चिपेंडेल, टॉमस : (? १७१८- ? १७७९). इंग्लंडमधील सुप्रसिद्ध फर्निचर-निर्माता. जन्म ऑट्‌ली, यॉर्कशर येथे. लहानपणी वडिलांच्या हाताखाली सुतारकामाच्या पिढीजात धंद्याचे शिक्षण घेतले. मोठेपणी स्वतंत्र दुकान थाटून त्याने आपल्या हाताखाली तज्ञ कारागीर बाळगले. वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक लाकडी वस्तूंची निर्मिती हे चिपेंडेलचे खास वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्या काळातील ड्यूक ऑफ ॲथल व अर्ल ऑफ पेम्ब्रुक इत्यादींसारखे अमीरउमराव व प्रतिष्ठित लोक त्याचे ग्राहक होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चिपेंडेल शैली बरीच गाजली [→ खुर्ची फर्निचर]. वस्तूच्या सांगाड्यातील एकसंघपणा व सुबकता हे त्या शैलीचे प्रमुख लक्षण होते. चिपेंडेलच्या या शैलीवर फ्रेंच रोकोको, चिनी व गॉथिक पद्धती आणि नव अभिजाततावादकल्पना इत्यादींचा बराच प्रभाव पडला होता. त्यामुळे इंग्लंडच्या बाहेरही चिपेंडेल शैलीचे अनुकरण होऊ लागले. त्यातूनच आयरिश चिपेंडेल आणि अमेरिकन चिपेंडेल अशा संज्ञा सुरू झाल्या. चिपेंडेलने लाकडी फर्निचरसंबंधी १७५४ मध्ये प्रसिद्ध केलेले जंटलमन अँड कॅबिनेट मेकर्स डायरेक्टर …. हे पुस्तक त्या काळी बरेच गाजले. पुढे त्याची १७५९ मध्ये दुसरी व १८६२ मध्ये तिसरी सुधारित आवृत्तीही निघाली.         

जोशी, चंद्रहास