मायकोबॅक्टिरिएसी : पूर्वीच्या सूक्ष्मजंतू वर्गीकरणाप्रमाणे ⇨ ॲक्टिनोमायसीटेलीझ या गणातील व नवीन सूक्ष्मजंतू वर्गीकरणाच्या भाग क्र. १७, ‘ॲक्टिनोमायसीटेलीझ व संबंधित सूक्ष्मजंतू’ मधील एक कुल. या कुलातील सूक्ष्मजंतू अचल, ग्रॅम-रंजकव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग टिकून राहतो असे), अम्‍ल-स्थायी (काही ठराविक पदधतीने सूक्ष्मजंतूवर केलेली रंजकक्रिया तीव्र अम्‍लानेही नाहीशी होत नाही असे) असून बीजाणुनिर्मिती (सूक्ष्म प्रजोत्पादक घटकांची निर्मिती ) करीत नाहीत. त्यांचा आकार सरळ शलाका किंवा तंतुशलाका, अल्पवक्र आणि क्वचित शाखायुक्त व अनियमित असतो. संवर्धकावरील (वाढीस पोषक असलेल्या खास माध्यामावरील) त्यांची वाढ ऑक्सिजीवी (जगण्यासाठी मुक्त ऑक्सिजनाची आवश्यकता असलेली) व मंद गतीने होते. या सूक्ष्मजंतूंवरील लिपॉइड (स्‍निग्ध पदार्थासारख्या द्रव्याच्या) आवरणात मायकॉलिक अम्‍ल व वसाप्रथिने [→ प्रथिने] यांचे जटिल संयुग असते. त्यामुळे त्यावरील ॲनिलीन रंजकक्रियेनंतर अकार्बनी अम्‍लाची प्रक्रिया करूनही कोशिकेवरील (पेशीवरील) रंजक स्थायी (स्थिर) राहतो. ५% व १०% सल्फ्यूरिक अम्‍लास स्थायी असलेल्या सूक्ष्मजंतूंचे अनुक्रमे सौम्य अम्‍ल-स्थायी व तीव्र अम्‍ल-स्थायी असे सुद्धा ढोबळ वर्गिकरण केले जाते. या कुलात मृदेत आढळणाऱ्या मृतोपजीवी (मृत जैव पदार्थांवर उपजीविका करणाऱ्या) सूक्ष्मजंतूंबरोबरच क्षय व कुष्ठरोग यांसारखे मानवाला होणारे रोग, तसेच इतर प्राण्यांचे रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा समावेश होतो. मायकोबॅक्टिरियम ही एकच प्रजाती या कुलात असून यातील सूक्ष्मजंतूंमुळे उद्‌भवणाऱ्या काही मानवी रोगांची माहिती कोष्ठकात दिली आहे.

मायकोबॅक्टिरियम प्रजातीतील सूक्ष्मजंतूंमुळे उद्‌भवणारे काही मानवी रोग

रोगाचे नाव

सूक्ष्मजंतूचे नाव

रोगाचे लक्षण व उद्‌गम

क्षयरोग

मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस

फुफ्फुस आणि इतर संलग्न कोशिकांचा नाश, खोकला व अशक्तपणा. उद्‌गम-मानव.

कुष्ठरोग

मा. लेप्री

त्वचा, तंत्रिका (मज्‍जातंतू), चेहऱ्याची हाडे व मानवी शरीराच्या इतर भागांवर चट्टे व संवेदना-नाश. उद्‌गम-मानव, ⇨ आर्मडिलो प्राणी.

पोहण्याच्या तलावातील पाण्यामुळे होणारे कणार्बुद

मा. मेरिनम

खंडित त्वचेच्या भागावर व्रण आढळतो. उद्‌गम-पोहण्याच्या तलावातील कोमट पाणी.

उष्ण कटिबंधीय व्रण

मा. अल्सेरान्स

त्वचा व तिच्या खालील भागात व्रण. उद्‌गम-अज्ञात.

हवाना रोग

मा. सीमिए

फुफ्फुस कोशिकांचा नाश. उद्‌गम-माकडे व पाणी.

फॉर्ट्युइटम रोग

मा. फॉटर्युइटम

मा. चेलोनेई

बसविलेले कृत्रिम भाग (दात, पाय वगैरे) वा जखमा यांचे संदूषण, क्वचित फुफ्फुसाच्या वा इतर रोगांत आढळतो. उद्‌गाम-सर्वत्र.

बॅटी रोग

मा. इंट्रासेल्यूलेर

मा. एव्हियम

क्षयरोगाप्रमाणे. उद्‌गम-पाणी, माती व धूळ यांत सर्वत्र.

*अगदी क्वचित मा.बोव्हीस या जंतूमुळेही क्षयरोग होतो. कणार्बुद म्हणजे ज्याच्यामुळे व्रण तयार होतो अशा संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकातील (कोशिकासमूहातील) नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणारी गाठ. व्रण म्हणजे त्वचेच्या पृष्ठभागावरील द्रव निघून जाऊन तेथील ऊतकाचे विघटन व मृत्यू होतो.

या सर्व सूक्ष्मजंतूंमध्ये क्षयरोगाचे (मा. ट्युबरक्युलॉसिस) आणि कुष्ठरोगाचे (मा. लेप्री) जंतू महत्त्वाचे आहेत.

मायकोबॅक्टिरियम या प्रजातीत एकूण २९ जाती आहेत. यांतील बहुतेक जाती प्राण्यात व मानवात रोग निर्माण करतात. मा. पॅराफिनिकमसारख्या जाती हायड्रोकार्बनांचे अपघटन करतात (रेणूंचे लहान तुकडे करतात). अशा सूक्ष्मजंतूंचा नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) व खनिज तेल यांच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी प्रगत देशांत उपयोग करण्यात आलेला आहे. अलीकडे समुद्रातील तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांमुळे समुद्राच्या पाण्यावर पसरणाऱ्या तेलाच्या तवंगामुळे होणारे प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणावर उपाय म्हणून हायड्रोकार्बनांचे अपघटन करणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा उपयोग करण्यात येत आहे.

पहा : ॲक्टिनोमायसीटेलीझ कुष्ठरोग क्षयरोग.

संदर्भ : 1. Buchanan, R. E. Gibbons, N. E. Ed, Bergey’s Manual of Determinative Bacteriology, Baltimore, 1974.

           2. Davis, J. B. Petroleum Microbiology, 1967.

           3. Day, N. C. Medical Microbiology, 1962.

कुलकर्णी, नी. वा. आगटे, अ. दा.