ओशिअॅनिया : पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी पसरलेल्या विस्तृत द्वीपसमूहास पूर्वी ओशिअनिया म्हणून ओळखीत असत. आता या समृहातून इंडोनेशिया, फिलिपीन्स व तैवान (फॉर्मोसा ) यांस वगळतात. पश्चिमेस न्यू गिनी, पालाऊ व मेअरिॲना बेटे, उत्तरेस हवाई, पूर्वेस ईस्टर बेटे व दक्षिणेस न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया अशा याच्या सीमा आहेत. ओशिॲनियाच्या पूर्व भागास पॉलिनीशिया व पश्चिम भागाच्या उत्तरेकडील भागास मायक्रोनीशिया व दक्षिणेकडील भागास मेलानीशिया म्हणतात. या सीमांतील विस्तार सु. १२·१५ लक्ष चौ. किमी. भरतो. त्यात १०,००० हून अधिक लहान-मोठी बेटे आहेत व त्यांवर १९५०च्या सुमारास पंचवीस लाखांवर लोक राहत. ही बेटे ज्वालामुखी उद्रेक व प्रवाळक्रिया यांमुळे बनलेली आहेत. यांवरील आदिवासी तेथे कसे व कोठून आले यांबद्दल शास्त्रज्ञांत एकमत नाही. परंतु त्यांतील काही पूर्व आशियातून व दक्षिण भारतातून आले असावेत याबद्दल फारसे दुमत नाही. वारा वा सागरप्रवाह यांच्या ओढीने आशिया खंडातील नाविक त्यावर पोहोचले असावेत, असा तर्क आहे. नव्या जगास यांची माहिती होण्यास १५२१ मध्ये सुरुवात झाली. त्यावर्षी फर्डिनंड मॅगेलन हा मेअरिॲना बेटावर पोहोचला. तथापि या द्वीपसमूहाची बऱ्यापैकी माहिती यूरोपीय नाविकांस पन्नास वर्षांनी , १५६८ साली आल्व्हारोदे मेंदान्या याने सॉलोमन बेटांची पहाणी केली तेव्हा झाली. या बेटांवर सोने आहे अशा समजुतीने तो पुन्हा १५९५ मध्ये परतला पण सॉलोमनऐवजी मार्केझास व सांताक्रूझ बेटांवर लागला. त्यानंतर दोन शतके या समूहातील निरनिराळी बेटे यूरोपीय नाविकांना ज्ञात होत होती व त्यांस तिकडील नावे दिली जात होती. उदा., ताहिती – १६०६ टोंगा (फ्रेंडली ) – १६१६ फिजी – १६४३. मार्केझास व सांताक्रूझ मात्र १५९५ नतंर स्मृतिलुप्त झाली. ती पुन्हा १७६७ मध्ये सापडली. या समूहातील बेटांचे सौंदर्य, विविध वनस्पती व खनिजे यांच्या लोभाने फ्रेंच, डच व ब्रिटिश यांच्या स्पर्धा सुरू होऊन निरनिराळ्या बेटांवर त्यांनी हक्क सांगितले आणि एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत बहुतेक बेटांवर तुरळक यूरोपीय वस्ती झाली. त्यांनी येथील लोकांस गुलामांच्या बाजारात विकण्यासही कमी केले नाही. मिशनऱ्यांनी त्यांना ख्रिस्ती केले. १८५० नंतर मात्र या बेटांवर व्यापार, मळे व शासन सुरू होऊन अराजकास आळा बसला आणि नारळ, कॉफी व कोको यांच्या लागवडीने सुबत्ताही आली. हवाई दळणवळणामुळे यांचे महत्त्व वाढले आहे. दुसऱ्या महायुद्धातील काही निर्णायक नौकासंग्राम या भागातच झाले. जगातील अत्यंत विलोभनीय निसर्गरम्य बेटे या समूहात असल्याने पर्यटकांना त्यांचे नेहमीच आकर्षण वाटते.
शहाणे, मो. ज्ञा.
“