ग्वातेमाला सिटी : ग्वातेमाला देशाची राजधानी. लोकसंख्या ७,६८,९८७ (१९७०). सिएरा माद्रे पर्वतराजीतील १,४८७ मी. उंचीवरील पठारावर वसलेले हे शहर पॅसिफिकवरील सान होसेपासून १२० किमी. व कॅरिबियनवरील प्वेर्तो बार्योसपासून २४१ किमी. आहे. याला ज्वालामुखींचे भव्य निसर्गकोंदण असून १५४१, १७७३, १८७४ व १९१७-१८ मधील धरणीकंपांमुळे ते जमीनदोस्त झाले होते. १७७६ मध्ये हल्लीच्या जागी उभारलेले हे शहर १९२१ मध्ये जवळजवळ सर्व पुन्हा बांधून काढावे लागले. फेब्रुवारी १९७६ च्या प्रचंड भूकंपामुळे येथे सु. दोन लाखांवर लोक बेघर झाले. देशातील १५% लोकसंख्या व निम्म्याहून अधिक उद्योगधंदे येथे असून ते देशाच्या राजकीय, औद्योगिक, व्यापारी, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र आहे. येथील सान कार्लोस विद्यापीठ एक श्रेष्ठ विद्यापीठ गणले जाते. मध्य अमेरिकेतील हे सर्वांत मोठे शहर मेक्सिको आणि एल् साल्वादोर यांच्याशी व देशातील मोठ्या शहरांशी लोहमार्गांनी जोडलेले असून ते आंतर अमेरिकी महामार्गावर आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ १९६८ मध्ये सुरू झाला. मिनर्व्हा पार्कमधील देशाचा उठावाचा नकाशा,सेंट्रल अमेरिकन ऑलिंपिक स्पर्धांसाठी १९५० मध्ये बांधलेले ऑलिंपिक सिटी, अनेक चर्च, जुन्या व नव्या बांधणीच्या भव्य, सुंदर इमारती, आधुनिक हॉटेले, रम्य उद्याने व सौम्य, आल्हाददायक हवा ही ग्वातेमाला सिटीची प्रमुख आकर्षणे आहेत.     

                          शहाणे, मो. ज्ञा.