गियाना : दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको, कासीक्यारे, नेग्रो व ॲमेझॉन नद्यांनी आणि अटलांटिक महासागराने वेढलेला प्रदेश. यात गुयाना, सुरिनाम व फ्रेंच गियाना यांशिवाय व्हेनेझुएला व ब्राझिल यांचा काही भाग येतो. किनाऱ्याजवळील गाळाचे सखल, सुपीक, अरुंद मैदान, त्याच्या दक्षिणेचा खनिजयुक्त उंचवट्याचा प्रदेश व त्याच्याही दक्षिणेचा पर्वत व पठारे यांचा उंच प्रदेश अशी याची सामान्य प्राकृतिक रचना आहे. २,७७२ मी. उंचीचा रॉराइमा पर्वत, ९७५ मी.पेक्षा उंच एंजेल धबधबा, अनेक द्रुतवाह, दक्षिणेकडे व उत्तरेकडे वाहणाऱ्या विपुल नद्या, विषुववृत्तीय हवामान, दाट वर्षावने व मधूनमधून सॅव्हाना गवती प्रदेश आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व प्राणी हे याचे भौगोलिक विशेष आहेत. खाणींजवळच्या वस्त्या व किनाऱ्याजवळची शहरे सोडली, तर लोकवस्ती विरळ आहे. थोडे मूळचे इंडियन, थोडे यूरोपीय व काही निग्रो यांशिवाय बहुसंख्य लोक शेतमजूरीसाठी आलेले ईस्ट इंडियन व भारतीय आहेत. सोने-चांदी न मिळाल्यामुळे स्पॅनिशांनी या प्रदेशाकडे दुर्लक्ष केले. डचांनी मात्र खारकच्छ हटवून लागवडी केल्या. ब्रिटिश व फ्रेंच नंतर आले.
पहा : गुयाना फ्रेंच गियाना सुरिनाम.
शहाणे, मो. ज्ञा. कुमठेकर, ज. ब.
“