पाडांग : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटातील प. सुमात्रा प्रांताचे मुख्य ठिकाण व प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या १,९६,३०० (१९७१). हे १° द. अक्षवृत्तावर पाडांग नदीमुखाशी वसले आहे. डचांची सर्वांत जुनी वसाहत येथे होती. १७८१–८४ व १७९५–१८१९ यांदरम्यान हे ब्रिटिशांच्या, तर दुसऱ्या महायुद्धात जपानच्या ताब्यात होते. शहराच्या परिसरात खनिज संपत्तीचे साठे असून, शहरात कापड व सिमेंट यांशिवाय इतरही अनेक उद्योग चालतात. हे महत्त्वाच्या शहरांशी रस्ते, लोहमार्ग व हवाई मार्ग यांनी जोडले आहे. बंदरातून रबर, खोबरे, चहा, कॉफी, कोयनेल, तंबाखू, दालचिनी, कोळसा, सिमेंट, चामडी वगैरेंची निर्यात होते. येथे पंचशिला विद्यापीठ आहे. रुंद रस्ते, सुबक घरे व रम्य उद्याने ही येथील ठळक वैशिष्ट्ये होत.

लिमये, दि. ह.