क्वाशिओरकोर : (प्रथिनन्यूनताजन्य रोग, अन्नाद-बालांतक). अर्भकांत आणि लहान मुलांमध्ये आहारात प्रथिने कमी वा निकस असल्यास हा रोग दिसतो. या रोगाचे नाव आफ्रिकेतील एका बोली भाषेवरून पडले कारण त्याचे वर्णन प्रथम तेथेच केले गेले. क्वाशी म्हणजे पहिले आणि ओरकोर म्हणजे दुसरे. दुसरे मूल जन्मण्याच्या सुमारास पहिल्या मुलाला होणारा रोग असा याचा मूळ अर्थ आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘लहान लाल मुलगा’ असा आहे. अविकसित, दरिद्री आणि उष्ण कटिबंधातील देशांत हा रोग फार मोठ्या प्रमाणात दिसतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार जगातील १० ते २७ कोटी मुलांत हा रोग असावा. भारतात हा रोग मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांत आढळतो. श्रीलंका व थायलंड या देशांतही तो दिसतो.

सहा महिन्यांपासून चार वर्षे वयाच्या मुलांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. फार दिवस अंगावर पिणाऱ्या अथवा नुकतेच अंगावरून तोडलेल्या मुलात या रोगाचे प्रमाण अधिक असते. क्वचित प्रौढांतही हा रोग होऊ शकतो.

आहारात निकस आणि कमी प्रमाणात प्रथिने असून कार्बोहायड्रेटांचे प्रमाण फार असेल, तर हा रोग प्रयोगशाळेतील प्राण्यांमध्येही होतो, असे सिद्ध झाले आहे.

विकृती  : यकृतातील मधुजनाचा (ग्‍लायकोजेनाचा) साठा वाढलेला असून यकृतकोशिकांचा (यकृतातील पेशींचा) वसापकर्ष (स्‍निग्‍ध पदार्थ साचणे) होतो. अग्‍निपिंड [उदराच्या वरच्या भागात असलेली पचनक्रियेत भाग घेणारी ग्रंथी, → अग्‍निपिंड], जठर, आंत्र (आतडे), लाला ग्रंथी, प्लीहा (पानथरी) आणि यौवनलोपी ग्रंथी [गळ्याच्या मध्य मागील बाजूस असलेली अंतःस्रावी ग्रंथी, थायमस, → यौवनलोपी ग्रंथि] या सर्व अंतस्त्यांत (इंद्रियांत) अपपुष्टी (पोषणाच्या अभावी रोडावणे) आढळते.

लक्षणे : मूल अंगावरून तोडल्यावर त्याची वाढ खुंटते, स्नायू कृश आणि शोफयुक्त (त्वचेच्या दोन पेशींच्यामध्ये द्रव साठल्यामुळे येणाऱ्या सुजेने युक्त) होतात, केसांचा रंग व घडण यांमध्ये फरक पडतो. पोट मोठे दिसते. अतिसार (हगवण), भूक मंदावणे  वगैरे लक्षणेही दिसतात. अ आणि ब जीवनसत्त्वे कमी पडल्याने तोंड येणे, त्वचा खरखरीत होणे अशी लक्षणे दिसून मूल उदासीन, चिडचिडे आणि रडके होते. ते एकाच जागी बसून राहते. डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही.

निदान : सर्व प्रकारांचे अन्न कमी पडल्यामुळे होणारा तीव्र अशक्तपणा आणि अपपुष्टी यांपासून व्यवच्छेदक (दोन सारखी लक्षणे दाखविणाऱ्या रोगांतील सूक्ष्म फरक ओळखून) निदान करणे आवश्यक आहे. त्या रोगात मूल अगदी कृश असते, तर क्वाशिओरकोर या रोगामध्ये त्वचेखाली वसा साठल्यामुळे आणि स्नायुशोफ असल्यामुळे मूल कृश दिसत नाही.

चिकित्सा : आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढविणे हा त्वरित गुण देणारा उपाय आहे. दूध, साय काढलेले दूध, ताजे ताक वा दुधाची भुकटी, मांसरस, अंडी वगैरे पदार्थ वारंवार थोड्या प्रमाणात दिले असता रोग-लक्षणे कमी होत जातात. अतितीव्र प्रकारांत नीलेच्या मार्गाने रक्तद्रव काही दिवस दिल्यास त्वरीत गुण येतो. पूर्वपाचित (प्रक्रिया करून पचनास सोपी केलेली ) प्रथिने आणि जीवनसत्वेही भरपूर प्रमाणात द्यावी लागतात.

आपटे, ना. रा.