गोटा : वातावरण, पाणी, वारा, बर्फ अथवा समुद्र यांच्या क्षरणक्रियेमुळे गुळगुळीत झालेला व मूळ ठिकाणापासून कमी अधिक दूर येऊन पडलेला दगड, धोंड किंवा शिला. ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूटच्या व्याख्येप्रमाणे गोटा निदान २०० मिमी. व्यासाचा किंवा अमेरिकेच्या वेंटवर्थ व्याख्येप्रमाणे २५३ मिमी. व्यासाचा असला पाहिजे. सामान्य अर्थाने तो यापेक्षा लहानही असतो. तीन चार मी. किंवा अधिक व्यासाचेही प्रचंड गोटे असतात. गोटे उघडे पडलेले किंवा मातीत गाडलेले आढळतात. समुद्रकाठचे गोटे आपल्या जागेवरून फारसे हालत नाहीत. विदारण झालेले मोठमोठे गोटे पुष्कळदा जागीच असतात. काही गोटे अगदी थोड्या आधारावर टेकलेले असतात, तर काही प्रचंड गोटे ढकलले तर हालतात पण पडत नाहीत. घसरत्या बर्फाबरोबर दूर येऊन पडलेल्या गोट्यावरील चऱ्यांवरून हिमानी क्रियेचा व तिच्या दिशेचा अंदाज करता येतो. 

कुमठेकर, ज. ब.