना नखराचा भाग असतो. जठर तीन कप्प्यांचे बनलेले असून त्यात जठरात जलकोशिका असतात. वरच्या जबड्यात दाढा व कृंतक दात असतात, तर सुळे दोन्ही जबड्यांत असतात. उदा., उंट, लम्स.

  रुमिनॅन्शिया : या उपगणात रवंथ करणार्‍या प्राण्यांचा समावेश होतो.उदा., चितळ, कस्तुरी मृग, सांबर, काळवीट, गवा.

  (१३) हायरॅकॉयकडिया : या गणातील प्राण्यांच्या शरीरावर दाट केस असतात. यांची शेपटी व कान लहान असतात. ते शाकाहारी आहेत. ते आफ्रिकेत आढळतात. उदा., हायरूना ॲबेसिनीकस.

  (१४) प्रोबॉसिडिया : या गणामध्ये जमिनीवर राहणार्‍या मोठ्या आकारमानाच्या प्राण्यांचा समावेश होतो. यांचे डोके मोठे असून त्यास लांब सोंड असते. सोंडेच्या टोकाला नासिका छिद्रे असतात. पुढच्या व मागच्या पायांस पाच खुर असतात. वरच्या जबड्यात लांब सुळे ( हस्तिदंत ) असतात. कवटीत पोकळ्या असतात. त्यांची त्वचा जाड व शुष्क असते. यांचे वृषण उदरात असतात. उदा., हत्ती.

  (१५) सायरेनिया : या गणामध्ये सागरी प्राण्यांचा समावेश होतो,  त्यांना सागरी गाय असे म्हणतात. यांच्या शरीराचा आकार बोटीसारखा असून मान लहान व त्वचा जाड असते. यांच्या शरीरावर केस व बाह्यकर्ण नसतात. पुढील पाय पोहण्यासाठी अनुकूलित झालेले असतात, मागचे पाय नसतात. शेपटीस पुच्छपक्ष असतो. ते शाकाहारी प्राणी आहेत.उदा., ट्रायकेकस, लॅट्रोस्ट्रिस, हॅलिकोअर डूगाँग.

  (१६) लॅगोमॉर्फा : या गणामध्ये ससे ( रॅबिट ) व हेअर यांचा समावेश होतो. या प्राण्यांचे बाह्यकर्ण लांब असतात. वरच्या जबड्यात कृंतकांच्या दोन जोड्या असतात तर सुळे नसतात. या प्राण्यांचे मागील पाय मजबूत असून त्यांचा उपयोग उड्या मारण्यासाठी होतो. पायांचे तळवे केसाळ असतात. उदा., लेपूस ( हेअर ) ओरिक्टोलॅगस ( रॅबिट ).  

स्तनी प्राणी व मानव : प्राचीन काळापासून मानवाच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाशी जंगली तसेच पाळीव सस्तन प्राण्यांचा संबंध आहे. सुरुवातीच्या काळात मानव अन्नासाठी जंगली प्राण्यांची शिकार करीत असे. अनेक शतकांपासून मानव मालवाहतुकीसाठी बैल, खेचर, गाढव, घोडे इत्यादींचा वापर करीत आहे. मानवासाठी लागणार्‍या आवश्यक प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या व गायीं यांच्या मांसाचा उपयोग केला जातो. तसेच दूध प्रामुख्याने शेळ्या, गाई, म्हशी व उंटीण यांपासून मिळविले जाते.

  एस्किमो लोक देवमासा व सील ब्लबर यांच्या तेलाचा उपयोग इंधनासाठी तसेच सीलच्या कातडीचा उपयोग बूट व बर्फावरील नौका  तयार करण्यासाठी करतात. म्हशीच्या मांसाचा उपयोग अन्न म्हणून, कातडीचा उपयोग कातडी वस्तू बनविण्यासाठी व कंडरातील (हाडाशी स्नायू जोडणारा बंध ) धाग्याचा उपयोग कातडी शिवण्यासाठी केला जातो. सांबर, हरिण या प्राण्यांच्या  फरचा वापर फॅशनेबल कोट व पर्स तयार करण्यासाठी केला जातो. 

  काही सस्तन प्राणी मानवाचे नुकसान करणारे आहेत. उदा., ससे, रानडुकरे यांसारखे प्राणी पिकांचे नुकसान करतात. मुंगूस, कोल्हा, वाघ, तरस यांसारखे प्राणी पाळीव प्राण्यांना मारतात, तर काही उंदरासारखे कृंतक प्राणी अन्नधान्याची नासाडी तसेच रोगांचा प्रसार करतात. वाघ व सिंह, बिबळ्या यांसारखे मांसाहारी प्राणी मानवासाठी धोकादायक आहेत.   

पाटील, चंद्रकांत. प.


 जीवाश्म : सस्तन प्राण्यांचा सांगाडा पूर्णतया हाडांचा असतो. सापडलेल्या कवट्या व सांगाड्यातील काही भाग चांगले टिकून राहिले आहेत. त्यामुळे सस्तन प्राण्यांच्या जीवाश्मांची चांगली फेरमांडणी करणे शक्य होते. या प्राण्यांचे दात सर्वाधिक टिकून राहिलेले आढळतात. कारण त्यांची झीज खूप कमी प्रमाणात होते. त्यांच्या पायांची हाडे अस्थिमय असल्याने तीही चांगली टिकून राहिलेली आढळतात. त्यांची सांध्या-लगतची वैशिष्ट्येही जीवाश्मांत आढळतात. त्यांवरून प्राणी ओळखण्यास मदत होते. परिणामी सस्तन प्राण्यांच्या जीवाश्मांचे वर्गीकरण दात व हाडे यांच्या मदतीने करता येते. उदा., ब्रॅकिओडोंट ( लघुदंत ), हिप्सोडोंट ( तुंगदंत ), हॅप्लोडोंट, प्रोटोडोंट, एकवारदंती व द्विवारदंती.

सस्तन प्राण्यांच्या क्रमविकासात पाच बोटे असलेल्या आदिम प्राण्यांच्या पायांच्या बाजूची बोटे क्रमाने कमी होत गेली. यातून समखुरी, विषमखुरी व एकखुरी हे खुरी प्राणी विकसित झाले. सीटॅसिया, पिन्निपीडिया ( सील व वॉलरस ) व सायरेनिया यांच्या पुढील पायांचे वल्ह्यासारख्या रूपात परिवर्तन झाले, तर किरोप्टेरा ( वटवाघूळ ) प्राण्यांचे पुढील पाय पंखासारख्या संरचनेत परिवर्तित झाले.

  अंडज सस्तन प्राण्यांचे जीवाश्म ऑस्ट्रेलियात प्लाइस्टोसीन काळातील खडकांत आढळले आहेत. शिशुधान प्राण्यांचे सर्वांत आधीचे जीवाश्म यूरोप व दक्षिण आफ्रिका येथील उत्तर जुरासिक काळात खडकांत तर उत्तर व दक्षिण अमेरिका आणि यूरोप येथील जुरासिक, क्रिटेशस व तृतीय कालीन खडकांत आढळले आहेत. कांगारूंचे फॅलँजेरिडी कुल ऑस्ट्रेलियात तृतीय काळात अवतरले व तेथेच राहिले. सध्याच्या इतर शिशुधान प्राण्यांचे जीवाश्म केवळ ऑस्ट्रेलिया व त्यालगतची बेटे येथील प्लाइस्टोसीन काळातील खडकांत आढळतात. हल्लीच्या कीटकभक्षी सस्तन प्राण्यांचे जीवाश्म फक्त पूर्व गोलार्ध व उत्तर अमेरिका येथे आढळतात. किरोप्टेरा गणातील सस्तन प्राण्यांचे जीवाश्म इओसीन, ऑलिगोसीन, मायोसीन व प्लाइस्टोसीन काळांतील आहेत.

  मांसाहारी सस्तन प्राण्यांपैकी क्रिओडोंशिया प्राण्यांचा प्रसार पूर्व पॉलिओसिन ते पूर्व ऑलिगोसीन काळापर्यंत विस्तृतपणे झाला. भारतात व आफ्रिकेत ते मायोसीन काळाच्या सुरुवातीसही टिकून होते. नंतर मात्र त्यांच्यावर फिसिपीडिया उपगणातील प्राण्यांनी मात केली. फिसिपीडिया उपगणातील सर्व कुले ( उदा., फेलिडी, व्हायव्हेरिडी ) उत्तर इओसीन काळात होती व काही कुले ऑलिगोसीन काळात अवतरली. यांपैकी कुत्रे, लांडगे, कोल्हे व खोकड हे प्राणी असणारे कॅनिडी कुल यूरोपात उत्तर इओसीन काळात अवतरले. नंतर या प्राण्यांचा प्रसार उत्तर अमेरिकेत झाला व तेथून ते जगभर पसरले. मांजर, वाघ, सिंह, बिबळे, चित्ते इ. फेलिडी कुलातील प्राणी इओसीन वा पूर्व ऑलिगोसीन काळात अवतरले आणि नंतर त्यांचा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे देश वगळता जगभर प्रसार झाला. मुस्टेलिडी व व्हायव्हेरिडी ( कस्तुरी मांजर ) या कुलांतील प्राण्यांचा उत्तर गोलार्धात प्रसार झाला. मध्य तृतीय काळात अवतरलेल्या अर्सिडी कुलातील अस्वल इ. प्राण्यांचा प्रसार उत्तर अमेरिका व इतर प्रदेशांत मायोसीन व प्लायोसीन काळांत झाला. तरसाचे हायनिडी कुल प्लायोसीन काळांत ग्रीस येथे अवतरले आणि नंतर यूरोप व आशिया खंडांत त्याचा प्रसार झाला. प्रोसिऑनिडी कुलातील रॅकूनासारख्या प्राण्याचे मायोसीन काळापासूनचे जीवाश्म अमेरिकेत व यूरोपात आणि यातील आयल्युरस प्रजातीच्या प्राण्यांचे जीवाश्म हिमालयात आढळतात.

  पिन्निपीडिया उपगणात सील व वॉलरस हे प्राणी येतात. या प्राण्यांचे मायोसीन काळापासूनचे जीवाश्म अमेरिका, ईजिप्त, हंगेरी, ऑस्ट्रिया व रशिया येथे आढळले असून सांप्रत हे प्राणी दोन्ही ध्रुवांलगतच्या प्रदेशांत आढळतात. 

  सीटॅसिया गणातील देवमासे, शिंशुक ( पॉरपॉइज ) इ. प्राणी इओसीन काळात अवतरले आणि नंतर प्लाइस्टोसीन काळापर्यंत त्यांचे विविध प्कार निर्माण होऊन त्यांची संख्याही खूप झाली.

एडेंटाटा गणातील जीवाश्म रूपातील प्राण्यांमध्ये कृंतक दात व सुळे होते आणि दंतिनावर दंतवल्क होते. या प्राण्यांचे (उदा., मोठे स्लॉथ ) इओसीन काळापासूनचे जीवाश्म पूर्व गोलार्ध व यूरोप येथे आणि पश्चिम गोलार्धात इओसीन कालीन जीवाश्म दक्षिण अमेरिकेत आढळले आहेत. याच्या झेनॅर्थ्रा उपगणातील ⇨ आर्मडिलोसारख्या प्राण्यांचे जीवाश्म केवळ दक्षिण अमेरिकेत सापडले आहेत.

  रोडेंशिया गणातील प्राणी उत्तर अमेरिका व यूरोपात उत्तर इओसीन व मायोसीन काळांमध्ये विपुल होते. यूरोप आणि उत्तर व दक्षिण अमेरिका येथील गुहांमध्ये साचलेल्या गाळात त्यांचे जीवाश्म सापडले आहेत. उंदीर, घुशी, ससे, साळ इ. कृंतक प्राणी मध्य तृतीय काळात पूर्व गोलार्धामध्ये अवतरले व पश्चिम गोलार्धात त्यांचा झपाट्याने प्रसार झाला.

  खुरी प्राण्यांच्या काँडिलार्थ्रा उपगणातील प्राण्यांचे इओसीन काळाच्या सुरुवातीचे थोडेच जीवाश्म उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात सापडले आणि पॅलिओसीन काळात त्यांचा निर्वंश झाला. लिटोप्टेर्ना उपगणातील खुरी प्राण्यांचे उत्तर इओसीन काळातील जीवाश्म दक्षिण अमेरिकेत आढळले असून हा उपगण प्लाइस्टोसीन काळात विलुप्त झाला. अँब्लिपोडा उपगणातील खुरी प्राणी फक्त इओसीन काळातच होते आणि त्यांचे जीवाश्म उत्तर अमेरिका, यूरोप व मंगोलिया येथे आढळले असून हा उपगणही इओसीन काळामध्ये निर्वंश झाला.

  विषमखुरी प्राण्यांचे ( पेरिसोडॅक्टिला ) टॅपिर, र्‍हिनोसेरॉसईक्वस ( घोडा ) या तीनच प्रजाती आहेत. टॅपिरिडी कुलाचे इओसीन काळापासूनचे पासूनचे जीवाश्म यूरोप व उत्तर अमेरिकेत आढळले आहेत. प्लाइस्टोसीन काळापासून या कुलातील प्राणी अमेरिका व आग्नेय आशियातील उष्ण कटिबंधीय वनांत होते. टॅपिर प्रजाती मात्र टिकून राहिली. र्‍हिनोसेरॅटिडी कुलाचे जीवाश्म मध्य इओसीन काळातील खडकांत यूरोप व उत्तर अमेरिकेमध्ये सापडले आहेत. नंतर त्यांचा उत्तर गोलार्धात विस्तृत प्रसार झाला. त्यांची र्‍हिनोसेरॉस ( गेंडा ) ही एकमेव प्रजाती मध्य आफ्रिका, भारत व सुंदा बेटे येथे टिकून राहिलेली दिसते.

घोड्याचे ईक्विडी कुल इओसीन काळामध्ये अवतरले. या प्राण्यांच्या दातांत व पायांत ठळकपणे बदल झालेले आढळतात. यांचे जीवाश्म जेथे सापडले तेथील निक्षेपांचे सहसंबंध ठरविण्यासाठी क्रमविकासातील विविध टप्पे स्पष्ट करणार्‍या त्यांच्या प्रजाती अतिशय उपयुक्त ठरलेल्या आहेत. ईक्वस प्रजाती भारतात प्लायोसीन काळात अवतरली आणि यूरोपात उत्तर प्लायोसीन आणि अमेरिका व आफ्रिकेत प्लाइस्टोसीन काळापर्यंत तिचा प्रसार झाला. तोपर्यंत ही प्रजाती ऑस्ट्रेलिया सोडून जगभर पसरली होती. या प्रजातीचे स्तरवैज्ञानिक महत्त्व पुष्कळ आहे. त्यामुळे ती केव्हा सुरू झाली याविषयी मतभिन्नता आहे. उत्तर अमेरिकेत या कुलाचा पूर्ण क्रमविकास होऊन यातील प्राणी तेथूनच यूरोप, दक्षिण अमेरिका व आशिया येथे गेले. उत्तर अमेरिकेत ईक्वस प्रजाती प्लाइस्टोसीन अखेरीस विलुप्त झाली. तथापि यूरोपियन वसाहतवाल्यांनी घोडा पुन्हा उत्तर अमेरिकेत आणला. विषमखुरी प्राण्यांच्या कॅलिकोथेरिआयडी कुलातील प्राणी तृतीय काळात उत्तर अमेरिका व यूरोपात आणि प्लायोसीन काळात भारत व चीन येथे, तर प्लाइस्टोसीन काळात युगांडात होते. प्लाइस्टोसीन काळात हे प्राणी विलुप्त झाले.

  आर्टिओडॅक्टिला हा समखुरी प्राण्यांचा उपगण असून सध्याचा तो सर्वांत प्रमुख गट आहे. याचे दंतविन्यासानुसार ब्युनोडोंशिया, सेलेनोडोंशिया व ब्युनो-सेलेनोडोंशिया हे गट मानतात. यांपैकी ब्युनोडोंशियातील सुइडी ( डुक्कर ) कुल इओसीन काळामध्ये अवतरले व मायोसीन काळामध्ये पूर्व गोलार्धात त्याचा व्यापक प्रसार होऊन संख्या विपुल झाली. अशा रीतीने हे प्राणी यूरोप, आशिया, आफ्रिका व अमेरिका येथील मूळचे प्राणी आहेत. हिप्पोपोटॅमिडी ( पाणघोडा ) कुलाचे जीवाश्म प्लायोसीन व प्लाइस्टोसीन काळांतील जीवाश्म असून त्याची एकमेव प्रजाती हिप्पोपोटॅमस आफ्रिकेत टिकून राहिली आहे. 


ब्युनो-सेलेनोडोंशिया हे आदिम समखुरी प्राणी इओसीन व मायोसीन काळांत यूरोपात विपुल होते. भारतात त्यांचे थोडेच जीवाश्म आढळले. यांतील ॲनोप्लोथेरायडी कुलाचे इओसीन व ऑलिगोसीन काळांतील जीवाश्म केवळ यूरोपात तर डायकोब्युनिडी कुलाचे याच काळातील जीवाश्म फक्त उत्तर अमेरिका व यूरोपमध्ये आढळले आहेत.

  सेलेनोडोंशिया गटातील सीनोथेरायडी हे आदिम कुल इओसीन व मायोसीन काळांत होते तर ॲग्रिओकीरिडी कुलातील प्राण्यांचे जीवाश्म अमेरिकेतील इओसीन ते प्लायोसीन काळांतील खडकांत आढळतात. झिफोडोंटिडी कुलातील प्राण्यांचे जीवाश्म फक्त यूरोपातील इओसीन खडकांत सापडले. कॅमलिडी गटातील प्राणी उत्तर अमेरिकेत इओसीन काळामध्ये अवतरले ते प्लायोसीन काळामध्ये उत्तर आफ्रिका व आशियात गेले. त्यांच्या जीवाश्मांच्या नोंदी परिपूर्ण असून यातील कॅमेलस ( उंट ) प्रजाती आशिया व उत्तर आफ्रिका आणि ऑकॅनिया प्रजाती दक्षिण अमेरिका येथे आढळते. ट्रॅग्युलिडी कुलातील ( माउस डियर ) जीवाश्म यूरोप, आशिया व आफ्रिका येथे सापडले असून त्यांचा काळ ऑलिगोसीन  ते पूर्व प्लायोसीन आहे. हे प्राणी आता दक्षिण आशिया व पश्चिम आफ्रिका येथे आहेत.

विविध प्रकारची हरिणे, शेळ्या, मेंढ्या, गायी इत्यादींचे सर्व्हिकॉर्निया व कॅव्हिकॉर्निया हे दोन स्थूल गट करतात. यांपैकी पहिला लांबट कवटीच्या हरिणांचा गट असून दुसर्‍या गटात पोकळ शिंगांचे रवंथ करणारे प्राणी येतात. पहिला गट ऑस्ट्रेलिया वगळता सर्व जगभर पसरला होता. यातील सर्वांत आधीच्या ( उत्तर इओसीन ते मायोसीन ) प्रोटोसेरॅटिनी गटातील प्राण्यांचे जीवाश्म फक्त उत्तर अमेरिकेत आढळले. यातीलच मॉस्किनी या सर्वांत लहान गटातील प्राण्यांचे जीवाश्म भारतात प्लायोसीन काळातील शिवालिक खडकांत प्रथम आढळले [⟶ शिवालिक संघ ]. सर्व्ह्युलिनी गटातील प्राण्यांचे मायोसीन काळापासूनचे जीवाश्म आढळले आहेत. सर्व्हिनी उपकुलातील ( रेनडियर व रँगिफर ) प्राण्यांचे प्लायोसीन काळापासूनचे जीवाश्म आढळतात. हे प्राणी सध्या उत्तर गोलार्ध व दक्षिण अमेरिकेत आहेत. शिवाथेरायनी गटातील प्राण्यांचे पूर्व प्लायोसीन काळातील जीवाश्म भारतात व काही चीन व तुर्कस्तान येथे आढळले आहेत. जिराफिनी गटातील कॅमेलोपारडॅलिस ( जिराफ ) प्रजातीचे पूर्व प्लायोसीन काळापासूनचे जीवाश्म दक्षिण यूरोप, पर्शिया, भारत व चीनमध्ये आढळतात. हल्ली हे प्राणी मध्य व दक्षिण आफ्रिकेत आहेत. अँटिलोकॅप्रिडी गटातील प्राण्यांचे ऑलिगोसीन काळापासूनचे जीवाश्म उत्तर अमेरिकेत सापडतात [ त्यांना चुकून अँटिलोप ( हरीण ) म्हणतात ].

  अंग्युलेटातील सर्वांत विपुल गट कॅव्हिकॉर्निया उत्तर मायोसीन काळात अवतरला व अभिनव काळात त्याची कमाल भरभराट झाली. त्याची ईगोडोंशिया व बूडोंशिया ही उपकुले असून त्यांचे अनेक उपगट आहेत. ईगोडोंशियातील निओट्रॅजिनी उपगटाचे जीवाश्म फक्त आफ्रिकेत रीसेंट काळातील खडकांत आढळतात. रुपिकॅप्रिनी उपगटाचे जीवाश्म यूरोप व पश्चिम आशियात आढळतात. गॅझेलिनी, ओव्हिकॅप्रिनी व ओव्हिबोव्हिनी या उपगटांचे पूर्व प्लायोसीन काळाचे जीवाश्म आढळतात. सध्या हे प्राणी यूरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ग्रीनलंड इ. भागांत आहेत. सध्याच्या पाळीव शेळ्या ( कॅप्रा ) व मेंढ्या ( ओव्हिस ) नवाश्म युगात अवतरल्या.

  बूडोंशिया हे पूर्व गोलार्धातील उपकुल बहुधा यूरोपात मायोसीन काळात अवतरले आणि ट्रॅजिलॅफिनी व सेफॅलोफिनी गटांत टिकून राहिले. स्यूडोट्रॅजिनी प्रजातीचे बहुतेक जीवाश्म यूरोप, पर्शिया, चीन व उत्तर अमेरिकेतील उत्तर मायोसीन ते पूर्व प्लायोसीन खडकांत आढळले आहेत. सर्व्हिकॅप्रिनी या मर्यादित गटाचे जीवाश्म भारतातील प्लायोसीन व अल्जीरियातील प्लाइस्टोसीन खडकांत सापडले आहेत. सध्या आफ्रिकेत आढळणार्‍या ट्रॅजिलॅफिनी गटातील प्राण्यांचे जीवाश्म ( प्लायोसीन ते प्लाइस्टोसीन ) उत्तर अमेरिका, यूरोप, उत्तर आफ्रिका व आशियात आढळले आहेत. गायी, म्हशी, गवे वगैरे बोव्हिनी कुलामधील सर्वाधिक उत्क्रांत प्राणी प्लायोसीन काळामध्ये अवतरले व प्लाइस्टोसीन काळामध्ये ते विपुल झाले. उत्तर भारतात गव्याचे सर्वांत जुने ( उत्तर प्लायोसीन ) जीवाश्म आढळले आहेत. गवे यूरोप व उत्तर आशियात प्लाइस्टोसीन काळामध्ये विपुल होते. गाय व बैल जगात सर्वत्र पसरले असून त्यांचे सर्वांत आधीचे जीवाश्म उत्तर भारतात शिवालिक संघातील खडकांत सापडले आहेत.

  शाकाहारी प्राण्यांच्या नोटोअंग्युलेटा या विलुप्त गटातील प्राण्यांचे जीवाश्म फक्त उत्तर अमेरिकेत इओसीन ते प्लाइस्टोसीन काळांतील खडकांत सापडले आहेत.  

  मोठ्या आकारमानाच्या शाकाहारी प्राण्यांच्या सबअंग्युलेटा गणाचे एंब्रिथोपोडा, हायरॅकॉयडिया, सायरेनिया व प्रोबॉसिडिया हे उपगण ईजिप्त-मध्ये उत्तर इओसीनामध्ये अवतरले. एंब्रिथोपोडा उपगणातील आर्सिनो-थेरायडी कुलातील आर्सिनोथेरियम या एकमेव प्रजातीचे ऑलिगोसीन काळातील जीवाश्म ईजिप्तमध्ये आढळले आहेत. हायरॅसिडी कुलातील कृंतकासारख्या प्राण्यांचे जीवाश्म आढळले नाहीत. हे प्राणी दक्षिण व पूर्व आफ्रिका, सिरिया व अरबस्तान येथे आहेत. मायोहायरॅसिडी कुलाचे अपूर्ण जीवाश्म नैर्ऋत्य व पूर्व आफ्रिकेतील मायोसीन खडकांत, तर सॅगाथेरायडी कुलाचे जीवाश्म ईजिप्तमध्ये ऑलिगोसीन व प्लायोसीन खडकांत मिळाले आहेत.

सायरेनिया उपगणातील ( समुद्र-गाय ) प्राण्यांचे इओसीन काळापासूनचे जीवाश्म ईजिप्त, इटली, फ्रान्स, इतर यूरोपीय देश, दक्षिण अमेरिका, जपान इ. विविध प्रदेशांत आढळले असून सध्या हे प्राणी आफ्रिका, भारत तसेच मध्य व दक्षिण अमेरिका यांच्या किनार्‍यांवर आढळतात.

  प्रोबॉसिडिया या हत्तीच्या उपगणातील मोइरिथेरायडी कुल ईजिप्त-मध्ये उत्तर इओसीन काळात अवतरून ऑलिगोसीन काळाच्या शेवटी विलुप्त झाले. बेरूथेरायडी कुलाचे उत्तर इओसीन काळातील जीवाश्म ईजिप्तमध्ये सापडले. डायनोथेरायडी कुलातील प्राण्यांचे मायोेसीन ते प्लाइस्टोसीन काळातील जीवाश्म आफ्रिकेत, तर मायोसीन ते प्लायोसीन काळातील जीवाश्म यूरोप व आशियात सापडले. भारतात शिवालिक टेकड्यांमध्ये डायनोथेरियम प्रजातीचे पूर्व प्लायोसीन कालीन जीवाश्म आढळले आहेत. 

  एलिफंटिडी कुलातील पॅलीओमॅस्टोडॉन प्रजातीचे जीवाश्म ईजिप्त-मध्ये प्लायोसीन खडकांत आढळले आहेत. तर टेट्राबेलोडॉन प्रजातीचे मायोसीन व प्लायोसीन काळांतील जीवाश्म उत्तर अमेरिका, यूरोप व पाकिस्तानात तसेच भारतात सौराष्ट्राच्या दक्षिणेचे पिराम बेट व शिवालिक टेकड्या येथे सापडले आहेत. मॅस्टोडॉन प्रजातीचे प्लायोसीन काळातील जीवाश्म यूरोप, दक्षिण व उत्तर अमेरिका, पर्शिया, पाकिस्तान व चीन येथे, प्लाइस्टोसीन काळातील जीवाश्म उत्तर अमेरिकेत आणि प्लायोसीन काळातील जीवाश्म भारतात पिराम बेट व शिवालिक टेकड्यांत सापडले आहेत.

  मॅस्टोडॉनएलिफस ( खरे हत्ती ) यांच्यातील संक्रमणी गट असलेल्या स्टेगोडॉन प्रजातीचे जीवाश्म भारतातील शिवालिक टेकड्या व जम्मू येथील मध्य व उत्तर प्लायोसीन काळांतील खडकांत आणि नर्मदा व गंगा खोर्‍यांतील प्लाइस्टोसीन काळातील गाळात सापडले आहेत. तसेच याचे मध्य व उत्तर प्लायोसीन काळांतील जीवाश्म दक्षिण व पूर्व आशिया आणि जावा येथे आढळले आहेत. एलिफस प्रजाती भारतात अवतरली व तिचे जीवाश्म भारतात शिवालिक टेकड्यांतील प्लायोसीन काळातील खडकांत, नर्मदेच्या प्लाइस्टोसीन काळातील गाळात आणि जम्मूतील कारेवा खडकांत आढळले आहेत. तसेच एलिफस प्रजातीच्या प्राण्यांचे प्लायोसीन व प्लाइस्टोसीन काळांतील जीवाश्म यूरोप, उत्तर आफ्रिका, दोन्ही अमेरिका आणि आशिया येथे आढळले आहेत. हल्ली हे प्राणी भारत, ब्रह्मदेश, आफ्रिका व आग्नेय आशिया येथे आहेत. एलिफस प्रायमिजिनियस म्हणजे मॅमथ या विलुप्त प्राण्याचा प्रसार कमाल झाला होता. त्याचा प्रसार फिनलंड, स्कँडिनेव्हिया सोडून सर्व यूरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका, कॅस्पियन समुद्र, बैकल सरोवरापर्यंतचा आशिया, चीन, जपान इ. भागांत विस्तृतपणे झाला होता.


 माणूस, कपी, माकड, लेमूर, वृक्ष-चिचुंदरी इ. नरवानर गणातील प्राणी आहेत. मंगोलियातील क्रिटेशस खडकांत आढळलेल्या ट्युपाइऑइडिया कुलामधील ॲनॅगेले आणि यूरोप व उत्तर अमेरिकेत आढळलेला पॅलिओसीन काळातील प्लेसिॲडेपिस हे नरवानर गणाचे अगदी आदिम गट आहेत. तसेच फ्रान्समध्ये इओसीन काळातील नेकोमूर आणि याच काळातील उत्तर अमेरिकेतील टेटोनियस  या प्रजातीचे जीवाश्म सापडले आहेत. 

नरवानर गणाचे प्रोसिमिआय व अँथ्रॉपॉइडिया हे उपगण आहेत. प्रोसिमिआय उपगणातील ॲनॅगेले प्रजातीचे ऑलिगोसीन काळातील जीवाश्म मंगोलियात सापडले आहेत. लेमुरॉइडिया या छोट्या गटातील प्राणी कोल्ह्यासारखे दिसतात आणि फक्त मॅलॅगॅसी व कोमोरो बेटांवर आढळतात. प्लेसिॲडेपिस ( पॅलिओसीन ) आणि ॲडेपिस व नेक्रोलेमूर ( इओसीन ) हे सर्वांत आधीचे लेमुरॉइड असून मेगॅलॅडेपिस, इंड्रिस, डॉबेटोमिया किंवा केरोमिस या लॅमुरॉइडियांचे प्लाइस्टोसीन काळातील जीवाश्म मॅलॅगॅसी बेटावर आढळले आहेत. लोरिसिडी कुलातील प्रोगॅलॅगो प्रजातीतील प्राण्यांचे मायोसीन काळातील जीवाश्म पूर्व आफ्रिकेत आणि इंद्रालोरिस प्रजातीचे प्लायोसीन ( मध्य शिवालिक ) कालीन जीवाश्म हिमाचल प्रदेशात आढळले आहेत. टार्सिडी कुलाचे थोडेच जीवाश्म उत्तर अमेरिका, चीन व यूरोप येथील इओसीन व ऑलिगोसीन काळांतील खडकांत सापडले आहेत.

  अँथ्रॉपॉइडिया उपगणाच्या सेबिडी कुलातील माकडांचे इओसीन काळापासूनचे जीवाश्म आढळतात. हे कुल आणि सर्वांत लहान माकडांचे कॅलिथ्रिसिडी ही दोन कुले ऑलिगोसीन काळात स्वतंत्र झाली. सर्को-पिथेसिडी कुलातील कॅटॅर्‍हिनी माकडांचे जीवाश्म पूर्व गोलार्धात आढळले आहेत. सर्कोपिथेसिडी कुलात अधोनासिका ( आफ्रिका ), बंदर, पवित्र ( हनुमान ), वानर ( भारत व श्रीलंका ), बसक्या नाकाची ( तिबेट ), मॅकाकस ( आग्नेय आशिया, सेलेबिस, जपान ), प्रेसबिटिस ( मलेशिया, ईस्ट इंडीज ) आणि नासावानर ( बोर्निओ ) ही माकडे येतात. भारतात उत्तर शिवालिक ( उत्तर प्लायोसीन ) खडकांत व आसाममधील पूर्व अभिनव कालीन गाळात मॅकाकाचे जीवाश्म सापडले आहेत. शिवालिक व सिमला टेकड्या, कर्नुल गुहा येथील प्लाइस्टोसीन काळातील निक्षेपांत पवित्र माकडे व पॅपिओ माकडे यांचे अवशेष सापडले आहेत.

  होमिनॉयडिया अधिकुलातील पाँजिडी कुलात प्रॉप्लिओपिथेकस, शिवपिथेकस, पोंगो ( ओरँगउटान ), जायगँटोपिथेकस, प्रोकॉन्सूल, ड्रायो-पिथेकस, अँथ्रॉपोपिथेकस ( चिंपँझी ), गोरिला हे प्राणी येतात. भारतीय प्रदेश प्लाइस्टोसीन काळात या मानवसदृश प्राण्यांच्या विकासाचे क्षेत्र होते. येथे शिवपिथेकस, ड्रायोपिथेकस, ब्रह्मपिथेकस, रामपिथेकस इ. जीवाश्म आढळतात. बहुधा रामपिथेकसपासून होमिनिडी कुल निर्माण झाले असावे. पाँजिडी कुलाचा जलदपणे विकास व प्रसार मायोसीन ते प्लाइस्टोसीन काळात झाला. त्यांचे सध्याचे वंशज म्हणजे गिबन ( आसाम, पश्चिम युनान, ब्रह्मदेश, मलेशिया ते बोर्निओ ), ओरँगउटान ( सुमात्रा, बोर्निओ ), चिंपँझी ( आफ्रिका ) व गोरिला ( आफ्रिका ) हे प्राणी होत. होमिनिडी कुलातील अधिक प्रगत प्राण्यांचे जीवाश्म फक्त प्लाइस्टोसीन काळातच आढळतात. प्लाइस्टोसीन काळात साचलेल्या आंतरहिमानीय निक्षेपांत आधुनिक मानवाचे ( होमो सेपिएन्स ) जीवाश्म ( दात, कवट्या, हाडे ) सापडतात. १९२० च्या सुमारास मानवाचे बरेच जीवाश्म सापडले असून त्यांच्यावरून प्रस्थापित केलेल्या प्रमुख जाती व प्रजातींची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे. पूर्व प्लायोसीन काळातील झिंजांथ्रोपस जीवाश्म, प्लेसिअँथ्रोपस, पॅरँथ्रोपसटेलँथ्रोपस, होमो हॅबिलिस हे ऑस्ट्रॅलोपिथेकस गटातील प्राणी आहेत. सायनँथ्रोपस पीकिनेन्सिस ( पीकिंग मानव ), पिथेकँथ्रोपस इरेक्टस ( जावा मानव ), होमो निअँडरथलेन्सिस ( निअँडरथल मानव ), होमो सोलोएन्सिस ( जावा ) यांचा समावेश पिथेकँथ्रोपस गटात करतात. होमो निअँडरथलेन्सिस, ॲटलँथ्रोपस ( मध्य प्लाइस्टोसीन ), होमो स्टाइनहाइ-मेन्सिस, होमो हायडेल्बर्गेन्सिस हे निअँडरथलॉइड गटातील प्राणी होत. यांव्यतिरिक्त होमो र्‍होडेसिएन्सिसहोमो सेपिएन्स तुल्य गट अँथ्रॉपॉइडिया उपगणात येतात. 

होमो सेपिएन्स म्हणजे प्रगल्भ किंवा बुद्धिप्रधान मानवाचा विचार करताना ग्रिमाल्डी ( वायव्य इटली ) मानव, क्रोमॅग्नॉन मानव (दक्षिण फ्रान्स), खरा क्रोमॅग्नॉन मानव आणि क्रोमॅग्नॉन परिवर्त चान्सडेल ( दक्षिण फ्रान्स ) या अवशेषांचा विचार करतात. इओअँथ्रोपस डाउसोनी म्हणजे पिल्टडाऊन मानव हे कुतूहलजनक अवशेष इंग्लंडमधील ससेक्स परगण्यातील पिल्टडाऊन येथे नदीच्या वाळूत अलग अलग आढळले होते. त्यांच्या आधारावर बनविण्यात आलेल्या या जातीचे कोडे सुटण्यासाठी आणखी काही सामग्री उपलब्ध होणे गरजेचे आहे.

  अशा तर्‍हेने उपलब्ध पुरावा अपूर्ण व विस्कळीत स्वरूपाचा आहे असे असले, तरी आधुनिक मानवापर्यंतच्या प्रमुख टप्प्यांची संभाव्य मालिका पुढीलप्रमाणे दर्शवितात : झिंजांथ्रोपस-पिथेकँथ्रोपस-ॲटलँथ्रोपस–होमो स्टाइनहाइमेन्सिस-होमो सेपिएन्स तुल्य.

  भारतातील स्तनी वर्ग व त्याच्याशी निगडित असलेल्या प्राण्यांच्या जीवाश्मांविषयी अनेक तज्ञांनी अध्ययन व संशोधन केले आहे. यांपैकी काही महत्त्वाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाची माहिती पुढे थोडक्यात दिली आहे. एच्. फॉक्नर व पी. टी. कॉट्ली यांनी शिवालिक टेकड्यांमधील पृष्ठवंशी प्राण्यांच्या जीवाश्मांविषयी लिहिलेले फॉना अँटिक्वा शिवालेन्सिस (१८४५) हे मोलाचे पुस्तक आहे. इतर काही संशोधक व त्यांचे संशोधनाचे विषय असे आहेत. जी. ई. पिलग्रिन : सस्तन प्राण्यांचे जीवाश्म (१९११—३४) एफ्. आर्. कौपर-रीड : हिमालयातील व काश्मीरमधील जीवाश्म (१९०८—३४) व सी. डीनर : हिमालयातील जीवाश्म (१८९५—१९०९) हे संशोधन भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या मेम्वार्स ( संस्मरणिका ) रूपात पॅलिआँटालॉजिया इंडिका या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. इतरत्र प्रसिद्ध झालेले संबंधित संशोधन पुढीलप्रमाणे आहे. ई. एच्. कोलबर्ट, डब्ल्यू. के. ग्रेगोरी, एम्. हेल्मन व जी. के. ल्यूइस : शिवालिक प्राणिजात. भारतीय विद्यापीठात झालेल्या काही संशोधनाची माहिती पुढे दिली आहे. डी. के. चक्रवर्ती : प्रोबॉसिडिया एम्. आर्. सहानी आणि आय्. खान : शिवालिक शैलसमूहातील पृष्ठवंशी जीवाश्म.

ठाकूर, अ. ना.   

पहा : अंग्युलेटा अपरापोषिका कॉर्डेटा क्रमविकास गर्भावधि तृतीय कल्प नरवानर गण नवजीव पुराप्राणिविज्ञान पृष्ठवंशी प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग भ्रूणविज्ञान मानव प्राणि मेंदू मोनोट्रिमॅटा शिवालिक संघ शिशुधान प्राणि.

 संदर्भ : 1. Bhamrach, H. S. Juneja, Kavita, A Textbook of Chordates, 2000. 

            2. Colbert, E. H. Evolution of Vertebrates, 1990. 

            3. Macdonald, D. The Encyclopedia of Mammals, 1984. 

            4. McKenna, M. C. Bell, S. K. Classification of Mammals above the Species Level, 1997. 

            5. Nowak, R. M. Walker’s Mammals of the World,1999. 

            6. Savage, R. J. G. Long, M.R. Mammal Evolution : An Illustrated Guide, 1986. 

            7. Saxena, O. P. Modern Textbook of Mammalia,1980. 

            8. Szalay, F. S. Novacek, M. J. McKenna, M. C., Eds., Mammal Phylogeny, 1993. 

            9. Young, J. Z. The Life ofMammals, 1975.


 काही जलचर सस्तन प्राणी

ओरका (ऑर्‌सिनस ओरका) बोहेड व्हेल (बॅलिना मिस्टिसिटस)
डूगाँग (डूगाँग डूगाँग) ब्ल्यू व्हेल (बॅलिनॉप्टेरा मस्क्युलस)
नागेल मॅनॅटी (ट्रायकेकस मॅनॅटस लॅटिरोस्ट्रिस) पिलासह  बुल अटलांटिक वॉलरस (ओडोबेनस रोझमेरस रोझमेरस)

साकी (पिथेसिया पिथेसिया)

काही वृक्षवासी सस्तन प्राणी

ग्रेटर स्लो लोरिस (निक्टिसेबस कूकँग)

टार्सिअर (टार्सियस सिरिक्टा)
फिलिपीन फ्लाइंग लेमूर (सायनोसेफॅलस व्होलान्स)   फॅलँजर (फॅलँजर ओरिएंटॅलिस)
इंड्री (इंड्री इंड्री) रिंग-टेल्ड् लेमूर (लेमूर कट्टा) नार्दर्न नाइट मंकी (एओटस ट्रिव्हिर्‌गॅटस)

काही भूचर सस्तन प्राणी

जायंट अँटइटर (मर्मिकोफॅगा ट्रायडॅक्टिला) पँगोलिन (स्मटसिया टेम्मिंकिई)
आर्डव्हार्क (ऑरिक्टेरोपस एफर) आर्मडिलो (डॅसिपस नोव्हेम्‌सिंक्टस)
रुफस एलेफंट श्रू (ऱ्हिंकोसिऑन पेटर्सी) एकिड्‌ना (टॅकिग्लॉसस ॲक्युलिएटस)
ऑपॉस्सम (डायडेल्फिस व्हर्जिनिॲना) वाँबट (लॅसिओऱ्हिनस लॅटिफ्रॉन्स)

उडणारे व इतर काही सस्तन प्राणी

फ्रूट बॅट (सायनोप्टेरस ब्रॅकिओटिस) किटीस हॉग नोज्ड् बॅट (क्रॅसेऑनिक्टेरिस थाँगलोंजिएई)
नॉर्दर्न फ्लाइंग स्क्विरल (ग्लॉउकोमिस सॅब्रिनस) ग्रेटर फ्लाइंग फॉक्स (प्टेरोपस गिगँटिअस)
पिग्मी मार्मोसेट (सेब्युला पिग्मिया) वॉलबी (ऑनिकोगॅलिया फ्रिनॅटा)
ग्वानॅको (लामा ग्वानिकोई) पांढरा सिंह (पँथेरा लीओ लीओ)