खूळ : (फॅड). खूळ म्हणजे एक प्रकारचा छांदिष्टपणा. खूळ आणि फॅशन या कल्पना भिन्न मानल्या जातात. तथापि ज्या समाजात नावीन्यप्रियता प्रभावी असते, त्या समाजात दोन्ही प्रकार आढळतात. बोगार्डस या मानसशास्त्रज्ञाने अमेरिकेत एकूण पस्तीस वर्षेपर्यंत दरवर्षी कोणकोणती खुळे येऊन गेली, यांची माहिती संकलित केली, तेव्हा खुळांचे साधारणतः पुढील वर्ग पडतात व संख्येच्या दृष्टीने त्यांचा अनुक्रम पुढीलप्रमाणे लागतो, असे त्यास आढळून आले : (१) स्त्री-पुरुषांचे पेहराव व पेहराव व प्रसाधनप्रकार, (२) मनोरंजन प्रकार, (३) वाहने, (४) शब्दप्रयोग, (५) शिक्षण व प्रचारतंत्रे, (६) स्थापत्य आणि गृहशोभनाच्या तऱ्हा.
जीवनाच्या केवळ बाह्यांगांच्या बाबतीतच खुळे उदय पावतात असे नाही तर धर्म व तत्त्वज्ञान यांसारखी क्षेत्रेही खुळांपासून अगदीच मुक्त नसतात. बहुतेक खुळे फार तर वर्षभर टिकतात. प्रारंभी कुठलेही खूळ वेगाने पसरते, दोनतीन महिनेपर्यंत फार लोकप्रिय होते व मग एकदम ओसरू लागते. खूळ म्हणून उदयास आलेली तऱ्हा जर उपयुक्त व सोयीची ठरली किंवा सर्वसामान्य माणसांच्या व्यवहारांशी ती संबंधित असली, तर मात्र ती अधिक काळ टिकते आणि पुष्कळदा तर त्या त्या समाजाच्या चालीरीतींचा व आचारांचा एक भाग बनून त्या संस्कृतीत सामावून जाते.
भारतीय जीवनात मिनी, मॅक्सी, लुंगी, सलवार-कमीज इ. पेहराव मॅचिंग कुंकू, कोरीव भिवया, कापलेल्या बटा, न विंचरलेला केशसंभार हे स्त्रियांच्या प्रसाधनांचे प्रकार तरुणांच्या हातात तांब्याचे कडे, रंगीबेरंगी कपडे, लांब केस व कल्ले इ. प्रकार लेका, मस्त, टॉप, बंडल व आयलासारखे शब्दप्रयोग कॅरम, माह-जाँग, बुलबुलतरंग शब्दकोडी वगैरे करमणुकीचे प्रकार सजावटीचा भाग म्हणून भिंतींना वेगवेगळे रंग व विशिष्ट पद्धतीच्या बैठका एखाद्या आचार्यांचे अनुकरणात्मक अनुयायित्व, कोणातरी तत्त्वचिंतकाचा किंवा वादाचा (इझमचा) अनन्यभावाने उदोउदो अशा अनेक खुळांचे जमाने होऊन गेले आहेत वा चालू आहेत. त्यांपैकी काही मात्र (उदा., काही पेहराव, काही केशरचना) सोयीस्कर वा आवश्यक वाटून दैनंदिन जीवनाचा भाग बनून गेली आहेत.
खुळांचा उदय व प्रसार यांच्या मुळाशी काही मानसिक प्रेरणा असतात. काही व्यक्तींना नावीन्याची न भागणारी भूक असते. काहींना इतरांचे लक्ष वेधून घ्यावयाची इच्छा असते. चार लोकांत स्वतःचे स्थान जरा उंचावण्यासाठी व इतरांना हेवा वाटावयास लावण्यासाठीही काही जणांना एखादे खूळ उपयोगी पडते. या विविध प्रेरणांपायी नावीन्याच्या मागे लागणाऱ्या व्यक्तींना नेहमीच काही ना काही जगावेगळे हवे असते. परिणामी उथळपणा व अस्थिरता हाच त्यांच्या वर्तनाचा स्थायीभाव बनतो, त्यांचा वैयक्तिक विकास होईनासा होतो आणि सदभिरुची व हीन अभिरुची यांतील फरकाचा विवेक त्यांना करता येत नाही [→ फॅशन].
अकोलकर, व. वि.