हेक्झॅकोरॅलिया : सीलेंटेरेटा (आंतरगुही) संघाच्या ॲक्टि-नोझोआ वर्गातील एक उपवर्ग. हा उपवर्ग ‘झोअँथेरिया’ या नावानेही ओळखला जातो. या उपवर्गात समुद्रपुष्पे, अश्मप्रवाळ, काळे पोवळेव पॅकिसेरिअँथस यांसारख्या अनेक प्राण्यांचा समावेश होतो. या उप-वर्गातील बहुतेक प्राणी एकएकटे वा समूहाने राहणारे असून त्यांनाशाखा नसतात. या प्राण्यांमध्ये आठपेक्षा जास्त संस्पर्शिका, उभे अरीय पडदे (देहभित्तीपासून निघून आंत्रात गेलेले उभे स्नायुमय पडदे) असतात. आंत्राच्या (आतड्याच्या) भित्तीमध्ये दोन खोल खाचा असून प्रत्येकीला ग्रसिका-खाच (घसा व जठर यांच्यामधील भागावर असणारी खाच, सायफोनोग्लिफ) म्हणतात. कंकाल तंत्र हे कोणत्याही स्वरूपात आढळते. या उपवर्गातील प्राण्यांत खूपच विविधता आढळते. या उपवर्गामध्येसु. ५,००० जातींचा समावेश होतो. त्यांची विभागणी पुढील सहागणांमध्ये केली असून त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

 

(१) ॲक्टिनिएरिया : (१) या गणातील प्राणी साधे एकएकटे राहणारे असून काही प्राणी मोठ्या आकाराचे, भडक रंगाचे, देठ नसणारे, परंतु खडकांना चिकटलेले नसतात. (२) या प्राण्यांमध्ये कंकाल तंत्रनसते. (३) शरीर स्नायूपासून बनलेले असून अपमुख बाजू पसरट व चकतीसारखी काही प्राण्यांमध्ये असते. (४) संस्पर्शिका व उभे अरीय पडदे या प्राण्यांमध्ये अनेक असून ते नेहमी सहाच्या पटीत असतात. (५) या प्राण्यात एक किंवा दोन सायफोनोग्लिफ असतात. उदा., मेट्रिडियम, ॲक्टिना व अर्टिसिना, ॲडॅम्सिया. 

 

(२) झोअँथीडिया : (१) या गणातील प्राणी एकएकटे किंवा समूहाने राहणारे आहेत. बहुतेक प्राणी दुसऱ्या लहान प्राण्यांवर जगणारे असून या प्राण्यांमध्ये तळाशी (खालच्या बाजूस) त्याचे एकत्रीकरण झालेले असते. (२) कंकाल तंत्र व चकतीसारखी बाजू नसते. देह भित्तीमध्ये कठीण भाग असतात. (३) या प्राण्यांमध्ये अधर बाजूस एक सायफोनोग्लिफ असते. (४) या प्राण्यांमध्ये अरीय पडद्याच्या जोड्या असतात. त्यांपैकी एक पूर्ण व दुसरी अपूर्ण असते. उदा., झोअँथस, एपिझोअँथस व पॉलिथोआ. 

 

(३) कोरॅलिमॉर्फॅरिया : (१) या गणातील प्राणी एकएकटे वा समूहाने राहणारे असून पॉलिप (सीलेंटरेट प्राण्यांच्या वसाहतीतील एकेक जीव) ते खऱ्या प्रवालासारखे दिसतात, परंतु त्यामध्ये कंकाल तंत्रनसते. (२) या प्राण्यांमध्ये संस्पर्शिकेची रचना अरीय पद्धतीची असते. (३) अरीय पडदे अथवा आंत्रयोजनीवर (देहभित्तीपासून निघून आंत्रात गेलेले स्नायूमय पडदे) कशाभिकायुक्त पट्टे नसतात. (४) या प्राण्यांमध्ये सायफोनोग्लिफ असून आधार स्नायू नसतात. (५) संस्पर्शिकेवरील मुकुलनामुळे या प्राण्यांत अनेक पॉलिप असल्यासारखी पॉलिस्टोमोडियल अवस्था निर्माण होते. उदा., कॉर्निटिस. 

 

(४) सेरिअँथेरिया : (१) या गणातील प्राणी लांबट व एकएकटे वाळूत राहणारे आहेत. या प्राण्यांमध्ये चकतीसारखी बाजू व कंकाल तंत्रनसते. (२) संस्पर्शिका साध्या व असंख्य असून प्राण्याच्या मोकळ्या बाजूंना दोन समूहांत असतात. (३) या प्राण्यांमध्ये एकच सायफोनोग्लिफ असते. (४) या प्राण्यांमध्ये अरीय पडदे अनेक असून ते पूर्ण असतात. उदा., सेरिअँथस व पॅकिसेरिअँथस. 

 

(५) अँटिपॅथेरिया : (१) वनस्पतीसारख्या शाखा असणारे व समूहाने राहणारे उभट प्राणी आहेत. (२) संस्पर्शिका व अरीय पडद्यांची संख्या इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी असून ते नेहमी ६, १०, १२ अशा सम संख्येत असतात. (३) या प्राण्यांमध्ये दोन सायफोनोग्लिफ असतात.उदा., अँटिपॅथीस. 

 

(६) मॅड्रेपोरॅरिया : (स्क्लेरॅक्टिनिया) : (१) या प्राण्यांमध्ये जलद अलैंगिक प्रजनन होत असल्याने ते नेहमी समूहाने आढळतात.(२) कंकाल तंत्र कठीण कॅल्शियमाच्या प्रवाळापासून (कोरल) बनलेले असते. (३) बशीसारख्या बाह्य कवचामध्ये पॉलिप हे लहान प्राणीराहत असतात. (४) या प्राण्यांमध्ये सायफोनोग्लिफ नसते व स्नायूदुर्बल असतात. उदा., मॅड्रेपोर, फ्लॅबेलम, अस्ट्रॉजिया व अस्ट्रिया.पहा : ॲक्टिनोझोआ पोवळे सीलेंटेरेटा. 

पाटील, चंद्रकांत प.