लघुनिबंध : लघुनिबंध मराठीमध्ये १९२७ च्या आसपास जन्माला आला.  तो जन्माला यायला १९२७ पूर्वीची मराठीची वाङमयीन पार्श्वभूमी जशी कारणीभूत आहे त्याचप्रमाणे त्याला नीटस आकार यावयाला इंग्रजीतील ‘पर्सनल एसे’ हाही कारणीभूत आहे.

मराठी साहित्यातील लघुनिबंधपूर्व तत्सदृश लेखनाकडे पाहात असताना असे दिसून येते, की शि.म. परांजपे यांचे काळातील काही लेख, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे विनोदी लेख, न. चिं. केळकर यांचे निबंध यांनी लघुनिबंधमाला अनुकूल वातावरण तयार केले. तसेच या काळात अनेक नियतकालिकांतून अनेक प्रकारचे ज्ञान, माहिती ही ललित पद्धतीने, ललित भाषेत लेख लिहून सांगितली जात होती.  जीवनातील सामान्य, क्षुद्र विषयांवर चुरचुरीत लेख लिहून वाचकांचे मनोरंजन केले जात होते.  अशा प्रकारच्या लेखनाला या काळात ‘पानपूरके’ म्हणूनच केवळ स्थान होते.  त्याला विशेष असे ‘प्रकारनाम’ नव्हते.  शिवाय या काळात काही इंग्रजी लघुनिबंधांची भाषांतरे होऊन तीही पानपूरकासारखी प्रसिद्ध झालेली आहेत.  अशा रीतीने या जवळच्या पूर्वकाळात लघुनिबंधाची जातकुळी सांगणारे स्फुटलेखन प्राकारिक नाव न घेता विपुल प्रमाणात जन्माला येत होते.

या वाङमयीन वातावरणाचा व अनुषंगाने इतर काही वाङमयबाह्य परिस्थितीचा परिणाम लघुनिबंधाचा जन्म होण्यात झाला. लघुनिबंधात ‘मीत्वा’ चा आविष्कार असतो. एखाद्या चिंतनाच्या, भावावस्थेच्या, वस्तूच्या, समानतेच्या सूत्रानुषंगाने ‘मी’ चा अनुभव अगर अनुभवगुच्छ लघुनिबंधात व्यक्त होत असतो.  या ‘मी’  च्या अनुभवाचे महत्व पटून १९२७ मध्ये वि.स. खांडेकर प्रथम वैनतेय ह्या नियतकालिकातून ‘लघुलेख’ या प्रकारनामाने लेखन करू लागले. १९२६ ते १९३१ पर्यंत ना.सी. फ़डके कंसात ‘निंबधात्मक’ असे म्हणून ‘गुजगोष्टी’ या नावाखाली साधेसुधे विषय घेऊन केळकरी वळणाचा निबंधच आपल्या (आरंभीच्या केळकरी भाषेचीच छाप असलेल्या) भाषाशैलीत लिहिताना दिसतात.  प्राथमिक स्वरूपातही ज्याला लघुनिबंध म्हणता येईल, अशा प्रकारचे हे लेखन नव्हते. शिवाय अशा प्रकारचे लेखन पूर्वी अनेकांनी केलेलेही आहे. १९३१ मध्ये आणि त्यानंतर मात्र फडके यांनी इंग्रजी ‘पर्सनल एसे’ चे अनुकरण करून मराठीमध्ये लघुनिबंध आणला व तो लोकप्रिय केला. त्यामुळे मराठी लघुनिबंधाचे जनक म्हणून वि.स. खांडेकर व प्रवर्तक म्हणून ना.सी. फडके यांना मान्यता द्यावी लागते.

खांडेकरांच्या लघुनिबंधाची जातकुळी मराठी वाटते. मराठी साहित्यपरंपरेत तो जन्माला आला आणि इंग्रजी ‘पर्सनल एसे ’ च्या आधारे तो वाढला.  त्यांच्या लघुनिबंधातून व्यक्त होणारे मन आणि व्यक्तित्व हे मराठीतील हरिभाऊ आपटे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शि.म. परांजपे, राम गणेश गडकरी यांची परंपरा सांगणारे वाटते. खांडेकरांच्या लघुनिबंधांची त्या काळातील भाषा काहीशी कृत्रिम, अलंकरणाचा सोस असणारी असली, तरीही तिला वरील परंपरेचाच वारसा आहे. लघुनिबंधकार खांडेकरांच्या ‘मीत्वा’ वरील संस्कारही अव्वल दर्जांच्या मराठी मनाचे, मराठी संस्कृतीचे वाटतात. चिंतनाला प्राधान्य देऊन त्यांनी बहुसंख्या अनुभव व्यक्त केले आहेत.

ना.सी. फडके यांचे लघुनिबंध आस्वादशील वृत्तीने प्रेरित झाले आहेत. एरव्ही जीवनात सामान्य आणि क्षुद्र वाटणाऱ्या घटना-वस्तूंना त्यांनी लघुनिबंधात विषयाची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या घटनावस्तूंबद्दलचे आपले अनुभव ते रसिक वृत्तीने व्यक्त करतात. लघुनिबंधाच्या इंग्रजीतील तंत्राचा जाणीवपूर्वक वापर मराठीत त्यांनी केला आहे.  मित्रांशी मारलेल्या गप्पांसारखे त्यांच्या लघुनिबंधाचे स्वरूप आहे. भाषाशैली प्रसन्न राहण्याविषयी त्यामुळे ते सतत दक्षता घेतात.  त्यांनी लघुनिबंधाला लोकप्रियता प्राप्त करून दिली. घटनावस्तूंविषयीचे ‘मी’ चे अनुभव व्यक्तिविशिष्ट रसिकतेने व्यक्त करणे ही त्यांच्या लघुनिबंधाची प्रेरणा दिसते.  अनंत काणेकरांच्या लघुनिबंधांचा मध्यवर्ती विषय आपल्याभोवतीचा समाज, आधुनिक मानवी जीवन, मानवी स्वभाव यांविषयी विचार व्यक्त करणे हा असतो. विनोदी आणि चटकदार उदाहरणे देऊन विचारविषय मनोरंजक करण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे.  एखादा विचार मनाशी पक्का करून तो चटकदार उदाहरणांनी मांडणे ही त्यांची लघुनिबंधविषयक कल्पना त्यांच्या बहुसंख्य लघुनिबंधांत दिसते. या त्यांच्या वृत्तीला फारच थोडे लघुनिबंध अपवादभूत आहेत.


या तिघांचेही लघुनिबंध आपापल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. खांडेकरांचे लघुनिबंध संख्येने अधिक व विविध स्वरूपाचे आहेत. व्यापक अनुभव व चिंतन यांचा तोल साधणारे, समृद्ध व विकसनशील असे त्यांचे स्वरूप आहे. फडके यांनी मराठी लघुनिबंधमाला तंत्र, लोकप्रियता. आस्वादशील वृत्ती दिली, तर अनंतक काणेकरांनी विचार चटकदारपणाने मांडण्याची हातोटी दिली.  या तिघांनी जो विषयांचा आवाका निर्माण केला तोच पुढे १९४५ पर्यंत स्थिर राहिला.  या तिघांच्या छायेत राहूनच अनेक लघुनिबंधकारांनी १९३४ ते १९४९ पर्यंत व तेथूनही पुढे आणखी काही लेखकांनी काही काळ लेखन केलेले दिसते.

असे असले, तरी या काळात गं.भा. निरंतर, कुसुमावती देशपांडे, ना.मा. संत यांचे अपवाद मानावे लागतात.

यांतील गं.भा. निरंतर हे पहिले प्रयोगशील लघुनिबंधकार.  रूढ लघुनिबंधाची चौकट मोडण्याचा त्यांनी प्रथम प्रयत्न केला. विषयाची हाताळणी गप्पांच्या सुरात न करता गंभीरपणे, अंतर्मुख वृत्तीने त्यांनी प्रथम केली.  प्रदर्शनीय ‘मी’  ला नाकारून ‘मी’  च्या व्यक्तित्वाचे मन:पूर्वक दर्शन घडविले. कथेची, शब्दचित्राची, चिंतनशीलतेची भिन्नभिन्न भावावस्थांची वेगळी परिमाणे आणि वैशिष्ट्ये लघुनिबंधमाला मिळवून देण्याचा त्यांनी प्रथमच प्रयत्न केला.  साखरझोप (१९३८) व नवी साखरझोप (१९४८) असे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.

कुसुमावती देशपांडे यांनी आपल्या उण्यापुऱ्या तीनचार लघुनिबंधांनी लघुनिबंधाचे एक सतेज रूप दाखवून दिले. निसर्गाच्या रेखाटनातूनच ‘मी’ चा भावगर्भ सूचक आविष्कार, अल्पाक्षरत्व, प्रतिमायुक्त संयमी भाषा, एका वेगळ्या भावात्म पातळीवर स्पंदणारे चिंतन, अनुभवातील गंभीरपणा व भोगलेपणा त्यांच्या लघुनिबंधातून मराठी लघुनिबंधात प्रथमच अवतरला.या दोघांनी लघुनिबंधाला वेगळी दिशा लावण्याचा प्रयत्न केला, तर ना.मा. संत यांनी आपल्या कुवतीनुसार फडकेपद्धतीच्या लघुनिबंधाचे निखळ रूप शोधले आणि फडके पद्धतीच्या लघुनिबंधाला त्याच्या जन्मापासूनच्या तंत्रनिष्ठेच्या आणि वाटकनिष्ठेच्या ज्या मऱ्यादा पडल्या होत्या, त्यांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. उघडे लिफाफे (१९४४) हा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे.

या काळातील वि.पां. दांडेकर, वि.ल. बरवे, रघुवीर सामंत यांचे लघुनिबंधही विशेष दर्जाचे नसले, तरी उल्लेखनीय आहेत.  वि.पां. दांडेकर यांचे फेरफटका (१९३६), टेकडीवरून (१९३७), एक पाऊल पुढे (१९४१), काळ खेळतो आहे (१९४८), पंचवीस वर्षांनंतर (१९४९) हे लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.  वि.ल. बरवे यांचा पिसारा हा लघुनिबंधसंग्रह १९३७ साली प्रसिद्ध झालेला असला, तरी ते १९२८ पासून लघुनिबंधलेखन करीत आहेत.  रघुवीर सामंत यांची पणत्या (१९३९), तारांगण (१९४०), रज:कण (१९४१), दिलजमाई (१९५९) अशी चार पुस्तके प्रसिद्ध असून त्यांत लघुनिबंधाबरोबरच इतर साहित्यप्रकारांतील लेखनेही प्रसिद्ध केलेली आहेत.  या लघुनिबंधकारांचे मोजके अपवाद सोडता, या काळातील बहुतेक लघुनिबंध सामान्य दर्जाचे आणि संख्यने विपुल आहेत.  त्यामुळे या काळात लघुनिबंधाला जी लोकप्रियता मिळाली होती, ती गमवायलाही हा विस्तारवादी लघुनिबंधच कारणीभूत झाला आहे.  सामान्य विस्तारवादी लघुनिबंधकारांनी लघुनिबंध उथळ करून टाकला, लघुनिबंधाची संकल्पना सामान्य पातळीवर नेऊन ठेवली. विचार गंभीरपमे केला तर तो निबंध होईल आणि अनुभवांना विशेष स्थान दिले तर विचार नीट सांगता येणार नाहीत, या शृंगापत्तीत सापडल्यामुळे त्यांचे विचार आणि अनुभव सामान्य पातळीवरच राहिले. विषयांची पुनरावृत्ती होत राहिली. त्यामुळे १९४५-४६ पर्यंत तो विस्तारवादी पातळीवरच, अपवाद वगळता रेंगाळत राहिला.

इरावती कर्वे यांचा परिपूर्ती हा लघुनिबंधसंग्रह १९४९ मध्ये प्रसिद्ध झाला आणि वरील प्रकारच्या लघुनिबंधाला नवे वळण स्पष्टपणे मिळाल्याचे त्या संग्रहाने दाखवून दिले.  १९४५ च्या आसपासच याची चाहूल येत होती.  नवा लघुनिबंध घडविणाऱ्या ⇨ दुर्गा भागवत, गो.वि. करंदीकर ह्यांनी १९५० त्या आगेमागेच लघुनिबंधलेखनाला प्रारंभ केला.  असे जरी असले, तरी १९५० नंतरही जुन्या वळणाने लिहिणारे अनेक लघुनिबंधकार आहेत. या जुन्या वळणाने लिहिणाऱ्या लघुनिबंधकारांमध्येही म.ना. अदवंत, भगवंत देशमुख, श्रीपाद जोशी, सरोजिनी बाबर ही नावे उल्लेखनीय आहेत.

गो.रा. दोडके हे लघुनिबंधकार संधिकाळात (म्हणजे १९४५ च्या आसपासच्या काळात) लेखन करणारे एक उल्लेखनीय लेखक होत. या काळात त्यांनी पूल बांधण्याचे कार्य केले.  जुने नकोसे वाटते आहे, पण नवे काय हवे आहे ते नीटसे दिसत नाही किंवा आत्मसात करता येत नाही, अशा अवस्थेत त्यांनी लघुनिबंधलेखन केलेले दिसते.  त्यामुळे ते संधिप्रदेशातच स्थिर झालेले आहेत. माहेरवाशिण (१९५३) हा त्यांचा लघुनिबंधसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.


जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि नवे यशस्वीपणे आत्मसात करणे असे दुहेरी यश इरावतीबाई कर्वे यांच्या परिपूर्तीला आणि नंतरच्या त्यांच्या लघुनिबंधांना प्राप्त झाले आहे. जुन्या लघुनिबंधाचे मौलिक रूप (म्हणजे ‘मी’ च्या अनुभवांचे गुच्छरूप) एवढेच त्यांनी स्वीकारले आणि बाकीचे सारे तंत्र व त्याविषयीच्या उपऱ्या जाणिवा (सामान्य – क्षुद्र विषय घेणे, गप्पांचा सूर, प्रसन्न भाषाशैली इ.)  त्यांनी नाकारल्या. त्यांनी आपले मौलिक स्वरूपाचे आणि वेगळे,  कौटुंबिक, समाजशास्त्रीय, परदेशीय, जगभरच्या प्रवासातील सांस्कृतिक व्यापक अनुभव सखोलपणे आणि जोमदारपणे आविष्कृत केले.  भाषा तितकीच मन:पूर्वक, प्रांजळ, पारदर्शी, साधी ठेवली. या सर्वांना हळूहळू गहिरी होत जाणारी चिंतनाची, विद्वत्तेची, विचारवंत मनाच्या स्पंदनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड मिळत गेली. त्यामुळे त्यांचा लघुनिबंध अंतर्बाह्य वेगळा झाला. लघुनिबंधालाही खऱ्याच अर्थाने अव्वल दर्जाचे व्यक्तिमत्व लागते, हे त्यांनी लक्षात आणून दिले.

जुन्या लघुनिबंधाला चाचपून पहात, त्याची शक्तिस्थाने हेरून आत्मसात करत, उपऱ्याप बाबींना नाकारत, लघुनिबंधाच्या प्रत्येक घटकातील मूळ रूप शोधून त्याचा वापर करत आणि नंतर विविध रूपांत आविष्कृत करत करत लेखन करणारा लघुनिबंधकार म्हणजे गो.वि. करंदीकर (विंदा करंदीकर).  त्यांच्या लघुनिबंधामुळेही जुना लघुनिबंध अंतर्बाह्य बदलला. लघुनिबंधाच्या आशयाच्या आवश्यकतेनुसार ते लघुनिबंधाचे नवेनवे घाट शोधत गेले. कधी अनुभवांचे गुच्छरूप, कधी एक अनुभव व शेवटी चिंतन, कधी अनुभवाच्या पोटातच चिंतन, कधी चिंतनगर्भ एकच अनुभव, कधी कवितेप्रमाणे प्रतीकात्म, पुनरावर्तनशील रूप, तर कधी कहाणीचे रूप अशी त्यांच्या लघुनिबंधांची विविध मांडणी आहे.  खरे तर ही त्यांच्या अनुभवांची व्यक्त रूपे आहेत.  त्यांचा आशयही सामाजिक, वस्तुनिष्ठ, आधुनिक स्वरूपाचा आहे. टीकात्म, उपरोधात्म, विनोदात्म, काव्यात्म, भयात्म अशा विविध भाववृत्ती त्यांच्या लघुनिबंधाला लाभल्या आहेत.  ‘मी’ ची संपूर्ण स्वतंत्र विचारशील वृत्ती, विचारातील गुंतागुंत आणि बारकावे उलगडून दाखविण्याचे विलक्षण सामर्थ्य, नवी भाषिक जाणीव ह्याही वैशिष्ट्यांमुळे मराठी लघुनिबंधाचा बहुमुखी विकास गो.वि. करंदीकरांनी केला आहे.  करंदीकरांचे व्यक्तिमत्व विशेषत्वाने वाङमयाच्या संदर्भात जागरूक वाटते.  जाणीवपूर्वक ते लेखनात प्रयोगशील असते.  स्पर्शाची पालवी (१९५८) आणि आकाशाच अर्थ (१९६५) हे त्यांचे दोन लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.

दुर्गाबाई भागवतांच्या लघुनिबंधांनी तर भावमुद्रेमध्ये (१९६०) आरंभापासूनच स्वतंत्र रूप धारण केले आहे.  त्यांनी जुन्या लघुनिबंधाला मुळातूनच वाट पुसण्याचे नाकारले.  आपणास आलेले अनुभव जास्तीत जास्त आत्मनिष्ठेने व्यक्त करण्याच्या गरजेतून त्यांचे लघुनिबंध आकाराला आलेले दिसतात.  म्हणजे असे की, साहित्यप्रकारांत अनुभव घालण्यापेक्षा अनुभवांनाच संपूर्ण शरण जाऊन त्यांनाच व्यक्त करत राहण्यात दुर्गाबाईंचे ललितलेखन बहुधा रमते.एका उत्कट भावावस्थेने त्यांचा लघुनिबंध सुरू होतो.  त्या भावावस्थेत ज्या आठवणी येतील त्यांचा हळूहळू अनुभवगुच्छ तयार होतो.  त्या भावावस्थायुक्त अनुभवगुच्छानंतर त्यातूनच चिंतन सुरू होते.  ते चिंतन तेवढेच तीव्र, सखोल असते.  हे चिंतन जिथे संपल्यासारखे वाटते तिथे लघुनिबंध संपतो.  झपाटून टाकणारी तीव्र भावावस्था, घनिष्ठ निसर्गसंबंध, पराकोटीची चिंतनशीलता, भावावस्थेमुळे सर्वच अनुभवगुच्छाला आलेली गतिमानता ही त्यांच्या लघुनिबंधाची वैशिष्ट्ये आहेत. संस्कृतिनिष्ठ अभिजात वृत्तीला जवळची अशी त्यांची भाषाही मराठी लघुनिबंधाला जवळची आहे.

मंगेश पाडगावकरांनीही नव्या लघुनिबंधात आपली काव्यात्म वृत्ती आपल्या परीने आणून सोडलेली आहे.  निंबोणीच्या झाडामागे (१९५६) हा त्यांचा लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहे.

‘प्राणहिता’ या लेखिकेने आपल्या बालमनाचा शोध आपल्या मोजक्या असंग्रहित लघुनिबंधांत ज्या नव्या प्रेरणेने आणि प्रवृत्तीने घेतला, तीही धडपड मराठी नव्या लघुनिबंधात मोलाची आणि महत्वाची आहे.

पुढे बालमनाच्या शोधाला श्रीनिवास कुलकर्णी यांनी विकसित अवस्थेला नेले आणि मराठी लघुनिबंधाला वेगळी परिमाणेही प्राप्त करून दिली. डोहमध्ये (१९६५) त्याचे प्रत्यंतर येते.  संवेदनशील, तरल, स्वप्नमय, पुराणकथा आणि प्रत्यक्ष वास्तव व स्वप्न यांचे मिश्रण करणाऱ्याय, अदभुताची सतत ओढ असलेल्या, कल्पक, निसर्ग, प्राणी यांत रमणाऱ्या ‘मी’ च्या बालमनाचा शोध त्यांनी सूक्ष्मतेने घेतलेला आहे. एका बाजूस प्राप्त विषयाचे भान ठेवून निवेदन करणे आणि त्यातच दुसऱ्याल बाजूने ‘बाल-मी’ चा शोध घेणे असे दुहेरी परिमाण त्यांनी आपल्या लघुनिबंधाला प्राप्त करून देऊन खऱ्या अर्थाने ललित लेख व लघुनिबंध एकजीव करून टाकले.  तसे करून त्यांनी त्या दोन्हीही प्रकारांचा विकास केला व त्यांच्या शक्यता, वाढवून दाखविल्या. ‘ललित निबंध’ हे नामाभिधान योग्य अर्थाने याच लेखनाला द्यावेसे वाटते.

याच पाच-सहा नव्या लघुनिबंधकारांनी अशा रीतीने लघुनिबंध वेगळ्या दिशांनी विकसित केला.  या कथेतच देवीदास बागूल, वसुंधरा पटवर्धन, वामन इंगळे, शिरीष पै इत्यादींचे लेखन कमीअधिक प्रमाणात येते.


नव्या लघुनिबंधाने उपऱ्या तंत्राचे भान कधी ठेवले नाही. स्वाभाविक आकाराच्या शोधातच तो धडपडताना दिसतो.  त्यामुळे आंतरिक स्वभावानुसार नवा लघुनिबंध आविष्कृत होत गेला.  तसेच तो आरंभापासून अखेरपर्यंत सघन, अंतर्मुख, गतिशील आणि विकसनशील वाटतो. नव्या लघुनिबंधकारांचा ‘मी’ वरचा विश्वास वाढलेला दिसतो.  नवलघुनिबंध जुन्या वर्णनपरतेतून बाहेर पडून आत्मशोधात मग्न झालेला जाणवतो. त्यामुळे त्याच्यातील अनुभवांना ‘चटकदार अनुभव’ असे स्वरूप न राहाता ‘व्यक्तिमत्वाचे मनःपूत अनुभव’ असे स्वरूप आले. त्या अनुषंगानेच अनेकविध भावावस्था आणि त्या व्यक्त करणारी नवी प्रतिमायुक्त भाषा लघुनिबंधाला प्राप्त झाली.  १९५० नंतरचा लघुनिबंध प्रामुख्याने अंतर्मुख कविमनाने घडविलेला वाटतो.

आज लघुनिबंध विरळ प्रमाणात लिहिला जाताना दिसतो. ललित गद्याचा हा एक उपप्रकार आहे, साहित्यप्रकार म्हणून त्याची शक्तीही मऱ्यादित आहे.आत्मनिष्ठ लेखनाला व लघुनिबंधीय वृत्तीला आज इतर अनेक साहित्यप्रकारांतून वाटही मिळत आहे.  शिवाय आज घडीला ‘ललित निबंध’ या व्यापक प्राकारिक नावाखाली लघुनिबंधाबरोबरच ललित गद्याच्या इतर उपप्रकारांचे लेखनही होत असल्याने कदाचित तो वेगळेपणाने उठून दिसत नसावा.  ‘ललित गद्य’ या व्यापक नावाने काही लेखनसंग्रह प्रसिद्ध होतात. ललित गद्याचे सगळे उपप्रकार त्यांत एकत्र येतात.  त्यामुळे ‘लघुनिबंध ’ शोधूनच काढावा लागतो.  एके काळी स्वतंत्रपणे चमकणारा हा साहित्यप्रकार अशा रीतीने आता एका व्यापक प्रकारात समाविष्ट होऊन गेलेला आहे.

यादव, आनंद

विनोद : विनोद हा जीवनाशी अपरिहार्यपणे संबद्ध असल्याने तो प्राचीन मराठी साहित्यातही थोड्या फार प्रमाणात का होईना, प्रकट होणे अपरिहार्य होते. श्रीचक्रधरांचे जीवन चित्रित करणाऱ्या लीळाचरित्र या मराठीतील आद्य चरित्रग्रंथात तसेच तुकाराम, एकनाथ यांच्या काव्यांत काही उत्तम विनोदस्थळांच्या आढळ होतो. मात्र अर्वाचीन मराठी साहित्यातील विनोदाला प्राचीन साहित्यातील विनोदाची परंपरा आहे, असे म्हणता येत नाही. गद्यवाङमयाची सातत्यपूर्ण परंपराच राहिली नव्हती. इंग्रजी सत्तेच्या आगमनानंतर, इंग्रजी साहित्याच्या द्वारा, इंग्रजांचा प्रभाव येथील सामाजिक, वाङमयीन, सांस्कृतिक जीवनावर पडला. त्यातून निर्माण झालेल्या काही आधुनिक वाङमयप्रकारांप्रमाणे स्वतंत्र विनोदी साहित्याचे दालनही विसाव्या शतकाच्या प्रारंभी निर्माण झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही वर्तमानपत्रांतून परमतखंडनार्थ कधी कधी उपहासाचा वापर केलेला आढळतो.  रंजनार्थ व पानपूरके म्हणून चुटके, आख्यायिका छापलेल्या आढळतात.  संगीत सौभद्रसारख्या स्वतंत्र व फाल्गुनरावसारख्या रूपांतरित नाटकात विनोदाची निर्मिती केलेली दिसते.  तरी विनोद वाङमय या नावाने ओळखला जावा असा स्वतंत्र वाङमयविभाग निर्माण करण्याचे व एका नव्या वाङमयप्रथेला जन्म देण्याचे श्रेय श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याकडे जाते.

कोल्हटकरांनी १९०२ मध्ये आपला पहिला विनोदी लेख ‘साक्षीदार’ हा विविधज्ञानविस्तारमध्ये लिहिला.सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे ह्यां त्यांच्या विनोदी लेखसंग्रहाची पहिली आवृत्ती १९१० मध्ये व बत्तीस लेखांची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्यबत्तिशी या नावे १९२३ मध्ये प्रसिद्ध झाली. कोल्हटकरांनी आधुनिक मराठी साहित्यात केवळ विनोदी वाङमय म्हणता येईल, अशा लेखनाची प्रथा सुरू केली एवढेच नव्हे,  तर विनोदी वाङमयाचे अत्यंत संपन्न स्वरूपही दाखविले.  जीवनदर्शन व रंजन या द्विविध प्रेरणांतून त्यांनी विशेषत: उपहासरूप व कोटीरूप ही दोन विनोदरूपे निर्माण केली.  सामाजिक जीवनातील व्यंगांचे भेदक परंतु तितकेच विनोदात्मक चित्रण करून व्यंगरहित जीवनाची जाणीव करून देणे ही जीवनदर्शनाची मूल्यनिष्ठ प्रेरणा त्यांच्या उपहासरूप विनोदाच्या मुळाशी आहे.  धार्मिक, सामाजिक, वाङमयीन व सांस्कृतिक जीवनातील अनेकविध व्यंगांचा प्रखर उपहास त्यांनी ‘शिमगा’,  ‘श्रावणी’,  ‘गणेशचतुर्थी’, ‘धर्मांतर’, ‘यश:सिद्धीचे सोप व अचूक मार्ग’ , ‘साहित्यसंमेलनाची तयारी’ ‘वर्तमानपत्रकर्ता’, ‘चोरांचे संमेलन’   ‘गवई’ इ. लेखांतून केला आहे. वास्तवातील अनुभवांची मोडतोड करून तो विक्षिप्त (वि + क्षिप् = विपरीत ठिकाणी ठेवणे)  रूपात ठेवणे ह्यामुळे जे विनोदरूप निर्माण होते, त्याला कोटीरूप असे येथे संबोधले आहे.  अशा विनोदाच्या मुळाशी मुख्य प्रेरणा असते ती रंजनाची.  ह्या प्रेरणेतून ‘आमचे बैठे खेळ’, ‘आमच्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य’ इ. उत्कृष्ट लेख कोल्हटकरांनी लिहिले आहेत.  श्रीपाद कृष्णांच्या विनोदी लेखनाला जो सकसपणा प्राप्त झाला आहे तो त्यांच्या समृद्ध वाङमयीन व्यक्तिमत्वामुळे.  ते माणुसकीवर श्रद्धा ठेवणारे समता, स्वातंत्र्य या मूल्यांची कदर करणारे व अव्वल दर्जाची सौंदर्यग्राही दृष्टी असलेले लेखक होते.  समकालीन जीवनाला मूल्यनिष्ठ दृष्टीने सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती होती.  म्हणूनच विषमतेवर आधारलेला, व्यक्तीच्या स्वातंत्र्याऱ्याऱ्याऱ्याचा संकोच करणारा हिंदू धर्म त्यांच्या उपहासाचा एक प्रमुख विषय झाला. धार्मिक, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रातून उपहासविषय निवडताना त्यांच्या मनात मूल्यभाव होता. व्यंगाचा उपहास करून अव्यंग जीवनाची स्पृहा निर्माण करणे हा त्यांच्या उपहासपर लेखनाचा हेतू.  आपणाला जो सिद्धांत मान्य असेल, त्याच्या विरोधी असणारा अपसिद्धांत घटकाभर खरा मानल्यास त्यापासून निघणारी अनुमानपरंपरा आपल्या पूर्वानुभवांशी किती विसंगत व हास्यापद ठरते, हे दाखविणे ही त्यांची उपहासनिर्मितीची पद्धती असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.त्यांचा जो कोटीरूप विनोद आहे, त्यामध्ये त्यांची विरुद्ध कल्पनांचा न्यास साधणारी वरच्या दर्जाची कल्पकता आढळते. शब्दवापरातील चोखंदळपणा, वाक्यरचनेतील सहेतुकता व एकंदर निर्मितीमागील परिश्रमशीलता ही वैशिष्ट्ये त्यांच्या सार्या्च विनोदी लेखनात दिसतात.


श्रीपाद कृष्णांनी मराठीमध्ये स्वतंत्र विनोदी लेखनाचे प्रवर्तन केले हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहेच परंतु त्यांच्या वाङमयाचा ठसा अनुगामी लेखकांवर उमटलेला जो दिसतो, तो त्यांच्या विनोदाच्या गुणवत्तेचा निदर्शक आहे. त्यांनी आपल्या विनोदी लेखाचे स्वरूप प्राधान्याने निबंधात्मक ठेवले असले, तरी त्यांनी मुखवटा धारण करणारी सुदामा, बंडूनाना, पांडुतात्या ही काल्पनिक पात्रे निर्माण करून ती विविध घटनाप्रसंगांतून नेली विनोदासाठी स्फुट विषय निवडले विनोदनिर्मितीसाठी कल्पनांचा विरोधात्मन्यास साधणारी शैली निर्माण केली व या शैलीवैशिष्ट्यांचा त्यांनी समर्थपणे उपयोग केला. श्रीपाद कृष्णांची जीवनदृष्टी व मूल्यनिष्ठा आत्मसात करता आली नाही, तरी पुढील अनेक लेखकांनी त्यांच्या शैलीचे अनुकरण करून विनोदी लेखन केलेले दिसते. ‘मराठी भाषेतील विनोदपीठाचे आचार्य’ असे न.चिं. केळकर यांनी केलेले त्यांचे वर्णन रास्त म्हणावे लागते.

कोल्हटकरांचे शिष्यत्व अभिमानाने मिरवणाऱ्या राम गणेश गडकरी यांनी नाटककार म्हणून तसेच विनोदी लेखक म्हणून अफाट लोकप्रियता मिळविली. त्यांनी आपले विनोदी लेखन ‘बाळकराम’ या टोपणनावाने प्रसिद्ध केले.  त्यांचे सर्व विनोदी लेखन संपूर्ण बाळकराम (१९२५) या पुस्तकात ग्रंथित केलेले आहे. विनोदनिर्मितीला अत्यंत आवश्यक असलेली तरल कल्पनाशक्तीची देणगी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती व उत्तम भाषाप्रभुत्व त्यांना लाभले होते.  या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या नाटकातील विनोद, तसाच त्यांचा स्फुट लेखनात्मक विनोदही अत्यंत लोकप्रिय ठरला.  त्यांच्या नाटकातील विनोद स्वतंत्र निर्मिती असल्यासारखा स्वतंत्र प्रवेशातून प्रकट होऊन वाचकांचे रंजन करतो.  प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन ह्या त्यांच्या नाटकांतील गोकुळ, नुपूर-कंकण, सुदाम, इंदु-बिंदू महेश्वर (कामण्णा) ह्या पात्रांच्या ठिकाणी गडकऱ्या नी एकेक हास्यजनक वैगुण्य कल्पून विनोदनिर्मिती केली आहे.  त्यांच्या ‘कवींचा कारखाना’ मधील उपहास, ‘स्वयंपाकघरातील गोष्टी’ – मधील  ‘विहिणीची रेवडी’, ‘गुळाचा गणपती’ इ. पदार्थांच्या विडंबनपर कृती वर्णन करताना साधलेला कोटीबाजपणा सरस आहे.  ‘वरसंशोधन’,  ‘लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी’ आणि ‘लग्न मोडण्याची कारणे’ हे लेख कोल्हटकरांच्या अनुकरणातून, विवाहसंस्थेला प्राप्त झालेल्या बाजारी स्वरूपाचा उपहास करून सामाजिक दोषदिग्दर्शनाच्या व सुधारणेच्या हेतूने लिहिल्यासारखे भासत असले, तरी तसा फारसा गंभीर हेतू त्यांच्या मनात असल्याचे जाणवत नाही.  ते अतिरेकी कल्पनांच्या मागे इतके ओढले जातात व एवढी अतिशयोक्ती करतात, की तिची परिणामक्षमता कमी होते.  लेखक म्हणून मानवतावादाची बैठक नसल्याने ठकीच्या कुरूपतेचा ते मनसोक्त उपहास करतात.  कोल्हटकरांप्रमाणेच त्यांनी बाळकराम, तिंबूनाना व भांबूराव ही पात्रे निर्माण केली खरी परंतु त्यांनी जिवंत तर नव्हेच निव्वळ सुसंगत व्यक्तिमत्वेसुद्धा प्राप्त होत नाहीत.  त्यांच्या चांगल्या विनोदाची उदाहरणे म्हणून ‘कवींचा कारखाना’, ‘स्वयंपाकघरातील गोष्टी’, ‘सकाळचा अभ्यास’, ‘छोट्या जगूचा रिपोर्ट’ अशा थोड्याच कृतींचा निर्देश करणे शक्य आहे.  त्यांचा विनोद वा.म. जोशी यांच्या शब्दांत सांगावयाचे, तर अतिशयोक्तीच्या उलटसुलट कोलांट्या उड्या मारणारा आहे.  लेखक म्हणून मानवतावादी बैठक, पुरोगामी जीवनसन्मुख दृष्टिकोण व मूल्यनिष्ठा यांचा त्यांच्या ठिकाणी अभाव असल्याने त्यांच्या विनोदाला सखोलपणा व गुणवत्ता प्राप्त होत नाही.  कोल्हटकरांनी प्रचलित केलेल्या उपहासपर व कोटीरूप विनोदाचीच त्यांनी प्राधान्याने निर्मिती केली.  स्तिमित करून टाकणारी कल्पनाशक्ती व विनोदनिर्मितीच्या तंत्रावरील प्रभुत्व इ. शैलीवैशिष्ट्यांनी गडकऱ्या चा विनोद अतिशय लोकप्रिय मात्र ठरला.केवळ विनोदी लेखन करून चिं.वि. जोशी यांनी स्वतःसाठी मराठी वाङमयात अढळ स्थान निर्माण केले.

केवळ विनोद (विशुद्ध विनोद) म्हणून ओळखले जाणारे विनोदरूप मराठी वाङमयात त्यांनी प्रथमतःच संपन्न स्वरूपात आविष्कृत केले. एरंडाचे गुर्हायळ (१९३२), वायफळाचा मळा (१९३६) ह्या त्यांच्या पहिल्या दोन पुस्तकांतील ‘कंपॉझिटरचा सूड’ ‘स्मरणशक्तीचे प्रोफेसर’, ‘मुशियन वाङमयाचा परिचय’ इ. लेखनकृतींमध्ये शब्दनिष्ट व उपहासरूप विनोद प्रकट होतो.  मात्र त्यांनी चिमणरावांचे चर्हाट (१९३३) पासून चौथे चिमणराव (१९५८) पर्यंत चिमणराव व त्याचा गोतावळा यांवरील कथांतून महाराष्ट्रातील पांढरपेशा मध्यमवर्गीयांचे तीन पिढ्यांच्या जीवनांचे अनेक अंगांनी भरघोस चित्रण केले आहे. स्फुट विनोदी गोष्टींत अवतरणाऱ्याह भीमाआजी खाणावळवालीच्या आत्मकथेतून (‘चार दिवस सुनेचे’)  टिळककालीन पुण्यातील कौटुंबिक जीवन राजकीय – सामाजिक ताणांसह प्रकट होते.  पुढच्या पिढीतील चिमणरावांचे जीवन त्यांचे कुटुंबीय, गुंड्याभाऊसारखे नातलग, गुलाब दिघे, प्रो. हवालदार यांसारखी घरोब्यातील मंडळी यांसह आविष्कृत होते. दुसऱ्या महायुद्धाचा काळ आणि मोठी झालेली मोरूमैनाची पिढीही त्यांनी रंगविली आहे. त्यांनी सु. तीन तपे निष्ठावंतपणे विनोदी वाङमयाची निर्मिती केली.

विडंबनाच्या द्वारा चांगल्या प्रतीचा उपहास ते साधू शकतात हे लंकावैभव (१९४७) सारख्या वृत्तपत्रीय नीतीचा व रीतीचा उपहास करणाऱ्याभ पुस्तकातून तसेच ‘मुशियन वाङमयाचा परिचय’ सारख्या आधीच्या लेखांतून त्यांनी दाखवून दिले आहे.  मात्र उपहासावर त्यांनी आपला वाङमयप्रपंच थाटला नाही.  विनोदनिर्मिती करणाऱ्याह तांत्रिक वैशिष्ट्यांचा उपयोग करून वास्तव जीवनाचे चित्रण करणारा केवल विनोद निर्माण करणे हे चि.वि. जोशी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य ठरते.  सर्वसामान्य माणसांच्या नात्यांतील प्रेमळपणा, गुंतागुंत, त्यांच्यामधील हेवेदावे, त्यांची स्वार्थपरता तसाच त्यांचा चांगुलपणा या साऱ्या चे चिं.वि. जोशी लेखकाच्या भूमिकेवरून आकलन व चित्रण करतात.  ह्या गुणवैशिष्ट्यांमुळे ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’ , ‘बोळवण’ इ. कथा उत्कृष्ट ठरल्या आहेत.  कोल्हटकर-गडकऱ्या सारखा बुद्धिविलास व कल्पनावैभव ते प्रकट करीत नाहीत.  आपल्या पात्रांचा बौद्धिक मगदूर लक्षात घेऊन त्यांच्या कुवतीच्याच कोट्या त्यांच्या तोंडी ते घालतात.  पात्रांची भाषाही प्रादेशिक, सांस्कृतिक व बौद्धिक वैशिष्ट्यांनुसार वापरतात.  भाषेचे कृत्रिम वळण मोडून घरगुती पद्धतीची भाषा विनोदी लेखनात त्यांनीच प्रथम अवलंबिली.  पात्रांच्या मूर्खपणाचा सौम्य उपहास ते करतात त्यामध्ये मर्मभेदक प्रहार मात्र नसतो. लेखकाच्या ठिकाणी अभिप्रेत असलेला व्यापक सहानुभाव, मानवतावादी दृष्टिकोण, जीवनसन्मुख मूल्यनिष्ठ दृष्टी त्यांच्या ठिकाणी असल्याने त्यांचा विनोद श्रेष्ठ दर्जाचा ठरला असून आजही रसिकांच्या अंतःकरणापर्यंत तो पोहोचू शकतो.


स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात विनोदाची निर्मिती करून अफाट लोकप्रियता मिळविणारे लेखक म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे हे होत.  त्यांच्या विनोदाचा आविष्कार स्फुट लेखनापेक्षा नाटक, चित्रपट, व्याख्याने यांमधूनच मुख्यतः झाला आहे.  रविकिरण मंडळातील कवींची लेखनशैली, विषय, वृत्ती यांतील हास्यापद वाटणाऱ्या बाबींचे विडंबन त्यांनी झेंडूची फुले (१९२५) या संग्रहातून अत्यंत प्रभावीपणे केले व विडंबनाचा एक नवा प्रकार मराठीमध्ये आणला.  उपहासिनी (१९३६) हा प्रातिनिधिक विडंबनकवितांचा संग्रह दि.वि. देवांनी प्रसिद्ध केला.  अत्रे ह्यांच्या ब्रँडीची बाटली (दुसरी आवृ. १९४४), साखरपुडा (१९४२) या कथासंग्रहांतील ‘जांबुवंत दंतमंजन’, ‘गुत्त्यात नारद’ यांसारख्या कथांतील विनोद अतिशोयक्ती, कल्पनाचमत्कृती व उपहास यांवरच आधारलेला असून ते गडकरी शिष्य असल्याचा प्रत्यय देणारा आहे.  त्यांच्या विनोदाचा विमुक्त आविष्कार साष्टांग नमस्कार (१९३३), भ्रमाचा भोपळा (१९३५)  यांसारख्या नाटकांतून व ब्रह्मचारी, पायाची दासी, मोरूची मावशी यांसारख्या चित्रपटांतून होतो.  रावबहाद्दूर, भद्रायू इ. विनोदी पात्रांची निर्मिती त्यांनी कोणत्या ना कोणत्या छांदिष्टपणाच्या वा व्यंगाच्या आधारे केलेली असली, तरी त्यांचे मानवी रूप लक्षात यावे असाही त्यांचा प्रयत्न असतो. कमालीचा विमुक्तपणा हे अत्र्यांऱ्याऱ्याऱ्याच्या विनोदाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.  कल्पनेची भरारी, चमत्कृतिपूर्णता, वेधक कोटीबाजपणा ही गडकऱ्यापचीच वैशिष्ट्ये त्यांच्या ठिकाणी आढळतात.  उत्तम गद्यशैलीमुळे त्यांचा विनोद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो.  अत्र्यांऱ्याऱ्याऱ्यानी आपल्या उत्तरकाळात विनोदाकडे साधन व त्यातल्या त्यात शस्त्र म्हणूनच पाहिले व त्याचा उपयोग राजकीय प्रचारासाठी वृत्तपत्रांतून व व्याख्यानांतून केला. तेव्हा त्यांच्या विनोदाला जालीम उपरोधाचे व अनेकदा शिवराळपणाचे रूप आलेले दिसते.  मात्र विडंबने, नाटक – चित्रपट व व्याख्याने यांद्वारा महाराष्ट्रात विनोद लोकप्रिय करण्याचे कार्य त्यांनी केले हे नि:संशय.

पत्रकार ⇨ अच्युत बळवंत कोल्हटकर (१८७९-१९३१) यांनी वृत्तपत्रातून जे विनोदी लेखन केले त्यांपैकी सौ. वत्सलावहिनी यांचे प्रसिद्ध व अप्रसिद्ध लेख (१९१५) हे सौम्य उपहास व संयम यांमुळे वाचनीय ठरले.  वा.म. जोशी यांच्या स्मृतिलहरी (१९४२)  मधील प्रेमगर्भ विनोदाचा दर्जा फारच वरचा आहे. शामराव ओक यांचा कल परिहासापेक्षा उपहासाकडे अधिक आहे, हे त्यांच्या धोत्र्याऱ्याऱ्याऱ्याचे कळे (१९४४), परिहास (१९५५) या संग्रहांवरून जाणवते.  अनुरूप वातावरणाची निर्मिती, संवादांचा चटकदारपणा व विडंबनाचे कौशल्या ही त्यांच्या विनोदी लेखनाची वैशिष्ट्ये होत.  वि.वि. बोकील ह्यांचे सगळेच लेखन खुसखुशीत म्हणण्याजोगे आहे मात्र लक्षणीय विनोदाची निर्मिती त्यांच्या हातून घडते असे दिसत नाही.  अ.वा. वर्टी यांच्या कथांमध्ये चमत्कृतीचा उपयोग करून विनोदात्म कथानकाची निर्मिती केलेली असते व त्यापाठीमागे त्यांचा प्रेममूलक दृष्टिकोण असतो, हे त्यांच्या दंतकथा (१९४७), टालडुप्पो वांगिमाडू (१९५०) ह्यांसारख्या कथासंग्रहांतील कथांतून जाणवते.

स्वातंत्र्योत्तर काळात विनोद नवनवीन शैलींत आणि विविध रूपांतून प्रगट होऊन त्याचा विकास झाला. काही चांगल्या दर्जाचा विनोद जीवनदर्शनाच्या प्रेरणेतून, मूल्यनिष्ठेतून निर्माण झाला, तर रंजनाच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या कोटीरूप विनोदाचे काही चांगले नवे आविष्कार प्रकट झाले.

१९४० नंतरचे विशेष महत्वाचे आणि सर्वाधिक लोकप्रिय विनोदी लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे होत.  बुद्धिमान गद्य विडंबनकार म्हणून त्यांचा प्रथमतः ‘महाराष्ट्रातील सहानुभाव संप्रदाय’,  ‘लोकमात पण (सापत्न)’ ‘अंगुस्तान विद्यापीठ’, ‘त्याचे व्यवच्छेदक लक्षण’  इ. खोगीरभरती (१९४९), नस्ती उठाठेव (१९५२) या संग्रहांतील लेखांच्या द्वारा प्रभाव पडला.  नंतर त्यांनी विनोदरूपाचे नवनवे आविष्कार करून आपली स्वत:ची अशी खास भर मराठी विनोदी वाङमयात घातली.  ‘चितळे मास्तर’, ‘अंतू बरवा’, ‘नारायण’ ही व्यक्तिचित्रे व्यक्ती आणि वल्ली, १९६२) लिहून व्यक्तिचित्रे विनोदात्म करता येतात हे त्यांनी दाखवून दिले आणि केवल विनोदाचा एक नवा आविष्कार साधला.  अनेक सांस्कृतिक अंगांनी युक्त असणारे कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या एका चाळीमधील सामूहिक जीवनाचे विनोदात्म चित्र त्यांनी बटाट्याची चाळ (१९५८) मध्ये रेखाटले आहे.  मात्र त्यामधील लेखांना विडंबन – उपहासाची जोड त्यांनी दिली आहे.

संपूर्ण प्रवासवर्णन विनोदाच्या सुरात लिहिणे हा पु.ल. देशपांडे यांनी केलेला विनोदाचा एक नवा आविष्कार अपूर्वाई (१९६०) मध्ये प्रगट झाला. पूर्वरंग (१९६५) हे त्यांचे अशा प्रकारचे दुसरे उल्लेखनीय पुस्तक. एका विशिष्ट संस्कृतीत घडलेल्या व्यक्तीच्या मनावर जेव्हा परकीय संस्कृतीचे आघात होतात, तेव्हा विनोददृष्टी असणाऱ्या ला विनोदनिर्मितीची सामग्री सुलभपणे मिळू शकते, हे पु. लं. नी. समर्थपणे दाखविले आहे.  पु.ल. देशपांडे हे यशस्वी आणि लोकप्रिय नाटककारही आहेत. नाटकातील पात्रांना व्यंगचित्राचे रूप न देता, वास्तव चित्रण करून, विनोदाची निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न तुझे आहे तुजपाशी (१९५७) मध्ये यशस्वी झालेला आहे.  आचार्य आणि काकाजी या व्यक्तिरेखा मराठी माणसाच्या ओळखीच्या होऊन बसल्या आहेत. पु.ल. देशपांडे यांचे व्यक्तिमत्व अनेक पैलूंनी युक्त आहे. साहित्याप्रमाणेच संगीत, चित्र, नाट्य इ. कलांची त्यांना उत्तम जाण आहे. चोखंदळ विनोददृष्टीच्या जोडीला मानवतावादी दृष्टिकोण व मूल्यात्मकतेची जाणीव संगीत, चित्र, नाट्य इ. कलांची जाण यांमुळे आलेली विदग्धता व आदर्शाच्या ओढीने आलेली चिंतनशीलता यांमुळे त्यांच्या विनोदाला गुणवत्ता प्राप्त झाली आहे.   साहित्य व नाटक यांप्रमाणेच व्याख्याने आणि एकपात्री प्रयोग यांच्या द्वारा त्यांचा विनोद महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचला आहे.

लघुकथा या साहित्यप्रकारात कोटी, उपहास व केवल विनोद या तीनही प्रकारचा उत्तम विनोद ग्रामीण कथेत द.मा. मिरासदार व शंकर पाटील यांनी प्रकट केला आहे.  मिरासदरांनी ‘माझ्या बापाची पेंड’, ‘व्यंकूची शिकवणी’ (बापाची पेंड) या कथांमध्ये स्थानांतर हे तंत्रवैशिष्ट्य वापरून विक्षिप्ताच्या धर्तीचा कोटीरूप विनोद उत्तम साधला आहे.  तर ‘माझी पहिलीच चोरी’ या कथेत उपहासरूप विनोद चांगल्या प्रतीचा आहे.  वास्तवाचे यथातथ्य चित्रण करतानाच त्यामधील विरोधात्म घटकांचा विनोदनिर्मितीसाठी उपयोग करून लिहिलेल्या शंकर पाटीला यांच्या ‘नाटक’, ‘टिपिशन’, ‘आफत’  (वळीव, १९५८) इ. कथा कलादृष्ट्या उत्कृष्ट आहेत.  ‘धिंड’ सारख्या कथांत ते विक्षिप्ताचा वापरही चातुऱ्याने करतात.


गंगाधर गाडगिळांच्या ‘खरं सांगायचं म्हणजे’ , ‘बसचं तिकिट’ ‘दोन चाके’ (खरं सांगायचं म्हणजे, १९५४) इ. कथा विक्षिप्ताचे रूप धारण करणाऱ्या कोटीरूपातील कथा होत.  त्यांत त्यांनी उपहासाचाही धागा गोवला आहे.  बंडू-स्नेहलता या दोघाच्या ठिकाणी काही स्थिर स्वरूपाची स्वभाववैशिष्ट्ये निर्माण करून, त्यांना नवरा व बायको या वर्गाचे प्रतिनिधी केले आहे.  बंडूसारखे अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त करणारे व विनोदनिर्मितीला कारणीभूत होणारे व्यक्तिचित्र मराठीत सर्वस्वी नवे ठरते (बंडू, १९६१).  गाडगिळांचा हा विनोद विक्षिप्ताच्या स्वरूपाचा असला, तरी मानवी मनावर प्रकाश टाकण्याचेही तो कार्य करतो.  त्यांचे फिरक्या (१९७६) हे कोणत्याच वाङमयप्रकारचे बंधन स्वतःवर लादून न घेता विमुक्त शैलीत केलेले विनोदी लेखन आहे.  काही वास्तवातील तर काही काल्पनिक व्यक्ती घेऊन त्यांना विविध प्रसंगांत दाखविले आहे. गाडगिळांच्या फिरक्या रंजन करता करताच मानवी जीवनव्यवहाराचेही दर्शन घडवितात.

जयवंत दळवींनी ‘मी बोका होतो’ (विक्षिप्त कथा, १९७३) अशासारख्या उत्तम कोटीरूप कथा लिहिल्या आहेत.  उपहासकथा (१९७४), सारे प्रवासी घडीचे (१९६४), कशासाठी पोटासाठी (१९६५), ही त्यांची इतर विनोदी पुस्तके.  साहित्यिक आणि साहित्यविश्वातील घटनांवर त्यांच्या ठणठणपाळाने (निवडक ठणठणपाळ, १९६९) खुसखुशीत विनोदाची निर्मिती सातत्याने केली आहे.  विनोदात्म शैलीचा एक महत्वाचा आविष्कार म्हणजे लीलाधर हेगडे यांचे राजकीय जीवनावरील उपहासपर लेखन.  प्र.के. अत्रे व दत्तू बांदेकर यांनी राजकीय जीवनावर उपहासपर लेखन केले, तर हेगडे यांनी गुंतागुंत (१९६७), फेडाफेडी (१९७१) या पुस्तकांतील लेखनात राजकीय उपहासाला विशिष्टाच्या पातळीवरून व्यापक पातळीवर नेण्याचे कार्य केले आहे. राजकीय जीवनातील व्यंगे हास्यापद करून अव्यंग राजकीय जीवनाची प्रतीती देण्याचे सामर्थ्य त्यांच्या उपहासात आहे.

अशा प्रकारे विनोदाचे काही नवे आविष्कार करून चांगल्या दर्जाच्या विनोदी वाङमयाची निर्मिती अलिकडच्या पंचवीसएक वर्षात विविध लेखकांनी घडविली आहे. १९६० नंतर विनोदी म्हटल्या जाणाऱ्याय वाङमयाची विपुल प्रमाणात निर्मिती झालेली दिसते.  वि.आ. बुवांनी केवळ १९६१ ते १९७१ या दशकात ५६ पुस्तके लिहिली.  रमेश मंत्र्यांऱ्याऱ्याऱ्यानी १९७९ या एका वर्षात २५ नवी पुस्तके लिहिली.  विनोदासाठी मासिके निघतात तशीच वार्षिकेही निघतात.  विनोदाचा चाहता वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु अधिक चांगल्या दर्जाचे विनोदी साहित्य त्या प्रमाणात निर्माण होतान दिसत नाही.  बाळ गाडगीळ, सुभाष भेंडे, बाळ सामंत इ. लेखक वाङमयीन स्वरूपाचे विडंबनात्मक लेखन आवडीने करतात असे दिसते.  काही ठराविक विषयांवर (उदा., स्त्रियांवरील विनोदी लेखन) अनेक लेखक लिहितात.  विनोदाला शृंगाराची जोड देऊन रंजकता वाढविण्याचा प्रयत्न इंद्रायणी सावकार, बा.भ. पाटील, वि.आ. बुवा, वसंत मिरासदार इ. लेखक करताना दिसतात. केवळ उथळ रंजनपरतेच्या ऐवजी रंजनाच्या जोडीनेच जीवनदर्शनाचे कार्यही विनोद साधू शकतो, ही जाणीव जर वाढीला लागली तर मराठीमधील विनोद आणखी संपन्न होऊ शकेल.

पवार, गो.मा.

प्रवासवर्णने: अर्वाचीन मराठी साहित्यातील आरंभीची प्रवासवर्णने माहितीपर आणि वृत्तान्तवजा आहेत.  शामराव मोरोजी यांचे काशिप्रकाश म्हणजे महायात्रावर्णन (१८५२) हे अर्वाचीन मराठीतील पहिले प्रवासवर्णन होय.  जगन्नाथ विठोबा क्षत्री यांचे गोकर्ण महाबळेश्वराचे यात्रेप्रकरणी वृत्तांत (१८६३) हे संवादात्मक म्हणून आणि हरि गणेश पटवर्धन यांचे काशीयात्रा (१८७२) हे पत्ररूप म्हणून लक्षणीय आहे. कलाकृती म्हणून साहित्यनिर्मितीसंबंधी कसल्याच जाणिवा नसूनही लिहिले गेलेले विष्णुभट गोडसे (१८२७-१९०६) यांचे माझा प्रवास अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकीगत हे १८८३ साली लिहिलेले आणि १९०७ साली प्रथम प्रकाशित झालेले प्रवासवर्णन अनेक दृष्टींनी अप्रतिम आहे.  आत्मपरता, प्रांजळ व प्रत्ययकारी निवेदन, अर्थवाही बोलीभाषेचा जिवंतपणा, नाट्यमयता, अदभुतता, जीवनभाष्य ह्या सर्वांमुळे ह्या प्रवासवर्णनाचे वाङमयीन महत्व आजही कमी नाही.  समकालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक स्थितीच्या चित्रणामुळे त्याला ऐतिहासिक महत्वही आहेच.  शिवाय मनुष्य आणि नियती ह्यांच्या संघर्षाचे, मानवी प्रयत्नांच्या अपूर्णतेचे सुंदर दर्शन गोडसे भटजींनी घडविले आहे.  तथापि हे प्रवासवर्णन अपवादात्मकच.  त्यांच्या नंतरच्या बहुतेक प्रवासवर्णनांतून माहितीचा रटाळ तपशील, रुक्ष, निरस वर्णने व बालिश विचार यांचाच आढळ होतो.  त्या पार्श्वभूमीवर ⇨ पंडिता रमाबाई या मराठीतील आरंभीच्या उल्लेखनीय प्रवासवर्णनलेखित असून

इंग्लडचा प्रवास (१८८३) व युनाइटेड स्टेट्सची लोकस्थिति आणि प्रवासवृत्त (१८८९) या दोहोंत त्यांच्या मनस्वीपणाचे, सौंदऱ्यासक्ततेचे व चिंतनशीलतेचे दर्शन घडते.  गोविंद बाबाजी जोशी यांच्या गेल्या तीस वर्षापूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकिकत (रोजनिशी) (१८९६) या प्रवासवर्णनात प्रथमच रोजनिशी पद्धतीचा वापर केलेला आहे.  गजानन पांडुरंग नाटेकर (‘हंस’ स्वामी) यांचे कैलासमानससरोवरदर्शन (१९१०) साहित्यगुणांनी संपन्न आहे.  वैराग्यप्रवण ‘हंस’ स्वामींनी आपल्या अनुभवांचे कथन तटस्थपणे व निरागस प्रांजळपणे केले आहे.  रावजी भवनाराव पावगी यांनी लिहिलेले विलायतचा प्रवास (भाग १, २-१८८९, १८९२) हे प्रवासवर्णन त्या काळात बरेच लोकप्रिय होते.  सर्व जग हिंडून येणाऱ्या पहिल्या स्त्रीचे प्रवासवर्णन म्हणून पार्वतीबाई चिटनविसांच्या आमचा जगाचा प्रवास (१९१५) ह्याचा व पांडित्याचा प्रत्यय देणारे पत्ररूप प्रवासवर्णन म्हणून पां. दा. गुणे यांच्या माझा युरोपातील प्रवास (१९१५) ह्याचा निर्देश करता येईल. गोविंद चिमणाजी भाटे यांनी देशी-विदेशी प्रवासवृत्तमालाच लिहिली.  माझा अटकेपार प्रवास (१९१८), माझा उत्तर हिंदुस्थानचा प्रवास (१९१८), माझे दूरदूरचे प्रवास (१९१९), हिंदुस्थानचे नंदनवन (१९१९), आमची युरोपची यात्रा (१९३४), माझी विलायतची यात्रा (१९३४), आमची पायगाडीची चक्करे (१९३५), केरलाचे वर्णन व वृत्तांत (१९३५) इत्यादी.  प्रवासवर्णनांची ही निर्मिती हेतुत: झालेली दिसते.  भाड्याचे दर, प्रवासात राहण्याच्या सोयी-गैरसोयी इत्यादींची कंटाळवाणी जंत्री, स्थूल व रुक्ष वृत्तांत, पाल्हाळा, तोचतोचपणा ह्यांमुळे कलात्मकतेचा स्पर्श राहोच, काही ठिकाणी हास्यास्पदता निर्माण झाली आहे.  पण एकाच प्रकारचे इतके विपुल लेखन करणारा भाटे यांच्याएवढा दुसरा मराठी लेखक नाही हेही मान्य करावे लागेल.


प्रवासवर्णनात्मक लेखनामध्ये ज्यांनी जिवंतपणा आणला, अशा लेखकांत न.चि. केळकर ह्यांचा समावेश करावा लागेल.  विलायतची बातमीपत्रे (१९२२), दिल्ली जुनी व नवी (१९२७), माझा सरहद्दीकडील दौरा व पूर्व बंगालची सफर (दोन्ही १९२९) ही सर्व प्रामुख्याने राजकीय बातमीपत्रांप्रमाणे असली, वाचकांना बहुश्रुत करण्याची दृष्टी त्यामागे असली, तरीही त्यांत केळकरांच्या रसिक, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा प्रत्यय ठायी ठायी येतो.  वर्णनात्मकता, कल्पनाविलास, पांडित्याचा वास न येणारी बहुश्रुतता, मिष्कील विनोदी वृत्ती ह्यांमुळे केळकरांची प्रवासवर्णने रुक्ष झाली नाहीत.  कुतूहलाने व चिकाटीने गोळा केलेल्या माहितीने रंजक ठरलेली गोविंद हरि फडकेकृत माझी तीर्थयात्रा (खंड १ ते ४, १९२३-१९३१) उल्लेखनीय आहे. काव्यात्मतेचे अस्तर असलेल्या पांडित्याचा प्रत्यय देणारे पत्ररूप यूरोपचा प्रवास (१९३८) हे पां.वा. काणे यांचे प्रवासवर्णनही लक्षणीय आहे.  श्री. रा. टिकेकर यांची मुसलमानी मुलुखांतली मुशाफरी (१९३१) सारखी बातमीपत्रे त्यांच्या डोळस निरीक्षणाची व देशाभिमानाची साक्ष देणारी असून त्यांनी प्रवासवर्णनाच राजकीय आशयाला स्थान प्राप्त करून दिले.

अनंत काणेकरांनी धुक्यातून लाल ताऱ्याशकडे (१९४०) लिहून या वाङमयप्रकाराला वेगळे वळण दिले.  काव्यात्मकता, प्रसंगातील नाट्य हेरण्याची वृत्ती, बोलक्या व्यक्तिरेखा, चित्रमयता, मार्मिक विनोद या गुणांनी ललितरम्य झालेल्या आमची माती, आमचे आकाश (१९५०) निळे डोंगर, तांबडी माती (१९५७) खडक कोरतात आकाश (१९६४), गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या (१९६९) या प्रवासवर्णनांत निसर्ग आणि माणूस ह्यांत रंगलेल्या लेखकाच्या रसिक, जिज्ञासू, संपन्न व्यक्तिमत्वावर घडलेल्या संस्कारांची ताजी, टवटवीत चित्रे अनौपचारिक शैलीने रेखाटलेली आहेत.  पूर्वीच्या स्थलवाचक प्रवासवर्णनांना काणेकरांनी व्यक्तिवाचक बनविले.  गो.नी.दांडेकर यांची नर्मदेच्या तटाकी (१९४९), दुर्गदर्शन (१९६९)महादेवशास्त्री जोशी यांची तीर्थरूप महाराष्ट्र (१९५०), महाराष्ट्राची धारातीर्थे (१९६१) ही प्रवासवर्णने उभयतांच्या भावभक्तीचा, रसडोळस जिज्ञासूपणाचा आणि ओघवत्या संस्कृतप्रचुर भाषेचा सुखद अनुभव देतात.  आमच्या देशाचे दर्शन (१९४३), भक्तिकुसुमे (१९४४), लाटांचे तांडव (१९४५ तिन्हींचे अनुवादक वामन चोरघडे, माधव सावंत) – लोकमाता (१९३८) या पौराणिक संदर्भ, वेधक शब्दचित्रे आणि गतिमान भाषाशैली यांनी नटलेल्या द.बा. ऊर्फ काका कालेलकरांच्या प्रवासवर्णनांतून एका निसर्गप्रेमी प्रतिभावंताचा परिचय होतो.  त्यांनी प्रवासवर्णनांना उत्कृष्ट चिंतनिकांचा दर्जा प्राप्त करून दिला.  प्रवासवर्णनांना कलात्मक साज चढविणाऱ्यान मोजक्या लेखकांत रा.भि. जोशी ह्यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे.  सूक्ष्म निरीक्षण, सौंदऱ्याचे अचूक टिपण, वाङमयीन संदर्भ, पौराणिक प्रसंगांची माहिती, संस्कृत अवतरणे यांमुळे त्या त्या स्थळांचा इतिहास जिवंत करून जोशी ह्यांनी स्थलप्रत्यय तर साधलाच पण प्रवासवर्णनांना ललित निबंधाच्या पातळीवर नेऊन पोहोचविले.  वाटचाल (१९५३) व मजल दरमजल (१९६१) ही त्यांची प्रवासवर्णने.  प्रवास करणे हा जोशी ह्यांचा छंद असून आपल्या व्यक्तिमत्वाच्या आविष्काराचे साधन म्हणून प्रवासवर्णन हा वाङमयप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळला आहे.गंगाधर गाडगीळांनी गोपुरांच्या प्रदेशात (१९५२) मध्ये दक्षिण भारताचे मनोज्ञ दर्शन घडविले आहे.  गाडगीळांना नावीन्याची हौस असून त्यांची वृत्ती प्रयोगशील आहे.  ह्याचा प्रत्यय त्यांच्या साता समुद्रापलिकडे (१९५९) मध्ये येतो.  ह्या प्रवासवर्णनात गाडगीळांना कालानुक्रमाच्या नोंदीला किंवा माहितीला महत्व दिलेले नाही.  एखाद्या कथाबीजाने लेखकाच्या मनाची पकड घ्यावी, त्याप्रमाणे परदेशप्रवासातील ज्या अनुभवांनी त्यांच्या मनाची पकड घेतली, त्या अनुभवांना कलावंताच्या शुद्ध भूमिकेतून प्राप्त झालेले तरल, व्यापक व संमिश्र स्वरूप साकार करण्यावर गाडगीळांच्या विशेष भर आहे.  हे प्रवासवर्णन म्हणजे या वाङमयप्रकाराच्या विकासपरंपरेतील एक महत्वाचा टप्पा आहे.  पु.ल. देशपांडे ह्यांनी आपल्या अभिजात विनोदी लेखनपद्धतीने प्रवासवर्णनांत वेगळेपण आणले.  अपूर्वाई (१९६०), पूर्वरंग (१९६५), वंगचित्रे आणि जावे त्यांच्या देशा (दोन्ही १९७४) ह्या सर्वात देश-परदेशच्या विविध व्यक्ती-प्रसंगांचे चटकदार दर्शन घडवीत असतानाच अंतर्मुख होऊन स्वतःच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचेही दर्शन त्यांनी घडविले. जीवनातील नानाविध सुसंगतींचे व विसंगतीचे त्यांनी मिष्कीलपणे वर्णन केले आहे.  प्रवासाची पूर्वतयारी, प्रवासाला निघताना येणाऱ्याण अडचणी, परदेशासंबंधी लिहिताना स्वदेशाशी केलेली तुलना इ. गोष्टी देशपांडे ह्यांनी अशा खुमारीने लिहिल्या आहेत, की बर्याीचशा प्रवासवर्णनकरांनी त्यांचेच अनुकरण केले.  पु.ल. देशपांडे यांच्या प्रवासवर्णनांतील अपूर्वाई भूप्रदेशाची नाही, विनोदाचीही नाही, तर ती शैलीची व दृष्टीची आहे.  वाचकांना अंतर्मुख करून चिंतनशील बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रवासवर्णनांत आहे.  अगस्तीच्या अंगणात (१९५७), उडता गालीचा (१९५९), तोकोनामा (१९६१), हिरवी उन्हे (१९६४) ह्या प्रवासवर्णनांना प्रभाकर पाध्ये ह्यांच्या विवेचक सौंदर्यदृष्टीमुळे वेगळा साज चढला आहे.  राजकीय दृष्टी, पत्रकारिता, तत्वजिज्ञासा, कलाभिरुची, काव्यात्मकता व निसर्गप्रेम यांचा सुंदर एकमेळ त्यांत साधला आहे. अनौपचारिकपणामुळे ह्या प्रवासवर्णनांची प्रकृती लघुनिबंधात्मक वाटते.

प्र.के. अत्रे ह्यांची साहित्ययात्रा (१९५६), भ्रमंती (१९५६), केल्याने देशाटन (१९६१) चिं.वि. जोशी ह्यांचे संचार (१९४५) ना.सी. फडके ह्यांची कमलपत्रे (दुसरी आवृ. १९४९) शशिकांत पुनर्वसूंचे ऊब आणि गारठा (१९५७) जयवंत दळवींचे लोक व लौकिक (१९५८) न.वि. गाडगीळांचे मुठा ते मेन (१९६५) व इतर स्फुट प्रवासवर्णने ज्ञानेश्वर नाडकर्णी ह्यांचे विलायती वारी (१९५९) अरविंद गोखले ह्यांचे अमेरिकेस पाहावे जाऊन (१९५९) रमेश मंत्री ह्यांचे थंडीचे दिवस (१९६३), क्षणाचा प्रवासी (१९७०), सुखाचे दिवस (१९७५) वसंत बापटांचे बारा गावचं पाणी (१९६७) मधुकर केचे ह्यांचे एक भटकंती (१९६८) माधव गडकरी ह्यांचे मुंबई ते मॉस्को … (१९६९) इंदू साक्रीकरांचे पूर्वेच्या परिसरात (१९७०) रवींद्र केळेकरांचे जपान असा दिसला श्रीपाद जोशी ह्यांचे चिनारच्या छायेत (१९५८), जा जरा पूर्वेकडे (१९७३), पूर्वाचलाची मुशाफिरी दि.बा. मोकाशी ह्यांचे पालखी (१९६४) आणि अठरा लक्ष पावले (१९७१) रवींद्र पिंगे ह्यांचे आनंदाच्या दाही दिशा (१९७४) मीना देशपांडे ह्यांचे पश्चिमगंधा (१९७५) इ. सर्व प्रवासवर्णने त्या त्या लेखक-लेखिकेच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविणारी, सांकेतिक पद्धतीचे अनुकरण न करता स्वत:चे वेगळेपण दाखविणारी, म्हणून निर्देशावी लागतील.  दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांचे शीबा राणीच्या शोधात (१९७०) हे पुस्तक आत्मवृत्तात्मक-प्रवासवर्णनाचा एक प्रभावी नमुना होय.

प्रारंभीच्या काळात प्रवासवर्णनांचे स्वरूप माहितीवजा टिपणांचे होते.  लेखकाचे व्यक्तिमत्व आणि प्रवासस्थळाचे वैशिष्ट्य ह्यांच्या परस्परांवर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांमधून वस्तुनिष्ठेकडून आत्मनिष्ठेकडे या वाङमयप्रकाराचा प्रवास होत राहिला.  आत्मचरित्राप्रमाणेच प्रवासवर्णन हीदेखील नवनिर्मिती मानली जाऊ लागली असून प्रवासवर्णनाला ललितलेखनातील महत्वाचा वाङमयप्रकार म्हणून मान्यता प्राप्त होऊ लागली आहे.

गोखले, वि.पु.


बालसाहित्य:स्वातंत्र्यपूर्वकाल: १८०६ ते १८५० (प्रारंभकाल): एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बालवाङमय, स्वतंत्रपणे लिहिलेले, स्वतंत्र ग्रंथरूपात नव्हते.  ऋग्वेद, रामायण, महाभारत ते बुद्ध-जैन काळापर्यंतच्या पाच सहा हजार वर्षांतल्या कथा-वाङमयात दर्जेदार प्राणिकथा, कल्पितकथा, अदभुतकथा, लोककथा, बुद्धजातक कथा, जैन कथाकोश कथा, कथासरित्सागरातल्या कथा, पंचतंत्र, हितोपदेशकथा अशा वेळोवेळी भर पडत जाऊन भारतीय कथावाङमय खूप समृद्ध झाले होते.  या सर्व कथांचा हेतू सर्वसामान्य लोकांना मनोरंजनातून नीतिशिक्षण देण्याचा होता.

मुलांचे मन कोवळे, भावनाशील व संस्कारक्षम असल्यामुळे यांतल्या बऱ्यातच कथा मुलांना अधिक उपयुक्त होण्यासारख्या होत्या.  भारतीय कथावाङमयाच्या या विपुल खजिन्यातून मुलांना सांगण्याजोग्या कथा, कहाण्या नेमक्या निवडून मौखिक म्हणजेच कथित बालवाङमयाचे पारंपारिक स्वतंत्र दालन घरोघरीच्या वयस्क स्त्रियांनी मोठ्या कौशल्याने तयार केले होते.

अनेक कल्पक स्त्री-पुरुषांनी वेळोवेळी या कथित वाङमयभांडारात स्वत:च्या कथांची, बालगीतांची भरसुद्धा घातली असणार. ‘चिमणीचे घर होते मेणाचे आणि कावळ्याचे घर होते शेणाचे’ ही पारंपारिक शिशुकथा प्राचीन मराठीत महानुभवांच्या साहित्यात आढळते.  ‘आटपाट नगर होते’ अशी सुरुवात असलेल्या कहाण्या, वेळोवेळी भर पडून, अजूनही व्रतांच्या, सणांच्या निमित्ताने व एरव्हीही सांगितल्या जातात.

परंतु मराठी बालवाङमयाला, एकदम कलाटणी मिळाली ती मुद्रणकलेच्या उदयामुळे.मुद्रणकलेच्या शोधानंतर यूरोपातून भारतात येणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक बायबलचे व ख्रिस्ताचे उपदेशपर साहित्य भारतीय भाषांत छापण्यासाठी भारतात मुद्रणालये काढू लागले भारतीय भाषांचे टाइप तयार करू लागले. ख्रिस्ती धर्माची माहिती लोकांच्या मातृभाषेतून सांगणे अधिक परिणामकारी होणार होते.

मराठी बालसाहित्याच्या प्रारंभकाळात तंजावरचे राजे सरफोजी यांनी १८०६ साली मराठी भाषिक मुलांसाठी सख्खन पंडित (सारस्वत पंडित असेही म्हणतात) या गृहस्थाकडून इंग्रजीतील इसापनीतीचा मराठीत अनुवाद करविला आणि तो छापविला.  या पुस्तकाचे नाव बालबोध मुक्तावली असे ठेवण्यात आले होते. या पुस्तकाचे विशेष स्वागत झाल्याचे दिसत नाही.

कलकत्त्याजवळील श्रीरामपूर येथे विल्यम कॅरीन वैजनाथशास्त्री कानफाडे ह्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून सिंहासनबत्तिशी आणि हितोपदेश ह्यांचे मराठी अनुवाद करविले. सिंहासनबत्तिशी श्रीरामपूरला छापली. (१८१४) व हितोपदेशही १८१५ मध्ये श्रीरामपूरलाच छापले.ही दोन्ही पुस्तके मोडी लिपीत छापलेली होती.  १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजी सत्तेचा पाया पक्का होऊ लागला.

१८२२ मध्ये मुंबईत हैंदशाळा शाळापुस्तक मंडळी स्थापन झाली. तिचे नेटिव सेक्रेटरी ⇨सदाशिव काशीनाथ छत्रे (१७८८ – १८३० ?) ह्यांनी बालांसाठी बाळमित्र माग पहिला (१८२८), इसप-नीतिकथा (१८२८), वेताळपंचविशी (१८३०), बोधकथा (१८३१) ह्यांसारखी पुस्तके लिहिली. त्यांपैकी बाळमित्र हे एका फ्रेंच ग्रंथावरून तयार केलेल्या बर्‌क्किन्स चिल्ड्रन्स फ्रेंड ह्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. बोधकथा हे ताराचंद दत्त ह्यांच्या प्‍लीजिंग टेल्स ह्या ग्रंथाचे भाषांतर होते. बोधकथा ह्या पुस्तकाचाच दुसरा भाग ð बाळशास्त्री जांभेकर ह्यांनी नीतिकथा ह्या नावाने प्रसिद्ध केला (१८३१). छत्र्यांनी आपल्या पुस्तकांतून सोपी पण आकर्षक भाषा वापरली होती. तसेच त्यांनी केलेली कथांची मांडणी कुतूहलजनक होती. बाळमित्राचा दुसरा भागही गेस्फोर्ड नावाच्या इंग्रज लेखकाने मराठीत आणला (१८३३). १८३७ मध्ये विष्णुशास्त्री बापट ह्यांनी मुलांना नीतिशिक्षण देण्यासाठी नीतिदर्पण तयार केले.मुंबई सरकारचा मुख्य सचिव डब्ल्यू. एच्‌. वॉथेन ह्याने मुळात इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद होय. परंतु नीतिदर्पण मुलांच्या दृष्टीने पाहता थोडे अवघड होते. ‘…मराठी शाळांवर पढणार्‍या मुलांस नीतिज्ञान व्हायाजोगे ग्रंथ फार थोडे आहेत, असा अभिप्राय मनात आणून…’ हा ग्रंथ केल्याचे खुद्द विष्णुशास्त्री बापटांनी म्हटले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले लिखित बालसाहित्य तसे बाल्यावस्थेतच होते. मौखिक म्हणजे कथित बालसाहित्याला घरोघरच्या आजीबाईनी. सोपी सुटसुटीत भाषा,कुतूहल व औत्सुक्य वाढणारी मांडणी, मनोरंजन किंवा विचारप्रवर्तक प्रसंग व कथा खुलविण्याची हातोटी यांमुळे भरीव केले होतेपण लिखित बालसाहित्य पाहिले तर बोजड भाषा, शैलीचा अभाव, न पेलणारी पृष्ठसंख्या, अवघड कथावस्तू असे दोष दिसतात. या बालसाहित्यावर साहित्यिक लेण्यांचा आवश्यक असणाग साज विशेषता चढू शकला नव्हता. हे अनुवादित होते. मात्र बालसाहित्यलेखनात प्रगतीचे प्रयत्‍न जारीने चालू होते हे निर्विवाद.


१८५१ – १९०० : हा मराठी बालसाहित्याचा विकासकाल. १८४७ मध्ये ⇨मेजर ट्रॉमस कँडी (१८०४ – ७७) ह्याची‘मराठी ट्रॅन्सलेटर व रेफरी’ म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्याने मराठी पुस्तकांची पोथी पद्धतीची प्रौढ भाषा टाळण्याचे प्रयत्‍न केले. इंग्रजी पद्धतीची, तसेच व्याकरणदोषयुक्त वाक्यरचना काढून टाकण्याचा कटाक्ष ठेवला. बालवाङ्‌मयाच्या दृष्टीने हे धोरण उपयुक्त ठरले.विनायक कोंडदेव ओक व हरि कृष्ण दामले(१८५४ – १९१३ ) ह्यांची ह्या धोरणास मदत झाली. विनायक कोंडदेव ओक ह्यांनी कँडीच्या धोरणानुसार शालेय पुस्तके लिहिली. त्यांनी मुलांसाठी बालबोध हे मासिक काढून त्यातून सहज व सोफ्या भाषेत चरित्रे, कविता, निबंध इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले. खर्‍या अर्थाने मराठी बालवाङ्‌मयाचा पाया त्यांनी घातला, असे म्हटले जाते. दामले ह्यांनी मुलांस नवी देणगी (आवृ. २ री, १८९३), सुबोध गोष्टी (भाग १, आवृ. ५ वी, (१९११), (भाग २, आवृ. ४ थी, १९०८), (भाग ३, आवृ. ३री, १९०६), सायंकाळची करमणूक (आवृ. ४ थी, १९१३), इसाप नीति) आवृ.नवी, १९१५) ह्यांसारखी रूपांतरित व स्वरचित पुस्तके लिहिली.

 

या कालखंडात रामजी गणोजी चौगुले (नारायणबोध, भाग १ ला, १८६०), गोविंदशास्त्री बापट (हरि आणि त्रिंबक, रूपांतर, १८७५), मोरेश्वर गणेश लोंढे (बोधशतक, १८८२), विष्णु जिवाजी पागनीस (जिल्‌ब्लास चरित्र, १८७१), कृष्णशास्त्री आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर, (रासेलस, सॅम्युएल जॉन्सनकृत रासेलस ह्या ग्रंथाचा अनुवाद, १८७३ वगैरेंनी बालसाहित्यात भर घातली.

१९०१ – १९५० : विसाव्या शतकाच्या प्रारंभ ⇨वासुदेव गोविंद आपटे(१८७१ – १९३०) यांच्या बालसाहित्यानने चिरस्मरणीय झाला. त्यांनी आपल्या लेखनात बालसाहित्याच्या विविध पैलूंचे सुरेख दर्शन घडवून बालसाहित्याच्या विकासाचा व क्रांतीचा एक नवा टप्पा निर्माम केला. उत्तम बालसाहित्याला प्रत्साहन देण्यासाठी त्यांनी आनंद मासिक काढले ( १९०६ ). रामायणांतल्या सोफ्या गोष्टी (१९०६ ), बालभारत ( आवृ. २री, १९०६ ), महाराष्ट्र देशाचा बालबोध इतिहास ( १९०७ ), बालभागवत (१९०९), वीरांच्या कथा ( १९१० ), लहान मुलांसाठी मैजेच्या गोष्टी ( भाग १ ला, १९११ ), परीस्तानांतल्या गोष्टी, बालमनोरंजन (१९१५), बालविहारमाला ( १९३०) ही व ह्यांसारखी त्यांनी लिहिलेली अन्य पुस्तकेही मुलांना व पालकानांही वाचनात खिळवून ठेवीत.

 

याच कालखंडात हॅन्स अँडरसन व ग्रिमबंधूच्या काही नावाजलेल्या परीकथा मराठीत अनुवादित किंवा रूपांतरित झाल्या. विष्णू धों. कर्वे ( लहान मुलांकरिता गोष्टी, १९१६), म. का. कारखानीस (अद्‌भुतकथा, भाग १, २, १९२७) ह्यांसारखे बरेच लेखक पुढे आले. बिरबलाच्या चातुर्यकथा आपापली शीर्षके देऊन वेगवेगळ्या लेखकांनी मनोवेधक भाषेत लिहिल्या.⇨ताराबाई मोडक (१८९२ – १९७३), म. का. कारखानीस, शं. ल. थोरात, मा. के. काटदरे, कावेरी कर्वे, देवदत्त नारायण टिळक, दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ दत्तकवी इत्यादींनी बालसाहित्यात शिशुगीते व शिशुकथा यांची स्वतंत्र प्रथा सुरू केली. मराठी लोककथासाहित्यात शिशुकथा भरपूर आहेत. ताराबाईनी आजीबाईच्या गोष्टी ( दोन भाग, १९३९, १९४३)या पुस्तकात त्यांतल्या बर्‍याच कथा एकत्रित केल्या. स्वत:ही शिशुकथा रचल्या नाटुकली लिहिली. म. का. कारखानिसांच्या सोप्या, पद्दात्मक, अनुप्रासात्मक शिशुकथांनी बालसाहित्यात रंगत भरली. या प्रांतात सरलाताई देवधर ( ताराबाईच्याच शिव्या), शेष नामले यांनीही भरीव कार्य केले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात रेव्ह. ना. वा. टिळक, त्र्यंबक बापूजी ठोमरे ( बालकवी ), श्री. बा. रानडे, सत्यबोध हुदलीकर, मा. के. काटदरे, महादेवशास्त्री जोशी, ह. ना. आपटे, गोपानाथ तळवळकर, ना. ह. आपटे, चिं. वि. जोशी, शरच्चंद्र टोंगो, मायादेवी भालचंद्र, विमला मराठे, भवानीशंकर पंडित, वामनराव चोरघडे, के. नारखेडे, आनंदराव टेकाडे, देवदत्त ना. टिळक, पां. श्री. टिल्लू, भा. रा. तांबे, विठ्ठलराव घाटे, साने गुरूजी, शं. रा. देवळे, ह. भा. वाघोलीकर, व्यं. रा. खंडाळीकर, वि. वि. बोकील, ना. धों. ताम्हनकर, भा. रा. भागवत, भा.म. गोरे, मालतीबाई दांडेकर, ग. ह. पाटील, ना. गं. लिमये, प्रभावती जोशी, वि. म. कुलकर्णी, संजीवनी मराठे, वा. गो. मायदेव, भालचंद्र वैद्य, ना. घ. पाटील आणि इतर अनेकांनी बालसाहित्याचा काव्य व गद्यविभाग नादमधुर सोफ्या शब्दांनी, विषयाच्या सुरेख सुटसुटीत मांडणीने अतिशय आकर्षक तर केलाच, पण संपन्नही केला. आधुनिकतेचे व आगळेपणाचे वळण देणार्‍या बालकवी, भा. रा. तांबे, वामनराव चोरघडे, गोपीनाथ तळवलकर, साने गुरूजी, ताराबाई मोडक, ना. धों. ताम्हणकर भा. रा. भागवत, मालतीबाई दांडेकर अशा काही लेखकांनी तर स्वातंत्र्यपूर्व बालसाहित्यात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ताराबाई मोडकांच्या नदीच्या गोष्टीतील वाक्ये, ‘मी होते डोंगरावर, डोंगराच्या पोटात, थेंब थेंब वहात होते.’ किंवा शेष नामल्यांचे सुंदर बालगीत ‘या या चांदण्यानो अंगणी माझ्या … सोबत चंद्रा घेऊन या या, चमकत ठुमकत अंगणी या या’ पाहिल्यावर स्वातत्र्यपूर्व काळातले मराठी बालसाहित्य सोपी व मनोवेधक भाषा, मुलांच्या वयानुरूप विषयांची निवड, कल्पनारम्यता या बाबतींत किती भरभर विकास पावत होते व त्या कालखंडातले सर्वच लेखक त्यासाठी किती प्रयत्‍न करीत होते हे लक्षात येते.


बालमासिके : पुणे येथील नॉर्मल स्कूलमध्ये पुणे पाठशालापत्रक नावाचे एक नियतकालिक १८६१ मध्ये निघाले. १८६३ पासून त्याचे नाव बदलून मराठी शालापत्रक असे ते ठेवण्यात आले. कृष्णशास्त्री चिपळूणकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर हे पितापुत्र ह्या मासिकाचे काही काळ संपादक होते. १८७५ मध्ये मासिक सरकारी अवकृपेमुळे बंद पडले. चिपळूणकर पितापुत्रांच्या मृत्यूनंतर, १८९० मध्ये ह्या मासिकाचे पुनरूज्‍जीवन करण्यात आले. ह्या मासिकाने लहान मुले व विद्यार्थी ह्यांना उपयुक्त असा गोष्टी, चरित्रे इ. बराच मजकूर प्रसिद्ध केला. दुसरे मासिक बालबोध मेवा ( १८७३). कथाकवितांच्या द्वारा चांगल्या वाचनाची गोडी मुलांना लागावी म्हणून हे सुरू करण्यात आले होते. रेव्ह. इ. एच्‌. ह्यूम, एमिली बिसेल, देवदत्त ना. टिळक, वत्सलाबाई घाटे आदींनी वेळोवेळी त्याच्या संयादनात भाग घेतला. १८८१ मध्ये विनायक कोंडदेव ओकांनी बालबोध हे मासिक काढले. मुलांसाठी गोष्टी, गाणी, ज्ञान, मौज इ. देणे हा वा. गो. आपटे ह्यांच्या आनंदाचा हेतू. महाराष्ट्राच्या बालसृष्टीत ह्या मासिकाने मोठा आनंद निर्माण केला. लोकप्रियतेत त्याने शालापत्रकालाही मागे टाकले. विविध साहित्याची मेजवानी मुलांना त्याने दिली. आपटे यांच्या नंतर गोपीनाथ तळवलकरांनीही आनंद अतिशय समर्थपणे चालवला. कोकणात, मालवणसारख्या खेडेगावी पारूजी नारायण मिसाळ यांनी बालसन्मित्र मासिक काढले आपल्या बालसन्मित्र मालेतर्फे विविध प्रकारचे विपुल साहित्य बालवाचकांना दिले. १९१८ मध्ये शंकर बळवंत सहस्त्रबुद्धे यांनी बालोद्यान ह्या सचित्र मासिकाचे प्रकाशन सुरू केले. आजच्या लोकप्रिय चित्रकथांची ( कॉमिक्स) झलक बालोद्यानमध्ये आढळते. या मासिकाची भाषा तर बालसुलभ, अगदी सुटसुटीत आणि गोड पण थोड्या वर्षानीच ते बंद झाले. मग १९२७ मध्ये दोन मासिके उद्‍यास आली. नागपूरचे बाळकृष्ण रामचंद्र मोडकसंपादित मुलांचे मासिक व मुंबईच्या का. रा. पालवणकरांचे खेळगडी. हे खेळगडी अतिशय खेळकरपणे मुलांच्या माहितीत भर घालगारे, विविध प्रकारांनी मुलांचे मनोरंजन करणारे. १९५० मध्ये ते बंद झाले. १९४७ मध्ये वीरेंद्र अढिया यांनी कुमार मासिक सुरू केले. १९५० मध्ये तेही बंद झाले.

बालनाट्य : १८९९ मध्ये पन्हाळगडाचा किल्लेदार हे नाटुकले किरांतानी लिहिले. राम गणेश गडकर्‍यांचे ‘सकाळचा अभ्यास’ हे प्रहसनही प्रसिद्ध झाले होते. आनंदातून वा. गो. आपटे यांनीही संवाद लिहिले होते. अत्र्यांचे गुरूदक्षिणा ( १९३० ) हे बालनाट्यही उल्लेखनीय आहे. केवळ मुलांनी किंवा केवळ मुलींनी करण्याजोगी नाटुकली गरजपरत्वे लिहिली गेली. ना. धों. ताम्हनकर, स. अ. शुल्क, चिं. आ. मुंडले यांनी नाटुकली लिहिली.

दिवाकरांच्या नाट्यछटाही मुले हौसेने करीत. के. गो. पंडितांनीही संवाद व नाट्यछटा लिहिल्या. वि. द. घाट्यांनी नाट्यरूप महाराष्ट्र (१९२६) लिहून चांगल्या ऐतिहासिक बालनाट्याला प्रारंभ केला. १९५५-५६ पर्यत शालेय समारंभाच्या निमित्ताने, मोठ्यांच्या नाटकांतले किंवा मुद्दाम लिहिलेले, मुलांना योग्य असे प्रवेश वा नाटिका निवडण्यात येत. गणेशोत्सवाच्या मेळ्यांसाठी संवाद, नाटुकली मद्दाम लिहिली जात. उदा., पुरूषोत्तम दारव्हेकरांची सुंदर बालनाट्ये. दिवसेंदिवस, संवादातली वाक्ये मुलांना सहज बोलता येतील अशी छोटी बनली. पुष्कळ मुलांना काम मिळेल अशी नाटुकली लिहिली जाऊ लागली.

स्वातंत्र्यपूर्व बालसाहित्यात एकोणिसाव्या शतकातले बालसाहित्य बहुतांशाने परकीय कुबड्यांच्या आधाराने वाटचाल करीत होते. पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले स्वातंत्र्यपूर्व बालसाहित्य, काव्य, कथा, कादंबरिका, नाट्य, मासिके या सर्वच प्रांतांत स्वतंत्र कल्पना नादमधुर, सोपी भाषा कुशल मांडणी व आकर्षक शैलीने नटलेले मनोरंजन व स्वतंत्रपणे वाटचाल करणारे बनले होते.

स्वातंत्र्योत्तर काळातील बालसाहित्य : १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्योत्तर काळात खूप पुढे आलेल्या लेखकांपैकी काही स्वातंत्र्यापूर्वीही लिहीत होतेच.

साने गुरूजी ( १८९९- १९५० ) ह्यांचे साहित्य स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात लिहिले गेले.तथापि त्यांचे साहित्य विशेष लक्षवेधी ठरले ते स्वातंत्र्योत्तर काळात. ‘गोड गोष्टी’ ह्या त्यांचा कथाकादंबरिकांच्या मालेत प्रसिद्ध झालेल्या नदी शेवटी सागराला मिळेल ( १९४२ ), दु:खी ( १९४२ ), मनूबाबा ( १९४२ ), बेबी सरोजा ( १९४३ ), करूणा देवी ( १९४३ ) तसेच आपण सारे भाऊ ( १९४७ ), गोप्या ( १९४७ ), दुर्दैवी ( १९४७ ), मिरी (१९४७ )इ. पुस्तकांनी थोरामोठ्यांचे मन हेलावून टाकले. ओघवत्या, सहजसोफ्या भाषेने व शौलीने इतर काहीच्या लेखनावरही छाप टाकली.

भा. रा. भागवतदेखील स्वातंत्र्यपूर्वकाळापासून लिहीत असले, तरी त्यांच्या झ्यूल व्हेर्नच्या कथांच्या अनुवादांनी त्यांची मुलांशी दाट गट्टी जमली, ती स्वातंत्र्यानंतर, झ्यूल व्हेर्नच्या शास्त्रीय व चमत्कृतिपूर्ण कथांना भारतीय वातावरणात बेमालूम बसवून भागवतांनी पुष्कळ कादंबर्‍या लिहिल्या आहेत. चंद्रावर स्वारी, सूर्यावर स्वारी, मुक्‍काम शेडेनक्षत्र वगैरेसारख्या शास्त्रीय चमत्कृतींच्या कादंबर्‍यांनी व ‘फास्टर फेणे’ च्या साहस कादंबर्‍यांनी भागवत हे मुलांचे फार लाडके लेखक बनले आहेत. मालतीबाई दांडेकरांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या अनेक कादंबरिकांनी, कथांनी व नाटुकल्यांनी मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे. माईच्या गोष्टी ( २ भाग, १९४४, १९४९ ) जलराज्यातल्या जमती ( २ भाग, १९४८ ), चिनी गुलाब ( १९४९ ) वगैरे त्यांची अनेक पुस्तके मुलांची आवडती आहेत. यांव्यतिरिक्त मालतीबाईनी, बालसाहित्याची रूपरेखा ( १९६४ ) हे मौलिक, अभ्यासपूर्ण पुस्तक लिहून बालसाहित्याच्या विकासाचा संपूर्ण मागोवा घेतला आहे. या पुस्तकामुळे बालसाहित्य छापले जाऊ लागल्यापासून त्याच्या प्रकृतीत, भाषेत, कल्पनाविष्कारात व शैलीत वेळोवेळी कसा फरक होत गेला, हे ध्यानी येते.


भा. द. खेर ( ऐतिहासिक गुजगोष्टी – साहा. रा. आ. जोशी, १९४९ ), वामनराव चोरघडे ( चंपाराणी, १९४४ प्रभावती, १९४५ ), गोपीनाथ तळवलकर ( गृहरत्न, आवृ. २री, १९४५ नवी गृहरत्ने, १९४८ ), के नारखेडे ( मधुराणी, १९४८ ),गो.नी. दांडेकर ( आईची देणगी, ६ भाग, १९४५ – ४८ सिवबाचे शिलेदार १९४९ ), विष्णू नरहर गोंधळेकर ( ज्ञान व मौज, १४ भाग ), नी. शं. नवरे ( दिग्विजयी रघुराजा, १९४४ ), ह.भा. वाघोळीकर ( सागरकन्या, १९४४ सोनेरी पक्षी, १९४४), महादेवशास्त्री जोशी ( आईच्या आठवणी ३ भाग, १९४७- ४८ गुणमंदिर, १९५० ), श्री. बा. रानडे ( तिबूनानांचा रेडिओ, १९४४ ), ग. म. वैद्य ( करवंदे, १९४५ ), गंगाधर गाडगीळ ( लखूची रोजनिशी ) ( १९४८ ), भालचंद्र रानडे ( इटुकल्या मिटुकल्या गोष्टी, १९४३ ), वि. वि. बोकील ( कुंतीचा घास, १९४७ मीनाघ्या गोष्टी, १९४९ ), शरच्चंद्र टोंगो, ( झेलम, १९४४ ), यदुनाथ थत्ते ( वाळवंटातले झरे, १९५० ), श्री. शं. खानवेलकर ( चन्दू, २ भाग, १९४३, १९४६ ), ना. ध. पाटील ( मानवतेचे पुजारी – थोरांची चरित्रे, ३ भाग, १९५० ), सुरेश शर्मा ( टारझन ), देवदत्त ना. टिळक ( वेणू वेडगावात, इ. ), द. के. बर्वे ( शंभू आणि शारी, १९४२,गुलछबू१९४४). ताराबाई मोडक ( गंपूदादांचा लाकडदंड्या, १९४४ सवाई विक्रम, १९४४ ) कावेरी कर्वे ( चिंगी, १९४२ ) पिरोजबाई आनंदकर ( किशोर कथा, १९४२ बालबहिर्जी, १९४७ ) चारूशीला गुप्ते ( बाजीप्रभू देशपांडे ) या व इतर अनेक साहित्यिकांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, साहसाच्या व शौर्याच्या छोट्यामोठ्या कथा, तसेच कादंबरिका स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात लिहून मुलांना आनंद दिला भारतीय संस्कृतीची ओळखही करून दिली.

 

स्वातंत्र्योत्तर कालात केंद्रशासित एन. सी. ई. आर्‌. टी. ( शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणार्थ राष्ट्रीय समिती ) तर्फे दरवर्षी बालसाहित्यस्पर्धा सुरू झाल्या. राज्यपुरस्कारही दिले जाऊ लागले. या स्पर्धानी अनेक उत्साही साहित्यिकांचे लक्ष वेधले. नव्या व जुन्या बर्‍याच साहित्यिकांनी वेळोवेळी भाग घतला. स्वकल्पित सुंदर पुस्तके लिहून बर्‍याच लेखकले खिकांनी पुरस्कार मिळविले आणि ते विशेष प्रकाशात आले. लीलावती भागवत, सुमति पायगांवकर, राजा मंगळवेढेकर, भा. रा. भागवत, शं. रा. देवळे, वि. स. गवाणकर, लीलाधर हेगडे, ग. ह. पाटील. ना. गो. शुल्क, मा. गो. काटकर, सुधाकर प्रभू, आशा गवाणकर, श्यामला शिरोळकर, निर्मला देशपांडे, विंदा करंदीकर, आशा भाजेकर वगैरे मंडळी यांत आहेत. या साहित्यिकांपैकी काहींनी तर ( भा. रा. भागवत, सुमति पायगांवकर, सुधाकर प्रभू, विंदा करंदीकर वगैरे ) पुन्हा पुरस्कार मिळविले.

सरकारी स्पर्धाचे काही महत्त्वाचे फायदे म्हणजे बालसाहित्याची सुरेख मजकुराची व सुंदर चित्रांची दर्जेदार पुस्तके पुष्कळ प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागली. बरेच नवे लेखक उद्‍याला आले. काही खाजगी संस्थांनीही स्पर्धाचा उपक्रम सुरू केला. १९६५ पर्यत मुलांचे व त्यांच्या पालकांचे लक्ष बालसाहित्याच्या पुस्तकांकडे खूपच आकर्षिले गेले. पुस्तकांचा मजकूर, टाइप, आकार, सजावट यांत सौंदर्यदृष्टी व मुलांचे वय लक्षून पुष्कळ फरक केले गेले.

दिल्लीत १९५७ मध्ये ⇨नॅशनल बुक ट्रस्ट ही संस्था स्थापन झाली. नेहरू बालपुस्तकालयही दिल्लीत प्रस्थापित झाले होते. या संस्थांनी मोठाली व खूप रंगीत चित्रांची, ठळक टाइपांची चित्तवेधक पुस्तके काढून बालसाहित्यात भरपूर आकर्षण निर्माण केले. नॅशनल बुक ट्रस्टच्या विविध पुस्तकांत प्राण्यांची पक्ष्यांची माहिती, वेगवेगळ्या भाषांतील काही गमतीदार लोककथा, परदेशीय कथांचे अनुवाद व काही स्वतंत्र कथा असे सुरेख साहित्य आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात काही खाजगी प्रकाशकांनी रूपांतरित किंवा अनुवादित कथा – कादंबरिकांच्या प्रकाशनाला सुरुवात केली. त्यातून टारझन ( सुरेश शर्मा ), गुप्त खजिना ( ट्रेझर आयलंड, ह. भा. वाघोळीकर ), धाडसी चंदू ( टॉमसॉयर, गंगाधर गाडगीळ ), शाळकरी मुले ( वित्या माल्येव, स. बा. हुदलीकर ), पळवलेला पोर ( किडनॅप्‌ड, श्रोत्री), सुलेमानचा खजिना ( किंग सॉलोमन्स माइन्स, मालतीबाई दांडेकर ) अशी केवढी तरी, बेतशीर पृष्ठसंख्येची, मनोरंजक, चांगली पुस्तके लिहिली गेली. भा. रा. भागवतांनी तर इयूल व्हेर्नची केवढी तरी कथानेक मोठ्या कौशल्याने रूपांतरित करून मराठी बालसाहित्याला भरीव देणगी दिली आहे. सुमति पायगावकरांनी हॅन्स अँडरसनच्या परीकथा ( भाग १ ते १६ ) व ग्रीमच्या परीकथा ( भाग १ ते १० ) अनुवादित करून बालसाहित्यात मोलाची भर टाकली आहे. शिवाय त्यांनी सोनपंखी कावळोबांच्या जमती, बदकताईंचा कॅक कॅक, मिनीची बाहुली, रानगावची आगगाडी, स्वप्नरेखा, चाफ्याची फुले, पोपटदादाचे लग्‍न अशी ( पुरस्कार विजेती ) स्वकल्पित, स्वतंत्र पुस्तकेदेखील अनेक लिहिली.

स्वातंत्र्योत्तर गद्य बालसाहित्याला आजपर्यत पुढील काही जुन्यानव्या मंडळींनी संपन्न केले आहे. ताराबाई मोडक, कमलाबाई टिळक, यदुनाथ थत्ते, सरोजिनी बाबर, शैलजा राजे, सविता जाजोदिया, सरिता पदकी, शांता शेळके, सरला देवधर, वि. म. कुलकर्णी, बा. रा. मोडक, बा. वा. फाटक, शं. ल. थोरात, ग. ल. ठोकळ, अंबादास अग्‍निहोत्री, वि. स. गवाणकर, राजा मंगळवेढेकर, भालबा केळकर, ना. वा. कोगेकर, रा. वि. सोवनी, वि. स. सुखटणकर, अमरेंद्र गाडगीळ, वि. कृ. क्षेत्रिय, सरोजिनी कमतनूकर, दि. नी.देशपांडे, आकाशानंद, ह. रा. पाटील, मा. गो. कुलकर्णी, व्यंकटेश वकील, दत्ता टोळ, मु. शं. देशपांडे, मा. गो. काटकर, ब. मो. पुरंदरे, म. वि. गोखले, आनंद घाटुगुडे, साधना कामत, अनुताई वाघ, कुमुदिनी रांगणेकर, गिरिजा कीर, लीला बावडेकर, मालती निमखेडकर, शकुंतला बोरगांवकर, तारा वैशंपायन, तारा कुलकर्णी, विजया वाड, न. दि. दुगल अशी केवढी तरी नावे देता येतील.


या लेखकांपैकी काहीचे लेखन अनुवाद-रूपांतराच्या स्वरूपाचे, तर काहींचे स्वतंत्र आहे. त्यात पौराणिक, अद्‌भुत व परीकथा भारतीय व परदेशीय लोककथा भारताच्या ऐतिहासिक कथा शौर्य व साहस कथा विज्ञानकथा चरित्रे, सामाजिक कथा अशी भरपूर विविघताही आहे.

 

मात्र याच कालावधीत असेही काही लेखक पुढे आले, की ज्यांच्या लेखनात मुलांना योग्य विषयही नाहीत नि मुलांनुरूप भाषांही नाही. नादपूर्ण शब्दांसाठी अर्थहीन अनुप्रासात्मक शब्द जोडून एका वाक्याच्या छापील चार पाच ओळी होतील अशा बोजड भाषेत कथावस्तूंची मांडणी असते. मोठा टाइप व थोडी पाने एवढीच जमेची बाजू. अद्‌भुत किंवा परीकथा असल्यास राक्षसाच्या भल्या बायकोने दिलेल्या जादूच्या अंगठीने किंवा परीच्या जादूच्या पिसाने बालनायक पटापट सर्व काही करू शकतो. बालकथांमागील मर्माचा या लेखकांनी अभ्यासच केलेला नसतो.

पण एकंदरीत पाहता बालसाहित्याच्या गद्य लेखकांनी, स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या कथावस्तूंना मनोरंजक वर्णने, चित्तवेधक प्रसंग, सुटसुटीत छोटी वाक्ये, सोपी भाषा आणि आकर्षक शैली ह्यांचा सुरेख साहित्यिक साज चढवुन मराठी बालसाहित्य खूपच मनोहर, लक्षवेधी, दर्जेदार केले आहे.

बालसाहित्यातील पद्यविभाग : साने गुरूजी, वा. गो. मायदेव, भवानीशंकर पंडित, ताराबाई मोडक, गोपीनाथ तळवलकर, शेष नामले, ग. ह. पाटील, संजीवनी मराठे, शांता शेळके, वगैरे मंडळी स्वातंत्र्यपूर्वकाळाचा उंबरठा ओलांडून उत्तरकाळात आली. बालकाव्य सोफ्या शब्दातले, नादमधुर, मुलांच्या विश्वातल्या विषयांवर, पण छोटेच असले तर मुलांना किती आवडते हे बालकवी, रे. टिळक व दत्त कवींनी पूर्वीच पटवून दिले होते. मायदेव, शांता शेळके, ग. ह. पाटील, राजा मंगळवेढे ह्यांनी लिहिलेल्या कविता गोड नि मुलांना सहज समजतील अशा आहेत. पुढील काही ओळीवरून बालकाव्याच्या प्रवाहाला हळूहळू कसे वळण मिळाले ते लक्षात येते.

‘थेंबा थेंबा थांब थांब, दोरी तुझी लांब लांब आकाशाला पोचली, तिथे कशी खोचली –(पाऊस–ताराबाई मोडक ).

‘कधी कधी मज वाटे जावे उंच ढगांच्यावर’, दो हातांनी रविचंद्रांचे हलवावे झुंबर ( संजीवनी मराठे ).

‘सदाकदा पहाल तेव्हा चिंतू आपला चिंतातूर-आभाळाला नाही खांब, चंद्र राहतो लांबलांब, समुद्राला नाही झाकण, कोण करील चांदण्याची राखण ? ( राजा मंगळवेढेकर ).

चिउताई चिउताई ! कायरे चिमणा ? हा बघ आणलाय मोत्याचा दाणा . पण ठेवायचा कुठे ? त्यात काय मोठं? बांधू या घरटं ! ( लीलावती भागवत ).

आई जरा ऐक माझं, आताच खाऊ देऊन टाक, दादा लवकर येणार नाही, नको पाहूस त्याची वाट. आई जरा ऐक माझं, आज शाळेत नाही जात, पोट जरा दुखतय माझं, तुलाही सोबत हवी घरात ! ( सुमति पायगांवकर ).

बालकाव्यांचा ओघ कल्पनाजगतातून रोजच्या विषयांकडे, वास्तव जगाकडे नि अवघडाकडून सोप्याकडे वळला, हे उपर्युक्त रचनांवरून दिसून येईल. रोज दिसणारी निसर्गदृश्ये, घडणारे प्रसंग यांतला गोडावा मुलांना दाखवण्याचा कवींनी अधिक प्रयत्‍न केला आहे. बालकाव्याच्या प्रातांत ताराबाई मोडक, संजीवनी मराठे, शांता शेळके, लीलावती भागवत, सुमति पायगांवकर, सरिता पदकी, सरला देवधर, सरोजिनी बाबर, मंदा बोडस, वंदना विटणकर, शिरीष पै, तारा वैशंपायन, तारा परांजपे, वृंदा लिमये, विजया वाड, डॉ. वि.म. कुलकर्णी, सूर्यकांत खांडेकर, मा. गो. काटकर, ग. दि. माडगूळकर, राजा मंगळवेढेकर, ग. ह. पाटील, ना. गो. शुल्क, शरद मुठे, विंदा करंदीकर मंगेश पाडगांवकर, आनंद घाटुगडे, महावीर जोंधळे यांनी मनोरंजक, सोफ्या, छोट्या, सुंदर कविता नि गोड बालगीते लिहून बालसाहित्याचा काव्यविभाग खूपच फुलवला. ‘सांग सांग भोलानाथ’ ( मंगेश पाडगांवकर ), नि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ( ग. दि. माडगूळकर ) ही गीते कोण विसरू शकेल?

बालनाट्य : जवळ जवल १९५५-५६ पर्यत शालेय कार्यक्रम, इतर उत्सव व आंतरशालेय नाट्यस्पर्धात मोठ्यांच्या नाटकांतील प्रवेश किंवा काही बालनाट्ये करणे ही प्रथा बहुतांशाने चालू होती. पुरूषोत्तम दारव्हेकरांनी आपल्या ‘रंजन कला मंदिर’ संस्थेतर्फे त्यांच्या गणपतीच्या मेळ्यांतील संवाद व नाटुकल्यांना हळूहळू व्यावसायिक रंगभूमीला योग्य असे रूप द्यायला सुरूवात केली. सई परांजपे यांनीही मुलांना गंमत वाटेल अशी छोटी नाटुकली लिहायला सुरूवात केली. त्यांनी प्रत्तेनगरी, शेपटीचा शाप, झाली काय गंमत इ. बरीच गंमतीदार नाटुकली लिहून मुलांना खरीखुरी बालनाट्ये सादर केली.

यामुळे बालनाट्यात दोन प्रवाह सुरू झाले. व्यावसायिक बालरंगभूमीसाठी मोठ्या माणसांनी कामे केलेली दोन-अडीच तासांची दोन-तीन अंकी मोठी नाटके आणि शालेय रंगभूमीसाठी, मुलांनी कामे करण्याजोगी सई परंजपे ह्यांच्या नाटुकल्यांसारखी छोटी नाटके. छोट्या नाटुकल्यांत मुलांना सहज उच्चारता येतील असे शब्द, पेलतील अशी नेटकी वाक्ये, जास्त मुलांना भाग घेता येईल अशी कथावस्तू व निखळ मनोरंजनातून जमल्यास, एखाद्या सुंदर गुणाचे दर्शन या गोष्टी प्रमुख असत व आहेतही. याच सुमाराची पु. ल. देशपांडे यांची  नवे गोकुळवयं मोठं खोटम्‌ही नाटुकली या दृष्टीने फारच सुरेख आहेत विजय तेडुंलकरांनीही चांभारचौकशीचे नाटक, बाबा हरवले आहेत, राजा राणीला घाम हवा वगैरे पाउण ते एक तासाची सुंदर बालनाट्ये लिहिली आहेत. ‘अविष्कार’ तर्फे सुलभा देशपांडे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे बरेच प्रयोग केले. राजाने चोरले पिठले, पोपट गेला उडून, शशी नि मयूरीला हवा मोत्याचा हार ही सुमती पायगांवकरांची छोटी नाटुकलीदेखील गाजली.

सुधा करमरकरांनी १९५९ साली लिट्‌ल थिएटर ( ‘बालरंगभूमी’) ही व्यावसायिक बालनाट्यसंस्था मुंबईला स्थापन केली. आजपर्यत मधुमंजिरी, अल्लादीन आणि जादूचा दिवा, अलीबाबा आणि चाळीस चोर, चिनी बदाम, हं हं आणि हं हं हं, सिंड्रेला यांसारखी कलात्मक किंवा भव्य नेपथ्यरचनेची, रंगतदार नि दर्जेदार, दोन अडीच तासांची नाटके करून मुलांना खूप आनंद दिला. यांतली काही नाटके स्वत: सुधाताईनी, तर काही दारव्हेकर, दिनकर नीलकंठ देशपांडे, रत्नाकर मतकरी वगैरेंनी लिहिली आहेत.

 

रत्नाकर मतकरींनी १९६१ मध्ये मुंबईला ‘बालनाट्य’ ही व्यावसायिक बालनाट्यसंस्था स्थापली. नेपथ्य शक्य तितके सुटसुटीत व प्रतीकात्मक करण्याकडे मतकरींचा कल आहे. त्यांची मोठ्यांनी कामे केलेली, दोन-अडीच तासांची निम्मा शिम्मा राक्षस, इंद्राचे आसन नारदाची शेंडी, राक्षसराज झिंदाबाद, गाणारी मैना, अलबत्या गलबत्या, अचाटगावची अफाट मावशी वगैरे नाटके खूप यशस्वी ठरली आहेत.

वंदना विटणकरांनीही बालनाट्ये लिहिली आहेत. पाच-सहा वर्षापूर्वी त्यांचे रॉबिनहूड हे अडीच तासांचे मोठ्यांनी छोट्यांसाठी केलेले व्यावसायिक नाटक खूपच यशस्वी झाले होते. वंदना थीएटर्स या त्यांच्या संस्थेने केलेले बजरबट्‌टू हे नाटकही गमतीदार आहे.

पुण्याला श्रीधर राजगुरूसंचालित ‘शिशुरंजन’ ही संस्थाही बालनाट्याचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन हे सर्व काम मोठ्या उत्साहात करीत असते. मुलांनी स्वत:ची मंडळे काढून किंवा शाळेत करण्याजोगी छोटी गमतीदार नाटके मालतीबाई दांडेकर व भालबा केळकर ह्यांनी फार सुरेख लिहिली आहेत. मुलांयोग्य विषय निवडून, त्यांना सुलभ जाईल अशा सुटसुटीत भाषेत कुतूहलपूर्ण किंवा गमतीशीर प्रसंगांवरील नाटुकली लिहिण्याचा पुष्कळ साहित्यिक अलीकडे प्रयत्‍न करीत आहेत. या प्रयत्‍नांमुळे मोठ्यांची नाटके करावी लागण्याच्या व शब्दावडंबराच्या दुरवस्थेतून आता मुलांची सुटका झाली आहे.

बालमासिके : स्वातंत्र्यापूर्वीची शालापत्रक, आनंद, मुलांचे मासिक ही बालसाहित्याची मन:पूर्वक सेवा करणारी मासिके. स्वातंत्र्योत्तर काळात काही वर्षानंतर शालापत्रक मात्र बंद झाले. १९४७ साली वीरेंद्र अढिया यांनी कुमार मासिक काढले आणि १९५१ मध्ये भा. रा. भागवतांनी बालमित्र मासिक काढले. दोन्ही मासिके चांगली असूनही आर्थिक तोट्यामुळे पुढे बंद पडली. यानंतर वि. वा. शिरवाडकरांनी कुमार नावाचेच मासिक काढले. अमरेंद्र गाडगीळांनी गोकुळ मासिक काढले. मराठी पाठ्यपुस्तक मंडळातर्फे किशोर हे रंगीबेरंगी चित्रांचे, बर्‍याच मजकुराचे मासिक सुरू झाले. आनंद, कुमार, मुलांचे मासिक आणि किशोर ही मासिके अजूनही आपले सुरेख साहित्य बालवाचकांना नेमाने देऊन मनोरंजनातून संस्कृतिसंवर्धनालही हातभार लावत आहेत. काही मोठ्यांची मासिके दिवाळीसाठी मुलांकरिता पुरवण्याही काढतात. प्रेस्टिज प्रकाशाने मुलांसाठी चालविलेल्या बिरबल, टारझन, क्रीडांगण ह्या नियतकालिकांतून मुलांना भरपूर चातुर्यकथा, साहसकथा आणि खेळांच्या कथा व माहिती मिळत गेली. वृत्तपत्रांची ‘रविवार पुरवणी’ व काही साप्ताहिकांची मुलांची पाने ही मुलांच्या मनोरंजनासाठी मजेदार गोष्टी, गीते, कोडी वगैरे देत असतात.

चित्रकथा : तर्‍हेतर्‍हेच्या छोट्या रम्यकथा, खाली अर्थसूचक वाक्ये व वर ठळक चित्रे देऊन मुलांना आकर्षून घेत असतात. ‘कॉमिक्स’ नावाची ही स्वतंत्र छोटी पुस्तके बर्‍याच मुलांना आवडतात. सोप्या सूचक वाक्यांमुळे मुलांत वाचनाची आवड उत्रन्न करण्यास कित्येकदा हा उपक्रम उपयोगी ठरतो.


एकंदरीत पाहाता, स्वातंत्र्योत्तर बालसाहित्य त्याच्या विविध शाखांत, आधीपेक्षा अधिक कल्पनारम्य, सोपे, शैलीदार, विचारप्रवर्तक, ज्ञानलक्षी, विज्ञानोन्मुख व मनोरंजक तर झाले आहेच पण विपुलही होत आहे.

पायगावकर, सुमति

यापुढील भाग मराठी साहित्य (अर्वाचीन-४ ) मध्ये पहा.