सोनार, नरहरि : ( ?१२६७ – ?१३१३). मराठी संतकवी. त्यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ. देवगिरीस त्यांचा सराफीचा व्यवसाय होता. नरहरी हे मात्र पंढरपुरात येऊन राहिले. कट्टर शिवभक्त असल्यामुळे ते पंढरपुरात राहूनही पांडुरंगाचे दर्शन घेत नसत तथापि पुढे शिव-विष्णू ऐक्याचा प्रत्यय त्यांना आल्यामुळे, ‘शिव आणि विष्णु एकचि प्रतिमा ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित’ अशी त्यांची वृत्ती झाली ते विठ्ठलभक्त झाले. गैबीनाथ किंवा गहिनी हे नरहरी सोनारांचे गुरू होत, असे काही अभ्यासकांनी सुचविले आहे तथापि ह्याबद्दल मतभेद आहेत.

नरहरी सोनारांच्या नावावर सकलसंतगाथेत ३४ अभंग आहेत तथापि त्यांतले ८-१० अभंगच त्यांचे असावेत अन्य अभंगांपैकी काही कवी नरहरिदास (रामदासी कवी) आणि काही नरहरी धुंडीराज मालो (मालू) ह्या उत्तरकालीन कवींचे असल्याचे दिसते.

‘देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार’ हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. सुवर्णकाराच्या आपल्या व्यवसायावर एक सुंदर आध्यात्मिक रूपक त्यांनी ह्या अभंगात रचले आहे. त्यांचे काही अभंग त्यांच्या उन्मनी अवस्थेतील अनुभव सांगणारे आहेत.

नरहरी सोनारांची समाधी पंढरपूर येथे आहे.

कुलकर्णी, अ. र.