ग्रोनिंगेन : नेदरर्लंड्सच्या ग्रोनिंगेन प्रांताची इतिहासप्रसिद्ध राजधानी. लोकसंख्या १,७०,२९५ (१९७३). शेतमालाची व गुरांची बाजारपेठ व पीठचक्क्या, दुग्धपदार्थप्रक्रिया, मद्ये, पुठ्ठे, साखर, खते, बटाट्याचे पीठ, ग्लोकोज, डेक्स्ट्रिन, फर्निचर, यंत्रे, सायकली, रेयॉन, वीजउपकरणे, रसायने, रंग, कापड यांचे कारखाने येथे असून हे लोहमार्ग, सडका, कालवे यांचे केंद्र आहे. ग्रोनिंगेनचे विद्यापीठ १६१४ पासूनचे असून येथील ग्रंथालय, संग्रहालय व रुग्णालय विख्यात आहे. दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेला भाग त्वरेने बांधून काढलेला आहे.
कुमठेकर, ज. ब.