ओसाका : जपानचे टोकिओ खालोखाल मोठे शहर. लोकसंख्या २९,८०,४८७ (१९७०). हे दक्षिण होन्शू बेटातील ओसाका प्रांताच्या राजधानीचे शहर असून ओसाका उपसागरावर, योडो व तिच्या उपनद्या यांच्या त्रिभुज प्रदेशभर पसरलेले आहे. लहानमोठ्या नद्याकालव्यांचे जाळेच शहरभर पसरलेले असल्याने दळणवळण व वाहतुकीच्या सोयींसाठी हजारावर पूल बांधून शहराचे निरनिराळे भाग जोडावे लागले आहेत. व्यापार-उद्योगधंद्याच्या गजबजाटामुळे ओसाकाला जपानचे शिकागो आणि कापड-उद्योगामुळे मँचेस्टर म्हणतात. ओसाकाचे बंदर मानवनिर्मित असून सतत गाळ काढून त्याची खोली टिकवावी लागते. त्यात ८–१० हजार टनी जहाजे सामावू शकतात. पश्चिमेस ३० किमी. वरील कोबे बंदरामुळे ओसाकावरील ताण हलका झाला आहे. ओसाका ते कोबेच्या दरम्यान मोठमोठ्या उपनगरांचे जाळेच विस्तारले असून ह्या सर्व औद्योगिक नगरसमूहाला हानशिन किंवा किंकी म्हणतात. ओसाकाचा इटामी विमानतळ, सरकारी मालकीचा टोकैडो लोहमार्ग, खाजगी मालकीचे पाच अन्य लोहमार्ग व कोबे ओसाकादी बंदरांतील अद्ययावत सोयी इत्यादींमुळे जपानच्या सर्व भागांशी दळणवळण तसेच जागतिक आयात-निर्यात व पर्यटन इत्यादींस साहाय्य होते.

ओसाका इंपीरिअल व कनसाई विद्यापीठांसारख्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था अनेक सुंदर उद्याने, उपवने सहाव्या शतकातील शिटेनोजी बुद्धमंदिर दहाव्या शतकातील टेमांगू हे शिंतो धर्माचे देऊळ चौथ्या शतकापासूनचे राजवाडे इत्यादींवरून ओसाकाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व दिसून येते. नानिवा हे शहराचे  प्राचीन नाव. १५८२ मध्ये हिडेयोशी टोयोटोमी ह्या प्रबळ सरदाराने येथील प्रसिद्ध दगडी किल्ला बांधल्यापासून  व्यापारउदीमाची बेसुमार वाढ होऊन जपानच्या प्रमुख शहरात याची गणना होऊ लागली.

जपानच्या कापड-उद्योगातील ओसाकाचे स्थान आजही श्रेष्ठ असले तरी अवजड उद्योगांचीही येथे वाढ झाली आहे. पोलाद, रसायने, औषधे, यंत्रे, सिमेंट, विजेची उपकरणे, जहाजे हे येथील काही महत्त्वाचे उद्योग होत. व्यापारी बँका, पेढ्या, विमा कंपन्यांच्या मोठमोठ्या कचेऱ्या यांनी ओसाका गजबजलेले असून, घाऊक व्यापाराची पेठवार विभागणी हे येथील वैशिष्ट्य चटकन नजरेत भरते. पश्चिम जपानची ही आर्थिक व व्यापारी राजधानी समजली जाते. दुसऱ्या महायुद्धातील बाँबहल्ल्यात शहराचा बराच भाग उद्‍ध्वस्त झाला. टोकिओ-योकोहामा विभागातील उद्योगधंद्यांना उत्तेजन देण्याच्या शासकीय निर्णयासारख्या अनेक कारणांनी येथील विकासाचा वेग काहीसा मंदावला, तरी त्यामुळे ओसाकाच्या व्यापारी व औद्योगिक महत्त्वास फारशी झळ लागलेली नाही म्हणूनच १९७० चे एक्स्पो प्रदर्शन याच शहराच्या परिसरात भरले होते. या प्रदर्शनास साडेसहा कोटी लोकांनी भेट दिली.

ओक, द. ह.