खुल्दाबाद : खुल्ताबाद. औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ६,१४९ (१९७१). हे औरंगाबाद-धुळे रस्त्यावर, औरंगाबादच्या वायव्येस २१ किमी. आहे. खुल्दाबादच्या परिसरात औरंगजेब, मलिकंबर, आझमशाह, तानाशाह वगैरे प्रसिद्ध राजकारणी पुरुषांच्या कबरी त्याचप्रमाणे जजराबक्ष, हजरतजंग इ. मुस्लिम संतांचे दर्गे असल्याने खुल्दाबादला महत्त्व आले आहे. येथील उरुसांना २५–३० हजारांपर्यंत गर्दी जमते. समुद्रसपाटीपासून सु. ८३० मी.उंचीवर असल्याने येथील हवा आल्हाददायक असते. यामुळेच शासनाने व नगरपालिकेने येथे डाकबंगले आणि इतर सोयी करून हे हवाखाण्याचे ठिकाण बनविले आहे.
शाह, र. रू.