खनिज तेल : (पेट्रोलियम). खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पेट्रोल), केरोसीन (रॉकेल), जळणासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळवितात. म्हणून नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल (क्रूड ऑइल) असेही म्हणतात. पेट्रोल हा शब्द भारतात व इतर काही देशांत सामान्यपणे मोटारगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिनासाठी वापरतात. हे पेट्रोल खनिज तेलाचा केवळ एक भाग असते. पेट्रोलियम ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘पेट्रा’ म्हणजे खडक आणि ‘ओलियम’ म्हणजे तेल या शब्दांपासून तयार झालेली आहे. म्हणजे पेट्रोलियमाचा शब्दशः अर्थ शिला-तेल असा आहे.
निरनिराळ्या तेलक्षेत्रांतील खनिज तेलांचे रासायनिक संघटन अगदी सारखेच नसते, पण ती मुख्यतः हायड्रोकार्बनी संयुगांच्या मिश्रणांची बनलेली असतात. खडकात आढळणारी हायड्रोकार्बने कधीकधी वायूच्या, तर कधी अतिशय श्यान (दाट) द्रवाच्या किंवा कधीकधी घन स्वरूपात असतात. हायड्रोकार्बनांची घनस्थिती म्हणजे बिट्युमेन व अस्फाल्ट, द्रवस्थिती म्हणजे तेल व वायुस्थिती म्हणजे ⇨नैसर्गिक वायू होय. कित्येक ठिकाणी तेलाबरोबर वायुरूप वा घनरूप हायड्रोकार्बने कमीअधिक प्रमाणात आढळतात. म्हणून कधीकधी त्यांचाही समावेश खनिज तेल या संज्ञेत केला जातो.
इतिहास : खनिज तेल सु. चार हजार वर्षांपासून माहीत आहे. काळ्या व कॅस्पियन समुद्रांभोवतालच्या प्रदेशांत तेल व वायू बाहेर पडतात, हे इ. स. पूर्वी माहीत होते. मध्यपूर्वेत इराण, इराक, सौदी अरेबिया व ईजिप्त या भागांत प्राचीन काळी पृष्ठभागावर असलेल्या निक्षेपातील (साठ्यातील) अस्फाल्टी बिट्युमेनाचा निरनिराळ्या प्रकारांनी उपयोग करीत व त्याला स्लाइम, पिच, बिट्युमेन किंवा अस्फाल्ट या अर्थांची नावे प्रचलित होती. या भागांत प्राचीन काळी संयोजक (सिमेंट) म्हणून बिट्युमेन वापरीत असत. रत्ने जडविणे, हत्यारे व उपकरणे यांची पाती मुठीत घट्ट बसविणे, रस्ते बांधणी, औषधे, जहाजांच्या भेगा बुजवून त्या जलाभेद्य करणे इत्यादींसाठी बिट्युमेन वापरीत, तसेच प्रेते गुंडाळण्याच्या पदरांमध्ये बिट्युमेन वापरल्याचे आढळते. ईजिप्शियन लोक ममी व्यवस्थितपणे गुंडाळून बांधण्यासाठी अस्फाल्ट वापरीत. एक इमारती कमान बांधण्यासाठी पिच (डांबर) वापरण्यास बायबलमध्ये सांगितले आहे. तसेच बॅबलचा मनोरा बांधताना स्लाइम (बिट्युमेन) संयोजक म्हणून वापरल्याचा उल्लेख आहे. नैर्ॠत्य इराणात बिट्युमेनयुक्त पदार्थ चार हजार वर्षांपूर्वीपासून वापरात आहेत. बिट्युमेनयुक्त वालुकाश्माच्या सुमेरियन कालीन कलाकृती पुष्कळ संग्रहालयांत आहेत. इराकमध्ये अस्फाल्ट व तेल भिन्नभिन्न उपयोगांसाठी इ. स. पू. ४००० च्या सुमारास वापरले असल्याचे आढळते.
नैसर्गिक वायूचे उल्लेखसुद्धा इतिहासात पुष्कळ आहेत. बाकू (कॉकेशस) येथील अग्निपूजकांचे मंदिर ज्या ठिकाणी खडकातून वायू बाहेर पडतो त्या मुखावरच बांधलेले असून या शाश्वत अग्नीला पुजण्यासाठी दूरदूरवरून लोक तेथे येतात. किर्कूक तेलक्षेत्रातील बाबा गुर्गुर (इराक) येथे सध्याही नैसर्गिक वायू जळतो. नॅप्थार या हिब्रू शब्दावरून आलेला (नाव पडलेला) नॅप्था हा पदार्थ धार्मिक अग्नी पेटविण्यासाठी वापरीत. चिनी लोक दोन हजार वर्षांपूर्वी लवण विद्रावातून लवण मिळविण्यासाठी इंधन म्हणून नैसर्गिक वायू वापरीत.
चिनी लोकांनी खनिज तेलासाठी इ. स. पूर्वी विहिरी खणल्या होत्या. लवणासाठी खणताना त्यांना तेल व वायू सुरुवातीला मिळाले. नंतर मात्र लवणी विहिरीतून तेल व वायूच मुख्यत्वेकरून ते मिळवीत. विहिरी खणण्यासाठी चिनी लोक प्रहार करणारी यंत्रे वापरीत. या यंत्रांच्या खालच्या भागात जमिनीत भोके पाडण्यासाठी कठीण अशी हत्यारे बसविलेली असत. याशिवाय ते बांबूचे नळ व मानवी बळ वापरीत. चिनी लोकांना सुरुवातीला पाझरातून तेल मिळे पण, हाताने खणलेल्या विहिरीही आढळतात. इ. स. पू. तिसऱ्या शतकात चिनी लोक दोरखंडी पद्धतीचे यंत्र विहिरी खणण्यासाठी वापरीत.
सोळा ते अठरा या शतकांतील खनिज तेलाच्या सुरुवातीच्या नोंदी मुख्यत्वेकरून पाश्चिमात्य देशांतील आढळतात. व्हेनेझुएलामधून १५३९ साली खनिज तेलाची पहिली निर्यात झाली. त्यावेळी तेथून स्पेनच्या राजाला एक पीप खनिज तेल पाठविण्यात आले होते. १५४२ मध्ये जोन रॉद्रीगेस या स्पॅनिश खलाशाने सँटा बार्बारा येथे तेल असल्याचे निदर्शनास आणले. १५४३ साली दे सोटो सफरीतील लोकांनी टेक्ससमधील पाझरातील तेल जहाजाच्या दुरुस्तीसाठी वापरले. सर वॉल्टर रॅली यांनी १५९५ साली त्रिनिदादमधील अस्फाल्टाच्या सरोवराला भेट दिली. त्यातील घटक जहाजांच्या दोरखंडांना लेप देण्यासाठी उत्कृष्ट असल्याचे आढळले. पीटर द ग्रेट यांनी १७२३ मध्ये बाकू तेलक्षेत्र जिंकून रशियाला मोठा तेलसाठा मिळवून दिला.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून खनिज तेलाचा उद्योग सगळ्या जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा झाला. या काळापर्यंत दिव्यात जाळण्यासाठी देवमाशाच्या तेलाचा उपयोग करीत. पण या माशांच्या कमतरतेमुळे व त्यांचे तेल मिळणे कठीण व महाग झाल्यामुळे खनिज तेल वापरणे व त्याचे उत्पादन करणे सुरू झाले. १८५४ साली रॉकेलाच्या दिव्याचा शोध लागला व रॉकेलाचे युग सुरू झाले. १८५९ पर्यंत अमेरिकेत दगडी कोळशापासून तेल मिळविणारे ६० पेक्षा अधिक कारखाने चालू होते. ३० डिसेंबर १८५४ रोजी पेनसिल्व्हेनियन रॉक ऑइल कंपनी ही पहिली अमेरिकन तेल कंपनी न्यू हॅवेन येथे स्थापन झाली. यूरोपातील खनिज तेल उद्योगाची सुरुवात १८५७ साली रूमानियात झाली. आधुनिक खनिज तेल उद्योग खऱ्या अर्थाने २७ ऑगस्ट १८५९ रोजी सुरू झाला. त्या दिवशी एडविन एल्. ड्रेक यांनी सु. २३ मी. खोल खणलेल्या विहिरीत तेल सापडले. ती विहीर त्यांनी वॉटसन फ्लॅटवर ऑइल–क्रीकजवळ टिस्टुव्हिल समीप सीनेका ऑइल कंपनीसाठी खोदली होती. तेलासाठी खणलेली ही पहिलीच विहीर होय. ड्रेक विहिरीपासून सु. १·५ किमी. अंतरावर १८६० मध्ये पहिला तेल परिष्करण कारखाना निघाला. त्यावेळी ५ सेंमी. व्यासाचा सु. ७·५ किमी. लांबीचा नळ तेल वाहून नेण्यासाठी टाकण्यात आला. १८६१ मध्ये अगदी प्रथम लाकडी पिपांतून खनिज तेल अमेरिकेतून लंडनला निर्यात करण्यात आले. अँटवर्प (बेल्जियम) येथील चार्लस ह्या पहिल्या तेलवाहू जहाजाने १८६९–७२ च्या दरम्यान अमेरिकेतून यूरोपात तेल वाहून नेले. १८७० मध्ये जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑइल कंपनीची स्थापना केली. १८७१ मध्ये प्रथमच आगगाडीचा डबा तेल वाहतुकीसाठी वापरण्यात आला. १८७५ मध्ये पहिली तेलवाहक पोलादी टाकी (टँकर) बांधण्यात आली. व्हेनेझुएलामध्ये १८७० च्या सुमारास एका लहान कंपनीने सु. २० मी. खोलीपर्यंत काही थोड्या विहिरी खणल्या होत्या. रशियात बाकू येथील तेलक्षेत्रात १८७४ साली पहिली विहीर खणण्यात आली. या क्षेत्रातील खनिज तेलाचा उद्योगंधदा रॉबर्ट व लडव्हिग नोबेल यांनी सुरू करून त्याचा विस्तार केला. त्यांनी अमेरिकेतील कंपन्यांप्रमाणे विहिरींचे नियंत्रण केले, तेल वाहुन नेण्यासाठी नळ टाकले, आगगाड्यांवरील तेलाच्या टाक्या बांधल्या, तसेच १८७७ साली लोखंडी जहाज बांधले. झोरोॲस्टर नावाचे जहाज १८७९ मध्ये प्रथमच बाकू आणि व्होल्गा यांमधील कॅस्पियन समुद्रात वाहतूक करू लागले. १८८३ सालापूर्वीच कॅस्पियन भागातील जहाजे व रेल्वे एंजिने कोळशाच्या किंवा लाकडाच्या ऐवजी तेलाचा उपयोग इंधन म्हणून करू लागली होती. १८८३ साली रशियन तेल जर्मनीत, १८८८ मध्ये सिंगापूरला व नंतर अतिपूर्वेकडे निर्यात झाले. रॉयल डच शेल कंपनीने १८८४ मध्ये सुमात्रामध्ये पहिली विहीर खणली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अंतर्ज्वलन एंजिनाचा (ज्यातील सिलिंडरामध्येच इंधन जाळून कार्यकारी माध्यमाला उष्णता देण्यात येते व दट्ट्याच्या द्वारे तिचे यांत्रिक कार्यात रूपांतर करण्यात येते अशा एंजिनाचा) शोध लागल्याने पेट्रोलाचे युग सुरू झाले व या उद्योगधंद्याची भरभराट सुरू झाली. यापूर्वीपासून जहाजे, विमाने, आगगाड्या यांत तेल वापरण्यास सुरुवात झाली होती. पुढे मोटारगाड्यांचे उत्पादन व वापर अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे तेलाची गरज वाढली. खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थांचे उपयोगही वाढले. पहिल्या महायुद्धामुळे तेलास अधिकच महत्त्व आले. १९११–२३ या काळात जागतिक उत्पादन तिप्पट होऊन प्रथमच ते एक अब्ज पिपांपेक्षा अधिक झाले. खनिज तेल व त्यापासून तयार होणाऱ्या द्रव्यांचा उपयोग अनेक मार्गांनी उदा., ऊर्जा, उष्णता व प्रकाश निर्माण करण्याकरिता इंधन म्हणून, वंगणे, विद्रावक (विरघळविणारे पदार्थ), प्लॅस्टिक, कृत्रिम रबर व धागे, खते, तृणनाशके, कीटकनाशके इ. रासायनिक पदार्थ बनविण्यासाठी होऊ लागला. दुसऱ्या महायुद्धानंतर खनिज तेल हे एक युद्धसाहित्य बनले व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचेही महत्त्व अधिकच वाढले. १९४८ पर्यंत खनिज तेलाच्या जागतिक उत्पादनात परत तिपटीने वाढ होऊन ते सु. ३·५ अब्ज पिपे इतके झाले. १८७० साली अमेरिकेत दोन हजारांहून अधिक विहिरी होत्या. १९०२ मध्ये त्यांची संख्या लाखावर गेली, तर १९५४ मध्ये पाच लाख विहिरी होत्या. १९४८ नंतर पुढे १९६६ पर्यंत तेलाच्या जागतिक उत्पादनात परत तिपटीहून अधिक वाढ होऊन ते ११·७ अब्ज पिपे इतके झाले.
अरब राष्ट्रे व इझ्राएल यांच्यात ऑक्टोबर १९७३ मध्ये झालेल्या युद्धानंतर अरब राष्ट्रांनी तेलाचे दर जवळजवळ चौपट केले व जपान, अमेरिका इ. राष्ट्रांना तेलाची निर्यात काही काळ बंद केली. तसेच उत्पादनही १० टक्क्यांनी कमी केले. यामुळे अनेक विकसनशील राष्ट्रांच्या आर्थिक स्थितीवर फार मोठा ताण पडला. परिणामी खनिज तेलाला पर्यायी इंधन शोधण्याचे प्रयत्न अधिक जारीने सुरू झालेले आहेत.
भारतामध्ये १८६५ साली आसाममधील मारघेरिटाच्या माकुम नामदा क्षेत्रात प्रथम तेल सापडले. परंतु दळणवळणाच्या सोयी त्यावेळी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर तेल काढणे शक्य झाले नाही. १८८२ साली रेल्वेमार्ग तयार करताना सध्याच्या दिग्बोईजवळ तेल आढळले. १८९० मध्ये या जागी सु. २२० मी. खोल विहीर खणण्यात आली. १८९९ मध्ये आसाम ऑइल कंपनी स्थापन झाली व या सालापर्यंत चौदा विहिरी खोदण्यात आल्या होत्या. या कंपनीने नंतर ८० विहिरी खणल्या, त्यांपैकी काही सु. ६६० मी. खोल होत्या. १९१७ मध्ये या विहिरींतून दररोज १८,००० गॅलन तेल मिळत असे. १९२१ साली आसाम ऑइल कंपनीची मालकी बर्मा ऑइल कंपनीकडे गेली. या कंपनीने १९३१ पर्यंत दररोज १८,००० गॅलन एवढे उत्पादन केले. याच काळात बर्मा ऑइल कंपनीने बदरपूर तेलक्षेत्रातून १८,६४,००० पिपे तेल काढले होते. कित्येक वर्षे दिग्बोई तेलक्षेत्रातून दरवर्षी फक्त २,७०,००० टन तेलाचे उत्पादन होत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे उत्पादन दर वर्षी चार लाख टनांपर्यंत वाढले आहे.
उत्तर आसामात नहरकटिया, मोरान व हुग्रीजन भागात अधिक तेलक्षेत्रे असून त्यांतून दरवर्षी २५ ते २६ लाख टन तेल मिळावे अशी अपेक्षा आहे, म्हणजे आसाम तेलक्षेत्रातून दरवर्षी जवळजवळ ३० लाख टन तेल मिळेल. गुजरातमधील खंबायत व अंकलेश्वर भागांत तेल आहे. खंबायत विभागात ३ कोटी टन तेल असावे व दरवर्षी १५ लाख टन काढता यावे असा अंदाज आहे. यांशिवाय मुंबईजवळील ‘बॉम्बे हाय’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या समुद्रातील भागात १९७४-७५ मध्ये पाच विहिरी खोदण्यात आल्या असून त्यांतून १९७६ सालापासून प्रत्यक्ष तेल उत्पादन करण्याची योजना आखण्यात आलेली आहे. तसेच पूर्व किनाऱ्यावर तेलक्षेत्रे शोधण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू आहेत. भारतातील तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे व देशातील उत्पादन अपुरे पडत असल्यामुळे १९६२ मध्ये ९६ कोटी, १९६३ मध्ये ८३ कोटी, तर १९६४ साली १०४·५ कोटी रुपयांचे तेल आयात करण्यात आले.
रासायनिक संघटन : कच्ची खनिज तेले मुख्यतः कार्बन आणि हायड्रोजन यांची बनलेली असतात. त्यांच्यामधील कार्बनाचे प्रमाण ८३ ते ८७ व हायड्रोजनाचे ११ ते १४ टक्के असते व त्यांचा उरलेला सु. ५ टक्के भागं मुख्यतः ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधकाचा असतो. ज्यांचा जवळजवळ ९९ टक्के भाग केवळ कार्बन व हायड्रोजन यांचा बनलेला असतो, अशी पुष्कळ कच्ची तेले आढळतात.
खनिज तेलांच्या घटक मूलद्रव्यांची संख्या अगदी थोडी असली, तरी त्यांच्यातील एकूण संयुगांची संख्या विपुल असते व ती कित्येक शेकडे सुद्धा असू शकते. या संयुगांचे प्रकारही पुष्कळ असतात. सारांश, खनिज तेल अनेक प्रकारच्या आणि पुष्कळ हायड्रोकार्बनी संयुगांचे जटिल मिश्रण असते. कच्च्या तेलात मुख्यतः पुढील तीन सजातीय मालांतील संयुगे कमीअधिक प्रमाणात आढळतात.
( १ ) पॅराफिने : याचे सामान्य सूत्र CnH2n+2 असे असते. यांच्यापैकी सर्वांत साधा म्हणजे मिथेन (CH4) वायू होय. रॉकेलमध्ये C12 ते C16 म्हणजे बारा ते सोळा कार्बन अणू असलेली द्रवरूप संयुगे व खनिज मेणात C20 ते C30 म्हणजे वीस ते तीस कार्बन अणू असलेली घनरूप संयुगे असतात. कमी उकळबिंदू असणारी पॅराफिने बहुतेक सर्व ठिकाणांतील कच्च्या खनिज तेलात आढळतात.
( २ ) सायक्लोपॅराफिने किंवा नॅप्थिने : यांचे सामान्य सूत्र CnH2n असे असते. या गटापैकी कच्च्या तेलात वारंवार आढळणारी संयुगे म्हणजे अनुक्रमे पाच, सहा किंवा सात कार्बन अणू असलेली सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन व सायक्लोहेप्टेन ही होत. पेट्रोल आणि रॉकेल यांच्या पुष्कळ नमुन्यांत ती असतात.
( ३ ) ॲरोमॅटिक किंवा बेंझिनाच्या गटातील हायड्रोकार्बने : यांचे सामान्य सूत्र CnH2n–6 असे असते. सामान्यतः ती अल्प किंवा अत्यल्प प्रमाणात असतात, पण बोर्निओतील कच्च्या तेलात या गटातील संयुगे बरीच असतात.
एखाद्या कच्च्या तेलातील बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारी) संयुगे काढून टाकल्यावर जो अवशेष उरतो त्याच्यात पॅराफिने किंवा मेण यांचे आधिक्य असेल, तर त्या तेलाला पॅराफिनी किंवा पॅराफीनप्रधान तेल म्हणतात. पण त्या अवशेषात नॅप्थिनांचे आधिक्य असेल, तर त्याला अस्फाल्टिक किंवा अस्फाल्ट–प्रधान तेल म्हणतात. इराण, इराक, रुमानिया व अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील कच्ची तेले पॅराफिनी असतात. बाकू व व्हेनेझुएला येथील कच्ची तेले अस्फाल्टी असतात. मेक्सिको, टेक्सस व ओक्लाहोमा येथील कच्ची तेले मध्यम प्रकारची असतात.
कच्चे तेल हे निरनिराळे उकळबिंदू असणाऱ्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. निरनिराळ्या तापामानांस त्याचे ऊर्ध्वपातन करून मिळविलेल्या भागांवर संस्कार करून अनेक उपयुक्त पदार्थ तयार केले जातात. कच्च्या तेलातील संयुगांपैकी जी सर्वांत हलकी असतात त्यांचा उकळबिंदू वातावरणाच्या तापमानाच्या बराच खाली असतो. म्हणजे वातावरणाच्या तापमानात ती वायुरूप असतात. तेलाच्या विहिरीतून म्हणजे खाणीतून जे कच्चे तेल मिळते त्याच्यात काही हायड्रोकार्बनी वायू असतातच, शिवाय थोडे पाणी व वाळू हीही मिसळलेली असतात. ती व वायू काढून टाकून कच्चे तेल परिष्करण करण्याच्या कारखान्यात पाठविले जाते. कच्च्या तेलातील वायू फुकट घालवीत नाहीत. जळण म्हणून व कित्येक कार्बनी संयुगे तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून त्याचा उपयोग केला जातो. उरलेल्या कच्च्या तेलाचे निरनिराळ्या व उत्तरोत्तर वाढत्या तापमानांत ऊर्ध्वपातन करून त्याचे निरनिराळे विभाग करण्यात येतात. या निरनिराळ्या विभागात मिळणारे मुख्य घटक म्हणजे गॅसोलीन, केरोसीन, हलके व जड डीझेल, वंगणासाठी लागणारे तेल, मेण, डांबर इ. होत.
गुणधर्म : खनिज तेलाचे महत्त्वाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे असतात. (१) एकसारख्या दिसणाऱ्या दोन खनिज तेलांचे विशिष्ट गुरुत्व वेगवेगळे असू शकते. तसेच एकाच भौतिक परिस्थितीत मिळणाऱ्या तेलांचे विशिष्ट गुरुत्वही भिन्न असू शकते. तेलाचे विशिष्ट गुरुत्व ए. पी. आय. (अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट) अंश किंवा बाऊमे अंश पद्धतींनी मोजले जाते. ए. पी. आय. आणि बाऊमे अंशांचा विशिष्ट गुरुत्वाशी असणारा संबंध खालील सूत्रांद्वारे दर्शविला आहे. सामान्यतः
ए. पी. आय.० | = | १४१·५ | — १३१·५ |
१५·५६०से. तापमानास वि. गु. |
आणि बाऊमे० | = | १४० | — १३० |
१५·५६०से. तापमानास वि. गु. |
खनिज तेलाचे वि. गु. २७० ते ३५०ए. पी. आय. असते. (२) भूपृष्ठावरील परिस्थितीच्या मानाने भूपृष्ठाखालील दाब आणि तापमान ही वेगळी असल्यामुळे खनिज तेलाचे आकारमान भूपृष्ठाखाली व भूपृष्ठावर निरनिराळे असते. (३) खनिज तेलाची श्यानता (दाटपणा) त्यात मिसळलेल्या वायूच्या प्रमाणावर अवलंबून असते व ती दाब आणि तापमान यांतील कमी जास्त फरकाप्रमाणे बदलत असते. तेलाच्या घनतेच्या प्रमाणात ती बदलते. (४) खनिज तेलाचा प्रणमनांक (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाच्या दिशेत होणाऱ्या बदलाच्या म्हणजे वक्रीभवनाच्या व्याख्येनुसार येणारे गुणोत्तर) सामान्यतः १·३९ ते १·४९ च्या दरम्यान असतो. (५) काही खनिज तेले, विशेषतः ॲरोमॅटिक वर्गाची तेले अनुस्फुरण (विशिष्ट तरंग लांबीचे किरण शोषून जास्त तरंग लांबीचे किरण बाहेर टाकण्याचा गुणधर्म) दर्शवितात. (६) खनिज तेलाच्या २५०० ते ३००० से. तापमानास मिळणाऱ्या घटकांत प्रकाशीय वलनाचा (एकाच पातळीत कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाची पातळी वळविण्याचा) गुणधर्म आढळून येतो. (७) तेल तापवीत असताना त्यापासून मेण वेगळे होताना त्याचा ढग बनतो. ज्या तापमानास ही क्रिया सुरू होते त्यास मेघनबिंदू म्हणतात. तेलाची वाहकता ज्या तापमानास नाहीशी होते त्यास ओतबिंदू म्हणतात व हे तापमान मेघनबिंदूपेक्षा दोन त पाच अंशांनी कमी असते. (८) खनिज तेलाचे कॅलरी मूल्य हे त्याच्या वि. गु. च्या व्यस्त प्रमाणात असते. ते सामान्यतः दर किग्रॅ. ला १०,२५० ते १०,९२० किलोकॅलरी असते. (९) खनिज तेलांचा रंग हिरवा, पिवळा, तांबूस किंवा करडा असतो व तो त्याच्या घनतेच्या प्रमाणात गडद होत जातो. पेनसिल्व्हेनियातील ब्रॅडफर्ड क्षेत्रातील तेलाचे वि. गु. ०·८ असून रंग हिरवा असतो. इराकमधील किर्कूक क्षेत्रातील तेलाचे वि. गु. ०·८४४ असून त्याचा रंग तांबूस तपकिरी असतो. व्हेनेझुएलातील बॅचॅक्वेरो क्षेत्रातील तेलाचे वि. गु. ०·९५ व रंग गडद तपकिरी असतो. पॅराफीन–प्रधान खनिज तेलाचा रंग फिकट हिरवा, पिवळसर किंवा मधासारखा काळसर असतो, तर अस्फाल्ट–प्रधान तेलाचा हिरवा किंवा करडा असतो. (१०) ॲरोमॅटिक वर्गाच्या पुष्कळशा तेलांना सुगंध असतो, तर बऱ्याचशा खनिज तेलांना गॅसोलिनाचा वास असतो.
खनिज तेलाची उत्पत्ती : ज्या मूळ पदार्थापासून खनिज तेलाची उत्पत्ती झाली किंवा होते त्याचा तेलात मागमूसही राहत नाही. यामुळे तेलाच्या उत्पत्तीबद्दलचे स्पष्टीकरण मुख्यत : (१) भूपृष्ठाखालील द्रवांतील वेगवेगळ्या घटकांची मिळविलेली संकलित माहिती व (२) इतर प्रायोगिक माहिती यांच्यावरून केलेल्या तर्कावर अधिष्ठित आहे. तेल निर्मितीबद्दल दोन प्रकारचे विचार प्रचारात आहेत. तेलाची निर्मिती अकार्बनी किंवा अजैव रासायनिक विक्रियेतून झाली हा एक व ती जैव रासायनिक विक्रियेतून झाली, हा दुसरा विचार होय.
अकार्बनी किंवा अजैव उत्पत्ती : तेलाची उत्पत्ती अजैव पदार्थांपासून अकार्बनी पद्धतींनी झालेली असावी असे पूर्वी मानण्यात येत असे. मिथेन, एथेन इ. हायड्रोकार्बने अजैव पदार्थांपासून प्रयोगशाळेत कृत्रिम रीतीने तयार करता येतात. कॅल्शियम कार्बाइडावर पाण्याची विक्रिया होऊन ॲसिटिलीन वायू तयार होतो. अशा प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया पृथ्वीच्या कवचाच्या खोल भागातील कार्बाइडांवर होऊन खनिज तेले तयार झाली असावीत, ही कल्पना या विचाराच्या मुळाशी होती. तसेच खनिज तेलात हायड्रोकार्बनांचे सजातीय मालेतील पुष्कळसे घटक आढळतात. सामान्य सागरी अवसादात (गाळात) कार्बनी संयुगांतील हायड्रोजनाचे प्रमाण ७ ते १० टक्के असते, त्यामुळे खनिज तेलातील हायड्रोकार्बनांसाठी आवश्यक असणाऱ्या हायड्रोजनाच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देता येते. मात्र खनिज तेलात हे प्रमाण ११ ते १५ टक्के असते.
खनिज तेलाची निर्मिती अकार्बनी रासायनिक विक्रियेतून झाली असे गृहीत धरल्यास काही मुद्यांचे मात्र समर्थन करता येत नाही. पृथ्वीतील खनिज तेलाचे वाटप अगदी अनियमित आहे. तेलाची निर्मिती अकार्बनी विक्रियांतून झाली असती, तर पृथ्वीच्या सर्व भागांत जवळजवळ सारख्या प्रमाणात तेलाचे साठे आढळले असते, शिवाय खडक जितके जास्त जुने तितके त्यात मिळणारे तेलसाठे मोठे, असेही आढळले असते. मात्र प्रत्यक्षात कँब्रियन-पूर्व, कँब्रियन (सु. ६० ते ५४ कोटी वर्षांपूर्वीचे) हे जुने खडक आणि ट्रायासिक (सु. २३–२० कोटी वर्षांपूर्वीचे) व प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख वर्षांपूर्वीचे) हे सापेक्षतः नवे खडक पुरेसे सच्छिद्र आणि पार्य असून सुद्धा त्यांच्यात फारच थोड्या प्रमाणात तेलसाठे मिळाले असल्याचे आढळते. सध्या माहीत असलेल्या तेलसाठ्यांपैकी ७० टक्के साठे कमी वयाच्या मध्यजीव (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) किंवा नवजीव (सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वी नंतरच्या) महाकल्पांच्या काळातील खडकांत आहेत. खनिज तेलाचे ऊर्ध्वपातनाने परिष्करण करताना २५०० ते ३००० सें. तापमानाच्या दरम्यान मिळणाऱ्या घटकांत प्रकाशीय वलनाचा गुणधर्म असतो. केवळ अकार्बनी रासायनिक विक्रियांनी निर्माण झालेल्या संयुगांच्या अंगी प्रकाशीय वलनाचा गुणधर्म नसतो. या कारणांनी अकार्बनी किंवा अजैव विक्रियांनी खनिज तेल निर्माण होते, या विचाराला आता फारशी मान्यता नाही व त्यास केवळ ऐतिहासिक महत्त्व उरले आहे.
जैव उत्पत्ती : ज्या खडकांत खनिज तेले आढळतात त्यांचे एकूण स्वरूप पाहिले व खनिज तेलांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांची काही वैशिष्ट्ये लक्षात घेतली म्हणजे खनिज तेले सागरात राहणाऱ्या जीवांच्या शरीरांपासून तयार झाली असली पाहिजेत, याविषयी शंका उरत नाही. खनिज तेलाच्या निर्मितीची सुरुवात भूपृष्ठाखाली फार पुरातन काळी झाली. सध्या जेथे जमीन आहे अशा ठिकाणी पूर्वी समुद्र होते. या समुद्रात गाळ साचत असताना त्यातील असंख्य लहान मोठे प्राणी व वनस्पती नाश पावल्या आणि सागराच्या तळावर गाळाशी एकजीव होऊन गेल्या. त्यावर गाळाचे थर साचत गेले. सतत वाढणाऱ्या गाळाच्या वजनामुळे खालचे थर घट्ट व टणक होत गेले. अशा रीतीने गाळाचे रूपांतर थरांच्या खडकांत होत असतानाच त्यांत पुरल्या गेलेल्या प्राणी व वनस्पती यांच्यातील कार्बनी द्रव्यांचे रूपांतर तेलात होत होते. भूपृष्ठाखालच्या या बदलांप्रमाणेच भूपृष्ठही खूपच बदलत होते. एकमेकांशी निगडित असलेल्या या विक्रिया व प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या असाव्यात असे दिसते.
निरनिराळ्या काळांत सागराच्या तळाशी साचलेल्या गाळाच्या कित्येक खडकांतील घटकांचे सूक्ष्म परीक्षण करताना असे आढळून आले की, त्यांच्यात जी हायड्रोकार्बनी संयुगे असतात ती सागरी वनस्पती किंवा प्राणी यांच्या शरीरांपासून मिळणाऱ्या हायड्रोकार्बनांसारखी असतात. खनिज तेलाचे बहुतेक सर्व साठे सागरी खडकांच्या सान्निध्यात आढळतात. यावरून तेलाची उत्पत्ती सागरी अवसादात आणि त्यात असणाऱ्या प्राणी व वनस्पती यांच्यापासून झाली असे दिसते. खनिज तेलाची निर्मिती ज्या मूळ पदार्थांपासून झाली त्यांबद्दल पुढील विविध मतप्रणाली आहेत. (१) सागरी कार्बनी चक्राच्या सुरुवातीला त्यात असणाऱ्या अकार्बनी द्रव्यांपासून तसेच अतिसूक्ष्म जलचर व वनस्पतींवर उपजीविका करणारे सूक्ष्मजीव इत्यादींपासून हायड्रोकार्बनसदृश पदार्थ तयार होतात. तसेच प्राणी व इतर जीव नाश पावल्यावर त्यांच्या विघटनातून (रेणूंचे तुकडे होण्याच्या क्रियेतून) तयार झालेली द्रव्ये पुन्हा सागराच्या पाण्यात मिसळतात. (२) प्रकाशसंश्लेषण (सूर्यप्रकाशात वनस्पतींमध्ये कार्बनडाय-ऑक्साइड व पाणी यांचे साध्या कार्बोहायड्रेटांत रूपांतर करणाऱ्या) क्रियेने सागरी शैवाल समुद्रातील पाण्यात विरघळलेल्या अकार्बनी द्रव्यांचे जटिल अशा कार्बनी द्रव्यात रूपांतर करतात. तसेच कार्बोहायड्रेटांच्या ⇨ क्षपणातूनहायड्रोकार्बने तयार होतात. (३) सागरी सूक्ष्मजीवांचे अवशेष खनिज तेल असलेल्या अवसादात भरपूर आढळतात, तसेच जीवाश्मांत (प्राणी व वनस्पती यांच्या शिळारूप अवशेषांत) खनिज तेलाच्या सदृश द्रव्ये मिळतात. (४) नद्यांच्या प्रवाहांतून ह्युमिक, गेइक व डाल्मक अम्ले ही कार्बनी द्रव्ये सागरातील पाण्यात येऊन पडतात. (५) वनस्पतीपासून मेण आणि राळ मिळते.
खनिज तेलाच्या निर्मितीसाठी कार्बनी द्रव्ये उपलब्ध असली, तरी त्यांचे तेलात रूपांतर होण्यासाठी क्षपणकारक परिस्थिती व क्षपणासाठी लागणारी ऊर्जा ह्या आवश्यक असतात. सागरतळावरील खोल पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे क्षपणकारक परिस्थिती निर्माण होते. तेलनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा पुढीलपैकी काही कारणांद्वारे पुरविली जात असावी. (१) भूकवचातील उष्णता आणि दाब : दाब परिणामकारक होण्यासाठी ३५०० ते ४००० से. तापमान लागते. भूकवचात आढळणारे जास्तीत जास्त तापमान २३५० सें. आहे.त्यामुळे एवढ्या कमी तापमानामुळे कार्बनी पदार्थांचे (शेलाचे) खनिज तेलात रूपांतर सामान्य परिस्थितीत असंभवनीय वाटते. काहींच्या मते रूपांतराची ही क्रिया भूकवचात अगदी मंद गतीने व दीर्घ काळ चालू असल्यामुळे जास्त तापमानाची आवश्यकता पडत नसावी किंवा विघटन क्रियेतून हे रूपांतर झाले असावे किंवा भूकवचातील मृत्तिकेचा उपयोग रासायनिक उत्प्रेरकासारखा (स्वतः विक्रियेत भाग न घेता तिची गती वाढविणाऱ्या वा ती कमी तापमानाला घडवून आणणाऱ्या पदार्थासारखा) झाला असावा. (२) सूक्ष्मजंतूंची क्रिया : सूक्ष्मजंतूंच्या क्रियांनी मिथेनाची निर्मिती होते. अशीच क्रिया प्रामुख्याने तेलनिर्मितीस कारणीभूत होत असावी, असे मानले जाते. खोलवर गाडल्या गेलेल्या पुरातन अवसादात व खनिज तेलात असंख्य सूक्ष्मजंतू मिळतात, ही गोष्ट वरील विधानास पुष्टी देते. (३) किरणोत्सर्गी भडीमार : भूकवचातील किरणोत्सर्गामुळे (कण वा किरण बाहेर टाकण्याच्या क्रियेमुळे) कार्बनी द्रव्यात बदल घडण्यास जरूर असणारी ऊर्जा मिळाली असणे शक्य आहे. संतृप्त (ज्यांच्या संरचनेतील एकही रासायनिक बंध मोकळा नाही अशा) वसाम्लांचे किरणोत्सर्गामुळे हायड्रोकार्बनांमध्ये रूपांतर करता येते, या विक्रियेचा वरील विधानास आधार देण्यात येतो. (४) उत्प्रेरकी विक्रिया : उदा., कार्बोनियमाच्या आयनांनी (विद्युत् भारित अणुगटांनी) ओलेफिनांचे पॅराफिनात रूपांतर होण्यास मदत होते.
खनिज तेलामधील काही घटकांच्या अंगी प्रकाशीय वलनाचा गुणधर्म असतो. हा गुणधर्म केवळ वनस्पती किंवा प्राणी यांच्याच प्रक्रियांनी निर्माण झालेल्या काही संयुगांत आढळतो. वनस्पतींच्या हरितद्रव्यापासून (क्लोरोफिलापासून) किंवा प्राण्यांच्या तत्सम रंग द्रव्यापासून तयार झालेली पॉर्फिरिने व इतर संयुगे खनिज तेलात अल्प प्रमाणात असतात. ही संयुगे ऑक्सिजनाचा संपर्क झाला असता लवकर नाश पावतात. यावरून जेथे ऑक्सिजन पोहोचू शकत नव्हता अशा जागी तेल निर्माण झाले असले पाहिजे. उथळ समुद्राच्या तळाशी कित्येक जागी असे खोलगट भाग असतात की, ज्यांच्यातील पाणी निश्चल असून त्याच्यात ऑक्सिजनाची कमतरता असते. अशा खोलगट भागांच्या तळांवर मातीसारख्या सूक्ष्म गाळाचे कण व सागरी जीवांच्या शरीरांचे अवशिष्ट भागही साचत असतात. चिखलात पुरल्या गेलेल्या जैव पदार्थांवर अननिल (हवा किंवा मुक्त ऑक्सिजन नसलेल्या परिस्थितीत जगणाऱ्या) सूक्ष्मजंतूंची क्रिया होते. जैव पदार्थातील ऑक्सिजन ते शोषून घेतात. सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे मूळच्या जैव पदार्थात अनेक रासायनिक बदल होत राहून अखेरीस त्यांचे हायड्रोकार्बनांत (खनिज तेलात) रूपांतर होते. काही विशिष्ट परिस्थितींत समुद्राच्या तळाशी साचलेल्या चिखलासारख्या गाळातील जैव पदार्थावर सूक्ष्मजंतूंची क्रिया होऊन खनिज तेल तयार होते, हे आता मान्य झाले आहे. मात्र त्या क्रियेचा तपशील कळलेला नाही. तेल तयार होण्याच्या प्रक्रिया अत्यंत मंद असतात व त्या पुऱ्या होण्याला अतिदीर्घ काळ म्हणजे हजारो वर्षे लागतात. म्हणून खनिज तेलाच्या उत्पत्तीच्या दृष्टीने काळ हा घटकही महत्त्वाचा ठरतो.
जैव पदार्थांचे खनिज तेलात रूपांतर करण्यामध्ये वर वर्णन केलेल्या चारांपैकी कोणते कारण जास्त प्रभावी ठरते हे शोधण्यासाठी हेडबर्ग व इतर संशोधकांनी महत्त्वाचे कार्य केले (१९६८). समुद्रात अथवा इतरत्र गाळ साचल्यानंतर त्यात अनेक विक्रिया होतात त्यांना निक्षेपोत्तर विक्रिया म्हणतात. जैव पदार्थांचे खनिज तेलात रूपांतर होणे ही सुद्धा एक निक्षेपोत्तर विक्रिया आहे. अशा विक्रिया सॅन फ्रॅन्सिस्कोची खाडी, कॅस्पियन समुद्र, मेक्सिकोचे आखात यांसारख्या अनेक जागी सध्याही चालू आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी सध्या खनिज तेल तयार होत आहे असा होतो.
खनिज तेलाच्या उत्पत्तीबद्दल सध्या मान्य असलेल्या विचारसरणीचे सार थोडक्यात पुढीलप्रमाणे देता येईल : (१) कार्बनी द्रव्य हे खनिज तेलाच्या निर्मितीस लागणारा मूळ पदार्थ आहे. (२) तेल क्षपणकारक परिस्थितीत तयार होते. (३) खनिज तेलाची निर्मिती अवसादी खडक तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेतून झाली. (४) पुष्कळशा जीवजंतूंच्या आणि वनस्पतींच्यामुळे घडून आलेल्या नैसर्गिक विक्रियांनी हायड्रोकार्बनांची मिश्रणे तयार होतात व ही मिश्रणे खनिज तेलाचे मूळ पदार्थ असतात. (५) अवसादामध्ये घडणाऱ्या निक्षेपोत्तर विक्रिया घडत असताना खनिज तेल तयार झाले. (६) अवसाद पूर्णपणे घट्ट होण्यापूर्वी बहुतेक कच्चे तेल तयार झाले. (७) तेल तयार होण्याच्या प्रक्रियेला सूक्ष्मजंतूंची क्रिया, कवचातील उष्णता, दाब, किरणोत्सर्ग इत्यादींपासून ऊर्जा प्राप्त झाली. (८) खनिज तेलात आढळणाऱ्या हायड्रोकार्बनांची निर्मिती आजही चालू आहे.
खनिज तेलाचे स्थलांतर व संचय : समुद्राच्या तळाशी गाळ साचत राहून चिखलाचा जो थर तयार होतो, त्याच्यातील कण एकमेकांस सैलसर चिकटलेले असतात. त्या थरात बरेच म्हणजे ८० टक्क्यांपर्यंत पाणी असू शकते. गाळ साचत राहून चिखलाच्या थराची जाडी वाढत गेली म्हणजे वरच्या भागातील गाळाच्या भाराने तळाकडच्या भागातला गाळ दाबला जातो व त्याच्यातील पाणी आणि त्याच्यात तेल तयार झाले असेल, तर त्या तेलाचे सूक्ष्म बिंदू ही त्या भागातल्या गाळाच्या बाहेर घालविली जातात. ती अर्थात जेथला दाब कमी आहे अशा भागांकडे म्हणजे लगतच्या एखाद्या खडकातील चिरांत किंवा छिद्रांत घुसविली जातात. पृथ्वीच्या कवचाची हालचाल होऊनही एखाद्या थरावर दाब पडणे शक्य असते. त्याच्यातील पाणी, तेल व सर्व वायू थरांच्या बाहेर घालविली जातात. थरातील गाळाचे कण एकमेकांना चिकटविले जाऊन चिखलाच्या मूळच्या सैलसर राशीचे टणक संहत (घटक द्रव्ये अधिक एकत्रित झालेल्या) अशा शेल खडकांत रूपांतर होते.
उद्गम शैल व आशय शैल : तेल ज्या खडकामध्ये उत्पन्न होते त्या खडकाला उद्गम शैल म्हणतात. ज्या खडकात ते उत्पन्न होते त्याच्यातच सामान्यतः त्याचा साठा असत नाही, तो दुसऱ्या एखाद्या खडकात असतो. ज्या खडकात खनिज तेलाचा साठा असतो त्याला तैलाशय शैल किंवा आशय शैल म्हणतात. खनिज तेल एकदा तयार झाले म्हणजे ते उद्गम शैलातून ज्या ठिकाणी ते जमण्यास अनुकूल परिस्थिती असते तेथे म्हणजे आशय शैलात जाते व तेथे ते गोळा होत राहते. यांस स्थलांतर व संचय असे म्हणतात. स्थलांतर दोन प्रकारचे असते. पहिल्या प्रकारात तेल उद्गम शैलातून आशय शैलात जाते, यास प्राथमिक स्थलांतर म्हणतात. तैलाशय म्हणजे तेलाने भरलेली एखादी गुहा खडकात असावी असा अर्थ नसून खडकांत जी सूक्ष्मछिद्रे व चिरा असतात त्या तेलाने भरलेल्या असतात. उद्गम शैलात तयार झालेले तेल त्यातून बाहेर घालविले जाऊन आशय शैलातील छिद्रांत व चिरांत शिरते व तेथे भरून राहते. अर्थातच सच्छिद्र व पार्य खडकांतच तैलाशय होऊ शकतात. दुसऱ्या प्रकारात आशय शैलातून तेलाचे मोठ्या साठ्यात स्थलांतर होते. कित्येक वेळा भूकवचात एकावर एक असणाऱ्या थरांत तैलाशय असतात. अशा वेळी खालच्या पातळीवरील खडकांना भेगा पडल्या, तर त्यांतील तेलाचे वरच्या थरात पुन्हा स्थलांतर होते. या प्रकारास द्वितीयक स्थलांतर असे म्हणतात. स्थलांतराचे ऊर्ध्वगामी व पार्श्विक असे भेदही आहेत. पहिल्या ऊर्ध्वगामी प्रकारात खनिज तेल वरच्या दिशेत प्रवास करते व सामान्यतः ते जुन्या खडकांतून नव्यात जाते. दुसऱ्या पार्श्विक प्रकारात ते आजूबाजूला आडव्या दिशेने वाहत जाऊन तेलाच्या साठ्यात पडते.आशय शैलांचे व ज्या खडकांतील पोकळ्यांत मोठे तेलाचे साठे तयार होतात त्यांचे स्वरूप कसे आहे, यावर पार्श्विक स्थलांतराची मर्यादा अवलंबून असते. उदा., आशय शैल भिंगाकार असतील, तर पार्श्विक स्थलांतर सु. १·५ किमी. पर्यंत आणि शैल विस्तृत पसरलेल्या वालुकाश्मासारखे असल्यास त्यापेक्षाही जास्त होऊ शकते.
भूकवचात आढळणारे तेलाचे मोठे साठे कसे तयार झाले असावेत, या प्रश्नासंबंधी सध्या तरी दोन मतप्रवाह प्रचलित आहेत:(१) खनिज तेलाचे साठे भूकवचात जेथे मिळाले त्याच ठिकाणी तेलाची उत्पत्ती झाली किंवा (२) तेलाची उत्पत्ती झाल्यानंतर त्याचे स्थलांतर होऊन ते सध्या आढळणाऱ्या साठ्याच्या जागी येऊन साचले.
वेगवेगळ्या जागी असणाऱ्या दाबाच्या भिन्नतेमुळे व भूकवचातील हालचालींमुळे उद्गम शैलातील आंतरीय जल, तयार झालेले तेल, वायू इत्यादींची हालचाल सुरू होते व हे द्रायू (द्रव व वायू) दुसऱ्या सच्छिद्र खडकांत शिरतात. सच्छिद्र व पार्य खडकांवर जर अपार्य खडकांचे आवरण असले, तर हे द्रायू त्यातून बाहेर न पडता तेथेच साठून राहतात. पण वरचे आवरण भंगले, तर त्यातून द्रायू बाहेर पडून पुन्हा स्थलांतर करू लागतात. अशा रीतीने ते पार्य खडकांतून दूरपर्यंत जाऊ शकतात. मार्गात सूक्ष्म छिद्रे असलेला खडक आल्यास त्यातील छिद्रांचा गाळणीसारखा परिणाम होतो व त्यातून पाणी, तेल व वायू हे वेगवेगळ्या गतीने प्रवास करतात. वायू प्रथम बाहेर पडतात. पाणी तेलापेक्षा लवकर छिद्रांत शिरते व त्यातून बाहेर पडते, तर तेल पृष्ठताणामुळे छिद्रांभोवतीच राहते. याउलट सच्छिद्र वालुकाश्मासारख्या खडकात छिद्रे सापेक्षत: मोठी असल्यामुळे तेलाचे थेंब पाण्याच्या थेंबांपेक्षा दूरवर स्थलांतर करतात.
थोडक्यात म्हणजे एखाद्या ठिकाणी तेलाचा मोठा साठा तयार होण्यासाठी त्या प्रदेशात उद्गम थर असावे लागतात, त्यांना लागून स्थलांतरित तेल साठविण्यासाठी आशय शैल असावे लागतात आणि तेलाचे पुढील स्थलांतर होऊ न देता तेल अडवून त्याचे साठे तयार होण्याकरिता आशय शैलांवर अपार्य व पक्क्या खडकांचे मजबूत आवरण असावे लागते आणि अर्थातच उद्गम थरात पुरेसे तेल तयार व्हावे लागते. आशय शैलांच्या आसपास आढळणाऱ्या खडकांचे रासायनिक विश्लेषण करुन त्यांत जैव कार्बनाचे प्रमाण किती आहे याचे परीक्षण केल्यास, त्यांत उद्गम शैलाचे गुणधर्म आहेत किंवा नाहीत हे ठरविता येते. त्यावरून खनिज तेलाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली असावी याबद्दल अंदाज बांधता येतात. गुजरातमधील खंबायतच्या वायुक्षेत्रात अशा प्रकारचे संशोधन झालेले आहे. या क्षेत्रात आशय शैल मुख्यत्वेकरून ऑलिगोसीन कालीन (सु. ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) वालुकाश्म आहेत. या वालुकाश्मांच्या खाली आढळणाऱ्या इओसीन (सु. ५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) शेलाचे भूरासायनिक विश्लेषण केल्यावर त्यात उद्गम शैलास अनुकूल असे गुणधर्म असल्याचे आढळून आले. ऑलिगोसीन आशय शैलात आढळणाऱ्या खनिज तेलाची उत्पत्ती इओसीन शेलात झाली असावी व नंतर या तेलाचे ऊर्ध्वगामी स्थलांतर होऊन ऑलिगोसीन आशय शैलात त्याचे साठे तयार झाले असावेत, असा याचा अर्थ होतो.
तेलाचे नैसर्गिक साठे तयार होण्यासाठी अनुकूल आशय शैल असणे आवश्यक असते. आशय शैलांचे आकारमान, त्यांचे गुणधर्म आणि परिवर्तनशीलता यांवर एखाद्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या तेलाच्या साठ्याचे भवितव्य अवलंबून असते. ज्या भागात गाळांचे खडक बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतात, तेथे अनुकूल आशय शैल असण्याची बरीच शक्यता असते. आशय शैलामध्ये आवश्यक असणारे दोन अगदी महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे सच्छिद्रता व पार्यता. यामुळेच तेल साचण्यास आवश्यक असणारी रिकामी जागा उपलब्ध होते. आशय शैलात सच्छिद्रता असेल, तर त्यात तेलाचे बिंदू साचू शकतात आणि त्यात पार्यता असेल, म्हणजे ही छिद्रे फटी, चिरा, भेगा यांच्यामुळे एकमेकांना जोडलेली असतील, तर तेलाच्या बिंदूंची हालचाल होऊन प्रवाह सुरू होतात. एखाद्या तेलक्षेत्रातून तेल बाहेर काढण्याची पद्धत तेथील आशय शैलाच्या सच्छिद्रतेवर व पार्यतेवर अवलंबून असते. मृत्तिकाश्मात छिद्रे विपुल असतात पण त्याची पार्यता अल्प असते. त्यात जी सूक्ष्म छिद्रे असतात त्यांच्या कैशिकतेमुळे (केसासारख्या पोकळ्यांमुळे) त्यांच्यात असलेले द्रव व वायू हे घट्ट पकडून ठेवले जातात. त्यामुळे घर्षणजन्य रोध होऊन त्यांच्यातील द्रव किंवा वायू वाहू शकत नाहीत. म्हणून तैलाशय होण्यासाठी मृत्तिकाश्म किंवा शेल हे खडक उपयोगी होऊ शकत नाहीत. वाळू किंवा वालुकाश्म यांच्यात चांगले तैलाशय निर्माण होऊ शकतात. सच्छिद्र तसेच भेग अथवा चिरा पडलेल्या चुनखडकात व डोलोमाइटातही चांगले तैलाशय निर्माण होऊ शकतात.
सुट्या वाळूची सच्छिद्रता सु. २५ टक्के असते. वालुकाश्मांतील वाळूचे कण लुकणाने एकमेकांस चिकटविले गेलेले असतात व त्यांची सच्छिद्रता सु. १७ ते १२ टक्के किंवा त्याहून कमी असते.सच्छिद्रता जितकी अधिक तितका एखाद्या खडकात होऊ शकणारा तेलाचा साठा अधिक असतो.तसेच छिद्रे जितकी मोठी असतील तितके तेल मिळविण्याच्या दृष्टीने चांगले असते.तैलाशयातील तेलापैकी सर्वच्या सर्व तेल आपणास काढून घेता येत नाही. तेलाचा काही अंश खडकात शिल्लक राहतोच.जिची सच्छिद्रता २० टक्के आहे अशा वाळूच्या ३० मी. जाडीच्या आणि ०·४ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या थरापासून १,५५,००० पिंपे तेल मिळू शकते.
तैलाशय मुख्यतः सागरात साचलेल्या गाळांच्या खडकांत आढळतात. या खडकांपैकी मुख्य म्हणजे वाळू, वालुकाश्म, गाळवटी खडक व पिंडाश्म हे होत.काही सच्छिद्र चुनखडकांत व डोलोमाइटांत तेलाचे साठे आढळतात. अग्निज आणि रूपांतरित खडकांत ते बहुधा असत नाहीत, असले तर त्यांच्यातील तेल अर्थात बाहेरून आलेले असते.
भूकवचात आढळणाऱ्या तैलाशयांचे ढोबळपणे दोन गट करता येतात : (१) लहान प्रमाणातील छोटे साठे व (२) आर्थिक दृष्ट्या फायद्याचे ठरणारे मोठे साठे.तेलक्षेत्राच्या आसपास खोदलेल्या विहिरीतून थोड्याफार प्रमाणात तेल असलेले खडकांचे नमुने बहुधा मिळतातच. त्यांच्या पाहणीवरून भूपृष्ठाखालील तैलाशयांच्या आकाराचा किंवा त्यांनी व्यापलेल्या जागेचा अंदाज बांधता येतो. मोठ्या आकारमानाच्या तैलाशयांना तैल पल्वल, तेलक्षेत्र किंवा तेलप्रदेश असे म्हणतात.वेगवेगळ्या थरांत मिळणाऱ्या परंतु द्रवांच्या हालचालींच्या दृष्टीने एकाच भौतिक संरचनेशी संबंध असलेल्या तैलाशयास तेलक्षेत्र म्हणतात.उदा., दिग्बोई, अंकलेश्वर इत्यादी.ज्या एखाद्या भौगोलिक प्रदेशात एकमेकांसदृश एकाच भौतिक परिस्थितीत अनेक तैलाशय आढळतात, त्यास तेलप्रदेश म्हटले जाते. उदा., खंबायतचे आखात, आसाम वगैरे. भूपृष्ठाखालच्या तैलाशयांचे वर्गीकरण आशय शैलाच्या भूवैज्ञानिक वयानुसार देखील करतात. हे वर्गीकरण मुख्यतः वर्णनात्मक असते. वेगवेगळ्या भूवैज्ञानिक वयांच्या आशय शैलांच्या गटांनुसार त्यांतून मिळणाऱ्या तेलांच्या गुणधर्मांबद्दल सुद्धा ढोबळ अंदाज बांधता येतो. उदा., खंबायतच्या आखातातील इओसीन खडकांत मिळणारे तेल व आसामातील ऑलिगोसीन काळच्या खडकांत मिळणारे तेल यांचे गुणधर्म पुष्कळ भिन्न आहेत. भूवैज्ञानिक वयानुसार केलेल्या तैलाशयांच्या वर्गीकरणावरून ढोबळपणे असे सांगता येईल की, काही विशिष्ट वय असणाऱ्या खडकांच्या गटात इतर खडकांच्या गटांपेक्षा जास्त प्रमाणात तैलाशय मिळतात. उदा., जगात मिळणाऱ्या खनिज तेलापैकी एक टक्क्याहून कमी तेल कँब्रियन-पूर्व, कँब्रियन आणि ट्रायासिक काळच्या खडकांत मिळते, प्लाइस्टोसीन काळच्या खडकांत ते मुळीच मिळत नाही, तर तृतीय कल्पातील (सु.६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांत ५८ टक्के मिळते.
भारतात खनिज तेलाचे साठे प्रामुख्याने आसाम व गुजरात या राज्यांत सापडले आहेत. तेथील तेलक्षेत्रांतील आशय शैल मुख्यतः तृतीय कल्पातील वालुकाश्म व गाळवटी खडक आहेत. अहमदाबादजवळील कलोल तेलक्षेत्रातील आशय शैल हे मात्र कोळशाचे थर आहेत.
तेलाचे सापळे किंवा संरचना : उद्गम शैलातून बाहेर घालविलेले तेल त्याला वाट मिळत असेल अशा जागेतून एखाद्या सच्छिद्र खडकात शिरते व त्या खडकातील छिद्रांवाटे कमी दाबाच्या व कमी उंचीच्या भागांकडे म्हणजे सामान्यतः वर वर जाऊ लागते. त्या तेलाला अटकाव होईल अशी परिस्थिती म्हणजे खडकांची संरचना असली, तरच तेलाचा प्रवास थांबलिला जाऊन ते साचू शकते.उद्गम शैलातून बाहेर पडलेले तेल ज्याच्यात शिरलेले आहे त्या खडकातल्या चिरा दूरवर पसरल्या असतील व त्यांच्या वाटे खनिज तेलाला पृथ्वीच्या पृष्ठाशी येणे शक्य होत असेल, तर ते अखेरीस हवेत निसटून जाते, त्याचा आशय होत नाही. पण त्या खडकाच्या माथ्यावर एखादा अपार्य, छिद्रहीन थर असला, तर मात्र खनिज तेलाचा प्रवास थांबविला जाऊन त्याचा साठा तयार होतो. तो अर्थात अप्रवेश्य थराच्या खालच्या बाजूस तयार होतो. तेलाच्या प्रवाहाला अडवून अटकाव करणारे खडक तैलाशयाच्या माथ्याशी असतात म्हणून त्यांना आच्छादक खडक, टोपण किंवा टोपी खडक असे म्हणतात. मृत्तिकाश्म, शेल अथवा इतर अपार्य खडक प्रामुख्याने आणि क्वचित घट्ट चुनखडक, डोलोमाइट व जिप्सम हे टोपी खडक असतात.
ज्यांच्यामुळे खडकातून वाहत जाणाऱ्या तेलाला अडथला निर्माण होऊन त्याचा साठा तयार होतो, अशा अनेक संरचना खडकांत आढळतात.त्यांना सापळे, संरचनात्मक सापळे किंवा केवळ संरचना असे म्हणतात. सापळा ज्या प्रकाराने निर्माण झाला असेल त्यानुसार (१) संरचनात्मक, (२) स्तरीय किंवा (३) संमिश्र सापळा असे त्यांचे वर्गीकरण करतात.
संरचनात्मक सापळे : यांची निर्मिती मुख्यतः खडकांना पडणाऱ्या घड्यांमुळे किंवा विभंगांमुळे (भेगांमुळे) होते. घड्या पडलेल्या किंवा भंगलेल्या खडकातील संरचना कवचाच्या
हालचालींमुळे निर्माण होत असल्यामुळे त्या स्तरित अवसादाच्या बऱ्याच मोठ्या भागात दिसून येतात. यामुळे ह्या प्रकारच्या सापळ्याचा शोध करणे सोपे असते व अशा सापळ्याचा शोध मोठ्या प्रमाणावर केला जातो. संरचना तयार होण्यास कारणीभूत झालेल्या विशिष्ट प्रकारच्या हालचालींनुसार या सापळ्यांमध्ये पुढीलप्रमाणे भेद केले जातात : (१) खडकात घड्या पडण्यामुळे (आ.१-अ), (२) सरळ व उलट्या विभंगामुळे (आ.१-आ), (३) खडक भंग पावण्यामुळे, (४) अग्निज खडकांच्या अंतर्वेशनामुळे (घुसण्यामुळे) (आ.१-इ) आणि (५) वरील सर्व प्रकारच्या नैसर्गिक क्रियांच्या संमिश्र परिणामांमुळे संरचनात्मक सापळे तयार होतात.
अशा संरचनांपैकी सर्वांत महत्त्वाची संरचना म्हणजे थरांस घडी पडून निर्माण झालेली उद्वलीसारखा (कमानीसारखा) किंवा घुमटासारखा आकर असलेली विमुखनतीची (खडकातील घडीच्या एका प्रकाराची) संरचना होय. खनिज तेलाचा शोध सुरू झाल्यावर पहिल्या काही वर्षांत जे तेलाचे साठे सापडले ते अशी म्हणजे उद्वलीसारखी किंवा घुमटासारखी संरचना असणाऱ्या थरांत सापडले आणि पृथ्वीवर मोठी अशी जी तेलक्षेत्रे आहेत त्यांच्या खडकांची संरचना याच प्रकारची असलेली आढळते. अशी संरचना असलेल्या एका तेलक्षेत्राचा उभा छेद आ. १ (अ) मध्ये दाखविला आहे. त्यातील वाळूचा थर मातीच्या थराने झाकला गेलेला आहे.मातीचा थर अपार्य आहे. त्या थराने अटकाव झाल्यामुळे वाळूच्या थरात पाणी, तेल (आकृतीत गर्द काळ्या भागाने दाखविलेले) व वायू ही गोळा झाली आहेत. जो जो खनिज तेलाचे अधिकाधिक साठे सापडत गेले तो तो उद्वली किंवा घुमट याशिवाय अनेक संरचनांमुळे तेलाचे साठे निर्माण होऊ शकतात असे दिसून आले.
स्तरित सापळे : एखाद्या ठिकाणी पार्य असणारा खडक थोड्याच अंतरावर अपार्य होत जातो व त्यामुळे त्यातील छिद्रांत साठलेल्या तेलाच्या स्थलांतराचा मार्ग रोखला जाऊन तेलाचा साठा निर्माण होतो. कित्येक वेळा पार्य खडक विसंगतीच्या पातळीशी (दोन निरनिराळ्या काळांत तयार झालेल्या आणि निरनिराळ्या दिशांना भिन्न कोन करून तयार झालेल्या खडकांच्या संरचनेच्या पातळीशी) एकाएकी संपतो व त्यामुळे तेलसाठा तयार होतो. सामान्यत: स्तरित सापळ्यांचा संरचनात्मक सापळ्यांशी थोडाफार तरी संबंध असतो. त्यामुळे संरचनात्मक व स्तरित या दोन प्रकारच्या सापळ्यांच्या मर्यादा स्पष्टपणे आखणे कठीण असते. स्तरित सापळ्यांचे प्राथमिक व दुय्यम स्तरित सापळे असे दोन गट करता येतात. प्राथमिक स्तरित सापळे (१) दलिक (आधीच्या खडकांच्या तुकड्यांपासून बनलेला) खडक व अग्निज खडक ह्यांच्या लहान तुकड्यांमुळे तयार झालेले व (२) रासायनिक अवसादनामुळे तयार झालेले असे दोन प्रकारचे असतात.दुय्यम स्तरित सापळे अवसादनानंतर अवसादात बदल होऊन तयार होतात. अशा सापळ्यांचा विसंगती पातळीशी संबंध असतो. त्यामुळे त्यांना विसंगती पातळीचे सापळे असे म्हणतात.
संरचनात्मक सापळ्यांपेक्षा स्तरित सापळ्यांमुळे तेलाच्या संशोधनात खूपच गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. संरचनात्मक सापळे एकापेक्षा अधिक स्तरण बदल घडून निर्माण होतात आणि त्यामुळे एकापेक्षा अधिक थरांत तेलसाठे मिळण्याची शक्यता असते. या उलट स्तरित सापळ्यांच्या एखाद्याच थरात तेलसाठा मिळणे शक्य असते. काही वेळा खडकांची मांडणी व त्यांचे भौतिक गुणधर्म यांच्या विशिष्ट परिस्थितीमुळे तिसऱ्या प्रकारचे म्हणजे संमिश्र सापळे तयार होतात.संमिश्र सापळे निर्माण होण्यासाठी संरचनात्मक व स्तरीय अशा दोन्ही प्रकारचे अटकाव असणे आवश्यक असते. सैंधवी घुमटांचे सापळे या प्रकारात येतात. भूपृष्ठाखालच्या लवणांचे थर त्यावरील अवसादात घुसून वर येतात व त्यामुळे सापळा तयार होऊन सैंधवी घुमटातील सच्छिद्र खडकांत तेलाचे साठे तयार होणे शक्य होते.
जगातील खनिज तेलाचे बहुतेक साठे संरचनात्मक सापळ्यांत मिळाले आहेत. आसाम व गुजरात राज्यांतील तेलक्षेत्रांतील सापळे संमिश्र आणि संरचनात्मक प्रकारात मोडतात.
तैलाशयात आढळणारे द्रायू : भूकवचातील तेलाच्या नैसर्गिक साठ्यात तेलाबरोबर वायू आणि पाणी साठविलेली असतात. भूपृष्ठाखालील दाब आणि तापमान यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे खडकांचे आकारमान बदलते व त्यामुळे त्यांत असलेल्या द्रायूंचे आकारमानही बदलते. अर्थातच भूपृष्ठावर मिळणाऱ्या तेलाचे प्रमाण भूपृष्ठाखाली त्यावर असणाऱ्या दाब व तापमान यांवर अवलंबून असते. भूपृष्ठाखाली असणाऱ्या तेल, वायू, पाणी इत्यादींचे वाटप त्या त्या घटकाचे विशिष्ट गुरुत्व, सापेक्ष प्रमाण, केशाकर्षण, स्थलांतरासाठी आवश्यक असणारा दाब या गुणधर्मांवर व तैलाशयाच्या खडकांची सच्छिद्रता, पार्यता, त्यांची संरचना वगैरे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. नैसर्गिक वायू हलका असल्यामुळे तो तैलाशयाच्या वरच्या बाजूस असलेल्या खडकातील छिद्रांत साठतो, त्याखालील जागा तेलाने व्यापलेली असते आणि सर्वांत खालच्या भागात पाणी असते.सामान्यत: वायु-तेल व तेलक्षेत्रीय जल यांच्यातील पातळी स्पष्ट असते, मात्र सूक्ष्म पाहणी केल्यास ती संक्रमणात्मक असल्याचे आढळते. तैलाशयात आढळणाऱ्या द्रायूंपैकी खनिज तेलाच्या गुणधर्मांचे यापूर्वीच वर्णन केले आहे.
वायू : जमिनीखाली खनिज तेल व वायू जास्त तापमान व दाब यांच्यामध्ये असल्यामुळे खनिज तेलात वायू थोड्याफार प्रमाणात विरघळलेला असतो. तेलात संतृप्त होऊन शिल्लक राहिलेला वायू तेलाच्या वरच्या पृष्ठभागावर स्वतंत्रपणे आवरणाच्या स्वरूपात साठून राहतो. तेलात विरघळलेल्या वायूचे प्रमाण तेलावर असणाऱ्या दाब व तापमान यांवर अवलंबून असते.
पाणी : तैलाशयात मिळणाऱ्या पाण्यास तेलक्षेत्रीय जल म्हटले जाते. या पाण्याच्या उगमाच्या प्रकारानुसार त्याचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करतात. (१) वातावरणीय जल: पावसाचे पाणी सच्छिद्र व पार्य खडकांतून भूपृष्ठाखाली झिरपते व तेथे साठते, जमिनीत झिरपत असताना ह्या पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन विरघळतात. (२) सहजात जल: समुद्राच्या तळावर अवसाद तयार होत असताना तेथील खारे पाणी गाळातील कणाकणांतून साठते व गाळाचे खडकात रूपांतर होत असताना पाणी त्यात अडकून राहते. ह्या प्रकारच्या पाण्यात मुख्यत: सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरेंची क्लोराइडे विरघळलेली असतात. तेल विहिरीच्या प्रदेशातील खारे पाणी याच प्रकारचे असते. वर उल्लेखिलेल्या दोन प्रकारच्या पाण्यांखेरीज आणखीही एका प्रकारचे पाणी भूकवचात आढळते. ते म्हणजे मिश्रजल. या पाण्यात सल्फेट, कार्बोनेट व बायकार्बोनेट आणि क्लोराइड ही विरघळलेली असतात.
भूपृष्ठाखाली मिळणाऱ्या पाण्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणेही करता येते. (१) मुक्तजल : हे तेलसाठ्याच्या खडकातील संबद्ध छिद्रांतून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते व तेलाच्या स्थलांतरासाठी मार्ग मोकळा करते. (२) आंतरालीय जल : खडकांच्या निर्मितीपासूनच त्यातील कणांस लागून म्हणजेच कणांतरीय छिद्रांभोवती नेहमी थोड्याफार प्रमाणात पाण्याचे अस्तित्व असते व हे पाणी त्या कणांपासून केशाकर्षण किंवा तेल आणि वायूमुळे सुद्धा दूर सारले जात नाही. ह्या पाण्याने खडकातील छिद्रांपैकी १० ते ३० टक्के जागा व्यापली जाते व क्वचित हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असू शकते.
तेलसाठ्यांच्या खुणा : भूकवचात असणाऱ्या तेल किंवा वायूच्या बाह्य खुणा भूपृष्ठावर दृश्यमान होतात. अशा खुणांत तेल किंवा तेलमिश्रित पाण्याचे झरे किंवा नैसर्गिक वायूचे प्रवाह व खडकांच्या भेगांतून जमलेले अस्फाल्टाचे थर यांचा समावेश होतो. तेलसाठ्याच्या खुणांचे दोन प्रकार करता येतात : (१) भूपृष्ठावरील तेलाचे झरे आणि (२) भूकवचातील तेल व वायूचे साठे. भूपृष्ठावर आढळणारे तेलाचे झरे त्याखाली भूकवचात असलेल्या मोठ्या तेलक्षेत्रांचे निदर्शक असतात व त्यांचा उपयोग तेल शोधण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर होतो.
भूपृष्ठावर आढळणाऱ्या खुणांचे आणखीही दोन प्रकार करता येतात. (१) क्रियाशील निर्देशक : ज्या वेळी खनिज तेल किंवा वायू सतत भूपृष्ठावर येत असतो, त्यावेळी तो भूकवचात असणाऱ्या छोट्या-मोठ्या तेलसाठ्याचा निर्देशक असतो. त्या तेलाच्या किंवा वायूच्या प्रवाहाला भूकवचातून सतत तेल किंवा वायूचा पुरवठा होत असतो व म्हणून अशा खुणेला क्रियाशील निर्देशक म्हणतात. (२) मृत निर्देशक : भूपृष्ठावरील खडकांच्या भेगांतून अस्फाल्टाचे किंवा बिट्युमेनाचे थर जमलेले दिसतात व ते पूर्वी अस्तित्वात असलेल्या तेलसाठ्याचे निदर्शक असतात. भूपृष्ठाखाली पूर्वी असलेले तेल किंवा वायू निघून गेल्यामुळे हे थर जमतात.
भूपृष्ठावर आढळणाऱ्या तेलाचे किंवा वायूचे खाली दिल्याप्रमाणे तीन प्रकार करता येतात : (१) द्रवरूप तेलाचे झरे, (२) चिखली ज्वालामुखी व (३) घनरूप खनिज तेल.
(१) तेलाचे झरे : भूपृष्ठाला गेलेल्या भेगा, खडकांच्या स्तरातील संधिरेषा व विसंगती इत्यादींमुळे खनिज तेल भूकवचातून पृष्ठभागापर्यंत येऊन पोहोचू शकते. तेल किंवा तेलमिश्रित पाण्याचे झरे किंवा द्रवरूप अस्फाल्टाचे झरे हे मुख्यत: भूकवचातील मोठ्या तेलसाठ्यातून निघून पृष्ठभागी येणाऱ्या खनिज तेलाच्या पाझरामुळे निर्माण होतात.जगाच्या वेगवेगळ्या भागांतील अशा तऱ्हेच्या झऱ्यांचे अस्तित्व माहीत आहे. कॅलिफोर्निया, त्रिनिदाद, बाकू इ. तेलसंपन्न प्रदेशांत अशा प्रकारच्या झऱ्यांनी शेकडो हेक्टर जमीन व्यापली आहे. वाळवंटातून मात्र तेलाच्या झऱ्यांपेक्षा वायूचे प्रवाह जास्त आढळतात.
(२) चिखली ज्वालामुखी : भूपृष्ठाखाली असणारा नैसर्गिक वायू जास्त दाबाखाली असल्यास तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो व वर येताना स्वत:बरोबर पाणी, खडकांचे तुकडे, चिखल व कित्येक वेळा तेलसुद्धा वर आणतो. अशा तऱ्हेच्या वायुमिश्रित गाळातून सतत किंवा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने वायूचे लोट बाहेर पडतात, हेच चिखलाचे ज्वालामुखी होत. मऊ अवसादांच्या प्रदेशात असे चिखली ज्वालामुखी बरेच आढळतात व ते एकेकटे किंवा गटागटाने शेकडो चौ. किमी.चा प्रदेश व्यापतात.रशियातील बाकू, कॅस्पियन समुद्राजवळील किंशिदाग, त्रिनिदाद, ब्रह्मदेशातील आराकान किनारा, अंदमान बेटे इ. ठिकाणी चिखलाचे ज्वालामुखी आहेत. त्यांच्यावरून भूपृष्ठाखालच्या वायूचे अस्तित्व समजते.
(३) घनरूप खनिज तेल : (बिट्युमेन अस्फाल्ट). अवसादांच्या थरात बऱ्याच वेळा अस्फाल्ट, बिट्युमेन इत्यादींच्या स्वरूपात खनिज तेल मिळते. खडकांतून अशा तऱ्हेने मिळणारे बिट्युमेन एकतर त्या खडकांत पूर्वी द्रवरूपात असून खडक एकसंध होत असताना किंवा कालांतराने घट्ट झालेले असते. या दुसऱ्या प्रकारच्या बिट्युमेन किंवा जड तेलाच्या साठ्यास अवशेषी तेलक्षेत्र म्हणतात. अशा प्रकारचे तेलसाठे ॲल्बर्टातील क्रिटेशस (सु.१४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील तैलवालू, टेक्ससमधील चुनखडक इत्यादींतून आहेत. अशा साठ्यांतून हायड्रोकार्बनांपैकी अस्फाल्ट, ग्रॅहमाइट, गिल्सोनाइट इ. पदार्थ घन किंवा द्रव अवस्थेत मिळतात. केरोसीन शेल हाही घनरूप खनिज तेलाचा प्रकार असून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या काळाच्या खडक-गटांत केरोसीन शेल मिळतात. त्यांत मुख्यत: ६९–८०% कार्बन, ७–११% हायड्रोजन, १·२५–१·५% नायट्रोजन, १–८% गंधक आणि ९–१७% ऑक्सिजन असतो.
तैलाशयांचे समन्वेषण : समन्वेषण म्हणजे शोध घेण्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक पाहणी करणे होय. वर उल्लेख केल्यासारख्या पृष्ठीय लक्षणांवरून खोल जागी असलेल्या तैलाशयाचा शोध लागणे शक्य असते व तसा तो कित्येकदा लागलेलाही आहे.परंतु तैलाशय शोधून काढण्यासाठी अशा लक्षणांचा उपयोग आता सामान्यत: होत नाही.पृष्ठीय लक्षणांवरून ज्यांचा मागमूस लागणे शक्य आहे असे साठे आता फारसे उरलेले नाहीत. आणखी असे की, पृष्ठभागी कोणतीच लक्षणे नसतानाही खोल जागी तैलाशय व काही वेळा मोठा तैलाशयही असणे शक्य असते. म्हणून आता भूवैज्ञानिक व भूभौतिकीय पद्धती वापरून तैलाशयांचा शोध केला जातो.
एखाद्या प्रदेशात तैलाशय आहे की काय हे पहावयाचे असेल, तर त्या प्रदेशात सर्वत्र हिंडून तेथल्या खडकांची व त्यांच्या संरचनांची काळजीपूर्वक पाहणी केली जाते व त्या प्रदेशाचा भूवैज्ञानिक नकाशा तयार करण्यात येतो. अशा माहितीवरून त्या प्रदेशात तैलाशय असण्याचा संभव आहे की नाही हे कळते. अशा म्हणजे केवळ भूवैज्ञानिक पाहणीवरून त्या प्रदेशातल्या खडकांचे प्रकार व त्यांच्या संरचनांचे स्थूल स्वरूप ही कळून येतात. अशा माहितीवरूनही कधीकधी तैलाशयाचा शोध लागण्याची शक्यता असते, पण अधिक निश्चित माहिती मिळविण्यासाठी अधिक खोल जागेतल्या संरचनांची पाहणी करावी लागते. प्रारंभिक पाहणीवरून एखाद्या क्षेत्रात तेलाचा साठा निर्माण होण्यास अनुकूल संरचना आहे असे आढळून आल्यास तेथे विहीर खणावी लागते. एखाद्या ठिकाणी तेल आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष विहीर खणण्याशिवाय सध्या तरी दुसरा मार्ग उपलब्ध नाही. खनिज तेलाचे शास्त्रीय पद्धतींनी समन्वेषण करण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतात: (१) अनुकूल उद्गम शैल, आशय शैल, सापळे, द्रवगतिक (द्रवाची गतीसंबंधीची) अवस्था इ. ज्यांमध्ये आहेत, असे प्रदेश निश्चित करावे लागतात (२) खनिज तेलाचे सापळे निर्माण होऊ शकतील अशा संरचना उदा., घड्या, विभंग इ. शोधाव्या लागतात (३) अशा ठिकाणी खनिज तेल आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी विहिरी खणाव्या लागतात व (४) तेलाच्या साठ्याचा शोध लागल्याबरोबर त्याचा विस्तार, तेलाचे गुणधर्म इत्यादींबद्दल निश्चित माहिती मिळवावी लागते.खनिज तेलाच्या शोधासाठी करण्यात येणाऱ्या समन्वेषणाचे भूवैज्ञानिक व भूभौतिक असे दोन विभाग स्थूलमानाने पडतात, परंतु कित्येकदा त्यांत काटेकोर फरक करणे शक्य होत नाही.
भूवैज्ञानिक पद्धती : यांत पृष्ठीय भूविज्ञान, प्रयोगशाळांतील अध्ययन, छायाचित्रण व प्रादेशिक भूविज्ञान यांचा समावेश होतो. (१) पृष्ठीय भूविज्ञान : जेथे समन्वेषण करावयाचे असेल त्या प्रदेशाचा प्रथम आधारभूत नकाशा तयार करतात. तेथील खडकांच्या दृश्यांशांची (पृष्ठावर उघड्या पडलेल्या भागांची) पाहणी व अभ्यास करून आणि आधारभूत नकाशा वापरून भूवैज्ञानिक नकाशा तयार करतात. या कामांमध्ये थरांच्या खडकांचे स्तंभ, भूवैज्ञानिक अनुप्रस्थ (आडवे) छेद इ. तयार करावे लागतात. ही सर्व पाहणी केल्यामुळे त्या प्रदेशात उद्गम शैल, आशय शैल, सापळे इ. आहेत किंवा नाहीत याची माहिती मिळते.खडकांची पाहणी करीत असतानाच या प्रदेशात खनिज तेलाचे पाझर आहेत किंवा नाहीत, हेही पहावे लागते. (२) प्रयोगशाळांतील अध्ययन : पृष्ठीय आणि अध:पृष्ठीय भूविज्ञानाचा अभ्यास करताना गोळा केलेल्या खडकांचे प्रयोगशाळांत सविस्तर विश्लेषण करतात. त्यामुळे खडकांचे गुणधर्म, खनिजे, जीवाश्म, खडकांची सच्छिद्रता, पार्यता, जलसंतृप्ती (पाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण सामावलेले असणे), तैलसंतृप्ती इत्यादींबद्दल माहती मिळते.याचा उपयोग नवीन विहिरींच्या जागा ठरविणे, समन्वेषणासाठी नवीन प्रदेश निवडणे यांसाठी होतो. (३) छायाचित्रण : या पद्धतीत विमानातून काढलेल्या भूपृष्ठाच्या छायाचित्रांचा अभ्यास केला जातो. एखादा प्रदेश अत्यंत दुर्गम असला, परंतु त्यात उत्कृष्ट दर्जाचे दृश्यांश असले, तर त्या प्रदेशाचे हवाई छायाचित्रण करून त्या प्रदेशाचा भूवैज्ञानिक नकाशा तयार करणे शक्य होते. अशा छायाचित्रांमध्ये विस्तीर्ण प्रदेशाचे सम्यक् दर्शन घडते. दृश्यांश तितक्या चांगल्या प्रतीचे नसले तरी तेथील वनस्पती, घड्या, विभंग यांसारख्या संरचना, मृदेचे गुणधर्म इत्यादींच्या आधारे तेथील भू-आकारविज्ञान व पर्यायाने संरचना यांच्याविषयी अप्रत्यक्ष अनुमान करता येते. सध्या हवाई छायाचित्रणामध्ये खूप प्रगती झालेली आहे. या कामी सूक्ष्मतरंग व अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील प्रारणांच्या) तंत्राचा उपयोग करण्यात येऊ लागला आहे. या तंत्रास दूर संवेदना तंत्र म्हणतात. तसेच कृत्रिम उपग्रहांद्वारा काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग करूनही प्रादेशिक भूविज्ञानाबद्दल महत्त्वाची माहिती मिळवितात. (४) प्रादेशिक भूविज्ञान : खनिज तेलाच्या पूर्वेक्षणासाठी पृष्ठीय भूविज्ञान, अंध:पृष्ठीय भूविज्ञान, भूभौतिकी इ. भिन्न मार्गांनी मिळविलेली माहिती एकत्र केल्यास तेथील प्रादेशिक भूविज्ञानाची कल्पना येते. खडकांचे व त्यांत आढळणाऱ्या प्रवाही पदार्थांचे गुणधर्म समजले म्हणजे तेलाचे साठे साधारणपणे कोठे मिळू शकतील, याचे स्थूल अनुमान काढणे शक्य होते.
भूभौतिकी पद्धती : भूकवचामध्ये जमिनीखाली खोल जागी असणाऱ्या खडकांच्या भिन्न प्रकारांमुळे आणि त्यांच्यात असणाऱ्या निरनिराळ्या संरचनांमुळे भौतिक गुणधर्मांत फरक पडतात. भूभौतिक पद्धतीत भूकवचातील भौतिक गुणधर्मांमधील फरकांची पाहणी व मोजणी करतात. या माहितीवरून भूपृष्ठाखालील खडकांचे स्वरूप, त्यांच्या प्रकारांतील फरक, त्यांच्यातील संरचना इत्यादींबद्दल अप्रत्यक्ष रीतीने आणि स्थूलमानाने अंदाज बांधता येतात.खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध लावण्यासाठी भूभौतिक पद्धती १९३० सालापासून प्रामुख्याने वापरात येऊ लागल्या. या पद्धतीचे (१) गुरुत्वाकर्षण, (२) चुंबकीय, (३) विद्युत्, (४) भूकंपीय व (५) किरणोत्सर्गी हे प्रकार आहेत.खंडांच्या किनाऱ्यालगत व उथळ समुद्राच्या तळाखाली असलेल्या प्रदेशातील खडकांविषयी तसेच खोल सागराच्या तळाखाली असलेल्या प्रेदशातील खडकांविषयी माहिती मिळविण्यासाठीही भूभौतिक पद्धतींचा उपयोग करतात. यांपैकी भूकंपीय पद्धत विशेष प्रभावी ठरते. मात्र ती खर्चाची असल्यामुळे तिचा वापर मर्यादित क्षेत्रातच करणे योग्य असते. म्हणून कमी खर्चाच्या गुरुत्वाकर्षण व चुंबकीय पद्धती सामान्यत: प्रथम वापरून नंतरच सापेक्षत: अधिक निश्चित व मर्यादित जागांमध्ये भूकंपीय पद्धतीने समन्वेषण करतात [→ खनिज पूर्वेक्षण]. भूभौतिक पद्धतींत आशय शैलांचे गुणधर्म, त्यांचा विस्तार आणि आकार इत्यादींचे मूल्यमापन करावे लागते. तेलाचे काही साठे विसंगतीची पातळी, संलक्षणी (खडकाच्या व त्यातील प्राण्यांच्या वैशिष्ट्यांतील) बदल, खडकांची सच्छिद्रता आणि पार्यता यांच्यात होणारे बदल इ. भिन्न कारणांनी उत्पन्न झालेले असतात. अशा प्रकारचे स्तरित साठे शोधून काढण्यास भूभौतिक पद्धती फारशा उपयुक्त ठरत नाहीत. मात्र या पद्धतींच्या आधारे एखाद्या ठिकाणी तेलाचे साठे निर्माण होण्यास अनुकूल अशा संरचना आहेत किंवा नाहीत, हे समजू शकते. मात्र अशा संरचनांत खनिज तेल निश्चितपणे आहे किंवा नाही हे समजण्यासाठी विहीरच खणावी लागते.
भूवैज्ञानिक व भूभौतिकीय पद्धतींनी एखाद्या जागी तेलाचा साठा हमखास सापडेल असे सांगता येत नसले, तरी त्यांच्या साहाय्याने केलेली भाकिते बऱ्याच वेळा खरी ठरतात.कोणताच वैज्ञानिक सल्ला न घेता तेलासाठी ज्या विहिरी खणण्यात आल्या त्यांच्यापैकी शेकडा चारातही तेल आढळले नाही. उलट वर उल्लेख केल्यासारख्या वैज्ञानिक पद्धती वापरून ज्यांच्या जागा निवडल्या होत्या अशा विहिरींपैकी शेकडा साठ विहिरींत तेल आढळले. म्हणून आता वैज्ञानिकांचा सल्ला घेतल्याशिवाय तेलासाठी विहिरी खणीत नाहीत.
छिद्रण : भूवैज्ञानिक व भूभौतिकीय पाहणीवरून एखाद्या क्षेत्रात तेल असण्याचा संभव आहे, असे दिसून आल्यावर त्या क्षेत्रातील एखाद्या जागी नळासारखे भोक पाडून तेल मिळते की नाही ते पाहतात. भोक पाडण्याच्या या क्रियेला छिद्रण म्हणतात.तेलाच्या विहिरीसाठी पाडलेली भोके ५ ते ३० सेंमी. व्यासाची आणि काही हजार मीटरांइतकी खोल असू शकतात व या भोकांनाच विहिरी म्हणतात.अ१९२० सालापूर्वी खणलेल्या विहिरी क्वचितच १,२२० मी. पेक्षा अधिक खोल असत. त्यानंतर विहिरी खणण्याच्या यंत्रात अधिकाधिक सुधारणा होत गेल्या. १९५० साली कॅलिफोर्नियातील पालोमा क्षेत्रातील सर्वांत खोल विहिरीची खोली ६,५४८ मी. होती.१९५८ साली टेक्ससमधील पेकस काउंटीमध्ये फिलिप्स पेट्रोलियम कंपनीने खणलेली विहीर ८,००० मी. खोलीची आहे. अशी भोके पाडण्यासाठी आता सामान्यत: चक्रीय छिद्रण पद्धती वापरली जाते [→ वेधन व छिद्रण].
मोठ्या व्यासाच्या भोकाला वेध व लहान व्यासाच्या भोकाला छिद्र म्हणतात. चक्रीय छिद्रणाच्या सामग्रीत एक उंचसा लोखंडी मनोरा असतो. त्याच्या तळाच्या मजबूत मंचावर एंजिन, चलित्र (मोटर) वगैरे चालक यंत्रणा, पंप इ. साहाय्यक यंत्रे असतात. मनोऱ्याच्या टोकाशी खालच्या बाजूला कप्प्यांचा एक संच असून त्याच्या खालच्या ठोकळ्याला एका भोवरकडीद्वारे छिद्रकमालिका जोडलेली असते. या मालिकेत सुरुवातीला एक मजबूत, जाड व चौरस छेदाचा पोकळ पोलादी केली (नळ) असतो. तो १०–१५ मी. लांब असून एका मोठ्या आडव्या दंतचक्राच्या मध्यातून जातो. हा केली चक्राबरोबर गोलगोल फिरतो व त्याच वेळी वरखालीही होऊ शकतो. केलीच्या खालच्या टोकाला दुसऱ्या नळांचे तुकडे जरूरीप्रमाणे जोडता येतात. शेवटच्या नळाच्या टोकाला छिद्रक आट्यांनी बसविलेला असतो. याप्रमाणे छिद्रकमालिकेत केली, नळ व छिद्रक येताना आणि भोक पाडताना सबंध मालिका फिरत असते.छिद्रक फिरताना तो त्यावरील नळांच्या वजनाने खालीखाली कापत जातो आणि भोक अधिक खोल होत जाते. छिद्रक निरनिराळ्या प्रकारचे असतात, पण हल्ली औद्योगिक हिरे (आकारमानाने लहान असलेले व काही अशुद्ध पदार्थांनी युक्त असलेले हिरे) बसविलेले छिद्रकच जास्त करून वापरतात.
छिद्रण चालू असताना पाणी व चिखल ही सतत नळातून भोकात सोडावी लागतात. द्रवाबरोबर येणारा खडकांचा भुगा तपासून त्यावरून काही अनुमाने बांधता येतात. तसेच खडक लागल्यास कधीकधी त्याचे वरवंट्यासारखे लांब तुकडेही (आंतरक) परीक्षेसाठी वर काढता येतात.
छिद्रण अव्याहत चालू ठेवून काम लवकर संपवता येते. छिद्रणाचे काम वाटते तितके सोपे नसते. त्यात निरनिरळ्या अडचणी येतात. छिद्रण तुटणे, नळ भोकात अडकणे, भोक वाकडे जाणे व भोकातून वायू, तेल किंवा पाणी न आवरता येण्याइतक्या जोराने एकदम बाहेर येऊ लागणे या छिद्रणातील मुख्य अडचणी होत.
तेलासाठी विहिरी खणण्याचे मुख्यत्वेकरून तीन प्रकार आहेत : (१) उथळ भागातील छिद्रण, (२) चाचणी छिद्रण व (३) विकास छिद्रण. हल्ली पाण्याखाली विहिरी खणण्याचा अपतटी (किनाऱ्यापासून दूर) छिद्रणाचा चौथा प्रकार वापरण्यात येत आहे. उथळ छिद्रण केवळ अध:पृष्ठीय भूवैज्ञानिक माहिती मिळविण्यासाठी करतात.खणण्याचे काम चालू असताना आत आढळणाऱ्या खडकांचे आंतरक सतत काढले जातात. या कामासाठी ट्रकवर बसविलेली छिद्रण यंत्रे वापरतात. सु. ५–१० सेंमी.व्यासाच्या १०० ते ३०० मी. खोल विहिरी खणून त्यांत मिळणारे शैलकण, आंतरक इत्यादींची पाहणी करून स्तरवैज्ञानिक व संरचनात्मक माहिती मिळविता येते. शास्त्रीय पूर्वेक्षणाशिवाय केवळ अंदाजाने म्हणजे ज्याप्रमाणे जुगार खेळतात त्याप्रमाणे प्रसंगी धोका पत्करून कोठेतरी खणलेल्या विहिरींचा चाचणी छिद्रण प्रकारात समावेश होतो. एखाद्या ठिकाणी तेलाचे साठे आहेत वा नाही हे पाहण्यासाठी भूवैज्ञानिक व भूभौतिक माहितीच्या आधारे खणलेल्या विहिरीस समन्वेषण विहीर म्हणतात. विहिरी खणत असताना (१) त्यांतून निघणाऱ्या शैलकणांचे व आंतरकांचे परीक्षण करण्यासाठी, (२) त्या विहिरींत खनिज तेल मिळाले, तर त्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आणि (३) छिद्रणाचे काम निर्विघ्नपणे व सुरळीत चालू राहण्यास मदत करण्यासाठी छिद्रणाच्या जागी तज्ञ व अनुभवी भूवैज्ञानिक २४ तास उपस्थित असणे आवश्यक असते.छिद्रण चालू असताना जमिनीखालील विविध थरांचा दाब व छिद्रणाच्या चिखलामुळे निर्माण होणारा दाब हे संतुलित ठेवावे लागतात. नाहीतर कित्येक वेळा अपघात होतात, तसेच हा चिखल आशय शैलात घुसून दुष्परिणाम होतात. विहिरीतून बाहेर पडणारे शैलकण, आंतरक व चिखल यांच्यामध्ये तेलाचा अंश आहे किंवा नाही, यांवर सारखे लक्ष ठेवावे लागते. वेळोवेळी विहिरीतील खडकांचे व त्यांच्या गुणधर्मांचे कूप –अभिलेखन (क्रमवार नोंदणी) करून थरांचे गुणधर्म, त्यांतून खनिज तेलाच्या प्राप्तीची शक्यता इत्यादींबद्दल माहिती मिळवावी लागते.तेलाच्या साठ्याचा शोध लागल्यानंतर जेव्हा त्यातून उत्पादन सुरू होते, तेव्हा तेलाचे जास्तीत जास्त व किफायतशीरपणे उत्पादन करण्यासाठी काही अधिक विहिरी खणाव्या लागतात. अशा कामासाठी केलेल्या छिद्रणास विकास छिद्रण असे म्हणतात.
अपतटी समन्वेषण : जमिनीवरील तेलाचे साठे सापडणे जसजसे कठीण होऊ लागले आणि तेलाची मागणी वाढू लागली तसतसे समुद्र किनाऱ्याजवळच्या पाण्याखालील प्रदेशांत समन्वेषण करण्याचे कार्य वाढू लागले.समुद्राच्या पाण्याखाली असणाऱ्या तेलाचा शोध लावण्यासाठी प्रथम कॅलिफोर्नियात विहिरी खणण्यात आल्या. या विहिरी सरळ उभ्या दिशेत न खणता वक्र दिशेत खणाव्या लागल्या. अशा प्रकारात जेव्हा विहीर खणण्याचे काम पूर्ण होते, तेव्हा विहिरीचा तळ खणण्याच्या मूळ जागेपासून समुद्रात दूर अंतरावर व समुद्राच्या पाण्याखाली असणाऱ्या आशय शैलात जाऊन पोहोचलेला असतो. समुद्रातील उथळ पाण्यामध्ये पहिली विहीर १९४५ साली अमेरिकेतील लुइझिॲना राज्यालगतच्या समुद्रात छिद्रण यंत्र उभारून खणण्यात आली. नंतर व्हेनेझुएलातील मराकायबो तळे, इराणचे आखात, कॅस्पियन समुद्रालगतचे बाकू क्षेत्र इ.ठिकाणी अशा विहिरी खणण्यात आल्या.१९७१ सालापर्यंत जगभर सु. ७५ देशांत ३०० मी. खोल पाणी असणाऱ्या सु. २·०५ कोटी चौ. किमी. प्रदेशात खनिज तेलासाठी समन्वेषण करण्यात आले. १९७० च्या सुमारास अंटार्क्टिका खंड सोडून जगातील इतर सर्व खंडांत समुद्राच्या पाण्यात तेलाच्या साठ्यांचा शोध लावण्याचे काम सुरू झालेले होते.
समुद्राच्या किनाऱ्याकडील खंडीय निधायाच्या (किनाऱ्याजवळील कमी उताराच्या समुद्रातील भागाच्या) सु.दीड कोटी चौ. किमी. प्रदेशात पाण्याखालील जमिनीत खनिज तेलाचे साठे सापडतील असा अंदाज आहे. १९६८ साली जगात झालेल्या खनिज तेलाच्या एकूण उत्पादनांपैकी सु. १५ टक्के उत्पादन अपतटीय प्रदेशातील होते. जगातील एकूण तेलसाठ्यांपैकी १९ टक्के तेलसाठे अपतटीय भागात आहेत. यांपैकी २० टक्के क्षेत्रांची छिद्रण करून पाहणी करण्यात आली आहे. या सर्व प्रदेशांचे भूभौतिक समन्वेषण होण्यास शंभराहून अधिक वर्षे लागतील असा अंदाज आहे. सध्या उत्तर समुद्र, फ्रान्सलगतची ब्रिटिश खाडी, ईजिप्तच्या बाजूचा तांबडा समुद्र, ऑस्ट्रेलियाच्या उत्तर, पश्चिम व दक्षिण भागांतील समुद्र, सुमात्रा लगतचा समुद्र, अमेरिकेचा गल्फ किनारा, अलास्काच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र, इराणचे आखात, मध्य व दक्षिण अमेरिकेच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवरील समुद्र, नायजेरिया व उत्तर आफ्रिका यांच्या आसपासचा समुद्र या भागांत अपतटी छिद्रण चालू आहे व काही भागांत ते चालू करण्याच्या योजना आहेत. यांशिवाय बाल्टिक समुद्र, चिनी समुद्र, थायलंडची खाडी, आयरिश समुद्र, आर्क्टिक महासागर आणि आर्क्टिक बेटे या भागांतही अपतटी समन्वेषणाचे काम चालू आहे. वर उल्लेख केलेल्या प्रदेशांपैकी (१) लुइझिॲनाजवळील गल्फ, (२) उत्तर समुद्र, (३) ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेस असलेली बास सामुद्रधुनी, (४) अलास्कामधील कुक इन्लेट (खाडी), (५) नायजेरियाजवळील समुद्र व (६) इराणचे आखात या भागांत तेलाचे व नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे सापडले आहेत. १९६७-६८ च्या सुमारापासून भारतीय तंत्रज्ञांनी रशियन तंत्रज्ञांच्या व जहाजांच्या मदतीने भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीची प्राथमिक पाहणी केली. मुंबईजवळील समुद्रामध्ये ‘बाँबे हाय’ नावाच्या भागात अशा छिद्रणाचे काम चालू आहे. १९७५ च्या मध्यापर्यंत तेथे पाच विहिरी खोदण्यात आल्या असून त्यांच्यात तेल लागले आहे. या भागातून किती तेल मिळू शकेल आणि ते कोणत्या प्रकारचे असेल, यांविषयीचे संशोधन चालू आहे.
अपतटी छिद्रण : समुद्राच्या तळाखालील तेल शोधणे व त्यासाठी छिद्रण करणे हे भूपृष्ठावरील कामापेक्षा फार अवघड असते. त्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.कारण छिद्रण
पाण्यातून करावे लागते. छिद्रणाची यंत्रणा जमिनीवर वापरताना जमिनीचा पक्का आधार मिळतो. त्यामुळे यंत्रणा पक्की बसविता येते. समुद्रात छिद्रण करताना यंत्रणा पाण्यावर तरंगणाऱ्या मोठ्या मंचावर किंवा जहाजावर केलेली असते. समुद्राच्या लाटा, वादळे इत्यादींमुळे मंच व त्यावरील यंत्रणा यांना हेलकावे बसतात व त्यामुळे त्या अस्थिर असतात. यासाठी छिद्रण यंत्र ज्या मंचावर किंवा जहाजावर उभारायचे ते स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याशिवाय समुद्रातील प्रवाह, लाटांचा जोर, त्यांची भरती व ओहोटी, तळावरील वाळूची हालचाल यांच्या परिणामांचा विचार करावा लागतो.समुद्राच्या पाण्यात पुष्कळ प्रकारची लवणे विरघळलेली असतात. या पाण्यामुळे छिद्रण यंत्राच्या धातूच्या भागांवर रासायनिक क्रिया होऊन त्यांची फुटतूट होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. वरील सर्व अडचणींना तोंड देऊ शकेल अशी यंत्रणा तयार करण्यासाठी मोठाल्या कारखान्यांचे व शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत.
अपतटी छिद्रणाचे कार्य प्रथम सुरू झाले त्या काळी छिद्रण यंत्र जहाजाला बांधून छिद्रण करावयाच्या जागी नेत आणि तेथे मंच शक्य तितका पक्का बसवीत.अशा प्रकाराने बसविलेल्या छिद्रण मंचास अचल मंच म्हणतात.पुढे या पद्धतीत अनेक सुधारणा करण्यात आल्यामुळे छिद्रण यंत्र एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणे व पाण्याची खोली जास्त असली, तरीही छिद्रण करणे शक्य झाले व चल छिद्रण मंच उपयोगात येऊ लागले.चल छिद्रण मंचाचे (१) स्वयंउत्थापक मंच, (२) पाण्याखाली संपूर्ण बुडणारा मंच, (३) पाण्याखाली अर्धवट बुडणारा मंच व (४) तरता मंच असे मुख्य प्रकार वापरात येऊ लागले. यांपैकी स्वयंउत्थापक मंच सर्वांत जास्त वापरला जातो. स्वयंउत्थापक मंच जहाजाला बांधून छिद्रणाच्या जागी नेण्यात येतो. त्याचे पाय समुद्राच्या तळावर टेकविले जातात व मंच लाटांच्या पातळीहून उंच जागी चढविला जातो. हा मंच नवीन जागी छिद्रण करण्यास उपयुक्त असतो तो वापरून सु. १०० मी. खोल पाण्यात छिद्रण करता येते. ‘बाँबे हाय’ येथील अपतटी छिद्रणासाठी वापरण्यात आलेला ’सागरसम्राट’ हा मंच या प्रकारचा असून तो जपानकडून विकत घेण्यात आला आहे. अपतटी छिद्रण मंचाची कल्पना आ. २ वरून येईल.
पाण्याची खोली जास्त असेल, तर तरता मंच वापरतात. असे मंच जहाजावर बसविलेले असल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे सोपे असते. अशा मंचावरील यंत्रांच्या साहाय्याने सु. ३०० मी. पर्यंत खोल पाण्याखाली असणाऱ्या भागात छिद्रण करता येते. या कामात पूर्वरचित छिद्रण यंत्रांचाही वापर करण्यात येतो. अपतटी छिद्रण यंत्रावर काम करणाऱ्या तंत्रज्ञांसाठी राहण्याची सोय मंचावरच करण्यात येते. मालाची व माणसांची वाहतूक हेलिकॉप्टरने किंवा लाँचने केली जाते. मंचावर हेलिकॉप्टर उतरण्याची सोयही असते. तेलाचे उत्पादन सुरू झाल्यावर थोडेफार तेल साठविण्याची सोयही मंचावर केलेली असते.
अपतटी छिद्रणासाठी ‘एल्फओशन’ या नावाची अगदी आधुनिक यंत्रसामग्री हल्ली वापरण्यात येऊ लागली आहे. हे एक फार मोठे नळकांडे असते. ते समुद्रतळावर पक्क्या केलेल्या चबुतऱ्याला घट्ट पकडून पायात सरळ उभे राहते. या नळकांड्याला पाण्याच्या पातळीखाली मोठाल्या फुगीर उत्प्लावक (तरंगणाऱ्या) टाक्या जोडलेल्या असतात. त्यामुळे ते सरळ उभे राहते. वादळ नसल्यास ते पूर्णपणे स्थिर राहते आणि वादळात त्यात सापेक्षत: कमी हेलकावे निर्माण होतात.या नळकांड्यांच्या वरच्या बाजूवर मंच बांधलेला असतो.
वर नमूद केलेल्या अपतटी छिद्रणात येणाऱ्या अडचणींशिवाय या कामात कधीकधी अपघात व धोकेही निर्माण होतात. उदा., विहिरीतून तेल व नैसर्गिक वायू प्रचंड फवाऱ्यासारखे बाहेर पडणे, आगी लागणे, छिद्रण मंच मोडणे इत्यादी. यांमुळे कित्येकदा छिद्रणाचे काम नुकसान सोसूनदेखील अर्धवट स्थितीत कायमचे सोडून द्यावे लागते.नैसर्गिक वायू व खनिज तेल सतत वाहत राहिल्यास इतरही दुष्परिणाम होतात. खनिज तेल पाण्यात फारसे विरघळत नसल्याने व ते पाण्यावर तरंगणारे असल्यामुळे त्याचा तवंग पाण्यावर राहतो व दुसरे म्हणजे त्यामुळे पाण्यातील वनस्पती व प्राणी यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ती मरतात. अशा प्रकारे पर्यावरणीय प्रदूषण होते. वरील अडचणींना तोंड देण्यासाठी व गंभीर धोके टाळण्यासाठी प्रयत्न आणि संशोधन सतत चालू आहेत.
तेलक्षेत्राचा विकास : चाचणीसाठी खणलेल्या एखाद्या विहिरीत तेल सापडले म्हणजे त्याचा त्या क्षेत्रात साठा किती आहे ते पाहण्यात येते.त्या क्षेत्रातील पहिल्या विहिरीपासून काही अंतरावर इतर अनेक विहिरी खणण्यात येतात व त्यांच्यात किंवा त्यांच्यापैकी काही विहिरींत तेल मिळाले म्हणजे त्या विहिरींच्या स्थानावरून तेथील तैलाशय केवढ्या क्षेत्रात पसरला आहे, हे कळून येते.
अध:पृष्ठीय भूविज्ञान : तेलाचे उत्पादन करणाऱ्या विहिरी व कोरड्या विहिरी खणताना मिळालेली भूवैज्ञानिक आणि अभियांत्रिकीय माहिती तसेच भूभौतिक व भूरासायनिक सर्वेक्षणाने (पाहणीने) मिळालेली माहिती ही सर्व एकत्र करून अध:पृष्ठीय भूविज्ञान तयार होते.यासाठी शैलकणांचा, आंतरकांचा, कूप–अभिलेखांचा सविस्तर अभ्यास करून निरनिराळ्या प्रकारचे स्तरवैज्ञानिक स्तंभ, भूवैज्ञानिक अनुप्रस्थ छेद, संरचना समोच्चता (सारख्या उंचीचे बिंदू जोडणाऱ्या रेषांनी संरचना दर्शविणारे) नकाशे, पुराभूवैज्ञानिक नकाशे इ.तयार करतात.या माहीतीवरून भूपृष्ठाखालच्या खडकांचे बरेच निश्चित स्वरूप कळते. थरांचे सहसंबंध निश्चित करता येतात व संरचनेची कल्पना येते.त्या क्षेत्रात विषमविन्यास (विषम मांडणी), संलक्षणी बदल इ. स्तरवैज्ञानिक वैशिष्ट्ये असल्यास ती सूचित होतात.वरील प्रकारच्या संशोधनास सर्वांत उपयुक्त साधन म्हणजे कूप–अभिलेख होत. त्यांच्या आधारे मिळणाऱ्या माहितीची अचूकता व सविस्तरपणा सतत वाढतच आहे. याबरोबरच विहिरी अधिकाअधिक खोल खणल्या जात आहेत. वेळोवेळी मिळणाऱ्या या नवीन माहितीवरून नकाशे व छेद सतत सुधारले जात आहेत.जुन्या संकल्पनांत बदल होऊन परिणामी भाकिते जास्त अचूक ठरत आहेत.
कूप-अभिलेखन : विहीर खणली जात असताना किंवा खणल्यानंतर विहिरीत एका खाली एक आढळणाऱ्या खडकांच्या व त्यांतील प्रवाही पदार्थांच्या गुणधर्मांची क्रमवार नोंदणी करणे म्हणजे कूप-अभिलेखन होय. हा समन्वेषणाचा फार महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे जवळजवळ प्रत्येक विहिरीचे अभिलेखन करावेच लागते. सामान्यत: कुठल्याही विहिरीचे अभिलेखन एकापेक्षा अधिक प्रकारची माहिती वापरून बऱ्याच प्रकारांनी करतात. या माहितीवरून एका अक्षावर विहिरीची खोली व दुसऱ्या अक्षावर विहिरीत आढळणाऱ्या खडकांचे आणि द्रायूंचे काही ठराविक गुणधर्म प्रमाणानुसार नोंदून आलेख तयार करतात. अशा रीतीने आलेखांचा व अभिलेखांचा अभ्यास केला असता भूपृष्ठाखालील खडकांचा आकार, विस्तार, संरचना, संलक्षणी बदल, पार्यता, सच्छिद्रता, खडकांत असणाऱ्या द्रायूंचे गुणधर्म इत्यादींची माहिती मिळते.
(१) छिद्रण अभिलेखन : विहीर खणली जात असताना ती खणणारा कर्मचारी हे अभिलेखन करतो. विहीर वेगाने खणली जात असेल, तर खडक ठिसूळ व संथ गतीने खणली जात असेल, तर तो कठीण व दृढ असतो, हे कर्मचाऱ्यांना माहीत असते. अभिलेखन करताना खडकांचे वाळू, चुना, माती, घट्ट किंवा कठीण दगड असे ढोबळ वर्णन ते करतात. अशा अभिलेखांवरून महत्त्वाची भूवैज्ञानिक माहिती मिळत नाही, परंतु या अभिलेखांचा उपयोग कर्मचाऱ्यांना बराच होतो.
(२) छिद्रण वेग अभिलेखन : (छिद्रण वेळाचे अभिलेखन). विहीर खणली जात असताना छिद्रणाचा वेग वेळोवेळी कसकसा बदलतो याची नोंद करून हा अभिलेख तयार करतात. सुटी वाळू, माती, गाळवटी खडक, शेल यांसारख्या ठिसूळ खडकांत छिद्रण वेगाने होते. या उलट बेसाल्ट वगैरेंसारख्या घट्ट व कठीण अग्निज खडकांत ते मंद गतीने होते. छिद्रणाच्या वेगाने होणारे बदल व भूपृष्ठाखालील खडकांचे प्रकार हे स्थूलमानाने परस्परावलंबी असतात. ठराविक वेळात, म्हणजे प्रत्येक पाच किंवा दहा मिनिटांनंतर किती खोल वेधन झाले, याची छिद्रण करणारे कर्मचारी नोंद ठेवतात व त्यांवरून छिद्रणाचा वेळ आणि खोली यांचा आलेख या प्रकारात काढतात.
(३) खडकांच्या चुऱ्याचे अभिलेखन : विहीर खणत असताना तिच्यातून बाहेर पडत असणाऱ्या खडकांच्या बारीक तुकड्यांचे व चुऱ्याचे निरीक्षण करून हा अभिलेख तयार करतात.खडकांचा चुरा छिद्रणातील वापरण्यात येणाऱ्या चिखलाबरोबर बाहेर येतो. तो चाळणीवर पसरून धुऊन त्यातील चिखल बाजूला करतात. मग चुरा वाळवून त्यातील खडकांच्या तुकड्यांचे परीक्षण करतात.सामान्यत: ठराविक वेळाने किंवा ठराविक खोलीवर चुरा गोळा करतात. तसेच छिद्रणाच्या गतीमध्ये फरक पडल्यानंतरही लगेच चुरा गोळा करतात कारण यावेळी खडकांच्या प्रकारांत फरक पडतो. चुऱ्यातील खडकांच्या तुकड्यांचे नुसत्या डोळ्यांनी किंवा सूक्ष्मदर्शकाने परीक्षण करतात. यावरून ज्या खडकांचा चुरा बाहेर पडतो त्यांच्याबद्दल बरीच सविस्तर, सूक्ष्म व निश्चित माहिती मिळते. चुऱ्यातील खडकांचा रंग, कणांचा आकार, त्यांत असणारी खनिजे, त्यांचा अणकुचिदारपणा, गोलाई, पोत इत्यादींचे वर्णन करून खडक कोणत्या प्रकारचा आहे, हे सांगता येते.छिद्रण एका प्रकारच्या खडकातून दुसऱ्या प्रकारच्या खडकात जाते तेव्हा बहुधा चुऱ्यामध्ये दोन्ही प्रकारच्या खडकांच्या तुकड्यांचे मिश्रण असते. अशा वेळी चुऱ्यातील घटकांचे प्रमाण काढतात. दोन्ही प्रकारच्या खडकांच्या चुऱ्यांची भेसळ होत असल्यामुळे कुठल्या खोलीवर खालचा खडक सुरू झाला, ते अगदी निश्चित सांगता येत नाही. अंदाजाने काढलेल्या खोलीमध्ये म्हणजेच खडकांच्या प्रत्यक्ष जाडीमध्ये सु.१–१·५ मी.चा फरक पडू शकतो. जास्त जाडीच्या खडकात यामुळे विशेष फरक पडत नाही, पण काही सेंमी. जाडीच्या थरांचे स्थान व त्यांची जाडी निश्चित करणे कठीण असते.दुसरे म्हणजे बाहेर पडणारा चुरा हा ठराविक खोल जागी असणाऱ्या खडकांचाच प्रातिनिधिक आहे, हे निश्चित करावे लागते.
(४) आंतरक अभिलेखन : विहिरीतून बाहेर काढण्यात आलेल्या खडकांच्या आंतरकांचे परीक्षण करून हा अभिलेख तयार करतात. निरनिराळ्या अभिलेखांपैकी आंतरक अभिलेख हा सर्वांत खात्रीलायक व निश्चित स्वरूपाचा असतो. विहिरीच्या भूपृष्ठावरील मुखापासून ते तिच्या अगदी तळापर्यंतचे सर्वच्या सर्व खडक आंतरकांच्या स्वरूपात सलग बाहेर काढले जातात. यामुळे तळापासून वरपर्यंतच्या खडकांचा स्तरवैज्ञानिक स्तंभ प्रत्यक्षच मिळतो. आंतरक बाहेर काढण्यासाठी विशेष प्रकारची छिद्रणाची यंत्रसामग्री वापरावी लागते.आंतरक बाहेर काढताना छिद्रणाचे काम बंद करून संपूर्ण छिद्रकमालिका वर घेऊन बाहेर काढावी लागते. छिद्रणाच्या नळांतून आंतरक बाहेर काढल्यावर मालिका पूर्ववत जोडून परत विहिरीत खाली सोडावी लागते व मगच छिद्रणाला पुन्हा सुरुवात करता येते आणि असा कार्यक्रम सामान्यत: दर ६ ते १० मी. जाडीचे छिद्रण झाल्यावर परत परत करावा लागतो. सामान्यत: १० मी. पेक्षा अधिक लांबीचा आंतरक मालिकेत ठेवून पुढील छिद्रण करणे शक्य नसते म्हणून इतकी जाडी होण्यापूर्वी आंतरक बाहेर काढावे लागतात. आंतरकाची सूक्ष्म व सविस्तर पाहणी प्रयोगशाळेत करून त्यावरून आंतरक अभिलेख तयार करतात.
(५) विद्युत् अभिलेखन : हा विहिरीत आढळणाऱ्या खडकांच्या विद्युत् गुणधर्मांची मोजणी करून तयार केलेला अभिलेख असतो. या पद्धतीत खडकांची विद्युत् रोधकता,
स्वयंस्थितिवर्चस् (नैसर्गिक विद्युत् स्थिती) यांसारख्या गुणधर्मांची मोजणी करतात. या गुणधर्मांची नोंद एका आलेखावर यंत्राच्या साहाय्याने सलग पद्धतीने केली जाते.विद्युत् अभिलेखन करताना खणण्याचे काम बंद करतात. विहीर छिद्रणपंकाने (छिद्रण करताना निर्माण झालेल्या चिखलाने) भरलेली असते. त्यात विद्युत् वाहक तारेला जोडलेले विद्युत् अग्र सोडतात. ही तार सु. १–१·५ मी. व्यासाच्या रिळावर गुंडाळलेली असते.ज्याप्रमाणे रहाटाचा उपयोग करून बादली विहिरीत सोडतात त्याप्रमाणे रीळ फिरवून विद्युत् अग्र हळूहळू विहिरीत सोडतात.रीळ व विद्युत् गुणधर्म अपोआप मोजणारी यंत्रणा एका ट्रकवर बसविलेली असते. विद्युत् अग्र विहिरीच्या तळाशी पोहोचल्यावर तार हळूहळू विहिरीबाहेर वर ओढण्यात येते. यावेळी विद्युत् गुणधर्म मोजण्यात येतात. विद्युत्
अग्राच्या सान्निध्यात असणाऱ्या खडकाचे गुणधर्म आलेखावर रेखाटले जातात.जसजसे विद्युत् अग्र वरवर जाते तसतसा खडकांची भूपृष्ठापासूनची खोली व त्याठिकाणी असणारा विद्युत् गुणधर्म यांचा सलग आलेख यंत्रांच्या साहाय्याने ट्रकमध्ये ठराविक वेगाने फिरणाऱ्या आलेखपत्रावर तयार होतो. खडकांच्या गुणधर्मांनुसार आलेखातील वक्रात लक्षात येण्याइतके फरक पडतात. या फरकांवरून खडकांचे प्रकार, त्यांची जाडी, सच्छिद्रता, पार्यता, त्यांच्यात असणारे पाणी, वायू आणि तेल यांसारखे द्रायू इत्यादींबद्दल अंदाज करता येतात. विद्युत् अभिलेखाचे रोधकता, स्वयंस्थितिवर्चस् सूक्ष्म अभिलेख, पार्श्विक अभिलेख, प्रवर्तन अभिलेख इ. प्रकार आहेत.विद्युत् अभिलेख आणि प्रत्यक्ष वर्णनावरून तयार केलेला स्तरवैज्ञानिक स्तंभ यांचा दगडी कोळशाकरिता मिळविलेला नमुना आ. ३ मध्ये दर्शविला आहे. खनिज तेल सामान्यत: सच्छिद्र वालुकाश्मांत किंवा चुनखडक अथवा शेल यांच्याखाली आढळते.
(६) पंक अभिलेखन : छिद्रणाच्या वेळी विहिरीतून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म चिखलाच्या गुणधर्मांच्या मोजणीवरून केलेला हा अभिलेख असतो. छिद्रण चालू असताना चिखलाच्या विशिष्ट गुरुत्व, श्यानता इ. गुणधर्मांची वरचेवर मोजणी करावी लागते. छिद्रणाच्या भोकात असलेल्या चिखलाच्या वजनामुळे निर्माण होणारा दाब आणि खोल जागी असणाऱ्या खडकातील दाब हे दोन्ही संतुलित ठेवणे हे एक अत्यंत महत्त्वाचे काम असते. यासाठी छिद्रणाच्या पाणी व चिखल यांच्या मिश्रणात आवश्यक ती रसायने टाकून त्यांच्या गुणधर्मांत योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. छिद्रण चिखलाचा दाब आशय शैलाच्या दाबापेक्षा कमी असल्यास खनिज तेलाचे फवारे जोराने विहिरीबाहेर उडू लागतात व त्याचे नियंत्रण करण्याची ताबडतोब व्यवस्था न केल्यास परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊन नुकसान होते. उलट चिखलाचा दाब आशय शैलाच्या दाबापेक्षा जास्त असला, तर चिखल खडकातील तेलास बाजूला सारून त्यातील छिद्रांत घुसतो. त्यामुळे खडकांच्या सच्छिद्रतेवर व पार्यतेवर विपरीत परिणाम होतो व तेल बाहेर निघण्यास अटकाव होतो. म्हणून छिद्रणाच्या चिखलाच्या गुणधर्मांवर सारखे लक्ष ठेवून अभिलेखन करणे जरूर असते. तसेच विहिरीतून बाहेर पडणाऱ्या चिखलात खनिज तेलाचा अंश येतो आहे किंवा नाही, यावरही लक्ष ठेवावे लागते.
(७) नतिमापक अभिलेखन : विहिरीतील खडकांची नती (कल वा उतार) मोजून केलेला अभिलेख. खडकांची नती नतिमापकाने मोजतात. नत्यांमधील फरकांवरून खडकांना घड्या पडल्या असल्यास त्या समजून येतात. त्यावरून तेलाचे साठे असणारे खडक कशा प्रकारे पसरले असतील, याचा अंदाज येतो. घड्या पडलेल्या संरचनांव्यतिरिक्त विसंगती व वालुकाश्माचा आकार शोधून काढण्यास या अभिलेखांची मदत होते.
(८) दिशामापक अभिलेखन : विहीर खणली जात असताना तिची खणण्याची दिशा मोजून हा अभिलेख तयार करतात. सामान्यत: ३०० मी. खोलीपर्यंत विहीर लंब असते, असे गृहीत धरण्यात येते.ती जसजशी अधिक खोल खणली जाते तसतशी ती ओळंब्यात आहे किंवा नाही हे पहावे लागते. विहीर तिरपी खणली गेल्यास निरनिराळ्या खडकांची जाडी व त्यांची खोली नक्की किती आहे हे समजणे कठीण होते व एखाद्या ठराविक खोलीपर्यंत पोहोचण्यास अधिक छिद्रण करावे लागते. यामुळे पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होतो. तसेच विहिरीत जास्त तिरपेपणा आल्यास छिद्रणाचे कामही अवघड होते. हल्ली काही विशिष्ट प्रकारच्या छिद्रणात (उदा., समुद्राच्या पाण्याखालील जमिनीतील तेल शोधण्यासाठी किनाऱ्यावरून करावयाच्या छिद्रणात) तिरपे छिद्रण करीत जातात. अशा वेळी विहीर ठरवून दिलेल्या अंशांनी तिरपी खणली जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी छिद्रणाची दिशा मोजून अभिलेख तयार करावा लागतो.
(९) व्यासमापक अभिलेखन : विहिरीच्या भोकाचा व्यास भूपृष्ठापासून तळापर्यंत कसकसा आहे, याच्या मोजणीवरून हा अभिलेख तयार करतात. खणलेल्या विहिरीत धातूच्या नळाचे कवच सिमेंटने पक्के बसविण्यासाठी किती सिमेंट लागेल, हे काढण्यासाठी ही माहिती लागते. कवच व्यवस्थित बसले नाही, तर आशय शैलातून तेल बाहेर वाहून नुकसान होऊ शकते. तसेच विहिरीतून तेलाचे उत्पादन करताना अडचणी निर्माण होतात.
(१०) छायाचित्रण अभिलेखन : विहिरीतील खडकांची छायाचित्रे घेऊन अभिलेख तयार करतात. तारेला अडकविलेला कॅमेरा विहिरीत तळापर्यत सोडण्यात येतो. तो वरवर ओढला जात असताना विहिरीतील खडकांची क्रमवार छायाचित्रे घेण्यात येतात. या पद्धतीत नेहमीचा फिल्म-कॅमेरा आणि दूरचित्रवाणी कॅमेरा हे दोन्ही वापरणे शक्य असते. खडकांच्या छायाचित्रांवरून त्यांच्याबद्दल महत्त्वाची भूवैज्ञानिक माहिती मिळते.
कूप-अभिलेखनाच्या वरील पद्धतींशिवाय इतर अनेक भूभौतिक पद्धतींनी अभिलेखन केले जाते. उदा., किरणोत्सर्ग अभिलेखन, तापमान अभिलेखन, तसेच भूरासायनिक व प्रकाशविद्युतीय (प्रकाशाच्या क्रियेने निर्माण होणाऱ्या विद्युत् ऊर्जेवर आधारलेल्या) पद्धतींनीही अभिलेखन करण्यात येते. एकाच विहिरीतील अनेक प्रकारचे अभिलेख एकत्र करून खनिज तेलाच्या शोधासाठी व उत्पादनासाठी बरीच निश्चित स्वरूपाची आणि महत्त्वाची माहिती मिळते. विहीर खणण्याच्या खर्चाच्या मानाने एकदा ती खणल्यावर वरीलपैकी बऱ्याच पद्धतींनी तिचे अभिलेखन करण्यास फारसा खर्च येत नाही. अभिलेखनाच्या वरील निरनिराळ्या पद्धती अधिक सुटसुटीत, निश्चित स्वरूपाची माहिती पुरविणाऱ्या व प्रभावी करण्यासाठी सतत संशोधन चालू आहे.
खनिज तेलाच्या नैसर्गिक साठ्यातून तेलप्राप्ती : खनिज तेल मिळविण्यासाठी विहीर खणून पूर्ण झाल्यावर तिच्यात असणारे खडक उघडे पडतात. या खडकांच्या काही थरांत भूमिजल, काहींत खनिज तेल व काहींत नैसर्गिक वायू असतो तर काहींत खनिज तेल व वायू ही दोन्ही असतात. विहिरीतून तेलाचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी भूमिजल असणारे थर झाकावे लागतात. नाही तर विहिरीत तेल व पाणी यांचे मिश्रण होते. केवळ तेलाचेच उत्पादन करता यावे आणि विहीर मजबून व्हावी म्हणून विहिरीत तिच्या व्यासापेक्षा थोडा कमी व्यास असलेले धातूचे एक नळकांडे बसवितात. त्यास कवच असे म्हणतात. कवचाची लांबी किती असावी हे आशय शैलाच्या खोलीवर अवलंबून असते.कवच म्हणून वापरण्यात येणारे धातूचे नळकांडे भूपृष्ठावरून प्रथम विहिरीत खाली सोडतात व नंतर ते सिमेंटने पक्के बसवितात. या कामास कवचाचे संयोजनीकरण म्हणतात. हे काम विशिष्ट प्रकारानेच करावे लागते. सिमेंट, पाणी व काही रसायने यांचे पातळ मिश्रण कवचामधील पोकळीतून पंपाच्या साहाय्याने खाली ढकलण्यात येते. कवचाच्या तळाशी उघडे भोक असते. त्यातून हे मिश्रण बाहेर पडून कवच व विहिरीची भिंत यांमधील कंकणाकृती रिकाम्या जागेत ढकलले जाते. या कामामध्ये वापरले जाणारे सिमेंटचे मिश्रण सु. अर्ध्या-पाऊण तासात घट्ट होते म्हणून संयोजनीकरणाचे संपूर्ण काम या कालावधीतच उरकावे लागते. नाही तर सिमेंट कवचामध्ये ठिकठिकाणी घट्ट होऊन उत्पादनाच्या कामात अडथळे निर्माण होतात. संयोजनीकरण योग्य रीतीने झाल्याची खात्री केल्यानंतरच आशय शैलाच्या समोर असणाऱ्या कवचाच्या भागातून कवचास व आशय शैलास भोके पाडण्यात येतात. यासाठी सुरुंगाची दारू भरलेली बंदूक छिद्रणाच्या चिखलाने भरलेल्या विहिरीत तारेच्या साहाय्याने सोडतात. बंदूक विहिरीत ठराविक खोल जागी म्हणजे आशय शैलासमोर पोहोचल्यावर पृष्ठभागावर असलेली कळ दाबून तिच्यातील गोळ्या झाडतात. या गोळ्या कवचाला भोके पाडून आशय शैलात घुसतात. त्यामुळे आशय शैलास भोके पडून त्यातून खनिज तेलास व नैसर्गिक वायूस बाहेर पडण्यास मार्ग तयार होतो. या कार्यास रंध्रीकरण म्हणतात. कवच विहिरीत बसविणे, कवचाचे संयोजनीकरण आणि रंध्रीकरण ही तिन्ही कामे निर्दोष झाली, तरच विहिरीतून खनिज तेलाचे उत्पादन अडथळे न येता व समाधानकारक होऊ शकते.
यानंतरचा टप्पा म्हणजे खनिज तेलाचे उत्पादन सुरू करणे हा होय.खनिज तेलाचे साठे भूमिगत जागी सापळ्यात कोंडलेल्या स्थितीत व मोठ्या दाबाने युक्त असे असतात. या अवस्थेतील दाबास मूळ संचय दाब असे म्हणतात. हा दाब पुढील कारणांनी निर्माण होतो.
(१) तेलाबरोबर साठ्यात कोंडून असणाऱ्या वायूमुळे. दाबामुळे नैसर्गिक वायू एकतर तेलात विरघळलेला असतो किंवा वायुरूपात स्वतंत्रपणे तेलाच्या पृष्ठभागावर साचलेला असतो वा तेलात विरघळलेला व स्वतंत्र वायुरूपात अशा दोन्ही प्रकारचा असतो. तेलाच्या वर वायू साचून त्याचे आवरण तयार झालेले असल्यास त्यास वायूची टोपी असे म्हणतात. (२) मूळ दाब तैलाशयाच्या तळावर व बाजूंवर असलेल्या पाण्यामुळेही असतो किंवा (३) तो वायू व पाणी या दोहोंमुळे तयार झालेला असतो. मूळ संचय दाब सामान्यत: वातावरणाच्या दाबापेक्षा बराच जास्त असतो. तेल व वायू यांचे मिश्रण साठ्यात असल्यास दाबामुळे काही वायू तेलात विरघळतो. अशा साठ्यात विहीर खणल्यावर त्यास असणाऱ्या द्रायूंना प्रसरण पावण्यास जागा मिळते व ते प्रसरण पावताच त्यांच्यावरील दाब कमी होतो. अशा वेळी ज्याप्रमाणे वायुयुक्त पेयाच्या बाटलीचे झाकण काढल्यावर पेयातील विरघळलेला वायू फसफसून बाहेर येतो त्याप्रमाणे विहिरीतून तेल जेव्हा भूपृष्ठाकडे वर वर येऊ लागते तेव्हा त्यात विरघळलेला नैसर्गिक वायू वेगळा होतो. संचयातील मूळ दाब भरपूर असल्यासच विहीर खणल्यावर तेल आपोआप वर येते. केवळ मूळ दाबाच्या बळावर तेलाचे बरेच उत्पादन झाल्याची उदाहरणे आहेत. निव्वळ मूळ दाबाच्या बळावर तेलाचे उत्पादन करण्याच्या पद्धतीला तेलप्राप्तीची प्राथमिक पद्धत असे म्हणतात. मात्र एकदा का संचयातील मूळ दाब ठराविक मर्यादेच्या खाली गेला म्हणजे उरलेले तेल आपोआप वर येऊ शकत नाही. हा दाब टिकवून धरण्यासाठी तेलाच्या उत्पादनाच्या गतीवर तसेच तेल बाहेर काढण्याच्या पद्धतीवर योग्य असे नियंत्रण ठेवावे लागते. तेल योग्य अशा संथ गतीने बाहेर काढले, तर खडकातील आजूबाजूच्या पोकळ्यांत असणाऱ्या पाण्यास तेल बाहेर पडल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागांत वाहत येऊन पडण्यास वेळ मिळतो व पोकळी भरून निघाल्यामुळे दाब पूर्ववत होतो.
तेलाच्या साठ्यातील मूळ दाब हा साठ्यातून तेल भूपृष्ठावर बाहेर काढण्यासाठी लागणारी ऊर्जा असल्यामुळे तेलाची विहीर एकदा उत्पादन करण्यासाठी तयार झाली म्हणजे हा दाब अगदी शेवटपर्यंत त्यात काहीही घट पडू न देता जसाचा तसा कायम राखणे, ही सर्वांत महत्त्वाची व अत्यंत आवश्यक गोष्ट असते.हा दाब कमी होऊ देऊन तो कमी झाल्यावर इतर काही व्यवस्था करून परत पूर्वीइतका प्रस्थापित करण्यापेक्षा तो नेहमी जसाच्या तसा टिकवून धरण्याची व्यवस्था करणे अधिक फायद्याचे व योग्य असते. योग्य अशा संथ गतीने तेल बाहेर काढूनसुद्धा प्राथमिक तेलप्राप्तीच्या पद्धतीने जर मूळ दाब कमी कमी होत असेल, तर बाहेरून ऊर्जा पुरवून उत्पादन करावे लागते. या क्रियेस द्वितीयक तेलप्राप्ती असे म्हणतात. द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धतींमध्ये प्राथमिक ऊर्जेला जोड देण्यासाठी दाबाखाली असणारा वायू किंवा पाणी तेलाच्या नैसर्गिक साठ्यात पंपाच्या साहाय्याने ढकलतात. दाबयुक्त अंत:क्षेपित (आत सोडलेला) द्रायू तेलाच्या साठ्यात उरलेले तेल उत्पादक विहिरीमध्ये ढकलतात.अगदी अलीकडील तंत्राप्रमाणे साठ्यात असणाऱ्या मूळच्या ऊर्जेला कधीच कमी न होऊ देता सुरुवातीपासून बाहेरील ऊर्जेची जोड देऊन तिची पातळी कायम ठेवण्यात येते. म्हणजेच प्राथमिक व द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धती सुरुवातीपासूनच एकत्र करून वापरतात. मात्र पूर्वी द्वितीयक ऊर्जा पुरविली न गेल्यामुळे ज्यातील मूळची ऊर्जा केव्हाच कमी होऊन गेली आहे, असे कित्येक साठे आजही आहेत. अशा व्यय पावलेल्या साठ्यांच्या विकासासाठी द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धतीच वापराव्या लागतात.
तेलप्राप्तीच्या द्वितीयक पद्धतींमध्ये बाहेरून वायू किंवा पाणी किती प्रमाणात व किती दाबाने पुरवायचे हे ठरविण्यासाठी विहिरीतील द्रायूंचे रासायनिक संघटन, त्यांची श्यानता, नैसर्गिक दाब व तापमान, खडकांमधील त्यांच्या वाटपाचा प्रकार तेल, वायू व पाणी यांची खडकांतील सापेक्ष पार्यता तसेच या तिन्हींची सापेक्ष श्यानता इत्यादींबद्दल माहिती असणे आवश्यक असते. तेलप्राप्तीची अगदी सर्वसामान्य द्वितीयक पद्धत म्हणजे तैलाशयाच्या खडकांत पंपाच्या साहाय्याने दाबाने पाणी ढकलणे व पाण्याचा पूर निर्माण करणे ही होय. या कामासाठी वापरण्यात येणारे पाणी शुद्ध व निर्मळ असावे लागते कारण त्यात काही अम्ले वगैरे असली, तर अविद्राव्य पदार्थाचे अवक्षेपण (साका तयार होणे) होते. छिद्रणासाठी वापरलेली बेंटोनाइट मृत्तिका फुगते व फुगून हलकी झाल्यामुळे ती इकडे तिकडे वाटेल तशी वाहत जाऊन आशय शैलातील छिद्रांत अडकून बसते आणि त्यामुळे तेलाच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तसेच पाण्यामध्ये सूक्ष्मजंतू असणे देखील अनिष्ट असते. पाण्यामध्ये इतर काही योग्य असे संभाव्य कारक वापरून तेलप्राप्तीत सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण त्यांना यश आले नाही. पाण्यात विरघळणारे व विशेषत: आयनरहित (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट नसलेले) अपक्षालक (ज्यात घन पदार्थ विरघळवून वेगळे करता येतो असा द्रव) वापरल्यावर मात्र तेलप्राप्तीत सुधारणा झाल्याचे समजते. वायूचे अंत:क्षेपण करून द्वितीयक पद्धतीने तेलप्राप्ती करताना सामान्यत: ज्यातून द्रवरूप हायड्रोकार्बन बाहेर काढून घेतलेले असतात, तो साठ्यातूनच बाहेर आलेला वायू परत वापरतात. या प्रकाराला पुनरावर्तनाची पद्धत म्हणतात.
अगदी अलीकडच्या काळात मोठ्या दाबाखाली व उच्च तापमानास असलेल्या बऱ्याच खोल थरांपर्यंत विहिरी खणल्या गेल्यामुळे काही विशेष भौतिक गुणधर्म असलेल्या अवस्थेतील तेलाचे साठे सापडले आहेत. अशा साठ्यांतून केवळ एकाच प्रावस्थेत असणारा द्रायू बाहेर काढणे शक्य होते. या प्रावस्थेमध्ये सामान्यत: वायुरूप असणाऱ्या हायड्रोकार्बनांचे प्रमाण उच्च असते व फार हलके असणारे कच्चे तेल अगदी कमी प्रमाणात असते. असे कच्चे तेल सु. दीड हजार लिटरांपेक्षा एक लिटर या प्रमाणात असते.या प्रावस्थेतील वायू हा सामान्य वायूच्या टोपीहून भिन्न प्रकारचा असतो कारण वायुरूप प्रावस्थेतील हलके कच्चे तेल प्रावस्थेतील दाब कमी होताच संद्रवण (द्रवात रूपांतर) होऊन मिळते. ही क्रिया वाफ व वायू यांच्या समांग (एकजिनसी) मिश्रणातून द्रव मिळविण्याच्या नेहमीच्या पद्धतीहून भिन्न प्रकारची म्हणजे उलट्या प्रकारची असते. वाफ व वायू यांच्या समांग मिश्रणातून द्रव मिळविण्याकरिता दाब वाढवावा लागतो. ज्या साठ्यांतून वायू बाहेर काढल्यावर दाब कमी झाल्यामुळे त्यातील हलके तेल संद्रवण होऊन द्रवरूपात मिळते, त्यांना संद्रावित साठे म्हणतात. काही खोल विहिरींत खनिज तेल वरच्या बाजूस असणाऱ्या वायूच्या टोपीखाली आणि इतक्या उच्च दाब व तापमानास असते की, वायूच्या टोपीवरील दाब कमी केला असता द्रवरूप हायड्रोकार्बनांचे संघनन (घनरूपात रूपांतर) होते. दुसऱ्या काही साठ्यांमध्ये वायूच्या टोप्या तेलापासून अगदी वेगळ्या झालेल्या स्वतंत्र अशा असतात, तर काही साठे हलक्या कच्च्या तेलाचे बाष्पीभवन होऊन अगदी अनपेक्षित रीतीने पूर्णपणे वायुरूप हायड्रोकार्बनांनी भरलले असतात. या सर्व प्रकारांमध्ये एक परिस्थिती समाईक असते, ती म्हणजे उच्च दाब व तापमान ही होय. तिच्यामुळे केवळ एकच प्रावस्था निर्माण होऊ शकते. या प्रावस्थेत दाब कमी झाला असताना द्रवरूप होणारी व सामान्यत: बाष्पनशील नसलेली हायड्रोकार्बने असतात. या परिस्थितीत दाब कमी झाल्यामुळे संद्रवण होत असल्यामुळे उत्पादन चालू असताना दाब कायम टिकवून धरणे महत्त्वाचे व अगदी आवश्यक असते. यासाठी वर वर्णन केलेली वायूच्या पुनरावर्तनाची पद्धती वापरतात.
एखाद्या साठ्यात जर मेणयुक्त खनिज तेल असेल, तर विहिरीतून ते बाहेर काढले जात असताना मेणाच्या निक्षेपणामुळे (साचण्यामुळे) विहिरीचे नळ तुंबण्याची शक्यता असते. अशा तेलातील हलक्या घटकांचे बाष्पीभवन होऊन उरलेल्या मेणयुक्त घटकांचे तेलातील प्रमाण वाढल्यामुळे तसेच बाष्पीभवन होताना तापमान कमी होण्यामुळे मेणाचे अवक्षेपण होते.तेलामध्ये असणारा गाळ व त्यात तरंगत असणारे इतर घन पदार्थ निक्षेपित होणाऱ्या मेणाबरोबर बाहेर पडतात. तसेच या निक्षेपात रेझिनयुक्त व अस्फाल्टी पदार्थही बरेच असण्याची शक्यता असते. अशा रीतीने निक्षेपित झालेले मेण खरडून काढणे, विद्रावक वापरून ते विरघळवून अथवा उष्णतेचा उपयोग करून वितळवून बाजूला करणे हे उपाय तुंबलेल्या विहिरी मोकळ्या करण्यासाठी करतात. तेलातील मेणाचे प्रमाण निरनिराळ्या ठिकाणी भिन्न असल्यामुळे विहिरी तुंबण्याचा अडथळा काहींमध्ये फार मोठा व गंभीर स्वरूपाचा असतो, तर काहींत तो अजिबात नसतो.
दाब, तापमान व रासायनिक संघटन यांची अगदी योग्य अशी मोक्याची परिस्थिती असताना सामान्यत: निर्माण होणारा अडथळा हा हायड्रोकार्बनांच्या हायड्रेटांमुळे होतो. हायड्रोकार्बनांची हायड्रेटे ही पाणी व ब्युटेनापर्यंत असणारी खालची पॅराफिने यांच्या मधल्या अवस्थेत आणि जालकासारखी असणारी जटिल (गुंतागुंतीची) संयुगे असतात.ती कमी तापमानास आणि उच्च दाबास स्थिर असतात. निर्जलीकरण, खालच्या गटातील अल्कोहॉलांसारख्या पदार्थांचे अंत:क्षेपण किंवा ती गोळा होण्याच्या जागी त्यांना तापविणे या क्रिया हायड्रोकार्बनांच्या हायड्रेटांचा अडथळा दूर करण्यासाठी करतात.
काही जड व अतिशय श्यान खनिज तेले, तसेच तेलाचा बराच भाग काढून घेतल्यावर साठ्यात खाली उरलेला तेलाचा भाग मिळविण्यासाठी उष्णतेचा उपयोग करतात.साठ्यात असणाऱ्या तेलाचाच काही भाग जागोजागी जाळतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे तेलाची श्यानता कमी होऊन ते वाहू लागते. उत्पादन होत असलेल्या विहिरीकडे हळूहळू प्रगत होत जाणारी जळणारी उष्णतेची लाट कायम राखण्यासाठी काही विहिरींत सतत ऑक्सिजन किंवा हवा आत भरत राहतात. विहिरीत असणाऱ्या तेलाच्या १५ टक्क्यांपेक्षा कमी तेल या कामासाठी जाळले, तरी उरलेल्या तेलाचे उत्पादन करण्यास ते पुरेसे होते.
द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धती सुरुवातीला अमेरिकेतील जुन्या व उथळ अशा ॲपालॅचियन तेलाच्या साठ्यासाठी वापरण्यात आल्या, नंतर त्या सर्व जगभर वापरण्यात येऊ लागल्या त्यामुळे काही विहिरींचे आयुष्य दुप्पट झाले. विहिरी खोल असल्यास द्वितीयक तेलप्राप्तीचे तंत्र प्राथमिक तंत्राशी जोडून वापरतात. जर अगोदरच दाब कमी झालेल्या विहिरी असतील, तर सु.१,००० मी. खोलीपर्यंतच्या विहिरींसाठीच द्वितीयक तेलप्राप्तीचे तंत्र वापरणे आर्थिक दृष्ट्या योग्य असते.
या पद्धतीने तेल मिळविण्यासाठी अंत:क्षेपक व उत्पादक अशा दोन प्रकारच्या विहिरी लागतात. या विहिरींची कुठे आणि कशा प्रकारची मांडणी असावी यासाठी प्रमाणभूत अशा रचना आहेत. ठराविक प्रकारांनी विहिरींची मांडणी केल्यामुळे एखाद्या तेलक्षेत्राचा विस्तृतपणे आणि संपूर्ण विकास करता येतो. तसेच साठ्याच्या सर्व भागांत अंत:क्षेपित वायू वा पाणी जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचविता येतात. हे तंत्र सुरुवातीला वापरले गेले तेव्हा एकाच अंत:क्षेपक विहिरीच्या सभोवार अनेक उत्पादक विहिरी असत. अशा प्रकारची विहिरींची वर्तुळाकार रचना, सामान्यत: जेथे वायू अंत:क्षेपित करतात, तेथे वापरण्यात येते. दुसऱ्या प्रकारच्या मांडणीत उत्पादक विहिरी एका रेषेत आणि शेजारी असणाऱ्या दुसऱ्या रेषेत अंत:क्षेपक विहिरी खणतात.अगदी सामान्य प्रचारात असणारी मांडणी पाच पाच विहिरींची असते. प्रत्येक चौरसाच्या कोपऱ्यांवर अंत:क्षेपणाच्या व उत्पादनाच्या विहिरी असतात म्हणजेच या विहिरी अशा रीतीने खणलेल्या असतात की, काही चौरसांच्या कोपऱ्यांवर अंत:क्षेपक विहिरी आणि त्यांच्या मध्यावर उत्पादक विहिरी, तसेच काही चौरसांच्या कोपऱ्यांवर उत्पादक विहिरी तर त्यांच्या मध्यावर अंत:क्षेपक विहिरी असतात. दुसऱ्या प्रकारची मांडणी सात सात विहिरींची असते. तिच्यामध्ये षट्कोणाच्या कोपऱ्यांवर अंत:क्षेपक विहिरी व मध्यावर उत्पादक विहीर असते.सात विहिरींच्या मांडणीतील उत्पादक व अंत:क्षेपक विहिरींची अदलाबदल करून चार बिंदूंची मांडणी तयार होते. नऊ बिंदूंची मांडणी म्हणजे पाच बिंदूंच्या मांडणीसारखी असते. मात्र चौरसांच्या कडांवर, चौरसांच्या कोपऱ्यांवर असणाऱ्या अंत:क्षेपक विहिरींच्या मध्यावर आणखी एक एक अंत:क्षेपक विहीर खणतात. अंत:क्षेपक आणि उत्पादक विहिरींत किती अंतर ठेवावे, हे साठ्याच्या स्थानिक गुणधर्मांवर व आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते.सु.अर्ध्या हेक्टरामध्ये एक ते चाळीस विहिरी असू शकतात. प्रत्येक अंत:क्षेपक विहीर किती वायू किंवा पाणी हाताळणार आहे हे माहीत असणे, हे द्वितीयक तेलप्राप्तीचा प्रकल्प ठरविण्यासाठी महत्त्वाचे असते.तैलाशयाची पार्यता साठ्यातील तेलाची श्यानता, साठ्यातील किती पोकळी तेलाने भरलेली आहे, आशय शैलाची जाडी, साठ्यातील मूळ दाब व पृष्ठभागावर पडत असणारा दाब यांवर प्रत्येक विहीर किती वायू अथवा पाणी हाताळू शकेल, हे अवलंबून असते.अंकलेश्वर व दिग्बोई क्षेत्रांत तेलाच्या उत्पादनासाठी अनुक्रमे जल अंत:क्षेपण आणि वायू अंत:क्षेपण या पद्धतींचा उपयोग करण्यात येत आहे. कित्येकदा पाणी किंवा वायू यांचे अंत:क्षेपण करूनही तेलाच्या उत्पादनात सुधारणा होत नाही. अशा वेळी विहिरीवर पंप बसवून तेल उपसून बाहेर काढतात. ही पद्धत अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी वापरात आहे, परंतु ती महाग असल्यामुळे कित्येकदा फायदेशीर ठरत नाही. वरील सर्व पद्धती वापरूनसुद्धा उत्पादनात सुधारणा झाली नाही, तर काही क्षेत्रांत खाणकाम करून तेल बाहेर काढतात.द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धती वापरल्यामुळे दिग्बोई तेलक्षेत्रात उत्पादन सुरू होऊन शंभर वर्षे उलटून गेली, तरीही अद्याप अल्प प्रमाणात उत्पादन चालू आहे.
विहिरी खणून झाल्यानंतरचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनाची सुरुवात हा होय.रंध्रित विहिरीत सु.६ सेमीं.व्यासाची नळी सोडतात व तिच्यातून पंपाने पाणी सोडतात.यामुळे विहिरीत असलेला चिखल बाहेर पडतो.त्यामुळे रंध्रित खडकांच्याजवळ दाब कमी होतो व खनिज तेल बाहेर पडू लागते. या क्रियेस विस्थापन असे म्हणतात. विस्थापन करूनसुद्धा विहिरीतून तेलाचा प्रवाह सुरू झाला नाही, तर विहिरीचे उद्दीपन करावे लागते. उद्दीपनाचे वातन (हवा भरणे), डीझेलाचे अंत:क्षेपण, अम्लीकरण, जलभंजन (पाण्याने विभाजन करणे), वालुकाभंजन, (सुरुंगाचा) स्फोट करणे इ. अनेक प्रकार असून त्यांचा प्रमुख उद्देश आशय शैलांची पार्यता वाढवून त्यांतून वाहणाऱ्या तेलाच्या प्रवाहात सुधारणा करणे हा असतो. उद्दीपित विहिरीतून तेल व वायू यांचे मिश्रण वाहू लागते. हा प्रवाह प्रथम अनियमित असतो व पुढे काही वेळाने नियमित व एकसारखा असा स्थिर होतो. विहिरीच्या तोंडाजवळ दाबमापक बसविलेले असतात. त्यावरून दाब व अर्थातच तेलाचा प्रवाह नियमित व स्थिर आहे किंवा नाही ते समजते. भूपृष्ठावर वायू व तेल यांच्या मिश्रणातून पृथ:कारकाच्या साहाय्याने तेल वेगळे करण्यात येते. तेल टाक्यांत साठविले जाते व वायू कित्येक ठिकाणी पेटविण्यात येतो. तेल व वायूचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी विहिरीवर अनेक झडपा बसविलेल्या असतात.विहिरीतून बाहेर पडणाऱ्या तेल व वायू यांची स्वतंत्र मोजणी करण्यात येते आणि त्यावरून विहिरीची उत्पादनक्षमता ठरविण्यात येते.याबरोबर दाबावरही लक्ष ठेवणे आवश्यक असते. कारण विहिरीतील दाब व भूपृष्ठाखालील तेलाचा एकूण साठा म्हणजे त्याचे घनफळ यांचा परस्पर संबंध असतो. विहिरीतून बराच काळ तेलाचे उत्पादन केल्यानंतरही दाबात फारसा फरक पडला नाही, तर तेलाचा साठा मोठा आहे आणि याउलट उत्पादन होत असताना तेलाचा दाब झपाट्याने कमी होऊ लागला, तर भूपृष्ठाखालील तेलाचा साठा मर्यादित स्वरूपाचा आहे, असे सामान्यत: अनुमान काढण्यात येते.दाब कमी पडू न देण्यासाठी अर्थातच द्वितीयक तेलप्राप्तीच्या पद्धती वापरतात.
संग्रह : विहिरीची उत्पादनक्षमता निश्चित केल्यावर तिच्यातून तेलाचे उत्पादन सुरू होईपर्यंत ती बंद ठेवतात. क्षेत्रातील आवश्यक त्या सर्व विहिरी खणून झाल्यावर जवळच तेल साठविण्यासाठी टाक्या बांधून काढतात.उत्पादन सुरू झाल्यावर तेल या टाक्यांमध्ये साठविण्यात येते. खनिज तेलाचे साठे जगात सर्वत्र पाहिजे तितक्या प्रमाणात आढळत नाहीत, मात्र त्यास मागणी सर्वत्र असते म्हणून खनिज तेलाचा किंवा त्यापासून मिळणाऱ्या परिष्कृत उत्पादांचा संग्रह करणे आवश्यक असते.खनिज तेलाचा संग्रह कोठे करावयाचा हे उत्पादन करणाऱ्या विहिरी व परिष्करण कारखाना यांतील अंतर आणि उत्पादांच्या मागणीची ठिकाणे कोठे आहेत, यांवर अवलंबून असते. सामान्यत: परिष्करण कारखान्याजवळ तेल साठविण्यासाठी मोठ्या टाक्या बांधलेल्या असतात. त्यांत बरेच तेल साठविता येते. अमेरिकेत अशा काही टाक्यांमध्ये पाच–सहा कोटी लि. तेल साठविण्यात येते व काही टाक्या तर दहा ते साडेबारा कोटी लि.तेल मावेल इतक्या प्रचंड आहेत. १० ते २० विहिरींतील तेल एकत्र करण्यासाठी विहिरींच्या गटांची संग्रह स्थानके बांधतात. कित्येक मोठाल्या व विस्तृत तेलक्षेत्रांत अनेक संग्रह स्थानके असतात. या सर्व संग्रह स्थानकांतील तेल वरील प्रकारच्या टाक्यांत साठवितात. या टाक्यांचा सामान्यत: एखाद्या ठिकाणी समुदाय असतो. त्यास टाक्यांचे क्षेत्र म्हणतात. अशी टाक्यांची क्षेत्रे बहुतेक करून समुद्राच्या किनाऱ्याजवळ किंवा तेलवाहक नळांच्या अंतिम टोकांजवळ असतात. तसेच परिष्करण कारखानेही त्यांच्याजवळच म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाणीच असतात. टाक्यांच्या क्षेत्रात तेलाचे विविध उत्पाद साठविण्याची व त्यांचे वाटप करण्याची सोय असते. म्हणून टाक्यांची केंद्रे जवळच असणाऱ्या परिष्करणाच्या कारखान्याशी नळाने जोडलेली असतात. उत्पाद ठराविक तेलवाहक टाक्यांत भरण्यासाठी व मोटारींतून, रेल्वे वाघिणीतून किंवा तेलवाहक नळातून गुदामांमध्ये किंवा ग्राहकांकडे पाठविण्याची व्यवस्था या केंद्रांत केलेली असते.
तेल साठविण्याच्या टाक्या पोलादी असतात. मोठ्या टाक्या पोलादी पत्रे वितळजोडकाम (वेल्डिंग) करून एकत्र जोडून बनविलेल्या असतात व सामान्यत: त्या उभ्या असतात.टाक्या जमिनीवर बसविण्यापूर्वी वाळू व बिट्युमेन यांचे मिश्रण करून त्यांच्यासाठी पाया बांधतात. गॅसोलिनासारखे बाष्पनशील द्रव साठविणाऱ्या टाक्यांचे छप्पर (झाकण) तरंगते असते. ते द्रवाच्या पातळीनुसार खालीवर होते. शिवाय अशा टाक्या पोलादी असल्यामुळे त्यांना आग लागण्याची शक्यता कमी असते. हिमवृष्टी होणाऱ्या प्रदेशात टाक्यांचे छप्पर तरंगते न बांधता शंकूच्या आकाराचे बांधतात त्यामुळे त्यावर हिम साचून राहत नाही. उन्हाळ्यात टाक्या गार ठेवण्यासाठी त्यांच्यावर पाणी शिंपडावे लागते. तेलाच्या टाक्यांच्या आसपास अग्निशामक व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक असते. तेल तात्पुरते साठविण्याच्या टाक्या कित्येकदा आडव्या असतात. सर्व प्रकारच्या टाक्यांत तेलाचे नमुने वारंवार तपासण्याची व त्यात तेल किती आहे हे मोजण्याची व्यवस्था असते. टाकीतील तेलाचे मापन कित्येकदा स्वयंचलित यंत्राने किंवा दूर नियंत्रण पद्धतींनीही करतात. जास्त बाष्पदाब असणारे पदार्थ (उदा., द्रवीकृत खनिज तेल वायू) साठविण्यासाठी गोल आकाराच्या टाक्या वापरतात. या टाक्या जास्त बाष्पदाब सहन करू शकतात. निरनिराळ्या प्रकारांच्या टाक्यांमध्ये किती अंतर असावे यासाठी स्फोटक पदार्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संचालनालयाने नियम ठरवून दिलेले असतात. टाकीत असणारे तेल कशा प्रकारे मोजावे, त्याची तपासणी कशी करावी यांसंबंधी जागतिक खनिज तेल संस्थेने नियम आणि पद्धती ठरवून दिलेल्या आहेत. तसेच टाक्यांजवळ वितळजोडकाम कसे करावे, अग्निशामक व्यवस्था कुठे व कशी करावी इ. सुरक्षिततेचे नियमही ठरवून दिलेले आहेत. खनिज तेल, गॅसोलीन, केरोसीन इ. पदार्थ साठविण्याच्या बऱ्याचशा टाक्या जमिनीखाली बांधलेल्या असतात. कित्येकदा निरुपयोगी खाणी व नैसर्गिक गुहा खनिज तेल व वायू साठविण्यासाठी वापरतात. अमेरिकेत व यूरोपातील काही देशांत भूपृष्ठाखाली साधारण खोल जागी असणाऱ्या खडकांतील संरचनात्मक सापळ्यांत आणि भिंगाच्या आकाराच्या वालुकाश्मात नैसर्गिक वायू ठराविक दाबाखाली साठवून ठेवतात. इ.स. १९७० च्या सुमारास प्लॅस्टिकसारख्या पदार्थांच्या प्रचंड टाक्या समुद्रात बुडवून त्यांत तेल साठविण्याचा अभिनव मार्ग शोधून काढण्यात आला आहे.
परिवहन : खनिज तेलाची क्षेत्रे, परिष्करण कारखाने व उत्पादांच्या बाजारपेठा एकमेकांपासून सामान्यत: दूर असतात. म्हणून तेल परिष्करण कारखान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोटारी, आगगाड्या,पडाव,जहाजे यांसारख्या वाहनांचा व नळांचा वापर करतात. या सर्व साधनांमध्ये तेल वाहतुकीसाठी खास व्यवस्था करण्यात येते.खनिज तेलाची वाहतूक इतर कुठल्याही सामान्य इंधनाच्या वाहतुकीपेक्षा कमी खर्चाची असते. ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.त्यामुळे ज्या देशांत खनिज तेलाची कमतरता आहे, अशा देशांना तेलाचा पुरवठा करणे शक्य झाले आहे. तेल वाहतुकीचा सर्वांत स्वस्त मार्ग म्हणजे तेलाचे लांबच लांब नळ होत. त्याखालोखाल तेलवाहू जहाजांचा क्रमांक लागतो. कित्येकदा खनिज तेलाचे उत्पाद लहान मोठ्या टाक्या, डबे, पिपे यांत भरतात. उदा., द्रवीभूत खनिज तेल वायू लहान गोल टाक्यांत, केरोसीन व वंगणे डब्यांमध्ये किंवा पिंपामध्ये भरतात. तेल वाहतुकीची सामान्य साधने पुढीलप्रमाणे आहेत.
(१) नळ : खनिज तेल प्रवाही असल्यामुळे कुठल्याही प्रकारे घट होऊ न देता त्याची नळांतून वाहतूक करणे शक्य असते.तेलाच्या अनेक विहिरी तेलक्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तेल गोळा करणाऱ्या संग्रह स्थानकांना नळांनी जोडलेल्या असतात आणि तेथून तेल इतर नळांतून परिष्करण कारखान्यांकडे पोहोचविले जाते.तेलवाहू नळ मोठ्या व्यासाचे आणि खूप लांबीचे असतात. सु. एक मी. व्यासाच्या जवळजवळ सव्वा दोन हजार किमी. लांबीच्या नळांतून अमेरिकेतील टेक्सस, लुइझिॲना व ओक्लाहोमा या राज्यांमधील तेलक्षेत्रांतून रोज अंदाजे चार लाख पिपे तेल अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या परिष्करण कारखान्याकडे वाहून नेण्यात येते.सौदी अरेबिया व इराक यांमधील तेलक्षेत्रांतील तेल वाळवंट पार करून सिरिया व लेबाननमधील बंदरापर्यंत नळांतून वाहून नेले जाते.सहारा वाळवंटातील तेलक्षेत्रांतील तेल भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सिरिया व अल्जीरिया या देशांत नळाने वाहून नेण्यात येते. नळाने वाहतूक करणे जरी स्वस्त असले, तरी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तेलाचा प्रवाह सतत चालू राहिला, तरच नळ बांधणीचा खर्च परवडतो. खर्चाच्या इतर प्रमुख बाबी म्हणजे नळाची किंमत, नळ टाकण्याचा खर्च, पंपकेंद्राची किंमत इ. होत. मोठ्या व्यासाचे नळ तेलाच्या वाहतुकीसाठी किफायतशीर ठरतात. परिष्करण कारखान्यातून नळ टाकून उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करतात. अशा वेळी एकाच नळातून निरनिराळ्या अंशांची उदा., केरोसीन, गॅसोलीन, डीझेल तेल इत्यादींची वाहतूक करतात. कित्येकदा दोन अंश एकमेकांत मिसळतात.परंतु नळातून वाहणाऱ्या एकूण उत्पादांच्या मानाने हे मिश्रण अत्यंत अल्प प्रमाणात असते. खनिज तेलाच्या उत्पादांचा खप ज्या भागात अतिशय असतो अशा भागात वरील प्रकारचे नळ टाकले जातात.
(२) जहाज : परिष्करण कारखाना व तेलक्षेत्रे अथवा परिष्करण कारखाना व ग्राहक यांच्यामध्ये जर खूप अंतर असेल आणि त्यांच्यामध्ये समुद्र अथवा मोठा जलाशय असेल, तर तेलाच्या वाहतुकीसाठी जहाज वापरणे फायदेशीर ठरते. जहाज वाहतुकीचा एक विशेष फायदा म्हणजे त्यांच्या प्रवासाचा मार्ग बदलता येतो. तसेच जहाज सुटण्याची व माल पोहोचविण्याची बंदरे बदलता येतात.अमेरिकेत तेलवाहतुकीसाठी जहाजांचा वापर सु.१८८० साली सुरू झाला व आता तो जगात सर्वत्र होत आहे.अशी जहाजे निरनिराळ्या प्रकारची असतात, त्यांची क्षमता कित्येकशे टनांपासून एक लाख टनांपेक्षा अधिक असू शकते. जपानमध्ये तर तीन लाख टनांची प्रचंड तेलवाहू जहाजे बांधण्यात येत आहेत. लहान जहाजे देशांतर्गत वाहतुकीसाठी आणि मोठी जहाजे महासागरांतील वाहतुकीसाठी वापरली जातात. जगातील कित्येक देशांजवळ आपापल्या मालकीची तेलवाहू जहाजे आहेत, परंतु अर्ध्याहून अधिक जहाजे खाजगी मालकीची आहेत. काही जहाजमालक कायद्याचे व आर्थिक संरक्षण देणाऱ्या लायबीरिया, पनामा यांसारख्या देशांत जहाजांची नोंदणी करतात.अशा प्रकारची जहाजे सु.२० टक्के आहेत.
(३) पडाव : देशातल्या देशात तेलवाहतुकीसाठी पडावांचा उपयोग करतात. यांमधून साधारणत: उत्पादांची वाहतूक अधिक प्रमाणात करतात.जहाजांच्या मानाने पडावांचा वेग कमी असतो.
(४) रेल्वे वाघिणी : खनिज तेल व उत्पाद यांच्या अल्प अंतरावरील जलद वाहतुकीसाठी रेल्वे वाघिणींचा वापर करण्यात येतो. या वाघिणी तेल वाहतुकीसाठी विशेष प्रकारच्या गोलाकार टाक्या बांधून तयार केलेल्या असतात.
(५) टाकीयुक्त ट्रक : (टँकर). या पद्धतीची वाहतूक १९५० पासून अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ लागली. ट्रकने सामान्यत: उत्पादांची वाहतूक करण्यात येते. भारतातही ही पद्धत प्रचलित आहे. डबे, पिपे, लहान टाक्या इत्यादींमध्ये खनिज तेल उत्पाद भरून साध्या ट्रकांतूनही त्यांची वाहतूक करतात.
भारतातील तेलाचे व उत्पादांचे नळ : तेलक्षेत्रातून परिष्करण कारखान्यात व परिष्करण कारखान्यातून बाजारपेठेत वाहतूक करण्यासाठी भारतात निरनिराळ्या भागांत नळ टाकण्यात आले आहेत. या कामासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९६५ साली स्वतंत्र नळ विभाग स्थापन केला. या विभागाने प्रथम गौहाती-सिलिगुडी उत्पादवाहक नळ आणि हल्डिया-बरौनी-कानपूर उत्पादवाहक नळ टाकले. भारतातील काही प्रमुख नळ प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत.
(१) नहरकटिया-नूनमती-बरौनी खनिज तेल नळ : लांबी १,१५२ किमी., हा प्रकल्प ऑइल इंडिया लि. कंपनीने दोन टप्प्यांत पूर्ण केला.पहिल्यात नहरकटिया-मोरान-नूनमती या मार्गात १९६२ मध्ये नळ टाकण्यात आले दुसऱ्यात नूनमती–बरौनी या मार्गात १९६४ मध्ये नळ टाकण्यात आले. या प्रकल्पाची प्राथमिक क्षमता दरवर्षी ३० लाख टन होती ती नंतर ४० लाख टनांपर्यंत वाढविण्यात आली.
(२) गौहाती-सिलिगुडी उत्पाद नळ : लांबी ४२६ किमी., या प्रकल्पासाठी सु. साडेसात कोटी रु. खर्च करण्यात आलेले आहेत. प्रकल्पाचे काम १९६६ अखेर सुरू करण्यात आले. या नळातून दरवर्षी सु. ५ लक्ष टन उत्पादाची वाहतूक होते.
(३) हल्डिया-बरौनी-कानपूर उत्पाद नळ : लांबी १,१९२ किमी. हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला.पहिल्यात बरौनी–कानपूर या मार्गावर आणि दुसऱ्यात बरौनी–हल्डिया या मार्गावर नळ टाकण्यात आले.
(४) बरौनी-हल्डिया नळ : लांबी ५२५ किमी., या नळाने खनिज तेल आणि उत्पाद या दोहोंची वाहतूक करण्याची योजना आहे. बरौनीहून हल्डियास उत्पादाची वाहतूक होते व हल्डियाहून बरौनी येथे खनिज तेलाची वाहतूक होते. हल्डिया येथे तरंगते छप्पर असणाऱ्या ३,३५,००,००० लि. द्रव मावणाऱ्या दोन टाक्या बसविण्यात आलेल्या आहेत.
(५) बरौनी-कानपूर उत्पाद नळ : लांबी ६६८ किमी., हे नळ १९६६ मध्ये टाकण्यात आले.
(६) कोयाली-अहमदाबाद उत्पाद नळ : लांबी ११५ किमी., हे नळ टाकण्याचे काम स्नाम या इटालियन कंपनीने केले. १९६५ पासून या नळांतून वाहतूक सुरू झाली.
(७) अंकलेश्वर-कोयाली खनिज तेल नळ : लांबी ९५ किमी., या नळातून १९६५ पासून वाहतूक सुरू झाली.
(८) कलोल-साबरमती खनिज तेल नळ : लांबी १५ किमी., या नळाचे काम १९६९ मध्ये पूर्ण झाले. यातून रोज सु.१,६०० टन तेल वाहून नेण्यात येते. साबरमतीहून तेल रेल्वे वाघिणीने कोयाली परिष्करण कारखान्यात नेण्यात येते.
(९) लकवा-मोरान खनिज तेल नळ : लांबी १८ किमी. रुद्रसागर व लकवा क्षेत्रांतील तेल मोरान येथे नेण्यात येऊन तेथून ते नूनमती व बरौनी परिष्करण कारखान्यांपर्यंत नेण्यात येते.या नळाचे काम १९६८ मध्ये पूर्ण झाले.
(१०) कलोल-नवागाम-कोयाली खनिज तेल नळ : लांबी १३० किमी., नवागाम व कलोल या क्षेत्रांतील खनिज तेल कोयाली परिष्करण कारखान्यापर्यंत वाहून नेण्यात येते.
(११) खंबायत-धुवरण वायू नळ : लांबी २५ किमी., या नळाचे काम १९६४ मध्ये पूर्ण झाले. खंबायत क्षेत्रातील वायू धुवरण औष्णिक विद्युत् केंद्रात नेण्यात येतो.
(१२) अंकलेश्वर-उतराण वायू नळ : लांबी ३७ किमी., अंकलेश्वर क्षेत्रातील वायू उतराण औष्णिक विद्युत् केंद्रात नेण्यात येतो. या नळाचे काम १९६५ मध्ये पूर्ण झाले.यातून रोज सु.३ लक्ष घ.मी. वायू पुरविला जातो.
(१३) अंकलेश्वर-बडोदे वायू नळ : लांबी ९५ किमी., या नळाचे काम १९६५ मध्ये पूर्ण झाले. या नळातून अंकलेश्वर क्षेत्रातील वायू बडोद्यातील गुजरात खत कारखाना व इतर उद्योगधंद्यांस पुरविला जातो.
(१४) राजबंध-दुर्गापूर नॅप्था नळ : द फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या दुर्गापूर येथील टाक्यांत राजबंधहून नॅप्था वाहून नेण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हे नळ टाकले आहेत.
मथुरा येथील परिष्करण कारखान्यासाठी कच्छच्या आखातापासून ते मथुरेपर्यंत आयात कच्चे तेल पाठविण्याकरिता १,२२२ किमी. लांबीचे नळ टाकण्याची योजना आहे.
परिष्करण : खनिज तेलामध्ये हायड्रोकार्बनांच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. या संयुगांचे रेणुभार भिन्न असतात व त्यामुळे त्यांचे गुणधर्मही भिन्न असतात.कमी रेणुभार असणारी संयुगे वातावरणाच्या तापमानापेक्षा थोड्या अधिक तापमानास तापविली असता उकळतात आणि त्यामुळे वेगळी करता येतात, तर जास्त रेणुभार असणारी संयुगे ४००० से.पर्यंत तापविली तरी वेगळी होत नाहीत. तापमानाच्या एका ठराविक पल्ल्यात उकळणाऱ्या संयुगांच्या समूहास अंश असे म्हणतात. खनिज तेलातील घटकांमध्ये असणाऱ्या भिन्न गुणधर्मांमुळे निरनिराळ्या गुणधर्मांवर आधारित प्रक्रिया वापरून खनिज तेलाचे वेगवेगळ्या अंशांत विभाजन करता येते. एखाद्या अंशातील संयुगांचे विविध गुणधर्म मिळून तयार होणारा एकत्रित फलित गुणधर्म हा त्या अंशाचा गुणधर्म असतो.यामुळे काही विशिष्ट उपयोगांसाठी विवक्षित अंश जास्त उपयुक्त असतो. म्हणून निरनिराळ्या तापमानांस उकळणाऱ्या अंशांत खनिज तेलाचे विभाजन करणे आवश्यक असते. परिष्करणाचा मुख्य हेतू खनिज तेलाचे निरनिराळ्या अंशांत विभाजन करणे, त्याचे पुनर्घटन करणे व त्यापासून निरनिराळे उत्पाद मिळविणे हा असतो. परिष्करण या संज्ञेत खनिज तेलापासून आवश्यक ते अंश मिळविणे, ते शुद्ध करणे, त्यांच्यामध्ये विविध उद्दिष्टांकरिता आवश्यक असणारे गुणधर्म आणणे इत्यादींसाठी करण्यात येणाऱ्या अनेक प्रक्रियांचा समावेश होतो.ग्राहकांच्या मागणीप्रमाणे परिष्करणाच्या पद्धतीत बदल करण्यात येतात किंवा नवीन प्रक्रिया शोधून काढतात. उदा., एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत केरोसिनाची मागणी वाढल्यामुळे कच्च्या खनिज तेलापासून ६० ते ७० टक्के केरोसीन मिळेल अशा पद्धतीने त्याचे परिष्करण करीत असत. पुढे १९५० च्या सुमारास गॅसोलिनाची मागणी इतकी वाढली की, सु. ५० टक्के गॅसोलीन मिळेल अशा पद्धतीने परिष्करण करण्यात येऊ लागले. कित्येकदा हवामानानुसार एका वर्षभरातही प्रक्रियेच्या योजनेत बदल करावा लागतो., उदा., हिवाळ्यामध्ये घरात ऊब निर्माण करण्यासाठी शेगड्यांत किंवा भट्ट्यांत वापरण्यात येणाऱ्या तेलाची मागणी वाढते तेव्हा त्याचे उत्पादन वाढवावे लागते, तर उन्हाळ्यातील गॅसोलिनाच्या वाढत्या मागणीस तोंड देण्यासाठी त्याचे उत्पादन वाढवावे लागते. परिष्करणाच्या प्रक्रियेत वरीलप्रमाणे वेळोवेळी बदल केल्यास निरनिराळे उत्पाद लागत नसतील त्यावेळी तयार केल्यास ते साठविण्यासाठी व वाहून नेण्यासाठी जो खर्च करावा लागतो, तो करावा लागत नाही अथवा त्यात बचत होते. आवश्यक तेच उत्पाद मागणीनुसार तयार केल्यामुळे केवळ त्यांचीच वाहतूक करता येते.
परिष्करण कारखाने तेलक्षेत्राजवळ, बंदाराजवळ अथवा ज्या भागात उत्पादांचा खप असतो त्या भागात उभारण्यात येतात. खनिज तेल उद्योगाच्या सुरुवातीच्या काळी केरोसीन, वंगणी तेले, इंधन तेले, इत्यादींची खूप मागणी असे त्यामुळे बाजारपेठेच्या भागातच परिष्करण कारखाने उभारणे त्यावेळी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होई. त्यावेळी तेलक्षेत्रे व परिष्करण कारखाने एकमेकांपासून खूप दूर अंतरावर असली तरीही कच्चे तेल एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणे परवडत असे. पुढे मोटारींचे युग सुरू झाले व गॅसोलिनाची मागणी वाढली आणि परिष्करणाने निर्माण होणाऱ्या बहुतेक उत्पादांचा खप होऊ लागला. या परिस्थितीत कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यापेक्षा त्यापासून मिळणाऱ्या उत्पादांची वाहतूक करणे सोयीचे व स्वस्त असते. या दृष्टीने परिष्करण कारखाने तेलक्षेत्राच्या जवळ उभारणे फायद्याचे होते. अशा प्रकारच्या कारखान्यांत आसपासच्या अनेक क्षेत्रांतील कच्च्या तेलाचे परिष्करण करता येते. दुसऱ्या महायुद्धानंतर उत्पादांची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यानंतर मात्र उत्पादांची मागणी असलेल्या भागात परिष्करण कारखाने उभारण्याची प्रवृत्ती सर्व जगभर वाढत गेली.
परिष्करणाच्या तंत्रात गेल्या काही वर्षांत बरीच क्रांती घडून आलेली आहे. सध्या परिष्करणात विभाजन, निष्कर्षण (अलग काढणे), औष्णिक भंजन (जड ऊर्ध्वपातित पदार्थांचे तुकडे पाडून हलक्या पदार्थांचा पुरवठा वाढविण्याची प्रक्रिया), उत्प्रेरकी भंजन, हायड्रोफायनिंग इ. प्रक्रियांचा समावेश होतो. एखाद्या परिष्करण कारखान्यात वरीलपैकी कोणती एक अथवा अनेक प्रक्रिया वापरायची हे परिष्कृत तेलाच्या कोणत्या अंशास मागणी आहे, खनिज तेलाचे गुणधर्म कोणते आहेत, तयार मालाचे विनिर्देशन काय आहे इत्यादींवर अवलंबून असते. परिष्करणातील महत्त्वाच्या प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
(१) कच्च्या तेलावरील प्राथमिक संस्करण : वातावरणीय दाबास खनिज तेलाचे ऊर्ध्वपातन केल्यास त्यातील प्राथमिक अंश सामान्यत: वेगळे होतात. खनिज तेलातील निरनिराळे अंश मिळविण्यासाठी प्रत्यक्ष परिष्करण करण्यापूर्वी त्यातील क्लोराइडे, हलके वायू, हायड्रोजन सल्फाइड इ. अनावश्यक पदार्थ काढून टाकण्यात येतात. यांपैकी काही पदार्थ घाणेरडा वास असणारे व काही संक्षारक (गंज निर्माण करणारे) असतात. उष्णता विनिमयक (एका पदार्थाची उष्णता काढून घेऊन दुसऱ्या पदार्थाला देणाऱ्या) नळ्या, परिष्करण स्तंभातील तबके, भट्टीतील नळ्या इत्यादीमध्ये असे पदार्थ साचून त्या तुंबतात. ऊर्ध्वपातनासाठी खनिज तेल खूप तापविल्यावर त्यात असणाऱ्या मॅग्नेशियम क्लोराइडापासून हायड्रोक्लोरिक अम्ल तयार होते. हे अम्ल संक्षारक असते. खनिज तेलात अमोनियम बायकार्बोनेट व दाहक (कॉस्टिक) सोडा यांचे मिश्रण टाकल्यास अशा प्रकारची अम्ले तयार होत नाहीत.मॅग्नेशियम व बेरियम क्लोराइडांचे स्थिर सोडियम क्लोराइडात रूपांतर होते. कित्येकदा ऊर्ध्वपातन करताना निर्माण होणाऱ्या हायड्रोक्लोरिक अम्लात अमोनिया वायूचे अंत:क्षेपण करून त्याचे उदासिनीकरण (अम्लीय वा क्षारीय, म्हणजे अल्कलीचे गुणधर्म नसलेला पदार्थ बनविण्याची विक्रिया) करतात. काही वेळा धातूच्या पृष्ठभागावर गंजरोधी पदार्थाचा लेप देतात. गंधकामुळे निर्माण होणाऱ्या गंजाचा प्रतिबंध करण्यासाठी चुना वापरतात.खनिज तेला गंधकाचे प्रमाण जास्त असल्यास बुडबुड्या टोप्या, तबके, केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर जाणाऱ्या प्रेरणेच्या साहाय्याने द्रवाचा दाब वाढविणारा) पंप आदी उपकरणांमध्ये क्रोमियमयुक्त पोलाद वापरतात.खनिज तेल साठविणाऱ्या टाक्या, वायुवाहक नलिका इत्यादींवर हायड्रोजन सल्फाइडामुळे गंज चढतो. खनिज तेलाचे रासायनिक पृथ:करण केल्यास त्यातील कोणते घटक अपायकारक आहेत, कोणत्या पदार्थापासून गंज निर्माण होतो, याची सर्वसाधारण कल्पना येते. प्रत्यक्ष यंत्रसंचावर आणि प्रयोगशाळेत खनिज तेलाची परीक्षा केल्यास काय प्रतिबंधक उपाययोजना करावी, हे निश्चित ठरविता येते.
(२) कच्च्या तेलाचे विभाजन : या प्रक्रियेत खनिज तेल उष्णता विनिमयकाच्या समूहात व भट्टीत तापवून पंपाने विभाजक स्तंभाकडे पाठविण्यात येते.या ठिकाणी खनिज तेलातून
उत्पन्न होणाऱ्या सर्व घटकांचे बाष्पीभवन होईल इतक्या तापमानापर्यंत ते तापवितात. विभाजक स्तंभाच्या टोकाकडील भागातून तेथे असणारे बाष्प सतत बाजूला काढून घेऊन त्याचे संद्रवण केले जाते. या संद्रावाचा काही भाग अलग केला जातो व उरलेला भाग पश्चवाही स्तंभाकडे परत पाठविला जातो. स्तंभातून खाली येणारा हा थंड पश्चवाही भाग व उष्ण ऊर्ध्वगामी बाष्प यांचा संयोग होतो. या बाष्पात उच्च व नीच उत्कलन बिंदू (उकळबिंदू) असणारी अशी दोन्ही प्रकारची संयुगे असतात. उच्च उत्कलन बिंदू असणारी संयुगे पश्चवाहीतील नीच उत्कलन बिंदू असणाऱ्या संयुगांना तापवितात. यामुळे नीच उत्कलन बिंदू असणाऱ्या थंड संयुगांचे बाष्प होऊन ते संद्रावकाकडे परत जाते. उच्च उत्कलन बिंदू असणारी संयुगे संद्रावित होऊन स्तंभातून खालच्या भागाकडे वाहू लागतात. यावेळी उच्च उत्कलन बिंदू असणारे द्रवरूप घटक त्याहून उच्च उत्कलन बिंदू असणाऱ्या ऊर्ध्वगामी वाफेच्या सान्निध्यात येतात व पुन्हा वर वर्णन केल्याप्रमाणे उष्णता विनिमय होतो. निरनिराळे उत्कलन बिंदू असणारे घटक निरनिराळ्या तापमानास वेगळे होतात. विभाजक स्तंभाच्या जसजसे खालच्या भागात जावे तसतसे उच्च उत्कलन बिंदू असणारे अंश मिळतात. या प्रक्रियेस विभाजन असे म्हणतात.
स्तंभाच्या बहुतेक भागात बुडबुड्या टोप्या, झोत, तबके अथवा चाळणी तबके बसवून बाष्प व द्रव एकमेकांत मिसळण्याची व्यवस्था केलेली असते. दोन तबकांमधील अंतर साधारणपणे ०·५ ते १·० मी. असते. पश्चवाही स्तंभांची व तबकांची संख्या जितकी जास्त तितके जास्त कार्यक्षमतेने विभाजन होते. पूर्वी यासाठी अनेक पात्रे आणि संद्रावक वापरीत असत.त्यामुळे विभाजनाचे काम किचकट होत असे. सध्या रासायनिक व अभियांत्रिकी तत्त्वांवर आधारित विभाजक आणि महाविभाजक वापरात आल्यामुळे उच्च प्रतीचे घटक सहज सुलभतेने सुटसुटीत स्वरूपात व कमी खर्चात मिळविता येणे शक्य झाले आहे.
विभाजन करणाऱ्या ऊर्ध्वपातकातून सामान्यत: चार ते आठ उपप्रवाह काढले जातात.निरनिराळ्या उपप्रवाहांतून निरनिराळे पदार्थ मिळतात. वायू, नॅप्था, सरळ मिळविलेले गॅसोलीन, केरोसीन, डीझेल तेले, वायु-तेले इ. पदार्थ या उपप्रवाहांतून मिळतात.काही उपप्रवाहांचे अपखंडन (वायू किंवा बाष्प यांची क्रिया करून बाष्पनशील घटक वेगळे करणे) करतात व प्रत्येकातील अल्प प्रमाणात असलेले हलके घटक वेगळे करतात. काही उपप्रवाहांचे पुन्हा विभाजन करून त्यांतील अल्प प्रमाणात असणारे अंश वेगळे केले जातात. उदा., नॅप्थ्याचे महाविभाजन केल्यास त्यातून अनेक विद्राव मिळतात. वायु-तेलाच्या (केरोसीन काढून घेतल्यानंतर उरणाऱ्या तेलाच्या) अंशातून अधिक अल्पांश काढायचा झाल्यास त्याचे निर्वात अवस्थेत ऊर्ध्वपातन करतात.कारण या अंशाचा उत्कलन बिंदू खूप उच्च असतो. विभाजनानंतर मिळालेल्या पदार्थांवर बाजारातील मागणीनुसार (विनिर्देशनानुसार) निरनिराळे संस्कार केले जातात.हे संस्कार निरनिराळ्या कारखान्यांत भिन्न प्रकारचे असू शकतात.परिष्करण कार्याचा साधा आराखडा आ. ४ मध्ये दिला आहे.
(३) औष्णिक व उत्प्रेरकी भंजन : डीझेल तेल व इंधन तेल यांच्या उत्कलन बिंदूंच्या कक्षेत उकळणाऱ्या अंशाची मागणी जास्त असते, असे बहुतेक देशांत आढळून आले आहे. म्हणून या अंशाचे औष्णिक अथवा उत्प्रेरकी भंजन करून त्यापासून गॅसोलीन, डीझेल तेलाचे घटक, औद्योगिक आणि घरगुती जळणासाठी लागणारा वायू इ. उत्पादांत रूपांतर करतात.
(अ) औष्णिक भंजन : या प्रक्रियेत उष्णतेचा उपयोग करून मोठ्या रेणूंचे लहान रेणूंत रूपांतर करतात. त्याच वेळी काही लहान विक्रियाशील रेणूही एकमेकांना जोडले जातात व त्यांपासून सशाख (शाखा असणाऱ्या) शृंखलायुक्त मध्यम रेणुभार असलेली संयुगे तयार होतात. स्थिर लहान रेणू भंजित गॅसोलिनाच्या स्वरूपात विक्रियकातून (विक्रिया ज्या उपकरणात घडवून आणतात त्यातून) बाहेर पडतात. या गॅसोलिनाचा ऑक्टेन–अंक (इंधनातील आयसो-ऑक्टेनाचे प्रमाण दर्शविणारे परिमाण, या अंकावरून एंजिनात इंधन जळताना होणाऱ्या स्फोटाचे प्रमाण समजते) विभाजन करून मिळालेल्या गॅसोलिनाच्या ऑक्टेन-अंकापेक्षा जास्त असतो. वायुरूप तेलाच्या पल्ल्यात असणारी काही उच्च रेणुभाराची संयुगे आणि काही वेळा कोकसुद्धा प्राप्त होतो. भंजन क्रियेत गॅसोलीन आणि इंधन तेल यांच्या उत्कलन बिंदूंच्या मधे उत्कलन बिंदू असणारी मध्यम रेणुभाराची इतर संयुगेही निर्माण होतात. या संयुगांचेही पुढे आणखी भंजन करतात. भंजन क्रियेत जर मोठ्या प्रमाणावर वायू निर्माण होत असतील, तर ती क्रिया ऊष्माग्राही होते नाहीतर ती ऊष्मादायी असते.
सरळ मिळविलेल्या ऊर्ध्वपातितांपेक्षा (ऊर्ध्वपातनाने मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा) भंजन करून मिळविलेली ऊर्ध्वपातिते किंवा इंधन तेले यांचे प्रवाह बिंदू (ज्या किमान तापमानाला द्रव प्रवाही होतो असे तापमान) कमी असतात.कित्येकदा इंधन तेलाची श्यानता कमी करण्यासाठी कमी तापमानास अंश भंजन करतात. यास श्यानता भंजन म्हणतात. भंजन करून कोक क्वचितच मिळवितात. वायु-तेलाचे जास्तीत जास्त उत्पादन करणे व कोकिंग यंत्रसंचात औष्णिक भंजन अथवा उत्प्रेरकी भंजन करून कोक परत मिळविणे जास्त श्रेयस्कर असते.
भंजनासाठी बाष्पमय प्रावस्था वापरावयाची की मिश्र बाष्पद्रव प्रावस्था वापरावयाची, हे खनिज तेलाच्या रासायनिक गुणधर्मांवर अवलंबून असते. भंजनाचे तापमान व दाब, तसेच खनिज तेल भट्टीत किती काळ असते या सर्वांचा तयार होणाऱ्या उत्पादांच्या प्रकारांवर परिणाम होतो. भंजनाचे तापमान सामान्यत: ४००० से. असते, पण कित्येकदा ते सु. ८००० से. इतके उच्चही असू शकते. भंजन क्रिया काही सेकंदापासून ते कित्येक तासांपर्यंत चालते. भट्टीतील दाब सु.७० किग्रॅ./चौ.सेंमी. असतो. या दाबामुळे वाफ निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. तसेच भंजित उत्पादांच्या गुणधर्मांवर आणि त्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो.
खनिज तेल ऊर्ध्वपातकातून विक्रिया होणाऱ्या कप्प्यात पाठविले जाते कारण तेथे विक्रियेस जास्त वेळ मिळतो.त्यानंतर तेलामधून निघणारे निरनिराळे बाष्परूप पदार्थ ताबडतोब थंड करतात.यामुळे भंजन आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ होत नाही.या बाष्पाचे विभाजन करून निरनिराळे उत्पाद तयार करतात.
विलंबित कोकिंग अथवा द्रव कोकिंग करून कोक तयार करण्यात येतो. द्रवरूप प्रावस्थेतील भंजनाचा काल वाढवितात व बहुवारिकीकृत (एकाच प्रकारच्या अनेक रेणूंचा संयोग होऊन तयार होणाऱ्या अधिक जटिल रेणुंनी बनलेले) व संघनित उत्पाद अधिक प्रमाणात मिळवितात.
(आ) उत्प्रेरकी भंजन : ही उत्प्रेरकाच्या सान्निध्यात जास्त तापमान व कमी दाबाखाली होणारी प्रक्रिया होय.उत्प्रेरकाच्या सान्निध्यात खनिज तेलाचे अपघटन होते आणि उत्प्रेरकाच्या पृष्ठभागावर जटिल विक्रिया होतात. या भंजनात विशिष्ट संयुगेच तयार होतात.औष्णिक भंजनाप्रमाणेच याही भंजनात बहुवारिकीकृत उत्पाद तयार होतात.ते कोकच्या स्वरूपात उत्प्रेरकाबरोबरच वेगळे काढले जातात. उत्प्रेरकाचा वापर केल्यामुळे मिळणाऱ्या उत्पादांची गुणवत्ता अधिक चांगली असते.
गॅसोलिन व मध्यम ऊर्ध्वपातिते यांची मागणी वाढली म्हणून औष्णिक भंजनाची प्रक्रिया शोधून काढण्यात आली.अमेरिकेत १९३५ च्या सुमारास हूड्री यांनी शोधून काढलेल्या दृढ स्तर उत्प्रेरकी भंजन पद्धतीचा वापर मोठमोठ्या कारखान्यांत करण्यात येऊ लागला.त्यापूर्वी जास्त ऑक्टेन–अंकाच्या गॅसोलिनाचे उत्पादन झाले नव्हते.गॅसोलिनाची मागणी जसजशी वाढू लागली तसतसे जास्त उत्पादन व्हावे म्हणून या प्रक्रियेत निरनिराळे बदल करण्यात आले.
(४) पुनर्घटन : नॅप्थ्याचा ऑक्टेन–अंक वाढविण्यासाठी अथवा ॲरोमॅटिक संयुगे पुन्हा मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या संस्कारांना पुनर्घटन म्हणतात.पुनर्घटनाचे औष्णिक आणि उत्प्रेरकी असे दोन प्रकार आहेत.
(अ) औष्णिक पुनर्घटन : हा प्रकार नॅप्थ्यापासून उच्च ऑक्टेन-अंक असणारे गॅसोलीन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा संस्कार होय. यामध्ये काही संयुगांची संरचना बदलली जाते. काही सरळ शृंखलायुक्त संयुगांचे सशाख शृंखलायुक्त संयुगांत रूपांतर होते.यामुळे गॅसोलिनाचा ऑक्टेन-अंक वाढतो.
भट्टीत उच्च तापमान व दाब वापरून हा संस्कार केला जातो. साधारणत: ७० किग्रॅ./चौ.सेंमी. दाबाखाली नॅप्था भट्टीतून बाहेर पडतो. उष्णतामान सामान्यत: ४००० ते ६७०० से. असते. कोक निर्माण होऊ नये म्हणून यावेळी भट्टीत असणाऱ्या वलयाच्या निर्गमनद्वारी द्रुतशीतन (जलद थंड) केलेली वाफ सोडतात. ऑक्टेन-अंक किती हवा यावर प्रक्रियेत करावयाचे बदल अवलंबून असतात. अपघटन जास्त झाल्यास गॅसोलीन मिळण्याचे प्रमाण कमी होते.
(आ) उत्प्रेरकी पुनर्घटन : कमी ऑक्टेन-अंक असलेल्या नॅप्थ्यापासून उच्च ऑक्टेन-अंक असलेले गॅसोलीन करण्यासाठी अथवा ॲरोमॅटिक संयुगांचे उत्पादन करण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करतात. या प्रक्रियेत कित्येकदा उप-उत्पाद म्हणून हायड्रोजन मिळतो. हायड्रोजनी पुनर्घटन, अतिरिक्त पुनर्घटन, प्लॅटिनमी पुनर्घटन (प्लॅटिनम उत्प्रेरक म्हणून वापरून करण्यात येणारे पुनर्घटन, प्लॅटफॉर्मिंग), आवर्तनी पुनर्घटन इ. अनेक प्रकारच्या संस्कारांचा उपयोग सध्या उरत्प्रेकी पुनर्घटनामध्ये करण्यात येतो.
हायड्रोजनी पुनर्घटनाचा वापर प्रथम गॅसोलिनाची प्रत सुधारण्यासाठी जर्मनीमध्ये करण्यात आला. या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे खनिज तेल योग्य दर्जाचे असल्यास त्यावर आधिक प्रक्रिया करून अत्यंत शुद्ध टोल्यूइन तयार करता येते, असे १९३९ साली समजले.दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी स्फोटक पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या टोल्यूइनाचे महत्त्व वाढले व साहजिकच हायड्रोजनी पुनर्घटनाचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला. या प्रक्रियेत उत्प्रेरक म्हणून मॉलिब्डेना (मॉलिब्डेनम मूलद्रव्याचे ऑक्साइड) व वाहक म्हणून ॲल्युमिना (ॲल्युमिनियमाचे ऑक्साइड) यांचा उपयोग करतात. तापमान सु. ५३८० से., दाब सु. १० ते १४ किग्रॅ./ चौ.सेंमी. व सान्निध्यकाल साधारणत: १५ सेकंद असतो. प्रक्रिया कोणत्या परिस्थितीत व्हावी हे खनिज तेलावर अवलंबून असते. यासाठी अचल स्तर, प्रवाहित स्तर अथवा चल स्तर यांपैकी कोणत्याहि प्रकारांचे विक्रियक वापरतात.या सर्व विक्रियकांचे मूलतत्त्व एकच आहे.
इ.स.१९४९ च्या सुमारास उत्प्रेरक म्हणून प्लॅटिनम वापरणाऱ्या प्लॅटिनमी पुनर्घटन प्रक्रियेचा उदय झाला. या प्रक्रियेमुळे नॅप्थ्यापासून उच्च ऑक्टेन-अंकाची गॅसोलिने व उच्च प्रतीचे एकत्रित घटक मिळविणे शक्य झाले. याशिवाय वरील प्रकियेतून मिळणाऱ्या हायड्रोजनाचा उपयोग परिष्करणाच्या इतर प्रक्रियांत अथवा खनिज तेल रसायन प्रक्रियेत किफायतशीरपणे करता येऊ लागला. अपुनरुज्जिवित दृढस्तर प्लॅटिनमी पुनर्घटन प्रक्रियेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तोच उत्प्रेरक कित्येक वर्षे वापरता येतो.
तापमान ४६०० ते ५२०० से. व दाब १५ ते ५० किग्रॅ./ चौ.सेंमी. असताना प्लॅटिनमी पुनर्घटनाची प्रक्रिया होते.ॲरोमॅटिक संयुगांचे उत्पादन करण्यासाठी कमी दाब व ऑक्टेन–अंक सुधारण्यासाठी जास्त दाब वापरतात.अधिकांश उत्प्रेरकी पुनर्घटनात खालील मुख्य प्रक्रिया होतात. (१) C6 – वलय असलेल्या नॅप्थिनांचा हायड्रोजननिरास (हायड्रोजन काढून टाकण्याची क्रिया), (२) इतर नॅप्थिनांचे समघटकीकरण होणे (एकच रासायनिक संघटन असलेली पण रेणूतील अणूंची मांडणी भिन्न असलेली संयुगे तयार होणे) आणि त्यांचा हायड्रोजननिरास होऊन ॲरोमॅटिक संयुगे तयार होणे, (३) पॅरोफिनांच्या वलयातील हायड्रोजनाचा निरास, (४) पॅराफिनांचे समघटकीकरण, (५) पॅराफिनांचे हायड्रोजनी भंजन. यांपैकी पहिल्या तीन प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या दोन कमी तापमान व जास्त दाब असेल तेव्हाच महत्त्वाच्या ठरतात.
हायड्राेजनी पुनर्घटन व प्लॅटिनमी पुनर्घटन या प्रक्रियांत निरनिराळ्या सुधारणा करून परिष्करणाच्या इतर पद्धती शोधून काढण्यात आल्या आहेत. भंजन प्रक्रियेत वायु-तेल व क्षपित [→ क्षपण] तेल यांचा उपयोग होतो व पुनर्घटन प्रक्रियेत नॅप्थ्यांचा उपयोग होतो. भंजनामुळे जास्त गॅसोलीन मिळविता येते, परंतु गॅसोलिनाची प्रत सुधारण्यासाठी पुनर्घटन तंत्र वापरावे लागते.
(५) अल्किलीकरण : मुख्यत: सशाख शृंखला असणाऱ्या पॅराफिनांचा उपयोग करून जास्त ऑक्टेन-अंकांची वैमानिकी गॅसोलिने या प्रक्रियेचा वापर करून तयार करण्यात येतात. भंजन यंत्रसंचात मिळणाऱ्या ब्युटिलीन व आयसोब्युटेन यांच्याबरोबर सल्फ्यूरिक अम्लाचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करून नियंत्रित दाब व तापमानाखाली ही प्रक्रिया होते. आयसोब्युटेन आणि ओलेफीन यांचे मिश्रण करून मोटारीत इंधन म्हणून वापरण्यात येणारी अल्किलेटे तयार करतात. अल्किलेटांच्या उत्पादनासाठी सल्फ्यूरिक अम्ल, हायड्रोक्लोरिक अम्ल, हायड्रोप्ल्यूओरिक अम्ल इत्यादींचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात.
(६) समघटकीकरण : एन-ब्युटेनापासून मुख्यत्वेकरून आयसोब्युटेनाचे उत्पादन करण्यासाठी शोधून काढण्यात आलेल्या या प्रकियेचा उपयोग मोटार-गॅसोलिनाचे घटक म्हणून वापरण्यात येणाऱ्या जास्त ऑक्टेन-अंक असणाऱ्या समघटकांच्या उत्पादनासाठीही करतात. ब्युटेनाचे आयसोब्युटेनामध्ये रूपांतर करण्यासाठी निर्जल ॲल्युमिनियम क्लोराइडाचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात. या प्रक्रियेसाठी तापमान १२०० ते १५००से. व दाब सु.११ ते १४ किग्रॅ./चौ.सेंमी. यांची आवश्यकता असते.
(७) बहुवारिकीकरण : उत्प्रेरकी व पुनर्घटन यंत्रसंचातून प्राप्त होणाऱ्या ओलेफिनी वायूचे व प्रोपिलीन अथवा ब्युटिलीन असणाऱ्या द्रवांचे अनुरूप उत्प्रेरक वापरून बहुवारिकीकरण केले जाते. या प्रक्रियेमुळे जास्त प्रत्याघाती (एंजिनात इंधन जळत असताना आघातासारखे ठोके उत्पन्न होण्यास प्रतिबंध करण्याचा) गुणधर्म असणारी संयुगे प्राप्त होतात.तथापि बहुवारिकीकृत गॅसोलीन अल्किलेटांपेक्षा कमी प्रतीचे असते.म्हणून गॅसोलीन ऑक्टेने कमी प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या देशांत बहुवारिकीकरणाचा मर्यादित स्वरूपात उपयोग केला जातो. या प्रक्रियेचा खनिज तेल रसायने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो.
(८) विद्रावक परिष्करण : मुख्यत्वे वंगणाच्या तेलाच्या अंशातून मेण काढून टाकण्यासाठी आणि उत्प्रेरकी भंजनासाठी संभरणे तयार करण्यासाठी विद्रावक परिष्करणाचा उपयोग करण्यात येतो.
(९) गॅसोलिनामधील सरळ शृंखला असलेली ॲलिफॅटिक हायड्रोकार्बने वेगळी करून गॅसोलिनाचा ऑक्टेन–अंक वाढविणाऱ्या परिष्करणाच्या इतरही काही पद्धती शोधून काढण्यात आल्या आहेत.
वर वर्णन केलेल्या निरनिराळ्या परिष्करण प्रक्रियांद्वारे खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध पदार्थांमध्ये अशुद्ध द्रव्ये असतात. हे पदार्थ बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास योग्य करण्याकरिता त्यांतील अशुद्ध द्रव्ये काढून टाकणे इष्ट असते. याकरिता या पदार्थांवर विविध प्रक्रिया करण्यात येतात. या प्रक्रियांचे उद्देश मुख्यत्वे गंधक आणि त्याची संयुगे काढून टाकणे, पदार्थांत तयार होणारा गोंद काढून टाकणे वा तो तयार होण्यास प्रतिबंध करणे, संक्षारणास प्रतिबंध करण्याची क्षमता सुधारणे, प्रकाशाची क्रिया होण्यास प्रतिबंध करणे, वास व रंग सुधारणे इ. असतात.
निरनिराळ्या क्षेत्रांतील खनिज तेलांचे घटक भिन्न असतात.त्यांचे ऊर्ध्वपातन करून जे निरनिराळे पदार्थ मिळतात त्यांचे प्रमाण अर्थात कमीअधिक असते. काही ठिकाणांच्या खजिन तेलांपासून मिळणाऱ्या पदार्थांचे प्रमाण कोष्टक क्र.१ मध्ये दिलेले आहे.
कोष्टक क्र. १. निरनिराळ्या ठिकाणच्या खनिज तेलांपासून मिळणाऱ्या पदार्थांचे प्रमाण. | |||
पदार्थ | पेनसिल्व्हेनिया
% |
इराण
% |
व्हेनेझुएला
% |
गॅसोलीन | ४७·४ | ४५·१ | १५·३ |
केरोसीन | १७·० | ११·५ | ७·४ |
वायु—तेल | १४·३ | २२·६ | ७७·३ |
अवशिष्ट | २१·३ | २०·८ | — |
आसाममधील दिग्बोई येथील खनिज तेलातून मिळणारे विविध पदार्थ व त्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे : गॅसोलीन (मोटार स्पिरिट) २३%, केरोसीन २२%, डीझेल तेल १३%, इंधन तेल ११%, मेण १०% इतर १९%. खनिज तेलापासून हे पदार्थ मिळविताना २% पर्यंत मालाची घट होते.
भारतातील परिष्करण : भारतात खनिज तेलाचे नऊ परिष्करण कारखाने असून दहावा कारखाना कलकत्त्याजवळ हल्डिया येथे उभारला जात आहे. भारताची परिष्करण क्षमता दरवर्षी सु. २·३ कोटी टन असून ती २·५ कोटी टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सु. ८५ लक्ष टन तेल खाजगी आणि बाकीचे सरकारी क्षेत्रातील कारखान्यांत परिष्कृत होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात ३ लक्ष टन क्षमतेचा छोटा परिष्करण कारखाना दिग्बोई येथे होता. १९५१ मध्ये स्टँडर्ड व्हॅक्यूम ऑइल कंपनी व बर्माशेल कंपनी यांच्याबरोबर मुंबईजवळ कारखाने सुरू करण्याबाबत करार करण्यात आले. त्यानंतर विशाखापटनम् येथे त्याच धर्तीवर पण लहान कारखाना काढण्याबाबत कॅलटेक्स कंपनीबरोबर करार करण्यात आला.
कोष्टक क्र. २. भारतीय परिष्करण कारखाने | ||||||
कंपनी | स्थळ | राज्य | स्थापना | वार्षिक उत्पादन क्षमता
लक्ष टन |
क्षेत्र | तांत्रिक साहाय्य |
बर्माशेल | तुर्भे, मुंबई | महाराष्ट्र | १९५५ | ३७ | खाजगी | — |
एस्सो | तुर्भे, मुंबई | महाराष्ट्र | १९५४ | २५ | खाजगी | — |
कॅलटेक्स | विशाखापटनम् | आंध्र प्रदेश | १९५७ | १५ | खाजगी | — |
आसाम ऑइल | दिग्बोई | आसाम | १९०१ | १ | खाजगी | — |
इंडियन ऑइल कार्पोरेशन | बरौनी | बिहार | १९६४ | ३० | सरकारी | रशिया |
इंडियन ऑइल कार्पोरेशन | कोयाली | गुजरात | १९६५ | ३० | सरकारी | रशिया |
इंडियन ऑइल कार्पोरेशन | कोचीन | केरळ | १९६६ | २५ | सरकारी | फिलिप्स, अमेरिका |
इंडियन ऑइल कार्पोरेशन | नूनमती, गौहाती | आसाम | १९६२ | १० | सरकारी | रूमानिया |
इंडियन ऑइल कार्पोरेशन | मद्रास | तमिळनाडू | १९६९ | २५ | सरकारी | नॅशनल इराणीयन व पॅन अमेरिकन इंटरनॅशनल |
इंडियन ऑइल कार्पोरेशन | हल्डिया, कलकत्ता | प. बंगाल | — | २५ | सरकारी | फ्रान्स व रूमानिया |
एकूण क्षमता | २२३ |
परिष्करण उद्योगाचा विकास करण्यासाठी १९५९ मध्ये इंडियन रिफायनरीज लि.नावाची कंपनी सरकारी क्षेत्रात स्थापन करण्यात आली.नंतर ही कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये विलीन करण्यात आली. रूमानियाच्या साहाय्याने गौहातीजवळ नूनमती येथे व रशियाच्या साहाय्याने उत्तर बिहारमध्ये बरौनी येथे परिष्करण कारखाने सुरू करण्यात आले. १९६५ मध्ये नूनमती परिष्करण कारखान्याच्या क्षमतेची वाढ करण्यासाठी रशियाबरोबर करार करण्यात आला. त्याच वर्षी गुजरातेतील कोयाली परिष्करण कारखान्याची क्षमता ३० लक्ष टनांपर्यंत वाढविण्याचा करार करण्यात आला.
अमेरिकेतील फिलिप्स कंपनीच्या साहाय्याने कोचीन येथे २५ लक्ष टन क्षमतेचा कारखाना काढण्यात आलेला आहे. यातील उत्पादांच्या वाहतुकीसाठी एर्नाकुलम् बंदारापर्यंत सु. ७५ सेंमी. व्यासाचे दुमार्गी नळ टाकण्यात आलेले आहेत. १९६५ मध्ये नॅशनल इराणीयन ऑइल कंपनी व पॅन अमेरिकन इंटरनॅशनल कंपनी यांच्याबरोबर झालेल्या करारांनुसार मद्रास येथे कारखाना उभारण्यात आलेला आहे. तसेच रूमानियाच्या साहाय्याने हल्डिया येथे २५ लक्ष टन क्षमतेचा कारखाना ६७·५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. बोंगाईगाव (आसाम) येथे १० लक्ष टन क्षमतेचा कारखाना उभारण्याची योजना असून हा कारखाना १९७६ मध्ये उत्पादनक्षम होणार आहे व त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मथुरा (उत्तर प्रदेश) येथे ६० लक्ष टन क्षमतेचा कारखाना उभारण्याची योजना असून १९७८ मध्ये तो उत्पादनक्षम होईल आणि
त्यासाठी २१७ कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. भारतातील परिष्करण कारखान्यांसंबंधीची माहिती कोष्टक क्र. २ मध्ये दिलेली आहे. १९७४ साली एस्सो कंपनीचे भाग भारत सरकारने विकत घेतले असून या कंपनीचे ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ असे नामांतरण करण्यात आलेले आहे.
एंजिनिअर्स इंडिया लि., ही १९६५ साली स्थापन झालेली भारतीय संस्था नवीन परिष्करण कारखान्यांच्या नियोजनाबद्दल आणि आधीच अस्तित्वात असणाऱ्या कारखान्यांचा विकास व विस्तार यांबाबत सल्ला देण्याचे कार्य करते. तसेच ही संस्था उद्योगधंद्यासाठी लागणारी अभियांत्रिकी मदत करते.
खनिज तेल उत्पाद : बहुतेक सर्व खनिज तेले ही इंधने, वंगणे, डांबर व निरनिराळी खनिज तेल रसायने बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरली जातात. एखाद्या मोठ्या खनिज तेल उद्योगधंद्याच्या कारखान्यातून शेकडो निरनिराळे पदार्थ काढण्यात येतात. सामान्य कच्च्या खनिज तेलात शेकडो हायड्रोकार्बने असतात. या हायड्रोकार्बनांच्या रेणुभारांचा पल्ला १६ ते ५०,००० किंवा एक लाखापर्यंतही असतो. सर्वांत कमी रेणुभार नैसर्गिक वायूतील मुख्य घटक असणाऱ्या मिथेनाचा १६ असतो आणि अस्फाल्टांचा रेणवीय भार पन्नास हजार ते एक लाख या पल्ल्यात असतो (कोष्टक क्र. ३).
कच्च्या तेलाचे परिष्करण होत असताना प्रथम निरनिराळे उत्कलन बिंदू असणारे भाग वेगवेगळे करतात. अगदी कमी उत्कलन बिंदू असणारा भाग वायुरूप हायड्रोकार्बनांचा असतो. या भागात मिळणारी मिथेन,एथेन, प्रोपेन आणि ब्युटेन ही हायड्रोकार्बने इंधन म्हणून किंवा खनिज तेल रासायनिक पदार्थ बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरतात. घरगुती वापरात इंधन म्हणून वापरण्यात येणारा द्रवीकृत खनिज तेल वायू यांच्यातूनच मिळवितात. पेंटेन (पाच कार्बन अणू असलेले) ते डोडीकेन (बारा कार्बन अणू असलेले) या हायडोकार्बनांपासून गॅसोलीन तयार होते. गॅसोलिनाचे अनेक प्रकार तयार करतात. कच्च्या तेलाचा सु.४५ टक्के भाग गॅसोलीन मिळविण्यासाठी वापरण्यात येतो व दुसरा ४५ टक्के भाग इतर इंधने तयार करण्यासाठी वापरला जातो. यातील (१) केरोसीन-स्टोव्ह, दिवे, शेगड्या व डीझेल एंजिनासाठी, (२) केरोसीन व गॅसोलीन यांची मिश्रणे-जेट एंजिनासाठी, (३) वायु-तेल, डीझेल तेल, घरगुती शेगड्या व काही विशेष औद्योगिक उपयोग यांच्यासाठी, (४) उरलेली जड तेले -पाण्याची वाफ करण्यासाठी, जहाजे चालविण्यासाठी इंधन म्हणून व सिमेंट किंवा पोलाद यांसारख्या अवजड उद्योगधंद्यांत वापरतात.केरोसिनामध्ये C10 ते C14 ही हायड्रोकार्बने असतात, तर सामान्य वायु–तेलामध्ये C14 ते C20 व जड इंधन तेलात C70 ते C80 ही हायड्रोकार्बने असतात. अस्फाल्टात याहून अधिक जड हायड्रोकार्बने असतात. खनिज तेलाच्या उरलेल्या १० टक्के भागापासून इतर अनेक व विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. यांमध्ये अतिशय वेगवान यंत्रात वापरण्यात येणाऱ्या अगदी हलक्या कमी श्यानतेच्या द्रवांपासून ते वाफेच्या एंजिनात वापरण्यात येणारी अतिशय श्यान तेले व अर्धघनरूप किंवा वंगण ग्रीजे येतात.नैसर्गिक अस्फाल्टे खनिज तेलापासून मिळविलेल्या अस्फाल्टांपेक्षा महाग असतात व ती क्वचितच जशीच्या तशी वापरली जातात. खनिज तेलापासून योग्य व इच्छित गुणधर्म असणारी अस्फाल्टे मिळविता येतात.
खनिज तेलापासून पुढील प्रमुख पदार्थ मिळतात : (१) द्रवीकृत खनिज तेल वायू, (२) गॅसोलीन (मोटार स्पिरिट अथवा पेट्रोल), (३) वैमानिकी गॅसोलीन, (४) केरोसीन, (५) विद्रावक नॅप्थे, (६) जेट इंधन, (७) डीझेल इंधन, (८) वंगण तेल, (९) ग्रीज, (१०) मेण, (११) अवशिष्ट इंधन तेल, (१२) खनिज तेल कोक, (१३) इतर खनिज तेल रसायने.खनिज तेलापासून मिळणाऱ्या उत्पादांचा भारतातील वापर कोष्टक क्र. ४ मध्ये दाखविला आहे.
(१) द्रवीकृत खनिज तेल वायू : (एल.पी.जी.किंवा एल.पी.गॅस). हा नुसत्या प्रोपेन किंवा ब्युटेन वायूचा किंवा दोहोंच्या मिश्रणाने बनलेला असतो. ही दोन्ही हायड्रोकार्बने सामान्य वातावरणीय दाबास वायुरूप असतात, पण त्यांच्यावरील दाब वाढविला असता ती द्रवरूप होतात. अतिशय मोठ्या आकारमानाचा वायू दाबामुळे अगदी कमी जागेत द्रवरूपात सामावता येतो.त्यामुळे तो हाताळण्याचा व त्याच्या वाहतुकीचा खर्च कमी होतो. म्हणून द्रवरूप खनिज तेल वायू हा घरगुती जळणासाठी वापरण्यात येणारे अगदी सामान्य इंधन होऊन बसला आहे. नैसर्गिक वायूपासून नैसर्गिक गॅसोलीन मिळविण्याच्या कारखान्यातून व कच्च्या तेलाच्या परिष्करणाच्या कारखान्यातून प्रोपेन व ब्युटेन हे दोन्ही वायू मिळतात. १९५०–५६ या काळात अमेरिकेत सु. ७५ टक्के द्रवीकृत खनिज तेल वायू नैसर्गिक वायूपासून व बाकीचा २५ टक्के परिष्करण कारखान्यात मिळणाऱ्या वायूंतून मिळविण्यात आला. प्रोपेन व ब्युटेन हे इतर वायूंच्या प्रवाहातून ऊर्ध्वपातनाने वेगळे केले जातात. त्यांच्याबरोबर एथेन वायू आला, तर या वायूंच्या मिश्रणाचे सामान्य वातावरणीय दाबास द्रवात रूपांतर करणे शक्य होत नाही. तसेच त्यांच्याबरोबर ब्युटेनापेक्षा जड असणारा पेंटेन आला, तर वायुवाहक नळ्यांतून तो द्रवरूप होऊन वेगळा होण्याची शक्यता असते .यामुळे प्रोपेन आणि ब्युटेन यांच्यामध्ये इतर अनावश्यक हायड्रोकार्बन वायू येऊ न देण्यासाठी त्यांचे विभाजन अगदी काळजीपूर्वक करणे आवश्यक असते.
द्रवीकृत खनिज तेलाचा उपयोग सुरुवातीला प्रामुख्याने उष्णता व शक्ती निर्माण करण्याकरिता होत होता. पुढे त्याची रासायनिक संरचना समजल्यावर तो खनिज तेल रसायनांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागला. हल्ली घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा भिन्न ठिकाणी तो इंधन म्हणून आणि कित्येक रासायनिक पदार्थ बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरतात.तसेच बस, ट्रक, ट्रॅक्टर इ. वाहतुकीच्या साधनांतही त्याचा वापर होतो.
कोष्टक क्र. ३. कच्च्या तेलातील महत्त्वाचे अंश | ||||
अंश | कार्बन अणू | रेणुभार | ए. पी. आय.
गुरुत्व |
उत्कलनाचा पल्ला
०से. |
वायू | १–४ | १६–५८ | — | –१६१·७ ते –३५ |
गॅसोलीन | ५–१२ | ७२–१७० | ५८–६२ | –०·६ ते २०४ |
केरोसीन | १०–१६ | १५६–२२६ | ४०–४६ | १८० ते २७४ |
वायु–तेल | १५–२२ | २१२–२५४ | ३४–३८ | २६० ते ३७१ |
वंगण तेल | १९–३५ | २६८–४९२ | २४–३० | ३३८ ते ४६८ |
शेष भाग | ३६–९० | ४९२–१,२६२ | ८–१८ | ४६८ च्या वर |
कोष्टक क्र. ४. खनिज तेल उत्पादांचा भारतातील वापर
(आकडे हजार टनांत). |
|||
उत्पादन | १९६९ | १९७० | १९७१ |
मोटार गॅसोलीन | १,३३० | १,४११ | १,५०९ |
नॅप्था | ६६५ | ८३७ | १,१०४ |
केरोसीन | ३,०३६ | ३,२६२ | ३,४६१ |
उच्च वेगी डीझेल तेल | ३,४६५ | ३,७३५ | ४,१९६ |
हलके डीझेल तेल | १,०३० | १,०४७ | १,१६२ |
भट्टी तेल ( नेहमीचे ) | ३,२०० | ३,४१५ | ३,७२२ |
भट्टी तेल ( सर्व प्रतींचे ) | ४,४२८ | ४,६५१ | ४,९६१ |
बिट्युमेन | ६५८ | ७५१ | ९२० |
वंगणे | ५०२ | ५३५ | ५६६ |
विमान इंधन | ६७७ | ७५० | — |
द्रवीकृत खनिज तेल वायू | १२६ | १६६ | २०० |
इतर | ४१२ | ४४४ | *१,२५६ |
परिष्करण बाष्पित्र इंधन | ९९९ | ११४७ | १,१५२ |
एकूण | २०,५२८ | २२,१५१ | २४,२०९ |
*यामध्ये विमान इंधनाचा समावेश होतो.
(२) गॅसोलीन : कच्च्या तेलापासून निरनिराळ्या प्रक्रियांनी गॅसोलीन मिळवितात व त्यांना पुढीलप्रमाणे वेगवेगळी नावे देतात. (१) संद्रवण-केसिंग हेड गॅसोलीन, (२) शोषण- नैसर्गिक गॅसोलीन, (३) ऊर्ध्वपातन- सरळ मिळविलेले गॅसोलीन, (४) अल्किलीकरण- अल्किलेट, (५) बहुवारिकीकरण- बहुवारिकीकृत गॅसोलीन, (६) पुनर्घटन- पुनर्घटित गॅसोलीन, (७) औष्णिक भंजन- औष्णिक गॅसोलीन, (८) उत्प्रेरकी भंजन- उत्प्रेरक-भंजित गॅसोलीन व (९) जलभंजन- जलभंजित गॅसोलीन.बाजारात मिळणारे गॅसोलीन वरील भिन्न प्रकारांचे भिन्न प्रमाणातील मिश्रण असते. शिवाय गॅसोलिनामध्ये हवे असलेले गुणधर्म येण्यासाठी इतर काही पदार्थही त्यात मिसळलेले असतात. शेल तेल, डांबरी वाळू, गिल्सोनाइट यांच्यापासून आणि फिशरट्रॉप्स प्रक्रियांनी कोळशापासून गॅसोलीन मिळविता येते. मात्र त्यात अल्कोहॉले आणि ॲरोमॅटिके असतात. या पदार्थांपासून मिळविलेले गॅसोलीन कच्च्या तेलापासून मिळविलेल्या गॅसोलिनाच्या मानाने सध्या तरी नगण्य आहे. गॅसोलिनाचा मुख्य उपयोग मोटारी व विमाने यांच्यामध्ये इंधन म्हणून होतो. त्याचे अल्प प्रमाणात होणारे उपयोग म्हणजे सिगारेट लायटरमधील तेल, कपड्यांवरील डाग घालविण्याचे तेल, निर्जल धुलाईचे तेल, नॅप्था बनविण्यासाठी व रंगाचा विद्राव हे होत.
मोटारीत वापरण्यात येणारे गॅसोलीन २६·७० ते २२१० से.या तापमानाच्या पल्ल्यात उकळते. त्यात C5 ते C12 ही हायड्रोकार्बने असतात.उत्कलनाचा पल्ला, बाष्पनशीलता स्थैर्य, ऑक्टेन–अंक व अल्प प्रमाणात असणारे एकूण घटक यांच्यावर गॅसोलिनाचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अवलंबून असतात. अंतर्ज्वलन एंजिनामधील संपीडन गुणोत्तर जसजसे वाढत जाते, तसतशी उच्च ऑक्टेन-अंकाच्या गॅसोलिनाची आवश्यकता वाढत जाते. म्हणजेच एंजिनावर पडणाऱ्या अधिकाधिक भारानुसार गॅसोलिनाचा ऑक्टेन-अंक उच्च असावा लागतो.ऑक्टेन-अंक वाढविण्यासाठी गॅसोलिनामध्ये टेट्रा एथिल लेड (टी. ई. एल.) व टेट्रा मिथिल लेड (टी.एम.एल.) मिसळतात. ऑक्टेन-अंक वाढला असता गॅसोलिनाची प्रत्याघाती पात्रता वाढते. त्यामुळे एंजिनामध्ये त्याचे ज्वलन होत असताना हातोडीच्या प्रहारांचा जसा आवाज होतो तसा खडखडाट एंजिनात होत नाही [→ अंतर्ज्वलन एंजिन]. गॅसोलिनामध्ये अतृप्त (काही रासायनिक बंध मोकळे असलेल्या) हायड्रोकार्बनांचे ⇨ ऑक्सिडीभवन होऊन तयार होणारा बहुवारिकीकृत गोंद तसेच गंज निर्माण करणारे गंधक व पाणी हे पदार्थ नसावेत. गॅसोलिनामध्ये गंधकाची संयुगे असल्यास ज्वलन कोठीत सल्फर डाय-ऑक्साइड व सल्फा ट्राय-ऑक्साइड तयार होऊन त्यांपासून सल्फूरस व सल्फ्यूरिक अम्ले तयार होतात आणि एंजिनामध्ये बिघाड होतो. यामुळे गॅसोलिनामधील गंधकाचे प्रमाण ०·२५ टक्क्याहून अधिक होऊ देत नाहीत. दाहक विद्रावक वापरून गंधकाची संयुगे बाहेर काढतात. पायरोले, पिरिडिने व ॲनिलिने यांच्या स्वरूपात ०·०२ टक्क्यांपेक्षा कमी नायट्रोजन आणि अल्किल फिनॉले तसेच कार्बॉक्सिलिक अम्ले हे पदार्थ गॅसोलिनामध्ये असतात. ते देखील दाहक पदार्थ वापरून बाहेर काढतात. प्रज्वलनासाठी आवश्यक इतके कार्बनाचे बाष्प तयार होण्यासाठी गॅसोलिनामध्ये बाष्पनशीलता असावी लागते. बाष्पनशीलता वर्षातील निरनिराळ्या हवामानांच्या ऋतूंमध्ये वेगवेगळी असावी लागते. गॅसोलिनामध्ये ब्युटेन व पेंटेन मिसळून ती योग्य इतकी करण्यात येते. एंजिन अगदी उत्तम रीतीने चालावे म्हणून औष्णिक भंजन करून सुधारणा केलेले गॅसोलीन, उत्प्रेरकी भंजन करून मिळविलेले किंवा पुनर्घटन केलेले ॲरोमॅटिकयुक्त गॅसोलीन व सरळ मिळविलेले गॅसोलीन यांचे मिश्रण वापरतात. गॅसोलिनाचे ऑक्सिडीभवन होऊ नये म्हणून त्यात प्रतिऑक्सिडीकारक [→ ऑक्सिडीभवन] मिसळतात.
(३) वैमानिकी गॅसोलीन : सरळ मिळविलेल्या गॅसोलिनाचे विशिष्ट प्रकाराने वेगळे केलेले निवडक भाग व अल्किलेटे यांच्या मिश्रणापासून वैमानिकी गॅसोलीन तयार करतात. त्यात मुख्यत्वेकरून आयसोपॅराफीन अल्किलेटे आणि ॲरोमॅटिके असतात. टोल्यूइन व आयसोपेंटेन यांसारखी सापेक्षत: शुद्ध हायड्रोकार्बने त्यात मिसळतात. वैमानिकी गॅसोलीन २७० ते १७०० से. तापमानाच्या पल्ल्यात उकळते. विमानांच्या निरनिराळ्या प्रकारांनुसार या गॅसोलिनाचे प्रत्याघाती गुणधर्म ठरवून दिलेले असतात. त्यातील हायड्रोकार्बने ओलेफिनिक नसल्यामुळे ऑक्सिडीभवनास अपोआपच प्रतिरोध निर्माण होतो. या गॅसोलिनामध्ये दर गॅलनामये ४·६ मिलिलिटर इतके टेट्रा एथिल लेड असू शकते. त्यात गोंद तयार होऊ नये आणि ते जास्त वेळ साठवून ठेवता यावे म्हणून तसेच त्यातील टेट्रा एथिल लेडाचे ऑक्सिडीभवन होऊ नये म्हणून त्यात प्रतिऑक्सिडीकारक व गंजविरोधी द्रव मिसळलेले असतात. हे गॅसोलीन लाल, निळ्या, जांभळ्या व हिरव्या अशा विविध रंगांत मिळते. उच्च प्रतीचे गॅसोलीन प्रवासी व संरक्षण दलांच्या विमानांसाठी तर सापेक्षत: हलक्या प्रतीचे खाजगी व लहान विमानांसाठी वापरतात. मोठाल्या विमानांना उच्च ऑक्टेन-अंकाचे गॅसोलीन लागते. मात्र जेट एंजिनांच्या साहाय्याने विमाने उडू लागल्यापासून वैमानिकी गॅसोलिनाची विमानांकरिता असलेली मागणी कमी झाली आहे.
(४) केरोसीन : प्रकाश मिळविण्यासाठी दिव्यात, उष्णता मिळविण्यासाठी शेगड्यांमध्ये व स्टोव्हमध्ये घरगुती इंधन म्हणून केरोसीन वापरतात. केरोसिनाला दिव्याचे तेल, मिट्टीका तेल, रॉकेल, घासलेट या नावांनी देखील ओळखतात. ट्रॅक्टर, जेट एंजिन व रॉकेट यांच्यात इंधन म्हणून, तसेच तण जाळण्यासाठी आणि कीटकनाशकांत केरोसीन वापरतात. कच्च्या खनिज तेलापासून ऊर्ध्वपातनाने केरोसीन मिळवितात. १६६० ते २८८० से. या तापमानास केरोसीन उकळते. बाजारात मिळणाऱ्या केरोसिनाच्या उकळण्याचा पल्ला कमी असतो. त्याचे वि.गु. ०·८ असून सु -३१.५० से. तापमानापर्यंत केरोसीन द्रवरूप असते. केरोसीन C10 ते C14 या पल्ल्यातील पॅराफिनी व नॅप्थिनी हायड्रोकार्बनांचे बनलेले असते. ट्रॅक्टरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या केरोसिनाव्यतिरिक्त इतर केरोसिनांत ॲरोमॅटिक संयुगांचा अंश कमी असणे इष्ट असते. दिव्यांमध्ये वापरण्यासाठी पॅराफिनयुक्त केरोसीन अधिक योग्य असते. कारण त्यात ॲरोमॅटिक संयुगे व नॅप्थिने असल्यास ज्योत धुरकट होते.एखाद्या विशिष्ट केरोसिनाच्या दिव्यात धूर न होता निर्माण झालेल्या ज्योतीची मिमी.मध्ये मोजण्यात आलेली उंची म्हणजे धूम्रबिंदू, हा त्या केरोसिनाचा महत्त्वाचा गुणधर्म होय. मागणीनुसार केरोसिनाचा धूम्रबिंदू १५ ते ३५ पर्यंत असतो. ठिणगी आणि हवा यांच्या सान्निध्यात उत्पादाची वाफ ज्या तापमानास जळू लागते त्यास प्रज्वलन बिंदू म्हणतात. केरोसिनाचा प्रज्वलन बिंदू सु. २२·८० से. च्या खाली असतो. केरोसिनाचा वापर घरात होत असल्यामुळे स्फोट होऊ नये म्हणून सावधगिरीच्या दृष्टीने प्रज्वलन बिंदू उच्च असणे, सक्तीचे करण्यात आलेले आहे. दिव्याच्या वातीतून तेल व्यवस्थितपणे टोकापर्यंत पोहोचायचे असेल, तर त्याची श्यानता २ सेंटिपॉइजपेक्षा [→ श्यानता] कमी असावी लागते, तसेच बाष्पनशील नसलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी असावे लागते. हवेचे प्रदूषण होऊ नये म्हणून त्यातील गंधकाचे प्रमाण कमी असावे लागते. हलक्या दर्जाचे व अशुद्ध प्रकारचे केरोसीन तांबड्या रंगाचे असते.
(५) नॅप्थे : औद्योगिक नॅप्थे हायड्रोकार्बनांच्या जटिल मिश्रणाचे बनलेले असतात. नॅप्थे म्हणजे खनिज तेलापासून मिळणारे विद्रावक, तरलक व वाहक होत. त्यांची प्रतत्यांच्या विद्रावकतेवर (विरघळविण्याच्या क्षमतेवर) ठरवितात. कॉरी-ब्युटिनॉल अंकाने त्यांची विद्रावकता दर्शवितात. ज्या नॅप्थ्यांचा कॉरी-ब्युटिनॉल अंक ४५ किंवा त्यापेक्षा कमी असतो, ते ॲलिफॅटिक नॅप्थे होत. ॲलिफॅटिक, ॲरोमॅटिक, मध्यम व गंधहीन असे नॅप्थ्यांचे प्रकार आहेत.
कच्च्या तेलाच्या परिष्करणात ज्या भागातून गॅसोलीन, केरोसीन हे पदार्थ मिळवितात ते भाग म्हणजे नॅप्थे होत. खनिज तेल उद्योगधंद्यात यांनाच नॅप्थे असे म्हणतात. कच्च्या खनिज तेलाचे उत्प्रेरकी भंजन करून मिळविलेल्या ऊर्ध्वपातितांपासून व पुनर्घटित हायड्रोकार्बनांपासून विद्रावक-निष्कर्षणाने (एखाद्या विद्रावकात विरघळवून मिश्रणातील घटक वेगळे करण्याने) नॅप्थे मिळवितात.शेष उत्प्रेरकी पुनर्भूत हायड्रोकार्बनांचे विभाजन करून उच्च विद्रावकतेचे नॅप्थे मिळवितात. त्यांच्यात अल्किल नॅप्थॅलिनांचे प्रमाण उच्च असते. बेंझीन, टोल्यूइन आणि झायलीन या दर्जाचे नॅप्थे ॲरोमॅटिक असून त्यांचा कॉरी-ब्युटिनॉल अंक ९८ पेक्षा अधिक असतो. टोल्यूइन व झायलीन यांच्याशी तुल्य अशी विद्रावकता असणारी अल्किल नॅप्थॅलिनेसुद्धा ॲरोमॅटिक नॅप्थांच्या गटात मोडतात. मध्यम प्रकारचे नॅप्थे हे सरळ मिळविलेल्या नॅप्थ्यांचे इतर नॅप्थ्यांशी मिश्रण करून तयार करतात. त्यांचेही कॉरी–ब्युटिनॉल अंक ४५ ते ९८ यांमध्ये असतात. गंधहीन नॅप्थ्यांचा विद्रावकता हा गुणधर्म विचारात न घेता, गंधहीनता हाच गुणधर्म महत्त्वाचा समजला जातो. बहुतेक सर्व उच्च विद्रावकात असणारे म्हणजे ॲरोमॅटिक नॅप्थे एकेकाळी कोळशाच्या डांबरापासून मिळवीत असत. उत्प्रेरकी भंजन व उत्प्रेरकी पुनर्घटन या प्रक्रिया प्रचारात आल्यानंतर खनिज तेलापासून ॲरोमॅटिक नॅप्थे मिळविण्यात येऊ लागले. त्यांच्यापैकी मुख्य म्हणजे टोल्यूइन, झायलीन आणि बेंझीन होत. पैकी बेंझिनाच्या वाफा विषारी असल्यामुळे ते तितकेसे वापरत नाहीत. ॲलिफॅटिक विद्रावक (उदा., खनिज स्पिरिटे) कच्च्या तेलाचे ऊर्ध्वपातन करून मिळवितात. ते अत्यंबिंदू (पूर्णपणे ऊर्ध्वपातित होण्यासाठी लागणारे तापमान) सु. २०४० से. असणाऱ्या एका प्रवाहाच्या स्वरूपात अथवा हलक्या नॅप्थ्यांच्या (अंत्यबिंदू सु.१२१० से.) व जड नॅप्थ्यांच्या (अंत्यबिंदू सु. २०४० से.) भिन्न भागांत मिळतात. अशा रीतीने मिळविलेल्या नॅप्थ्यांचे इच्छित तापमानाच्या पल्ल्यात उकळणाऱ्या अंशांमध्ये ऊर्ध्वपातनाने पुन्हा विभाजन करतात [→ नॅप्था].
(६) जेट इंधने : ही इंधने गॅसोलीन व केरोसीन यांच्या मधल्या कक्षेत मिळतात. ती गॅसोलीन आणि केरोसीन यांच्या उत्कलनाच्या बिंदूंच्या मधल्या तापमानास उकळतात. जेट इंधने प्रवासी वाहतुकीच्या व्यापारी विमानांत व संरक्षक दलाच्या विमानांमध्ये वापरण्यात येतात. जेट इंधनांचा गोठणबिंदू –४०० ते –६०० से. इतका कमी असावा लागतो. जेट इंधनात पुढील गुणधर्म असावे लागतात : (अ) ते कुठल्याही वातावरणात आणि परिस्थितीत सहज प्रज्वलित करता यावे, ( आ) ते स्थिरपणे व नियमित जळावे, ( इ) न विझता किंवा स्फोट न होता जळावे, (ई) त्यापासून धूर, काजळी अथवा इतर पदार्थ निर्माण होऊ नयेत, (उ) त्याचा फवारा उत्तम प्रकारचा असावा, (ऊ) त्यात भरपूर उष्णता देण्याचा गुणधर्म असावा व (ए) त्याचा बाष्पदाब व गोठणबिंदू हे कमी असावेत. या सर्व गरजा पॅराफिनी केरोसीन अथवा ज्यांच्यातील ॲरोमॅटिक संयुगांचा एकूण अंश २५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, अशी केरोसीन आणि गॅसोलीन यांची मिश्रणे पुऱ्या करू शकतात. संरक्षक दलाच्या जेट विमानात केरोसीन आणि कमी ऑक्टेन-अंकाचा सरळ मिळविलेला नॅप्था यांचे ३० : ७० या प्रमाणाचे मिश्रण वापरतात (याला अमेरिकेत जेपी-४ म्हणतात). जेट इंधनाची प्रत रीड बाष्पदाबाने दर्शवितात. जेट इंधनाचा रीड बाष्पदाब १ ते १·५ किग्रॅ. इतका असतो. तुलनेसाठी सांगायचे झाल्यास केरोसिनाचा रीड बाष्पदाब ०·०५ किग्रॅ., शक्तिशाली केरोसिनाचा ०·२५ किग्रॅ. वैमानिकी स्पिरिटाचा २·७५ ते ३·५० किग्रॅ. व मोटार-स्पिरिटाचा ३ ते ६ किग्रॅ. असतो.
निवडक कच्च्या खनिज तेलाचे ऊर्ध्वपातनाने विभाजन होत असताना मिळणाऱ्या दोन प्रवाहांचे मिश्रण करून जेपी-४ तयार करतात. २८७·८० से. अंत्यबिंदू असणाऱ्या केरोसिनामध्ये शुद्ध नॅप्था मिसळवून जेपी-४ तयार करतात. रीड बाष्पदाब योग्य इतका करण्यासाठी या मिश्रणात काही प्रमाणात हलके गॅसोलीन व ब्युटेन मिसळतात. ही इंधने जेट एंजिनांना नुसती शक्तीच पुरवीत नाहीत, तर त्यांना थंडही करतात. उडत असणाऱ्या जेट विमानातील एंजिनामध्ये तापमान सु. २०४० से. इतके उच्च असू शकते. याचा अर्थ ही इंधने उच्च तापमनासदेखील स्थिर असावी लागतात. त्यांत तयार होणारा गोंद नाहीसा करण्यासाठी व त्यांचे ऑक्सिडीभवन होऊ म्हणून नये त्यांमध्ये ऑक्सिडीभवनरोधी पदार्थ मिसळतात.
(७) डीझेल इंधने : डीझेल एंजिनाच्या प्रकारानुसार निरनिराळ्या प्रतींची डीझेल इंधने तयार करण्यात येतात. डीझेल एंजिनांचे तीन प्रकार आहेत. (अ) कमी वेगाची एंजिने दर मिनिटाला ५०० आवर्तने पूर्ण करतात. ती जागच्या जागी स्थिर ठिकाणी चालणाऱ्या तसेच मोठ्या आकाराच्या सागरी यंत्रांमध्ये वापरतात. (आ) मध्यम वेगाची एंजिने दर मिनिटाला ५०० ते १,५०० आवर्तने पूर्ण करतात. अशी एंजिने ट्रॅक्टर, शक्तिशाली फावडी, रेल्वे एंजिने, सागरी वाहतुकीच्या साधनातील वीजनिर्मितीची यंत्रे, पंप व औद्योगिक संयंत्रात वापरतात. (इ) उच्च गतीची एंजिने दर मिनिटाला १,५०० पेक्षा अधिक आवर्तने पूर्ण करतात. ती मोटार–ट्रक, बसगाड्या यांत वापरतात. डीझेल इंधन वापरण्याचे तंत्र गॅसोलीन वापरण्याच्या तंत्रापेक्षा वेगळे असते. गॅसोलीन एंजिनामध्ये इंधनाची हवेबरोबर वाफ होते आणि हवेबरोबर तयार होणारे स्फोटक मिश्रण ज्वलन कोठीत जाते व तेथे विजेच्या ठिणगीने ते पेटविले जाते. डीझेल एंजिनात इंधन हवेमध्ये अंत:क्षेपित केले जाते व हवा आणि इंधन यांचे मिश्रण पेट घेण्याच्या बिंदूपर्यंत संपीडित केले (दाबले) जाते. संपीडनाने प्रज्वलन आपोआप होते, त्यासाठी विजेच्या ठिणगीची आवश्यकता नसते. मात्र डीझेल इंधनाच्या अंत:क्षेपित मिश्रणाने ज्वलन कोठीत पोहोचताच संपीडन होताच सहज पेटावे लागते. डीझेल इंधनामध्ये आवश्यक असणारे गुणधर्म अशा रीतीने गॅसोलीन इंधनांच्या अगदी विरुद्ध प्रकारचे असतात.
डीझेल इंधनाचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्याची प्रज्वलनशीलता म्हणजे अंत:क्षेपणाची वेळ व स्वयंप्रज्वलन या दोहोंमध्ये कुठलाही वेळ न लावता या इंधनाने अगदी झटकन पेट घेऊन सहज व सुलभतेने जळत राहणे. या इंधनाची प्रत दर्शविण्यासाठी सिटेन-अंक वापरतात. सिटेन म्हणजे एन–हेक्झाडिकेन (C16H34) होय. ते डीझेल एंजिनामध्ये चांगले उपयुक्त असते, पण गॅसोलीन एंजिनामध्ये अयोग्य असते. सिटेन–अंकाच्या प्रमाणामध्ये सिटेनाला १०० क्रमांक दिलेला असतो. आल्फा-मिथिल नॅप्थॅलीन (C10H7CH3) हे अगदी निकृष्ट दर्जाचे डीझेल इंधन असल्यामुळे त्याचा सिटेन-अंक शून्य असतो. कुठल्याही डीझेल इंधनाचा सिटेन–अंक म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या हायड्रोकार्बनांच्या मिश्रणातील सिटेनाची टक्केवारी होय.
कमी वेगाच्या एंजिनामध्ये २५ ते ४० सिटेन–अंकाचे, मध्यम वेगाच्या एंजिनात सु. ४५ सिटेन-अंकाचे व अतिशय वेगवान एंजिनात ५० ते ६० सिटेन-अंकाचे डीझेल इंधन लागते.जरूरीपेक्षा जास्त सिटेन-अंकाचे डीझेल वापरल्यास एंजिनाच्या कार्यक्षमतेमध्ये अधिक काहीच सुधारणा होत नाही. उलट अर्ध-डीझेल किंवा मिश्र-डीझेल एंजिनात ६० पेक्षा जास्त सिटेन–अंकाचे डीझेल वापरल्यास ते अनिष्ट व त्रासदायक ठरते.
उत्प्रेरकी भंजन करून मिळविलेल्या जड ऊर्ध्वपातितांपासून सामान्यत: डीझेल इंधने बनवितात. या ऊर्ध्वपातितांचा सिटेन-अंक कमी असतो, परंतु त्यांत ॲमिल नायट्रेटे व कार्बनी पेरॉक्साइडे यांच्या मिश्रणापासून तयार झालेली कार्बनी नायट्रेटे मिसळून तो वाढविता येतो. डीझेल इंधनांची कार्यक्षमता त्यांच्यात एथिल ईथर मिसळूनसुद्धा वाढविता येते. डीझेल इंधनांचा अर्धवट जळून धूर निर्माण होण्याचा अवगुण त्यांचा उत्कलनाचा पल्ला कमी करून नाहीसा करण्यात येतो. यासाठी त्यांमध्ये व्यापारी गॅसोलिनासारखे पदार्थ मिसळतात. डीझेल इंधने स्वत: स्थिर असूनदेखील इतर इंधनांबरोबर त्यांचे मिश्रण केलेले असल्यामुळे कधीकधी त्यांच्यात घन पदार्थांचे अवक्षेपण (साका खाली बसण्याची क्रिया) सुरू होते. अवक्षेपण होऊ नये म्हणून ऑक्सिडीभवनरोधी आणि संक्षारण होऊ नये म्हणून संक्षारणरोधी पदार्थ त्यांत मिसळतात. डीझेल इंधनाचे इतर महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे श्यानता, प्रवाहबिंदू व त्यातील गंधकाचे प्रमाण. श्यानता नसल्यास पंप गळण्याची शक्यता निर्माण होते. श्यानतेवर पंप चालविण्याची शक्ती अवलंबून असते. अंत:क्षेपणाच्या तोटीतून बाहेर पडणाऱ्या इंधनाच्या कणांचे अाकारमानही श्यानतेवर अवलंबून असते. कमी तापमानास इंधन द्रवरूप राखण्याच्या दृष्टीने प्रवाहबिंदू महत्त्वाचा असतो संक्षारक होऊ नये म्हणून इंधनात गंधक नसावे.
(८) वंगण तेले : उपयोगांनुसार यांचे एंजिन तेल, मशिन तेल, मोटार तेल, टरबाइन तेल, रंग तेल, संक्षारक तेल, चर्म तेल असे अनेक प्रकार आहेत. मात्र हे सर्व प्रकार मुख्यत्वेकरून पुढील तीन गटांत पडतात. (अ) थांबून थांबून, अधूनमधून चालणाऱ्या यंत्रांत वापरण्यात येणारी वंगण तेले, उदा., मोटारी व विमाने यांतील वंगणे. (आ) सतत एकसारख्या चालत राहणाऱ्या यंत्रांतील वंगणे, उदा., टरबाइनामधील वंगणे. (इ) वंगणी तेलांच्या भागांपासून मिळविलेली परंतु वंगणाव्यतिरिक्त इतर कामांसाठी उपयोग होत असणारी, उदा., उष्णता किंवा विद्युत् रोधक पदार्थ व जलीय तेले (ज्यांच्या दाबाचा विविध उपकरणांमध्ये उपयोग करण्यात येतो अशी सामान्यत: कमी श्यानता असलेली तेले) बनविण्यासाठी वापरण्यात येणारी वंगण तेले व औषधी तेले. पहिल्या प्रकारच्या तेलाच्या श्यानतेमध्ये तापमान बदललेले असताना थोडासुद्धा फेरफार होऊन चालत नाही. यंत्र चालवून या तेलाचा साचलेला गाळ व त्यात पडलेले इतर पदार्थ बाहेर काढण्यासाठी तेल वरचेवर बदलतात. त्यामुळे सतत चालत असणाऱ्या यंत्रातील वंगण तेलामध्ये लागणारे स्थैर्य पहिल्या प्रकारच्या वंगण तेलामध्ये आवश्यक नसते. सतत चालणाऱ्या यंत्रातील वंगण तेलामध्ये मोठे स्थैर्य असावे लागते, मात्र त्याचा श्यानता गुणांक कमी असला तरी चालतो. कारण अशी यंत्रे सामान्यत: स्थिर अशा नियंत्रित तापमानास चालत असतात. हीच परिस्थिती तिसऱ्या प्रकारच्या वंगण तेलांच्या बाबतीत असते.
ज्यामध्ये उच्च श्यानता गुणांकाच्या वंगण तेलाचे अंश असतात, अशा पॅराफिनी व मिश्र प्रकारच्या कच्च्या तेलापासून पहिल्या प्रकारची वंगण तेले मिळवितात. उच्च दर्जाचे स्थैर्य असणारे अंश ज्यामध्ये असतात, अशा अस्फाल्टी खनिज तेलापासून इतर दोन प्रकारची वंगण तेले मिळवितात. कच्च्या तेलाचे निर्वात परिस्थितीत ऊर्ध्वपातन करून वंगण तेले मिळवितात. निर्वात परिस्थितीत ऊर्ध्वपातन केल्यास तेलांची श्यानता कमी न होता व त्यांत इतर अनावश्यक गुणधर्म न येता तेलांचे भंजन होते. इच्छित ऊर्ध्वपातिते आणि शेष अंश मिळाल्यावर ऊर्ध्वपातनाची क्रिया थांबवितात. अशा रीतीने वंगण तेलाच्या भागाचे ऊर्ध्वपातित वंगण व शेष वंगणे असे दोन भाग करता येतात.या दोन भागांपैकी प्रत्येकापासून स्वतंत्रपणे किंवा एकमेकांत मिसळून अनेक पदार्थ तयार करतात. कधीकधी ऊर्ध्वपातित आणि शेष वंगण भाग बाजारात विक्रीसाठी तसेच आणतात. त्यांना उदासीन तेले व ज्वलन कोठी तेले म्हणतात. कच्च्या तेलाच्या ज्या भागातून वंगण तेले मिळतात तो भाग अस्फाल्ट, मेण व तेल यांचे जटिल मिश्रण असते. मात्र या पदार्थाचा निरनिराळ्या खनिज तेलांतील अंश भिन्न असतो. पॅराफिनी तेलामध्ये अस्फाल्ट जवळजवळ नसते, तर अस्फाल्टी तेलामध्ये मेण जवळजवळ नसते. यामुळे ज्या प्रकारचा माल पाहिजे असेल त्यानुसार ठराविक प्रकारच्या खनिज तेलाचे परिष्करण करणे उचित असते [→ वंगणे].
(९) ग्रिजे आणि संयुक्त तेले : संयुक्त तेले ही खनिज तेले आणि प्राणी व वनस्पती यांच्यापासून मिळविलेली चरबी यांची मिश्रणे होत. कधीकधी त्यांना द्रवरूप वंगणे असेही म्हणतात.वंगणातील जैव चरबींच्या प्रमाणावर संयुक्त तेले व वंगण तेले यांतील फरक अवलंबून असतो. पूर्वी ग्रिजे म्हणजे साबणांचे वंगण तेलातील विद्राव अशी त्यांची व्याख्या करीत. ती घनरूप किंवा अर्धघनरूप असतात.ज्या ठिकाणी द्रवरूप वंगणे वापरणे इष्ट नसते तेथे ग्रिजे वापरतात. हल्लीच्या ग्रिजांमध्ये साबणाऐवजी, ग्रॅफाइट, ॲस्बेस्टस, रेझीन व कृत्रिम रीतीने तयार केलेले इतर पदार्थ असतात.म्हणून वंगण तेलांचे वंगणी गुणधर्म कमी होऊ न देता त्यांची श्यानता वाढविणाऱ्या पदार्थांची वंगण तेलातील मिश्रणे म्हणजे ग्रिजे होत.
ग्रिजांमधील मुख्य घटक म्हणजे वंगण तेले व त्यांना घनरूप करणारे पदार्थ हे होत. ग्रिजांमध्ये कधीकधी भरीचे पदार्थ आणि भेसळ पदार्थ पण असतात. खनिज तेलापासून मिळविलेल्या मूळ भागामध्ये निरनिराळे पदार्थ मिसळून ग्रीज बनविण्याच्या किटलीमध्ये ग्रीज तयार करतात. या पदार्थांच्या प्रतींवर तसेच त्यांना एकत्र मिसळविण्याच्या प्रकारांवर म्हणजेच दाब, तापमान, वेळ व वेग यांच्यावर ग्रिजांचे गुणधर्म अवलंबून असतात. ग्रीज तयार करण्याच्या किटल्या हवेत उघड्या ठेवून प्रक्रिया केली तरी चालते. परंतु सामान्यत: दाब सहन करणाऱ्या मोठ्या बंद भांड्यांतच ते तयार करतात [→ वंगणे].
(१०) मेण : खनिज तेलापासून मिळणारे मेण पॅराफिनी आणि सूक्ष्मस्फटिकी अशा दोन प्रकारांचे असते. पॅराफिनी मेणाची स्फटिकी संरचना स्पष्ट असून त्याचे स्फटिक ढोबळ आकारमानाचे असतात, तर सूक्ष्मस्फटिकी मेणाचे स्फटिक मोठ्या शक्तीच्या सूक्ष्मदर्शकानेच दिसू शकतात. पॅराफिनी मेण खनिज वंगण तेलाच्या नीच तापमानास उकळणाऱ्या अंशापासून, तर सूक्ष्मस्फटिकी मेण त्याच्या उच्च तापमानास उकळणाऱ्या अंशापासून मिळवितात.पॅराफिनी मेणाचे उत्कलन बिंदू ४०·५० ते ६५·५० से. व सूक्ष्मस्फटिकी मेणाचे ६५·५० ते ९०·५० से. असे असतात. निरनिराळ्या मेणांतील हायड्रोकार्बनांच्या रासायनिक संरचना भिन्न असल्यामुळे कुठल्याही एका मेणाच्या वितळबिंदूचा व त्याच्या उत्कलन बिंदूचा संबंध सरळ स्वरूपाचा नसतो. मात्र सूक्ष्मस्फटिकी मेणांचे वितळबिंदू पॅराफिनी मेणांच्या वितळबिंदूंपेक्षा उच्च असतात. वंगण तेलाचे अगदी खालच्या तापमानास उकळणारे अंश हे त्या तापमानास द्रवरूप असतात. त्यामुळे त्यामध्ये कुठलेही विद्रावक न वापरता केवळ तो भाग अधिक थंड करून त्यात घट्ट झालेले पॅराफिनी मेण गाळून बाहेर काढता येते. मात्र उच्च तापमानास उकळणारे भाग विद्रावक वापरून विरळ करावे लागतात.
मेण बाहेर काढण्यासाठी विद्रावक म्हणून नॅप्थे वापरतात. पॅराफिनी मेण कमी तापमानास उकळणाऱ्या खनिज तेलाच्या भागातून गाळून बाहेर काढता येते, तर सूक्ष्मस्फटिकी मेण केंद्रोत्सारण (एखाद्या अक्षाभोवती मिश्रण फिरते ठेवून त्यातील घटक द्रव्ये अलग करण्यासाठी केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेचा उपयोग करणारी क्रिया) करून मिळवितात. नॅप्थे विद्रावक म्हणून वापरल्यास पॅराफिनी व सूक्ष्मस्फटिकी मेणांच्या मधल्या अवस्थेतील मेणे जाळून किंवा केंद्रोत्सारणाने बाजूला काढता येत नाहीत, अशा प्रसंगी ऊर्ध्वपातनाने विभाजन करूनच वेगवेगळ्या प्रकारची मेणे मिळवावी लागतात. मेण बाहेर काढण्यासाठी हल्ली मिथिल-एथिल कीटोन व टोल्यूइन यांची मिश्रणे किंवा प्रोपेन हे विद्रावक वापरतात. त्यांचे प्रवाहबिंदू व विद्राव थंड करण्याचे तापमान यांच्यामध्ये अगदी कमी फरक असतो. त्यामुळे नॅप्थ्यांच्या विद्रावातून मेण मिळविण्यापेक्षा या पदार्थांच्या विद्रावांतून ते थंड केले असता मेण अगदी सहज व अधिक सुलभतेने गाळून बाजूला करता येते. मेणबत्त्या, कागदी वेष्टणे, खडू, शाई, दारूगोळा इत्यादींसाठी मेण वापरतात. मऊ अर्धघन खनिज तेल मेण (पेट्रोलियम जेली) औषधी मलम तयार करण्यासाठी वापरतात [→ मेण].
(११) उष्णता मिळविण्यासाठी वापरण्यात येणारी तेले व शेष इंधन तेले : इंधन तेले ही निरनिराळ्या प्रतींची ऊर्ध्वपातिते व खनिज तेलातील अवशिष्ट भाग यांची बनलेली असतात. औद्योगिक भट्ट्यांतील तेले व घरगुती शेगड्यांतील तेले म्हणून ऊर्ध्वपातिते वापरण्यात येतात. भंजन करण्याच्या संयंत्रातील आवर्तनी वायु-तेलावर योग्य अशा क्रिया करून (उदा., मृत्तिकांतून गाळून किंवा जलपरिष्करण करून) इंधन तेले मिळवितात. गाळाचे विसरण (रेणूंच्या गतीमुळे एकमेकांत आपोआप मिसळण्याची क्रिया) करणारे पदार्थ त्यात मिसळतात. तसेच त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यात ट्राय क्रेसिल फॉस्फेट घालतात.
हलकी औद्योगिक तेले म्हणून वापरण्यात येणारी ऊर्ध्वपातित इंधने ही भट्ट्यांच्या तेलांसारखीच असतात. मात्र त्यांचे उत्कलनाचे पल्ले मोठे असतात.ती मूळच्या किंवा भंजित अशा हलक्या व जड वायुतेलांची मिश्रणे असतात. औष्णिक भंजन करून मिळविलेली ऊर्ध्वपातिते स्थिर करण्यासाठी दाहक सोडा व दाहक पोटॅश यांच्या संहत विद्रावाने धुऊन काढतात. ऊर्ध्वपातित इंधनांना प्रज्वलन करण्यापूर्वी तापवावे लागत नाही. या इंधनांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्यात स्थैर्य आणणारे, विसरण करणारे, संक्षारणरोधी, प्रज्वलन सुधारणारे वगैरे पदार्थ मिसळतात.
शेष इंधन तेले मुख्यत्वेकरून परिष्करणातील उप-उत्पाद होत. कच्च्या तेलाचे ऊर्ध्वपातन, उत्प्रेरकी भंजन, औष्णिक भंजन व कोक तयार करणे या क्रिया करणाऱ्या संयंत्रातील शेष भागांतून शेष इंधन तेले मिळतात. ज्या खनिज तेलांपासून ती मिळविली जातात त्यांच्या पेक्षा स्वस्त दराने ती विकली जातात. सामान्य शेष इंधन तेले म्हणजे कच्च्या तेलापासून नेहमीच्या परिष्करणात मिळणाऱ्या सर्वांत जड अंशांची मिश्रणे होत. सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रांनी त्यांच्यापासून उच्च प्रतीचे पदार्थ मिळविता येत नाहीत. त्यांच्यामध्ये गाळ व पाणी ही असतात.त्यांना तरंगत ठेवून खालच्या भागातील तेल भट्ट्यांमध्ये पाठवितात. त्यांतील गंधकामुळे तसेच त्यांच्या राखेत व्हॅनॅडियम व सोडियम असल्यास त्यांमुळेही संक्षारण होते. संक्षारणामुळे सु. ५३८० से.च्या पेक्षाही अधिक तापमानास चालणाऱ्या बाष्पित्राच्या (बॉयलराच्या) अतितप्त भागात बिघाड निर्माण होतो. प्रवासी वाहनांत व वायू टरबाइनांमध्ये वापरण्यात येणारी तेले निवडक कच्च्या तेलापासून मिळवितात. त्यांच्यात होणारे संक्षारक मॅग्नेशियमयुक्त पदार्थ मिसळून थांबविण्यात येते. त्यांच्या राखेपासून भट्ट्यांच्या भिंतींना अपाय होत असेल, तर त्यांचे वितळबिंदू उच्च करण्यासाठी त्यांत योग्य असे इतर पदार्थ मिसळतात. शेष इंधन तेलांचा उपयोग जागच्या जागी काम करणाऱ्या वाहनांतील बाष्पित्रांमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी आणि औद्योगिक भट्ट्यांत होतो. जहाजांमध्ये शक्तिनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या एंजिनांत कमी श्यानतेची शेष इंधन तेले वापरतात. काही इंधन तेले कमी रेल्वे एंजिनांत वापरतात. तसेच वीजनिर्मितीसाठी व जहाजे आणि आगगाड्या चालविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायू टरबाइनांमध्येही ती वापरतात.
(१२) खनिज तेल कोक : खनिज तेलाच्या औष्णिक भंजनाच्या काही प्रक्रियांत कोक हा उप-उत्पाद म्हणून मिळतो. तो उच्च प्रतीचा कार्बन म्हणून मौल्यवान असतो. त्याचा रंग फिकट काळा असून तो काहीसा तंतुमय व घन असतो. तो जाळला असता त्यापासून अगदी थोडी राख पडते. जेव्हा खनिज तेलाचे भंजन होते, तेव्हा गॅसोलिनाबरोबर उच्च तापमानास उकळणारी हायड्रोकार्बने तयार होतात. अवशिष्ट प्रक्रियांत उच्च तापमानास उकळणारी हायड्रोकार्बने द्रवरूपात बाजूला काढण्यात येतात आणि बिन-अवशिष्ट प्रक्रियांत संपूर्ण द्रवरूप भागाचे गॅसोलीन व कोक होईपर्यत भंजन क्रिया चालू ठेवण्यात येते.
उत्प्रेरकी भंजनात कोक उत्प्रेरकावर गोळा होतो व त्याच्यापासून तो संपूर्ण जाळण्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही उपायाने बाजूला करता येत नाही.म्हणून सावकाश कोक तयार होण्याच्या प्रक्रियेने खनिज तेलापासून मिळविलेले जड अवशिष्ट भागच उत्प्रेरकी भंजन करणाऱ्या संयंत्रात मूळ कच्चा भाग म्हणून वापरतात. सापेक्षत: अधिक जड ऊर्ध्वपातिते मिळविण्यासाठी अवशिष्ट भागांचे औष्णिक भंजन करतात. ह्या अधिक जड ऊर्ध्वपातितांचे जादा कोक न तयार करता उत्प्रेरकी भंजन करता येते व इतर मौल्यवान पदार्थ मिळविता येतात. या प्रक्रिया म्हणजे खनिज तेलापासून कोक मिळविण्याचा आणखी एक मार्ग होय.
गंधकाचा अंश कमी असलेला खनिज तेल कोक ॲल्युमिनियम, पोलाद आणि इतर उद्योगधंद्यात फार आवश्यक असतो. अशा कोकपासून कार्बनाची विद्युत् अग्रे बनवितात.कॅल्शियम कार्बाइड, अपघर्षक (खरवडून व घासून पदार्थाचा पृष्ठभाग गुळगुळीत करणारे पदार्थ) आणि कृत्रिम ग्रॅफाइट बनविण्यासाठी तो वापरतात. काही प्रमाणात घरगुती इंधन म्हणूनही त्याचा उपयोग होतो. खनिज तेल कोकपासून बनविलेले खनिज तेल ग्रॅफाइट अणुभट्ट्यांमध्ये मंदायक (न्यूट्रॉनांची गती मंद करण्यासाठी) म्हणून वापरतात.
खनिज तेल रसायने : कच्च्या तेलापासून व नैसर्गिक वायूपासून मिळणाऱ्या वर वर्णन केलेल्या उत्पादांपेक्षा निश्चित स्वरूपात भिन्न असलेल्या रसायनांच्या उत्पादनास १९१८ साली सुरुवात झाली. त्यावेळी कच्च्या तेलातील अंशांचे औष्णिक भंजन करून प्रोपिलिनापासून आयसोप्रोपिल अल्कोहॉल मिळविण्यात आले. पुढे लवकरच एथिल व ब्युटिल अल्कोहॉले आणि एथिलीन ऑक्साइड तयार करण्यात येऊ लागले. सुरुवातीला खनिज तेलाचे परिष्करण करताना त्यातील रासायनिक भाग वेगळे करत असताना योगायोगाने रसायने मिळाली. मात्र पुढे काही ठराविक रसायने कृत्रिम रीतीने बनविण्यासाठी खनिज तेलाच्या भागांचे उपयोग ठराविक रासायनिक भाग तयार करण्यासाठी मुद्दाम होऊ लागले.
पूर्वी परिष्करण कारखान्यांनी केरोसिनाच्या उत्पादनाने पुष्कळ पैसा मिळविला. पुढे गॅसोलिनाने त्याची जागा घेतली. गॅसोलिनाची किंमत कमी ठेवूनही अगदी मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन करून उत्पादकांना समाधानकारक नफा होत राहिला. नफा कमी पडू लागल्यावर वंगणांचे उत्पादन सुरू झाले.वंगणे बनविण्याचा खर्च आणि त्यांची विक्रिची किंमत यांत गॅसोलिनाच्या मानाने बराच नफा असल्यामुळे सापेक्षत: कमी प्रमाणात वंगणे तयार करूनही पैसा वसूल होऊ लागला. परंतु पुढे ती परिस्थितीही राहिली नाही. हल्ली खनिज तेल रसायने तयार करून नफा मिळविण्याची तेल कंपन्यांना मोठी संधी प्राप्त झाली आहे. बहुतेक प्रत्येक परिष्करण कारखाना त्यातील परिष्करणाच्या प्रकारानुसार व भौगोलिक ठिकाणानुसार निवडक खनिज तेल रसायने तयार करतो. यामुळे खनिज तेलाचे परिष्करण हे रसायने तयार करण्याच्या कारखान्यांच्या अगदी जवळचे आणि संबंधित असे काम होऊन बसले आहे. तसेच प्रक्रियांची निवड व तयार होणारे उत्पाद यांबाबतीत परिष्करण क्रिया अधिक विविध प्रकारच्या झाल्या आहेत. परिष्करण कारखाने व रसायने तयार करणारे कारखाने स्वतंत्रपणे किंवा एकत्र होऊन नैसर्गिक वायू, कच्चे तेल व परिष्ककरणात मिळालेले टाकाऊ भाग यांच्यापासून उपयुक्त अशी अनेक रसायने बनविण्यात गुंतले आहेत. कच्च्या तेलात कार्बन, हायड्रोजन व इतर मूलद्रव्ये असल्यामुळे त्यापासून सैद्धांतिक दृष्ट्या अनेक कार्बनी आणि काही अकार्बनी पदार्थ तयार करता येतात. खनिज तेलातील निरनिराळे घटक वापरंणाऱ्या प्रकिया जसजशा वाढत चालल्या तसतसे खनिज तेल रसायनांचे क्षेत्र विस्तृत होऊ लागले. हल्ली या क्षेत्राने कार्बनी रसायनशास्त्राचे जवळजवळ संपूर्ण क्षेत्र व्यापिले असून अकार्बनी रसायनशास्त्रातील नव्या वाटांचा शोध लावला आहे. व्यापारी खनिज तेल रसायने ही मुख्यत्वेकरून ॲरोमॅटिक व ॲलिफॅटिक कार्बनी संयुगे असतात. काजळी, अमोनिया आणि गंधक यांसारखे काही थोडेच अकार्बनी पदार्थ खनिज तेल रसायने म्हणून मिळवितात [→ खनिज तेल रसायने].
खनिज तेल, जागतिक : खनिज तेलाचे लहानमोठे साठे सर्व जगभर पसरलेले आहेत. परंतु त्याचे प्रचंड साठे सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, इराक, इराण, लिबिया, अल्जीरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा व्हेनेझुएला व इंडोनेशिया या देशांत प्रामुख्याने आहेत. यांपैकी बहुतेक सर्व देशांत खनिज तेलाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या १९७० च्या अहवालानुसार १९६९ साली खनिज तेलाचे जागतिक उत्पादन दोन अब्ज सात कोटी बावीस लाख टन झाले. १९६१–६५ या काळात दरवर्षी सरासरी १३१ कोटी ३१ लाख टन, १९६६ मध्ये १६४ कोटी १६ लाख, १९६७ मध्ये १७६ कोटी १० लाख, १९६८ मध्ये १९२ कोटी ३७ लाख, तर १९६९ साली २०७ कोटी २२ लाख टन उत्पादन झाले. १९६० नंतर तेलाचे साठे शोधून काढण्याच्या कामाला विशेष चालना मिळाली.सध्या वाळवंटे, दलदलीचे प्रदेश, बर्फाच्छादित प्रदेश व उथळ पाण्याखालचे आणि समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश अशा सापेक्षत: दुर्गम प्रदेशांतही खनिज तेलाचा शोध चालू आहे. १९६९ साली ज्ञात असलेला खनिज तेलाचा जगातील निश्चित साठा ७३ अब्ज टन इतका होता. दोन अब्जांहून थोडे अधिक टन खनिज तेल वापरले गेले. अशा रीतीने त्याच्या उत्पादनात व वापरात दरवर्षी वाढ होत आहे. या गोष्टींचा विचार करता हे ज्ञात साठे व शोधून मिळणारे नवीन साठे सु. ४० ते ५० वर्षांत संपुष्टात येतील, असा अंदाज करण्यात येतो. त्यामुळे नंतर तेल–शेल (ज्यांच्यापासून ऊर्ध्वपातनाने तेल मिळवता येते असे एक प्रकारचे गाळाचे खडक), दगडी कोळसा यांसारख्या पदार्थांपासून खनिज तेल मिळवावे लागेल. १९६३ साली अमेरिकेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला की, सु. ५० वर्षानंतर तेल–शेल खडकांचे ऊर्ध्वपातन करणे जरी महाग असले, तरीही ते करून खनिज तेलाचे उत्पादन करावे लागेल. अमेरिकेत या खडकांचे साठे सु. ७० अब्ज टन इतके आहेत. कॅनडामध्ये ॲथाबास्का येथे डांबरी वाळूचे साठे याहून अनेक पटींनी अधिक आहेत. सध्या बाजारात मिळणाऱ्या गॅसोलिनाच्या दराशी स्पर्धा करू शकणाऱ्या दरात दगडी कोळशापासून गॅसोलीन मिळविण्यासाठी प्रायोगिक व कमी क्षमतेचे कारखाने सुरू करण्याचे प्रयत्न अमेरिकेत काही ठिकाणी चालले आहेत.जगातील निरनिराळ्या देशांतील खनिज तेलाचे साठे व उत्पादन यांची माहिती कोष्टक क्र.५ मध्ये दिली आहे.
देश |
साठा (कोटी टन) |
१९६९ सालचे उत्पादन (कोटी टन) |
अमेरिका |
४०० |
४५·५६ |
रशिया |
७९९ |
३२·८३ |
व्हेनेझुएला |
२२९ |
१८·८० |
इराण |
७४३ |
१६·६० |
लिबिया |
४०५ |
१४·९७ |
सौदी अरेबिया |
१,८६४ |
१४.८८ |
कुवेत |
९८१ |
१२·९५ |
इराक |
३८१ |
७·४५ |
कॅनडा |
११७ |
५·४१ |
अल्जीरिया |
१०४ |
४·३८ |
इंडोनेशिया |
२४३ |
३·६६ |
ओमान |
२०० |
२·८८ |
नायजेरिया |
६८ |
२·७० |
मेक्सिको |
८० |
२·१४ |
चीन |
– |
२·०० |
अर्जेंटिना |
२२ |
१·८१ |
कॉटार |
५१ |
१·७३ |
रूमानिया |
१२ |
१·३२ |
संयुक्त अरब राष्ट्रे |
४३ |
१·३० |
कोलंबिया |
२२ |
१·७० |
अमेरिका : या देशात खनिज तेलाचे सर्वांत जास्त उत्पादन होत आहे. अमेरिकेतील एकूण तेलाच्या साठ्यांपैकी सु. अर्धे साठे टेक्ससमध्ये आहेत आणि बाकीचे मुख्यत्वेकरून कॅलिफोर्निया, लुइझियाना, ओक्लाहोमा, वायोमींग, कॅनझस, न्यू मेक्सिको व इलिनॉय या राज्यांत आहेत. आर्कॅन्सॉ, मिसिसिपी, मिशिगन, कोलोरॅडो व पेनसिल्व्हेनिया या राज्यांत कमी प्रमाणात तेल मिळते. खनिज तेलाची मागणी व परिष्करणक्षमता दरवर्षी ४५ कोटी टनांहून अधिक आहे. मात्र खनिज तेलाच्या उत्पादांची मागणी यापेक्षाही अधिक असल्यामुळे खनिज तेलाची आयात करणे भाग पडते. खनिज तेल रसायनांच्या क्षेत्रात हा देश सर्व जगात अग्रेसर आहे. तसेच प्लॅस्टिक, रेझीन, संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेले) तंतू, संश्लेषित रबर इ. क्षेत्रांत येथे इतकी प्रगती झाली आहे की, यूरोपातील इतर प्रगत देशही याबाबतीत अमेरिकेवर अवलंबून आहेत. इंधनाच्या एकूण मागणीपैकी ७०% मागणी खनिज तेलाचे उत्पाद व नैसर्गिक वायू यांनी पुरविली जाते. खनिज तेल किंवा त्याचे गॅसोलिनासारखे उत्पाद यांची दरडोई मागणी व उपयोग या देशात सर्वांत जास्त आहे. गॅसोलिनाची मागणी खनिज तेलाच्या उत्पादांच्या एकूण मागणीच्या सु. ४५ टक्के आहे. खनिज तेलाच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील तेलाचे साठे कमी झाले. परंतु नैसर्गिक वायूचे नवीन साठे सापडल्यामुळे त्यांच्या साठ्यांत थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे.
रशिया : खनिज तेलाच्या उत्पादनाच्या बाबतीत रशियाचा अमेरिकेच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. खनिज तेलाचे रशियातील साठे अमेरिकेपेक्षा अधिक पण सौदी अरेबिया व कुवेत यांच्यापेक्षा कमी आहेत. रशियात नैसर्गिक वायूचे साठेही प्रचंड आहेत.रशियामध्ये तेलाचे उत्पादन करणारी पुढील पाच प्रमुख क्षेत्रे आहेत, त्यांपैकी पहिली चार कॉकेशियन पट्ट्यात आहेत. (१) बाकू प्रदेश हा पूर्व कॉकेशसमधील ॲप्शेरन द्वीपकल्पात आहे, (२) ग्राँत्सी प्रदेश, (३) माइकॉप– क्युबान प्रदेश– हा काळ्या समुद्राजवळ उत्तर कॉकेशसमध्ये आहे, (४) डागेस्तान व (५) उरल-व्होल्गा (दुसरा बाकू). रशियातील गाळाच्या खडकांच्या बऱ्याच भागांचे पूर्वेक्षण अद्याप व्हायचे आहे. त्यामुळे हा देश खनिज तेलाच्या उत्पादनात अग्रेसर बनेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. येथे इंधनाच्या मागणीपैकी सु. ५० टक्के भाग खनिज तेलाचा आहे. पूर्वी कार्बनी रसायन उद्योग व खतनिर्मिती उद्योग मुख्यत्वेकरून कोळशावर आधारित होते. हल्ली हे उद्योग खनिज तेलावर अवलंबून आहेत. निरनिराळ्या कार्बनी रसायनांचे व इतर खनिज तेल रसायनांचे उत्पादन सध्या खनिज तेलापासून करण्यात येत आहे.
व्हेनेझुएला, कोलंबिया व त्रिनिदाद : माराकायव्हो सरोवराच्या पूर्व किनाऱ्याच्या खाली व आजूबाजूला असणाऱ्या ५० किमी. लांबीच्या पट्ट्यातून व्हेनेझुएलातील खनिज तेलाचे बहुतेक सर्व उत्पादन हाते.१९६९ च्या उत्पादनाच्या आकडेवारीनुसार या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागला. या देशाच्या जवळच असणाऱ्या कोलंबिया व त्रिनिदाद या देशांतही खनिज तेलाचे साठे असून तेथे उत्पादन चालू आहे. त्रिनिदादमधील प्रसिद्ध पिच लेकमधून अस्फाल्ट मिळते. येथील पालोसेको व ब्रिंग्टन यांमधील भागात असणाऱ्या संमुखनती (खालच्या बाजूला अंतर्गोल असलेली घडी) व विमुखनती संरचनांतील साठ्यातून तेलाचे उत्पादन होते. त्रिनिदाद व टोबॅगो मिळून १९६९ साली ८१ लाख टन उत्पादन झाले. कोलंबियातील खनिज तेल मुख्यत्वेकरून वरच्या बाजूस असणाऱ्या मॅग्डालीना खोऱ्यातून मिळविण्यात येते. या देशांतील १९६९ मधील उत्पादन २१ कोटी ३१ लाख टन इतके झाले.
मध्यपूर्व : या भागातील इराण, सौदी अरेबिया, कुवेत, इराक व ओमान आणि संयुक्त अरब राष्ट्रे या देशांत खनिज तेल भरपूर प्रमाणात सापडते. जगातील खनिज तेलाचे सर्वांत अधिक साठे सौदी अरेबियात आहेत. वरील सर्व देश मिळून होणारा मध्यपूर्व हा भाग खनिज तेलाच्या साठ्यांच्या दृष्टीने संपूर्ण जगात अत्यंत महत्त्वाचा आहे.
इराक व इराण : येथील मुख्य तेलक्षेत्रे (१) हाफ्ट केल, (२) मस्जि-द-ए-सुलेमानजवळ, (३) आघाजारी, (४) गख सारान, (५) नफ्त साफिद व (६) लाली (ही सर्व पर्शियन आखाताच्या ईशान्येस आहेत) आणि (७) नफ्त-इ-शाह(बगदादच्या उत्तरेस सु. १३० किमी. अंतरावर) ही आहेत. या देशांच्या सीमांजवळ इराकमध्ये (८) नफ्त खाने व त्याच्या पलीकडे (९) किर्कूक व (१०) क्कैयाराह ही तेलक्षेत्रे आहेत. दक्षिण इराणमधील खनिज तेल पर्शियाच्या आखाताकडे व इराक-इराणचे तेल भूमध्य समुद्राकडे नळातून वाहून नेण्यात येते. अरेबियन तेल ट्रान्स-अरेबियन नळातून हैफा येथे पोहोचविण्यात येते.
सौदी अरेबिया : (१) पर्शियन आखातापासून सु. १४० किमी. अंतरावर असणारे दम्मम क्षेत्र, (२) ॲबकाइक, (३) कातीफ, (४) अबू हैदिरा व (५) बुक्का या ठिकाणच्या क्षेत्रांत तेल सापडते. दम्मम येथील तेल लवणी घुमटाजवळ मिळते. इतर सर्व ठिकाणी विमुखनती संरचना आहेत. ॲबकाइक येथील संरचना सु. ५० किमी. लांबीची असून ते जगातील मोठ्या तेलक्षेत्रांपैकी एक आहे. बहरीन बेटावरील एका मोठ्या विमुखनतीमध्ये असणाऱ्या क्रिटेशस कालीन (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) शेल-वालुकाश्म-चुनखडकांपैकी एका सच्छिद्र खडकातून सु. ६३३ मी. व ८३३ मी. इतक्या खोलीवर खनिज तेल मिळते.
कुवेत : मध्य क्रिटेशस कालीन (सु. १२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) विमुखनतीतील वाळूच्या तीन थरांत १,२२३ मी. व १,५८३ मी. इतक्या खोलीवर खनिज तेल मिळते. या देशातील साठा हा जगातील मोठ्या साठ्यांपैकी एक आहे.
संयुक्त अरब राष्ट्रे : घड्या पडताना विभंग पावलेल्या व तिरप्या झालेल्या क्रिटेशस ते मायोसीन या (सु. १४ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातल्या थरांमध्ये ईजिप्तमधील खनिज तेल आढळते. हे तेलक्षेत्रांचे थर सुएझपासून दक्षिणेस सु. २२५ किमी. अंतरावर आखाताच्या पश्चिमेस आहेत.
मध्यपूर्वेतील देशांत मिळणारे बरेचसे खनिज तेल इतर देशांना निर्यात करण्यात येते. या देशांतील परिष्करणक्षमता मर्यादित आहे. खनिज तेल रसायन उद्योगास अगदी योग्य असा कच्चा माल या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु या भागातील खनिज तेल उत्पादांची मागणी कमी आहे. अभियांत्रिकी व तंत्रविद्येच्या संस्थांचा, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा व कारखान्यांसाठी लागणाऱ्या सोयींचा अभाव इ. कारणांमुळे खनिज तेल उद्योगधंद्यांचा या भागात म्हणावासा विकास झालेला नाही. या भागातील बहुतेक देशांची अर्थव्यवस्था खनिज तेलाचे उत्पादन, त्याची विक्री व निर्यात यांवरच अवलंबून आहे.
कॅनडा : (१) पश्चिमेकडील इलाखे, (२) लीमा-इंडियाना तेलक्षेत्राचा उत्तरेकडील विस्तार असणारा आँटॅरिओमधील सार्नियाचा प्रदेश व (३) ॲपालॅचियन तेलक्षेत्राचा कॅनडामध्ये असणारा, नायगारा धबधब्याच्या पश्चिमेकडील भाग या तीन प्रदेशांत कॅनडामध्ये खनिज तेल मुख्यत्वेकरून सापडते. कॅनडातील नैसर्गिक वायूचे साठे जगातील सातव्या क्रमांकाचे आहेत. यामुळे खनिज तेल रसायनांच्या उद्योगधंद्यांना तेथे खूपच वाव आहे. १९५०–६० या काळात खनिज तेल उद्योगधंद्यांची वाढ १६ टक्क्यांनी झाली व ती सतत होत आहे. या उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून अल्बर्टा राज्यातील नैसर्गिक वायू व परिष्करण कारखान्यातून मिळणारा नॅप्था वापरतात. नैसर्गिक वायू सापेक्षत: स्वस्त दराने मिळतो. त्याचा उपयोग संश्लेषित वायू तयार करण्यासाठी व नॅप्था आणि परिष्करणातील प्रवाहात मिळणाऱ्या इतर पदार्थांचा उपयोग ओलेफीन तयार करण्यासाठी होतो. नैसर्गिक वायूपासून गंधक मिळवितात. कॅनडाचा मोठा विस्तार, त्याच्या काही भागांत असणारे असह्य हवामान, सापेक्षत: कमी लोकसंख्या, त्यामुळे खनिज तेल उत्पादांचा कमी वापर व कमी मागणी, दळणवळणाच्या साधनांची सापेक्षत: कमी उपलब्धता यांमुळे कॅनडामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे साठे विपुल असूनदेखील खनिज तेल उद्योगधंद्यांचा विस्तार अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. गॅसोलिनाची मागणी या देशात खनिज तेल उत्पादांच्या एकूण मागणीच्या ३५ टक्के आहे. कॅनडातील बऱ्याच खनिज तेल उद्योगधंद्यांची मालकी अमेरिकेतील खाजगी कंपन्यांकडे आहे.
आफ्रिकेतील देश : १९५०–७० या काळात आफ्रिकेतील काही देशांत खनिज तेलाचे उत्पादन सुरू झाले. पैकी लिबिया व अल्जीरियामध्ये मुख्यत्वेकरून उत्पादन होते. या दोन देशांतील खनिज तेल त्या देशांत असणाऱ्या सहारा वाळवंटाच्या भागात मिळते. सहाराच्या दक्षिणेस नायजेरिया व गाबाँ या दोन देशांतच खनिज तेलाचे उत्पादन होते. आफ्रिकेत तेलाचे उत्पादन करणारा चौथ्या क्रमांकाचा ईजिप्त हा देश आहे पण त्याची गणना मध्यपूर्वेकडील देशांत करतात.
अल्जीरिया : सहारा वाळवंटामध्ये खनिज तेलाचे प्रचंड साठे आहेत. अल्जीरियातून होणारी तेलाची निर्यात वाढत आहे. या देशात खनिज तेल उद्योगधंद्यांमध्ये व खनिज तेल रसायने तयार करण्याच्या दृष्टीने खूपच वाव असून नवीन उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत. येथून द्रवीकृत नैसर्गिक वायू यूरोपला निर्यात करण्यात येतो.
इंडोनेशिया : या देशातील बहुतेक खनिज तेल मायोसीन व प्लायोसीन (सु. २ ते १ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालखंडातील गाळांच्या खडकात आढळते. हे खडक सु. ३,२५० मी. जाडीचे असून बहूतेक सर्व तेल या खडकांना घड्या पडून तयार झालेल्या उथळ अशा विमुखनती संरचनांतून मिळते. नैसर्गिक वायूचे साठे पण या देशात मोठ्या प्रमाणात मिळतात. नैसर्गिक वायूपासून तयार करण्यात येणाऱ्या अमोनियाव्यतिरिक्त या देशात खनिज तेल उद्योगधंद्यांचा विशेष विकास झालेला नाही.
मेक्सिको : (१) उत्तरेकडील किंवा (टँपीकोजवळचे) पानूको, (२) दक्षिणेकडील (टॅमासोपो वा गोल्डन लेन) तूसपानजवळ, (३) पोझारिका आणि (४) तेवानतेपेक या चार तेलक्षेत्रांत खनिज तेल सापडते.
चीन : येथील खनिज तेलाच्या साठ्यांबद्दल माहिती उपलब्ध नाही. कार्बनी रसायने व इतर रासायनिक उद्योग दगडी कोळशावर आधारित आहेत. नैसर्गिक वायूचे काही साठे शोधून काढण्यात आले आहेत. भविष्यकाळात नैसर्गिक वायूंपासून संश्लेषित वायू तयार करण्याच्या योजना आहेत. खतांचे उत्पादन करणे हा चीनमधील अग्रक्रमाचा उद्योग आहे.तसेच नायट्रोजनाचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत.
अर्जेंटिना : (१) दक्षिण किनाऱ्यावरील कोमोदोरो रीव्हादाव्हिया, (२) साल्टा, (३) नेउकेन व (४) मेंदोसा हे पूर्व अँडीजमधील खनिज तेलाचे चार प्रदेश अर्जेंटिनामध्ये आहेत. पैकी पहिल्या तेलक्षेत्रातून अर्जेटिनातील खनिज तेलाचे ८० टक्के उत्पादन होते. या देशात नैसर्गिक वायूचे पण साठे आहेत. येथे मागणीनुसार खनिज तेलाचे उत्पादन केले जाते व परिष्करणक्षमता ठरविली जाते. येथील खनिज तेल रसायनांच्या उद्योगधंद्यात बरीच प्रगती झालेली आहे.
पूर्व यूरोप : पूर्व यूरोपात रूमानियामध्येच काय ते जास्त प्रमाणात खनिज तेलाचे उत्पादन होते. हंगेरी, अल्बेनिया, पोलंड, बल्गेरिया, यूगोस्लाव्हिया या देशांत अल्प प्रमाणात तेलाचे उत्पादन होते. रूमानियामध्ये (१) सब-कार्पोथियन, (२) ट्रान्सिल्व्हेनियन खोरे (फक्त नैसर्गिक वायू) आणि (३) बकाऊ प्रदेश या भागांत नैसर्गिक वायू व खनिज तेल मिळते. खनिज तेल मायोसीन व पूर्व प्लायोसीन काळातल्या विमुखनतीतील वाळूत, सैंधवी घुमटात व लवणाच्या विमुखनतीत मिळते. नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात मिळतो व कच्च्या खनिज तेलात गॅसोलिनाचे प्रमाण उच्च असते.
खनिज तेल, भारतीय : १९५६–६१ या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारत सरकारने खनिज तेलाचा शोध, त्याचे परिष्करण व वाटप ही कार्ये सुरू केली. त्या वेळेस भारतातील खनिज तेल उद्योगाचा खऱ्या अर्थाने पाया घातला गेला. १९५६ साली तेल व नैसर्गिक वायू आयोगाची स्थापना झाली. या उद्योगधंद्यात यश मिळून त्याचा प्रसार झाल्यावर १९६३ साली खनिज तेल व रसायने मंत्रालय सुरू झाले. भारतातील खनिज तेलाच्या शोधाचा इतिहास सुरुवातीला दिलेला आहे. भारतामध्ये खनिज तेल उद्योगधंद्याची सुरुवात आसाम तेल कंपनी व बर्मा शेल कंपनी यांनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात केली. परंतु त्यांचे कार्य मुख्यत्वेकरून आसामच्या वरच्या भागातच होते. १९४९–६० या काळात स्टँडर्ड व्हॅक्यूम ऑइल कंपनीने पश्चिम बंगालमधील खोऱ्यात खनिज तेलासाठी समन्वेषण केले. प्रथम या कंपनीने समन्वेषणाचे काम स्वतंत्रपणे केले व पुढे भारत सरकारबरोबर ‘इंडो-स्टॅनव्हॅक पेट्रोलियम प्रॉजेक्ट’ या स्वरूपात केले. सध्या आसाम ऑइल कंपनी, ऑइल इंडिया लिमिटेड आणि तेल व नैसर्गिक वायू आयोग ह्या तीन संस्था खनिज तेलाचे समन्वेषण करतात. पैकी पहिल्या दोन खाजगी क्षेत्रातील व आयोग सरकारी क्षेत्रातील आहे. पहिल्या दोन संस्था बहुतेककरून आसामातील क्षेत्रातच कार्य करतात, तर आयोग भारतातील इतर सर्व भागांत कार्य करतो.
गाळाच्या खडकांनी व्यापलेले प्रदेश जवळजवळ संपूर्ण भारतभर विखुरलेले असून त्यांनी दहा लाख चाळीस हजार चौ.किमी. क्षेत्र व्यापलेले आहे. तसेच खंबायत व कच्छच्या आखातातील अपतटी प्रदेश, गुजरात व महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश, कारोमंडलच्या बाजूचा किनारा, पाल्क सामुद्रधुनी व मानारचे आखात, गंगा व महानदी या नद्यांच्या मुखांचे प्रदेश, केरळचा किनारा, अंदमान व निकोबार बेटे ह्या भागांत खनिज तेल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाने भारताच्या निरनिराळ्या भागांत भूवैज्ञानिक व भूभौतिक समन्वेषणाचे कार्य चालू ठेवले आहे. त्यात मिळालेल्या माहितीवरून आयोगाने निरनिराळ्या राज्यांत वेधनाचे काम सुरू केले आहे. मात्र बरेच वेधन गुजरात व आसाम राज्यांत झाले असून या भागांत अधिकाधिक वेधन चालू आहे. कारण या भागांत नैसर्गिक वायू व तेलाचे प्रत्यक्ष साठे सापडले आहेत. आयोगाला अनेक विहिरींत खनिज तेल व नैसर्गिक वायू सापडले आहेत. यांपैकी मुख्य ठिकाणे म्हणजे खंबायतमधील वायुक्षेत्र आणि अंकलेश्वर, कलोल व नवगाम ही गुजरातमधील आणि रुद्रसागर व लकवा ही आसामातील तेलक्षेत्रे होत. खंबायतच्या आखताच्या अपतटी प्रदेशात एक वर्षभर वेधन करून प्रयत्न केल्यानंतर १९ मार्च १९७० रोजी तेलाचा झरा लागला, परंतु येथे आर्थिक दृष्ट्या परवडेल इतक्या मोठ्या प्रमाणात तेल मिळाले नाही. १९७०-७१ साली दाबका या गुजरातमधील ठिकाणी नवीन सापडलेल्या सरंचनेमध्ये तेल आढळले आणि तेथे उत्पादन सुरू होऊन उत्तर गुजरातमधील तेलाच्या उत्पादनात वाढ झाली. या भागात आणखी १३ विहिरी खणण्यासाठी वेधन यंत्रणा उभारण्यात आली. त्रिपुरा भागात अपतटी वेधन करण्यासाठी १९७१ च्या अखेरीस वेधनाची यंत्रणा उभारण्यात आली. अलियाबेट या ठिकाणीही वेधन सुरू करण्यात आले आहे. या आयोगातर्फे भारताबाहेरील काही देशांत उदा., इराणमध्ये खनिज तेलाच्या समन्वेषणाचे व तांत्रिक सल्ला देण्याचे कार्य करण्यात येते. १९५६ ते डिसेंबर १९७० पर्यंत आयोगाने एकूण ८६२ विहिरी खणल्या. त्यांपैकी ४७८ विहिरींत खनिज तेल, ६६ विहिरींत नैसर्गिक वायू, २१ पाण्याच्या अंत:क्षेपणासाठी आणि २१४ कोरड्या व ८३ मध्ये तपासणी चालू होती. सप्टेंबर १९७२ अखेर एकूण ९८२ विहिरी खणण्यात आल्या.
ऑइल इंडिया लिमिटेड ही ५० : ५० या प्रमाणात भारत सरकार व बर्माशेल कंपनी यांच्या भागीदारीत चालणारी संस्था असून तिला १,३२१ चौ.किमी. भागाच्या खाणकामाचा परवाना व १,२१९ चौ. किमी. भागाच्या समन्वेषणाचा परवाना देण्यात आला आहे. हा भाग ईशान्य भारतात आहे. या संस्थेने डिसेंबर १९७० पर्यंत २८४ उत्पादनासाठी व १४ समन्वेषणाच्या विहिरी खणल्या. या संस्थेचे उद्दिष्ट दरवर्षी ३० लाख टन खनिज तेलाचे उत्पादन करणे हे आहे. तिने १९७० साली ३० लाख ६० हजार टन उत्पादन केले. यापैकी ३० लाख ४० हजार टन तेल गौहाती व बरौनी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आणि दिग्बोई येथील आसाम ऑइल कंपनीच्या परिष्करण कारखान्यांना पाठविण्यात आले.
आसाम ऑइल कंपनीने डिसेंबर १९७० पर्यंत ९९८ विहिरी खणल्या त्यांपैकी ३८४ विहिरींतून उत्पादन चालू आहे. सध्या या कंपनीचे दरवर्षी १ लाख १० हजार टन उत्पादन चालू आहे.
भारतातील खनिज तेलाचे उत्पादन सतत वाढत आहे. १९६१–१९६५ या काळात दरवर्षी सरासरी १६ लाख ९६ हजार टन उत्पादन झाले. १९६६ साली ४६ लाख ४७ हजार, १९६७ साली ५६ लाख ६७ हजार, १९६८ साली ५८ लाख ५३ हजार, १९६९ साली ६७ लाख २३ हजार, १९७० साली ६८ लाख ९ हजार व १९७१ साली ७१ लाख ८५ हजार टन असे खनिज तेलाचे उत्पादन दरवर्षी वाढत्या प्रमाणात झाले.
देशातील खनिज तेलाची मागणी उत्तरोत्तर वाढतच आहे. १९७१ साली भारतास सु. दोन कोटी टन खनिज तेलाची आवश्यकता होती.
कोष्टक क्र ६. कच्चे तेल व खनिज तेल उत्पाद यांची आयात
(राशी हजार टनांत व किंमत कोटी रुपयांत). |
||||||
पदार्थ | १९७० | १९७१ | १९७२ | |||
राशी | किमंत | राशी | किंमत | राशी | किंमत | |
हलकी ऊर्ध्वपातिते | २३·० | १·०० | ७२·५ | ३·७४ | ६८·४ | २·०४ |
मध्यम ऊर्ध्वपातिते | ३२७·३ | ७·६४ | ८६७·४ | २१·०५ | १३,०२·९ | २८·०२ |
इतर उत्पाद | ६१९·८ | २१·८९ | ९८३·० | १८·७० | १८,९२·७ | २६·७१ |
कच्चे तेल | ११,६६५·३ | १०२·३६ | १२,६८७·७ | १३९·८८ | १२,३१०·१ | १४४.०१ |
एकूण | १२,६३५·४ | १३२·८९ | १४,६१०·६ | १८३·३७ | १५,५७४·१ | २००·७८ |
त्यांपैकी सु. ०·७ कोटी टन तेल आसाम व गुजरात राज्यांतील तेलक्षेत्रांतून मिळाले. उरलेले सु.१·३ कोटी टन तेल परदेशातून आयात करावे लागले. या आयात तेलाची किंमत सु. १०० कोटी रुपये होती. १९७२ मध्ये आसाम व गुजरात राज्यांतील तेलक्षेत्रांतून सु. ०·७४ कोटी टन तेल मिळाले आणि १·२३ कोटी टन आयात करण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने भारत सरकारच्या तेल व नैसर्गिक वायू आयोगाने डेहराडून येथे चालविलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम एक्स्प्लोरेशन या संस्थेत खनिज तेल उद्योगधंद्याच्या सर्व अवस्थांचे संशोधन करण्यात येते व त्याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच डेहराडून येथे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेने चालविलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेत खनिज तेलाच्या परिष्करणाची तंत्रविद्या आणि व्यापार या विषयांचे संशोधन करण्यात येते व या विषयांचे प्रशिक्षणही देण्यात येते.
(१) आसाम : बर्मा शेल व आसाम ऑइल कंपनी यांनी नहरकटिया येथे १९५३ मध्ये खणलेल्या क्र.१ या विहिरीत तेल मिळाले. या यशामुळे आसामात इतरत्रही तेलाचे साठे मिळतील अशी आशा उत्पन्न झाली. सध्या दिग्बोई, नहरकटिया, मोरान या क्षेत्रांतून तेलाचे उत्पादन चालू आहे. तेल व नैसर्गिक वायू आयोगाने रुद्रसागर व लकवा या ठिकाणी तेलाचे साठे शोधून काढले आहेत.
(२) गुजरात : १९५८ मध्ये खंबायतजवळ लुणेज येथे तेल व नैसर्गिक वायू आयोगाने खणलेल्या विहिरीत काही थोड्या प्रमाणात तेल आढळले. तेथे जवळपास जास्त विहिरी खणल्यानंतर नैसर्गिक वायू विपुल प्रमाणात सापडला. सध्या खंबायत क्षेत्रातून त्याचे उत्पादन चालू आहे. येथील नैसर्गिक वायू धुवरण औष्णिक विद्युत् केंद्रात पाठविण्यात येतो. १९६० मध्ये अंकलेश्वर या अत्यंत महत्त्वाच्या तेलक्षेत्राचा शोध लागला. तेथून रोज सु. ८,००० टन उच्च प्रतीच्या तेलाचे उत्पादन चालू आहे. गुजरातमध्ये कलोल, नवगाम इ. क्षेत्रांतून तेलाचे उत्पादन होते. हे तेल कोयाली परिष्करण कारखान्यात पाठविण्यात येते. मेहसाणा, जंबुसर, कच्छ इ. ठिकाणी विहिरी खणण्याचे काम चालू असून राज्यातील इतर काही ठिकाणीही विहिरी खणण्यात येणार आहेत.
(३) पश्चिम बंगाल : १९४९ साली स्टँडर्ड व्हॅक्युम ऑइल कंपनी व इंडो-स्टॅनव्हॅक पेट्रोलियम प्रॉजेक्ट यांच्याद्वारे मिळविलेल्या भूभौतिकीय माहितीच्या आधारे या राज्यात दहा विहिरी खणण्यात आल्या. नंतर तेल व नैसर्गिक वायू आयोगाने खणण्याचे काम केले परंतु त्यात यश आले नाही.
(४) हिमाचल प्रदेश : कांग्रा जिल्ह्यातील एका खेडेगावी जमिनीतून बाहेर पडणारा नैसर्गिक वायू आढळून आला. या ठिकाणी आगपेटीतील काडी धरली असता आपोआप पेटून ज्योत जळू लागे. हा दैवी चमत्कार मानण्यात येऊन ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ज्वालामुखी देवीचे देऊळ बांधले. पुढे त्या गावाचे नावही ज्वालामुखी पडले. १९५८ मध्ये या भागात तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाने विहीर खणली असता नैसर्गिक वायू विपुल प्रमाणात मिळाला नाही. या प्रदेशात इतरत्र खणलेल्या विहिरीही निष्फळ ठरल्या.
(५) इतर राज्ये : गेल्या काही वर्षांत पंजाब, राजस्थान, जम्मू व काश्मीर, पाँडिचेरी इ. राज्यांत विहिरी खणण्यात आलेल्या आहेत. त्रिपुरा, नेफा व द्वीपकल्पातील किनारपट्टीचा उथळ समुद्र या प्रदेशांत तेलाचे साठे शोधून काढण्याचे काम चालू आहे.
पहा : खनिज तेल रसायने, नैसर्गिक वायु.
संदर्भ :
- Bell, H.S., American Petroleum Refining, Princeton, 1959.
- Frick, T. C. Ed., Petroleum Production Handbook, 2 Vols., New York, 1962.
- Gruse, W. A., Stevens, D. R. Chemical Technology of Petroleum, New York, 1960.
- Guthrie, V. B., Petroleum Products Handbook, New York, 1960.
- Landes, K. K., Petroleum Geology, New York, 1959.
- Levorsen, A. I., Geology of Petroleum, San Francisco, 1967.
- Menon, M. G., Oil for the Millions, Bombay, 1969.
- Nelson, W. L., Petroleum Refinery Engineering, New York, 1958.
- Sell, G., Petroleum Industry, New York, 1963.
- Waddams, A. L., The Petroleum Chemical Industry, London, 1962.
- Waddams, A. L., Chemicals from Petroleum, London, 1962.
लेखक : आगस्ते, र. पां.; गाडेकर, दि. रा.; टोणगावकर, चं. स.; ठाकूर, अ. ना.; जोशी, र. वि.; जोशी, ह. कृ.