उस्मानाबाद जिल्हा : महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील जिल्हा. क्षेत्रफळ १४,२७२ चौ. किमी. लोकसंख्या १८,९६,६८७ (१९७१). उतर अक्षांक्ष १७० ३५’ ते १८० ४o’ व पूर्व रेखांश ७५० १६’ ते ७६० ४o’. याच्या उत्तरेस बीड व परभणी, पूर्वेस नांदेड व कर्नाटक राज्याचा बीदर, दक्षिणेला सोलापूर आणि पश्चिमेला अहमदनगर व सोलापूर हे जिल्हे आहेत. अहमदपूर, परांडा, उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर, कळंब, उदगीर, औसा, उमरगा, निलंगा हे तालुके व भूम हा महाल असे जिल्ह्याचे विभाग आहेत. हा पूर्वीचा हैदराबाद संस्थानाचा भाग. १९०४ मध्ये जिल्ह्याचे ठिकाण नळदुर्गहून उस्मानाबाद (पूर्वीचे धाराशिव) येथे आणण्यात आले. १९५० मध्ये तालुक्यांची पुनर्रचना करण्यात आली. १९५६ च्या राज्यपुनर्रचनेमध्ये बीदर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा व उदगीर हे तालुके उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट केले गेले. महाराष्ट्राच्या अनुक्रमे ४·६६ टक्के क्षेत्रफळ व ३·८ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.

भूवर्णन : जिल्ह्याचे स्थूलमानाने दोन नैसर्गिक विभाग पडतात. तेरणा नदीच्या उत्तरेकडील बालाघाट डोंगराने व्यापलेला पठारी प्रदेश व नदीच्या दक्षिणेकडील सखल मैदानी प्रदेश. बालाघाटची एक शाखा अहमदनगर जिल्ह्यातून येते भूम, औसा, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यांतील काही भाग या शाखेने व्यापलेला आहे. बालाघाट डोंगराची दुसरी शाखा अहमदपूर व उदगीर तालुक्यांतून वायव्येकडून आग्‍नेयीकडे जाते. तुळजापूर व उदगीर तालुक्यांमध्ये आणि भूम महालामध्ये पर्वतरांगांना विभागणारी मोठी खोरी आहेत. पठारी प्रदेश समुद्रसपाटीपासून सरासरी ६०९ मी. उंच आहे. चुनखडी, वाळू, दगड व माती ही या जिल्ह्यात आढळणारी खनिजे आहेत. तुळजापूर, कळंब व उदगीर तालुक्यांत थोडी जंगले असून त्यांचे एकूण जमिनीशी प्रमाण ०·१ टक्क्यापेक्षाही कमी आहे.

मांजरा व तेरणा या जिल्ह्यातील मुख्य नद्या आहेत. बोरी, बाणगंगा, मन्याड, तावरजा आणि सीना या इतर नद्या आहेत. मांजरा ही गोदावरीची उपनदी असून जिल्ह्यातील तिच्या प्रवाहाची लांबी १०८·६ किमी. आहे. तेरणा उस्मानाबादजवळ उगम पावते व पूर्व सीमेजवळ मांजरा नदीस मिळते. मन्याड व तावरजा या मांजराच्या उपनद्या अनुक्रमे अहमदपूर व लातूर तालुक्यांतून वाहतात. सीना पश्चिम सीमेवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. परांडा व भूम भागातील चांदणी व इतर छोट्या नद्या आणि तुळजापूर तालुक्यातील बोरी व हरणी या सीनेच्या उपनद्या होत. जिल्ह्यात पाटबंधार्‍याकरिता अहमदपूर, परांडा, औसा व तुळजापूर तालुक्यांत तलाव असून अनेक विहिरीही आहेत. चांदणी, हरणी इ. नद्यांवरील पाटबंधार्‍यांच्या योजना कार्यान्वित आहेत.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे हवा कोरडी व सौम्य आहे. पठारी प्रदेशातील तालुक्यांचे हवामान दक्षिणेकडील सपाट प्रदेशातील तालुक्यांपेक्षा अधिक थंड व दमट असते. परांडा व भूम महाल या घाटापलीकडील प्रदेशात पाऊस सु. ६० सेंमी. उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर या तालुक्यांमध्ये सु. ९० सेंमी. औसा, उमरगा व निलंगा तालुक्यांत सु. ८० सेंमी. आणि कळंब तालुक्यात सु. ७o सेंमी. पडतो. कमी पावसामुळे परांडा व भूम महाल या भागांत दहा वर्षांतून एकदा तरी दुष्कळ पडतो.

आर्थिक परिस्थिती : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुपीक व काळी कापसाची जमीन असून मधूनमधून लाल, पांढरी किंवा वालुकामय जमिन आढळते. अहमदपूर व उदगीर तालुक्यांतील जमिनी हलक्या दर्जाच्या, निलंगा तालुक्यांतील जमीन काळी कापसाची, औसा व लातूर तालुक्यांतील मांजरा खोर्‍यातील अतिशय सुपीक आणि तुळजापूर, उमरगा, परांडा व भूम यांमधील सकस व ओलावा टिकवून धरणारी आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग शेती असून कामकरी लौकांपैकी ८०·१३ टक्के लोक शेतीव्यवसायात आहेत. १९६८-६९ मध्ये पेरणीचे निव्वळ क्षेत्र ७७·३ टक्के व ओलिताखालील ५·५ टक्के होते ओलितापैकी ८९·६२ टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याखाली होते. खरीप व रब्बी यांच्या पिकांखालील क्षेत्राचे प्रमाण ६३ : ३७ इतके होते. भूम महाल, परांडा व तुळजापूर तालुक्यांत पिके अधिक होतात. ज्वारी, कापूस, ऊस, भूईमूग, तूर, मूग, गहू, हरभरा, अळशी ही येथील मुख्य पिके असून भात, मका, बाजरी, इतर कडधान्ये व गळिताची धान्ये, तंबाखू, मसाल्याची पिके व फळे आणि भाजीपाला यांचेही उत्पादन होते. पिकांखालील एकूण क्षेत्रापैकी ज्वारीने ३७·२८ टक्के आणि गळिताच्या धान्याने १/५ क्षेत्र व्यापले असून गळितांपैकी ५४ टक्के भुईमुगाने व्यापलेले आहे.

वाहतुकीच्या अपुर्‍या सोई व स्वस्त विजेचा अपुरा पुरवठा ह्यांमुळे जिल्ह्यात उद्योगधंद्यांचा फारसा विकास झाला नाही. लातूर येथील एक कापूस पिंजणी व दाबणीचा कारखाना, एक वनस्पती तुपाचा कारखाना आणि दोन तेलाच्या गिरण्या, औसा येथील कागद कारखाना व ढोकी येथील साखर कारखाना एवढेच मोठे उद्योग जिल्ह्यात आहेत. उत्पादक उद्योगधंद्यांमधील कामकर्‍यांपैकी ८१·७२ टक्के घरगुती उद्योगधंद्यांत असून फक्त तीन टक्के नोंदणी झालेल्या कारखान्यांमध्ये आहेत. हातमाग, लोकर विणणे, तेलघाण्या, कातडी कमाविणे व चामड्याचे काम, दोरखंड बनविणे, मातीची भांडी, साबण, बांबूकाम हे घरगुती उद्योगधंदे येथे आहेत. उदगीर येथे उत्तम प्रतीची कांबळी तयार होतात. उदगीर व अहमदपूर येथे बिदरी हस्तकला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. धान्य, कापूस, तेल, चामडी, मिरच्या, गुरे, मेंढ्या, हाडे व शिंगे, तंबाखू व तारवाडाची साल ह्या वस्तूंची जिल्ह्यातून निर्यात होते. मीठ, सुकवलेले मासे, मसाल्यांचे पदार्थ, तांबे व पितळ यांची भांडी, साखर, घासलेट, कापड, किराणामाल, नारळ इ. माल आयात होतो. लातूर ही मोठी बाजारपेठ असून उदगीर हे उंटांच्या व्यापाराकरिता, तर मालेगाव हे घोड्यांच्या बाजाराकरिता प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील देवनी जातीचे गाय-बैल भारतभर प्रसिद्ध आहेत.


दक्षिण-मध्य रेल्वेचा विकारावाद-परळी वैजनाथ हा रुंदमापी फाटा अहमदपूर व उदगीर तालुक्यांतून ६९·२ किमी. जातो मिरज-लातूर हा अरुंदमापी फाटा उस्मानाबाद व लातूर तालुक्यांतून ५७·१ किमी. जातो. हे प्रमाण दर १०० चौ. किमी.ला २·३ किमी. इतके पडते. १९६७ मध्ये सडकांची लांबी १,१३२.०६ किमी. असून त्यांपैकी २२·५० किमी. सिमेंट काँक्रीट सडका व ३७३·३३ किमी. डांबरी होत्या. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ह्या जिल्ह्यातून ७८·८३ किमी. जातो. १९६७ मध्ये तार व दूरध्वनी व्यवस्था अनुक्रमे पंधरा व पाच ठिकाणांहूनच उपलब्ध होती.

लोक व समाजजीवन : १९६१–७१ या काळात जिल्ह्याची लोकसंख्या २८.०९ टक्क्यांनी वाढली. १९६१ मध्ये जिल्ह्यात वस्ती असलेली १,३८८ खेडी आणि तालुक्यांची मुख्य ठिकाणे, नळदुर्ग व मुरूम अशी तेरा शहरे होती. १९७१ साली १२·५२ टक्के लोकवस्ती शहरात होती. लातूर हे जिल्ह्यातील सर्वांत मोठे शहर होय. जिल्ह्यात दर चौ. किमी. ला लोकवस्तीचे प्रमाण १३४ होते. लोकसंख्येत स्त्रियांचे पुरुषांशी दर हजारी प्रमाण ९४७ होते. साक्षरता २८·१ टक्के असून ८३·९७ टक्के लोक मराठी, ९·९९ उर्दू, २·७८ कन्नडभाषिक आहेत. याशिवाय जिल्ह्यात वंजारी, गुजराती, हिंदी, कैकाडी, पारधी, तेलुगू ह्या भाषा बोलल्या जातात. ८३·१७ टक्के लोक हिंदुधर्मीय असून १०·११ टक्के मुसलमान व ६·२३ टक्के बौद्धधर्मीय आहेत. जिल्ह्यातील डोंगराळ भागात परधान, भिल्ल, गोंड, कोलम, आंघ, कोया या अनुसूचित जमाती राहतात.

१९६९ मध्ये जिल्ह्यात १,६३५ प्राथमिक शाळा व १९६ माध्यमिक शाळा होत्या. उस्मानाबाद, लातूर आणि उमरगा येथे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालये, उस्मानाबाद येथे शिक्षण महाविद्यालय व लातूर येथे तांत्रिक महाविद्यालय आहे. जिल्ह्यात सरकारमान्य दहा ग्रंथालये व वीस मुद्रणालये असून एकही वर्तमानपत्र अथवा नियतकालिक प्रसिद्ध होत नाही. १९६७ मध्ये अहमदपूरला एक, उस्मानाबादला दोन, लातूरला पाच, तुळजापूरला एक, कळंबला एक व उदगीरला दोन चित्रपटगृहे होती. जिल्ह्यात तीन मोठी रुग्णालये असून उस्मानाबाद जवळ एक कृष्ठरोग-केंद्र आहे. तालुक्याच्या ठिकाणी दवाखाने व पशुवैद्यकीय केंद्रे आहेत.

महत्त्वाची स्थळे : उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावी झालेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून ग्रीक व रोमन संस्कृतींशी या भागाचा संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. सुप्रसिद्ध संत गोरा कुंभार इथलाच रहिवासी. कुंथलगिरीची जैन लेणी तसेच उस्मानाबाद शहराजवळील चांभारलेणी व धाराशिवलेणी यांमधील शिल्पे येथील प्राचीन कलेची साक्ष देतात. परांडा, नळदुर्ग, औसा व उदगीर येथील किल्ले उल्लेखनीय आहेत. उस्मानाबाद व निलंगा येथील दर्गे, परांडा व औसा येथील मशिदी तसेच निलंगा येथील नीलकंठेश्वर व माणकेश्वर येथील महादेव यांची मनोहर शिल्पकाम असलेली मंदिरे, समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी यांचा डोमगांव येथील मठ आणि महाराष्ट्राचे एक प्रमुख कुलदैवत असलेल्या भवानीमातेचे क्षेत्र तुळजापूर यांसाठी जिल्हा प्रसिद्ध आहे. (चित्रपत्रे ७१, ७२).

शाह, र. रू.