अमृत : भारतीय पुराणकथेत वर्णिलेले एक दिव्य पेय. देवासुरयुद्धांत मेलेल्या देवांना जिवंत करण्यासाठी विष्णूच्या सांगण्यावरून देवांनी ⇨समुद्रमंथन  केले. त्यात देवांनी असुरांनाही सहभागी करून घेतले. समुद्र- मंथनातून अमृतकलशासह धन्वंतरी वर आला. अमृतकलश असुरांनी पळविला असता मोहिनीरूपाने विष्णूने त्यातील अमृत देवांना दिले. एका असुराने देवरूप घेऊन अमृत प्राशन केले. तेव्हा विष्णूने चक्राने त्याचे मस्तक कापले तथापि तो राहू ह्या ग्रहरूपाने अमर झाला. देव व पितर अमृत प्राशन करतात, असे पुराणांत म्हटलेले आहे. चंद्राला अमृतमय समजतात. अमृतास ‘सुधा’ व ‘पीयूष’ अशीही  नावे असून ते सर्वोत्कृष्ट पेय मानले जाते. ग्रीक पुराणकथांतूनही  ‘नेक्टर’ ह्या अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या पेयाचे उल्लेख आढळतात.

केळकर, गोविंदशास्त्री