संदला-शिल्पन : (स्टको वर्क). चुना, बारीक रेती, जिप्सम, पाणी यांचे मिश्रण घोटून तयार केलेला अत्यंत मुलायम, गुळगुळीत गिलावा म्हणजे संदला. त्याचा उपयोग करून केलेली वास्तुसजावट, नक्षीयुक्त अलं-करण, मूर्तिशिल्पनिर्मिती म्हणजे संदला-शिल्पन होय. ह्यालाच ‘चुनम’ वा ‘चुनेगच्ची’ कलाकाम असेही म्हटले जाते. संदला मिश्रणात कित्येकदा संगमरवराची बारीक भुकटी, सरस, प्राण्यांची लीद, क्वचित बळकटीसाठी केसही मिसळले जातात. मिश्रणातील घटकद्रव्यांचे प्रमाण गरजेनुसार कमीअधिक केले जाते. हे मिश्रण हवारोधक असते व ते रंगवताही येते. संदला हा मुळात पांढरा असतो पण त्यात रंग मिसळून काही रंगछटा निर्माण केल्या जातात वा तो रंगवला जातो. वास्तूच्या बाहेरील व आतील भिंती, छते यांवर गुळगुळीत चुनेगच्ची गिलावा केला जातो तसेच त्रिमितीय शिल्पालंकरणासाठी, उत्थित मूर्ती वा अन्य प्राणिशिल्पे घडविण्यासाठी चुनेगच्चीचा वापर केला जातो. चित्रे रंगविण्यासाठी संदल्यामध्ये गुळगुळीत भित्तिपृष्ठ तयार केले जाते, तव्दतच भित्तिलेपचित्रणासाठी आर्द्र भूमिपृष्ठ म्हणूनही त्याचा वापर होतो. लाकडी भिंती, छते यांवर चुनेगच्चीची घट्ट पकड मिळावी, म्हणून प्रत्यक्ष शिल्पकाम करण्यापूर्वी भित्तिपृष्ठांवर बांबूच्या पातळ कामट्या ठोकल्या जातात. त्यायोगे भिंतीवर गिलाव्याचा पहिला थर (की) तयार होऊन मजबुती वाढते. संदला मिश्रण भिंतीवर स्थिरावण्याची प्रक्रिया संथ असल्याने, दरम्यानच्या काळात संदलाकारागीराला (स्टकाटोरी) संदल्यावर मुक्तहस्ते सूक्ष्म, गुंतागुंतीचे वैविध्यपूर्ण अलंकरण, तसेच नानाविध प्रकारच्या आकारिक घडणी करण्यास पुरेसा अवधी लाभतो. विशिष्ट आलंकारिक आकृतिबंधाची पुनरावृत्ती साधावयाची असल्यास, त्याचे आधीच साचे तयार करून त्यायोगे ते भिंतीवर जडवले जाते, जेणेकरून समग अलंकरणात्मक सजावटीचा तो एक भाग बनून सर्वसाधारण अलंकरणात मिसळून जातो.
चुनेगच्ची गिलाव्याचा अलंकरणासाठी, तसेच वास्तुसजावटीसाठी फार प्राचीन काळापासून उपयोग होत असल्याची उदाहरणे आढळतात. काही आदय ईजिप्शियन पिरॅमिडांमध्ये चुनेगच्चीकाम अदयापही अवशिष्ट आहे. त्याचप्रमाणे चुनेगच्चीकामाचे आदयकालीन नमुने मेक्सिको येथील ॲझटेक वास्तूंमध्ये, तसेच उत्तर आफिका व स्पेन येथील मुस्लिम वास्तुनिर्मितींत प्रामुख्यानेपहा- वयास मिळतात. प्राचीन गीसमध्ये मंदिर वास्तूंच्या आतील-बाहेरील भिंतींवर चुनेगच्ची गिलावा केला जात असे (इ. स. पू. सु. १४००). गीकांनीउत्थित शिल्पांकनाप्रमाणेच भिंतींवरील चित्रणपूर्व आवरणासाठी चुनेगच्चीचा वापरकेला. नंतर त्या भित्तिपृष्ठांवर चित्रे रंगवली जात. रोमन कारागीरांनी वास्तूंच्या अंतर्भागातील भिंतींवर चुनेगच्चीचा नितळ गुळगुळीत थर देऊन त्यावर कोरीव उत्थित शिल्पांकन केले. प्राचीन रोमन वास्तुकार भव्य स्मारकवास्तूंच्या खडबडीत दगडी वा विटांच्या भिंतींवर चुन्याचा गिलावा करून त्यावर उथळ उठावशिल्पे खोदत वा कोरीवकाम करीत असत. इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांतील थडग्यांवरही विस्तृत प्रमाणात चुनेगच्ची-अलंकरण आढळते. ग्रीकांश तसेच उत्तर रोमनकालीन वास्तूंच्या अंतर्भागां-मध्ये (उदा., पाँपेई येथील स्नानगृहे, इ. स. पहिले शतक), तसेच ⇨ भूमिगत थडग्यां मध्ये चुनेगच्चीतील आकृतिबंधांचे उत्तम नमुने आढळतात. बायझंटिन व इस्लामी वास्तुसजावटींचे, चुनेगच्चीमध्ये खोदलेले समग भरगच्च अलंकरण हे खास वैशिष्टय होते. हड्डा (अफगाणिस्तान) येथे इ. स. तिसऱ्या ते पाचव्या शतकांपर्यंत चमकदार, रंगीबेरंगी चुनेगच्चीचा वापर करून मूर्तिशिल्पे, उत्थित शिल्पे इ. निर्माण केल्याची उदाहरणे आढळतात. तसेच अफगाणिस्तानातील अनेक बौद्धमठांमध्ये गांधार कलेच्या निदर्शक असलेल्या गीक-बौद्ध शैलीतील चुनेगच्ची वास्तुशिल्प-सजावटींचे विपुल नमुने आढळतात. माया संस्कृतीतील वास्तूंवर रंगीत चुनेगच्चीचे संपूर्ण आवरण चढवले जाई, हे त्यांचे खास वैशिष्टय होते. प्रबोधनकाळात इटलीतील कलावंतांनी संदला-शिल्पनामध्ये विशेष नैपुण्य संपादन केले व त्यांनी ती कला यूरोपमध्ये सर्वदूर प्रसृत केली. ⇨ रॅफेएल (१४८३-१५२०) व ज्यूल्यो रोमानो (सु. १४९९-१५४६) या चित्रकारांनी व्हॅटिकन ‘ लोगी’ मध्ये चित्र व चुनेगच्ची शिल्प यांचा प्रभावी संयोग साधून, त्या प्रकारात उत्कृष्ट नमुनादर्श निर्माण केला. त्याचेच पुढे अनुकरण करून प्रिमात्चिओ व रोस्सो या इटालियन कलावंतांनी फाँतेनब्लो प्रासादाची अंतर्गत सजावट चित्र व चुनेगच्ची शिल्पांकन यांच्या मिश्रणातून उत्कृष्ट रीत्या केली. पांढरे चुनेगच्ची आलंकरण चर्चवास्तूंच्या सजावटीत, मुख्यत्वे देवदूतांच्या प्रतिमांकनासाठी वापरले गेले (उदा., स्ता मारिआ देल पोपोलो, सान आंद्रेआ अल क्विरिनेल या रोममधील चर्चवास्तू). प्राचीन रोमन कलेतील अलंकरण-सजावटींचे नमुनादर्श अनुसरून प्रबोधन काळात रोममधील लौकिक वास्तूही चुनेगच्ची अलंकरणाने सजवल्या गेल्या (उदा., व्हिला मादामा, व्हिला ज्यूलिआ, व्हिला डोरिआ इ. वास्तू). सतराव्या शतकापासून पुढे संदला–शिल्पकारांचे संघ एका तज्ञाच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे काम करू लागले. नक्षीयुक्त अलंकरणाबरोबर मूर्तिशिल्पांची सांगड घालण्याचे ह्या कारागिरांचे कसब वाखाणण्याजोगे होते. त्याचे प्रत्यंतर मध्य यूरोपमधील बरोक शैलीच्या चर्चवास्तूंमध्ये (उदा., द्येसेन, व्ह्येरझेनहेलिंजेन चर्चवास्तू), तसेच ओटोब्यूरेनच्या क्लॉइस्टर चर्चच्या वास्तुशिल्प-सजावटींत दिसून येते. जॉकोमो सेरपोट्टा (१६५६-१७३२) या इटालियन शिल्पकाराने चुनेगच्चीच्या हलक्या व सौम्य रंगांचा प्रभावी वापर करून सिसिलीमधील वास्तुसजावटी केल्या (उदा., पालेर्मोच्या सान लोरेंत्सो चर्चची सजावट). एजिट क्विरिन आझाम (१६९२-१७५०) यासारख्या बरोक कलावंतांच्या कारकीर्दीत संदला-शिल्पन कलेला खराखुरा बहर आला. त्याने आपला चित्रकार बंधू कॉसमॉस डॅमियन (१६८६-१७३९) याच्या समवेत वास्तुसजावटीची अनेक कामे केली. उत्तर प्रबोधनकाळातील भपकेबाज व भरगच्च वास्तु-अलंकरण शैलीला साजेशीच संदला-शिल्पनाची कला असल्याने तिचा वापर विपुल प्रमाणात केला गेला. चुनेगच्ची माध्यम हे दगडापेक्षा स्वस्त व घडणीला सुलभ असल्याने ह्या काळात ते प्रथमत:च स्तंभ व स्तंभशीर्षे यांसाठीही वापरले गेले. उत्तर प्रबोधनकालीन वास्तूंच्या छत-सजावटीही संदला-शिल्पनाने भरगच्च व समृद्ध असत. संदलामिश्रणात सरस व रंग यांचे प्रमाण बृयाच अंशी वाढवून कारागीर त्याला खूप तकाकी व गुळगुळीतपणा आणत, त्यायोगे संगमरवराचा आभास निर्माण करता येत असे. अठराव्या शतकात वास्तूंच्या अंतर्गत सजावटींमध्ये ह्या मिश्रणद्रव्याचा वापर विपुल प्रमाणात केला गेला. हे संदलामिश्रण हुबेहूब संगमरवरासारखेच दिसत असल्याने, खऱ्या संगमरवरापेक्षा ते वेगळे ओळखू येणे कठीण असे. मात्र ते जास्त ऊबदार असल्याने फक्त स्पर्शानेच कळत असे. अठराव्या शतकातील फ्रान्समधील रोकोको शैलीमध्ये व इंग्लंडमधील ॲडम शैलीमध्ये संदला-अलंकरणाच्या कौशल्यपूर्ण उपयोजनातून निर्माण झालेले विविध प्रकार, ह्या माध्यम हाताळणीचे सामर्थ्य दर्शविणारे आहेत. दक्षिण जर्मनीतील रोकोको शैलीच्या चर्चवास्तू व प्रासाद यांवरील पांढऱ्याशुभ तसेच रंगीबेरंगी चुनेगच्चीचे उत्थित शिल्पांकन विशेष उल्लेखनीय आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत प्रबोधन कलेचे जे पुनरूज्जीवन घडून आले, त्यात चुनेगच्ची-अलंकरणावर विशेष भर दिला गेला. प्रामुख्याने इंग्लंडमधील वास्तूंच्या बाह्य दर्शनी भागांची सजावट संदला-शिल्पनाने केली गेली.
विसाव्या शतकात संदला-शिल्पनाची संकल्पना वास्तूंच्या बाह्य पृष्ठभागापुरतीच मर्यादित झाल्याने, साहजिकच अलंकरणावरही मर्यादा पडल्या. संदला-शिल्पन हे लहान आकारमानांच्या व प्राय: निवासी वास्तूं-पुरतेच वापरले जाऊ लागले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये १९२० च्या दशकात विशेषत्वाने उबदार हवामानाच्या प्रदेशात चुनेगच्चीने सजविलेले छोटे बंगले सर्वत्र दिसू लागले.
चुनेगच्चीचे इतर माध्यमांशी-उदा., विटा, दगड, लाकूड इ.-मिश्रण साधता येते. चुनेगच्ची माध्यम हे अनेक प्रकारे हाताळता येते. ते सहजपणे रंगवता येते. ओल्या चुनेगच्चीमध्ये रंगद्रव्य मिसळले जाऊ शकते. चुनेगच्चीच्या सफाईदार मुलायम थरावर जाडीभरडी वाळू वा गिट्टी (खडी) मिसळून नानाविध प्रकारचे पोत तयार करता येतात. ह्या सर्व फायदयांमुळे चुनेगच्ची कामाची लोकप्रियता अदयापही टिकून आहे.
इनामदार, श्री. दे.
भारतीय संदला-शिल्पन-परंपरा : भारतात संदला-शिल्पन कलेला निश्चितपणे केव्हा सुरूवात झाली, याविषयी तज्ज्ञांत एकमत नाही तथापि गांधार देशावर अलेक्झांडर द ग्रेटने स्वारी केल्यानंतर या भूभागात गीक क्षत्रपांची अधिसत्ता होती. त्या सुमारास चुनेगच्चीतील वा चुन्यातील मूर्ती घडविण्याची कला अलेक्झांड्रियात (ईजिप्त) प्रगत झाली होती. तेथून ती इराणमध्ये पोहोचली. गांधार देशावर इराणच्या ससेनियन समाटांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर स्वाभाविकच इ. स. दुसऱ्या शतकात ही कला गांधार देशात प्रविष्ट झाली व तिचा विकास झाला. पुढे पाचव्या शतकाच्या अखेरीस हूणांच्या आकमणांमुळे ती थंडावली.
इ. स. पू. पहिल्या शतकाच्या शेवटी या भागातील बौद्ध धर्मीयांनी वास्तू बांधल्या व त्या सुशोभित करण्यास सुरूवात केली. भौगोलिक दृष्टया सुभाजा (शिस्ट) दगड फक्त पेशावर खोरे व त्याजवळचा वायव्य सरहद्द प्रांत अशा सीमित भागातच उपलब्ध होता. म्हणून गांधार देशात एकाच वेळी पाषाण- शिल्पाबरोबर चुन्याच्या (चुनेगच्चीच्या) वा मातीच्या मूर्ती घडविण्यात येऊ लागल्या. इ. स. २५० नंतर चुन्याच्या शिल्पाला प्राधान्य मिळाले. माती-चुन्याच्या मूर्तींचे क्षेत्र तुलनात्मकदृष्ट्या विस्तृत असून ते सिंधू नदीच्या पश्चिम काठापासून थेट अमुदर्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत पसरले होते. त्यातही तक्षशिला व हड्डा या दोन ठिकाणी चुन्याच्या कामाचे विपुल अवशेष मिळाले आहेत. स्तूप व चैत्य यांच्या सजावटीसाठीच प्रामुख्याने हे शिल्प-काम करण्यात येई. सामान्यत: प्रथम एखादा सेंटीमीटर जाडीचा चुन्याचा थर भिंतीवर देत. त्यावर लाकडी किंवा विणलेल्या गवताचे सांगाडे उभे करून चुना लिंपून मूर्तीला आकार देत. चेहरे व डोकी साच्यात दाबून काढीत व अशा तृहेने तयार झालेल्या धडांवर ती बसवीत. डोक्यावर चुना थापून त्यावर केशभूषा कोरीत. वस्त्रांच्या चुण्याही असा ओला चुना थापून बनवीत असत. क्वचित चुन्याऐवजी मातीचाही वापर करीत. काही ठिकाणी ती भाजूनही काढीत असत. मातीच्या वा चुनेगच्चीच्या मूर्ती घडविणे, दगडी मूर्ती खोदण्यापेक्षा अधिक सोपे व सुलभ होते. शिवाय चुना ओला असताना हवा तो आकार मूर्तींना सहजतेने देता येई. त्यामुळे चुनेगच्चीतील मूर्तींचे चेहरे अधिक भावदर्शी उतरले आहेत. तसेच त्यांत वैविध्यही आढळते. या सर्व मूर्ती नैसर्गिक रंगांनी रंगवीत असत.
दक्षिण भारतात चुनेगच्चीतील वा चुन्यातील शिल्प मुख्यत्वे मंदिरांच्या ⇨ गोपुरां वर आढळते. वैखानस, मयमत, ईशानशिव–गुरूदेवपद्धती वगैरे प्राचीन दाक्षिणात्य शिल्पशास्त्रीय गंथांत गोपुरांचा उल्लेख असून तमिळनाडूतील कांचिपुरमच्या कैलासनाथ मंदिराचे गोपुर हे सर्वांत प्राचीन (इ. स. सहावे शतक) आहे. त्यानंतरचे त्याच प्रदेशातील महाबलिपुरमचे गोपुर होय. लाँगहर्स्टच्या मते, नंतर बांधलेली सर्व गोपुरे या नमुन्यानुसार बांधलेली आहेत फक्त पुढे या गोपुरांचा आकार वाढला आणि चुनेगच्चीतील प्रतिमांची व प्रति-मानांची संख्या वाढली. चोल राजांनी बांधलेल्या गोपुरांत चुन्याच्या माध्यमातील मूर्तींचे प्रमाण कमी असून वैविध्यही नाही परंतु अकराव्या शतकातील बृहदीश्वर (तंजावर) व बृहदीश्वर (गंगैकोण्डचोलपुरम) येथील गोपुरे भव्य असून संदला-शिल्पांकनाने अलंकृत आहेत. यानंतरची अत्यंत विकसित गोपुरे विजयानगर व त्यानंतरच्या नायक राजांची आढळतात. त्यांतील देव कोष्टांतील अनेक मूर्ती चुन्याच्या माध्यमातील आहेत. दक्षिण भारतात अवशिष्ट असलेल्या चिदंबरम्च्या पांडयकालीन (इ. स. ११००-१३५०) श्री नटराज मंदिराची गोपुरे तसेच विजयानगर आणि श्रीरंगम्ची गोपुरे, ही ह्या वास्तूच्या उत्कांतीचे विविध टप्पे दाखवितात. तिरूमल नायकाने इ. स. १६२३-५९ मध्ये बांधलेली मदुरेच्या मीनाक्षी मंदिरातील सर्वांत बाहेरची – म्हणजे सातव्या प्राकाराची-गोपुरे प्रेक्षणीय आहेत. बहुतेक गोपुरांचा तळमजला दगडी बांधणीचा असून वरचे मजले चुना व विटा यांचे असतात. यांवरील मूर्तिकामही चुनेगच्चीचे असून चित्रविचित्रपणे नटविलेले व रंगविलेले दिसते.
महाराष्ट्रातील मराठा वास्तुविशारदांनी दक्षिण हिंदुस्थानातील द्राविड मंदिरशैलीतील गोपुरांची नक्कल मराठा मंदिरांच्या शिखर बांधणीत केली. महाराष्ट्रात सासवड, नासिक, पुणे, वाई, माहुली (सातारा जिल्हा) नागपूर याठिकाणी अनेक मंदिरे आढळतात. पुणे, वाई व माहुली येथील काही मंदिरांच्या शिखरांवर देवकोष्टकांत चुनेगच्चीतील मूर्ती आढळतात. या मूर्तींत दशावतार, ऋषीमुनी, महिषासुरमर्दिनी, सरस्वती, गोपालकृष्ण, राधा- कृष्ण, रामसीता- लक्ष्मण, शेषशायी विष्णू इ. देवदेवतांच्या मूर्ती असून काही नृत्यांगना, पुत्रवल्ल्भा, शिपाई, सेनापती, सरदार यांच्या मूर्ती आहेत. क्वचित एखादे कामशिल्पही आढळते. या सर्व मूर्ती रंगविलेल्या असून काही मूर्तींच्या खाली त्या मूर्तींचे वर्णन वा नावही दिलेले आढळते. मराठाकालीन मंदिरांतील काशीविश्वेश्वर (वाई) या मंदिराच्या शिखरावरील मूर्तींची संख्या अन्य मंदिरांच्या तुलनेत अधिक असून पडझड झालेल्या मूर्तींवरून असे दिसते की, या मूर्ती जरी साच्यात बनविल्या असल्या, तरी त्यांचे चेहरे, हात व शीर नंतर लोखंडाच्या कांबीचा उपयोग करून जोडलेले असावे. मराठा काळात काही जुन्या मंदिरांवरही (भुलेश्र्वर-पुणे, घृष्णेश्र्वर-वेरूळ, पार्श्र्वनाथ-खिद्रापूर) शिखर बांधून चुन्यात मूर्ती बसविलेल्या आहेत. गांधारमधील चुनेगच्चीतील सुरेख मूर्तिकाम किंवा दक्षिण भारतातील गोपुरांवरील चुन्याचे मूर्तिकाम यांचा विचार करता, मराठाकालीन महाराष्ट्रातील चुनेगच्चीतील मूर्तिकाम निकृष्ट दर्जाचे आहे. स्त्री–पुरूषांच्या, विशेषत: स्त्रियांच्या सर्वांगावरील मर्यादित अलंकार तत्कालीन आर्थिक परिस्थितीचे दयोतक होत. पुरूष पगडी घातलेले, अंगरखा, धोती किंवा सरवार घातलेले, भरदार मिशांचे दाखविले आहेत. काही पुरूषांच्या माथ्यावर यूरोपियन पद्धतीची हॅट आहे, त्यावरून इंगजांचा प्रभाव जाणवतो. (चित्रपत्र).
देशपांडे, सु. र.
संदर्भ : 1. Hallade, M. The Gandhar style and the Evolution of Buddhist Art, London, 1968.
2. Mahalingam, T. V. The South Indian Temple Complex, Dharwar, 1970.
3. Marshal, Sir John, The Buddhist Art of Gandhar, Cambridge, 1960.
4. Mate, M. S. Maratha Architechture, Poona, 1959.
५. माटे, म. श्री. प्राचीन भारतीय कला, पुणे, १९७४.