सूफी : जाडे-भरडे वस्त्र धारण करुन अल्लाहच्या नामस्मरणात व्यग्र असणाऱ्या, विरक्त साधुपुरुषांना सर्वसाधारणपणे ‘सूफी’ असे म्हणतात. हे कोण्या एका पंथाचे नाव नाही. ‘सूफी’ हा शब्द कसा व कधी निर्माण झाला, याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. एका मतानुसार ‘सुफिया’ या फार्सी शब्दापासून ‘सूफी’ म्हणजे अध्यात्मवादातील ज्ञानी, हा शब्द आला आहे. दुसऱ्या एका मतानुसार, अरबी शब्द ‘सौफ म्हणजे लोकरीचे जाडे-भरडे वस्त्र, ते वस्त्र पांघरणारा तो सूफी असा त्याचा अर्थ आहे. या व्युत्पत्तीबद्दल इब्न खातून, एडवर्ड ब्राउन, निकोल्सन ह्यांसारख्या विद्वानांचे एकमत आहे. ‘साफ’ (शुद्घ) या शब्दापासून, ज्याचे अंतःकरण शुद्घ आहे तो ‘सूफी’ असा शब्द तयार झाल्याचेही म्हटले गेले आहे. काहींच्या मते, मदीनेच्या मशिदीसमोरील जो ‘सुफ्फा’ (चबुतरा) त्यावर बसून नामस्मरण करणाऱ्या लोकांना ‘सूफी’ असे म्हटले जाई. राहुल सांकृत्यायन यांनी म्हटले आहे, की ‘सोफी’ हा शब्द ग्रीक भाषेतील असून काही ग्रीक तत्त्वज्ञांना ‘सोफिस्ट’ म्हटले जाई. आठव्या शतकात ग्रीक तत्त्वज्ञान अरबी भाषेत आणले गेले. तेव्हा ‘सूफी’ म्हणजे सन्यस्त वृत्तीने अल्लाची भक्ती करणारे आध्यात्मिक लोक असा शब्द रुढ झाला.

राहुल सांकृत्यायन यांच्या मते सर्वप्रथम प्रसिद्घ तत्त्वज्ञ अबू हाशिम यांना ‘सूफी’ ही उपाधी प्राप्त झाली. इमाम गजाली (१०५९–११११) यांनी म्हटले आहे, की तवस्सु म्हणजे ईश्वरी ज्ञान आणि तद्‌नुसार आचरण करणारे हे ‘सूफी’ असतात. पुढे ईश्वरी ज्ञानाचा विचार मांडणाऱ्या आणि तसे प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या साधुपुरुषांची ही व्यापक चळवळ बनली. त्यात गृहस्थाश्रमी आणि कडक ब्रह्मचर्याचे पालन करणारे असे दोन्ही प्रकारचे ‘सूफी’ होऊन गेले. पुढे या सूफी संप्रदायामध्येही अनेक पंथ निर्माण झाले.

सूफी तत्त्वज्ञान सर्वस्पर्शी आहे. त्यावर प्रचंड लिखाण झालेले आहे. सूफी संप्रदायामध्ये अनेक पंथ उदयास आले. इराण, इराक आणि भारत या तीन देशांतील सूफी पंथ प्रमुख आणि महत्त्वाचे मानले जातात. या पंथांच्या भूमिका, साधना, आचरणाच्या पद्घती, सत्यज्ञान किंवा ब्रह्मज्ञान याबद्दलचे प्रतिपादन भिन्न भिन्न आहे. ते ज्ञानप्राप्तीचे चार प्रमुख मार्ग मानतात. ते मार्ग म्हणजे शरियत, तरिकत, मारिफत आणि हकीकत. ज्ञानाचे ते दोन प्रकार मानतात. पहिला प्रकार म्हणजे बाह्यात्‌कारी ज्ञान (इल्मे जाहिर) आणि दुसरा प्रकार आंतरिक ज्ञान (इल्मे बातिन). पोथीनिष्ठ उलेमांच्या (धर्मवेत्ते ) कर्मठ धर्माचरणाविरुद्घ प्रतिक्रिया म्हणून देखील सूफी तत्त्वज्ञान विकसित झाले.

सूफी परंपरेत गुरुला (मुर्शद) असाधारण महत्त्व आहे. गुरुकृपेशिवाय शिष्याला अध्यात्मविद्या प्राप्त होत नाही, हा सिद्घांत आहे. शिष्याला दीक्षा देण्याचा (बयत) प्रत्येक पंथात वेगळा प्रकार असतो.

सूफी तत्त्वज्ञानाचे सार पुढीलप्रमाणे सांगता येईल : अल्ला (परमेश्वर) सर्वत्र, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी आहे. तो अखिल विश्वात सामावून राहिला आहे. विश्वातील सर्व वस्तुमात्रात तो आहे. सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तुमात्र आणि जीवमात्र त्याच्यापासूनच निर्माण होतात. जिक्र (जप), नामस्मरण, एकांतातील चिंतन, वैराग्य या मार्गाने सत्याप्रत जाता येते. जिक्र करता करता सूफी अशा अवस्थेला पोहोचतो की, त्याला अल्लाशिवाय कशाचेही भान राहत नाही. कादरिया, चिश्तीया, सुव्हावर्दिया, नक्शबंदिया, सत्तारिया हे सूफीमधील प्रमुख पंथ आहेत. त्याशिवाय हबिबीया, जुनैदिया, सख्तिया, गाजरुनियां, फिरदोसिया, जैदिया, हुबेरिया असे अनेक पंथ निर्माण झाले आहेत. मलंग आणि मदारिया हे भटके असतात. मलंग आणि अवधूत यांच्यात साम्य दिसून येते. ते आपल्याच धुंदीत मग्न असतात आणि पोथीनिष्ठ धर्माचरण करीत नाहीत.

संदर्भ : 1. Arberry, A. J. The Doctrine of the Sufis, New Delhi, 2000.

2. Hughes, Thomas Patrick, Disctionary of Islam, New Delhi, 1992.

3. Sharif, Jafar Herklots, G. A. Islam in India or The Qanun-I-Islam, 1972.

४. वकील, अलीम, सूफी संप्रदायाचे अंतरंग, पुणे, २०००.

५. सांकृत्यायन, राहुल, दर्शन-दिग्दर्शन, नवी दिल्ली, १९७८.

बेन्नूर, फकरुद्दीन