आपटे, नारायण हरि : (११ जुलै १८८९ – १५ नोव्हेंबर १९७१). एक मराठी कादंबरीकार. जन्म सांगली जिल्ह्यातील समडोळी या गावी. शिक्षण समडोळी आणि सातारा येथे. त्यांनी मुख्यतः कादंबरीलेखन केले असले, तरी लघुकथा, निबंध यांसारखे साहित्यप्रकारही हाताळले आहेत. त्यांनी पस्तीसाहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांतील बऱ्याचशा सामाजिक आहेत.न पटणारी गोष्ट (१९२३), सुखाचा मूलमंत्र (१९२४), पहाटेपूर्वींचा काळोख (१९२६), उमज पडेल तर (१९३९), एकटी (१९४५) या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा (१९०९), संधिकाल (१९२२), लांच्छित चंद्रमा (१९२५) आणि रजपूतांचा भीष्म (१९४९) या विशेष उल्लेखनीय आहेत. आराम-विराम (१९३४) आणिबनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह. यांशिवाय गृहसौख्य (१९३१), आयुष्याचा पाया (१९४६), कुर्यात् सदा मङ्‍गलम् (१९४९) यांसारख्या ग्रंथांतून संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इ. विषयांसंबंधी विवेचन त्यांनी केले आहे. त्यांनी सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून केलेले आहे. त्यांची शैली प्रसादपूर्ण आणि प्रसन्न आहे.  त्यांच्या काही कादंबऱ्‌यांवरून चित्रपटही काढण्यात आले आहेत. प्रभात या चित्रपटसंस्थेचा कुंकू हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच न पटणारी गोष्ट ह्या कादंबरीवर आधारलेला आहे. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे साठ आहे. किर्लोस्कर खबरचे ते काही काळ सहसंपादक होते. मधुकर हे स्वतःचे मासिकही त्यांनी काढले होते. सातारा साहित्य संमेलनाचे (१९६२) ते स्वागताध्यक्ष होते. कोरेगाव येथे ते निवर्तले.

इनामदार, श्री. दे.