सेलेंगा नदी  :  मध्य आशियातील रशियाच्या बुर्यात मोंगल प्रदेशामधील व्यापारोपयोगी जलमार्गास उपयुक्त नदी असून तिचा उगम मंगोलियाच्या पठारावर (१७०० मी. उंच, १०१° पू.) असून ती बैकलच्या सरोवरास मिळते. तिची लांबी ९९३ किमी. आहे.

उगमाजवळ सेलेंगा आणि ऑर्कॉन असे दोन प्रवाह असून त्यांचा संगम उगमाच्या ईशान्य बाजूस होतो. डावीकडून डेलगेर आणि ऐगीन आणि उजवीकडून तोला, खारागोल, चिकॉय, खिलोक आणि उडा ह्या उपनद्या मिळतात. उडा आणि सेलेंगा यांच्या संगमावर ऊलान उडे हे औद्योगिक आणि राजधानीचे शहर आहे. मुखापासून क्याखटा पर्यंत ३३६ किमी. जलमार्ग मिळतो. नदीच्या मुखापाशी सुपीक त्रिभुज प्रदेश आहे. येथे पेट्रोलच्या विहिरी आहेत. हा प्रदेश स्टेप्सचा आहे. येथे रशियन लोकांनी गहू आणि गुरांच्या पैदाशीकरिता कृषिव्यवसाय केंद्रे स्थापन केली आहेत. त्याशिवाय १९३३ पासून सुरू झालेल्या पंचवार्षिक योजनेमुळे गहू, मांस, गव्हाचे पीठ, लाकूड, मासे, कातडी सामान यांचे उत्पादन या नदीखोऱ्यात वाढले आहे.

यार्दी, ह. व्यं.