खेकडा : कवचधर-वर्गाच्या (क्रस्टेशिया) मॅलॅकोस्ट्रॅका उपवर्गातील डेकॅपोडा (दशपाद) गणातल्या ब्रॅकियूरा या उपगणातील हा प्राणी होय. डेकॅपोडा गणातील अनॉम्यूरा या उपगणातील प्राण्यांनाही खेकडे म्हणण्याचा प्रघात आहे. उदा. शंखवासी खेकडा, नारळखाऊ अथवा चेरखेकडा इत्यादी. पण हे खरे खेकडे नव्हेत. संरचनेच्या दृष्टीने ते मॅक्रूरा उपगणातील शेवंडे, झिंगे, चिमोरे इ. कवचधर आणि ब्रॅकियूरा उपगणातील खरे खेकडे यांच्या मध्ये बसणारे आहेत.
खेकडे सगळ्या जगभर आढळतात. त्यांच्या सु. ४,५०० जाती आहेत. बहुतेक समुद्रांत राहणारे असले, तरी काही जाती गोड्या पाण्यात राहणाऱ्या आणि काही भूचर आहेत. सागरी खेकडे समुद्रकिनाऱ्यापासून ते ३,७०० मी. खोलीपर्यंत आढळतात. भूचर खेकडे समुद्रकिनाऱ्यापासून ते ३,७०० मी. खोलीपर्यंत आढळतात. भूचर खेकडे उष्ण प्रदेशात मुबलक आढळतात. हे मधूनमधून समुद्रात जातात. कारण त्यांच्या जीवनवृत्तातील प्राथमिक डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्वावस्था) तेथे पार पडतात. खेकडे विविध आकारमानांचे असतात. वाटाणा-खेकड्याचा (पी-क्रॅबचा) नर १·६ मिमी. असतो. मॅक्रोकीइरा हा जपानी खेकडा व स्यूडोकार्सिनस हा टास्मानियातील खेकडा हे फार मोठे असतात. भारतातील चिल्का सरोवरात आढळणाऱ्या सिला सेरॅटा या खेकड्याची रुंदी ४६ सेंमी. पर्यंत असते.
खेकड्यांचे श्वसन सामान्यतः क्लोमांनी (कल्ल्यांनी) होते. शरीराच्या दोन्ही बाजूंना पृष्ठवर्माच्या (पाठीवरील आच्छादक कवचाच्या) खाली असणाऱ्या दोन कोष्ठांत क्लोम असतात. भूचर खेकड्यात हे कोष्ठ अथवा गुहा मोठ्या होऊन फुप्फुसांचे कार्य करतात.
खेकडे सामन्यतः मंद गतीने चालतात पण ते धावू शकतात. समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूतील त्यांची तिरकी चाल बऱ्याच वेळा दृष्टीस पडते. पोर्ट्यूनीडी कुलातील खेकडे आणि इतर काही आपल्या वल्ह्यांसारख्या चपट्या पायांनी मोठ्या कुशलतेने पोहतात.
इतर पुष्कळ कवचधरांप्रमाणेच खेकडे सर्वभक्षक असल्यामुळे ते सफाईचे कामही करतात. पुष्कळ खेकडे हिंस्र असून जिवंत भक्ष्य पकडून खातात. काही केवळ शाकाहारीही असतात.
खेकड्याचे शरीर थोडेफार चपटे असते. बहुतेकांच्या शरीराची रूपरेखा आडवी अंडाकृती अथवा तिकोनी असते. शरीराचे तीन भाग पडतात : शीर्ष, वक्ष, आणि उदर. शीर्ष आणि वक्ष ही निराळी नसून त्यांच्या सायुज्यनाने (एकीकरणाने) शिरोवक्ष तयार होते. शिरोवक्ष पृष्ठवर्माने झाकलेले असते. उदर लहान व सममित (ज्याचे दोन सारखे भाग पडू शकतात असे) असून ते खाली वाकलेले आणि पुढच्या बाजूकडे वळून वक्षाच्या खालच्या पृष्ठावरील एका उथळ खळग्यात घट्ट बसलेले असते. खेकडा वरून पाहिला असता त्याचे उदर दिसत नाही. नराचे उदर सामान्यतः अरुंद व तिकोनी आणि मादीचे रुंद व गोलसर असते.
खेकड्याच्या शरीरावर उपांगांच्या (शरीराला जोडलेल्या इंद्रियांच्या) एकोणीस जोड्या असू शकतात. पाच जोड्या शीर्षावर, आठ वक्षावर आणि सहा उदरावर. शीर्षावर लघुशृंगिका, शृंगिका, जंभ, पहिली जंभिका आणि दुसरी जंभिका यांच्या जोड्या असतात. लघुशृंगिकांवर घ्राणेंद्रिये असतात शृंगिका ही स्पर्शेंद्रिये होत जंभ आणि जंभिका ही मुखांगे असून जंभांचा उपयोग अन्नाचे तुकडे करण्याकरिता आणि जंभिकांचा अन्न जंभांकडे नेण्याकरिता होतो. जंभिकांचा उपयोग क्लोम साफ करण्याकरिता आणि वारविण्याकरिताही होतो. डोळे संवृत्त (देठासारखा भाग असलेले) असून सर्व बाजूंना फिरविता येतात आणि जरूर पडेल तेव्हा पृष्ठवर्माच्या पुढच्या भागात असलेल्या खाचेच्या आत ओढून घेता येतात.
वक्षावरील आठ जोड्यांपैकी पहिल्या तीन जंभपादांच्या असून त्यांचा उपयोग अन्न हाताळण्याच्या आणि श्वसनाच्या कामी होतो. बाकीच्या पाच जोड्यांचा उपयोग चालण्याकरिता होतो. यांच्यापैकी पहिल्या जोडीतील पाय इतरांपेक्षा मोठे व भक्कम असून त्यांच्या टोकांवर सामान्यतः फार मोठे कीले अथवा नखर (नख्या) असल्यामुळे त्यांना नखरपाद म्हणतात.
काही खेकड्यांच्या उदरावर उपांगांच्या सहा जोड्या असतात. पाच जोड्या प्लवपादांच्या (सामान्यपणे पोहण्याकरिता उपयोगी पडणाऱ्या उपांगांच्या ) आणि एक जोडी अल्पवर्धित पुच्छपादांची (पुच्छखंडाच्या अलीकडच्या खंडावरील उपांगांची) असते, पण बहुसंख्य खेकड्यांत फक्त प्लवपादच असतात. मादीत चार जोड्या आणि नरात फक्त दोनच जोड्या असतात. प्लवपाद पोहण्याकरिता उपयोगात आणले जात नाहीत. अंडी घातल्यावर मादी ती या उपांगांना चिकटविते. नराच्या प्लवपादांचा उपयोग मैथुनांगे म्हणून केला जातो.
खेकड्यांचे एक विशिष्ट लक्षण म्हणजे त्यांच्या मुखाच्या वर असणारा मुखपरिपट्ट (शृंगिका आणि मुख यांच्या मधला भाग) डोक्याच्या दोन्ही बाजूंना पृष्ठवर्माशी सायुज्यित झालेला असतो. मुखपरिपट्ट आणि पृष्ठवर्माचा विस्तार यांच्यामुळे मुखाभोवती एक प्रकारची गुहा तयार होते. या गुहेत मुखांगे आणि जंभपाद असतात. या गुहेचे द्वार तिसऱ्या जंभपादांच्या जोडीने बंद करता येते.
बहुतेक खेकड्यांत अंडी फूटून त्यांतून बाहेर पडणारा डिंभ झोइया हा असतो. [→ डिंभ]. हा सूक्ष्म आणि पारदर्शक असून समुद्रपृष्ठावर प्लवकात (तरंगणाऱ्या प्राण्यांत व वनस्पतींत) राहतो. याच्या डोळ्यांना देठ नसतात पाय उत्पन्न झालेले नसतात आणि जंभपादांचा पोहण्याकरिता उपयोग होतो कित्येक निर्मोचनानंतर (कात टाकण्यासारख्या क्रियांनंतर) तो वाढून मोठा होतो आणि अखेरीस त्याचे मेगॅलोपा डिंभांत रूपांतर होते. या डिंभाचे प्रौढाशी साम्य असते पण उदर मोठे असून खाली वाकलेले नसते आणि प्लवपादांचा उपयोग पोहण्याकरिता होतो. मेगॅलोपाचे निर्मोचन होऊन तो प्रौढ खेकड्याचे रूप धारण करतो. गोड्या पाण्यात राहणाऱ्या खेकड्यांना मुक्तजीवी डिंभावस्था नसतात. अंड्यांतून बाहेर पडणारी पिल्ले प्रौढाच्या लहान प्रतिमा असतात. त्यांच्या शरीरावर सगळी उपांगे असतात आणि पहिले निर्मोचन पार पडेपर्यंत ती आईच्या शरीराला चिकटलेली असतात.
खेकडे बहुधा परजीवी (अन्न व आश्रय यांसाठी दुसऱ्या जीवावर किंवा त्याच्या शरीरात राहणारे) नसतात. पण काही खेकडे सहभोजी (दुसऱ्या प्राण्याबरोबर राहून त्याच्या अन्नात वाटेकरी होणारे) म्हणून इतर प्राण्यांच्या शरीरात राहतात. उदा. पिन्नोथेरीस हा लहान खेकडा कालवांच्या शिंपल्यांच्या आत सहभोजी म्हणून राहतो. कालवाच्या अन्नाचा काही भाग याला मिळतो. पुष्कळ खेकडे पृष्ठवर्मावर समुद्रतृणे, प्राणिद्रुम (वनस्पतींसारखे दिसणारे प्राणी), स्पंज इ. आणून चिकटवितात. तेथे त्यांची वाढ होऊन पृष्ठवर्म पूर्णपणे झाकले जाते. या मायावरणामुळे ते दिसून येत नाहीत व त्यांचे शत्रूपासून रक्षण होते.
माणूस खेकड्यांचा खाण्याकरिता उपयोग करतो. कॅन्सर पॅग्युरस (ब्रिटन व यूरोप), कॅलिनेक्टिस सॅपायडस (यूरोप), कॅन्सर मॅजिस्टर (अमेरिका) आणि भारतातील सिला सेरॅटा, नेपच्यूनस पेलॅजिकस आणि पॅराटेलफ्यूजा स्पिनिजेरा (गोड्या पाण्यातील) हे खेकडे या दृष्टीने महत्त्वाचे होत. ब्रिटन, यूरोप आणि अमेरिकेत खेकडे पकडण्याचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर चालतो. भारतातदेखील या उद्योगाचे प्रमाण फार मोठे आहे. भारतात कोळंब्यांच्या खालोखाल खेकडे पकडले जातात. सबंध इंडो-पॅसिफिक प्रदेशात सिला आणि नेपच्यूनस हे खेकडे समुद्रापासून मिळणारे महत्त्वाचे अन्न समजले जातात.
पहा : क्रस्टेशिया खेकडा, नारळखाऊ खेकडा, शंखवासी.
कर्वे, ज. नी.
“