कुमारजीव : (सु. ३४३–४१३). प्रख्यात बौद्ध पंडित व लेखक. त्याचा पिता कुमारायन हा भारतातील बौद्ध होता आणि आई जीवा ही चिनी तुर्कस्तानातील (मध्य आशिया) कुची येथील राजकन्या होती. कुमारजीवाच्या जन्मानंतर जीवाने बौद्ध धर्म स्वीकारला व ती भिक्षुणी झाली. कुमारजीवास बौद्ध धर्माचे संपूर्ण ज्ञान व्हावे, म्हणून तो आठ वर्षांचा असतानाच जीवा त्याला काश्मीरात घेऊन गेली. तेथे त्याने बंधुदत्त नावाच्या आचार्याजवळ विद्या संपादन केली. त्याच्या विद्वत्तेची कीर्ती ऐकून खोतान, कॅश्गार, यार्कंद इ. ठिकाणचे लोक त्याच्याकडे आकृष्ट झाले. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि नंतर तो कुची येथे परत आला. भारतीय पंडितांशी संपर्क ठेवून त्याने भारतीय ग्रंथांची भाषांतरे चिनी भाषेत करण्याचे योजिले. ४०१ च्या सुमारास मध्य आशियावर चिन्यांनी स्वारी केली व कुमारजीवास अटक करून चीनमध्ये नेले. तथापि त्याच्या विद्वत्तेची कीर्ती आधीच तेथे पसरली असल्यामुळे त्याला चीनमध्ये राजमान्यता मिळाली. राजाने कुमारजीवाच्या साहाय्याने संस्कृत बौद्धग्रंथ चिनी भाषेत भाषांतरित करण्याची योजना आखली आणि तीनशेहून अधिक संस्कृत ग्रंथांची चिनी भाषांतरे करून घेतली. महाप्रज्ञापारमिता, वज्रच्छेदिका, सद्धर्मपुंडरीक  इ. ग्रंथांची त्याने केलेली चिनी भाषांतरे सरस आहेत.

कुमारजीवाने ⇨ नागार्जुनाच्या माध्यमिक मताचा चीनमध्ये प्रसार केला. तेथे त्याचे तीन हजारांवर शिष्य बनले.  

बापट, पु. वि.