रू, व्हिल्हेल्म: (९ जून १८५०–१५ सप्टेंबर १९२४). जर्मन प्राणिशास्त्रज्ञ ते प्रायोगिक भ्रूणविज्ञानाचे संस्थापक मानले जातात. फलनाच्या वेळी व विकासाच्या सुरूवातीच्या अवस्थेत अवयव आणि ऊतक (समान रचना व कार्य असलेले कोशिका–पेशी–समूह) यांची संरचना व कार्य त्यांच्याकडे कशी सोपविली जातात यांविषयी त्यांनी संशोधन केले. त्यांचा जन्म येना येथे व शिक्षण येना, बर्लिंन व स्टॅसबर्ग येथे झाले. ‘रक्ताच्या गतीस कारणीभूत असणाऱ्या, कारकांचे रक्तवाहिन्यांच्या विकासावर नियंत्रण असते’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पी.एच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर लाइपसिक येथील आरोग्य संस्थेत सहाय्यक म्हणून त्यांनी १८७९–८६ पर्यंत काम केले. नंतर ब्रेस्लौ येथे १८८६–८९ व हाल येथे १८९६–१९२१ पर्यंत ते शारीराचे (शरीररचनाशास्त्राचे ) प्राध्यापक होते.

इ. स. १८८० मध्ये त्यांनी बेडकाच्या अंड्यांवर अनेक प्रयोग केले व फलन झालेल्या अंड्याच्या समविभाजनामुळे विकास पावणाऱ्या जीवाचे भावी अवयव निश्चित केले जातात, असे अनुमान काढले. बेडकांच्या फलित अंड्याच्या पहिल्या दोन भागांपैकी एका भागाचा (ब्लास्टोमिअर) नाश केला व उरलेल्या भागापासून अर्धा भ्रूण मिळविण्यात त्यांना यश मिळाले. यांवरून असा निष्कर्ष काढला की, पहिल्या विभाजनाच्या वेळीच भावी अवयव व त्यांची कार्ये निश्चित केली जातात आणि अर्धा भ्रूण तयार होण्यास आवश्यक असणारे द्रव्य दोन्ही ब्लास्टोमिअरांना आधीच मिळालेले असते. त्यांचा हा सिध्दांत मान्यता पावला नाही कारण हान्स ड्रीश या जर्मन जीववैज्ञानिकांनी असे सिद्ध केले की, सागरी अर्चिनाच्या अंड्याच्या पहिल्या दोन्ही ब्लास्टोमिअरांपासून लहान पण पूर्ण विकसित भ्रूण मिळतात. Der Kempf der Theile im Organismus (१८८१) व Autoergographie (१९२३) हे ग्रंथ त्यांनी लिहिले, तसेच १८९४ मध्ये Archiv fur Entwicklungsmechanik der Organismen या प्रायोगिक भ्रूणविज्ञानाच्या पहिल्या नियतकालिकाची स्थापना केली व त्याचे ते बरीच वर्षे संपादक होते. ते हाल येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.