ग्रेवॅक : (वॅक). वातावरणक्रियेने जवळजवळ अपघटन (झीज ) न झालेल्या लोह-मॅग्‍नेशियमी खनिजे विपुल असलेल्या भरडकणी वालुकाश्माचे नाव. अल्पसिकत ( सिलिकेचे प्रमाण अल्प असणाऱ्या) खडकाच्या विघटनाने (तुकडे होऊन) तयार झालेले डबर चिकटून घट्ट झाले म्हणजे ग्रेवॅक तयार होतो. यात प्लॅजिओक्लेज फेल्स्पार, क्कॉर्ट्‌झ, ऑजाइट, हॉर्नब्‍लेंड, सपेंटाइन, कृष्णाभ्रक, क्लोराइट, मॅग्‍नेटाइट, पायराइट ही खनिजे आणि गाळवटी खडक, स्लेट, वालुकाश्म इ. खडकांचे तुकडे असतात. या खडकाचा आधारक ( भरडकण ज्याने चिकटविले जातात तो भाग) मृण्मय असून त्याचे खडकातील प्रमाण सु. १५ टक्के व क्वचित ५० टक्क्यांपर्यत असते. अल्पसिकत खडकांचे तुकडे आणि खनिजे यांचे प्रमाण क्वॉर्ट्‌झाइतके किंवा जास्त असते. त्यामुळे खडक करडा, उदी, जांभळट, काळसर यांसारख्या गडद रंगांचा असतो. तो कठीण व चिकट असून त्याचे वयन ( पोत ) स्पष्ट नसते. त्याच्यातील स्तर पातळ असून कधीकधी श्रेणीयुक्त (प्रतवार ) स्तरण असते. मात्र प्रतिस्तरण ( विसंगत थर असणे ) किंवा तरंगचिन्हे (लाटांच्या आकारासारख्या खुणा ) त्यात नसतात. ग्रेवॅकातील तुकडे आणि कण भरड, अणकुचिदार असून त्यांत सर्व आकारांच्या कणांची सरमिसळ झालेली असते. यावरून त्यांची वाहतूक सापेक्षतः अल्प झाली असावी असे अनुमान करता येते. विविध प्रकारचे खडक असलेल्या आणि जलद झीज होणाऱ्या प्रदेशांत उदा., त्रिभुज प्रदेश, गाळवटी समुद्रकिनारा इ. ठिकाणी वेगवान नद्यांनी वाहून आणलेल्या डबरांपासून ग्रेवॅक तयार होत असावेत असे त्यांच्यातील द्रव्यांवरून दिसते. भूद्रोणीसारख्या अतिशय जाड थरांमध्ये स्लेट, चर्ट, ग्रीनस्टोन, पिलो लाव्हा इत्यादींच्या बरोबर ग्रेवॅक आढळतो. पुराजीव ( सु. ६० ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) विशेषत: पूर्व-पुराजीव काळातील संघाच्या खडकांचा ग्रेवॅक हा मुख्य घटक आहे. तो काश्मिरातील त्रेहगाम येथे आढळतो. यालाच ग्रिट किंवा ग्रे-फ्लॅग्ज म्हणतात. करडा दगड या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून ग्रेवॅक नाव पडले.

ठाकूर, अ. ना.