गोलदार : (कुकर हिं. हिरीक क. हप्पू, सवगे गु, गोलडरो लॅ.स्टर्क्युलिया गटाटा कुल-स्टर्क्युलिएसी). हा सरळ मोठा वृक्ष श्रीलंका, अंदमान बेटे, मलाका व भारत (आसाम, मलबार, निलगिरी, मद्रास, कोकण व कारवार) येथील गर्द जंगलात आढळतो. साल राखी व तडकलेली असून पाने साधी व खालच्या बाजूस लवदार असतात. बहुतेक द्विलिंगी फुले बाहेर गर्द पिवळट व आत जांभळट असून शेंड्यावर मंजरीत जानेवारी-फेब्रुवारीत, तीन-तीन झुबक्यांनी येतात. पाकळ्या नसतात. परागकोश १२ किंजपुट लांब किंजधरावर ३-५ भागांचा व केसाळ [→ फूल]. घोसफळातील पेटिकाफळ [→ स्टर्क्युलिएसी] लालभडक असते. बिया मोठ्या व काळ्या. सालीपासून काढलेल्या धाग्याचे दोर व हलक्या प्रतीचा कागद करतात. मलबारात त्यांचे कापड बनवून वापरतात. बिया कच्च्या किंवा भाजून खातात. या वृक्षाची पाने फेब्रुवारीत झडतात. रंगीत फुले व लाल फळे यांमुळे हे झाड शोभिवंत दिसते, म्हणून मोठ्या बागेत शोभेकरिता लावतात. कच्च्या फळांतील बिया माकडे खातात.

पराडकर, सिंधू अ.